Tuesday, 29 December 2015

परवा.. माझ्या एका, गोव्यानिश किरीस्ताव मित्राच्या मुलीचं लग्नं होतं. 
ती पोर, आमच्या समोरच लहानाची मोठी झालीय. अगीद लहानपणापासून, आत्ता तिच्या लग्नापर्यंत आम्ही तिला पाहात आलोय. तिच्या वडिलांचे आणि माझे अगदी घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे, तिच्या लग्नाला आम्हाला सहकुटुंब जाणं फारच गरजेचं होतं.

मंगलविधी चर्चमध्ये पार पडल्या नंतर.. एका, खुल्या कार्यालयात त्यांनी रिसेप्शनचा कार्यक्रम आयोजित केला होता. रात्री ठीक आठ वाजता कार्यक्रमाला सुरवात झाली. 
आमची मुलगी.. दिसायला खूपच देखणी, आणि उंचीपुरी आहे. त्यात, तिने लग्नात परिधान केलेल्या जाळीच्या आणि झुपकेदार पांढऱ्या रंगाच्या झग्यामध्ये. पोरगी, अगदी अप्सराच दिसत होती. नवरा मुलगा सुद्धा, अगदी तिला साजेसा असाच मिळाला होता.


कार्यक्रमाला सुरवात झाली... सुरवातीला, एक मोठ्ठासा केक कापण्यात आला. डीजेवर गोव्यानिश गाणी वाजू लागली. तशी, डायसवर उपस्थित असणाऱ्या सर्व आबालवृद्ध लोकांची पावलं थिरकू लागली. नवरा बायकोच्या जोड्या, एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून जागेवरच डोलू लागली. बराच वेळ हा धमाल कार्यक्रम चालू होता. थोड्या वेळाने, इंग्रजी गाणी वाजू लागली. तरुणाई बरोबर, इतर लोक सुद्धा नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटत होते. नंतर कसलीशी एक प्रार्थना झाली. सगळा माहोल, अगदी इंग्रजी आणि 'विदेशी' झाला होता.

त्यानंतर, जेवणाला सुरवात झाली.. मांसाहारा बरोबरच, शाकाहारी जेवण सुद्धा मस्त होतं. सर्व पाहुणे मंडळींनी, जेवणाचा चांगलाच 'समाचार' घेतला. 
एकीकडे जेवणं चालू होती. तर, दुसरीकडे नाच गाण्याचा कार्यक्रम चालूच होता. त्यानंतर, कसलासा एक विधी होता. 
नव दांपत्याला, डायसच्या मधोमध उभं केलं गेलं होतं. आणि, त्यांच्या बाजूने इतर पाहुणे मंडळीनी एक मोठंसं रिंगण केलं होतं. रंगीबेरंगी रिबन, इकडून तिकडे देण्यात आल्या होत्या. प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये, रिबनचं एक-एक टोक होतं. डीजेवर.. एक हळुवार इंग्रजी प्रेमगीत सुरु झालं. त्याचबरोबर, नव दांपत्य एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून आणि दुसरा हात हवेत धरून गालाला गाल भिडवून जागेवर गोल फिरत नृत्य करू लागले. आणि बाकीचे लोकं, त्यांच्या बाजूने रिबनची टोकं धरून गोलसर फिरत होते. शेवटी काहीवेळाने, त्या रिबनच्या गुतावामध्ये ते नव दांपत्य घट्ट अडकलं गेलं. नंतर, त्यांची त्यातून सुटका केली गेली. आणि सर्वांसमक्ष, त्या नव दाम्पत्यांनी आलिंगन देत एकमेकांच्या ओठाला ओठ भिडवले. त्या दोघांचं, एक दीर्घ चुंबन त्या ठिकाणी झालं. आणि, ते दोघेही आता एकमेकांचे आयुष्य भराचे जोडीदार झाले आहेत. असं फादर महाशयांनी घोषित केलं.

इथपर्यंतचा सगळा कार्यक्रम, आणि तो माहोल पाहात असताना. मी स्वतः, विदेशात आहे कि काय..? मला तर अगदी असाच भास होत होता. 
रात्रीचे बारा वाजत आले होते. मुलीच्या, पाठवणीचा कार्यक्रम सुरु झाला. 
आणि, पोटचा गोळा आपल्या पासून दूर जाणार ह्या भावनेने आई बापांनी त्यांच्या अश्रूंना मार्ग मोकळा करून दिला. 
हा प्रसंग पाहून, मुलीने सुद्धा आपल्या अश्रूंचा बांध फोडला..वातावरणात, एकदम गंभीरपणा आला होता. आता पर्यंत आम्ही सगळी वर्हाडी मंडळी विदेशातील माहोलमध्ये होतो. 
आणि, काहीच क्षणातच..  हि रडारडी पाहून, आम्ही पुन्हा आमच्या मायभूमीत परतलो..

शेवटी काय आहे..
लग्न, कोणत्याही समाजाचं असुध्यात, 
शेवटची रसम, हि 'भारतीय' रितीरिवाजा प्रमाणेच पूर्ण होते..!

Sunday, 27 December 2015



मध्यंतरी.. नाशिकचा कुंभमेळा पाहायला जाण्याचा मला योग आला होतो.
ज्यादिवशी, आम्ही पुण्याहून निघालो होतो, त्याच दिवशी, नेमका नाशिक भागातील बैलपोळा होता. नाशिकजवळ असणाऱ्या, घोटी नावाच्या गावी एका मित्राच्या घरी आमचा मुक्काम ठरला होता. दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने, नेमकी सायंकाळी रिपरिप सुरु केली. मित्राच्या घरी चहापाणी उरकलं. आणि, गावामधील बैलपोळा उत्सव पाहायला आम्ही मित्रगण निघालो..
गावातील मारुतीच्या मंदिराबाहेर, बऱ्याच आबालवृद्ध लोकांची गर्दी जमा झाली होती. मारुती मंदिराबाहेर असणाऱ्या, रस्ता वजा मैदानावर गावातील प्रत्येक शेतकरी आपआपल्या बैलाला सजवून धजवून आणत होता. रंगीबेरंगी झुली, पाठी पोटावर विविध रंगांची नक्षीकामं, अणकुचीदार शिंगांना काचेने तासून चकचकीत लालेलाल रंग मढवलेले पाहायला मिळत होते. वर्षभर शेतात राबणाऱ्या राजाचा आज उत्सव दिवस होता. सारा गाव आनंदात नाहून निघाला होता.
बैलाला घेऊन, मंदिराला एक प्रदक्षिणा घालून झाल्या नंतर. त्या बैलाने, आपले पुढील दोन्ही पाय गुढग्यात वाकवून आणि ते जमिनीला टेकवून मारुतीला दंडवत घालायचा. असा, त्या गावाचा प्रघात होता. बरेच बैल, त्याच्या मालकाच्या आज्ञेप्रमाणे म्हणा किंवा त्यांना त्याची आपसूकच जान असावी. त्यामुळे, ते त्या मंदिरा समोर नतमस्तक होत होते.
पण, काही बैल खूपच आडदांड होते. ते काही केल्या ऐकत नव्हते. त्यात, त्यांची तर काहीच चूक नव्हती. पण, मालकाच्या खोट्या प्रतिष्ठेपाई त्यांना हे सर्व करावं लागत होतं.

काही बैलं, बाकी बिलकुल ऐकतच नव्हते. त्यावेळी, त्यांचे मालक त्या बैलाचा पुढील एक पाय हाताने मुडपून, त्याला अक्षरशः खाली जमिनीवर लोळवत होते. एवढा हौसेने सजवलेला बैल, एका मिनिटात मातकट चिखलामध्ये माखून जात होता. त्याचा डामडौल, जागेवरच खलास होत होता.
मालकाच्या ह्या अतिशयोक्ती पायी, काही बैल जोरात उधळून बघ्यांच्या गर्दीमध्ये घुसत होते. त्यावर, बघ्यांची एकच धावपळ आणि तारांबळ उडत होती. पावसाची रिपरिप चालूच होती. आणि, तितक्यात एक दहा बारा वर्षाचा मुलगा त्याचा भल्या दांडग्या बैलाला घेऊन मंदिरापाशी आला. आणि काय आश्चर्य, त्या मुलाच्या एका इशार्यावर त्या बैलाने आपले गुडघे जमिनीवर टेकवले. बघ्यांच्या गर्दीमधून, टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळी लोकं, त्या चिमुरड्याचं कौतुक करत होते.
त्याच्या पाठोपाठच, एक जान जवान गडी त्याच्या उमद्या बैलाला घेऊन तेथे आला. थोडासा झिंगलेल्या अवस्थेत असणारा तो गडी, त्याच्या बैलाला मंदिरासमोर घेऊन आला. पण, त्याचा बैल काही केल्या नतमस्तक होईनाच. तसा, याने जोरदार प्रयत्न सुरु केला. कि तो बैल, त्याचे सगळे प्रयत्न हाणून पाडत होता. आणि, चौफेर उधळत होता. याच्या प्रत्येक असफलते पुढे, गाववाले लोकं जोरदारपणे त्याचा हुर्यो करत होते. त्यामुळे, चवताळून तो अजून जोरदार प्रयत्न करत होता. जवळ-जवळ पंधरा मिनिटे तो त्याच्या बैलाशी झटत होता. तो तरुण, आणि त्याचा बैल दोघेही पावसात चिंब भिजले होते. फुकाच्या मोठेपणापाई, त्याने त्या बैलाच्या जीवनातला तो एकमेव आनंदी दिवस वाया घालवला होता. शेवटी, कसाबसा प्रयत्न करून त्याने त्या बैलाला खाली पाडलाच. तेंव्हा कुठे त्याला बरं वाटलं. मी तर घाबरून होतो, कि.. निराशेपोटी तो व्यक्ती त्याच्या बैलाला मारेल कि काय.? पण नशीब, तसं काही घडलं नाही.
शेवटी, मला सुद्धा ह्या कार्यक्रमाचा वीट आला. बैलांचे हाल पाहवत नव्हते. तुमच्या खोट्या प्रतिष्ठेपाई त्या मुक्या जनावराला वेठीस का धरायचं..?

हा, न सुटलेला प्रश्न घेऊन मी मित्राच्या घरी दाखल झालो. जेवणं तयार होती. तिकडच्या पद्धती प्रमाणे, ताटात गरमागरम गुळवणी टाकून. त्यावर, खरपूस पुरणाची पोळी वाढली होती. एका पेल्यामध्ये, आमटी होती. तर मोठ्या डिशमध्ये, वाळवणात बनवलेल्या कुरडया आणि पापड्या आणि भजी होते. भूक तर खूप लागली होती. पण वारंवार, त्या बैलांचे निरागस चेहेरे माझ्या नजरेसमोर येत होते. कशीबशी, एक पोळी मी घशाखाली घातली. त्यात सुद्धा, मला म्हणावा असा गोडवा वाटत नव्हता..
बैलाच्या रवंत करण्याचं चित्र, माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं. आणि, उद्यापासून चाबकाचे फटके खात नांगरांची जुंपण सुद्धा मला त्याच जेवणाच्या ताटावर दिसत होती.. 


Saturday, 26 December 2015

इतर दिवशी... 
मी न चुकता कपड्यावर सेंटची वारेमाप उधळण करत असतो.
परंतु, ज्यावेळी मला.. एखाद्या भरगच्च समारंभात जायचं असेल.
त्यावेळी... मी कपड्यावर, सेंट किवा डियो मारायचं हमखास टाळतोच,

कारण, त्या भल्या मोठ्या गर्दीमध्ये,..

बरीच मंडळी, विविध प्रकारचे सेंट आणि डिओ मारून आलेले असतात. त्यामुळे, संपूर्ण वातावरण अगदी सुगंधित झालेलं असतं. अशावेळी, 

" आपण कपड्यावर सेंट मारला आहे कि नाही..? "

ते... कोणाच्या लक्षात सुद्धा येत नाही...!
आणि... मूळ मुद्दा म्हणजे,
आपल्या कपड्यावर मारलेल्या सेंट किंवा डिओचा, आपल्या स्वतःला कधीच सुवास येत नाही.
अशावेळी...

त्या भरगच्च गर्दिमध्ये, बर्याच दर्दी मंडळींच्या इतर नवनवीन उंची अत्तरांचा सुगंध. मला, मनभरुन आणि नाकभरून अनुभवता येतो...

Friday, 25 December 2015

फसवा..

किती चटके सोसावे..? 
त्याला सुद्धा, मर्यादा असतात रे..
हवेतला गारवा सुद्धा, आताशा रुसलाय माझ्यावर.
पाउस सुद्धा, येतो-येतो म्हणतो.
आणि, हळूच हुलकावणी देवून जातो....
दे गड्या,
मी, आत्ता तरी तुला काहीच बोलणार नाही.
पण, पुढील चार महिने....
तू मला, काहीच 'बोलू' देवू नकोस.
भ्रमनिराशा फार वाईट रे...
सांग.... फसवणार तर नाहीस ना मला.. ?
दे, वचन दे....

येरे येरे पावसा तुला देईन पैसा,
पैसा झाला खोटा पाउस आला मोठा.
माय....

होय गं माता माउली,
तुझीच आहे साउली.


बोट धरुनी वाट दाविली,
होते एक छोटी बाहुली.


तव लोचनी हि अवनी पाहिली
वंदन तुझ्या कमल पावूली.


आई होऊ कसा गं उतराई,
हा जन्मच तुझ्या चरणी वाही.
एक गाव असावाच..
***********************

शहरातल्या डांबरी पायवाटा तुडवून थकल्याने,
मातीच्या पायवाटेच्या हळुवार स्पर्शासाठी.
एक गाव असावाच....

कार मधून दिसणाऱ्या देवाचं रोज ओघवतं दर्शन घ्यावं लागतं,
मंदिरात भक्तिभावाने टाळ कुटत बसण्यासाठी.
एक गाव असावाच....

अंगावरती उडणारे अत्तारचे फवारे तर नित्याचेच,
अंगणातल्या सड्याच्या मंद,धुंद सुवासासाठी.
एक गाव असावाच...

पोहे, उपमा, इडली, शिरा.. हि तर नित्याचीच न्याहारी,
शिळी भाकर आणि चटणी कांदा खाण्यासाठी.
एक गाव असावाच....

रोज-रोज त्याच टीव्ही मालिका पाहून जीव कंटाळून जातो,
जात्यावरच्या सुरेल ओव्या ऐकण्यासाठी.
एक गाव असावाच....

एसी कार मधून फिरायला सोकावलेल्या शरीराला,
बैलगाडीचे खाच खळगे उमजण्यासाठी.
एक गाव असावाच....

चिकन तंदुरी, तंदूर रोटी रोज तेच खाऊन मन अगदी विटतं,
गावरान कोंबडीचा झणझणीत रस्सा भूरकण्यासाठी.
एक गाव असावाच....

उंची मद्य पिऊन नशा लपवत हाय बाय करीत जपून बोलावं लागतं.
हातभट्टीची बाटली ढोसून मनसोक्त बरळण्यासाठी,
एक गाव असावाच....

सुटा बुटातील किचकट पेहेरावाचा खूपच वैताग येतो,
मोकळी, ढाकळी लुंगी लेऊन निवांत फिरण्यासाठी.
एक गाव असावाच....

मऊशार गादीवर तर रोजच झोपत असतो,
शेणाने सारवलेल्या ओसरीवर निवांत पहुडण्यासाठी.
एक गाव असावाच....

~ पंडित पॉटर ~
ओठ विलगले, शब्द थिरकले,
चित्कारली ती जीव्हनी.

ती तर, आक्रंदत होती.
मज, भासली ती गाणी.

Tuesday, 22 December 2015

सुरवातीच्या काळात... 

पुणे महानगर पालिकेमध्ये, मी गार्बेज ट्रकवर सुद्धा काम केलं आहे. त्या गाडीला आता सर्वत्र, 'घंटा गाडी' असं गोंडस नाव दिलं गेलं आहे. त्यावेळची, एक खास गुलाबी घटना आठवतेय..

त्या घंटा गाडीवर काम करायचं म्हणजे. घरगुती.. ओला आणि सुका कचरा जमा करण्यासाठी, तो ट्रक घेऊन मला नेमून दिलेल्या भागातील प्रत्येक गल्लीतील सोसायटी मध्ये जावं लागायचं. प्रत्येक सोसायटी मधील कचरा, वर्गवारी करून आमचे सेवक आमच्या गाडीमध्ये जमा करत असत. या कामाकरिता नाही म्हंटलं तरी, प्रत्येक सोसायटी मध्ये आमचे वीस ते तीस मिनिटं खर्ची पडायचे. सकाळी, सहा वाजता सुरु झालेलं आमचं काम. दुपारी, दीड-दोन वाजता संपायचं. मी आजवर, कोणत्याच कामाला कधी कमी लेखलं नाही. आणि, समजलं सुद्धा नाही. त्यामुळे, त्या कचरा गाडीवरील कामात सुद्धा मला एक वेगळाच आनंदच मिळत होता.

तर..पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठ भागामध्ये. माझी गाडी, आणि आमचा कर्मचारी वर्ग कचरा जमा करत असायचा. त्या विद्यापीठ परीसरामधील एका ठराविक भागात, एका बंगल्याच्या व आजूबाजूच्या सोसायट्यांचा कचरा जमा करण्यासाठी आमच्या सेवकांना जावं लागायचं. त्यामुळे, मला बराच फावला वेळ मिळायचा. त्या फावल्या वेळात, त्या कचरा गाडीवर मी बऱ्याच कादंबर्या वाचून हातावेगळ्या केल्या आहेत. ना. स. इनामदार यांची "शहंशाह" हि जगप्रसिद्ध कादंबरी सुद्धा, मी त्याच कचरा गाडीत बसून वाचली आहे.

तर.. त्या ठराविक ठिकाणच्या एकुलत्या एक सुंदरशा बंगल्यातून, घरातील कचरा घेऊन माझ्या गाडीत टाकण्यासाठी एक दिलखेचक मुलगी यायची. बहुतेक, ती मुलगी त्या बंगल्यात केअर टेकर म्हणून कामाला होती. तिला, मुलगी याकरिता म्हणायचं. कारण, तिचं वय बिलकुल दिसून येत नव्हतं. काळी सावळी, शेलाट्या बांध्याची ती मुलगी, दिसायला अगदी नक्षत्रावाणी होती. तिझं ते गालातल्या गालात हसणं, ठुमकत चालणं भल्याभल्यांना घायाळ करण्यासारखं होतं. गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी घालणारी ती एक तरुण विवाहिता होती. बहुतेक, तिच्या नवऱ्याने तिला 'टाकलं' आहे. असं सुद्धा माझ्या ऐकिवात होतं..
माझी घंटा गाडी, त्या बंगल्यापाशी थांबली. कि, माझं लक्ष सुद्धा आपसूकच त्या बंगल्याच्या दरवाजाकडे जायचं. काय करणार, " शेवटी मी सुद्धा माणूस आहे. "
नेत्रसुख घ्यायला कोणाची मनाई आहे. नाही का,

बंगल्याचा दरवाजा उघडल्या बरोबर, नकळत थोडीशी मान वाकडी करून, माझ्याकडे पाहत  " चलावो ना नैनोसे बाण रे " ती एक सुंदरसं हसरं आणि मादक कटाक्ष माझ्या दिशेने फेकायची. आणि, ठुमकत-ठुमकत माझ्या गाडीपर्यंत यायची. तिने परिधान केलेली, साधीशी साडी चोळी. आणि, त्यावर चालताना तिच्या पायातल्या पैंजणाचा छम-छम आवाज मला खूपच सुरेख वाटायचा. गाडीमध्ये कचरा टाकून, ती जेंव्हा माघारी फिरायची. तेंव्हा, बंगल्याचा दरवाजा बंद करताना पुन्हा एकदा ती माझा 'कलिजा' खलास करायची. तुम्हाला म्हणून सांगतो, 

" सौंदर्य हे कधीच गरीब किंवा श्रीमंत नसतं. "

हा डोळे हुलकावणीचा प्रकार, जवळ-जवळ पाच सहा महिने चालू होता. पण, मी फक्त एक गंमत म्हणून त्याकडे पाहत होतो. असल्या बाबतीत, मी बराच 'मागास' माणूस आहे. पण, माझ्या गाडीवरील सेवकांच्या डोक्यात हि गोष्ट लगेच आली होती. कि, ती मुलगी माझ्यावर खूप फिदा आहे. हा सर्व प्रकार पाहता. त्यातील एक कर्मचारी तर मला म्हणाला... 
काय राव, तुझ्यासमोर.. 
"जेवणाचं" भरलेलं ताट वाढून ठेवलंय. आणि तू, असा आहेस. कि, एक "घास" सुद्धा खात नाहीयेस..! 
मलाही ते सगळं कळत होतं. पण, शेवटी मी सुद्धा काही वेडा माणूस नाहीये. काही गोष्टी माझ्या तत्वात बसत नाहीत. त्या, मी हमखास टाळतोच. काय आहे, " लफडं करणं सोपं असतं. पण, ते निस्तरनं महाकठीण काम. " 
ते, प्रत्येकाला साध्य होऊ शकतंच असं नाही. आणि, मला तर नाहीच नाही..

असे बरेच दिवस गेले. मी तिला पाहायचो, ती सुद्धा मला पाहून हसायची. हा रोजचा खेळ चालूच होता. पण आम्हा दोघांपैकी कोणीच 'पुढचं' पाऊन उचललं नाही. 

एके दिवशी, सकाळी दहाच्या सुमारास माझी गाडी त्या भागात निघाली होती. आणि वाटेमध्ये, काहीतरी गडबड गोंधळ चालू होता. म्हणून, मी माझी गाडी जरा बाजूला घेतली. पाहतो तर काय...तिथे, त्याच मुलीचा एका मुलाबरोबर मोठ्ठा वादंग सुरु होता. कुतूहल म्हणून, आम्ही त्याच्या बाजूलाच आमची गाडी उभी केली. मी, त्या भांडणाची पार्श्वभूमी समजावून घेत होतो. 

तर, तिच्यासोबत भांडत असणाऱ्या त्या मुलाने तिच्याबरोबर आपले अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. आता.. खरं कि खोटं, ते त्या परमेश्वरालाच माहिती. पण ती मुलगी, धाय मोकलून रडत होती. आणि, तिच्या ओटी पोटावर 'हलक्या' हाताने दगडाचे प्रहार करत म्हणत होती.. 
हे पोर, मी आता पोटातच मारते. आणि, तुला फासावर लटकावते का नाय ते बघ. तो मुलगा, तिच्या खूप गयावया करत होता. तिच्या पाया पडत होता. अगं... माझं सुद्धा लग्न झालंय. मला सुद्धा एक मुलगा आहे. आता तुला कुठे नेवून ठेवू..? माफ कर गं मला. माझ्या बायकोला समजलं तर घरात खूप वाद होतील गं. ऐक ना माझं, असं येड्यावानी करू नकोस. आणि, बरच काहीबाही बोलत होता..

समोर घडत असलेलं हे सगळं दृश्य पाहत असताना, अचानक मी शून्यात गेलो. आणि, त्या मुलाच्या ठिकाणी मी स्वतःला पाहू लागलो. 

" सरकारी नोकरीच्या आईला घोडा लागलाय, दोन बायका फजिती ऐका असा तमाशा सुरु झालाय. मी रानोमाळ भटकतोय..आणि काय-काय नको ते विचार माझ्या मन पटलावर उमटू लागले. " 

क्षणार्धात, माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी जेंव्हा शुद्धीवर आलो, तेंव्हा पाहतो तर, तो 'घास' खाऊ घालण्याचं आमंत्रण देणारा माझा मित्र. माझ्या पायावर डोकं ठेवून उभा होता. त्याला त्या अवस्थेत मी पाहिलं. आणि, मी झटकन माझा पाय झटकला. आणि एक्सीलिटर कडे माझा पाय घेत त्याला म्हणालो, अरे काय करतोयेस हे..? 

तर म्हणाला... तू खरा गुरु आहेस बाबा. तो एक 'घास' तुला किती महागात पडला असता. हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय राव. असं म्हणून तो गाडीत येऊन बसला. आणि, त्या विषयाला फाटा देत आम्ही आमच्या कामाला निघून गेलो. 

पण, तुम्ही काहीही म्हणा, 

" ती मुलगी म्हणजे, चिखलात उगवलेलं कमळाचं एक शापित फुलच होतं.. " 

Monday, 21 December 2015

काल सकाळी, सिग्नलवर एक गम्मतच घडली..

लाल दिवा लागला होता, सगळे वाहन चालक दिवा हिरवा होण्याची वाट पाहत ताटकळत उभे होते. पण, तो सिग्नल तब्बल एक्यान्नव सेकंदाचा आहे. हे, माझ्या रोजच्या पाहण्यातलं. त्यामुळे, मी माझी बाईक बंद करून निवांत उभा होतो. तितक्यात, माझं लक्ष.. माझ्या बाजूला, थोडं पुढील बाजूस असणाऱ्या एका बाईक वरील मुलाकडे गेलं. त्याच्या मागील सीटवर, बहुतेक त्याची प्रेयसी बसली असावी. तो मुलगा, बाईकच्या आरशात पाहून आपल्या 'विरळ' झालेल्या केसांना हळुवार हाताने कुरवाळत आणि ठीकठाक बसवत होता. 

ते दृश्य पाहून, मला... खुदूखुदू हसू येत होतं. 

मी.. एकटक त्याच्या कसरतीकडे पाहत होतो. तसं, काही वेळाने त्याचं सुद्धा माझ्याकडे लक्ष गेलं. 
त्याने सुद्धा, गुपचूप माझ्या दिशेने एक चोरटा कटाक्ष टाकला.. 
तरी सुद्धा, मी निर्विकार आणि सताड डोळ्याने त्याच्याकडेच पाहत होतो... 
मग मात्र, तो सैरभैर झाला... त्याला वाटलं, बहुतेक मी त्याच्या प्रेयसीकडे पाहत असावा. 
म्हणून, त्याने मागे वळून पाहिलं, 
तर बाईसाहेब, मोबाईल मध्ये तोंड घालून बसल्या होत्या.. 
आता बाकी, तो खूपच अवाक झाला... 

हा माणूस... नेमकं काय पाहतोय..? आणि, हसतोय तरी कशाला..? 

शेवटी, न राहवून त्याने 'मानेने' आणि 'डोळ्याने' मला काय म्हणून विचारलं.. 
मी सुद्धा, हसत-हसत माझ्या डोक्यावरील 'हेल्मेट' आणि 'रुमाल' काढला. आणि, माझं चकचकीत 'टक्कल' त्याच्या समोर सादर केलं.

आणि..एका झटक्यात, सगळं सत्य त्याच्या समोर 'प्रसव' झालं. 

त्याला कळून चुकलं. 
कि, हा मनुष्य सुद्धा.. पूर्वी, माझ्याशी आत्ता होत असलेल्या प्रसंगातून गेला असावा. 

मी पुन्हा, माझा रुमाल आणि हेल्मेट परिधान केलं.  हिरवा दिवा लागला होता.. गाड्यांची प्याss प्याss  सुरु झाली, तेंव्हा, त्या मुलाने आपल्या विरळ केसावर पुन्हा एकवार हात फिरवून. 
मला, होकाराचा थम्स अप दाखवत पुढे निघून गेला. मी हि त्याला, हसत-हसत अंगठा दाखवला. 
बहुतेक.. त्याला म्हणायचं होतं.. 

" अब डर काहेका, माझं साध्य माझ्या पाठीमागे बसलं आहे. "

वरील घडलेल्या ह्या सगळ्या प्रकरणाशी अनभिज्ञ असणारी, बाईकवर पाठीमागे बसलेली मुलगी ( त्याचं साध्य ) शेवटपर्यंत, तिच्या हातातील मोबाईल मधेच गर्क होती.


मान, किंचीतशी " वाकडी " केल्याशिवाय..
मुलींचे फोटो..
" छानसे येतच नाहीत..! "
सध्या..
ह्या निष्कर्शा पर्यंत, मी येऊन पोहोचलो आहे..

Saturday, 19 December 2015

शुभ्र तळ्याकाठी, गुलाब लेऊन ओठी,
शिकार कोण होणार, कोण येणार भेटी.
कोणास थांग नसावा, नशिबाच्या गोष्टी,
दुनिया म्हणे त्याला, साता जन्मांच्या गाठी.

Thursday, 17 December 2015

हिवाळ्यामध्ये, थंडी गारठ्यात...
जिकडे हात लावावा, किंवा पाय ठेवावा. तिकडे सगळीकडे, अगदी गार-गार असतं. नागव्या पायाने फरशीवर चालू वाटत नाही. हात धुवण्याचा विषय तर खूप दूर राहिला, साधा नळ सुद्धा चालू करावासा वाटत नाही.
गोबऱ्या गालावर आपला हात ठेवावा. तर, ते गाल कधीच काश्मीर मध्ये पोहोचलेले असतात. इवलूसं नाक तर, जागेवर आहे कि नाही. ते सुद्धा कळत नाही. कानाच्या पाळीचा तर निव्वळ बर्फच व्हायचा बाकी राहिलेला असतो. हातांनी, एकतर खिशांचा आधार घेतलेला असतो. किंवा, गपगुमान छातीशी घट्ट कवटाळून बसलेले असतात, इतकी भयंकर थंडी असते.
अशा, कडाक्याच्या थंडीमध्ये..
फक्त, 'टाँयलेट' मधुन आपला 'कार्यभाग' उरकून नुकतंच कोनी तरी बाहेर पडलं असेल.
आणि, योगायोगाने आपली तिथे 'एंट्री' झाली.
तर,
ते " कमोड सिट " तेवढं ऊबदार लागतं बघा..!

Wednesday, 16 December 2015

माझा... रोजचा रहदारीशी संबंध येत असतो. त्यामुळे, माझ्या बरेचदा असं पाहण्यात येतं..
कि... चौका-चौकात, ट्राफिक 'पोलीस' लोकाचं. मुसाफिरांना 'ओलीस' ठेवण्याचं काम अव्याहतपणे चालू असतं. नाहीतरी, ते त्यांचं कामच आहे म्हणा. 
प्रत्येक वाहन चालकाकडे, तपासणी दरम्यान काही न काही तरी त्रुटी हि हमखास आढळतेच. आणि, ते सापडलेलं सावज. दंडाची 'पावती' करूनच पुढे मार्गक्रमण करत असतं. ( चिरीमिरीचा विषय मला माहित नाहीये बरं का.. ;) )
पण हल्ली, मला एक गोष्ट सातत्याने दिसू लागलीय..

ह्या ट्राफिक पोलिसांच्या ताफ्यामध्ये, "चुकून" नवीन भरती झालेले काही तरुण मुलं-मुली त्या ठराविक ठिकाणी तपासणी बंदोबस्ताला असतील.
तर, ते हमखास...
त्यांच्या सारख्या समवयस्क "मुला-मुलींना" एक गंमत म्हणून मुद्दाम शोधून टार्गेट करतात. बाईकवर मुलगा, मुलगी जोडीने असले. कि मग तर, ते त्यांना हमखास अडवणारच. मग त्या मुलाने, नियमानुसार हेल्मेट परिधान केलं असलं आणि ती बाईक पुण्यातली असली तरी. त्यावेळी, त्याला सुट्टी मिळत नसते..त्याची, तपासणी हि हमखास होणारच..

मला तर वाटतं, कि ते पोलीस मुलं, मुली त्या मुला, मुलींना.. निव्वळ 'असूयेपोटी' टार्गेट करत असावेत. कारण आजची तरुणाई शक्यतो नियमबाह्य कामं करत नाही. आणि, त्यांच्या सोबत जर त्यांची मैत्रीण असेल. तर मात्र नाहीच नाही. विनाकारण, मैत्रिणी समोर कोण अपमान सहन करेल हो..

" आम्ही इथे दिवसभर उन्हातान्हात तडपडतोय, कर्तव्य बजावतोय. आणि,  तुम्ही मस्त मजा मारताय का..! " थांबा.. तुम्हाला आमचा इंगा दाखवतो.. "

मनात, ते असंच काहीतरी म्हणत असावेत. असं मला तरी वाटतंय..

पण, एक गोष्ट आहे... पोलीस मुलं हमखास मुलांनाच टार्गेट करतात. तर, पोलीस मुली... मुलींना पकडायची एक सुद्धा संधी दवडत नाहीत. 
आणि हो, ठराविक वेळी..
हे दोघेही... त्यांना, जास्ती नडवत नाहीत. थोडीशी समज देऊन सोडून देतात.
बहुतेक... त्यावेळी, त्यांच्या मनात सुद्धा " कशी जिरवली तुमची " म्हणून 'लाडू' फुटत असावेत. 
असं माझं 'दाट' निरीक्षण आहे.

आता... काम करणं, किंवा मौजमजा करणं. हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो. पण, असा राग काढण्यात काहीएक अर्थ नसतो. असं, मला तरी वाटतंय. पण, अधिकाराचा वापर प्रत्येक जन करणारच त्यात सुद्धा बिलकुल वाद नाही...

काल.. माझ्यासमोर नेमकं असंच काहीतरी घडलं, 
माझा सिग्नल सुटला. आणि, माझ्या डावीकडील भागातील सिग्नल नुकताच बंद झाला होता. जाम गर्दीमुळे, मी सुद्धा अगदी रस्त्याच्या मध्यातच अडकलो होतो. आणि नेमकं त्याच वेळी, डावीकडील सिग्नलवरील मुलगी झेब्रा क्रॉस करून थोडीशी पुढे आली होती. आणि ते, त्या ठिकाणी असणाऱ्या सिग्नलवरील ट्राफिक पोलीस मुलीच्या पाहण्यात आलं. क्षणाचीही उसंत न घेता.. ती पोलीस मुलगी तिथवर आली. 
आणि, त्या मुलीला म्हणाली...

" कसली घाई असते गं तुम्हाला..? थोडा दम निघत नाही का..? नुसती घाई, घाई, घाई.. कुठे लढायला चालली आहेस का..? "

घाबरून चूर-चूर झालेली ती मुलगी, तिच्याच वयाच्या 'साहेब' मुलीला नकळत झालेल्या चुकी बद्धल माफी मागत होती. आणि, हा सगळा प्रकार मी सताड डोळ्याने पाहत होतो. 
कारण, माझ्यासमोर बरंच ट्राफिक जाम झालं होत..
त्या मुलीला, कोंडीत पकडून नामोहरन करून विजयी मुद्रेने ती पोलीस मुलगी जेंव्हा मागे वळली. नेमकी त्याक्षणी... त्या पोलीस मुलीची आणि माझी नजरानजर झाली. 
मी, तिच्याकडे पाहून गालातल्या गालात थोडं छद्मीपणे हसलो..
माझं हसणं पाहून, तिला सुद्धा समजून गेलं होतं. कि.. आत्ता घडलेला सगळा प्रकार बहुतेक यांनी पाहिला असावा. आणि, आत्ता घडलेली माझी अरेरावी सुद्धा यांनी पाहिली असावी..
त्यावर, त्या पोलीस मुलीने सुद्धा माझ्याकडे पाहून हलकासा डोळा मिचकावत माझ्या हो मध्ये हो मिसळली. आणि, जोरात शिट्टी मारत ट्राफिक मोकळं करायला ती पुढे निघून गेली...

बरं आहे, मी सरकारी गाडी चालवत असल्याने. ना मला, कोणी पकडतं. ना कोणी आडवतं.
त्यामुळे.. मला हे सगळं अगदी निवांत पाहायला मिळतं.

ते काहीही असुध्यात, पण दिवसभर उन्हातान्हात ताटकळत. आणि, प्रदुषणाचा मारा झेलत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या ट्राफिक पोलिसांना आपला मानाचा मुजरा आहे.

Monday, 14 December 2015

भिक मागणं, हि सुद्धा एक फार मोठी कला आहे. तिला व्यवस्थितपणे जोपासली. तर, ते भिक मागनं सुद्धा एका व्यवसायात कसं रुपांतरीत होऊ शकतं. 
काही वर्षांपूर्वी, या विषयाची मला फार जवळून अनुभूती मिळाली होती. म्हणून, हा किस्सा तुमच्याकरिता शेअर करतोय..

साधारण.. एकोणीसाव्या शतकातल्या शेवटच्या वर्षातील हि घटना आहे.
आमच्या गावात, एक मनुष्य भिक मागायला यायचा. पण, त्याची भिक मागायची पद्धत खूपच निराळी होती. त्याच्या हातामध्ये, विशिष्ट आकार असलेलं एक लाकडी द्रोण असायचं. त्यामध्ये, 'हळद' ज्याला आपण भंडारा 
म्हणतो. तो, भंडारा असायचा..

" सदानंदाच्या नावानं चांगभलं..! " 

म्हणून... तो एक सुरेल, सुमधुर आरोळी ठोकायचा. आणि, त्या द्रोणातील भंडारा समोरील व्यक्तीच्या भाळी लावायचा. कि समोरचा व्यक्ती, त्याच्या द्रोणामध्ये चार आठाणे रुपाया दोन रुपाया हमखास टाकायचाच. हा झाला, देवाच्या नावाखाली पैसे उकळायचा धंदा..

असुदेत.. पण, प्रत्येकाला अशी लाज सोडून कामं करता येणार आहेत का..?

तर, हा व्यक्ती.. आमच्या गावात घरोघरी कधीच भिक मागत नसायचा. गावातील दुकानात काय मागेल तितकीच. पण दिवाळी आली, कि.. मग मात्र तो प्रत्येक घरात भिक मागायचा. त्याच्या तोंडात साखर असल्यामुळे. नाही म्हणता, दिवाळ सनात प्रत्येक घरातून त्याला पाच दहा रुपये हमखास मिळायचेच.

त्यावर्षी.. दिवाळी मध्ये, तो आमच्या घरी आला होता..!

पांढरी दाढी, झुपकेदार मिशा, मागच्या बाजूला मानेपर्यंत रुळणारे त्याचे काळे पांढरे केस, अंगामध्ये स्वच्छ असा नेहेरू शर्ट पायजमा, डाव्या हातात भंडाऱ्याचा द्रोण आणि उजव्या हाताची सगळी बोटं भंडाऱ्यात बुडवून पिवळी झालेली. एकंदरीत असा, त्याचा अवतार असायचा. 
तो, नीटनेटका आणि टापटीप राहत असल्यामुळे. त्याला कोणी, एकदम हाकलत किंवा हटकत नव्हतं. कधीमधी, तो 'बाहेरचं' सुद्धा पाहतो. त्याच्या नावाची, गावात अशी सुद्धा एक गुप्त चर्चा होती. पण, त्या गोष्टीत काहीएक तथ्य नव्हतं. हे मी जाणून होतो. पण नाही म्हणता, त्याचा त्याला फायदाच होत होता.

तर, त्या दिवशी मी त्याला विचारता झालो. तो व्यक्ती वयाने माझ्यापेक्षा बराच मोठा असल्याने. अर्थातच, मला त्याच्याशी अहो जाहोच करावं लागलं. आणि, ती आपली संस्कृती सुद्धा आहे..

"काका.. हे सगळं करण्यापेक्षा, तुम्ही काही काम धंदा का करत नाही..?
"नाही बाळा.. हे सुद्धा कामच आहे. ह्याला, "देवाचं काम" म्हनत्यात. आणि, कुणीतरी हे करावंच लागतंय. आता, ह्या कामासाठी देवानी मला निवडलं. त्याला मी काय करावं..?
"पण काका, ह्या कामात तुम्हाला असे किती पैसे मिळत असतील..? म्हणून, हे सगळं मला तुम्हाला विचारावंसं वाटलं..
"मिळतात कि, पोटापुरते मिळतात..!
"नाही पण किती मिळतात..? आणि तुम्हाला मुलं बाळं सुद्धा असतील ना, त्यांचं कसं भागत असेल..?

माझ्या, ह्या प्रश्नांच्या सरबत्तीला कंटाळून. शेवटी त्याने त्याचं 'तोंड' उघडलं. आणि, त्याची खबरबात ऐकून. माझी, 'वाचा' बसायची वेळ आली...

ऐक पोरा... 
" माझा मोठा मुलगा आमच्या गावामध्ये ग्रामसेवक म्हणून कामाला आहे. गावाला मोठं चार खनाचं घर बांधलय. मागल्या वर्षी, पाच तोळा घालून माझ्या पोरीचं म्या लग्नं लाऊन दिलं. गावाला, म्या खरेदी केलेली माझी दहा एकर शेती हाय. ती अर्धलीनं करायला दिलिया. इथं, माझी बायकू आणि मी हितल्या झोपड्यात राहतूय.. "

हे सगळं सांगताना, त्याच्या चेहेऱ्यावर एक विशिष्ट तेज झळकत होतं. आपन करत असलेल्या कामाचा, त्याला मनापासून अभिमान वाटत होता.
मी त्याला म्हणालो.. अहो तुमचं इतकं सगळं आहे. तर, आता कशाला हे काम करताय..? 
गावाला जाऊन शेतीवाडी का करत नाही..?

" मग.. हे देवाचं कोण करणार..? असं म्हणून तो हसू लागला. " 

त्याचं ते हसू फार छद्मी होतं. त्याला हि कळालं होतं. कि मी काय काम करतोय..? आणि, हा मुलगा जे काही समजायचं आहे. ते, सगळं काही समजून गेला आहे. 

मग तर मी जीद्धीला पेटलो. आणि त्यांना म्हणालो.. 
सांगा तर मग, तुम्ही इतकी सगळी माया कशी काय जमा केलीत ते..?

सांगतो पोरा.. तू काय माझा धंदा हिसकावून घेणार नाहीस. पण, काय माहिती, मला तुला हे सगळं सांगावसं वाटतंय..

आणि, तो सुरु झाला...

पोरा... तशी तर पुण्यात लई गावं हायती. पण म्या, माझा टायम टेबल आखून ठेवलाय. महिन्याचे तीस दिवस कणत्या भागात जायचं ते म्या ठरवून ठेवल्यालं हाये. रोज एका गावात जायचं. आणि, शे पाचशे दुकानं पालथे घालायचे. रूपा दोन रुपायांनी धरलं तरी रोजच्या हजार पाचश्याला मरण न्हाय. महिन्यातून एकदा गेल्यावर कुणी हाड तुड बी करत नाय. राजी खुशीनं गल्ल्यात हात घालतंय. दर महिन्याला एकदा आमुषा आणि पोर्णिमा असतीया. 
काही दुकानदारांनी, त्यांच्या दुकानात मला लिंबू मिरची आणि काळी भावली लावायचं काम दिलं हाय. त्यांचा, लई इस्वास हाये माझ्यावर. एका दुकानाचं लिंबू, मिरची, भावली सगळं सामान, पाच रुपयात मला इकत मिळतंय. आणि एक दुकानदार, त्याचं मला एकवीस रुपय देतो. अशी शे दोनशे दुकानं हायेत माझ्याकडं. नाय म्हणता, महिन्याकाठी वीस तीस हजाराचं देवाचं 'काम' होतंय माझं..

बापरे... हे सगळं कथानक ऐकून, मी तर अगदी सुन्नं होऊन गेलो होतो. त्याकाळी, तो व्यक्ती खूप खूप पैसे कमवत होता. तेंव्हा सोनं, साधारण पाचशे रुपये ग्राम असावं. त्या प्रमाणे, आजचा हिशोब करा. तुम्ही काहीही म्हणा,पण.. त्याच्या चौकस बुद्धीला मी मानलं होतं..
मी शुद्धीवर येईपर्यंत, माझ्या आईने त्याचा शिधा आणि पाच रुपये त्याच्या हातावर टेकवले होते. बहुतेक हे दिवाळीतील देवाचं 'काम' म्हणजे. त्याच्याकरिता, दिवाळीचा 'बोनस' जमा करायची सोय असावी. 

माझ्या डोळ्याची पापणी लवते न लवते तोच.. 
हसत-हसत देवाचं 'काम' करायला तो पुढच्या दारात डेरेदाखल झाला होता...!

Tuesday, 8 December 2015

चारशे रुपये किलोच्या मटणाच्या भाजीमध्ये 

चाराने किमतीची लिंबाची फोड पिळून त्याला आंबट स्वाद देण्यात मला काहीएक हाशील वाटत नाही. तसं पाहायला गेलं तर...

" सगळेच, आंबट शौकीन असतात...! "

पण, मटणाच्या बाबतीत मी हि बाब हमखास टाळतोच..
मटणाचा 'ओशट' आणि झटकेबाज स्वादच मला हवाहवासा वाटतो.

( टीप :- ताटात मिळालेली ती लिंबाची फोड. 
जेवण झाल्यावर, ग्लासातील पाण्यात पिळून मी पीत असतो. त्यामुळे, पचनक्रिया सुलभ होते. किंवा ही पोस्ट वाचुन, एखाद्याला 'मळमळ' सुद्धा होऊ शकते. त्यांच्यासाठी सुद्धा, ती लिंबाची फोड रामबान ठरु शकते.. ;) )

Sunday, 6 December 2015

हल्ली..चौका चौकात, शुभेच्छा फलक लावण्याचं खूप मोठं फ्याड आलं आहे, 

खिशात जास्तीचे दोन पैसे खूळखूळले. कि प्रत्येकला, प्रसिद्धीचा सोस चढतो. बाजारात, दोन पाच हजारात मोठमोठे शुभेच्छा फलक छापून मिळतात. मग सगळे जन, त्या फलकावर.. 
तथाकथित..भाऊ, दादा, तात्या, मामा, काका ह्या नावाने प्रसिद्ध पावतात. प्रसिद्धीची हौस नसणारा माणूस, इथे शोधून सुद्धा सापडणार नाही. मध्यंतरी, काही लोकांनी खूपच अति केलं होतं. चक्क कुत्र्यांचे फोटो असलेला फलक लाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. कोणाच्या डोक्यात नेमकं काय चालू असेल. त्याचा आपल्याला थांगपत्ता लागू शकत नाही..

परवा, अशाच एका तोंड ओळख असणाऱ्या व्यक्तीच्या फोटो असलेला फलक मला पाहायला मिळाला. त्या व्यक्तीचं निधन झालं होतं. एकतर, हा माणूस खूपच कफल्लक होता. तर, त्याच्या मृत्य पश्चात त्याच्या फोटोचा फलक लावण्याचं धाडस कोणी केलं असावं..? हा माझ्यासाठी मुख्य विषय होता...
तितक्यात, त्याठिकाणी एक ओळखीचा व्यक्ती मला भेटला. मी त्याला विचारलं, 
"अरे कधी वारला हा..?
"सात दिवस झाले कि राव आता..!
"पण, मला एक गोष्ट कळत नाहीये, ह्याचा फलक कोणी लावला..?
तर म्हणाला, आम्हीच वर्गणी काढून लावला. 
तुला तर माहिती आहे. हा, किती लोकांचा देणेकरी होता. रोज-रोज ह्याच्या घरी येऊन ह्याच्या बायकोला कोणी सावकाराने त्रास देऊ नये. म्हणून, आम्ही त्याचा दुखःद निधनाचा फलकच लाऊन टाकला. 
हा मेलाय, असं समजल्यावर. पैश्यासाठी तगादा लावायला ह्याच्या घरी तरी कोणी जाणार नाही...! 

लो, कर लो बात...

रविवार म्हंटलं, कि मटणाचा वार...

गेले दोन रविवार.. एकादशी आणि चतुर्थी मध्ये गेल्याने. सगळी मासेच्छुक खादाड लोकं, खूपच काऊन होती. त्यामुळे, आज मटणाच्या दुकानाबाहेर भली मोठी गर्दी जमा झाली होती. नुसती, मला-मला चालू होती. बकऱ्यावर बकरे पडत होते. तब्बल, तासाभराच्या प्रतीक्षे नंतर एकदाचा माझा नंबर लागला. आणि, विजयी मुद्रेने मी त्या गर्दीतून बाहेर पडलो.

मटणाची चरबी मला आवडते, तर आमच्या घरच्यांना बिलकुल आवडत नाही. त्यामुळे, मी बिगर चरबीचे मटन घेत असतो. 
त्यात, आणखीन एक कमालीची गोष्ट म्हणजे आमचा मटन वाला माळकरी बुवा आहे. माझ्या, नेहेमीच्या मटन खरेदी सोबत चरबी न घेण्यामुळे. आज, तो मला म्हणाला...
" शेठ, चरबी शिवाय मटणाला मज्जा नाही बघा...! "
मी त्यांना म्हणालो, तुम्ही तर माळकरी आहात राव. तुम्हाला कसं काय माहिती..?
तर म्हणाला... " गिर्हाईकं सांगतात, म्हणून म्हणतोय..! "
मी म्हणालो, तसं नाहीये हो. चरबीत जर एवढी मज्जा असती. तर, लोकांनी किलो-किलो चरबीच विकत नेली असती ना. मटन कशाला नेलं असतं..? 
माझ्या, सडेतोड आणि ताबडतोब उत्तरांना, तो भलताच घाबरलेला दिसला.

शेवटी.. नाय हो म्हणता, गर्दीचं कारण पुढे करत. मला त्याने, आज चरबीचंच मटनच दिलं. 
वजन झाल्यावर, मटणाचे तुकडे करत असताना मी त्याला म्हणालो..
शेठ, एक काम करा..! ती चरबी तुमच्याकडेच काढून ठेवा. नाहीतरी, घरी गेल्यावर माझी बायको ती टाकूनच देणार आहे. त्यापेक्षा, कोणाच्या तरी मुखात जाउद्यात..!

असं म्हणताच, रागारागाने त्याने ती चरबी काढली. आणि, खाली वेस्टेज मटणाच्या ढिगात टाकली.
मला हे फार खटकलं.. मग मी त्यांना म्हणालोच.
अहो शेठ.. चरबी एवढी भारी.. आणि, तोलामोलाची असती. तर, तुम्ही तिला कचऱ्यात फेकून नसती दिली..! 

मगाशी मला बोललेलं वाक्य तो साफ विसरून गेला होता. त्याची चूक, त्याच्या लगेच ध्यानात आली होती..

शेवटी, मटन तोडता-तोडता खजील होत, त्याने कानाला हात लावला. 
आणि, आपली चूक कबुल केली.

ते काहीही असुध्यात, बाकी 'कालवण' एक नंबरच झालं होतं...!

Thursday, 3 December 2015

आमच्या, पुणे महानगरपालिकेत.. 

" कुत्रा बंदोबस्त विभाग " नावाचं एक खातं आहे. या विभागात, प्रामुख्याने पिसाळलेल्या कुत्र्यांना जेरबंद करणं. आणि, भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचं काम केलं जातं. कुत्र्यांची नसबंदी केली, कि त्यांना जेथून पकडून आणलं होतं. त्याच ठिकाणी पुन्हा सोडावं लागतं. असा नियम आहे. आणि, आमचे कर्मचारी ती भूमिका अगदी चोख बजावतात. 

साधारण, पाच सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या कुत्रा बंदोबस्त विभागाच्या परिसरात, मी फेरफटका मारत होतो. तर, त्या विभागाच्या बाहेर एक ग्रामीण कुटुंब बसलेलं मला आढळलं. मला वाटलं, बहुतेक यांचं कुत्रं वगैरे पकडून आणलं असावं. त्यामुळे, कुत्रा सोडण्याच्या प्रतीक्षेत ते बसले असावेत. पण, मी परत फिरून आलो तरी सुद्धा ते त्याच जागेवरच होते. त्यामुळे, एक कुतूहल म्हणून मी त्यांना विचारलं. 

काय हवंय तुम्हाला..?
तर म्हणाले.. आम्हाला कुत्रे पाहिजेत..! 
तो माणूस, अनेकवचनी बोलला होता. त्यामुळे, मी त्याला पुन्हा विचारलं कुत्रा कि कुत्रे..? म्हणाला.. दोन चार कुत्रे मिळाले तर बरं होईल...! 
त्या व्यक्तीच्या कपड्यावरून, त्याची परिस्थिती मला अगदी जेमतेमच वाटत होती. खरं तर, त्यालाच पोटभर खायाला मिळत नसेल. तर, तो ह्या कुत्र्यांना काय खायाला घालणार.? 
हा, मला पडलेला प्रश्न.
शेवटी.. माझ्या मनातलं मी त्याला विचारलंच.. तर म्हणाला,
आमच्या जातीत.. ज्या माणसाकडं जास्ती कुत्री असत्यात. त्याला, शिरमंत समजत्यात. त्याच्या पोराला, लगीच पोरगी मिळतीय. जमीन जुमला काही इचारीत नाही. घरात, कुत्री किती हायीत ते इचारत्यात. माझ्यासाठी, हा अगदी नवखा प्रकार होता..
मी म्हणालो..आणि मग, त्या कुत्र्याचं काय करायचं..?
त्यानला.. शिकवून, सवरून  शिकार करायला लावायची.. ससा, घोरपड, सायाळ पकडायला शिकवायचं. पोटापाण्याची सोय व्हती, पैका मिळतोय..
अरे ते सगळं खरं आहे, पण इतक्या कुत्र्यांना तुम्ही खायाला काय घालनार..?
तर म्हणाला.. आमच्या बाया, घरं मागायला जात्यात कि. त्या भाकरी, आम्ही कुत्र्याला घालतो. आम्ही नाय खात.. ( नाही म्हणता, काही लोकं ते शिळं पाकं अन्न खात सुद्धा असतील. )

हे ऐकून, मी तर अगदी थक्कच झालो. आपण समजतो. कि घरोघरी मागितलेलं अन्न ते स्वतः खात असतील. पण नाही, हे सगळं ते त्यांच्या कुत्र्यांसाठी करत असतात.

गप्पांमध्ये, माझा बराच वेळ निघून गेला होता. तोवर, आतील कर्मचाऱ्याने वर्षभराच्या वयाची तीन कुत्री त्याला आणून दिली. त्याने सुद्धा, खुश होऊन त्या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये एक पाचशेची नोट कोंबली. आणि काखेत कुत्री घेऊन, त्या कुटुंबाने तेथून काढता पाय घेतला.

" दारु "
ही...
प्रत्येक बाईची ' सवत ' असते..
आणि,
" गरिबी "
ही...
सार्या गावाची ' मेहुणी ' असते..
परमेश्वराने...
टक्कल पडन्याचा शाप, फक्त पुरुषांनाच दिला.
म्हणुन बरं झालं.
नाहीतर...
महिलांचे हाल, मला तरी पाहवले नसते बुवा..
लहानपनी,
पँट ची चेन लावत असताना. चुकुन, कधीतरी " अपघात " घडायचा...
त्या संकटसमयी,
नेमकं हसावं कि रडावं तेच समजायचं नाही. त्या संकटातुन सुटका करुन घेत असताना. अल्हाददायक हसु सुद्दा यायचं. त्या दुखर्या कळा सुद्धा हव्या हव्याशा वाटायच्या. आणि, डोळ्यात पाणी सुद्धा असायचं..
दोन्ही क्रिया, अगदी एकसाथच घडायच्या...!

Tuesday, 1 December 2015

रस्त्याने,  नवरा बायकोची एखादी जोडी जात असेल... 

आणि, त्या जोडीमधील सदर महिला. 
खूपच.. आखीव, रेखीव, भरीव आणि ठसठशीत बांध्याची असेल. तर, तिला पाहून तमाम पुरुषांच्या मनात लगेच लाडू फुटू लागतात..
आणि, तिच्या ( सुंदर ? ) नवऱ्याला पाहून मनातल्या मनात ते म्हणतात. 

क्या यार... " ये लंगुर के हात मे अंगूर दे दिया..! "  खरं तर, त्याच्या जागी मीच असायला पाहिजे होतो राव...!
जसा काही, हा अगदी अक्षय कुमारच असतो. ( मी मुद्दाम अक्षयचं नाव घेतलं आहे. कारण, हल्ली 'खाना'वळीतल्या लोकांची नावं मला घेऊ वाटत नाहीयेत. ) आणि अचानक त्याला, आपण स्वतः खूपच सुंदर आणि 'खमक्या' असल्याचा दृष्टांत घडतो..

प्रत्यक्षात, तसं काही एक नसतं. हा सुद्धा, दिसायला आणि तब्बेतीने सुद्धा अगदी जेमतेमच असतो.
पण, हि एक प्रकारची 'वृत्ती' असते. आणि, सुंदर महिलांना पाहिल्यावर ती जवळ-जवळ प्रत्येक पुरुषात उफाळून येतेच. आणि, त्यावर कोणतं औषध सुद्धा नसतं. ( आता हे वाचल्यावर, इथे बरेच जन मी एक वचनी आणि एक पत्नी असल्याचा दावा करू लागतील. पण, तसं कोणी करू नये.. )

कारण, वरील ( मनातल्या मनात ) वक्तव्य करनारा पुरुष. जेंव्हा, स्वतःच्या बायकोबरोबर फिरायला निघालेला असतो..
तेंव्हा, त्याला आणि त्याच्या बायकोला पाहून इतर पुरुष सुद्धा, 

मनातल्या मनात तेच म्हणत असतात. जो हा, स्वत:च्या मनातल्या मनात चिंतत असतो...!

असं भलतंच काही तरी, महिलांच्या मन पटलावर देखील उमटत असेल कि नाही. याबाबत, मी फारच साशंक आणि उत्सुक असतो..!