Friday, 26 August 2016

या पृथ्वीतलावर मनुष्याने जन्म घ्यायच्या कित्तेक वर्ष अगोदर. काही कृमी कीटकांची निर्मिती झाली होती, असं माझ्या ऐकिवात आहे. परमेश्वराने हि पृथ्वी निर्माण करताना, इथे असणाऱ्या प्रत्येक जीवजंतूला काहीतरी विशीष्ट कारणाने बनवलं असावं असं वाटून जातं. पण अपना सर्वांना त्या जीवजंतूची निर्मिती नेमकी का आणि कशासाठी केली गेली असावी. याचं संपूर्ण ज्ञान नाहीये. पण, विनाकारणच कोणत्याही गोष्टीची निर्मिती झाली नाही. ज्याला भूक लागते. तिथे आत्मा वसत असतो. आणि, आत्मा असणाऱ्या सर्व गोष्टीत जीव असतो. पण काहीवेळा, या नको त्या जीवांचा मला फार तिटकारा येतो. किंवा यांच्या निर्मिती मागचं नेमकं इंगित काय आहे..? हा प्रश्न मला सतत भेडसावत असतो..!
मच्छर :- साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है. हा झाला फिल्मी डायलॉग. पण बघा ना, सात दिवसाचं आयुष्य असणारा हा मच्छर माणसाला डसल्यावर त्याला सात जन्माची आठवण करून देतो. काहीवेळा हा दंश इतका घातकी असतो. कि, तो माणसाला आहे तो जन्म सुद्धा व्यवस्थितपणे जगू देत नाही. साधा काळा मच्छर चावल्यावर फारतर, अंगावर मोठाल्या गांध्या उठल्या जायच्या. आणि त्यासोबत एक जोरदार कळ सुद्धा मोफत मिळायची. पण आता नव्या दमाचे मच्छर.. डेंगू, चिकुनगुन्या, मलेरिया, टायफाईड आणि कसले कसले रोग बहाल करून जातो ते त्याचं त्यालाच माहिती.
का.. याची निर्मिती नेमक्या कोणत्या उद्देशाने केली गेली असावी. मला तर कधी कधी असा दाट संशय येतो. कि, हि समस्त दुनियादारी या मच्छर मुळेच नष्ट होतेय कि काय.
ढेकुण :- हा प्राणी निर्माण करून, परमेश्वराने समस्त मानव जातीवर फार मोठा सूड उगवला असावा. असं राहून राहून मला वाटत असत. कसला नालायक प्राणी आहे हा, माणसाला शांत चीत्तेने झोपून देईल तर शपत. आणि, हि राक्षसाच्या पोटची अवलाद. मारेल तशी वाढतच जाते. पण कमी व्हायचं नाव घेत नाही. माणूस थकून आला आहे, किंवा आजारी आहे. याची कसलीच जाणीव नसते हो त्याला. फक्त चावणे एकं चावणे इतकंच माहिती असतं त्याला. बरं चाउदेत मरुदेत,आपल्या शरीरात मस्त दोन तीन लिटर रक्त असतं. तो छोटासा जीव असं पिऊन पिऊन किती रक्त पिणार आहे..? म्हणून मी त्याला थोडा सॉफ्ट कॉर्नर सुद्धा देवू इच्छित होतो. पण गप चावेल तो ढेकुण कसला. रक्त सुद्धा पितो आणि माणसाला बोंबाबोंब सुद्धा करायला लावतो. स्वतः हकनाक मरतो. आणि, दुसऱ्याची जिंदगी हराम करतो.
झुरळ :- हा एक फार कमालीचा प्राणी आहे. आपल्या घरामध्ये, नको त्या भागात लुडबूड करत असताना हा आपल्याला आढळतो. तसा तर, हा फार निरुपद्रवी प्राणी आहे. त्याच्या असण्याने कोणाला काही खास त्रास होत नाही. पण त्याच्या अस्तित्वाने एकप्रकारचे किळसवाणे जीवन आपल्या वाट्याला येत असते. या प्राण्याचा मुक्काम खासकरून स्वयपाकघरात असतो. आणि बाहेरील बाजूस, नाल्याच्या किंवा बाथरूमच्या अडगळीत हि झुरळे हमखास आढळतात. यांची जास्ती प्रमाणात संख्या वाढली कि खरी मज्जा सुरु होते. तोपर्यंत याची कोणी गांभीर्याने दखल घेत नाही. यांच्या शरीराची वाढ होईल तसे ते थोड्याफार प्रमाणात हवेत उडू सुद्धा शकतात. त्यामुळे ते भलतेच तापदायक व किळसवाणे वाटू लागतात. जेवण करत असताना, चुकून जेवणाच्या ताटावरून यांची स्वारी गेली. कि खाल्लेल्या गोष्टी पोटातून बाहेर पडायला अवकाश लागत नाही. किंवा, तिथून पुढील जेवण तरी आपल्याला गिळवत नाही. या झुरळांची निर्मिती का आणि कशासाठी झाली असावी. हा फार मोठा प्रश्न आहे. मी तर असं सुद्धा ऐकलं आहे. कि, हि झुरळं.. एलीयंस लोकांबरोबर अंतराळातून आले आहेत. आणि, सगळ्या पृथ्वीचा विनाश झाला तरी. यांचा कधीही अंत होणार नाहीये.
मुंगी :- हा जीव मात्र मला फार जिव्हाळ्याचा वाटतो. या मुंग्यांसारखी हुशार बुद्धिमत्ता माणसाकडे सुद्धा नसावी,असं कधी कधी वाटून जातं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हा कानमंत्र बहुतेक मुंग्यांनीच आपल्याला दिला असावा. मुद्दाम तिच्या वाटेला गेलं तरच ती आपल्याला दंश करते. अन्यथा ती कोणाच्या वाटेला जाताच नसते. असा माझा तरी अनुभव आहे. साखरेचं खाणार, आणि गपगुमान राहणार. शिस्तबद्ध चालीत चालणाऱ्या मुंग्यांसारखी बुद्धिमत्ता प्रत्येकाकडे असावी असं मला वारंवार वाटत असतं. आपल्या वजनापेक्षा जास्ती मोठा बोजा त्या लीलया ढकलत नेत असतात. यातच त्यांचं खरं सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळतं. पावसाळा येण्यापूर्वीच आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची लगबग अगदी पाहण्यासारखी असते. मातीचा कणकण गोळा करून भलंमोठं वारूळ त्या बनवतात. आपल्या नांगीतून मातीचा कण वाहत असताना. त्या मातीच्या कणात, त्यांच्या विषाचा अंश सुद्धा मिसळून जातो. आणि हीच वारुळाची माती पायावरील भेगा ( जळवात ) यावर लेप करून लावली असता. त्या रोगाचा मुळापासून नायनाट होतो.
परमेश्वराची लीलाच न्यारी, कुठे दुखः तर कुठे हवीहवीशी लाचारी..!
टायपिंग क्लासमध्ये..
परीक्षेतील मुख्य सरावासाठी, सर्व परीक्षार्थींना आता दहा पंधरा ओळींचे छोटे छोटे मथळे टाईप करायला दिले जात आहेत. तशा प्रकारचे, ऐकून दहा ते वीस मथळे तेथील कंप्युटर मध्ये फीड करून ठेवले आहेत. सरावासाठी,रोज फिरून फिरून तेच मथळे आमच्या समोर येत असतात.
त्या सर्व मथळ्यांमध्ये, इतर अनेक विषयांच्या लेखांसोबतच फार मोठी एकसमानता म्हणजे. इतर बरेचसे लेख हे अध्यात्मिक विषयावर आधारित आहेत.
रोज तेच लेख वाचून आणि टंकून, विशिष्ट आध्यत्मिक विषया बाबत माझ्या ज्ञानात सुद्धा एकप्रकारची अतिरिक्त भर पडत आहे.
ते लिखाण टंकत असताना, कधी कधी माझ्या मनात विचार येतो. कि, इथे परीक्षार्थी असणाऱ्या एखाद्या नास्तिक किंवा अध्यात्माला न मानणाऱ्या व्यक्तीने.
हेच लिखाण सतत वाचलं आणि टंकलं. तर, सहा महिन्यांच्या कालावधीत तो व्यक्ती आस्तिक आणि आध्यात्मिक सुद्धा होईल. आणि, सोबतच बोनस म्हणून त्याला टंकलेखन परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र सुद्धा मिळेल..!
काही जिन्नस खरेदी करण्याकरिता, परवा आमच्या येथील मारवाड्याच्या स्वीट होम मध्ये मी गेलो होतो. काय त्यांची ती दुकानं, काय त्यांचा तो थाट आणि झगमगाट. दुकानात गेल्यावर माणूस अगदी सैरभैर होऊन जातो.
मी दुकानात प्रवेशित झालो, नेहेमीप्रमाणे.. भुकेल्या खवैय्यांची दुकानात तुडुंब गर्दी झाली होती. काऊंटर वर माल पुरवणारे तीनचार मुलं असून सुद्धा, तो दुकानदार मला प्रचंड व्यस्त दिसत होता.
इतकी ग्राहक लोकं, त्या दुकानात होती. तब्बल दहा मिनिटा नंतर माझा नंबर लागला.
आणि, तो दुकानदार मला म्हणाला..!
" बोलो सेठ क्या चाहिये..!
" तुमच्याकडे चितळ्यांची बाकरवडी आहे का..?
" नही.. हमारी है ना, एकदम एक नंबर कॉलीटी है..!
मी तो विषय तिथेच सोडून दिला. आणि, त्याला म्हणालो.
" बुधानीचे वेफर्स आहेत का..!
" नही, हमारे है ना. एकदम एक नंबर तलेगाव बटाटे वाले वेफर्स है.
शेवटी, वैतागून मी त्याला म्हणालो. वरील दोन्ही वस्तू तुम्ही का ठेवत नाही..?
तर, तो म्हणाला..
ये चीज हम भी बनाते है ना..! फिर, दुसरोंका माल कायको रखनेका..?
मग काय, मला सुद्धा त्याला माझा पुणेरी कचका दाखवावाच लागला.
मी त्याला म्हणालो.
तुम्ही राजस्थानवरून सगळं काही पणाला लावून पुण्यात येता. मस्त उंची दुकानं थाटता, रग्गड माल कमवता. त्याबद्धल आमचं काहीएक म्हणनं नाहीये. तुमचा व्यवसाय तुम्हाला लखलाभ असो. पण, एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा..
पुण्यात.. चितळ्यांची बाकरवडी आणि बुधानीचे वेफर्स. यांची, तुम्ही कधीही बरोबरी करू शकणार नाही.
काही चोखंदळ ग्राहकांसाठी, तुम्हाला या वस्तू तुमच्या स्वीट मार्ट मध्ये ठेवाव्याच लागतील. अन्यथा, परत निघून गेलेला तो चोखंदळ ग्राहक. इतर कोणतीही वस्तू घेण्यासाठी तुमच्या दुकानात पुन्हा कधीच फिरकणार नाही.
माझ्या न जाण्याने, त्या मारवाड्याच्या व्यवसायावर तसा काही खास फरक पडणार नाही.
पण, त्याच्या काळजावर मी घातलेला वर्मी घाव. लवकर भरून सुद्धा निघणार नाही.
रक्ताच्या नात्यांना सुद्धा,
या ढोंगी " बाजारात " किंमत उरली नाहीये.
तर मग, 
मानलेल्या नात्यांचा " लिलाव " तरी का मांडावा..?
काल दुपारी, एक गंमतच झाली..
लाल दिवा बंद व्हायची वाट पाहात, मी सिग्नलला उभा होतो. हिरवा दिवा कधी लागेल, त्याची मी आतुरतेने वाट पाहात होतो.
तोच.. माझ्या पुढील बाजूस उभ्या असणाऱ्या एका कारकडे माझं लक्ष गेलं.
त्या पांढर्या रंगाच्या कारमध्ये, एक सुंदर युवती बसली होती. बहुतेक कारमध्ये एसी चालू असावा, त्यामुळे त्या कारच्या काचा बंद होत्या. त्या काचांवर, हलक्याश्या काळ्या रंगाची फिल्म बसवली होती. पण तरीही, आतमध्ये काय घडामोडी चालू आहेत, ते मला बऱ्यापैकी दिसत होतं.
कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर असणारी, चुडीदार परिधान केलेली ती महिला दिसायला सुद्धा खूप सुंदर होती. तिचे काळेभोर मोकळे सोडलेले केस तिच्या पाठीवर रुळत होते. पण, सीटच्या अडथळ्यामुळे मला त्याचं यथोचित दर्शन घडत नव्हतं. तिच्या डोळ्यावर, एक सुंदरसा गोगल होता. ती सुद्धा, हिरवा दिवा लागण्याची वाट पाहात होती. तितक्यात.. तिला काहीतरी आठवलं.
तिने, लगबगीने कारच्या समोरील एका कप्प्यातून कसलासा डबा बाहेर काढला. तिने तो डब्बा उघडला, आणि त्या डब्ब्यात असणरा कसलासा जिन्नस त्या डब्ब्यात असणाऱ्या चमच्याने तिच्या तोंडात टाकला.
त्या काळ्या काचेमुळे, तो डब्बा कशाचा होता..? किंवा, त्या महिलेने तिच्या तोंडात नेमकं काय टाकलं असावं..? ते मला स्पष्ट दिसलंच नाही. आता, हे नवीन कुतूहल माझ्या मनात जागृत झालं. मला वाटलं, कदाचित तिने डब्यात असणारी सौफ किंवा गुठ्का वगैरे खाल्ला असावा. हा माझा अंदाज होता. पण ते नक्की काय असावं..? ते मात्र मला समजलं नाही.
माझं मन काही मानायला तयार नव्हतं. तिने तोंडात नेमकं काय टाकलं असावं..? या प्रश्नाने मला पुरतं हैराण करून सोडलं होतं. सिग्नल सुटायला, फक्त दहा सेकंद उरले होते. तिने, तोंडात नेमकं कोणतं मिश्रण टाकलं आहे. ते आता, बहुतेक गुलदस्त्यातच राहणार होतं.
तितक्यात.. माझं लक्ष, तिच्या कारच्या दरवाजावर गेलं.
गुठ्का खाणाऱ्या व्यक्ती, जेंव्हा कारची काच उघडून आपल्या तोंडातली पिंक रस्त्यावर थुंकत असतात. त्यावेळी, त्या पिंकेतील काही शिंतोडे त्या कारच्या दरवाजावर सुद्धा उडत असतात. तसेच काहीसे काळ्या रंगाचे शिंतोडे मला त्या महिलेच्या कारच्या दरवाजावर आढळले.
बस.. गुत्त्याचा उलघडा झाला होतो. आणि, माझा अंदाज सुद्धा खरा ठरला होता.
त्या सुशिक्षित दिसणाऱ्या महिलेने,
तिच्या तोंडात चक्क तंबाखूची काळी मशेरी ( मिसरी ) कोंबली होती..!
यापूर्वी, महिलांना तंबाखूची काळी मशेरी लावताना मी पाहिलं होतं. पण, चमच्याने मशेरी खाण्याचा हा प्रकार, आणि ते सुद्धा, अगदी उंची कारमध्ये. मला, पहिल्यांदाच पाहायला मिळाला होता.
तीनेक महिन्यांपूर्वी, माझ्या एका मित्राबरोबर त्याची पाचेक वर्षांची गोडशी चिमुरडी मुलगी मला भेटली होती. उन्हाळ्याचे दिवस होते, शाळेला सुट्ट्या होत्या, उन्हामुळे डोक्यात घाम येऊन घामाच्या गाठी येऊ नये. आणि, लहान वयात दोनचार वेळा टक्कल केल्यावर मुलींची केसं सुद्धा दाटसर येतात. हि सगळी उद्धिष्ट साधून, तिच्या वडिलांनी तिला न्हाव्याच्या दुकानातून नुकतंच टक्कल करून आणलं होतं.
तितक्यात, मला पाहून तो मित्र माझ्यापाशी थांबून गप्पागोष्टी करू लागला. मी सुद्धा, विचारायचं म्हणून त्याला विचारलं.
उन्हाळा आला म्हणून मुलीचे केस कापलेत का. त्यावर, त्याने सुद्धा मी मनात योजलेलं वरील सगळं रामायण मला ऐकवलं.
आम्ही दोघे बोलत असताना, ती चिमुरडी माझ्याकडे वारंवार पाहत होती. कदाचित, ती माझ्या डोक्यावर असणारं टक्कलच पाहत असावी. याची मला पूर्ण खात्री झाली होती.
त्यानंतर, काल पुन्हा एकदा मला ती चिमुरडी दिसली. लहान मुलांबरोबर खेळण्यात ती अगदी दंग झाली होती. तीन महिन्यामध्ये, तिच्या डोक्यावर भरपूर काळे आणि घनदाट केस आले होते. आणि खेळता-खेळता, अचानक त्या चिमुरडीचं माझ्याकडे लक्ष गेलं. तशी ती, पळतच माझ्यापाशी आली. आणि, प्रश्नार्थक मुद्रा करत मला म्हणाली.
" काका, तुम्हाला अजून केस आले नाहीत का..? "
माझा कयास खरा ठरला होता. तीन महिन्यापूर्वी ती चिमुरडी मला जेंव्हा भेटली होती. तेंव्हा, त्या लहान जीवाला वाटलं असेल. कि बहुतेक, या काकांनी सुद्धा माझ्या सारखच टक्कलच केलं असावं. पण आज मला भेटून, ती फार मोठ्या कोड्यात पडली होती.
कारण, गेल्या तीन महिन्यात तिच्या डोक्यावर तर भरपूर केस आले होते. आणि अजून, या काकांच्या डोक्यावर केस कसे आले नाहीत..? हा तिला पडलेला फार मोठा यक्ष प्रश्न होता.
शेवटी.. तिचं शंका निरसन करत मी तिला म्हणालो..!
" बाळा, मला आता डोक्यावर केस येत नाहीत गं..! "
माझ्या या धीरगंभीर आणि अनपेक्षित उत्तरावर, ती बिचारी भलतीच कोड्यात पडली होती. डोक्यावर केस येतच नाहीत..?
हा विचार काही, त्या लहान जीवाच्या पचनी पडला नव्हता. आणि, माझ्या उजाड डोक्याकडे पाहात, नकळत तिचा हात तिच्या डोक्यावरील केसांवरून फिरु लागला.
काही काळा नंतर, असं काही विपरीत सुद्धा घडू शकतं. या कल्पनेने ती खूपच सैरभैर झाली होती. तिच्या जीवनात, तिला मिळालेला हा एक नवा धडा होता. माझ्याशी वार्तालाप संपवून, ती पुन्हा तिच्या सवंगड्यांसोबत खेळायला निघाली होती.
पण जाताना, तिने मला किमान तीन वेळा तरी वळून पाहिलं होतं. तिच्या मनात बहुतेक हा एकच प्रश्न असावा..!
ऐसा भी हो सकता है..?

Monday, 15 August 2016

टाईल्स..
हे झालं, फरशीचं अगदी शास्त्रशुद्ध असं इंग्लिश नाव. काही लोकं, तिच्या नावाचा अगदी टिपिकल असा सेक्सी अपभ्रंश...
" स्टाईल " असा सुद्धा करतात.
बहुतेक, सर्वच घरातील.. किचन, बाथरूम या टाईल्स मुळे चकाचक किंवा झकपक दिसत असतात. म्हणून, काही लोकं तिला 'स्टाईलबाज' स्टाईल. अर्थात, टाईल्स असं म्हणत असावेत. असा माझा अंदाज आहे.
पण आम्ही पुणेकर, त्या टाईल्स नावाच्या वस्तूला सर्रास " फरशी " असं म्हणतो.
तर मग, ती दहा रुपयांची असो किंवा दहा लाखांची..!
हे झालं पुण्याचं गणित..
पण, सर्रास मुंबईकर लोकं. या टाईल्स किंवा फरशीला " लादी " असं संबोधतात. बऱ्याच मुंबईकरांना, त्या टाईल्स नामक फरशीला लादी म्हणताना मी ऐकलं आहे.
शेवटी काय आहे, गावं तितकी नावं
पण.. मुंबईकर लोकांच्या तोंडून, मी जेव्हा फरशीला लादी म्हणताना ऐकतो. त्यावेळी, माझ्या नजरे समोर दुसरं तिसरं काही नाही.
तर.. चक्क " पावाची " लादी तरळून जाते.
बटाटा वड्या सोबत मिळणाऱ्या पावांच्या एकत्रित समूहाला, आमच्या इथे लादी असं संबोधतात..
पावाची लादी किंवा लादी पाव..
आहे की नाही गंमत,
चला तर मग सांगा बरं. तुम्ही लोक फरशीला काय म्हणता..!
अधिकार पदावर असताना, केलेल्या रुबाबाची किंमत.
मनुष्याला,
रिटायर्डमेंट नंतर, अवश्य भोगावी लागते.
आकडा फक्त,
लोकसंख्येचा " वाढत " चाललाय.
आकडा फक्त,
मटक्याचाच " बसत " चाललाय.
लोकसंख्या परवडली, मटका सुद्धा चालेल.
पण, ती ऑलम्पिकची स्पर्धा नको रे बाबा. अगदी, असं म्हणायची वेळ आली आहे.
सगळीकडे.. फक्त आणि फक्त वशिलेबाजी चालू आहे.
भारतात.. खेडोपाडी, वाड्या वस्त्यावर, आदिवाशी पाड्यावर, झोपडपट्टी मध्ये अणि अन्य काही ठिकाणी बरंच मोठं टैलेंट दडून बसलं आहे.
त्यांना कधी संधीच मिळाली नाही. आणि, भविष्यात मिळणार सुद्धा नाही. हे मी खात्रीने सांगू शकतो.
इथे एखादा, मातब्बर व्यक्ती जरी अशा खेळात सिलेक्ट झाला.
कि लगेच, त्याच्या जेवणात किंवा कोणत्याही माध्यमातून काहीतरी भेसळ करून. तो, दोषी कसा आढळेल. आणि, आपला माणूस त्याठिकाणी कसा सिलेक्ट होईल. अशी चोख व्यवस्था इथे राबवली जात आहे.
हे सगळं, अगदी सगळ्या बाजूने गडगंज आहेत त्यांच्यासोबत घडतंय.
तर मग, खेडोपाडी असणाऱ्या लोकांना तर, हि धेंड कस्पटा समान अडगळीत कधी फेकून देतील. त्याचा तपास सुद्धा लागणार नाही. आणि, लागू सुद्धा देणार नाहीत.
काही वर्षांपूर्वी, " धनुष्य बाण " ( आर्चरी ) या खेळ प्रकारात. एक नवीन प्रयत्न म्हणून, " लिंबाराम " नावाच्या एका खेडूत ( आदिवासी ) व्यक्तीला संधी देण्यात आली होती.
तो खेळाडू कितपत सक्सेस झाला, हा भाग निराळा आहे. पण, चयन कर्त्यांनी त्या खेळाडूत काहीतरी टैलेंट नक्कीच पाहिलं असेल. त्यामुळे तर, त्याला भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यात आली होती. तसे प्रयत्न, पुन्हा कधी झालेले पाहायला मिळाले नाहीत.
सर्वात पहिला, या देशातील भ्रष्टाचार आणि वशिलेबाजी बंद केली गेली पाहिजे. वशिल्याच्या तट्टू लोकांना, कायमचं हद्पार केलं गेलं पाहिजे.
पेरूच्या आकाराचा, पेरू सारखा दिसणारा देश सुद्धा दोन चार पदकं सहज घेऊन जातो.
आणि इथे, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत अवाढव्य पसरलेल्या देशात. एकसुद्धा पदक येऊ नये.
हि फार मोठी शरमेची बाब आहे.
" जहां डाल डाल पर सोनेकी चिडिया करती है बसेरा वोह भारत देश है मेरा..! "
ते सगळं सोनं तर, इंग्रजांनी केंव्हाच लुटून नेलं.
आता, विदेशात जाऊन आपली धमक दाखवून एकजरी सुवर्णपदक या खेळाडूंनी जिंकलं. तरी, सगळ्या भारतवासियांच्या छात्या अभिमानाने फुलून येतील. तो दिवस कधी येईल काय माहिती.
आत्ताच्या ऑलंपिक स्पर्धांमध्ये खेळायला गेलेले खेळाडू अगदी कमकुवत किंवा सुमार दर्जाचे आहेत. असं मला मुळीच म्हणायचं नाहीये. त्यांच्या ठिकाणी ते अगदी दुरुस्त आहेत.
पण अशा सामन्यांमध्ये किंवा विविध खेळांमध्ये, भारतामध्ये यापेक्षा सुद्धा भरपूर तल्लख कामगिरी करणारे मुलंमुली. केवळ, एका संधीची वाट पाहत कुठेतरी अडगळीत खितपत पडले असतील. हे तुम्हाला सुद्धा माहित असेल.
माझ्या उमेदीच्या काळात, मी असे बरेच खेळाडू पाहिले होते. जे आज, आमच्या औद्योगिक वसाहतीत अक्षरशः हेल्पर म्हणून काम करत आहेत. अर्थातच, त्यांचं शिक्षण कमी असल्यामुळे त्यांच्यावर हि वेळ आली. पण, त्यांच्या खेळात त्यांना एखादी संधी किंवा वाव दिला असता. तर तीच मुलं, आज भारताच्या शिरपेचाचा मुगुटमनी झाली असती. यात तिळमात्र शंका नाही.
आपण.. आपला शेजारील देश चीनबरोबर,
फक्त " लोकसंख्या " या विषयातच स्पर्धा करू शकतो. ऑलंपिकच्या पदक तालिकेत नाही.
हि, फार मोठी खेदाची गोष्ट आहे.
काय तर म्हणे,
सव्वासौ करोड कि आबादी का है मेरा देश..! 

Friday, 12 August 2016

भोगविलासी जीवनाला कंटाळून,
एक तरुण, आपला देह त्यागण्यासाठी जंगलाच्या दिशेने निघालेला असतो. त्यामागे, त्या तरुणाचं एकच उद्धिष्ट असतं. कि आजवर, मी या जीवनात सर्वप्रकारच्या मौजमजा केल्या आहेत. आणि, जीवनात नवीन काही करण्यासारखं आता माझ्याकडे उरलंच नाहीये.
या सर्व गोष्टीचा तिटकारा आल्यामुळे, देहत्याग करण्यासाठी तो जंगलाच्या दिशेने निघालेला असतो.
जंगलात जाण्यामागे सुद्धा कारण हेच, कि आजवर.. मी जे काही भोगविलासी जीवन जगलो आहे. तर माझ्या मृत्यूनंतर, माझा देह कोणत्या तरी प्राण्याच्या उपयोगी पडावा. माझ्या हाडामासाच्या गोळ्यापासून कोणाची तरी क्षुधाशांती व्हावी. हाच त्यमागे प्रामाणिक हेतू असतो.
जंगलात जात असताना..
वाटेत, त्याला एक ऋषीमुनी भेटतात. तो तरुण,त्या ऋषींना शरण जातो. आणि, त्याच्या जीवनाला कंटाळल्याचं कारण तो त्यांच्यासमोर विशद करतो. ते ऋषी सुद्धा त्याला आज्ञा करतात..
वत्सा.. हा मानव जन्म पुन्हा नाही, असा देहत्याग करू नकोस...! जा, काही समाज उपयोगी कार्य कर जेणेकरून तुझं पापक्षालन होईल. जा वत्सा, यशस्वी भवः
ऋषींचा आशीर्वाद घेऊन, तो तरुण त्याच्या भ्रमंतीला सुरवात करतो. याच्या आजवरच्या जीवनात याने सगळे " नाद " केलेले असतात. त्यामुळे, त्याला आता कसलीच इच्छा उरलेली नसते. भगवी वस्त्र परिधान करून, भिक्षा म्हणून जे मिळेत ते अन्न ग्रहण करत. हातून घडेल तेवढं सत्कर्म करत त्याची सतत भ्रमंती सुरु असते.
असाच प्रवास करत असताना, तो एका घनदाट जंगलात येऊन पोहोचतो. दिवस बुडायला आलेला असतो. आता तो सुद्धा, एक निवार्याचं ठिकाण शोधत असतो.
आणि दूरवर.. त्याला एक लहानशी कुटीया दिसते. त्याठिकाणी, आपली राहण्याची व पोटापाण्याची काहीतरी निश्चित सोय होईल. अशी आशा धरून, तो त्या लहानशा झोपडी वजा कुटीया पाशी पोहोचतो.
हा वाटसरू याचक असल्याने, तो दरवाजात उभा राहून याचना करतो.
या कुटीयेत कोणी आहे का..?
याचा आवाज ऐकून, त्या कुटीयेतून एक सुंदर आणि कमनीय देहाची युवती बाहेर येते. त्या रुपगर्वितेला पाहून हा सन्यासी तरुण तिला म्हणतो.
देवी, आजची रात्र मला इथे निवारा मिळेल का..!
नितांत सुंदर दिसणारा संन्यासी वाटसरू पाहून, ती युवती सुद्धा लगेच त्याच्या मदतीला धावून येते. त्याचं, आपल्या छोट्याशा कुटीयेत स्वागत करते. आपले वृद्ध पिता आज बाहेरगावी गेले आहेत. त्यांना यायला कदाचित उशीर होईल. आणि, त्यांच्या पश्चात आपल्याला या अंधाऱ्या रात्री या युवकाची सोबत सुद्धा होईल. असा विचार करत, ती तरुणी त्याचं कुटीयेत स्वागत करते. त्याच्यासाठी, मस्तपैकी जेवणाचा बेत करते. जेवणं उरकतात, थोड्या गप्पागोष्टी होतात. वेळ पुढे पुढे जात असते. चंद्र पश्चिमेकडे झुकू लागलेला असतो. आता, जवळपास झोपण्याची वेळ झालेली असते. पण, त्याठिकाणी एक फार मोठी अडचण असते.
ती कुटीया, फार लहान असते. त्यामुळे, तिथे दोन अपरिचित व्यक्तींना झोपण्यासाठी अगदी कटाकटी जागा होणार असते. शेवटी, कशीबशी दोन अंथरूनं अंथरली जातात. आणि, एक समजोता म्हणून दोन्ही अंथरुणाच्या मधोमध एक कापडी उशी ठेवली जाते. आणि, ते दोघेही निद्रादेवीच्या स्वाधीन होतात.
संन्यासी फार थकलेला असतो. त्यामुळे, तो तत्काळ झोपी जातो. पण, त्या राजबिंड्या संन्याशाला पाहून या तरुणीची मात्र झोप उडालेली असते. तिला वाटत असतं, येवढ्या अंधार्या रात्री आपणाला कोणी पाहायला नाहीये. सर्वप्रकारचा एकांत त्याठिकाणी असतो. आजच्या रात्री, तिचे वृद्ध वडील सुद्धा तिथे येणार नसतात. ती मनोमन स्वप्न रंगवत असते, हा तरणाबांड संन्याशी, आवेशाने आपल्या बाहुपाशात नक्कीच येईल. परंतु असं काहीएक घडत नाही. तो संन्यासी गाढ झोपी गेलेला असतो.
आणि, राम तेरी गंगा मैली, या सिनेमातील गीत,
कोही हसीना कदम पहेले बढाती नही. या उक्तीप्रमाणे, ती बिचारी तरुणी, रात्रभर तशीच तरमळत राहते.
रात्र संपते.. सकाळचं झुंजूमुंजू होतं. ती युवती, शुचिर्भूत होऊन आपल्या रोजच्या कामाला लागते. तोवर, जवळच वाहत असणाऱ्या नदीवर जाऊन अंघोळ करून हे संन्याशी महाशय परत येतात.
आल्यावर सगळी आवराआवर करत, तो निघण्याच्या तयारीत असतो.
तेव्हा, आभारप्रदर्शन करत तो त्या युवतीला म्हणतो..
धन्यवाद देवी.. मला निघायला उशीर होतोय. आज, समोर असणारा हा आडवा डोंगर मला पार करायचा आहे.
त्यावर.. चवताळून ती युवती त्या संन्याशाला म्हणते..!
" संपूर्ण रात्रीत, तू एक साधी कापडी उशी पार करू शकला नाहीस. आणि, हा डोंगर पार करायच्या मोठमोठ्या गप्पा काय करतोस..? "
हि बोधकथा इथेच समाप्त होते,
भोगविलासी जीवनाचा कंटाळा आल्याने. त्या तरुणाने, हे जीवन संपवण्यासाठी हा कठोर मार्ग पत्करलेला असतो. तर दुसरीकडे, एका पुरुषी मिलनाला आसुसलेल्या तरुणीची व्यथा याठिकाणी स्पष्ट होते.
त्यामुळे, कोणावरही कसल्याही प्रकारचा आरोप करण्यापूर्वी. नाण्याच्या दोन्ही बाजू प्रत्येकाने तपासनं फार महत्वाचं ठरतं..!!
सुंदर, आकर्षक, टंच आणि ठसठशीत बांध्याच्या मुलींना.
फक्त मुलंच नाही..
तर,
" मुली सुद्धा "
पुन्हा-पुन्हा, मागे वळून पाहात असतात..!
भारतीय माणूस, इतका भयंकर काळजीवाहू असतो.
कि..
बाईकवर जात असताना,
समोरील दुचाकी स्वाराच्या गाडीचं चाक पंक्चर असेल. तर, ते त्याला सांगण्यासाठी. जोरात गाडी चालवून जीवाचा आटापिटा करून, त्याच्या समीप जाऊन, त्याला ती वस्तुस्थिती सांगितल्या शिवाय त्याला बिलकुल चैनच पडत नाही.
किंवा, त्याच्या समोरील बाईकवर असणाऱ्या महिलेच्या साडीचा पदर किंवा तिची ओढणी. बाईकच्या चाकात जाऊ पाहत असेल. तर, जोवर त्या बाईला तो सावरून, आवरून बसायला सांगत नाही. तोवर, आमचं मन काही शांत बसत नाही..!
शेवटी काय, गाडी दुसऱ्याची आणि बायको तिसऱ्याची.
पण, काळजी फक्त आम्हालाच असते..!
लाखामंडल, एक अद्भुतरम्य शिवालय..!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चारधाम यात्रेला जात असताना.. हरिद्वार येथून पुढे गेल्यावर, मसुरी आणि देहरादून हि दोन प्रेक्षणीय अशी मोठी शहरं ओलांडून शंभर एक किलोमीटर अंतर पुढे गेल्यावर. बडकोट नावाच्या मोठ्या गावाच्या अलीकडे, तीसेक किमी अंतरावर. मुख्य रस्त्यापासून, डाव्या बाजूस सुमारे पाचेक किमी अंतरावर. आदी केदारनाथ, " लाखामंडल " नावाचं एक धार्मिक ठिकाण आहे. फारच वैशिष्ट्यपूर्ण असं हे ठिकाण आहे.
चारधाम केदारनाथ मंदिराची, छोटी प्रतिकृती असणारं हे मंदिर, तेथील आवार आणि तेथील नैसर्गिक संपदा पर्यटकांना, भाविकांना अगदी मोहवून टाकते.
१९८० च्या सुमारास, पुरातत्वशास्त्र विभागाने काही पौराणिक माहितीच्या आधारे. त्याठिकाणी, उत्खनन करत असताना. या मंदिराचा शोध लागला. अशी माहिती, मला त्याठिकाणी मिळाली.
या अद्भुत ठिकाणाला " लाखा मंडल " हे नाव का पडलं..?
तर, त्याठिकाणी उत्खनन करत असताना, शोधकर्त्यांना तिथे लहान मोठ्या अशा लाखो सुबक आणि दगडी मुर्त्या सापडल्या होत्या. पण आजमितीला, तिथे फारच कमी मुर्त्या आपणाला पाहायला मिळतात. त्यातील, काही मूर्तींची तस्करी झाली असावी, असंही समजलं जातं.
तर.. उदराच्या आड दडलेल्या या ठिकाणची महती फार अचाट आहे. या पवित्र ठिकाणाला,
" मर्डेश्वर महादेव " म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
वनवासात असताना, काही काळ पांडवांचं या भागात वास्तव्य होतं. पांडवाना जिवंत जाळण्याकरिता. दुर्योधनाने कुटनीती वापरून इथे एका लाक्षाग्रहाची निर्मिती केली होती. ज्यामध्ये, पांडवांना जिवंत जाळलं जाणार होतं. ( लाखे पासून बनवलेल्या त्या गृहाला लाक्षागृह किंवा लाखामंडल असं सुद्धा म्हंटलं गेलं आहे. ) परंतु, दुर्योधनाचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही..!
आणि, पुढील महाभारत घडलं..!
परंतु, पांडव याठिकाणी वास्तव्याला असताना. धर्मराज युधिष्ठिराने, याठिकाणी एका शिवलिंगाची स्थापना केली होती. ते ठिकाण म्हणजे, हे आजचं लाखामंडल आहे.
आजही त्या मंदिराच्या अवतीभवती, आपल्याला त्यातील काही विस्मयकारक आणि विविधप्रकारचे शिवलिंग पाहायला मिळतात.
मुख्य मंदिरातील शिवलिंगासमोर, अगदी समोरामोर मंदिराच्या बाहेरील बाजूस. पश्चिमेकडे मुख करून दोन भग्नावस्थेत असणारे द्वारपाल उभे आहेत.
या शिवलिंगाचं, एक फार मोठं वैशिष्ट्य होतं. कि, त्याकाळी.. त्या गावातील कोणताही व्यक्ती मृत पावत असताना. त्याला, मृतावस्थेच्या अगदी सुरवातीला. या, दोन्ही द्वारपालांच्या संमुख ठेवलं जायचं. आणि त्यावेळी, त्या मंदिरातील पुजाऱ्याच्या हातून अभिमंत्रित केलेलं पवित्र जल, त्या मृतात्म्यावर शिंपडलं असता. तो मृत व्यक्ती, त्याठिकाणी पुन्हा जीवित होत होता.
ज्यावेळी, मृत्यू घटिका समीप आली असताना. मुखातून राम राम हे उच्चार तरी करा, किंवा.. काहीच जमलं नाही. तर, मुखातून राम राम या उच्चाराची साक्ष तरी घडवील गेली पाहिजे. त्यानंतर, सदर व्यक्तीने उभ्या हयातीत गंगाजल प्राशन केलं नसेल, तर.. तत्पूर्वी, त्याने ते गंगाजल प्राशन करून घ्यावं. किंवा, त्याच्या मुखात कोणीतरी गंगाजल सोडावं, हे सर्व विधी केले असतां.
मृत्यू समयी, किंवा मृत्य पश्चात ती व्यक्ती तिथे साजिवंत होत असे. असा काहीसा परमेश्वरी चमत्कार तिथे होत होता. अशी दंतकथा आहे.
संभाव्य व्यक्ती, किंवा त्याचं कुटुंबीय या मृत्युसमयी या गोष्टींची पूर्तता करत असत. त्यावेळी, काही क्षणांकरीता तो मृत व्यक्ती तिथे जीवित होत असे. आणि, सगळे सोपस्कार, म्हणजे.. मृत्युपत्र म्हणा किंवा शेवटची इच्छा म्हणा. हे सर्व काही झाल्यानंतर. तो व्यक्ती किंवा महिला मृत होऊन थेट वैकुंठ प्राप्ती करत असे. अशी, फार मोठी दंतकथा मला त्याठिकाणी ऐकायला मिळाली.
आणखीन एक गूढ कथा, मला त्याठिकाणी ऐकायला मिळाली. हि गोष्ट, प्रत्येक व्यक्तीच्या पचनी पडेलच असं सांगता येत नाही. पण.. या दंतकथा किंवा सत्यकथा आहेत. यांना कोणी, चुकुनही भाकडकथा म्हणू नका. एवढीच एक, माझी प्रामाणिक विनंती आहे.
पुरातन काळात सुद्धा, पुत्रप्राप्ती ( मुल होणं ) हा फार मोठा विषय होता.
तर, त्याकाळी..
एखाद्या स्त्रीला, मुल होत नसेल. अशा, पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून इच्छुक असणाऱ्या महिला. या लाखामंडल मंदिरासमोर, महाशिवरात्रीच्या रात्री..
त्या मंदिरात, सतत तेवत असणाऱ्या शिव ज्योतीसमोर, " ज्योती त्राटक " करत असत. आणि सोबतच, शिव मंत्राचा जाप सुद्धा करत असत. असं केल्याने, एका वर्षाच्या आत. त्या महिलेला, शिव प्रभूंच्या आशीर्वादाने पुत्र रत्नाचा लाभ होत असे.
या मंदिराच्या आवारात, एक असं अद्भुत शिवलिंग आहे. कि, त्या शिवलिंगाच्या शाळीग्रामावर शुद्ध जल वाहीलं असता, त्या शाळीग्रामावर समोरील व्यक्तीची हुबेहूब प्रतिकृती दिसते. जणू काही अगदी आपल्या समोर आरसाच ठेवला असावा. ती अनुभूती, मी याची डोळा पाहिली आहे..!
वरील कथांमधील, खऱ्या खोट्या गोष्टी मला माहिती नाही. ऐकीव माहितीच्या आधारे, मी हा लेख लिहिला आहे. परंतु, एक शिवभक्त म्हणून.
असं हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर, सर्वांनी याची देहा पहावं. असं मी, सर्व शिवभक्तांना आग्रहाचं आवाहन करत आहे..!

Sunday, 7 August 2016

सगळीकडे नोकरीची मारामार होती,

आणि एके दिवशी, अचानकपणे पुणे महानगरपालिकेच्या नोकरीचा मला कॉल आला. नाही म्हणता, मी फार खुश झालो होतो. पण, माझा आनंद जास्ती काळ काही टिकला नाही. कारण, सगळ्यात मोठी अडचण होती. ती म्हणजे, महापालिकेत एखाद्या बड्या व्यक्तीशी असणारी ओळख. किंवा, आपण त्याला वशिला सुद्धा म्हणू शकतो.
आणि, अशाप्रकारची माझी कुठेही ओळख नव्हती. मुलाखत होण्याअगोदर, कुठे काही वशिला लागतोय का. ते पाहण्यासाठी, थोडी ओळख काढावी म्हणून. मी, एका ठिकाणी माझ्या मित्राकरवी सेटिंग लावली. तर, तो गडी म्हणाला..
तू.. आपल्या ओळखीतला माणूस आहेस. म्हणून, एक लाख रुपयात आपण तुझं काम करून टाकू..!
त्यावेळी, माझ्याकडे दातावर मारायला सुद्धा पैसा नव्हता. आणि, लाख रुपये कोठून आणावेत..?
तो विषय, मी तिथेच सोडून दिला. सगळं काही, परमेश्वराच्या हवाली केलं.
आणि, ठरलेल्या तारखेला मुलाखतीला गेलो. एकूण पन्नास साठ मुलं त्या परीक्षेला आली होती. तोंडी मुलाखतीत, मी उत्कृष्ट गुणाने पास झालो होतो. मुलाखती दरम्यान आलेल्या प्रत्येक ड्रायव्हरला.. त्याठिकाणी, एक कॉमन प्रश्न विचारला जायचा.
इथे, कामाला लागल्यावर " सगळ्या पुण्याचा कचरा वाहावा लागतो..! "
जमेल का..?
काही मुलं, या प्रश्नाला जागेवर थबकायचे. विचारात पडायचे, तर काही मुलं.. रुबाबात, हातातील दुसरा कॉल दाखवत आम्हाला म्हणायचे. कचरा कोण वाहील..? माझ्या हातात लगेच दुसरा कॉल आहे. तिकडं कामाला निघून जाईल. पण, कचरा वाहणार नाही..!
आम्ही लोकं गरजवंत होतो. मुलाखतीत, साहेबाच्या हो ला हो म्हणून, त्यानंतर असणाऱ्या, मोठ्या हेवी गाडीवर ट्रायल देवून, त्यात हि पास झालो. आणि, एकदाचा कामावर रुजू झालो.
कोणाला रुपया दिला नाही. कि , कोणाचा वशिला नाही. घरून कामापर्यंत जाण्यायेण्याचा जो काही खर्च झाला. तोच, मोठा खर्च म्हणायचा.
आणि.. पुणे महानगर पालिकेत, मोटार सारथी म्हणून मी कामाला लागलो.
मी सुरवातीपासून लहान गाड्यांवर कामं केली असल्याने. अती अवजड वाहनं, मला चालवता येत नव्हती. कारण, त्याचा योग्य सराव मी केला नव्हता. पण, आता मला ती वाहनं चालवणं क्रमप्राप्त होतं. मी मारून मुटकून काम करत होतो. पण, पुण्यातील.. छोट्या गल्ली बोळातल्या रस्त्यावरून सराईतपणे ती वाहनं मला हाकता येत नव्हती. पुण्यातील पेठांमधून, कचऱ्याने भरलेली अवजड गाडी चालवत असताना माझी फारच कसरत व्हायची.
एकतर, मी उंचीने बराच बुटका. त्यामुळे ड्रायव्हर सीट, स्टियरिंग आणि.. क्लज, ब्रेक, एक्सिलेटर पर्यंत माझा पाय जेमतेमच पोहोचायचा. क्लज आणि ब्रेक पर्यंत विनासायास माझे पाय पोहोचावे. म्हणून, मी सीटच्या पाठीकडील बाजूस. कचऱ्यात मिळालेली एखादी जाडशी उशी टेकन म्हणून लावायचो. तेंव्हा कुठे मी माझ्या लक्षा पर्यंत व्यवस्थित पोहोचायचो. त्यामुळे, अगदी कम्फर्ट होऊन मनमोकळी अशी मला गाडी चालवता येत नव्हती.
त्यात, त्या गाड्या बऱ्याच जुन्या असल्याने. आवाज आणि धुराचा त्रास व्हायचा. ह्या सगळ्या त्रासात, रात्री झोपेत सुद्धा माझ्या डोक्यात गाडीची घरघर चालू असायची. त्यामुळे, मी पुरता वैतागून गेलो होतो. पण दिवस ढकलत होतो. एकेदिवशी, मी माझ्या बायकोला म्हणालो.
हे काम मला काही झेपत नाहीये..! काय करू..?
ती बिचारी काय बोलणार, म्हणाली.. नसेल झेपत तर सोडून द्या. पण, जीवाला त्रास करून घेऊ नका. त्यामुळे, वैतागून मी हे सोन्या सारखं काम सुद्धा सोडून द्यायला निघालो होतो.
पण.. त्यावेळी माझ्या सोबतच मोटार सारथी म्हणून कामाला लागलेल्या.
" राम माने " नावाचा एक मित्र माझ्या पाठीशी धावून आला. आमची, तशी काही खास ओळख नव्हती. पण, मुलाखती दरम्यानच्या काळात आमची चांगली ओळख झाली होती. त्यामुळे, माझं दुखः मी त्याच्यासमोर व्यक्त केलं होतं.
त्यावेळी.. त्याने माझी खूप मनधरणी केली.
मित्रा, आपल्याला अगदी फुकटात नोकरी लागली आहे. लाखो रुपये भरून, लोकांना सरकारी नोकऱ्या लागत नाही. तुला काही पैश्याची अडचण असेल तर मला सांग. पण, तू नोकरी सोडू नकोस राव. अशी संधी परत येणार नाही. तुझं शिक्षण झालंय, पुढे मागे तू इथून बदली करून घे.
पण काम सोडू नकोस..!
त्या मित्राच्या, कळकळीच्या विनंतीला मान देऊन. मी नोकरीवर कायम राहण्याचं ठरवलं.
दोनेक महिन्यात, माझ्या शिक्षणाच्या आधारे. मला, आमच्या डेपोतील आर.टी.ओ. पासिंग विभागात काम करायची संधी मिळाली. त्यामुळे, पालिकेत मी थोडा स्थिरस्थावर झालो. त्या विभागात, प्रत्येक प्रकारच्या गाड्या कामासाठी यायच्या. नवीन गाड्यांचं रजिस्ट्रेशन करणं, जुन्या गाड्यांचं पासिंग करून घेणं. खटल्याची कामं पाहणं. अशी, विविध प्रकारची कामं मला तिथे करावी लागत होती. सोबतच, तिथे असणाऱ्या सर्वप्रकारच्या गाड्या पासिंग करिता मलाच न्याव्या लागत होत्या. त्यामुळे, थोड्याच अवधीत प्रत्येक प्रकारच्या लहान मोठ्या गाड्यांवर माझा हात साफ झाला होता. सगळ्या गाड्या, मी अगदी सफाईदारपणे चालवायला लागलो होतो.
दरम्यानच्या काळात, कचरा गाडीवर काम करून. माझा, हा राम नावाचा मित्र दारूच्या पक्का आहारी गेला. अगदी किरकोळ शरीरयष्टी असणाऱ्या रामला अगदी खपाटीला गेलेलं पोट होतं. पण, गडी फार चपळ होता. त्याला पाहिल्यावर, मला तर तो कधी दारू पिलेला वाटायचा नाही. त्याचं चालनं व्यवस्थित, बोलणं व्यवस्थित. त्यामुळे, मला ते सगळं खोटं वाटत होतं. पण.. ज्या-ज्या वेळी, तो मला भेटायचा. तेंव्हा त्याचं एक फेवरेट वाक्य ठरलेलं असायचं.
" भावड्या.. आज, माझ्यामुळं कामावर हायेस बरं का तू..! "
मी सुद्धा त्याचा आदर राखत, त्याच्या बोलण्यात माझा होकार मिसळायचो. तसं पाहायला गेलं, तर त्याच्या या वाक्यात फार मोठी सत्यता होती. नंतर नंतर, त्याचं दारू पिण्याचं प्रमाण फारच वाढलं. एकदोन वेळा मी त्याला समजावून सुद्धा सांगितलं. बायको मुलांच्या शपता घातल्या. त्यावर, तेवढ्या पुरतं, तो मला.. हो म्हणायचा. आणि.. पुन्हा ए रे माझ्या मागल्या, अशातली गत व्हायची. दरम्यानच्या काळात, मी सुद्धा पासिंग सेक्शन सोडून बाहेर दुसऱ्या एका फिक्स गाडीवर कामाला लागलो. त्यामुळे, रामची आणि माझी भेट काही होत नव्हती.
त्यानंतर, तब्बल वर्ष भरानंतर.. असाच, एकदा तो मला भेटला.
त्याने,कपाळावर चार बोटं भरून ठसठशीत भंडारा लावला होता. त्यावर, कपाळाच्या मधोमध कुंकवाची एक रेघ सुद्धा ओढली होती. त्याचा चेहेरा, मला अगदी प्रसन्न वाटत होता. मला पाहताच, त्याने मला एक कडकडून मिठी मारली. आणि म्हणाला, भावड्या खंडोबाच्या वाऱ्या सुरु केल्या बरं का. आता लई बरं वाटतय बघ.
भावड्या.. मी दारूला रामराम केला बरं का..! लई पिडलं होतं तिनं.
मला सुद्धा, फार आनंद वाटला. दारूचं व्यसन वाईट, दारूमुळे संसाराची वाट लागते. हे काही, मी नव्याने सांगायला नको.
त्यानंतर.. दोनेक महिन्यांनी तो पुन्हा मला दिसला. कसलं काय, गडी मजबूत दारू प्यायला होता. त्याने मला जसं पाहिलं, तसं त्याने आपलं तोंड लपवलं. मी सुद्धा, त्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं. आणि, तेथून निघून गेलो. नंतर, बाहेरून काही मित्रांकरवी मला समजायचं. कि, माने आता जास्तीच दारू प्यायला लागला आहे. कधी मधी, कामावर दांड्या सुद्धा मारायला लागला आहे.
हे ऐकून, मला फार वाईट वाटायचं. पण, काही गोष्टींना पर्याय नसतो.
काही लोकांच्या, मला कागाळ्या सुद्धा आल्या होत्या. कि, माने आता मित्रांना दारू पिण्याकारिता पैसे मागू लागला आहे. चांगल्या घरचा गडी, मोठ्या पगाराची नोकरी. पण हा, नको तसं वागायला लागला होता. पण, मी भेटल्यावर मला कधी त्याने दारूकारिता पैसे मागितले नव्हते. त्यामुळे, त्या मित्रांच्या या कागाळ्या मी सरळ धुडकावून लावायचो.
एकदा.. त्याच्या एका पिताड मित्राबरोबर, तो मला भेटला. आणि, पुन्हा त्याने तेच भजन सुरु केलं.
त्या बेवड्याला तो त्याची फुशारकी सांगत होता..
हे बग, ह्यो मित्र आज माझ्यामुळं इथं कामाला हाये. नायतर, काम सोडून निघाला होता.
जाऊदेत म्हणून, हि वेळ सुद्धा मी मारून नेली.
पण काय असतं.. एकच गोष्ट, आपल्याला कोणी सारखं सारखं सुनवायला लागलं. कि, त्याची चव निघून जाते. त्याचा वीट येतो. त्यात, म्हणावा असा कस राहत नाही. आणि, ऐकणारा सुद्धा शेवटी वैतागून जातोच कि.
त्यादिवशी मात्र, माझ्या रागाचा पारा खूपच चढला होता.
रागाच्या भरात, मी त्याला म्हणालो.
माने, कितीवेळा एकच गोष्ट सांगायची..? एकदा झालं, दोनदा झालं.. गेली पंधरा वर्ष झाली. मी भेटलो, कि तुझ्या तोंडात हेच वाक्य असतं. काही गोष्टींना मर्यादा असते राव. मान्य आहे, तुझे माझ्यावर लाख उपकार आहेत.
पण बस.. हे वाक्य, मला पुन्हा तुझ्या तोंडी नको आहे बरं का..!
हे सगळं काही, मी त्याला अगदी शांततेत आणि सौम्य भाषेत समजावून सांगितलं होतं.
त्याला, मी हे सांगत असताना, तो दारूच्या पूर्ण अमलाखाली होता. पण.. छद्मी हास्य करत, माझ्या डोळ्यात डोळे घालून तो हे सर्व ऐकत होता. आणि, हळुवार होकारार्थी अशी आपली मान सुद्धा डोलावत होता.
झालं.. माझं बोलनं संपल्यावर तो मला म्हणाला..
कुंभार.. यापुढं, हे वाक्य मी तुला कधीच नाय बोलणार..!
असं म्हणून, शरीराला झोकांड्या देत तो तेथून चालता झाला.
मी कामाला एकीकडे, तर तो दुसरीकडे. म्हणून, सलग दोनेक महिने त्याची आणि माझी काही भेट झालीच नाही. एकदा, माझ्या गाडीत डीझेल भरण्याकरिता मी आमच्या व्हेईकल डेपोमध्ये गेलो असता. तिथे असणाऱ्या, सूचना फलकावर माझं लक्ष गेलं. त्या फलकावर, नेहेमी काहीना काही लिहिलेलं असायचं. कधी युनियनची मिटिंग असायची. तर कधी काय, तर कधी काय.
पण, आज त्याठिकाणी काहीतरी वेगळंच लिहिलं गेलं होतं.
मजकूर होता,
आपल्या डेपोमध्ये कार्यरत असणारे मोटार सारथी, श्री. राम माने यांचं दुखःद निधन. आणि, हे सर्व घडून एक आठवडा उलटून गेला होता.
हि बातमी, माझ्या मनाला फार चटका लावणारी होती. चौकशी केली असता समजलं. नशेच्या भरात, जीवनाला कंटाळून त्याने घरातच फाशी घेतली होती. त्याच्या घरी जाऊन भेटावं, तर त्याच्या घरच्यांची आणि माझी बिलकुल ओळख नव्हती. विनाकारण, त्यांना काही वेगळं वाटू नये. म्हणून, मी त्याच्या घरी जाणं सुद्धा टाळलं.
गेला.. सुटला बिचारा, आज, मी महापालिकेत जी सेवा करत आहे. किंवा, ज्या कामामुळे माझ्या घरची आज चूल पेटत आहे. ती, या राम माने नावाच्या मित्रामुळे. नाहीतर, हातचं काम सोडून दिल्यावर. आज, मी काय असतो. आणि, कोठे असतो. ते मला ठावूक नाही. कसा का असेना, पण माझ्या आयुष्यात आलेला तो माझा एक खास मित्र होता.
शेवटी दारुनेच त्याला गिळला. पण, त्याने मला दिलेला शब्द मात्र पाळला.
पुन्हा फिरून,
तो.. ते वाक्यं, मला कधीच बोलला नाही.
" भावड्या.. आज, माझ्यामुळं कामावर हायेस बरं का तू..! "

Tuesday, 2 August 2016

उत्तराखंडमधील, शेवटचं भारतीय गाव " माना "
~~~~~~~~~~~~~~~~~~~
बद्रिनाथाचं दर्शन आटोपलं,
भंडाऱ्यात जेवणं उरकली. दुपारचे तीन वाजले होते, दिवस बुडायला अजून बराच अवकाश होता. म्हणून, बद्रिनाथाच्या पर्वतराजीत असणाऱ्या. आणि, भारतातल्या शेवटच्या " माना " नावाच्या गावात आमचा ड्रायव्हर 'पवार' आम्हाला घेऊन निघाला..!
बद्रीनाथ धामापासून, अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणारं हे माना नावाचं गाव. एरवी, तसं फारच सुमसाम असतं.
चारधाम यात्रा जेंव्हा चालू असते. तोवरच, इथे त्या ग्रामस्थ लोकांचा वावर असतो. अन्यथा, दिवाळीनंतर स्नो फॉल सुरु झाल्यावर. चमोली नावाच्या, मोठ्या गावामध्ये येथील लोकं वास्तव्याला जातात.
या लोकांची, माना आणि चमोली अशा दोन्ही ठिकाणी घरं आहेत. चमोली गावात सुद्धा हि लोकं उंच पहाडावर राहत असतात. आपल्यासाठी, अशी घरं पाहणं म्हणा किंवा तिथे राहणं म्हणा. हि एकप्रकारची मौज असते. पण, रोज मरे त्याला कोण रडे. ह्या म्हणी प्रमाणे.. ती लोकं, जमेल तशी जीवन कंठत असतात.
रेडीमेड लोकरीपासून, उणी कपडे बनवणे. कशिदाकारी करणे आणि गुरं ढोरं सांभाळणे. हि, या लोकांची प्रमुख कामं आहेत. यात्रा काळातील सिजनमध्ये, हि लोकं चमोली येथून माना येथे राहायला येतात. मे महिना.. ते, साधारण नोव्हेंबर महिन्या पर्यंत या लोकांचं इथे वास्तव्य असतं. त्यानंतर, यांची घरं कुलुपबंद सुद्धा असतात. आणि, बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडलेली सुद्धा असतात. या सिजनच्या काळात, इथे राहायला जी लोकं येतात.
त्यामध्ये, प्रामुख्याने " वयोवृद्ध " आणि, " बिन " कामाच्या लोकांची फार मोठी भरती असते. चपट्या तोंडाची, किंवा हवं तर नाकाची दिसणारी म्हणा. हि लोकं, त्या माना नावाच्या गावातील भागात आपल्यामोर शिवणकाम किंवा कशिदाकारी करण्याचं निव्वळ नाटकं करत असतात.
आणि, तिथे असणाऱ्या त्या महिला. ज्याठिकाणी, त्यांचं स्वेटर विणण्याचं काम करायला बसलेल्या असतात. तिथे, एका झोपडी वजा दुकानात. त्यांनी..पाच पन्नास स्वेटर, कानटोप्या आणि हातमोजे वगैरे अडकवून ठेवलेले असतात.
त्या ठिकाणी, ते अशा अविर्भावात आपल्याशी बातचीत करत असतात. कि जसं काही, त्यांनी तिथे थाटला असणारा सगळा 'माल' जसा काही, त्यांच्या हातानेच बनवलेला असावा.
इतक्या लांबून फिरायला आलेल्या लोकांना काय आहे हो. फक्त, एक 'आठवण' हवी असते.
कि..हि, अमुक एक वस्तू आम्ही भारताच्या शेवटच्या गावातून आणली आहे.
झालं, या गोष्टीचा गैरफायदा घेत. ती स्थानिक लोकं, पर्यटकांना " भावनिकदृष्ट्या " घायाळ " करत. आपला माल, चांगल्या आणि मोठ्या किमतीत त्यांच्या गळ्यात मारून मोकळे होतात.
शिवाय, या लोकांना माणसाची भलतीच पारख आहे बरं का. नेमका, कोण खरीददार आहे. आणि, कोण मुसाफिर आहे..? हे.. ती लोकं, ताबडतोब ओळखतात. आणि त्या-त्या लोकांना, अगदी तशीच ट्रीटमेंट ती लोकं देतात.
मी.. मुलखाचा शहाणा माणूस. मी कशाला तिथे खरेदी करतोय..! तरी सुद्धा, त्याठिकाणी मी जुजबी खरेदी केली. कसल्याशा पुडीत असणारा हिरवा 'पाला' मी ग्रीन टी म्हणून विकत घेतला. आणि, घरी आल्यावर तो पाला फेकून सुद्धा दिला. हे सर्व, त्या लोकांच्या मनधरणी करिता मी केलं होतं.
उत्तराखंडमधील बऱ्याच भागात, मी अत्यंत गरिबी आणि सदाचार पाहिला होता. पण, माना या गावामध्ये, खूपच माजोरडी लोकं आहेत. एकतर, सगळे चपट्या तोंडाची लोकं आहेत. पण त्यांचा रुबाब किती मोठा..
त्यांचा कोणी फोटो काढला, कि लगेच ते आपसात कुजबुज करायचे. जसे काही हे फार मोठे सेलिब्रिटी असावेत. आणि, फोटो काढणाऱ्या व्यक्तीकडून चक्क पैश्यांची अपेक्षा करायचे.
एका ठिकाणी.. मी फोटो काढल्यावर, तिथे असणारा एक थेरडा मनुष्य मला म्हणाला.
" फोटो काढायच्या अगोदर, तू मला विचारलं का नाही..? "
ह्याच्या तर आयला...
जसा काही, याचा फोटो घेऊन तो प्रदर्शित करून मी लगेच लाखो रुपये कमवणार होतो..!
नालायक लोकं साली.
यांच्या, अशा वागणुकीमुळे. माझं मस्तक खूपच फिरलं होतं. आणि, घडीभर का होईना. महाराष्ट्रीयन लोकं, परप्रांतीयांना त्रास का देत असावेत..? याचा, थोडाफार उलघडा सुद्धा झाला.
तो थेरडा, असं बोलल्यावर. मी, तडक त्या थेरड्या पाशी गेलो,
त्याला.. त्याचा फोटो दाखवला. आणि, त्याच्या समोरच त्या फोटोची 'राखरांगोळी' केली. माझ्या केमेर्यातून मी तो फोटो लगेच काढून टाकला. येवढा कसला माज आलाय साल्यांना..?
अती फालतू लोकांना, मी जास्तीची किंमत मी कधीच देत नसतो.
नाहीतर, तो थेरडा आज इथे या पोस्टवर झळकला असता. आणि, वाहवा सुद्धा मिळवून गेला असता..!
पुढे गेलो, तिथे एक गणेश मंदिर होतं. तिथे आम्ही, सर्वजन नतमस्तक झालो. आणि, त्यापुढे असणाऱ्या व्यास गुफेकडे चालते झालो. श्री गणेश भगवानांनी या ठिकाणी व्यास ऋषीच्या वाणीतून येणारा महाभारत हा ग्रंथ लिहिला.
तिथून पुढे गेलो, आणि भारतातील शेवटच्या गावातील शेवटचा चहा पिऊन आलो. मला तर चहा काही आवडत नाही, तरी सुद्धा मी तिथे चहा पिलो. काय करता, एक आठवण म्हणून नवीन काहीतरी करायलाच हवं नाही का. तर, तिथून खाली उतरून आल्यावर, तळभागात एक दुसरा फाटा फुटला. त्या रस्त्याने, आम्ही सरळ निघून गेलो. बरच अंतर चालून गेल्यावर. वाटेत, दगडाच्या एका कपारीत काही नग्न साधू लोकं बसले होते. ते स्वतःला, नागा साधू म्हणवून घेत होते. नागा साधू, याविषयी मला बरच सखोल ज्ञान असल्याने. त्यांना टाळत, मी पुढे निघून गेलो.
पुढील बाजूस अलकनंदा आणि गुप्त असलेल्या सरस्वती नदीच्या वरून पलीकडे जाण्याकरिता एक मोठी दगडी शिळा दोन्ही तीराच्या मधोमध अगदी विनासायास अडकून बसली होती. या शिळेला, 'भीमपूल' असं संबोधलं जातं. त्यामागील कथा सुद्धा फारच रोचक आहे. ती पुढीलप्रमाणे,
कलियुग सुरु होण्याआगोदर..
पाच पांडव, आणि माता द्रौपदी स्वर्गारोहनला जात असताना. वाटेत, सरस्वती नदी आडवी आली. आज जरी, सरस्वती नदी अस्तिवात नसली. तरी तिचं अस्तीत्व तेंव्हा होतं. आणि, तोच गुप्त अस्तित्व, हा आजवर फार मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.
तर, त्या ठिकाणी.. ती नदी. माता, द्रौपदीला ओलांडता येत नव्हती. त्यावेळी, बलभिमाने त्यांची सहाय्यता करण्याकरिता. एक.. भली मोठी शिळा, त्या नदीच्या दोन्ही उंच तटावर आणून टाकली. आणि, अशा रीतीने माता द्रौपदी सहित पाच पांडव स्वर्गारोहनाला निघून गेले.
म्हणून, त्या पुलाला " भिमपुल " असं नाव पडलं आहे.
आणि, त्या पुलाला पडलेलं ते नाव. पुरातन काळापासून आजवर तसच प्रचलितही आहे.

Monday, 1 August 2016

मी मरताना, तुम्ही शोक करू नका.
एक बेवडा मेला,
असं तर मुळीच म्हणू नका.
विश्वास ठेवा गड्यांनो, 
मी 'अमृतपानच' करत होतो.
माझ्या पिंडावर तुम्ही,
चुकुनही " दारू " ठेवू नका..!