Friday, 12 August 2016

भोगविलासी जीवनाला कंटाळून,
एक तरुण, आपला देह त्यागण्यासाठी जंगलाच्या दिशेने निघालेला असतो. त्यामागे, त्या तरुणाचं एकच उद्धिष्ट असतं. कि आजवर, मी या जीवनात सर्वप्रकारच्या मौजमजा केल्या आहेत. आणि, जीवनात नवीन काही करण्यासारखं आता माझ्याकडे उरलंच नाहीये.
या सर्व गोष्टीचा तिटकारा आल्यामुळे, देहत्याग करण्यासाठी तो जंगलाच्या दिशेने निघालेला असतो.
जंगलात जाण्यामागे सुद्धा कारण हेच, कि आजवर.. मी जे काही भोगविलासी जीवन जगलो आहे. तर माझ्या मृत्यूनंतर, माझा देह कोणत्या तरी प्राण्याच्या उपयोगी पडावा. माझ्या हाडामासाच्या गोळ्यापासून कोणाची तरी क्षुधाशांती व्हावी. हाच त्यमागे प्रामाणिक हेतू असतो.
जंगलात जात असताना..
वाटेत, त्याला एक ऋषीमुनी भेटतात. तो तरुण,त्या ऋषींना शरण जातो. आणि, त्याच्या जीवनाला कंटाळल्याचं कारण तो त्यांच्यासमोर विशद करतो. ते ऋषी सुद्धा त्याला आज्ञा करतात..
वत्सा.. हा मानव जन्म पुन्हा नाही, असा देहत्याग करू नकोस...! जा, काही समाज उपयोगी कार्य कर जेणेकरून तुझं पापक्षालन होईल. जा वत्सा, यशस्वी भवः
ऋषींचा आशीर्वाद घेऊन, तो तरुण त्याच्या भ्रमंतीला सुरवात करतो. याच्या आजवरच्या जीवनात याने सगळे " नाद " केलेले असतात. त्यामुळे, त्याला आता कसलीच इच्छा उरलेली नसते. भगवी वस्त्र परिधान करून, भिक्षा म्हणून जे मिळेत ते अन्न ग्रहण करत. हातून घडेल तेवढं सत्कर्म करत त्याची सतत भ्रमंती सुरु असते.
असाच प्रवास करत असताना, तो एका घनदाट जंगलात येऊन पोहोचतो. दिवस बुडायला आलेला असतो. आता तो सुद्धा, एक निवार्याचं ठिकाण शोधत असतो.
आणि दूरवर.. त्याला एक लहानशी कुटीया दिसते. त्याठिकाणी, आपली राहण्याची व पोटापाण्याची काहीतरी निश्चित सोय होईल. अशी आशा धरून, तो त्या लहानशा झोपडी वजा कुटीया पाशी पोहोचतो.
हा वाटसरू याचक असल्याने, तो दरवाजात उभा राहून याचना करतो.
या कुटीयेत कोणी आहे का..?
याचा आवाज ऐकून, त्या कुटीयेतून एक सुंदर आणि कमनीय देहाची युवती बाहेर येते. त्या रुपगर्वितेला पाहून हा सन्यासी तरुण तिला म्हणतो.
देवी, आजची रात्र मला इथे निवारा मिळेल का..!
नितांत सुंदर दिसणारा संन्यासी वाटसरू पाहून, ती युवती सुद्धा लगेच त्याच्या मदतीला धावून येते. त्याचं, आपल्या छोट्याशा कुटीयेत स्वागत करते. आपले वृद्ध पिता आज बाहेरगावी गेले आहेत. त्यांना यायला कदाचित उशीर होईल. आणि, त्यांच्या पश्चात आपल्याला या अंधाऱ्या रात्री या युवकाची सोबत सुद्धा होईल. असा विचार करत, ती तरुणी त्याचं कुटीयेत स्वागत करते. त्याच्यासाठी, मस्तपैकी जेवणाचा बेत करते. जेवणं उरकतात, थोड्या गप्पागोष्टी होतात. वेळ पुढे पुढे जात असते. चंद्र पश्चिमेकडे झुकू लागलेला असतो. आता, जवळपास झोपण्याची वेळ झालेली असते. पण, त्याठिकाणी एक फार मोठी अडचण असते.
ती कुटीया, फार लहान असते. त्यामुळे, तिथे दोन अपरिचित व्यक्तींना झोपण्यासाठी अगदी कटाकटी जागा होणार असते. शेवटी, कशीबशी दोन अंथरूनं अंथरली जातात. आणि, एक समजोता म्हणून दोन्ही अंथरुणाच्या मधोमध एक कापडी उशी ठेवली जाते. आणि, ते दोघेही निद्रादेवीच्या स्वाधीन होतात.
संन्यासी फार थकलेला असतो. त्यामुळे, तो तत्काळ झोपी जातो. पण, त्या राजबिंड्या संन्याशाला पाहून या तरुणीची मात्र झोप उडालेली असते. तिला वाटत असतं, येवढ्या अंधार्या रात्री आपणाला कोणी पाहायला नाहीये. सर्वप्रकारचा एकांत त्याठिकाणी असतो. आजच्या रात्री, तिचे वृद्ध वडील सुद्धा तिथे येणार नसतात. ती मनोमन स्वप्न रंगवत असते, हा तरणाबांड संन्याशी, आवेशाने आपल्या बाहुपाशात नक्कीच येईल. परंतु असं काहीएक घडत नाही. तो संन्यासी गाढ झोपी गेलेला असतो.
आणि, राम तेरी गंगा मैली, या सिनेमातील गीत,
कोही हसीना कदम पहेले बढाती नही. या उक्तीप्रमाणे, ती बिचारी तरुणी, रात्रभर तशीच तरमळत राहते.
रात्र संपते.. सकाळचं झुंजूमुंजू होतं. ती युवती, शुचिर्भूत होऊन आपल्या रोजच्या कामाला लागते. तोवर, जवळच वाहत असणाऱ्या नदीवर जाऊन अंघोळ करून हे संन्याशी महाशय परत येतात.
आल्यावर सगळी आवराआवर करत, तो निघण्याच्या तयारीत असतो.
तेव्हा, आभारप्रदर्शन करत तो त्या युवतीला म्हणतो..
धन्यवाद देवी.. मला निघायला उशीर होतोय. आज, समोर असणारा हा आडवा डोंगर मला पार करायचा आहे.
त्यावर.. चवताळून ती युवती त्या संन्याशाला म्हणते..!
" संपूर्ण रात्रीत, तू एक साधी कापडी उशी पार करू शकला नाहीस. आणि, हा डोंगर पार करायच्या मोठमोठ्या गप्पा काय करतोस..? "
हि बोधकथा इथेच समाप्त होते,
भोगविलासी जीवनाचा कंटाळा आल्याने. त्या तरुणाने, हे जीवन संपवण्यासाठी हा कठोर मार्ग पत्करलेला असतो. तर दुसरीकडे, एका पुरुषी मिलनाला आसुसलेल्या तरुणीची व्यथा याठिकाणी स्पष्ट होते.
त्यामुळे, कोणावरही कसल्याही प्रकारचा आरोप करण्यापूर्वी. नाण्याच्या दोन्ही बाजू प्रत्येकाने तपासनं फार महत्वाचं ठरतं..!!

2 comments:

  1. अगदी बरोबर आहे.
    ज्यावेळी आपल्या नात्यातील,मैत्रीतील, वा व्यवहारातील एखादा सहकारी एखादा निर्णय घेतो तेंव्हा त्याने त्या निर्णयासाठी आपले सर्वस्व सुद्धा पणाला लावलेले असू शकते.
    त्यासाठी हि बोधकथा अगदी समर्पक आहे.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर आहे.
    ज्यावेळी आपल्या नात्यातील,मैत्रीतील, वा व्यवहारातील एखादा सहकारी एखादा निर्णय घेतो तेंव्हा त्याने त्या निर्णयासाठी आपले सर्वस्व सुद्धा पणाला लावलेले असू शकते.
    त्यासाठी हि बोधकथा अगदी समर्पक आहे.

    ReplyDelete