Friday, 12 August 2016

लाखामंडल, एक अद्भुतरम्य शिवालय..!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चारधाम यात्रेला जात असताना.. हरिद्वार येथून पुढे गेल्यावर, मसुरी आणि देहरादून हि दोन प्रेक्षणीय अशी मोठी शहरं ओलांडून शंभर एक किलोमीटर अंतर पुढे गेल्यावर. बडकोट नावाच्या मोठ्या गावाच्या अलीकडे, तीसेक किमी अंतरावर. मुख्य रस्त्यापासून, डाव्या बाजूस सुमारे पाचेक किमी अंतरावर. आदी केदारनाथ, " लाखामंडल " नावाचं एक धार्मिक ठिकाण आहे. फारच वैशिष्ट्यपूर्ण असं हे ठिकाण आहे.
चारधाम केदारनाथ मंदिराची, छोटी प्रतिकृती असणारं हे मंदिर, तेथील आवार आणि तेथील नैसर्गिक संपदा पर्यटकांना, भाविकांना अगदी मोहवून टाकते.
१९८० च्या सुमारास, पुरातत्वशास्त्र विभागाने काही पौराणिक माहितीच्या आधारे. त्याठिकाणी, उत्खनन करत असताना. या मंदिराचा शोध लागला. अशी माहिती, मला त्याठिकाणी मिळाली.
या अद्भुत ठिकाणाला " लाखा मंडल " हे नाव का पडलं..?
तर, त्याठिकाणी उत्खनन करत असताना, शोधकर्त्यांना तिथे लहान मोठ्या अशा लाखो सुबक आणि दगडी मुर्त्या सापडल्या होत्या. पण आजमितीला, तिथे फारच कमी मुर्त्या आपणाला पाहायला मिळतात. त्यातील, काही मूर्तींची तस्करी झाली असावी, असंही समजलं जातं.
तर.. उदराच्या आड दडलेल्या या ठिकाणची महती फार अचाट आहे. या पवित्र ठिकाणाला,
" मर्डेश्वर महादेव " म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
वनवासात असताना, काही काळ पांडवांचं या भागात वास्तव्य होतं. पांडवाना जिवंत जाळण्याकरिता. दुर्योधनाने कुटनीती वापरून इथे एका लाक्षाग्रहाची निर्मिती केली होती. ज्यामध्ये, पांडवांना जिवंत जाळलं जाणार होतं. ( लाखे पासून बनवलेल्या त्या गृहाला लाक्षागृह किंवा लाखामंडल असं सुद्धा म्हंटलं गेलं आहे. ) परंतु, दुर्योधनाचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही..!
आणि, पुढील महाभारत घडलं..!
परंतु, पांडव याठिकाणी वास्तव्याला असताना. धर्मराज युधिष्ठिराने, याठिकाणी एका शिवलिंगाची स्थापना केली होती. ते ठिकाण म्हणजे, हे आजचं लाखामंडल आहे.
आजही त्या मंदिराच्या अवतीभवती, आपल्याला त्यातील काही विस्मयकारक आणि विविधप्रकारचे शिवलिंग पाहायला मिळतात.
मुख्य मंदिरातील शिवलिंगासमोर, अगदी समोरामोर मंदिराच्या बाहेरील बाजूस. पश्चिमेकडे मुख करून दोन भग्नावस्थेत असणारे द्वारपाल उभे आहेत.
या शिवलिंगाचं, एक फार मोठं वैशिष्ट्य होतं. कि, त्याकाळी.. त्या गावातील कोणताही व्यक्ती मृत पावत असताना. त्याला, मृतावस्थेच्या अगदी सुरवातीला. या, दोन्ही द्वारपालांच्या संमुख ठेवलं जायचं. आणि त्यावेळी, त्या मंदिरातील पुजाऱ्याच्या हातून अभिमंत्रित केलेलं पवित्र जल, त्या मृतात्म्यावर शिंपडलं असता. तो मृत व्यक्ती, त्याठिकाणी पुन्हा जीवित होत होता.
ज्यावेळी, मृत्यू घटिका समीप आली असताना. मुखातून राम राम हे उच्चार तरी करा, किंवा.. काहीच जमलं नाही. तर, मुखातून राम राम या उच्चाराची साक्ष तरी घडवील गेली पाहिजे. त्यानंतर, सदर व्यक्तीने उभ्या हयातीत गंगाजल प्राशन केलं नसेल, तर.. तत्पूर्वी, त्याने ते गंगाजल प्राशन करून घ्यावं. किंवा, त्याच्या मुखात कोणीतरी गंगाजल सोडावं, हे सर्व विधी केले असतां.
मृत्यू समयी, किंवा मृत्य पश्चात ती व्यक्ती तिथे साजिवंत होत असे. असा काहीसा परमेश्वरी चमत्कार तिथे होत होता. अशी दंतकथा आहे.
संभाव्य व्यक्ती, किंवा त्याचं कुटुंबीय या मृत्युसमयी या गोष्टींची पूर्तता करत असत. त्यावेळी, काही क्षणांकरीता तो मृत व्यक्ती तिथे जीवित होत असे. आणि, सगळे सोपस्कार, म्हणजे.. मृत्युपत्र म्हणा किंवा शेवटची इच्छा म्हणा. हे सर्व काही झाल्यानंतर. तो व्यक्ती किंवा महिला मृत होऊन थेट वैकुंठ प्राप्ती करत असे. अशी, फार मोठी दंतकथा मला त्याठिकाणी ऐकायला मिळाली.
आणखीन एक गूढ कथा, मला त्याठिकाणी ऐकायला मिळाली. हि गोष्ट, प्रत्येक व्यक्तीच्या पचनी पडेलच असं सांगता येत नाही. पण.. या दंतकथा किंवा सत्यकथा आहेत. यांना कोणी, चुकुनही भाकडकथा म्हणू नका. एवढीच एक, माझी प्रामाणिक विनंती आहे.
पुरातन काळात सुद्धा, पुत्रप्राप्ती ( मुल होणं ) हा फार मोठा विषय होता.
तर, त्याकाळी..
एखाद्या स्त्रीला, मुल होत नसेल. अशा, पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून इच्छुक असणाऱ्या महिला. या लाखामंडल मंदिरासमोर, महाशिवरात्रीच्या रात्री..
त्या मंदिरात, सतत तेवत असणाऱ्या शिव ज्योतीसमोर, " ज्योती त्राटक " करत असत. आणि सोबतच, शिव मंत्राचा जाप सुद्धा करत असत. असं केल्याने, एका वर्षाच्या आत. त्या महिलेला, शिव प्रभूंच्या आशीर्वादाने पुत्र रत्नाचा लाभ होत असे.
या मंदिराच्या आवारात, एक असं अद्भुत शिवलिंग आहे. कि, त्या शिवलिंगाच्या शाळीग्रामावर शुद्ध जल वाहीलं असता, त्या शाळीग्रामावर समोरील व्यक्तीची हुबेहूब प्रतिकृती दिसते. जणू काही अगदी आपल्या समोर आरसाच ठेवला असावा. ती अनुभूती, मी याची डोळा पाहिली आहे..!
वरील कथांमधील, खऱ्या खोट्या गोष्टी मला माहिती नाही. ऐकीव माहितीच्या आधारे, मी हा लेख लिहिला आहे. परंतु, एक शिवभक्त म्हणून.
असं हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर, सर्वांनी याची देहा पहावं. असं मी, सर्व शिवभक्तांना आग्रहाचं आवाहन करत आहे..!

No comments:

Post a Comment