Friday, 26 August 2016

या पृथ्वीतलावर मनुष्याने जन्म घ्यायच्या कित्तेक वर्ष अगोदर. काही कृमी कीटकांची निर्मिती झाली होती, असं माझ्या ऐकिवात आहे. परमेश्वराने हि पृथ्वी निर्माण करताना, इथे असणाऱ्या प्रत्येक जीवजंतूला काहीतरी विशीष्ट कारणाने बनवलं असावं असं वाटून जातं. पण अपना सर्वांना त्या जीवजंतूची निर्मिती नेमकी का आणि कशासाठी केली गेली असावी. याचं संपूर्ण ज्ञान नाहीये. पण, विनाकारणच कोणत्याही गोष्टीची निर्मिती झाली नाही. ज्याला भूक लागते. तिथे आत्मा वसत असतो. आणि, आत्मा असणाऱ्या सर्व गोष्टीत जीव असतो. पण काहीवेळा, या नको त्या जीवांचा मला फार तिटकारा येतो. किंवा यांच्या निर्मिती मागचं नेमकं इंगित काय आहे..? हा प्रश्न मला सतत भेडसावत असतो..!
मच्छर :- साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है. हा झाला फिल्मी डायलॉग. पण बघा ना, सात दिवसाचं आयुष्य असणारा हा मच्छर माणसाला डसल्यावर त्याला सात जन्माची आठवण करून देतो. काहीवेळा हा दंश इतका घातकी असतो. कि, तो माणसाला आहे तो जन्म सुद्धा व्यवस्थितपणे जगू देत नाही. साधा काळा मच्छर चावल्यावर फारतर, अंगावर मोठाल्या गांध्या उठल्या जायच्या. आणि त्यासोबत एक जोरदार कळ सुद्धा मोफत मिळायची. पण आता नव्या दमाचे मच्छर.. डेंगू, चिकुनगुन्या, मलेरिया, टायफाईड आणि कसले कसले रोग बहाल करून जातो ते त्याचं त्यालाच माहिती.
का.. याची निर्मिती नेमक्या कोणत्या उद्देशाने केली गेली असावी. मला तर कधी कधी असा दाट संशय येतो. कि, हि समस्त दुनियादारी या मच्छर मुळेच नष्ट होतेय कि काय.
ढेकुण :- हा प्राणी निर्माण करून, परमेश्वराने समस्त मानव जातीवर फार मोठा सूड उगवला असावा. असं राहून राहून मला वाटत असत. कसला नालायक प्राणी आहे हा, माणसाला शांत चीत्तेने झोपून देईल तर शपत. आणि, हि राक्षसाच्या पोटची अवलाद. मारेल तशी वाढतच जाते. पण कमी व्हायचं नाव घेत नाही. माणूस थकून आला आहे, किंवा आजारी आहे. याची कसलीच जाणीव नसते हो त्याला. फक्त चावणे एकं चावणे इतकंच माहिती असतं त्याला. बरं चाउदेत मरुदेत,आपल्या शरीरात मस्त दोन तीन लिटर रक्त असतं. तो छोटासा जीव असं पिऊन पिऊन किती रक्त पिणार आहे..? म्हणून मी त्याला थोडा सॉफ्ट कॉर्नर सुद्धा देवू इच्छित होतो. पण गप चावेल तो ढेकुण कसला. रक्त सुद्धा पितो आणि माणसाला बोंबाबोंब सुद्धा करायला लावतो. स्वतः हकनाक मरतो. आणि, दुसऱ्याची जिंदगी हराम करतो.
झुरळ :- हा एक फार कमालीचा प्राणी आहे. आपल्या घरामध्ये, नको त्या भागात लुडबूड करत असताना हा आपल्याला आढळतो. तसा तर, हा फार निरुपद्रवी प्राणी आहे. त्याच्या असण्याने कोणाला काही खास त्रास होत नाही. पण त्याच्या अस्तित्वाने एकप्रकारचे किळसवाणे जीवन आपल्या वाट्याला येत असते. या प्राण्याचा मुक्काम खासकरून स्वयपाकघरात असतो. आणि बाहेरील बाजूस, नाल्याच्या किंवा बाथरूमच्या अडगळीत हि झुरळे हमखास आढळतात. यांची जास्ती प्रमाणात संख्या वाढली कि खरी मज्जा सुरु होते. तोपर्यंत याची कोणी गांभीर्याने दखल घेत नाही. यांच्या शरीराची वाढ होईल तसे ते थोड्याफार प्रमाणात हवेत उडू सुद्धा शकतात. त्यामुळे ते भलतेच तापदायक व किळसवाणे वाटू लागतात. जेवण करत असताना, चुकून जेवणाच्या ताटावरून यांची स्वारी गेली. कि खाल्लेल्या गोष्टी पोटातून बाहेर पडायला अवकाश लागत नाही. किंवा, तिथून पुढील जेवण तरी आपल्याला गिळवत नाही. या झुरळांची निर्मिती का आणि कशासाठी झाली असावी. हा फार मोठा प्रश्न आहे. मी तर असं सुद्धा ऐकलं आहे. कि, हि झुरळं.. एलीयंस लोकांबरोबर अंतराळातून आले आहेत. आणि, सगळ्या पृथ्वीचा विनाश झाला तरी. यांचा कधीही अंत होणार नाहीये.
मुंगी :- हा जीव मात्र मला फार जिव्हाळ्याचा वाटतो. या मुंग्यांसारखी हुशार बुद्धिमत्ता माणसाकडे सुद्धा नसावी,असं कधी कधी वाटून जातं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हा कानमंत्र बहुतेक मुंग्यांनीच आपल्याला दिला असावा. मुद्दाम तिच्या वाटेला गेलं तरच ती आपल्याला दंश करते. अन्यथा ती कोणाच्या वाटेला जाताच नसते. असा माझा तरी अनुभव आहे. साखरेचं खाणार, आणि गपगुमान राहणार. शिस्तबद्ध चालीत चालणाऱ्या मुंग्यांसारखी बुद्धिमत्ता प्रत्येकाकडे असावी असं मला वारंवार वाटत असतं. आपल्या वजनापेक्षा जास्ती मोठा बोजा त्या लीलया ढकलत नेत असतात. यातच त्यांचं खरं सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळतं. पावसाळा येण्यापूर्वीच आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची लगबग अगदी पाहण्यासारखी असते. मातीचा कणकण गोळा करून भलंमोठं वारूळ त्या बनवतात. आपल्या नांगीतून मातीचा कण वाहत असताना. त्या मातीच्या कणात, त्यांच्या विषाचा अंश सुद्धा मिसळून जातो. आणि हीच वारुळाची माती पायावरील भेगा ( जळवात ) यावर लेप करून लावली असता. त्या रोगाचा मुळापासून नायनाट होतो.
परमेश्वराची लीलाच न्यारी, कुठे दुखः तर कुठे हवीहवीशी लाचारी..!

2 comments:

  1. परमेश्वराची लीलाच न्यारी, कुठे दुखः तर कुठे हवीहवीशी लाचारी..!

    एकदम सही....👌

    ReplyDelete