Saturday, 24 September 2016

पूर्वी.. सावकारी करणारा माझा एक मित्र होता..!
भयंकर चेंगट माणूस....
सणावाराला, हाताच्या आठी बोटात सोन्याच्या अंगठ्या घालायचा. गळ्यात पाचेक तोळ्याची सोनसाखळी घालायचा. पण त्या सगळ्या अंगठ्या पिळ्याच्या असायच्या. त्याला, असं का म्हणूनं विचारलं, तर म्हणायचा..
" डिझाईनच्या अंगठ्यांना मोडताना घट फार येते..!
प्रत्येक गोष्टीत, त्याचा बारीकसारीक विचार असायचा. त्याने उभ्या जन्मात कोणतच व्यसन अंगाला लाऊन घेतलं नव्हतं. त्याला कारण म्हणजे, व्यसन करायचं म्हणजे खर्च आलाच ना..!
परंतु त्यातूनही, हा व्यक्ती कधीमधी दारू प्यायचा. पण, स्वतःच्या पैशाने बिलकुल नाही बरं का. दारूसाठी स्वतःच्या खिशाला त्याने कधीच चाट दिलेला मी पाहिला नाही.
त्याला दारू पिण्याची तलफ झाली, कि मला म्हणायचा.. पंडितराव, तुम्हाला दारू प्यायची इच्छा आहे का..?
सवयी प्रमाणे, मी सुद्धा त्याला नाही म्हणून सांगायचो.
त्यावर तो म्हणायचा, तुम्ही नुसतं हो तरी म्हणा राव..! मग मी, बळेबळेच त्याला होकार द्यायचो.
मग तो, त्याच्या एखाद्या गिर्हाईकाला तिथे बोलवून घ्यायचा. आणि, त्याला सांगायचा.
दोन गार बेर घेऊन ये ( तो बियरला बेर म्हणायचा..! ) पंडित रावांना आज इच्छा झालीय. आणि विनाकारण, ते बिल तो माझ्या नावे फाडायचा..!
तो बिचारा देणेकरी, त्याच्या सावकारी खाली झुकलेला असायचा. गपगुमान मारून मुटकून तो दोन बियरच्या बाटल्या घेऊन यायचा. आणि, मी पीत नाहीये असं समजल्यावर. त्यातील एक बियर तो देणेकरी स्वतः प्यायचा. त्यामुळे, किमान बियर करीता त्याचे पैसे गेल्याचं त्याला दुखः तरी होत नसायचं.
या बाबाने, पै-पै करून पैसा कमवला, रग्गड माल आहे त्याच्याकडे. पण त्याने, कधीही मोकळ्या हाताने स्वतःकरिता खर्च केला नाही. तर, दुसऱ्या कोना व्यक्तीला खर्च करायचा विषय खूप लांब होता. कधी देवधर्म नाही कि हौस मौज नाही. तो बहाद्दर पैसे खर्च होण्याच्या भीतीने कधी बाहेरगावी फिरायला सुद्धा गेला नाही. खास सांगायला गेलं तर, हा पुण्याच्या बाहेर कधी गेलाच नाही..!
मध्यंतरी..
माझे काही मित्र आणि मी बाहेरगावी फिरायला निघालो होतो. संध्याकाळच्या मज्जेकरिता वारुणी खरेदीसाठी आम्ही एका वाईनच्या दुकानापाशी आमची गाडी थांबवली.
माझे बाकी मित्र वारुनी खरेदी करण्यात व्यस्थ होते. आणि माझं लक्ष गेलं, तर.. त्या दुकानाबाहेर माझ्या त्या सावकार मित्राचा एकुलता एक मुलगा तिथे उभा होता. त्याने, त्याच्यासोबत असणाऱ्या एका मुलाकरवी दारूची बाटली मागवून घेतली होती. तो मुलगा दारूची बाटली घेऊन आला. आणि माझ्या मित्राच्या मुलापाशी येऊन थांबला.
मी मुद्दामच.. त्याला आवाज दिला, अरे क्षितीज ओळखलस का मला, मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे. अशी ओळख सुद्धा मी त्याला सांगितली. पण त्याने काही मला ओळखलं नाही. कि ओळखून न ओळखल्या सारखं केलं ते त्याचं त्यालाच माहित. कारण, त्याचा बाप मला नेहेमी सांगायचा. आमच्या पोरांना पाच पैशाचं व्यसन नाहीये. आणि, इथे तर याने माझ्या समोर दिडेक हजार रुपयाचा दारूचा खंबा विकत घेतला होता.
बघा ना, बापाने पै-पै करून पैसा जमवला. कधी रुपाया म्हणून खर्च केला नाही. आणि, त्याचा मुलगा मात्र महागड्या दारूचे खंबेच्या खंबे रिचवतोय.
काही लोकांना याच गोष्टीची अक्कल नसते. आपण, जे कमवतोय त्याचा स्वतःला उपभोग घेता येत नसेल. तर कमवलेला तो पैसा काय कामाचा..? ते सगळं कमावून ठेवणं अगदी कवडीमोल आहे. आणि नाहीतर मग, अशी चोरांची धन आहेच कि..!

No comments:

Post a Comment