Saturday, 24 September 2016

आग्रा-दिल्ली-पुणे,
बंगला साहिब गुरुद्वारा. ( भाग :- दोन )
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
गुरुद्वारा मधील नियमाप्रमाणे, आम्ही आमच्या डोक्याला रुमाल बांधून घेतले. आणि, तिथे असणाऱ्या त्या एकमेव लिंबाच्या झाडापाशी आम्ही जाऊन थांबलो. पाचेक मिनिटात, एक उंची वस्त्र परिधान केलेली व्यक्ती, ज्याने त्याच्या डोक्यावर पिवळ्या रंगाची पगडी धारण केली होती. अतिशय देखणी आणि प्रसन्न मुद्रा असणारा तो व्यक्ती आमच्यापाशी आला.
आणि, अगदी अदबीने आम्हाला तो म्हणाला..
तुम्ही पुण्याहून आलात ना..!
आम्ही सुद्धा, त्याला आमचा आदरार्थी होकार कळवला. तो आम्हाला म्हणाला, पुण्यातील गुरुद्वारा मधील एका व्यवस्थापक व्यक्तीने मला तुमची शिफारस केली आहे. आत्ताच त्यांचा मला फोन आला होता. राग माणू नका... पण, मी तुमची.. मला जमेल तशी व्यवस्था करून देतो. कारण येथील सगळ्या रूम फुल झाल्या आहेत. आता खरं सांगायला गेलं तर, आम्हाला तिथे राहायची बिलकुल इच्छा नव्हती. पण काय करणार..? कोणाची इच्छा आणि मन मोडवत नव्हत. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी आमची गत झाली होती. आता, तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागणार होता.
सर्वप्रथम, त्याने आम्हाला विचारलं. तुमची जेवणं झाली आहेत का..? सकाळपासून आम्ही खरोखर जेवलो नव्हतो. त्या व्यक्तीने, ताबडतोब एका ठिकाणी आमचं सामान आणि चपला ठेवायची व्यवस्था केली. आम्ही, हात पाय धुवून घेतले. आणि जेवण करण्यासाठी, तिथे जवळच असणाऱ्या लंगरमध्ये गेलो. त्या लंगरमध्ये.. लहान, मोठा, गरीब, श्रीमंत असा काहीएक प्रकार नसतो. सगळे जन एका लाईनीत बसून जेवणाचा आस्वाद घेत होते. गव्हाची जाडसर चपाती, आणि उडदाची पातळ भाजी. त्यादिवशी हा मेनू तिथे होता. आम्ही, दोन-दोन घास पोटात ढकलले. आणि, प्याऊ मधील थंड पाण्याचा गारेगार आस्वाद घेतला.
लंगरमध्ये आणि त्या पाण्याच्या प्यावूवर सेवा करणाऱ्या लोकांना पाहून अगदी अचंबित व्हायला होत होतं. मनात, कोणताही स्वार्थ न ठेवता भक्तिभावाने सगळी लोकं त्या सेवेत एकरूप झाली होती. आमची पोटपूजा उरकली होती. गुरुद्वारा मध्ये आपलं सामान न्यायला मनाई होती. त्यामुळे, आम्हाला लागणारं अत्यावश्यक असं मोजकंच सामान आम्ही आमच्यापाशी एका मोठ्या पिशवीत ठेवून घेतलं. आणि बाकी सगळं सामान, तिथे चोवीस तसा चालू असणाऱ्या क्लोक रूम मध्ये जमा करून टाकलं.
तिथून पुढे आमचा मोर्चा एका इमारतीच्या दिशेने वळाला. तिमजली इमरतीच्या शेवटच्या मजल्यावर, तो व्यक्ती आम्हाला घेऊन गेला. तिथे एक भलामोठा हॉल होता. पूर्ण हॉलमध्ये, एक मोठी सतरंजी अंथरून ठेवली होती. त्यावर, बरीच लोकं अस्ताव्यस्त झोपली होती. त्यात महिला आणि पुरुष असा एकत्रित भरणा होता. त्या रूममध्ये, कमालीचा असा असह्य उकाडा होता. तिथे अगोदर पासून असेलेले काही लोकं, कुलरचं तोंड आपल्या दिशेने करून निवांत पहुडले होते. तर काही व्यक्ती, लेपटोप वरील सिनेमा पाहण्यात दंग होते.
तो व्यक्ती आम्हाला म्हणाला, तुम्ही काहीवेळ इथे आराम करा. माझ्याच्याने काही चांगली व्यवस्था झाली. कि मी लगेच तुम्हाला येऊन भेटतो.
त्या हॉल मध्ये, सगळे पंजाबी लोकं होते. त्यात आम्हीच काय ते बाहेरचे होतो. प्रवासामुळे, सगळे मित्र थकले होते. त्यामुळे, तिथे गेल्याबरोबर सगळ्यांनी आपापलं अंग जमिनीवर टाकलं.
आणि काही वेळातच, त्यातील काही जन चक्क घोरू लागले होते.
मला काही त्याठिकाणी झोप लागत नव्हती. दुपारचे चार वाजले होते. उकाडा सहन होत नसल्याने, अंग गार करावं म्हणून मी लगेच अंघोळीला निघून गेलो. पाहतो तर काय, त्या बाथरुमच्या दरवाजांना कड्याच नव्हत्या. आणि, स्त्रिया आणि पुरुषांकरिता हे एकत्रित असं शौचालय आणि स्नानगृह होतं. एका मित्राला, मी त्या बाथरूमच्या बाहेर उभं करून, कशीबशी मी अंघोळ उरकून घेतली. माझ्या पाठोपाठ, झोप झालेल्या प्रत्येक मित्राने अंघोळ उरकली. आणि, सगळी आवारावर करून आम्ही तेथील परिसर फिरायला बाहेर पडलो.
मघाशी येतो म्हणून निघून गेलेला पंजाबी मित्र अजूनतरी काही आला नव्हता. आम्ही अजूनही आशेवर होतो. कि संध्याकाळी तरी आमची काहीतरी उचित व्यवस्था होईल.
गुरुद्वाराच्या परिसरात अगदी शांत आणि प्रसन्न वातवरण होतं. पांढर्याशुभ्र रंगाचा गुरुद्वारा उतरत्या सोनेरी किरणात आणखीनच उजळून निघाला होता. त्याच्या कळसावर असणारा सोन्याचा मुलामा अगदी चकचक करत होता. आज वेळ आहे तर देवदर्शन आटोपून घ्यावं. असं आम्ही ठरवलं. प्रथम प्याऊ मध्ये जाऊन एक एक मग थंड पाणी पोटात उतरवलं. तेंव्हा कुठे जरासं हायसं वाटलं. उघड्या डोक्याने मंदिरात किंवा तेथील प्रांगणात फिरू नये. म्हणून डोक्यावर रुमाल बांधून आम्ही आमच्या चपला ठेवण्यासाठी चप्पल घरापाशी गेलो. खूपच सुसज्ज आणि मोठ्या आकाराचं हे चप्पल घर होतं. तिथे सुद्धा, मनात कोणताही दुजाभाव न ठेवता. अगदी श्रीमंत दिसणारी लोकं, भाविकांच्या चपला पुसून त्यांना चप्पल घरात ठेवताना दिसत होते. पाद्यपूजा किंवा चरणसेवा या विषयाला हिंदू धर्मात फार मोठी मान्यता आहे. तीच उपासना मला सिख धर्मात सुद्धा पाहायला मिळाली. हि सगळी सेवा पाहून मी अगदी चक्रावून गेलो होतो. कुठेही धक्काबुक्की नाही, कि आरडाओरडा नाही. कि घाईगडबड नाही. तिथे सेवा करत असणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मुखात फक्त एकच शब्द असायचा. तो म्हणजे,
वाहेगुरू, वाहेगुरु, वाहेगुरु...!
क्रमशः

No comments:

Post a Comment