Saturday, 24 September 2016

आग्रा-दिल्ली-पुणे,
बंगला साहिब गुरुद्वारा. ( भाग :- तीन )
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
आम्ही गुरुद्वाराच्या मुख्य पायऱ्या चढण्यास सुरवात करताना. तिथे असणाऱ्या पहिल्या पायरीवर, आपल्या पायाचे तळवे बुडतील इतक्या खोलीचा एक छोटासा लांबूळका खोल खड्डा होता. त्यात आम्ही आमचे पाय धुवून घेतले. ती सोय अशाकरिता, कि प्रत्येक भाविकाने आपले चरण स्वच्छ धुवूनच गुरुद्वारात प्रवेशित व्हावं. आणि, पायऱ्या चढत आम्ही गुरुद्वाराच्या मुख्य द्वारात येवून पोहोचलो. मुख्य द्वारातून, आतमध्ये आम्ही प्रवेशित झालो.
अगदी प्रसन्न वातावरणात गुरुग्रंथ साहिबचे पूजापाठ आणि पठण चालू होते. तगड्या शरीरयष्टीचे, काही पंजाबी युवक त्यांच्या सुमधुर स्वरातून काही पंजाबी भक्तिगीते आणि रचना म्हणता होते. सगळं वातावरण प्रसन्नतेने भारावून गेलं होतं. दर्शन झाल्यावर प्रत्येक भाविक त्याठिकाणी आपला माथा टेकवत होता. सर्वधर्मसमभाव असं ब्रीदवाक्य असणारं हे ठिकाण. आणि खरोखरच त्याठिकाणी प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला मुक्त प्रवेश होता.
त्या पवित्र ठिकाणावरून, आम्हाला बाहेर पडावंसं वाटत नव्हतं. आम्ही पुन्हा एकवार, गुरु ग्रंथाचं दर्शन घेतलं. आणि गुरुद्वाराच्या बाहेर आलो. तिथे असणाऱ्या, पाण्याच्या तलावाशेजारी बसून थोडा विरंगुळा केला. या बंगला साहिब गुरुद्वाराची कहाणी फारच कमालीची आणि तितकीच रोचक आहे. ती मी तुम्हाला सांगू इच्छितोय..
करोड सिंधिया मिसल चे नेता, बाबा बघेल सिंह यांचा जन्म १७२५ मध्ये झाला. मुघली योद्धा अहमद शहा अब्दाली याने केलेल्या आक्रमणा नंतर. सिख फौजांनी, स्वतःला वेगवेगळ्या गटात विभागून घेतलं होतं. बाबा बघेल सिंग, यांच्या नेतृत्वाखाली एक करोड सिंधिया मिसलने.
अंबाला, कर्नाल, मेरठ आणि अवध सारख्या राज्यावर कब्जा करून. संपूर्ण उपद्वीपावर सिख साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. १७८३ मध्ये, जेंव्हा सिख फौजांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला कब्जा प्रस्थापित केला. तेंव्हा, शहा आलम द्वितीय याने बाबा बघेल सिंह यांच्याशी तह केला. आणि, त्यांनी जिंकलेल्या त्या लाल किल्ल्याच्या बदल्यात. त्यांना, दिल्लीमध्ये सात गुरुद्वारे बनवण्याचा अधिकार दिला. त्यामध्ये..
१ ) गुरुद्वारा मजनू का टीला, गुरु नानक देव तथा गुरु हरगोविंद जी यांच्या स्मरणार्थ बनवला गेला.
२ ) गुरुद्वारा नानक प्याऊ, गुरु नानक देव यांच्या स्मरणार्थ बनवला गेला.
३ ) गुरुद्वारा माता सुंदरी, माता सुंदरी यांच्या स्मरणार्थ बनवला गेला.
४ ) गुरुद्वारा मोती बाग, गुरु गोविंद सिंग यांच्या स्मरणार्थ बनवला गेला.
५ ) गुरुद्वारा शिश गंज शहीदी स्थान, गुरु तेगबहादूर साहिब यांच्या स्मरणार्थ बनवला गेला.
६ ) गुरुद्वारा रकब गंज, महागुरू तेगबहादूरजी यांच्या शरीरावर या ठिकाणी पवित्र अंत्यसंस्कार केले गेले होते. आणि,
७ ) गुरुद्वारा बंगला साहिब, गुरु हरिकृष्णजी यांच्या स्मरणार्थ बनवला गेला.
केवळ आठ महिन्याच्या कालावधीत, बाबा बघेल सिंह यांनी हे सातही गुरुद्वारे बनवून. एक नवा इतिहास आणि विक्रम रचला. त्यातीलच, हा एक फार मोठा असा हा बंगला साहिब गुरुद्वारा होय.
याठिकाणी, गुरुनानक साहेबांची एक सुंदर कथा मला ऐकायला मिळाली.
गुरु नानकांनी, सिख धर्माचा झेंडा हाती घेऊन जगभर बरीच भ्रमंती केली आहे. एकदा, अशीच भ्रमंती करत ते मक्केवरून परत येत असताना.
बाबा नानक आणि मरदाना पश्चिम पंजाब येथील हसन अब्दाल नावाच्या छोट्याशा कसब्यातून निघाले होते. गुरु नानक यांच्या सोबत असणारा मरदाना, चालून-चालून खूप थकला होता. आणि त्या थकव्यामुळे, त्याला खूप तहान लागली होती. तहानलेल्या मर्दान्याने, तिथे जवळच असणाऱ्या एका मुस्लीम पीर, वली कंधारी यांना तिथे जवळच असणाऱ्या तळ्यातील पाणी पिण्याची परवानगी मागितली. कारण, ते वली.. त्या तळ्याचे रक्षक होते. त्यांच्या परवानगीशिवाय तो तेथील पाणी पिऊ शकत नव्हता. पण, त्या वलीने त्याची विनंती साफ धुडकावून लावली.
त्यावर, बाबा नानक यांनी मरदानाला तेथील एक दगड हटवण्याची आज्ञा केली. मरदानाने, गुरूच्या आज्ञेच पालन करत, तेथील एक दगड हटवला. आणि काय आश्चर्य, त्या दगडा खालून पाण्याचा एक झरा वाहू लागला. बाबांनी दाखवलेला चमत्कार पाहून, वली खूप रागे भरला. त्याने रागारागात त्याच्या शक्ती सामर्थ्याने, गुरु नानकांना एक चट्टान फेकून मारली. ती चट्टान, गुरु नानकांनी त्यांच्या एका हाताने अडविली. आणि त्याबरोबर, त्या चट्टानावर बाबांच्या हाताच्या ठशाची निशाणी उमटली. आज त्याच ठिकाणी, पवित्र पंजा साहिब गुरुद्वारा स्तिथ आहे.
बंगला साहिब गुरुद्वाराचा प्रसन्न परिसर, आम्हाला एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी आणि शिकवण देवून गेला होता. त्यानंतर थोडीशी भटकंती करत आम्ही थोडं बाहेरील बाजूस फिरून आलो. बाहेरच आमची जेवणं आटोपली. उद्या सकाळी चार वाजता उठावं लागणार होतं. त्यामुळे, लवकरच आम्ही रूमवर पोहोचलो. तो देखणा पापाजी अजूनही आला नव्हता.
आता काहीच इलाज नव्हता, रात्रीचे दहा वाजले होते. पुढील प्रवासाला फक्त सहा तास उरले होते. शेवटी, आम्ही सगळे त्याच भल्यामोठ्या हॉल मध्ये झोपी गेलो. उकाड्यामुळे झोप काही लागत नव्हती. माझीतर जेमतेम तासाभराची झोप झाली असेल.
गजर झाला, पहाटे चार वाजता आम्ही उठलो, प्रातर्विधी उरकला अंघोळी उरकल्या. इमारतीच्या खाली आलो. गुरुद्वाराला भक्तिभावाने नमस्कार केला. क्लोक रूम मध्ये ठेवलेलं आमचं सामान ताब्यात घेतलं. आणि, दोन कार ठरवून सकाळी सहा वाजता आम्ही विमानतळावर पोहोचलो.
आमचं विमान, सकाळी नऊ वाजता उड्डाण करणार होतं. विमानतळावर लवकर आलं तर चालून जातं. पण उशीर झाला तर काय करता..? कारण, दिल्लीचं ट्राफिक सुद्धा नेहेमी जाम असतं. आमच्याकडे अजून बराच वेळ होता. मग फावल्या वेळात, आम्ही सगळं विमातळ फिरून घेतलं. तासाभराने आमच्या बेग्स आम्ही विमान कंपनीच्या हवाली केल्या. आणि विमान कधी येयील त्याची वाट पाहत आम्ही बसलो. काही कारणाने, नऊ वाजताचं विमान तासभर उशिरा म्हणजे दहा वाजता उड्डाण करणार होतं. वेळ, पुढे पुढे सरकत होती.
ठीक साडेनऊ वाजता, कडेकोट बंदोबस्तात आमची चेकिंग करून आम्हाला विमानतळावर सोडण्यात आलं. आमचं विमान, त्या मैदानावर अगदी पायी चालत पाच मिनिटाच्या अंतरावर उभं होतं. परंतु, त्याकरिता सुद्धा तिथे एका लग्झरी बसने आम्हाला विमानापर्यंत नेऊन सोडण्यात आलं. विशिष्ट प्रकारचा सुईंग.. असा आवाज करणाऱ्या एकशेवीस सीटर विमानात आम्ही सगळे मित्र प्रवेशित झालो.
प्रत्येक जन, आपापल्या सीटवर स्थानपन्न झाला. विमानात वैमानिक आले, एक सुंदर मुलाकडून काही जुजबी सूचना सांगून झाल्या. गोऱ्या गोमट्या नेपाळी वाणाच्या हवाई सुंदऱ्या इकडून तिकडे लुडबुड करू लागल्या. विमान उड्डाणाला तयार झालं होतं. हळुवार वळसा घेत विमान मुख्य धावपट्टीवर आलं. आणि त्याने असा काही वेग घेतला, कि सगळ्या विमानात अगदी थरथर जाणवत होती. आणि अचानक उसळी खात ते अजस्त्र विमान हवेत झेपावलं. तसा माझ्या पोटात एक विचित्र गोळा आला. विमान अगदी उंच भरारी घेत होतं. आणि शेवटी ते विमान अगदी ढगांच्या वर जाऊन स्थिरावलं. तसे, विमानातील नेहेमीचे सराईत प्रवासी ताबडतोब निद्रादेवीचीच्या स्वाधीन झाले. आम्ही नवखी माणसं. विमानाच्या काचेतून बाहेर पाहून एक वेगळाच आनंद उपभोगत होतो. छोट्याशा नालीसारख्या दिसणाऱ्या वळणदार नद्या खूपच सुरेख दिसत होत्या. अजस्त्र पहाड अगदी छोट्याशा दगडाप्रमाणे भासत होते. एकूण अगदी मस्त नजारा पाहायला मिळत होता.
गोड दिसणाऱ्या, आणि गोड बोलणाऱ्या हवाई सुंदऱ्यांच्या हातून. विमानात मिळत असणारा महागडा चहा आणि केक आम्ही स्वाहा केला. सोबतच, तहान नसतानाही मोफत मिळत असणारं ग्लासभर बिसलेरी पाणी सुद्धा पिऊन घेतलं. आणि, विमानात बसून बाहेर पाहत कधी एकदा आमचे दोन तास निघून गेले. ते आम्हाला समजलं सुद्धा नाही. आणि,पुन्हा एकदा नव्या सुचनांचं पालन करत आम्ही कंबरेवर सीटबेल्ट आवळले. आणि मोठी घरघर करत त्या विमानाची चाकं एकदाची जमिनीवर टेकली.
बरच अंतर कापत जात. शेवटी विमान एका जागी स्थिरावलं. आणि लगबगीने, आम्ही सगळे जन विमानाच्या बाहेर पडलो. विमानाचा फोटो काढताना, मला हटकनाऱ्या एका कर्मचाऱ्याला मी दोन ज्ञानाच्या गोष्टी सुनावल्या. तेंव्हा तो सुद्धा थोडा ठिकाणावर आला. तेथून बाहेर पडलो,
कन्वेयर वरून पुढे सरकत येणाऱ्या आमच्या ब्यागा ओळखून. त्यांना आमच्या पाठीवर लादून काही बेगा हाताने ओढत आम्ही सर्वांनी आपापल्या घराकडे कूच केली.
समाप्त.

No comments:

Post a Comment