Saturday, 24 September 2016

प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या मनामध्ये..
उभ्या हयातीत, भारतातील किंवा जगभरातील मोठमोठ्या धामांची यात्रा करण्याची सुप्त इच्छा दडलेली असते. काही व्यक्ती या इच्छांना मूर्त रूप देण्यात सफल होत असतात. तर काही व्यक्ती त्यात अपयशी सुद्धा ठरत असतात. हा सगळा नशिबाचा भाग झाला. शेवटी काय आहे,
" मानला तर देव, नाहीतर माळावरचा दगड "
मी सुद्धा आजवर, अशी बरीच धार्मिक भटकंती केली आहे. आणि, अजूनही करत आहे.
त्यापैकी तिरुपती बालाजी हे माझं आराध्यदैवत आहे..!
त्यामुळे, वर्षातून किमान एकदा आणि जमल्यास दोन तीन वेळा तरी मी बालाजी भेटीला जात असतो. साधारण सतरा वर्षांपूर्वी, पहिल्यांदा मी तिरुपती बालाजीला गेलो. आणि, तेंव्हापासून त्या धार्मिक स्थळाचा मी निस्सीम भक्त झालो. ते आजवर कायम आहे.
पुणे ते रेणीगुंठा ( तिरुपती ) किंवा तुमच्या इच्छित स्थळावरून हा रेल्वेप्रवास किंवा विमानप्रवास पार पडल्यानंतर. तिथून पुढे बसचा प्रवास करत, सप्तगिरी पर्वत पार करत आपण तिरुमला या धार्मिक स्थळी येऊन पोहोचतो. बस प्रवासाने, माझ्या अशा कित्तेक वाऱ्या झाल्या होत्या.
परंतु, त्यानंतर तीनेक वर्षात मला असं समजलं.
कि, रेणीगुंठा ते अलीपिरी हा साधारण आठ दहा किमीचा टप्पा बसने पार केल्यानंतर. तिथून पुढे तिरुमला पर्यंत पायी यात्रा करण्याची फार छान सोय त्या देवस्थानाने केली आहे. आणि एक आवड म्हणून, मी साधारण बारा तेरा वर्षांपासून हि पायी यात्रा करत आहे.
अलीपिरी ते तिरुमला या टप्प्याचं पायी अंतर साधारण नऊ किमी आहे. छातीवर येणाऱ्या, साडेतीन हजार पायऱ्या आणि काही सरळसोट मार्ग असा खडतर, तरीही आल्हाददायक असा हा धार्मिक प्रवास आहे. आपण, या पायी मार्गाने अगदी रमतगमत जरी गेलो, तरी साधारण पाचेक तासात आपण तिरुमला येथे जाऊन पोहोचतो. तसं पाहायला गेलं तर, पायी मार्ग हा खडतर असतोच. पण तिथे टप्प्या टप्प्याला असणारी.. स्वच्छतागृह, अल्पोपहार गृह, अभयारण्य आणि सोबतच भाविकांच्या भल्यामोठ्या लवाजम्यासह आपला पायी प्रवास अगदी सुकर होऊन जातो.
परंतु गतवर्षी, तिरुमला येथे जाण्यासाठी दोन वेगवेगळे पायी मार्ग आहेत. याची मला माहिती मिळाली, आणि गतवर्षी पासून, मी या दुसऱ्या मार्गाने पायी यात्रा करत आहे.
रेणीगुंठा ते श्रीनिवास मंगापुरम..
हे एकूण, पंचवीस किमीचं अंतर आहे. रेणीगुंठा वरून श्रीनिवास मंगापुरम येथे जाण्यासाठी. आपण, सुमो, जीप अथवा सहा आसनी रिक्षा वगैरे करू शकतो. प्रत्येक व्यक्तीला, साधारण सत्तर ते शंभर रुपयामध्ये श्रीनिवास मंगापुरम येथे पोहोचता येतं. पण त्याकरिता, तुमच्याकडे किमान पाच सात लोकांचा ग्रुप तरी हवाच. नाहीतर, एकट्या व्यक्तीकरिता तिथे जाण्यास चार पाचशे रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे.
श्रीनिवास मंगापुरम येथे, श्री बालाजी आणि पद्मावती देवीचा विवाह पार पडला होता. अशी आख्यायिका आहे. तर, श्रीनिवास मंगापुरम येथे तीरुमालाच्या धरतीवरच अगदी हुबेहूब असं बालाजीचं पुरातन मंदिर बनवलं गेलं आहे. तिरुमला येथे, भाविकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने. श्रीनिवास मंगापुरम येथील मूर्ती आणि तिचं मनमोकळं दर्शन भाविकांना फारच समाधान देऊन जातं.
दर्शन आटोपल्यावर, तिथून पुढे साधारण पाचेक किमी अंतरावर सप्तगिरी पर्वताचा पश्चिमेकडील भाग लागतो. आणि तिथूनच आपल्या पायी यात्रेला सुरवात होते.
डोंगर पायथ्याला, आपल्याकडे असणारं अवजड सामान देवस्थानाच्या वाहतूक विभागाकडे सुपूर्त करायचं. ते सामान अगीद मोफत आणि नीटनेटक्या पद्धतीने तिरुमला येथे पोहोचवलं जातं. त्यामुळे पायी चालताना अतिरिक्त बोजा सोबत घेऊन जाण्याची आपल्याला गरज भासत नाही.
एकूण दोन हजार तीनशे आठ्याऐंशी पायऱ्या, आणि साधारण तीन साडेतीन किमी अंतर असणारी हि यात्रा फार कठीणही म्हणता येणार नाही. किंवा अगदी सोप्पी सुद्धा म्हणता येणार नाही.
या पायी मार्गावर सुद्धा स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. परंतु, अलीपिरी मार्गाप्रमाणे या रस्त्यावर मोठमोठी भोजनालयं नाहीत. या मार्गाचं खास वैशिष्ट्य म्हणजे, ज्या भाविकांच्या मनात, नवस रूपाने अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पायी जाण्याचा संकल्प केला जातो. त्या भाविकांसाठी हा रस्ता कमालीचा सोप्पा आहे. अवघ्या एक ते दीड किंवा जास्तीत जास्त दोन तासात आपण तीरुमलाच्या डोंगर माथ्यावर असतो. हा पायी प्रवास करणाऱ्या प्रत्येक भाविकाला वाटेमध्ये एक कुपन दिलं जातं. ते कुपन " दिव्यदर्शन " म्हणून असतं. या कुपनच्या सहाय्याने आपणाला आपल्या आहे त्या पेहेरावात आणि एका वेगळ्या जलद मार्गाने बालाजी दर्शनासाठी सोडलं जातं. अन्यथा, दर्शनासाठी पारंपारिक वेश केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.
तर.. असा नवीन संकल्प करणाऱ्या भाविकांना. किंवा, काहीतरी नवीन मार्ग शोधणाऱ्या भाविकांसाठी हा पायी मार्ग म्हणजे एक सुंदर अनुभूती आहे.

No comments:

Post a Comment