Saturday, 24 September 2016

प्रत्येक घरातील महिलेला रोजचा पडलेला प्रश्न म्हणजे..
आजच्या जेवणात नेमकं काय काय बनवायचं, आणि मुख्य म्हणजे भाजी कोणती बनवायची..?
कारण.. भाजीशिवाय सगळं जेवण अधुरं असतं.
मराठी भाषेत, भाजीला सुद्धा बरीच मस्त-मस्त नावं आहेत. कालवन, कोरड्यास, शाक भाजी.. अजून काही नवीन नावं असतील तर अवश्य कळवा..!
सुरवातीला.. माझ्या बायकोने मला " भाजी " या विषयावर अगदी भंडावून सोडलं होतं.
त्यामुळे.. माझ्या आवडीप्रमाणे,
सोमवार ते रविवार पर्यंत, आपल्या घरात रोजच्या जेवणामध्ये कोणता मेनू असेल. मुख्य म्हणजे कोणती भाजी असेल. त्याचं एक वेळापत्रक मी तिला बनवून दिलं. आणि, ते आम्ही आमच्या किचनमध्ये लाऊन ठेवलं आहे.
गेल्या महिन्यात, माझे आणि माझ्या सौचे श्रावणाचे उपवास चालू असल्याने. घरात असणाऱ्या त्या वेळापत्रकाचा काहीच उपयोग होत नव्हता.
कारण, माझ्या मेनूकार्ड मध्ये जास्ती करून नॉनव्हेज पदार्थाचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे.
या गोष्टीचा लाभ उठवत, श्रावण महिना चालू असताना. माझ्या बायकोने मला फार म्हणजे फार पीडलं.
आज स्वयपाक काय करू..?
हा प्रश्न ऐकला, कि मी फार चिडचिडा व्हायचो.
कारण, शाकाहारी जेवण म्हंटल. कि त्यात सतराशे साठ पदार्थ आले. वरण, भात, भाजी, चपाती एखादा गोड पदार्थ.
त्यामुळे, मी सुद्धा या रोजच्या प्रश्नाने पुरता गारद झालो होतो.
काय करावं..?
बायकोला नामोहरम कसं करावं. याचा मी विचार करत होतो. आणि, मला एक आयडिया सुचली.
बायकोने मला विचारलं ना.. आज जेवायला काय बनवू..!
कि, मी लगेच सुरवात केली..
एक काम कर.. पनीरची खवा टाकून मस्तपैकी भाजी बनव. त्यासोबत, थालीपीठ आणि मसाला भात बनव. आणि एक काम कर दही घालून काकडीची कोशिंबीर बनव. गोड काही करू नकोस, दुकानातून एखादा श्रीखंडाचा डबा घेऊन ये.
एवढी मोठी फर्माईश, आणि..असला भयंकर मेनू ऐकल्या बरोबर, माझी बायको जागच्या जागीच डायरेक्ट क्लीन बोल्डच झाली.
आणि म्हणाली, आता येवढा वेळ आहे का माझ्याकडे हे सगळं बनवायला..?
तर मी म्हणालो,
ठीक आहे.. आज राहूदेत, पण अनायसे या सगळ्या वस्तू आपल्या घरात असतातच. तर, उद्यापासून संध्याकाळी चार पाच वाजता मी तुला फोन करून सांगत जाईल.
आज जेवणासाठी नेमकं काय बनवायचं आहे ते..!
माझी मात्रा बरोबर लागू पडली होती, बायकोने मी सांगणाऱ्या अवघड आणि वेळकाढू मेनुंचा भयंकर धसका घेतला होता. आणि, नेहेमीप्रमाणे न सांगताच माझ्या आवडीच्या भाज्या आता ती गपगुमान बनवून देऊ लागली आहे.
आता बरेच दिवस झाले, ती मला असं विचारायचं धाडसच करत नाही..!
अहो, आज जेवायला काय बनवू..?

No comments:

Post a Comment