Saturday, 24 September 2016

आग्रा-दिल्ली-पुणे,
बंगला साहिब गुरुद्वारा. ( भाग :- एक )
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
चारधाम यात्रा संपली,
मजल दरमजल करत, आम्ही हरिद्वारहून आग्र्यात येऊन पोहोचलो. आणि तिथून पुढे, आगऱ्याहून दिल्लीला निघालो होतो. सकाळची वेळ, पण हवेत भलताच उखाडा जाणवत होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. चारी बाजूला असणाऱ्या, आग्रा येथील प्रसिद्ध मिठाईच्या विविध पेठ्यांची दुकानं पाहत, तोंडाची लाळ गटकन गिळत, आमचं अवजड सामान ओढत नेत, कसेबसे आम्ही आमच्या लग्झरी बस पर्यंत पोहोचलो.
नशिबाने..आग्रा दिल्ली सुपरफास्ट, विनाथांबा बस आम्हाला तिथून मिळाली होती. आणि, दिल्लीतील मध्यवर्ती भागात ती आम्हाला नेऊन सोडणार होती. प्रवासाला सुरवात झाली. आणि, थोड्याच अंतरात बस चालकाने आम्हाला त्याचे लटके झटके दाखवायला सुरवात केली.
त्या बसमध्ये, पाचेक रिकाम्या सीट्स होत्या. त्यामुळे, अतिरिक्त पैसे मिळवण्याच्या लालसेने त्या गाडीच्या मोटार सारथ्याने आणि त्याच्या सोबत असणाऱ्या क्लीनरने. विविध थांब्यांवर, वडाप सारखी ती गाडी भरायला सुरवात केली. सुरवातीला पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून, एक दोन वेळा लोकांनी सहन केलं. पण असं तर आता वारंवार घडू लागलं होतं. कमी अंतराच्या लोकांना सुद्धा हि लोकं त्या बसमध्ये घेत होते. त्या बसला त्या दोघांनी मिळून सुपरफास्ट ची अगदी लोकल बस करून टाकली होती. पण, शेवटी उद्रेक झालाच. आणि वैतागलेल्या सहप्रवाश्यांनी, त्या मोटार सारथ्याला शिवीगाळ करायला सुरवात केली. पण, तो कुठला ऐकायला आलाय. कान बंद करून, त्याचं काम तो अव्याहतपणे पार पाडत होता. या.. नको त्या प्रकारामुळे, नियोजित वेळात तीन तासात पोहोचणारी आमची गाडी तब्बल सहा तासांनी दिल्लीत पोहचली.
एकतर, आम्हाला तिथे पोहोचायला तीन तास उशीर झाला होता. त्यात, आम्हाला दिल्लीमधील काहीएक माहिती नव्हती. आमचा दिल्लीत जायचा नेमका विषय काय,
तर.. उद्या सक्काळी दिल्ली हवाई अड्ड्यावरून पुण्याकरिता आम्हाला विमान होतं. गाडी थांबली, तशी बसमधील काही प्रवाश्यांनी पुन्हा एकदा गोंधळ सुरु केला. त्या बसचालक बहाद्दराने, आम्हाला दिल्ली शहराच्या बाहेर कुठेतरी सोडून दिलं होतं. आणि गाडीतून उतरून, तो कुठेतरी निघून गेला होता. शेवटी झक मारत, आम्ही बसच्या खाली उतरलो. आणि, डिकी मधून आमचं सामान ताब्यात घेतलं. वाद घालायचा प्रश्नच येत नव्हता. कारण, आम्ही मराठी होतो ना..!
आता पुढे काय करायचं..? आजचा दिवस आणि रात्र कुठे राहायचं..? याचा काहीच तपास नव्हता. किंवा आम्ही तसं काही नियोजन केलं नव्हतं. मी तर, माझ्या मनात मस्त प्लान तयार केले होते. दिल्लीतील सगळ्या खाऊ गल्ल्या पालथ्या घालुयात, दिलकी दिल्ली करूयात. बाकी विषय एवढाच होता. कि, आपण जिथे कुठे थांबुयात. त्या ठिकाणापासून, विमानतळ जवळ असावं. म्हणजे, सकाळी जाताना घाई गडबड होता कामा नये. झालं, एका मित्राकडे मी विचारपूस केली. तर ते म्हणाले, तुम्ही दिल्लीतील मध्यवर्ती भागातील करोलबाग भागातील कोणत्याही ठिकाणी थांबा. त्याठिकाणी राहायची आणि जेवायची उत्तम सोय आहे. आणि, तिथून विमानतळ सुद्धा अगदी जवळ आहे.
आमच्या मनात फार मोठी भीती हीच, कि.. विमानतळावर विमान उड्डाणाच्या नियोजित वेळेपूर्वी किमान तासभर अगोदर तरी तिथे पोहोचावं लागतं. आणि ती वेळ चुकली, तर पुढील सगळी गणितं चुकतील. हि फार मोठी भीती आमच्या मनात घर करून बसली होती. कारण, चारधाम यात्रा करून. आमच्या सगळ्या शरीराचा अगदी पिठ्ठा पडला होता. आणि, या हवाई प्रवासाची कोणाला म्हणावी अशी खास माहिती सुद्धा नव्हती. माझा तर हा जेमतेम तिसरा विमान प्रवास होता. पण माझ्याबरोबर असणारे माझे सगळे मित्र पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार होते. त्यामुळे, मला या बाबतीत कोणतीच तडजोड नको होती. आणि कोणत्याही परिस्थितीत, आम्हाला उद्या सकाळी असणारं ते प्लेन चुकवायचं नव्हतं.
झालं.. आता पुढे काय..? हा प्रश्न आमच्यासमोर आ वासून उभा राहिला होता. उन्हाचा चटका, आणि अंगातून घामाच्या धारा सतत चालू होत्या. त्यात कमी कि काय म्हणून, तेथील रिक्षावाले आम्हाला विनाकारण पिडत होते. नको, नको म्हंटल तरी..
चला.. तुम्हाला कुठे जायचं आहे, आम्ही सोडतो. इतके पैसे दया तितके पैसे द्या.
तर आमचाच कोणी मित्र म्हणत होता, रिक्षाने नको, आपण बसने किंवा मेट्रोने जाऊयात, ते बरं पडेल. शेवटी, यामुळे आमच्यातच काय ते एकमत होत नव्हतं. कसाबसा त्या रिक्षावाल्यांचा ससेमिरा चुकवत, आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. तितक्यात, आत्तापर्यंत गप्प असलेला आमचा एक मित्र म्हणाला,
पुण्यातील माझ्या एका पंजाबी मित्राने मला सांगितलं आहे. दिल्लीत, फसवणुकीच्या फार घटना घडत असतात. तुम्ही, इकडे तिकडे कुठेही राहून नको त्या खर्चात पडायची कामं करू नका. तुम्ही लोकं, तिथेच जवळ असणाऱ्या " बंगला साहिब " नावाच्या गुरुद्वारात मुक्कामाला जावा. मी तिथे, तुमच्या राहण्याची व्यवस्था करतो.
आता, गुरुद्वारात राहायचं म्हणजे. आमच्या काही मित्रांची पंचायत होणार होती. कारण, तिथे गेल्यावर कोणत्याच प्रकारचं व्यसन करता येणार नव्हत. आणि, माझे बहुतांश मित्र हे तंबाखू शौकीन होते. शेवटी हो नाही करत, आमचं पक्कं एकमत ठरलं, कि आपण सगळे बंगला साहिबला राहायला जाऊयात. त्याकरिता, तिथे असणाऱ्या एका व्यवस्थापकाला मला फोन करावा लागला. त्याला, मी आमच्या पुण्यातील पंजाबी व्यक्तीचा रेफरन्स दिला. त्याने सुद्धा, आमच्या विनंतीला मान देत. आम्हाला बंगला साहिब गुरुद्वारा येथे तुमचं स्वागत आहे. असं म्हणून, आम्हाला त्या ठिकाणी बोलावून घेतलं. आणि आमच्या पुढील प्रवासाला सुरवात झाली. एका स्थानिक नागरिकाला, बंगला साहिबला कसं जावं लागेल. त्याची माहिती विचारून घेतली. आणि दिल्लीमधील परिवहन मंडळाच्या एका " एसी बसमधून " आमचा पुढील प्रवास सुरु झाला.
बसमध्ये तुफान गर्दी होती. त्यात.. माझ्या पारख्या नजरेने, बसमध्ये असणारे खिसेकापू लोकं ताबडतोब ओळखली. सोबतच माझ्या दोनचार मित्रांना सुद्धा त्याची चाहूल लागली. ( आम्हा पुणेकरांना, लोक उगाच भामटे म्हणत नाहीत. यानिमित्ताने याची दखल सर्व वाचकांनी घ्यावी. ) आणि, मी माझ्यासोबत असणाऱ्या मित्रांना सावध केलं. आमची मराठी बोली भाषा कोणाला समजत नव्हती. त्यामुळे, मी काय म्हणतोय ते इतर लोकांना किंवा त्या चोरांना सुद्धा समजलं नाही. थोड्यावेळाने कोणता तरी स्टॉप आला. आणि, धक्काबुक्की करत ती चोर मंडळी सुद्धा बसच्या खाली उतरून निघून गेले. बस पुढे निघाली, आणि बसमधील दोनचार लोकांना समजलं. कि..आपली पाकिटं किंवा मोबाईल चोरीला गेला आहे.
रात गयी बात गयी.. बस बरीच पुढे निघून गेली होती. वस्तू चोरीला गेलेली लोकं, खूप मनापासून तळतळ करत होते. आणि, आम्ही लोकं त्यातून सहीसलामत बचावलो होतो म्हणून, परमेश्वराचे आभार मानत होतो.
त्यानंतर, आम्ही सुद्धा कोणत्यातरी एका बस थांब्यावर उतरलो. तिथून पुढे आम्हाला अजून एक नवीन बस करायची होती. ती बस, आम्हाला बंगला साहिब गुरुद्वारा येथे नेऊन सोडणार होती. तोवर, त्या थांब्यावर असणाऱ्या दोन रुपयात ग्लासभर थंड पाणी मिळणाऱ्या गाड्यावर आम्ही सर्वांनी आमची तहान शमवली. त्यावर..सर्वांनी एक-एक लिंबू सरबर मारला. आणि, पुढील प्रवासासाठी येणार्या बसची आम्ही वाट पाहू लागलो.
थोड्याच वेळात, आम्हाला हवी असणारी बस त्याठिकाणी आली. पुन्हा सगळं ओझं बसमध्ये चढवून आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. दहाएक मिनिटात, आम्ही बंगला साहिब गुरुद्वारा येथे पोहोचलो. मी मनात ठरवलेल्या माझ्या अपेक्षेपेक्षा, हा फारच मोठा गुरुद्वारा होता. त्याठिकाणी प्रवाश्यांची आणि यात्रेकरूंची बरीच मोठी गर्दी होती. यात्रेकरू आलेले पाहून, वाटेत पुन्हा एकदा आम्हाला काही सरदारजी टॅक्सी चालकांनी थांबवलं. आणि आमची विचारपूस केली,
तुम्ही कुठे चालला आहात वगैरे-वगैरे.
आम्ही सुद्धा त्यांना आम्ही गुरुद्वारात दर्शनासाठी आणि मुक्कामाला निघालो आहोत, म्हणून सांगितलं. तर, तो सरदारजी व्यक्ती आम्हाला म्हणाला..
या गुरुद्वारात काही, राहायची फुकट सोय होत नसते. इथे सुद्धा, एका रूमचे तुम्हाला दीडहजार रुपये पडतात. त्यापेक्षा, तुम्ही आमच्या सोबत बाहेरील एसी लॉज मध्ये चला. तुम्हाला आम्ही, तिथे इथल्या पेक्षा स्वस्तात लॉज घेऊन देऊ. आणि.. तसं पाहायला गेलं तर, गुरुद्वाराच्या सगळ्या रूम बुकिंग सुद्धा फुल झाल्या आहेत. त्यामुळे..तुम्हाला तिथे रूम मिळणं मुश्कील आहे..!
आता.. हा नवीन प्रकार ऐकून, आम्ही पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीत अडकलो. पण आमच्या ज्या मित्राने आम्हाला हि सूचना केली होती. तो काही, माघार घ्यायला तयार नव्हता.
इथवर आलोच आहोत, तर पुन्हा एकदा त्या व्यक्तीला फोन करून आपण शहानिशा करून घेऊयात. असं त्याचं म्हणनं झालं. त्यावर, मी सुद्धा त्या व्यक्तीला फोन केला. सुरवातीला तो व्यक्ती काही आमचा फोन उचलतच नव्हता. त्यावेळी मला सुद्धा थोडा संशय आला. आता, नको ती उगाच लटकायची कामं झाली होती. थोड्यावेळाने..मी पुन्हा एकवार, त्या व्यक्तीला फोन लावला. यावेळी मात्र, त्या व्यक्तीने माझा फोन उचलला. आणि आम्हाला, गुरुद्वारा मध्ये असणार्या एका लिंबाच्या झाडापाशी बोलावून घेतलं. पुन्हा सगळं ओझं ओढत आम्ही आतमध्ये निघालो.
त्यावर, तो बाहेर उभा असणारा टॅक्सी चालक आम्हाला म्हणाला.
आतमध्ये, तुमची काही सोय झाली नाही. तर बाहेर या, मी इथेच तुमची वाट पाहतोय..!
आम्हा दहाएक लोकांमागे, लॉजिंग कमिशन म्हणून किंवा गाडी भाडं म्हणून त्याला पाच सहाशे रुपये तरी नक्कीच सुटणार होते. त्यामुळे, तो व्यक्ती काही आमचा पिच्छा काही सोडत नव्हता.
दोन्हीकडे समतोल असावा. म्हणून, त्या सरदारजीला होकार कळवत. आम्ही, बंगला साहिब गुरुद्वारात प्रवेशित झालो.
क्रमशः

No comments:

Post a Comment