Saturday, 24 September 2016

टोमॅटोचा सॉस बनवला जातो, बटाट्याचे वेफर्स बनवले जातात, आले लसणाची पेस्ट बनवली जाते. हिरव्या मिरच्यांना वाळवून लाल मिरच्या तयार केल्या जातात. कोथंबीर आणि पुदिना सुद्धा सुकवून हवाबंद डब्यात विकले जातात.
भाजी पाल्यातील, अजून सुद्धा अशा बऱ्याच वस्तू असतील. ज्या " ड्राय व्हेजिटेबल " या सदरात मोडत असतील. याव्यतिरिक्त, बाकी सुद्धा बऱ्याच भाज्या प्रक्रिया करून ठेवल्या जात असतील.
आजवर, तो टोमॅटो किंवा बटाटा या फळभाज्या मंडई मध्ये फेकल्या गेल्या आहेत का...!
अशा बातम्यांना, म्हणावा इतका उत येत नाही. चुकून, एखाद अर्धा अपवाद वगळता. कधीतरी, अशी बातमी आपल्या ऐकण्यात आली सुद्धा असेल.
पण.. या, कांद्याच्या बाबतीत कायमच बोंबाबोंब ऐकायला मिळते. कांदा या पिकामुळे समस्त शेतकरी हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय.
असं का..?
एकतर, सर्रास कांदा लावण्याच्या पद्धतीमुळे नियोजन ढासळत आहे. कांदा साठवणी करीता, कांद्याच्या वखारी असतात. त्या प्रत्येक शेतकऱ्याकडे असतीलच असं सांगता येत नाही. त्यामुळे नियोजनात बिघाड होत असावा. दलाल लोकांनी तर, शेतकर्यांचे कंबरडे मोडून टाकले आहे.
नाहीच काही तर.. त्या वखारीत सुद्धा, साधारण पाच सहा महिने कांदा टिकतो. आणि त्यानंतर, नाईलाजाने तो कांदा शेतकऱ्याला एकतर स्वस्तात तरी विकावा लागतो. किंवा तो कांदा वखारीत सडून तरी जातो.
मला काय म्हणायचं आहे. रोजच्या जेवणात कांदा हा आपल्याला अगदी लागतोच लागतो.
तर मग, त्याची इतकी परवड का व्हावी..?
त्याबद्धल, कोणीच का उपाययोजना आखत नाहीये..?
कांदा प्रक्रियेच्या उद्योगाला कोणीच का सुरवात करत नाहीये..?
कांद्याच्या पातळ चकत्या बनवून, त्यांना अद्ययावत यंत्राने चिरून जर त्याला यंत्रामार्फत वाळवला गेला. आणि, हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत भरून तो विकला गेला. तर, त्याच कांद्याला बाजारात दहापटीने भाव मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होईल.
तशा प्रकारचा वाळलेला कांदा.. बिर्याणी, व्हेज पुलाव, आणि इतर बऱ्याच भाज्यांची चव वाढवण्यासाठी नक्कीच कामी येईल. आणि, दरवेळेस कांद्याची होणारी परवड सुद्धा थांबेल.
नाबार्ड सारख्या सहकारी संस्थांना हाताशी धरून, किंवा.. शेतकऱ्यांच्या स्थानिक संस्थांनी पुढाकार घेऊन. विदेशातून अशी एखादी यंत्रणा आणली. तर, कांदा वाया सुद्धा जाणार नाही. स्थानिक लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होईल. आणि, कांद्याला मिळणारा हा पाच पैसे किलोसारखा मानहानीकारक भाव सुद्धा कोण्या शेतकऱ्याला पाहायला मिळणार नाही.
टीप :- उन्हाळ्यात कांदा स्वस्त झाल्यावर, दरवर्षी मंडईतून आम्ही मोठमोठे वीसेक किलो कांदे विकत आणतो. आणि, त्यांना सोलून, बारीक चिरून उन्हात वाळत घालतो. तीन दिवसात, पांढरा शुभ्र कुरकुरीत कांदा चिप्स तयार होतात. आणि, हा वाळलेला कांदा वर्षभर टिकतो सुद्धा. शिवाय, भाजी करताना ओला कांदा भाजायला तेल सुद्धा खूप लागतं. या सुख्या कांद्यामुळे, तेलाची सुद्धा बरीच बचत होते, काम सुद्धा लवकर होतं. आणि, सर्व प्रकारच्या भाज्या सुद्धा खूपच लज्जतदार होतात. बिर्याणी साठी असा कांदा फारच फायदेशीर ठरतो.
अनायसे, आता ऑक्टोबर हिट आलीच आहे. या ऑक्टोबरी उन्हाळ्यात, हा प्रयोग प्रत्येकाने करून पाहायला काहीच हरकत नाही.

No comments:

Post a Comment