Friday, 26 August 2016

काल दुपारी, एक गंमतच झाली..
लाल दिवा बंद व्हायची वाट पाहात, मी सिग्नलला उभा होतो. हिरवा दिवा कधी लागेल, त्याची मी आतुरतेने वाट पाहात होतो.
तोच.. माझ्या पुढील बाजूस उभ्या असणाऱ्या एका कारकडे माझं लक्ष गेलं.
त्या पांढर्या रंगाच्या कारमध्ये, एक सुंदर युवती बसली होती. बहुतेक कारमध्ये एसी चालू असावा, त्यामुळे त्या कारच्या काचा बंद होत्या. त्या काचांवर, हलक्याश्या काळ्या रंगाची फिल्म बसवली होती. पण तरीही, आतमध्ये काय घडामोडी चालू आहेत, ते मला बऱ्यापैकी दिसत होतं.
कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर असणारी, चुडीदार परिधान केलेली ती महिला दिसायला सुद्धा खूप सुंदर होती. तिचे काळेभोर मोकळे सोडलेले केस तिच्या पाठीवर रुळत होते. पण, सीटच्या अडथळ्यामुळे मला त्याचं यथोचित दर्शन घडत नव्हतं. तिच्या डोळ्यावर, एक सुंदरसा गोगल होता. ती सुद्धा, हिरवा दिवा लागण्याची वाट पाहात होती. तितक्यात.. तिला काहीतरी आठवलं.
तिने, लगबगीने कारच्या समोरील एका कप्प्यातून कसलासा डबा बाहेर काढला. तिने तो डब्बा उघडला, आणि त्या डब्ब्यात असणरा कसलासा जिन्नस त्या डब्ब्यात असणाऱ्या चमच्याने तिच्या तोंडात टाकला.
त्या काळ्या काचेमुळे, तो डब्बा कशाचा होता..? किंवा, त्या महिलेने तिच्या तोंडात नेमकं काय टाकलं असावं..? ते मला स्पष्ट दिसलंच नाही. आता, हे नवीन कुतूहल माझ्या मनात जागृत झालं. मला वाटलं, कदाचित तिने डब्यात असणारी सौफ किंवा गुठ्का वगैरे खाल्ला असावा. हा माझा अंदाज होता. पण ते नक्की काय असावं..? ते मात्र मला समजलं नाही.
माझं मन काही मानायला तयार नव्हतं. तिने तोंडात नेमकं काय टाकलं असावं..? या प्रश्नाने मला पुरतं हैराण करून सोडलं होतं. सिग्नल सुटायला, फक्त दहा सेकंद उरले होते. तिने, तोंडात नेमकं कोणतं मिश्रण टाकलं आहे. ते आता, बहुतेक गुलदस्त्यातच राहणार होतं.
तितक्यात.. माझं लक्ष, तिच्या कारच्या दरवाजावर गेलं.
गुठ्का खाणाऱ्या व्यक्ती, जेंव्हा कारची काच उघडून आपल्या तोंडातली पिंक रस्त्यावर थुंकत असतात. त्यावेळी, त्या पिंकेतील काही शिंतोडे त्या कारच्या दरवाजावर सुद्धा उडत असतात. तसेच काहीसे काळ्या रंगाचे शिंतोडे मला त्या महिलेच्या कारच्या दरवाजावर आढळले.
बस.. गुत्त्याचा उलघडा झाला होतो. आणि, माझा अंदाज सुद्धा खरा ठरला होता.
त्या सुशिक्षित दिसणाऱ्या महिलेने,
तिच्या तोंडात चक्क तंबाखूची काळी मशेरी ( मिसरी ) कोंबली होती..!
यापूर्वी, महिलांना तंबाखूची काळी मशेरी लावताना मी पाहिलं होतं. पण, चमच्याने मशेरी खाण्याचा हा प्रकार, आणि ते सुद्धा, अगदी उंची कारमध्ये. मला, पहिल्यांदाच पाहायला मिळाला होता.

2 comments:

  1. भाऊ
    नविन फॅशन असेल.

    एकेकाळी भाकरीला नावे ठेवणारे आज पिठलं भाकरी आवडीने खातात तसाच प्रकार हा असेल.

    बाकी मिशरी चे नशिब मोठे आहे.

    ReplyDelete
  2. भाऊ
    नविन फॅशन असेल.

    एकेकाळी भाकरीला नावे ठेवणारे आज पिठलं भाकरी आवडीने खातात तसाच प्रकार हा असेल.

    बाकी मिशरी चे नशिब मोठे आहे.

    ReplyDelete