Friday, 26 August 2016

तीनेक महिन्यांपूर्वी, माझ्या एका मित्राबरोबर त्याची पाचेक वर्षांची गोडशी चिमुरडी मुलगी मला भेटली होती. उन्हाळ्याचे दिवस होते, शाळेला सुट्ट्या होत्या, उन्हामुळे डोक्यात घाम येऊन घामाच्या गाठी येऊ नये. आणि, लहान वयात दोनचार वेळा टक्कल केल्यावर मुलींची केसं सुद्धा दाटसर येतात. हि सगळी उद्धिष्ट साधून, तिच्या वडिलांनी तिला न्हाव्याच्या दुकानातून नुकतंच टक्कल करून आणलं होतं.
तितक्यात, मला पाहून तो मित्र माझ्यापाशी थांबून गप्पागोष्टी करू लागला. मी सुद्धा, विचारायचं म्हणून त्याला विचारलं.
उन्हाळा आला म्हणून मुलीचे केस कापलेत का. त्यावर, त्याने सुद्धा मी मनात योजलेलं वरील सगळं रामायण मला ऐकवलं.
आम्ही दोघे बोलत असताना, ती चिमुरडी माझ्याकडे वारंवार पाहत होती. कदाचित, ती माझ्या डोक्यावर असणारं टक्कलच पाहत असावी. याची मला पूर्ण खात्री झाली होती.
त्यानंतर, काल पुन्हा एकदा मला ती चिमुरडी दिसली. लहान मुलांबरोबर खेळण्यात ती अगदी दंग झाली होती. तीन महिन्यामध्ये, तिच्या डोक्यावर भरपूर काळे आणि घनदाट केस आले होते. आणि खेळता-खेळता, अचानक त्या चिमुरडीचं माझ्याकडे लक्ष गेलं. तशी ती, पळतच माझ्यापाशी आली. आणि, प्रश्नार्थक मुद्रा करत मला म्हणाली.
" काका, तुम्हाला अजून केस आले नाहीत का..? "
माझा कयास खरा ठरला होता. तीन महिन्यापूर्वी ती चिमुरडी मला जेंव्हा भेटली होती. तेंव्हा, त्या लहान जीवाला वाटलं असेल. कि बहुतेक, या काकांनी सुद्धा माझ्या सारखच टक्कलच केलं असावं. पण आज मला भेटून, ती फार मोठ्या कोड्यात पडली होती.
कारण, गेल्या तीन महिन्यात तिच्या डोक्यावर तर भरपूर केस आले होते. आणि अजून, या काकांच्या डोक्यावर केस कसे आले नाहीत..? हा तिला पडलेला फार मोठा यक्ष प्रश्न होता.
शेवटी.. तिचं शंका निरसन करत मी तिला म्हणालो..!
" बाळा, मला आता डोक्यावर केस येत नाहीत गं..! "
माझ्या या धीरगंभीर आणि अनपेक्षित उत्तरावर, ती बिचारी भलतीच कोड्यात पडली होती. डोक्यावर केस येतच नाहीत..?
हा विचार काही, त्या लहान जीवाच्या पचनी पडला नव्हता. आणि, माझ्या उजाड डोक्याकडे पाहात, नकळत तिचा हात तिच्या डोक्यावरील केसांवरून फिरु लागला.
काही काळा नंतर, असं काही विपरीत सुद्धा घडू शकतं. या कल्पनेने ती खूपच सैरभैर झाली होती. तिच्या जीवनात, तिला मिळालेला हा एक नवा धडा होता. माझ्याशी वार्तालाप संपवून, ती पुन्हा तिच्या सवंगड्यांसोबत खेळायला निघाली होती.
पण जाताना, तिने मला किमान तीन वेळा तरी वळून पाहिलं होतं. तिच्या मनात बहुतेक हा एकच प्रश्न असावा..!
ऐसा भी हो सकता है..?

No comments:

Post a Comment