Saturday, 25 March 2017

माझ्या एका मित्राला, एक; खूप घाण सवय आहे.
तो स्वतः, तब्बेतीने जरा गरगरीत आहे...
परंतु, त्याच्यासमोर कोणी मित्र वगैरे आला. कि, त्याचं नेहेमीचं एकच टुमनं असतं.
काय रे, तुझी तब्बेत खूपच खराब झालीय...!
मग, तो समोरचा मित्र .. पहिली स्वतःची, आणि' अर्थात, नंतर त्याची सुद्धा समजूत काढतो. 
आणि म्हणतो..... नाही रे, माझ्या तब्बेतीला काय झालय. अगदी तशीच आहे.
कमी नाही कि जास्ती नाही. अगदी व्यवस्तीत आहे मी..!
मित्रहो, होतं काय.. कि, एखाद्याच असं नकारार्थी बोलनं.
जर कोणी, खरोखरच मनावर घेतलं तर ?
किती पंचायत होईल..!
 मन, विनाकारणच झुरणीला लागतं. मनामध्ये, नको ते विचार येऊ लागतात. विनाकारणच घाबरायला होतं. काळजी वाटते, आपल्या तब्बेतीला काही झालं तर नसेल ना ?
असे, नाना विचार मनामध्ये येऊ लागतात.
त्याउलट, तुम्ही एखाद्याला असं म्हणा....
काय रे मित्रा, तुझी तब्बेत खूप मस्त दिसतेय. काही, खुराक वगैरे लावला आहेस कि काय ?
बघा, तुमच्या ह्या एका वाक्याने. समोरच्या व्यक्तीच्या अंगावर मुठभर मास नक्कीच वाढेल.
नेहेमी, सकारात्मक बोलायला शिकलं पाहिजे. असा, माझा तरी हट्ट आहे...
तर, आज नेमका तोच 'गरगरीत' मित्र मला भेटला.
घाई गडबडीत, त्याची स्कूटर थांबवून तो मला काही तरी ( म्हणजे, तेच नेहेमीचं ) म्हणणार. तितक्यात, मीच त्याला म्हणालो.
काय रे, तुझी तब्बेत खूपच वाढलीय. अशा स्थूल पणामुळे, तुला हृदय विकाराचा झटका येण्याची दाट शक्यता आहे. असं, मला वाटतंय. जरा वजन कमी कर राव तुझं...
माझं, हे वाक्य ऐकताच. गडी, अगदी कावरा बावरा झाला. आणि, म्हणाला...
चल.... येऊ का ? मी जरा, घाईमध्ये आहे....
असं म्हणून, तो स्कूटरला स्टार्टर मारून पळून गेला.
(त्याची खोड जिरवण्याकरिता, मी मुद्दामच त्याला असं म्हंटल होतं.)
स्वतःवर वेळ आली, कि अशी गत होते....
प्रत्येकाला वाटत असतं. मी निरोगी असावं, दणदणीत असावं.
विनाकारण, एखाद्याला हिणवण्यात काय अर्थ आहे..?
चला तर मग, संकल्प करूयात. आणि, सकारात्मक दृष्टीकोन ठेउयात.
आवश्यकता.. हि मुळी, गरज नाहीच.
विवस्त्र, मनुष्य राहत होताच ना ...?
"सौंदर्य" आणि "लज्जा"
हेच, बहुतेक त्याला कारणीभूत असावं.
ह्या, " देहाला " झाकण्याकरिता केलेला अट्टाहास..!
आपल्या बुद्धीची क्षमता,
हिच आपली ....
बौद्धीक " पातळी " आहे.
काम करण्याची,
कोणालाच 'भीती' वाटत नसते.
परंतु,
'निरर्थक' काम, सांगणार्याची भीती.
हि, प्रत्येकाला वाटतच असते..!
आयुष्यात, 
करण्यासारख्या बर्याच गोष्टी असतात.
त्या करत्या करवीत्याने, प्रत्येकाकरिता एक "गोष्ट" हि राखून ठेवलेलीच असते.
त्या, ठराविक गोष्टीत. 
प्रत्येकाला, महारत प्राप्त करता येत असतं. प्रत्येकाच्या अंगी, 'तो' कलागुण सुद्धा असतोच.
परंतु, तो सुप्त अवस्थेत असतो.
तो कलागुण, सिध्द करून दाखविण्याकरिता,
योग्य संधी यावी लागते.
आणि, ठराविक कालावधी मध्ये ती संधी येते सुद्धा..!
मधुमेह, श्रीमंतांचे रोग,
आता,
गरिबांनाही होऊ लागले. संपत्तीशी नाही,
किमान..
रोगाशी तरी, "साधर्म्य" साधले.
अनावश्यक गोष्टींच्या मागे लागणे,
हा, मनुष्य 'धर्म' आहे.
आणि,
आवश्यक गोष्टी समोर असताना त्याची 'किंमत' न करणे.
हा, मनुष्य "गुणधर्म" आहे..!
कोणाच्याही मनावर, अधिराज्य गाजवण्यापेक्षा.
त्याच्या मनात, 
आपलं एक, स्वतंत्र 'स्थान' निर्माण करणं.
केंव्हाही, अभिमानास्पद असतं..!
आता, शिकायचं म्हणजे.
माझ्या आंगावर काटाच येतो राव..
असं म्हनतात, कि..
इंग्रजी फार सोप्पी भाषा आहे.
पन, माझं आणि तिचं खुपच वाकडं आहे..
नाही म्हनता..
कधी मधी "घेतल्यावर" तिही मला साकडं घालतेच.
कारण,
भाषा नाहि, पन ' इंग्रजी' मला जाम आवडते..!
चुका तर मनुष्यच करत असतो.
परंतु, 
चुका समजून सुद्धा.
जो, वेडेपणा करत असतो.
तो,
माणूस मुळीच नसतो..!

Thursday, 16 March 2017

पूर्वी.. आमच्या घराशेजारी, एक तिबेटी महिला राहायला होती. त्या महिलेचा सगळा जन्म.. भारतात, म्हणजे महाराष्ट्रात गेला.
पण, त्या बाईला मराठी भाषा काही कधी बोलता आलीच नाही.
तिला.. मराठी भाषा समजायची, पण बोलता बाकी येत नव्हती. त्यामुळे, आमच्याशी बोलताना ती हिंदीतच बोलायची.
आणि त्याविरुद्ध.. माझ्या आईला हिंदी भाषा बोलायला येत नव्हती, पण समजत मात्र होती. त्यामुळे, माझी आई आणि ती भाभी एक दुसऱ्याशी बोलताना. 
भाभी माझ्या आईशी हिंदीत बोलायची, आणि.. माझी आई तिच्याशी मराठीत बोलायची. आणि, हा वार्तालाप.. नेहेमी असाच चालू असायचा.
पण एकदा काय झालं..
त्या नेपाळी भाभीला " बाहेरचं " झपाटलं. त्यावेळी, तिच्या अंगात दहा लोकांचं बळ आलं होतं. हे, मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं होतं.
आणि.. कधी नाही ते,
ती भाभी, त्या झपाटल्या पणात, चक्क अगदी स्पष्ट " मराठी " भाषा बोलत होती.
यावर.. कोणाचा विश्वास असो अथवा नसो. पण, हि गोष्ट अगदी सोळा आणे खरी आहे..!
मुठभर भाजकी किंवा कच्ची सुपारी,
प्लास्टिकच्या एका जाडसर कागदात घ्यावी. त्यात, ठराविक मोजमापात १२० आणि ३०० नामक सुगंधित तंबाखू आणि समोरच्याला हवी असेल तर थोडी ३२ नंबरची कडक तंबाखू टाकावी. थोडी खुशबू आणि किवाम टाकावा.
त्या सगळ्या मिश्रणात, थोडासा चुना आणि दोनचार थेंब पाणी शिंपडावं. आणि हे सगळं मिश्रण, आपल्या उजव्या हाताने त्याची घट्ट अशी पुरचुंडी करून, आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर त्याला हळुवार आणि अगदी प्रेमाने दहा पंधरा मिनिटं जोरदार रगडावी.
झाला बघा.. आमचा पुणेरी मावा तयार..!
पूर्वी.. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी पान टपरी सुद्धा चालवली आहे. तेंव्हा हे सगळं काही मी आपसूक आणि गिर्हाईक सांगतील त्याप्रमाणे शिकून गेलो होतो...
तंबाखू, चुना आणि सुपारीच्या चुर्नाला, पुण्यामध्ये " मावा " असं म्हणतात.
खरं तर, मावा म्हणजे खवा. जो गाईच्या किंवा म्हशीच्या दुधापासून बनवला जातो.
आणि पुढे.. त्या माव्याचा बर्फी किंवा पेढा बनवला जातो.
आता, तंबाखू आणि सुपारीच्या मिश्रणाला " मावा " हा शब्द फक्त आमच्या पुण्यातच प्रचलित आहे. त्याला, हवं तर तुम्ही पुणेकरांची चोखंदळ शब्द्शैली म्हणा. किंवा तंबाखूजन्य पदार्थांना विक्री करण्यासाठी, त्यांनी या तंबाखू आणि सुपारी मिश्रित मिश्रणाला खवा हे गोंडस नाव देऊन एक प्रकारची नामी शक्कल लढवली आहे. असं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही.
पण याच पुणेरी माव्याला विदर्भात " खर्रा " म्हणतात. सुरवातीच्या काळात जेंव्हा मी विदर्भ वारी करायचो, आणि जेंव्हा मी माव्याला खर्रा असं म्हणलेलं ऐकलं.
आणि, अचानक माझ्या घशात एक वेगळीच खरखर सुरु झाली. त्यामुळे, मावा किंवा खर्रा नावाच्या तंबाखूजन्य पदार्थाला सेवन करणं मी कायमस्वरूपी टाळू लागलो.
ते जाऊदेत.. पण, तुमच्या भागात माव्याला किंवा खर्र्याला काय म्हणतात हो...!

आमच्या इथे, फार पूर्वीपासून एक मारवाडी कुटुंब राहायला आहे. ती लोकं पैश्या पाण्याने खूपच मजबूत आहेत. आणि, तितकीच धार्मिक सुद्धा आहेत. ती लोकं महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत, त्यामुळे.. त्यांना कोणत्याही धार्मिक कार्याकरिता आपल्या मराठी ब्राम्हणांनाच बोलवावं लागतं. कारण आमच्या भागात, हिंदी भाषिक ब्राम्हण उपलब्ध नाहीयेत. आपले मराठी ब्राम्हण, विधी करताना संस्कृत मधील श्लोक म्हणतात.
परंतु.. यजमानांशी मधेच काही बोलायचं असेल. तर, त्यांच्याशी ते हिंदीमध्ये वार्तालाप करत असतात. त्यामुळे, ती मारवाडी लोकं माझ्या घरासमोर राहणाऱ्या एका मराठी ब्राम्हणाला सगळे धार्मिक विधी करण्यासाठी त्यांच्या घरी नेहेमी बोलावत असतात. योगायोगाने तो ब्राम्हण मुलगा सुद्धा माझा चांगला मित्र आहे.
त्या मारवाडी लोकांची, अजून एक वेगळीच आणि खूप चांगली अशी रीतरिवाज आहे.
ती लोकं.. महिन्यातून किमान एकदा तरी, ठराविक दिवशी..
ब्राम्हणांना शिधा स्वरुपात काहीतरी अन्नदान करत असतात. तर मग, त्यात पाच कडधान्य असतात, तर कधी काही मिठाई असते, तर कधी जेवण म्हणजे पंचपक्वान्नाचे ताट असतं, तर कधी आणखीन काहीतरी किंवा रोख रक्कम असते. शेवटी काय आहे, अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे.
तर.. प्रत्येक महिन्याला, त्यांच्या घरातीलच कोणीतरी व्यक्ती हा शिधा घेऊन त्या भटजींच्या घरी येत असतो.
पण एकदा काय झालं..
त्यादिवशी कामामुळे त्यांच्या घरातील कोणालाच वेळ नव्हता. आणि, हा शिधा तर लगोलग त्या ब्राम्हणाच्या घरी नेऊन द्यायचाच होता.
तर त्या दिवशी, त्या शेटजींनी..
घाईघाईने.. तिथे असणाऱ्या एका हरकाम्या व्यक्तीला हे काम सांगितलं.
" अरे भाई.. ये शिधा, जरा पंडितजीके घर देके आणा..! "
हि गुजर मारवाडी लोकं.. ब्राम्हणाला " पंडितजी " म्हणत असतात.
हे मला माहित आहे, कदाचित तुम्हाला सुद्धा माहित असावं. पण नेमकं, ज्या व्यक्तीकडे त्यांनी हा शिधा दिला होता. त्यालाच हे माहिती नव्हत. कि पंडितजी म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे..?
कारण, पंडित म्हणून तो आमच्या भागातील फक्त मला एकट्यालाच ओळखत होता. आणि, आमच्या भागात तिथे राहणारा " पंडित " नावाचा मी एकमेव व्यक्ती आहे.
झालं..तर तो संभाव्य व्यक्ती, तो शिधा घेऊन नेमका माझ्या घरी आला. आणि मला म्हणाला, त्या समोरच्या शेठजींनी सांगितलं. कि.. हा शिधा, पंडितच्या घरी देऊन ये..!
समोर आलेला बॉक्स पाहून मी सुद्धा पक्का परेशान झालो..! हा नेमका काय प्रकार असावा..?
शेवटी, घरात आलेला तो पुडा मी उघडून पाहिला.
तर त्यात.. गावरान तुपात बनवलेले किलोभर लाडू होते. तुम्हाला म्हणून सांगतो, गावरान तुपातील म्हणा किंवा मोतीचूर लाडू हा माझा फार मोठा कमकुवत दुवा आहे. मग काय, तो पुडा मी घेतला त्या हरकाम्याला एक गोडशी स्माईल दिली. दरवाजा लाऊन घेतला. आणि, मागचा पुढचा विचार न करता. तो लाडूचा पुडा समोर घेतला. आणि, लगोलग त्यावर आडवा हात मारला. एका दमात, त्या पुड्यातील पाच लाडू मी फस्त केले होते.
दोनचार दिवसानंतर.. माझा तो ब्राम्हण मित्र आणि मी गप्पा मारत आमच्या रोजच्या ठिकाणी उभे होतो. आणि तितक्यात.. ते शेठजी तिथे आले.
आणि.. माझ्या ब्राम्हण मित्राला म्हणाले.
पंडितजी, माफ किजीये..
इस बार.. आपके घर वह शिधा लेकर मै आ न सका. इसलिये, मैने एक दुसरे आदमीको भेज दिया था..! तकलीफ के लिये मै माफी चाहता हुं..!
त्यावर माझा मित्र त्यांना म्हणाला.. ठीक है सेठजी, कोई बात नही. लेकीन अगली बार आप खुद आ जाईये. त्यावर होकार देत, एवढं बोलून.. ते सेठ तेथून निघून गेले.
म्हणून सहजच मी माझ्या त्या ब्राम्हण मित्राला म्हणालो.
हा काय प्रकार आहे रे..?
तर तो म्हणाला.. अरे हे सेठजी दर महिन्याला ब्राम्हणाला शिधा म्हणून काहीतरी गोडधोड पदार्थ देत असतात. पण एक गडबड झाली आहे, गेल्या दोनचार दिवसात माझ्या घरी यांचा शिधा काही आलाच नाहीये. नाहीतर मला समजलं असतं. किंवा घरचे लोकं तरी मला तसं बोललेच असते.
शेवटी.. न राहवून मी त्या मित्राला म्हणालो.
अरे.. आपल्या चौकातील तो हरकाम्या व्यक्ती माझ्या घरी परवा एक लाडूचा पुडा घेऊन आला
होता. मला म्हणाला,
त्या समोरच्या शेठजींनी हा पुडा पंडितच्या घरी देऊन ये म्हणून मला सांगितलं आहे.
मला वाटलं, काही कारणाने त्यांनी तो लाडूचा पुडा मलाच दिला असेल. त्यामुळे, आम्ही सर्वांनी मिळून तो लाडूचा पुडा " स्वाहा "केला आहे.
हा घडलेला प्रकार म्हणजे, फार मोठा विनोद झाला होता. हे ऐकून माझा ब्राम्हण मित्र आणि मी अगदी पोटभरून हसलो. आणि.. हसत हसत, माझा ब्राम्हण मित्र मला म्हणाला..
 बघ ना, काय योगायोग आहे, शेवटी..
या ना त्या कारणाने, तू सुद्धा एक दिवसाचा पंडितजी ( ब्राम्हण ) झालासच..!


माझा एक मित्र आहे....
रोज सकाळी कामावर आल्यावर मला तो आवर्जून सांगत असतो.
आज, माझ्या बायकोने मस्तपैकी मटकीची भाजी बनवली होती. भाजीसोबत मी मस्तपैकी दोन चपात्या मुरगळल्या, मस्तपैकी एक दुधाचा ग्लास मारला. आणि, आज डब्याला सुद्धा मटकीची भाजीच आणली आहे. " मस्तपैकी " आणि " मटकी " ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या अगदी जिवाभावाच्या आहेत.
आत्ता मध्यंतरी, आमची दुपारच्या जेवणाची वेळ झाली. सगळी लोकं जेवायला निघून गेली, आणि तो मित्र मला म्हणाला. मला माहिती आहे, तू सकाळीच सगळं जेवणखाण उरकून येत असतोस. पण आता एक काम कर, माझ्याबरोबर हॉटेलमध्ये चल. आणि मला थोडी कंपनी दे.
मी सहजच त्याच्या चेहेऱ्याकडे पाहिलं. तर मला त्याच्या चेहेऱ्यावर टवटवी अशी जाणवली नाही. रोज अगदी प्रसन्न असणारा व्यक्ती आज अशा पडलेल्या चेहेऱ्यात का..? ते बाकी मला समजलं नाही.
बोलता-बोलता आम्ही दोघे एका हॉटेलमध्ये जाऊन पोहोचलो. तिथे त्याने एक व्हेज कटलेटची ऑर्डर दिली. आम्ही दोघांनी मिळून, ते कटलेट संपवलं. त्या खाण्याचं बिल चुकतं करून आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो. आणि तो मित्र मला म्हणाला..
हॉटेलचं खानं मला बिलकुल आवडत नाही, पण काय आहे नाईलाज असल्यावर काही करता येत नाही. मी त्याला म्हणालो, कसला नाईलाज..? काही गडबड वगैरे झाली आहे का..?
तर म्हणाला, गडबड वगैरे काही नाहीये रे. माझी बायको तिच्या वडिलांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याला गेली आहे. त्यामुळे, माझ्या पोटाची इथे भलतीच आबाळ होत आहे.
मी त्याला म्हणालो, अरे मग तू सुद्धा वहिनी बरोबर गेला असतास..!
तर म्हणाला, नको रे.. माझ्या मुलांच्या फायनल एक्झाम चालू आहेत. त्यात व्यत्यय यायला नको. आणि अचानक मला आठवलं, त्याची मुलगी तर चक्क वीस वर्षांची आहे. मग हा जेवणाचा डबा न घेता ऑफिसला कसा काय आला..?
म्हणून मी सहजच त्याला म्हणालो, ते सगळं ठीक आहे. तुझी बायको घरात नसल्यावर, तुझी मुलगी स्वयपाक करत नाही का..?
तर म्हणाला.. काय बोलतोस तू, माझ्या मुलीला मी कलेक्टर बनवनार आहे. तिला असली स्वयपाकाची कामं सांगायची का..?
आणि खरं सांगायला गेलं तर माझ्या मुलीला स्वयपाक वगैरे काहीसुद्धा येत नाही. आणि त्याची काही आवश्यकता सुद्धा मला वाटत नाही..!
बापरे.. माझ्या मित्राच्या या उत्तरवार मी अगदी सैरभैर झालो होतो. मुलीच्या जातीला स्वयपाक येऊ नये, यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं. मुलगी लाख शिकेल, अगदी कलेक्टर किंवा कमिशनर सुद्धा होईल. शिक्षणाच्या जोरावर ती लाखो रुपये सुद्धा कमवेल,
पण या सगळ्या कालचक्रा मध्ये आपली विवाहसंस्था फार मोठं काम बजावून जाते. मुलगी एवढी शिकलेली आहे म्हंटल्यावर, तिचा होणारा नवरा सुद्धा अगदी तिच्या तोडीचाच पाहिला जातो. आणि, असे तोडीचे मुलं सुद्धा भरपूर मोठाले पगार घेत असतात. आणि चुकून, जर त्या मुलाला घरच्या जेवणाची आवड असेल तर..? रोजच्या भांडणाला कार सुरु झाला कि नाही..!
ती म्हणणार.. मी पैसे कमावतेय, आणि हा म्हणणार मला पैसे नको. मला तुझ्या हातचं मनासारखं जेवण हवं आहे. कारण, जीवनात आपण जी एवढी धावपळ करत आहोत, ती फक्त आणि फक्त आपल्या पोटाकरिताच चालू असते. आपण जे चांगलं चुंगलं खाऊ, तेच आपल्या सोबत नेऊ. याव्यतिरिक्त आपल्या सोबत काहीच येणार नाहीये.
आणि.. अशी काही प्रकरणं घडली, तर रागारागाने मुलं मुली तडकाफडकी विभक्त सुद्धा होऊ शकतात. पण लग्न म्हणजे काही पायातली चप्पल नाहीये, कि आज काढली आणि उद्या लगेच दुसरी नवीन घेतली. तुम्ही लाखो रुपये जरी कमवत असाल, तरी पैसे खाऊन कोणाचं पोट भरत नसतं. त्याकरिता अन्न हि एकमेव गरज असते.
मुली भरपूर शिकल्या तर त्याचा मला आनंदच आहे. पण त्या मुलींना स्वयंपाक येऊ नये, त्यांच्या घरून त्यांना अशा प्रकारचं प्रोत्साहन मिळावं, किंवा त्यांनी स्वयंपाक करायला नकार देणं. हे कितपत योग्य आहे..?
या एकमेव कारणावरून, मी स्वतः दोन घटस्फोट झालेले माझ्या डोळ्याने पाहिले आहेत. विशेष म्हणजे, त्या दोन्ही मुली कमवत्या सुद्धा नव्हत्या. परंतु, घरचं चांगलं असल्याने नेहेमीच्या हॉटेलिंग करण्याच्या सवयीमुळे नको त्या विषयाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. आणि मुख्य म्हणजे, या गोष्टीला त्या मुलीच्या आईवडिलांचा सुद्धा दुजोरा होता. हि फार मोठी खेदाची गोष्ट होती.
या माध्यमात सुद्धा मी बऱ्याच अशा महिला पाहिल्या आहेत. कि ज्यांचं खूप मोठं शिक्षण झालं आहे. पण त्या स्वयपाक बनवण्यात सुद्धा तितक्याच वाकबगार आहेत. किंवा, स्वयपाक बनवण्याची त्यांना लाज वाटत नाही. त्या विषयाकडे त्या एक कला म्हणून पाहत असतात.
त्यांचं एकवेळा मला इथे अभिनंदन करू वाटत आहे
वानगीदाखल.. आमच्या Ramaa Atul Nadgauda ताई, कवियत्री आहेत. आणि नाट्य सृष्टीत सुद्धा कार्यरत आहेत. Disha Naik वहिनी पदविका पास आहेत, Sadhana Verma ताई स्वतः एक उद्योजिका आहेत. Anjali Jagannath Dixit ताई तर पेशाने डॉक्टर आहेत. Surekha Kasbe ताई, शिक्षिका आहेत. Ratna Kale Joshi ताई, उच्चशिक्षित एन.आर.आय. आहेत. Dipa Dalvi ताई तर एक नंबर सुगरण आहेत. नम्रता माळी पाटीलत सुद्धा शिक्षिका आहे. Sadhana Revankar ताईच्या घरी तर फार मोठा व्यवसाय आहे. वेळ पडली तर त्या दोन चार बायका घरात कामाला ठेऊ शकतात. Sujata Shembekar S जी सुद्धा फार उच्चशिक्षित आहेत. त्यांनी काही वर्षे मरीन मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. Manisha Kulkarni ताई तर, मुंबई मधील एका मोठ्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. शिवाय त्या संगीत विशारद सुद्धा आहेत. पण जेवण बनवण्यात सुद्धा एकदम मास्टर आहेत. आणि आमची Kanchan Nilesh Bhave ताई तर चक्क इंजिनियर आहे.
वरील सर्व महिला, या माझ्या फेसबुक वरील ओळखीतल्या आहेत. आणि या सगळ्याच अगदी उच्चाविध्याविभुशीत सुद्धा आहेत. शिवाय या सगळ्याजनी, गडगंज घरच्या आणि कमवत्या सुद्धा आहेत. मनात आलं तर, स्वयपाक बनवण्यासाठी त्यांच्या घरात त्या एखादी बाई कामाला सुद्धा ठेऊ शकतात. पण त्या तसं करत नाहीत. किंवा त्यांना स्वतःलाच ते आवडत नाही. कारण, घरच्या माणसाला आपल्याच हातचं जेवण असावं. या विषयवार या सगळ्याजणी अगदी ठाम आहेत.
सगळी व्यवसायिक कामं करत असताना, त्या स्वयपाक कामात सुद्धा खूप सुगरणी आहेत. हे मला इथे अगदी अभिमामाने सांगावसं वाटतं.
जास्ती शिकलं म्हणजे, स्वयपाक पाणी करायचा किंवा शिकायचा नसतो. हे साफ चुकीचं आहे, असं मला वाटतं. आणि वर नावं लिहिलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींनी ते सपशेल खोटं ठरवलं आहे, ज्याला खायची आवड आहे, त्याला बनवायची सुद्धा आवड निर्माण होते.
त्याला उदाहरण म्हणजे, मी स्वतः आहे.
मला वेगवेगळे पदार्थ खायला जसे आवडतात. तसे मला निरनिराळे पदार्थ सुद्धा बनवता येतात बरं का. मला फक्त भाकरी बनवायला येत नाही. नाहीतर, मी तुम्हाला हवे ते पदार्थ माझ्या हाताने बनवून खाऊ घालू शकतो. इतकंच काय, तर खुद्द माझ्या बायकोला सुद्धा मी बरेच पदार्थ बनवायला शिकवलं आहे. मी पुरुष असून सुद्धा अशा कामात फार मोठी रुची ठेवत असतो. तर मग, नवतरुण महिलांनी किंवा उच्चशिक्षित मुलींनी तरी या विषयात मागे का असावं..?.
मुलगा कितीही गर्भश्रीमंत असुध्यात, पण तो जर कोणतंही काम न करता घरात बसून तुकडे मोडत असेल. तर हि गोष्ट कोणत्याच महिलेला पटणार नाही. काही अंशी हा विषय सुद्धा अगदी तसाच आहे.
मला, माझ्या त्या मित्राचं बोलणं बिलकुल पटलं नाही. मुलगी कमवती जरी झाली, तर ती फारतर घरामध्ये एखादी स्वयपाकीन बाई कामाला ठेवेल. पण कधीतरी एक विरंगुळा म्हणून किंवा आवड म्हणून तरी स्वयपाक यायलाच हवा असं माझं मत आहे.
कारण, विवाहसंस्थेत प्रेमाचे सगळे मार्ग हे पोटातूनच जात असतात. असं माझं ठाम मत आहे. यावर बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा असू शकतात.
पण, बाईच्या जातीला जेवण बनवता आलंच पाहिजे. या मतावर मी अगदी ठाम आहे.
( टीप :- महिला म्हणजे घरगडी आहेत का..? आम्ही फक्त चूल आणि मुल हेच पहायचं का..? अशा आशयाची " विचारसरणी " असणाऱ्या पुरुष आणि महिलांनी, या पोस्टवर बिलकुल फिरकू नये. अपमान केला जाईल..! )

सगळेच डॉक्टर काही, वैद्यकीय उपचार करत बसत नाहीत.
त्यातील काही जण,
आर.टी. ओ. ऑफिसच्या बाहेर बसून..
वैद्यकीय प्रमाणपत्रावर,
सही आणि शिक्का मारायची नकली कामं सुद्धा करत असतात..!
पुण्यातील..
जैन, गुजर, मारवाड्याच्या मुली..
लग्नाच्या अगोदर, त्यांच्या आवडीची आणि त्यांना हवी तशी मॉडर्न वेशभूषा करत असताना मला नेहेमी पाहायला मिळतात. आणि त्यासाठी, त्यांच्या घरातून सुद्धा त्यांना बिलकुल विरोध किंवा नकार होत नसावा. असं, किमान माझ्यातरी पाहण्यात आलं आहे.
परंतु, त्याच मुली लग्न झाल्यावर मात्र..
फक्त मराठमोळा आणि पारंपारिक वेश, म्हणजे सहावारी साडीच परिधान करत असताना मला आढळतात. आणि, त्यांच्या त्या साडीचा पदर सुद्धा डोक्यावरून खाली कधीच ढळत नसतो.
 विशेष म्हणजे, त्या सगळ्याच मुली उच्चविद्याविभूषित सुद्धा असतात. खरच.. त्या महिलांना मी अगदी मनापासून मानतो..! ( शेवटी, आवड आपली-आपली )
बहुतेक यालाच #संस्कृती जपणं असं म्हणत असावेत.
सर्वांना, #मराठमोळ्या_भाषा_दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

परिस्थितीने गांजलेला मनुष्य..
प्रवास करण्यासाठी, महामार्गावर उभा असताना. तो, एस. टी. ला कधीही हात दाखवत नाही.
त्यावेळी, तो एखाद्या साध्या मालवाहू ट्रकला आपली प्रथम पसंती देत असतो..!

काल आमच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती माहितीच्या अधिकारात काहीतरी विचारणा करीत होता.
शरीराने अगदी कृश असा तो व्यक्ती होता. मी त्याच्याकडेच पाहत होतो.
तितक्यात, माझ्या शेजारी बसलेला आमचा एक शिपाई मला म्हणाला.
कोणाला बघताय तुम्ही..? त्या किडक्याला बघताय का..?
मी मानेनेच त्याला होकार कळवला..
तर, तो शिपाई मला म्हणाला..
तो आपलाच कर्मचारी, कारकून आहे आपल्या इथे. कामाला यायचं नाव घेत नाही. आणि फालतू उठाठेवी भरपूर करत असतो. जसा माहितीचा अधिकार आला आहे. तसा तर, तो अगदी दिवाना झाला आहे. नको त्याची माहिती विचारत फिरत असतो. कधीकधी, मला सुद्धा भरपूर परेशान करत असतो. पण मी त्याला सरळ सांगतो.. मी शिंपाई आहे, लागलं तर झाडू मारायला सांगा पण नको त्या माहित्या मला विचारू नका..!
आणि पुढे म्हणाला, आज तो एका गरीब माणसाच्या विरोधात माहितीचा अर्ज घेऊन आला आहे. ज्याच्या घराच्या बाहेर अंघोळीसाठी एक मोरी ( न्हाणी ) होती. ती त्याने, घराच्या आतील बाजूस घेतली. त्यामुळे याची जळाली आहे. त्याने, ती जागा एक्वायार केलीच कशी..? असं त्याचं म्हणनं आहे..!
त्या लुकड्या सुकड्या व्यक्तीला पाहून, मी आमच्या शिपायाला म्हणालो..!
लैच मस्ती आहे राव याला, नको ते फालतू उद्योग करत सुटलाय, त्याला कोणी ठोका दिला नाही वाटतं अजून..!
तर तो शिपाई मला म्हणाला..!
आता तुम्हीच बघा, त्याच्या अंगावर जरा तरी " मटन " आहे का..? एका बुक्कीत मरल तो. त्यामुळे, त्याला कोणी मारत नाही. आणि, त्यामुळे हा सुसाट सुटला आहे.
त्या शिपायाच विशिष्ट असं बोलनं ऐकून, मला तर हसू बिलकुल कंट्रोल होत नव्हतं. पण, कसं बसं मी ते कंट्रोल केलं.
आपल्याकडे बोलताना सर्रास असं म्हणत असतात.. त्याच्या अंगावर मास आहे कि नाही.
पण, अंगावर मटन आहे का, असं कोणी म्हणत नाही.
त्यामुळे.. या शिपायाच्या वाक्यानंतर,
मला.. तो समोरील कृश कारकून व्यक्ती, लुकडा बोकड वाटत होता. तर, आमचा शिपाई मात्र मला अव्वल दर्जाचा कसाई वाटत होता..!

पाच सहा दिवसांपूर्वी, मला थोडा फावला वेळ मिळाला होता. म्हणून..सहजच मी घरात टीव्ही पाहत बसलो होतो. न्यूज चॅनल चालू होता. आणि अचानक, अंगावर काटा आणणारी एक बातमी माझ्या नजरेसमोर आली.
भारतातील प्रत्येक राज्यातून, दरवर्षी साधारणपणे तीन ते चार हजार लहान मुलं-मुली हरवली जात असतात. आणि, शेवटपर्यंत त्यांचा कोणताच तपास लागत नाही.
लहान मुलांना.. चोरी करणे किंवा भिक मागणे अशा कामाला लावलं जातं. तर, मुली मोठ्या झाल्यावर त्यांना वेश्याव्यवसाय करायला भाग पाडलं जातं.
ती बातमी पाहून, माझ्या काळजाचं अगदी पाणी-पाणी झालं. आणि, अचानक माझं मन दहा वर्ष पाठीमागे गेलं.
दहाएक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..
आम्ही तिरुपती बालाजीचं दर्शन आटोपलं, दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता आमच्या परतीच्या प्रवासाची तिकिटं होती. रेणीगुंठा स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये त्या दिवशीचा शेवटचा रस्सम भात आम्ही मनसोक्त ओरपून घेतला. रेल्वेमध्ये काही चांगल्या पद्धतीचं जेवण मिळत नाही. त्यामुळे, संध्याकाळच्या जेवणासाठी त्याच हॉटेल मधून मैद्याच्या पांढऱ्या फटक रोट्या आणि वाटाण्याची जाडसर पातळ भाजी, श्रीखंडाच्या एका मोकळ्या डब्यामध्ये पार्सल करून घेतली. दुपारी पावणेतीन वाजता, चेन्नई एक्स्प्रेस रेणीगुंठा स्टेशनवर येऊन धडकली. आम्ही, आमच्या सामानांच्या पिशव्या आवरत ट्रेनमध्ये प्रवेशित झालो. बरोबर तीन वाजता गाडीने रेणीगुंठा स्टेशन सोडलं. धडाक धुडूक करत.. ते अजस्त्र लोखंडी धूड लोखंडी रुळावरून हळुवारपणे धाऊ लागलं.
स्टेशना मागून स्टेशनं मागे पडत होती. बाहेर दिसणारी हिरवाई पाहत गाडीच्या धडधडीचे हेलकावे खात मी खिडकीत बसून होतो. रात्र रंगात आली होती, आम्ही आमची जेवणं आटोपली आणि ताबडतोब निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
रात्रभर.. रेल्वेचा खडखडाट आणि चिंचोळ्या आवाजात वाजणारा तिचा हॉर्न आमची अनामिक सोबत करत होता. रेल्वेत झोपताना, अगदी लहानपणी आईच्या मांडीवर झोपल्या सारखा मला अनुभव येत होता. त्या मधुर आठवणीत थोड्या वेळातच कधी एकदा माझा डोळा लागला, ते माझं मलाच समजलं नाही. ते.. सकाळी काही चित्र विचित्र आवाजाने माझी निद्रा भंग पावली.
सकाळचे आठ वाजले होते, आमची गाडी महाराष्ट्रातील दौंड स्टेशनवर येऊन पोहोचली होती. अगदी तासाभरात, पुणे स्टेशन येणार होतं.
दौंड वरून पुण्यात कामाला येणाऱ्या चाकरमानी लोकांनी मिळेल ती मोकळी आरक्षित जागा बिनधास्तपणे आपल्या नावावर करून घेतली होती. आम्ही सुद्धा, ताबडतोब आमच्या ब्यागा आवरायला घेतल्या. थोडावेळ विश्रांती घेत, गाडीने पुन्हा एक जोरदार भोंगा दिला. आणि पुन्हा एकदा ते धूड पुढील दिशेने मार्गक्रमण करू लागलं.
चाय य्ये... ए मसालेदार चाय्य ये, ए.. चिक्की ये चिक्की, ए लोणावला चीक्कीये... थंडा पाणी बॉटल बोलो, थंडा पाणीये.. बोला..लोकमत, सकाळ, लोकसत्ता, टाईम्स, इंडिया टुडे. तर कोणी, खिडकीतून ओरडत होता.. बोलो, व्हेज बिर्याणी अंडा बिर्याणी है. बोलो आम्लेट पाव है, गरमागरम वडा पाव घ्या वडा पाव.
रेल्वेतील या सगळ्या संमिश्र आवाजांनी माझं डोकं अगदी उठलं होतं. हि सगळी भाऊगर्दी हळूहळू पुढे सरकत होती. गाडीने पुन्हा एकदा जोरदार वेग धरला होता. आणि तितक्यात, कुठूनतरी मधुर अशी छोटी ढोलकी वाजल्याचा मला आवाज आला. तसं माझं तिकडे लक्ष गेलं.
चार-पाच वर्षांचं नजर लागावं इतकं सुंदर, गुटगुटीत आणि गोरं गोमटं पोर माझ्या नजरेस पडलं. जीन्सची मळकट प्यांट आणि अगदी साधा टी शर्ट त्याने अंगात घातला होता. त्याच्या ओठाच्या वरील बाजूस, स्केच पेणच्या सहाय्याने पातळशा नकली मिशा कोरल्या होत्या. लिपस्टिकच्या सहाय्याने, त्याचे कळकटलेले गाल बळेच लाल केले गेले होते.
डोक्यावरील मळकट टोपीला दोरीच्या सहाय्याने बांधलेला लहानसा गोंडा. त्या ढोलकीच्या तालावर, तो हवेतल्या हवेत गोल फिरवत होता. आपल्या शरीराची अजब हालचाल करत तो जागेवर नाचत होता. आणि चालता-चालता एका हाताने रेल्वेतील प्रवाशांना भिकेची याचना सुद्धा करत होता.
ते मुल भयंकर गोरंपान असल्याने, त्याच्या गालावर असणारे काही कळकट डाग माझ्या नजरेतून सुटत नव्हते. त्याचे पाणीदार डोळे मला जागेवर खिळवून ठेवत होते. आणि, मला कोड्यात सुद्धा पाडत होते. त्या मुलाच्या पाठोपाठ, एक तिशीतली काळीकुट्ट आणि कशीतरीच दिसणारी बाई. एक छोटीशी ढोलकी वाजवत त्या मुलाच्या मागोमाग चालत पुढे येत होती. आणि, मागीलबाजुने ढोलकीच्या सहाय्याने ती त्या मुलाला हळूहळू पुढे सुद्धा ढकलत होती.
त्या बाईला पाहून, कोणत्याच अंगाने मला तो तिचा मुलगा वाटत नव्हता.
माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. हा नेमका काय प्रकार असावा..? हे मुल नेमकं त्या बाईचंच असावं का..? कि लहानपणी त्याला कुठूनतरी चोरलं वगैरे असावं..? अशा नानाविध प्रश्नांनी मला अगदी भंडावून सोडलं होतं. पण हे सगळं, मी कोणाला आणि कसं विचारणार होतो..!
पण.. मला नक्की ठाऊक होतं, हे मुल नक्कीच चोरीचं असणार आहे..! पण माझ्याकडे, कोणताच सबळ पुरावा नसल्याने मी अगदी हतबल झालो होतो. ते गोड गोबरं बाळ, गालातल्या गालात हसत भिक मागत पुढे-पुढे निघालं होतं. आणि नकळत, माझ्या डोळ्यात अश्रूंची दाटी झाली होती.
" दैव देतं आणि कर्म नेतं " कोणाच्या नशिबात काय लिहून ठेवलेलं असतं ते कोणालाच ठावूक नसतं..!
चुकून ते मुल, कोणा श्रीमंताच्या घरात जन्माला आलं असेल. आणि त्याच्या वाट्याला हे भोग आले असतील. तर, हि घटना म्हणजे त्याच्याकरिता अगदी दुर्दैवी आणि क्रूर गोष्ट होती.
बघता-बघता ते लहान बाळ माझ्या नजरेआड झालं.
आणि, पुढे थोड्यावेळात पुणे स्टेशन सुद्धा आलं. दुक्खी अंतकरणाने मी त्या गाडीच्या बाहेर पडलो. आणि माझ्या घरी पोहोचलो. पण, सकाळच्या या अनपेक्षित घटनेने माझा संपूर्ण दिवस अगदी उदासवाणा असा गेला होता.
आज.. तो लहान मुलगा, पंधरा वर्षांचा झाला असावा. आज तो काय करत असेल ते परमेश्वरच जाणो. पण, टीव्ही वरील बातमी पाहून माझं मन थोडं सुखावलं.
कारण, त्यात सांगत होते,
कि.. भारतात जन्मणाऱ्या प्रत्येक लहान मुलाचं एका वर्षांनंतर " आधार कार्ड " काढून ठेवा.
जेणेकरून, तुमचं मुल हरवलं किंवा चोरीला जरी गेलं.
आणि चुकून, दहा वर्षांपूर्वी माझ्यासोबत जो प्रसंग घडला होता. तसा प्रसंग अन्य कोणासोबत घडला. तर, तुम्ही दोन पाच लोकांची मदत घेऊन त्या संशयित मुलासाबोत पोलीस केंद्रात दाखल होऊ शकता. आणि सुदैवाने त्या मुलाचं आधार कार्ड काढलं गेलं असेल. तर, त्या मुलाची खरी माहिती आणि ओळख आपल्याला मिळू शकेल. आणि जर ते मुल चोरीचं असेल, तर त्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा तर होईलच. आणि, त्या लहान मुलाला त्याचं घर आणि त्याचा हक्क नक्कीच परत मिळेल. किंवा एक समाजकार्य म्हणून काहीतरी उचित गोष्ट केल्याचा तुम्हाला एक अनामिक आनंद तरी नक्कीच मिळेल. त्या लहान मुलाच्या आई वडिलांचे आणि खुद्द त्या लहान मुलाचे, तुम्हाला आशीर्वाद सुद्धा नक्की मिळतील.
त्यामुळे, माझ्या सर्व वाचक मित्रांना माझी एक कळकळीची विनंती आहे.
तुमच्या घरातील, आणि शेजारील किंवा ओळखीतील प्रत्येक लहान मुलाचं " आधार कार्ड " तुम्ही तातडीने काढून घ्या. आणि भविष्यात घडणाऱ्या नको त्या गोष्टींपासून चिंतामुक्त व्हा.
आणि जमल्यास, हा संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आजचा प्रेमदिवस थोडा वेगळ्या पद्धतीने साजरा करा..!
मी लहान असताना..
एकदम भारीतली भारी दुचाकी म्हंटली, तर.. बुलेट, जावा, स्कूटर आणि त्यानंतर लुना असा उतरता क्रम त्यावेळी आम्हाला पाहायला मिळत होता. खरोखर, त्या दुचाक्या अगदी भारीच होत्या. आणि, आता तर त्या दुचाक्या अँटिक पीस झाल्या आहेत.
त्यामुळे साहजिकच, त्यांचा भाव सुद्धा बराच वधारला आहे. आणि आज त्याच जुन्या गाड्या, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये, मॉल मध्ये किंवा एखाद्या शोरूममध्ये. मानाचं पान झालेल्या आणि दिमाखदार स्वरुपात नटून-थटून विराजमान झालेल्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असतील.
त्याकाळी.. आमच्या पुणे शहरामध्ये जास्तकरून स्कूटर नावाची दुचाकी फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायची. मला आठवतंय असं, १९८७ सालाच्या सुमारास. " बजाज कब " नावाची बाजारात नवीन आलेली स्कूटर, काहीतरी आठ-दहा हजार रुपयाला होती. आणि, ती घेण्यासाठी सुद्धा, वर्ष दोन वर्ष आगाऊ बुकिंग करून ठेवावी लागत असे. अन्यथा गाडी मिळत नसे. काही महाभाग तर, अशा दुचाकी खरेदी नंबरचा त्याकाळात सुद्धा काळाबाजार करायचे असं माझ्या ऐकण्यात होतं. तो फारच विचित्र काळ होता. कारण नसताना, जनतेला मागास ठेवण्यात, राजकारणी मंडळी फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली होती. बघा ना.. साधी गोष्ट आहे, आजच्याला विदेशात नवनिर्माण होणारी वस्तू, अगदी दुसऱ्या दिवशी भारतात असते. मग त्याकाळी, आम्ही एवढे मागास का होतो..? किंवा, मुद्दाम ठेवले गेले होतो. हा फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. असो..
त्याकाळी, माझ्या वडिलांची ऐपत असून सुद्धा ते काही स्कूटर खरेदी करणार नव्हते. हे मला चांगलच माहित होतं. त्यामुळे..खरेदी फार लांब राहिली. मला तिच्यावर पाठीमागे बसून एखादी चक्कर मारायला जरी मिळाली, तरी फार समाधान वाटायचं
त्याकाळी, आमच्या पिंपरीमध्ये सिंधी लोकांची फार मोठी वसाहत आणि बाजारपेठ सुद्धा होती. आणि, ती आजही आहे. आणि अगदी भरभराटीत सुद्धा आहे. त्या भागात असणाऱ्या काही व्यापाऱ्यांकडे सुद्धा अशा स्कूटर असायच्या. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे, एकतर त्या स्कूटरवर एकावेळेला दोन लोकांना वाहून नेता यायचं. आणि, समोरच्या भागात तिचा ब्रेक असणाऱ्या मोकळ्या जागेत काही किरकोळ किराणा सामान सुद्धा अगदी सहज नेता यायचं. त्यामुळे, व्यापारी वर्गात आजही स्कूटर सारख्या वाहनांना फार मोठी मागणी आहे.
त्या " परदे के पीछे क्या है " च्या जमान्यात, स्कुटरवर बसून एखादी विवाहित जोडी जात असतांना पाहून मनाला फार छान वाटायचं. कारण त्याकाळी, येवढा मोकळेपणा नव्हता. बाई म्हणजे फक्त चूल आणि मुल. येवढ्यातच तिचं विश्व सामावलं होतं.
 तर, साडी परिधान केलेली ती महिला, त्या स्कूटरवर नवरोबाच्या पाठीमागे अगदी अंग चोरून आणि थोडसं अंतर ठेऊन, एकांगी बसलेली असायची. कारण, साडी घालून स्कूटरवर पाठीमागील बाजूस दुटांगी बसनं काही सोपं काम नाही.
महिलांचं ठीक आहे, पण त्याकाळी पिंपरीतील बाजारपेठेत काही सिंधी व्यक्ती सुद्धा स्कूटरच्या मागील सीटवर महिलांसारखं एकांगी बसलेले मला पाहायला मिळायचे. त्यावेळी, मला त्या मागे बसलेल्या व्यक्तीवर भलताच संशय यायचा. कि, हा बाप्या स्कूटरवर बाईसारखा का बसला असावा..? कि.. याच्यात काही " त्रुटी " वगैरे तरी नाही ना..? असा भलताच संशय, माझ्या बालमनात येऊन जायचा.
त्यात माझी काहीएक चूक नव्हती, कारण.. त्यावेळी मी वयाने बराच लहान असल्याने, मला समज सुद्धा फार कमी होती.
त्या सिंधी व्यक्ती, स्कूटरवर एकांगी का बसत होत्या..?
या फार मोठ्या गूढ प्रश्नाचं उत्तर, मला बऱ्याच वर्षांनी सुटलं. आणि त्यांच्या अशा पद्धतीने बसण्यामागचं मुख्य कारण म्हणजे..
तेलकट, तुपट आणि मैद्याचे पदार्थ खाऊन त्या सिंधी लोकांची पोटं अगदी पोत्यासारखी सुटलेली असायची. आणि, एवढं मोठं बोजड अंग घेऊन, टांग टाकून त्यांना त्या स्कूटरवर बसता यायचं नाही. त्यामुळे, ती लोकं स्कूटरवर महिलां सारखं एकांगी बसायचे.
हे गणित.. माझ्या ध्यानात आल्यापासून, त्यांच्यावरील असणारा माझा " संशय " सुद्धा कायमचा दूर झाला होता.
हल्लीच्या जमान्यात, म्हणावा असा अडाणीपणा राहिला नाहीये.
शहरातील मुली.. दुचाकी चालवत असताना, त्याला साजेसा असा पोशाख त्या परिधान करत असतात. मुलाच्या पाठीमागे बसणाऱ्या मुली, आता त्या दुचाकी स्वाराला सुद्धा ओवरटेक करू लागल्या आहेत. अगदी, त्या बाईक स्वाराच्या बोकांडीवर बसलेल्या आपल्याला त्या आढळत असतीलच. तर समस्त महिलावर्ग सुद्धा पाठीमागे एकांगी बसताना, नवऱ्याला अगदी रेलून बसलेल्या असतात. आणि, त्याच्या खांद्यावर आपली हनुवटी ठेवून त्याच्या कानात काहीबाही चिवचिव करत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
 नाही म्हणता, आता बऱ्याच प्रमाणात फार मोठी प्रगतीच झाली आहे.
खेड्यातील महिला, नऊवारी साड्यांना अलविदा करत आता सहावारी साड्या नेसू लागल्या आहेत. अगदी सहावारी साडी नेसून त्या बाईक सुद्धा चालवू लागल्या आहेत. आणि ते सुद्धा अगदी कम्फर्टेबल बरं का. अगदी सावरून आवरून अंगाचा कोणताही लबाड भाग दिसणार नाही. याची पूर्ण दक्षता घेऊन त्या दुचाकि चालवताना आपल्याला आढळतात.
पण, त्याच सहावारी साड्या परिधान करणाऱ्या काही साध्याभोळ्या महिला, दूरच्या प्रवासात दुचाकीवर जात असताना. एकांगी बसून अगदी अवघडतात. आणि व्यवस्थितपणे, कसं का होईना, त्या गोल साड्यांचा बोजा सांभाळत, अवघडत, दुटांगी बसत असतात. पण हे सुद्धा त्याचं अगदी लाजवाब असं कसब असतं. अशा दुटांगी बसताना सुद्धा, आपल्या शरीराचा कोणताही भाग उघडा दिसणार नाही. याची त्या भयंकर काळजी घेत असतात. हे सगळं, मी बरेच वेळा पाहिलं आहे. आणि, कदाचित तुम्हाला सुद्धा हे पाहायला मिळालं असावं. थोड्याफार त्याच फरकाने, खेडे गावातील काही वृद्ध महिला. ज्या अजूनही, नऊवारी साड्या परिधान करत आहेत. त्या मात्र, त्यांच्या मुलांच्या किंवा नातवांच्या बाईकवर अगदी दुटांगी बसून आणि आरामात प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात.
त्यामुळे, काहीवेळा.. " जुनं ते सोनं " असं म्हणताना, मला कोणताच संकोच वाटत नाही...!


Saturday, 11 March 2017

दारू, जास्ती प्रमाणात फक्त " पुरुषांनाच " आवडते.
कारण..
दारू हि " स्त्रीलिंगी " आहे..! 👍

परवा.. देवदर्शनासाठी आम्ही वणीला ( नाशिक ) गेलो होतो,
माता सप्तशृंगी देवीचं दर्शन आटोपलं. आणि, इथे आलोच आहे. तर, सहज त्या भागात मी फेरफटका मारत असताना. त्या ठिकाणी, रस्त्याच्या कडेला काही झोपडीवजा छोटी दुकानं मला आढळली.
काय आहे ते पाहू, म्हणून मी त्या दुकानांपाशी थांबलो.
तर ते सगळे, जडीबुटी विकणारे काही मराठी आणि गुजराती भाषेचं मिक्सिंग असणारे आदिवासी लोकं तिथे व्यवसाय करत होते. 
त्या दुकानात, मला काही घ्यायचं नव्हतं. पण माझी चीक्त्सक वृत्ती मला शांत बसू देत नाही. म्हणून मी तिथे फिरत होतो.
प्रत्येक दुकानात.. थोड्याफार फरकाने, सगळी समसमान झाडपाल्याची औषधं होती.
अशी.. एका लाईनीत बरीच दुकानं त्याठिकाणी होती. मी, त्या प्रत्येक दुकानात डोकावत पुढे निघालो होतो. आणि, अचानक एका दुकानापाशी मी थांबलो..
कारण, मी तिथे जाण्याअगोदर त्या दुकानात एक व्यक्ती काहीतरी विचारपूस करत होता.
काही लोकांना खूप घाण सवय असते. गरीब लोकांना विनाकारण खाली दाखवायचं, किंवा त्यांची टर उडवायची कामं ती सर्रास करत असतात. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सुद्धा अशा व्यक्ती पाहायला मिळाल्या असतीलच.
तर, त्या दुकानात थांबलेली ती व्यक्ती अगदी अशाच प्रकारची होती. मी तिथे जाऊन थांबलो. आणि, हा गडी तर बोलायला थोडा चालूच होता.
त्या व्यापारी व्यक्तीने, विक्रीला ठेवलेल्या प्रत्येक जडीबुटीची तो त्यांना माहिती विचारात होता.
" ते काय आहे..?
तो नागरमोथा आहे, घरात उंबरठ्यावर बांधून ठेवायचा. त्यामुळे बाहेरची बाधा होत नाही..!
" आणि, ते काय आहे..?
ती मुरड शेंग आहे, लहान मुलाच्या पोटात दुखायला लागलं कि त्याला उगळून पाजायच. पोटदुखीचा त्रास ताबडतोब कमी होतो.
" आणि ते काय आहे..?
ती हातजोडी आणि पायजोडी आहे. तुम्हाला व्यवहारात कोणी फसवलं असेल, तर त्याचा वापर करून आपण त्या लोकांना हातपाय जोडत आपल्या घरी बोलावू शकतो. फार जालीम आहे ते.
" आणि, ते केळा सारखं दिसतंय ते काय आहे..?
ती जंगली केळी आहेत, त्यांना वाळवून आणि वाटून त्याचं चूर्ण पिल्यावर मुतखडा कायमचा नाहींसा होतो.
" आणि ते, त्या डब्यात ठेवलंय ते काय आहे..?
खरं तर.. या व्यक्तीला, तो वैदू माहिती देऊन फार वैतागला होता. पण शेवटी, धंदा करायचा आहे. म्हणजे वैतागून चालत नाही.
तर, तो वैदू म्हणाला..
त्या डब्यात व्हय.. ती गर्भार वटी आहे..!
" त्याने काय होतय..?
त्याने.. एखाद्या बाईला गर्भधारणा होत नसेल. तर, तिला त्याची पावडर करून सात दिवस पाण्यातून प्यायला द्यायचं. एका महिन्यात गर्भधारणा होणार म्हणजे होणारच..!
तर.. लगेच तो व्यक्ती म्हणाला.. आणि, चुकून मुलात प्रोब्लेम असल तर..?
तर.. त्या दोघांनाबी ते औषध पिऊ घालायचं. सगळं काही व्यवस्थितपणे होतंय..!
आता हे ऐकल्यावर त्याने गप्प बसायचं ना..
तर म्हणाला, आणि त्या दोघात सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर..?
शेवटी वैतागून तो वैद म्हणाला...
म्हणजे.. नेमका कोणाला प्रॉब्लेम आहे..? ते तरी मला कळूद्या..!
तर तो व्यक्ती म्हणाला...
म्हणजे.. तुम्ही असं समजा, त्या मुलात काहीतरी प्रॉब्लेम असेल तर..?
त्यावर, तो वैद त्याला म्हणाला..
मग.. ज्याला " तसला " प्रॉब्लेम नसेल, त्याला आपल्या घरी घेऊन यायचं..!
जसा त्या वैद्याने, असा भयंकर शालजोडीतला फटका त्याला हाणला.
तसा, त्या माणसाने सुद्धा तिथून लागलीच काढता पाय घेतला..! 😀😀😀

हल्ली.. नव्वद टक्के मुलांना टक्कल पडत आहे..!
म्हणजे, टक्कल पडणे हा विषय आता अगदी कॉमन झाला आहे.
आणि त्यात, " डीझेल " महाशय आमच्या पंगतीत आल्यामुळे. आम्हा टक्कलग्रस्त लोकांचा भाव खूप वधारला आहे.
त्यामुळे, चिकण्या चोपड्या मुली सुद्धा टकल्या मुलांना लगेच पटत असतात. किंवा, लग्नासाठी आपली लगेच पसंती कळवत असतात.
कारण.. त्यांना माहित असतं,
भरगच्च केस असणाऱ्या मुलाशी जरी आपण लग्न केलं. आणि, तो जर पुढे जाऊन टक्कल पडला तर..?
नंतर मनस्ताप करत बसण्यापेक्षा..
त्या, सुरवातीलाच आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून मोकळ्या होतात..!