Saturday, 11 March 2017


परवा.. देवदर्शनासाठी आम्ही वणीला ( नाशिक ) गेलो होतो,
माता सप्तशृंगी देवीचं दर्शन आटोपलं. आणि, इथे आलोच आहे. तर, सहज त्या भागात मी फेरफटका मारत असताना. त्या ठिकाणी, रस्त्याच्या कडेला काही झोपडीवजा छोटी दुकानं मला आढळली.
काय आहे ते पाहू, म्हणून मी त्या दुकानांपाशी थांबलो.
तर ते सगळे, जडीबुटी विकणारे काही मराठी आणि गुजराती भाषेचं मिक्सिंग असणारे आदिवासी लोकं तिथे व्यवसाय करत होते. 
त्या दुकानात, मला काही घ्यायचं नव्हतं. पण माझी चीक्त्सक वृत्ती मला शांत बसू देत नाही. म्हणून मी तिथे फिरत होतो.
प्रत्येक दुकानात.. थोड्याफार फरकाने, सगळी समसमान झाडपाल्याची औषधं होती.
अशी.. एका लाईनीत बरीच दुकानं त्याठिकाणी होती. मी, त्या प्रत्येक दुकानात डोकावत पुढे निघालो होतो. आणि, अचानक एका दुकानापाशी मी थांबलो..
कारण, मी तिथे जाण्याअगोदर त्या दुकानात एक व्यक्ती काहीतरी विचारपूस करत होता.
काही लोकांना खूप घाण सवय असते. गरीब लोकांना विनाकारण खाली दाखवायचं, किंवा त्यांची टर उडवायची कामं ती सर्रास करत असतात. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सुद्धा अशा व्यक्ती पाहायला मिळाल्या असतीलच.
तर, त्या दुकानात थांबलेली ती व्यक्ती अगदी अशाच प्रकारची होती. मी तिथे जाऊन थांबलो. आणि, हा गडी तर बोलायला थोडा चालूच होता.
त्या व्यापारी व्यक्तीने, विक्रीला ठेवलेल्या प्रत्येक जडीबुटीची तो त्यांना माहिती विचारात होता.
" ते काय आहे..?
तो नागरमोथा आहे, घरात उंबरठ्यावर बांधून ठेवायचा. त्यामुळे बाहेरची बाधा होत नाही..!
" आणि, ते काय आहे..?
ती मुरड शेंग आहे, लहान मुलाच्या पोटात दुखायला लागलं कि त्याला उगळून पाजायच. पोटदुखीचा त्रास ताबडतोब कमी होतो.
" आणि ते काय आहे..?
ती हातजोडी आणि पायजोडी आहे. तुम्हाला व्यवहारात कोणी फसवलं असेल, तर त्याचा वापर करून आपण त्या लोकांना हातपाय जोडत आपल्या घरी बोलावू शकतो. फार जालीम आहे ते.
" आणि, ते केळा सारखं दिसतंय ते काय आहे..?
ती जंगली केळी आहेत, त्यांना वाळवून आणि वाटून त्याचं चूर्ण पिल्यावर मुतखडा कायमचा नाहींसा होतो.
" आणि ते, त्या डब्यात ठेवलंय ते काय आहे..?
खरं तर.. या व्यक्तीला, तो वैदू माहिती देऊन फार वैतागला होता. पण शेवटी, धंदा करायचा आहे. म्हणजे वैतागून चालत नाही.
तर, तो वैदू म्हणाला..
त्या डब्यात व्हय.. ती गर्भार वटी आहे..!
" त्याने काय होतय..?
त्याने.. एखाद्या बाईला गर्भधारणा होत नसेल. तर, तिला त्याची पावडर करून सात दिवस पाण्यातून प्यायला द्यायचं. एका महिन्यात गर्भधारणा होणार म्हणजे होणारच..!
तर.. लगेच तो व्यक्ती म्हणाला.. आणि, चुकून मुलात प्रोब्लेम असल तर..?
तर.. त्या दोघांनाबी ते औषध पिऊ घालायचं. सगळं काही व्यवस्थितपणे होतंय..!
आता हे ऐकल्यावर त्याने गप्प बसायचं ना..
तर म्हणाला, आणि त्या दोघात सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर..?
शेवटी वैतागून तो वैद म्हणाला...
म्हणजे.. नेमका कोणाला प्रॉब्लेम आहे..? ते तरी मला कळूद्या..!
तर तो व्यक्ती म्हणाला...
म्हणजे.. तुम्ही असं समजा, त्या मुलात काहीतरी प्रॉब्लेम असेल तर..?
त्यावर, तो वैद त्याला म्हणाला..
मग.. ज्याला " तसला " प्रॉब्लेम नसेल, त्याला आपल्या घरी घेऊन यायचं..!
जसा त्या वैद्याने, असा भयंकर शालजोडीतला फटका त्याला हाणला.
तसा, त्या माणसाने सुद्धा तिथून लागलीच काढता पाय घेतला..! 😀😀😀

No comments:

Post a Comment