Thursday, 16 March 2017

आमच्या इथे, फार पूर्वीपासून एक मारवाडी कुटुंब राहायला आहे. ती लोकं पैश्या पाण्याने खूपच मजबूत आहेत. आणि, तितकीच धार्मिक सुद्धा आहेत. ती लोकं महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत, त्यामुळे.. त्यांना कोणत्याही धार्मिक कार्याकरिता आपल्या मराठी ब्राम्हणांनाच बोलवावं लागतं. कारण आमच्या भागात, हिंदी भाषिक ब्राम्हण उपलब्ध नाहीयेत. आपले मराठी ब्राम्हण, विधी करताना संस्कृत मधील श्लोक म्हणतात.
परंतु.. यजमानांशी मधेच काही बोलायचं असेल. तर, त्यांच्याशी ते हिंदीमध्ये वार्तालाप करत असतात. त्यामुळे, ती मारवाडी लोकं माझ्या घरासमोर राहणाऱ्या एका मराठी ब्राम्हणाला सगळे धार्मिक विधी करण्यासाठी त्यांच्या घरी नेहेमी बोलावत असतात. योगायोगाने तो ब्राम्हण मुलगा सुद्धा माझा चांगला मित्र आहे.
त्या मारवाडी लोकांची, अजून एक वेगळीच आणि खूप चांगली अशी रीतरिवाज आहे.
ती लोकं.. महिन्यातून किमान एकदा तरी, ठराविक दिवशी..
ब्राम्हणांना शिधा स्वरुपात काहीतरी अन्नदान करत असतात. तर मग, त्यात पाच कडधान्य असतात, तर कधी काही मिठाई असते, तर कधी जेवण म्हणजे पंचपक्वान्नाचे ताट असतं, तर कधी आणखीन काहीतरी किंवा रोख रक्कम असते. शेवटी काय आहे, अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे.
तर.. प्रत्येक महिन्याला, त्यांच्या घरातीलच कोणीतरी व्यक्ती हा शिधा घेऊन त्या भटजींच्या घरी येत असतो.
पण एकदा काय झालं..
त्यादिवशी कामामुळे त्यांच्या घरातील कोणालाच वेळ नव्हता. आणि, हा शिधा तर लगोलग त्या ब्राम्हणाच्या घरी नेऊन द्यायचाच होता.
तर त्या दिवशी, त्या शेटजींनी..
घाईघाईने.. तिथे असणाऱ्या एका हरकाम्या व्यक्तीला हे काम सांगितलं.
" अरे भाई.. ये शिधा, जरा पंडितजीके घर देके आणा..! "
हि गुजर मारवाडी लोकं.. ब्राम्हणाला " पंडितजी " म्हणत असतात.
हे मला माहित आहे, कदाचित तुम्हाला सुद्धा माहित असावं. पण नेमकं, ज्या व्यक्तीकडे त्यांनी हा शिधा दिला होता. त्यालाच हे माहिती नव्हत. कि पंडितजी म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे..?
कारण, पंडित म्हणून तो आमच्या भागातील फक्त मला एकट्यालाच ओळखत होता. आणि, आमच्या भागात तिथे राहणारा " पंडित " नावाचा मी एकमेव व्यक्ती आहे.
झालं..तर तो संभाव्य व्यक्ती, तो शिधा घेऊन नेमका माझ्या घरी आला. आणि मला म्हणाला, त्या समोरच्या शेठजींनी सांगितलं. कि.. हा शिधा, पंडितच्या घरी देऊन ये..!
समोर आलेला बॉक्स पाहून मी सुद्धा पक्का परेशान झालो..! हा नेमका काय प्रकार असावा..?
शेवटी, घरात आलेला तो पुडा मी उघडून पाहिला.
तर त्यात.. गावरान तुपात बनवलेले किलोभर लाडू होते. तुम्हाला म्हणून सांगतो, गावरान तुपातील म्हणा किंवा मोतीचूर लाडू हा माझा फार मोठा कमकुवत दुवा आहे. मग काय, तो पुडा मी घेतला त्या हरकाम्याला एक गोडशी स्माईल दिली. दरवाजा लाऊन घेतला. आणि, मागचा पुढचा विचार न करता. तो लाडूचा पुडा समोर घेतला. आणि, लगोलग त्यावर आडवा हात मारला. एका दमात, त्या पुड्यातील पाच लाडू मी फस्त केले होते.
दोनचार दिवसानंतर.. माझा तो ब्राम्हण मित्र आणि मी गप्पा मारत आमच्या रोजच्या ठिकाणी उभे होतो. आणि तितक्यात.. ते शेठजी तिथे आले.
आणि.. माझ्या ब्राम्हण मित्राला म्हणाले.
पंडितजी, माफ किजीये..
इस बार.. आपके घर वह शिधा लेकर मै आ न सका. इसलिये, मैने एक दुसरे आदमीको भेज दिया था..! तकलीफ के लिये मै माफी चाहता हुं..!
त्यावर माझा मित्र त्यांना म्हणाला.. ठीक है सेठजी, कोई बात नही. लेकीन अगली बार आप खुद आ जाईये. त्यावर होकार देत, एवढं बोलून.. ते सेठ तेथून निघून गेले.
म्हणून सहजच मी माझ्या त्या ब्राम्हण मित्राला म्हणालो.
हा काय प्रकार आहे रे..?
तर तो म्हणाला.. अरे हे सेठजी दर महिन्याला ब्राम्हणाला शिधा म्हणून काहीतरी गोडधोड पदार्थ देत असतात. पण एक गडबड झाली आहे, गेल्या दोनचार दिवसात माझ्या घरी यांचा शिधा काही आलाच नाहीये. नाहीतर मला समजलं असतं. किंवा घरचे लोकं तरी मला तसं बोललेच असते.
शेवटी.. न राहवून मी त्या मित्राला म्हणालो.
अरे.. आपल्या चौकातील तो हरकाम्या व्यक्ती माझ्या घरी परवा एक लाडूचा पुडा घेऊन आला
होता. मला म्हणाला,
त्या समोरच्या शेठजींनी हा पुडा पंडितच्या घरी देऊन ये म्हणून मला सांगितलं आहे.
मला वाटलं, काही कारणाने त्यांनी तो लाडूचा पुडा मलाच दिला असेल. त्यामुळे, आम्ही सर्वांनी मिळून तो लाडूचा पुडा " स्वाहा "केला आहे.
हा घडलेला प्रकार म्हणजे, फार मोठा विनोद झाला होता. हे ऐकून माझा ब्राम्हण मित्र आणि मी अगदी पोटभरून हसलो. आणि.. हसत हसत, माझा ब्राम्हण मित्र मला म्हणाला..
 बघ ना, काय योगायोग आहे, शेवटी..
या ना त्या कारणाने, तू सुद्धा एक दिवसाचा पंडितजी ( ब्राम्हण ) झालासच..!


No comments:

Post a Comment