Thursday, 16 March 2017

पाच सहा दिवसांपूर्वी, मला थोडा फावला वेळ मिळाला होता. म्हणून..सहजच मी घरात टीव्ही पाहत बसलो होतो. न्यूज चॅनल चालू होता. आणि अचानक, अंगावर काटा आणणारी एक बातमी माझ्या नजरेसमोर आली.
भारतातील प्रत्येक राज्यातून, दरवर्षी साधारणपणे तीन ते चार हजार लहान मुलं-मुली हरवली जात असतात. आणि, शेवटपर्यंत त्यांचा कोणताच तपास लागत नाही.
लहान मुलांना.. चोरी करणे किंवा भिक मागणे अशा कामाला लावलं जातं. तर, मुली मोठ्या झाल्यावर त्यांना वेश्याव्यवसाय करायला भाग पाडलं जातं.
ती बातमी पाहून, माझ्या काळजाचं अगदी पाणी-पाणी झालं. आणि, अचानक माझं मन दहा वर्ष पाठीमागे गेलं.
दहाएक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..
आम्ही तिरुपती बालाजीचं दर्शन आटोपलं, दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता आमच्या परतीच्या प्रवासाची तिकिटं होती. रेणीगुंठा स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये त्या दिवशीचा शेवटचा रस्सम भात आम्ही मनसोक्त ओरपून घेतला. रेल्वेमध्ये काही चांगल्या पद्धतीचं जेवण मिळत नाही. त्यामुळे, संध्याकाळच्या जेवणासाठी त्याच हॉटेल मधून मैद्याच्या पांढऱ्या फटक रोट्या आणि वाटाण्याची जाडसर पातळ भाजी, श्रीखंडाच्या एका मोकळ्या डब्यामध्ये पार्सल करून घेतली. दुपारी पावणेतीन वाजता, चेन्नई एक्स्प्रेस रेणीगुंठा स्टेशनवर येऊन धडकली. आम्ही, आमच्या सामानांच्या पिशव्या आवरत ट्रेनमध्ये प्रवेशित झालो. बरोबर तीन वाजता गाडीने रेणीगुंठा स्टेशन सोडलं. धडाक धुडूक करत.. ते अजस्त्र लोखंडी धूड लोखंडी रुळावरून हळुवारपणे धाऊ लागलं.
स्टेशना मागून स्टेशनं मागे पडत होती. बाहेर दिसणारी हिरवाई पाहत गाडीच्या धडधडीचे हेलकावे खात मी खिडकीत बसून होतो. रात्र रंगात आली होती, आम्ही आमची जेवणं आटोपली आणि ताबडतोब निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
रात्रभर.. रेल्वेचा खडखडाट आणि चिंचोळ्या आवाजात वाजणारा तिचा हॉर्न आमची अनामिक सोबत करत होता. रेल्वेत झोपताना, अगदी लहानपणी आईच्या मांडीवर झोपल्या सारखा मला अनुभव येत होता. त्या मधुर आठवणीत थोड्या वेळातच कधी एकदा माझा डोळा लागला, ते माझं मलाच समजलं नाही. ते.. सकाळी काही चित्र विचित्र आवाजाने माझी निद्रा भंग पावली.
सकाळचे आठ वाजले होते, आमची गाडी महाराष्ट्रातील दौंड स्टेशनवर येऊन पोहोचली होती. अगदी तासाभरात, पुणे स्टेशन येणार होतं.
दौंड वरून पुण्यात कामाला येणाऱ्या चाकरमानी लोकांनी मिळेल ती मोकळी आरक्षित जागा बिनधास्तपणे आपल्या नावावर करून घेतली होती. आम्ही सुद्धा, ताबडतोब आमच्या ब्यागा आवरायला घेतल्या. थोडावेळ विश्रांती घेत, गाडीने पुन्हा एक जोरदार भोंगा दिला. आणि पुन्हा एकदा ते धूड पुढील दिशेने मार्गक्रमण करू लागलं.
चाय य्ये... ए मसालेदार चाय्य ये, ए.. चिक्की ये चिक्की, ए लोणावला चीक्कीये... थंडा पाणी बॉटल बोलो, थंडा पाणीये.. बोला..लोकमत, सकाळ, लोकसत्ता, टाईम्स, इंडिया टुडे. तर कोणी, खिडकीतून ओरडत होता.. बोलो, व्हेज बिर्याणी अंडा बिर्याणी है. बोलो आम्लेट पाव है, गरमागरम वडा पाव घ्या वडा पाव.
रेल्वेतील या सगळ्या संमिश्र आवाजांनी माझं डोकं अगदी उठलं होतं. हि सगळी भाऊगर्दी हळूहळू पुढे सरकत होती. गाडीने पुन्हा एकदा जोरदार वेग धरला होता. आणि तितक्यात, कुठूनतरी मधुर अशी छोटी ढोलकी वाजल्याचा मला आवाज आला. तसं माझं तिकडे लक्ष गेलं.
चार-पाच वर्षांचं नजर लागावं इतकं सुंदर, गुटगुटीत आणि गोरं गोमटं पोर माझ्या नजरेस पडलं. जीन्सची मळकट प्यांट आणि अगदी साधा टी शर्ट त्याने अंगात घातला होता. त्याच्या ओठाच्या वरील बाजूस, स्केच पेणच्या सहाय्याने पातळशा नकली मिशा कोरल्या होत्या. लिपस्टिकच्या सहाय्याने, त्याचे कळकटलेले गाल बळेच लाल केले गेले होते.
डोक्यावरील मळकट टोपीला दोरीच्या सहाय्याने बांधलेला लहानसा गोंडा. त्या ढोलकीच्या तालावर, तो हवेतल्या हवेत गोल फिरवत होता. आपल्या शरीराची अजब हालचाल करत तो जागेवर नाचत होता. आणि चालता-चालता एका हाताने रेल्वेतील प्रवाशांना भिकेची याचना सुद्धा करत होता.
ते मुल भयंकर गोरंपान असल्याने, त्याच्या गालावर असणारे काही कळकट डाग माझ्या नजरेतून सुटत नव्हते. त्याचे पाणीदार डोळे मला जागेवर खिळवून ठेवत होते. आणि, मला कोड्यात सुद्धा पाडत होते. त्या मुलाच्या पाठोपाठ, एक तिशीतली काळीकुट्ट आणि कशीतरीच दिसणारी बाई. एक छोटीशी ढोलकी वाजवत त्या मुलाच्या मागोमाग चालत पुढे येत होती. आणि, मागीलबाजुने ढोलकीच्या सहाय्याने ती त्या मुलाला हळूहळू पुढे सुद्धा ढकलत होती.
त्या बाईला पाहून, कोणत्याच अंगाने मला तो तिचा मुलगा वाटत नव्हता.
माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. हा नेमका काय प्रकार असावा..? हे मुल नेमकं त्या बाईचंच असावं का..? कि लहानपणी त्याला कुठूनतरी चोरलं वगैरे असावं..? अशा नानाविध प्रश्नांनी मला अगदी भंडावून सोडलं होतं. पण हे सगळं, मी कोणाला आणि कसं विचारणार होतो..!
पण.. मला नक्की ठाऊक होतं, हे मुल नक्कीच चोरीचं असणार आहे..! पण माझ्याकडे, कोणताच सबळ पुरावा नसल्याने मी अगदी हतबल झालो होतो. ते गोड गोबरं बाळ, गालातल्या गालात हसत भिक मागत पुढे-पुढे निघालं होतं. आणि नकळत, माझ्या डोळ्यात अश्रूंची दाटी झाली होती.
" दैव देतं आणि कर्म नेतं " कोणाच्या नशिबात काय लिहून ठेवलेलं असतं ते कोणालाच ठावूक नसतं..!
चुकून ते मुल, कोणा श्रीमंताच्या घरात जन्माला आलं असेल. आणि त्याच्या वाट्याला हे भोग आले असतील. तर, हि घटना म्हणजे त्याच्याकरिता अगदी दुर्दैवी आणि क्रूर गोष्ट होती.
बघता-बघता ते लहान बाळ माझ्या नजरेआड झालं.
आणि, पुढे थोड्यावेळात पुणे स्टेशन सुद्धा आलं. दुक्खी अंतकरणाने मी त्या गाडीच्या बाहेर पडलो. आणि माझ्या घरी पोहोचलो. पण, सकाळच्या या अनपेक्षित घटनेने माझा संपूर्ण दिवस अगदी उदासवाणा असा गेला होता.
आज.. तो लहान मुलगा, पंधरा वर्षांचा झाला असावा. आज तो काय करत असेल ते परमेश्वरच जाणो. पण, टीव्ही वरील बातमी पाहून माझं मन थोडं सुखावलं.
कारण, त्यात सांगत होते,
कि.. भारतात जन्मणाऱ्या प्रत्येक लहान मुलाचं एका वर्षांनंतर " आधार कार्ड " काढून ठेवा.
जेणेकरून, तुमचं मुल हरवलं किंवा चोरीला जरी गेलं.
आणि चुकून, दहा वर्षांपूर्वी माझ्यासोबत जो प्रसंग घडला होता. तसा प्रसंग अन्य कोणासोबत घडला. तर, तुम्ही दोन पाच लोकांची मदत घेऊन त्या संशयित मुलासाबोत पोलीस केंद्रात दाखल होऊ शकता. आणि सुदैवाने त्या मुलाचं आधार कार्ड काढलं गेलं असेल. तर, त्या मुलाची खरी माहिती आणि ओळख आपल्याला मिळू शकेल. आणि जर ते मुल चोरीचं असेल, तर त्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा तर होईलच. आणि, त्या लहान मुलाला त्याचं घर आणि त्याचा हक्क नक्कीच परत मिळेल. किंवा एक समाजकार्य म्हणून काहीतरी उचित गोष्ट केल्याचा तुम्हाला एक अनामिक आनंद तरी नक्कीच मिळेल. त्या लहान मुलाच्या आई वडिलांचे आणि खुद्द त्या लहान मुलाचे, तुम्हाला आशीर्वाद सुद्धा नक्की मिळतील.
त्यामुळे, माझ्या सर्व वाचक मित्रांना माझी एक कळकळीची विनंती आहे.
तुमच्या घरातील, आणि शेजारील किंवा ओळखीतील प्रत्येक लहान मुलाचं " आधार कार्ड " तुम्ही तातडीने काढून घ्या. आणि भविष्यात घडणाऱ्या नको त्या गोष्टींपासून चिंतामुक्त व्हा.
आणि जमल्यास, हा संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आजचा प्रेमदिवस थोडा वेगळ्या पद्धतीने साजरा करा..!

No comments:

Post a Comment