Saturday, 10 June 2017

आज सकाळचा जबरी बेत..
तर्रीबाज लालभडक मिसळ, त्यासोबत लुसलुशीत मसाला पाव, कुरकुरीत बटाटा भजी आणि मसाला ताक.
हाय काय, नाय काय.. दे ठेऊन. 👍

घरातील लाईट (वीज) गेली..!
इतर आठ महिन्यात कधीतरी, आणि..पावसाळ्यात तर, ती हमखास जातेच जाते.
मला माहिती आहे, हे वीज काम दुरुस्ती व्हायला वेळ हा लागतोच. फार जिकरीचे काम असते ते. भर पावसात, वीजजोड करणाऱ्या होतकरू कारागिरांना माझा अगदी मनापासून सलाम आहे. जीवावर बेतणारं काम आहे हो ते. परंतु, एक सेवा म्हणून ती लोकं अविरत झटत असतात.
लाईनवर कामं करणारे लोकं तर काम करत असतात.
परंतु.. नेहेमी लाईट जात नसल्याने, महावितरण मधील फोन अटेंडंटला. वर्षभर, म्हणावं इतकं काम नसतं.
आता कसं आहे.. शहरी लोकांना लाईट शिवाय बिलकुल जमत नाही. खेडूत लोकांनी तर, त्यांचा विषय सोडून दिला आहे. त्यामागे विविध कारणं सुद्धा आहेत.
तर मग, शहरी भागातील हवालदिल व्यक्ती..त्यांना वारंवार फोन करून विचारात असतात..!
साहेब..लाईट कधी येईल.?
अशा गंभीर प्रसंगी काही वेळेस, काही " लाईट " मारलेल्या व्यक्ती खूपच चिडलेल्या अवस्थेत असतात. त्यावेळी, ती " टाईट " लोकं.. त्या फोन अटेंडंटला " वाईट साईट " सुद्धा बोलतात.
माझ्या माहितीप्रमाणे, त्या अटेंडंट व्यक्तीने लोकांच्या तक्रारीचं समाधान करायला हवं आहे.
भले.. तो व्यक्ती टाईट असेल तरीही. कारण, फोनवर माणूस फक्त शाब्दिक मारा करत असतो. हाताने मारत नसतो. त्यामुळे, शाब्दिक मारा सहन करत, काही अंशी त्यांनी कोडगं व्हायला शिकलं पाहिजे. आमच्या कामात तर आमचे साहेब लोकं आम्हाला सर्रास म्हणत असतात. आपण अर्धा पगार शिव्या खायचा घेत असतो. आणि हि अगदी सत्य परिस्थिती आहे.
पण ही महावितरण मधील लोकं.. असं काही झालं, की लगेच फोन खाली ठेऊन देतात. आणि, आपल्या कामात दिरंगाई करतात. फोन लागत नसल्याने, लोकं हवालदिल होतात. मग कधीतरी मोर्चे वगैरे येतात. प्रसंगी संतापलेल्या जमावाकडून ऑफिस सुद्धा फोडलं जातं. मग याला जबाबदार कोण आहे. शिव्या खायला भिणारी लोकं मार खाऊ शकतील का..? किंवा फोडाफोडीत सरकारची झालेली नुकसानभरपाई देऊ शकतील का..?
अरे लेकहो.. कर्मधर्मसंयोगाने, तुम्हाला गरम खुर्चीची नोकरी मिळाली आहे. हे तुमचं नशीब समजा.
वर्षभर..तुम्हाला म्हणावं असं काहीच काम नसतं.
तर मग, वर्षातून एकदा काम म्हणून जनतेच्या शिव्या खायला तुमची कसली हरकत आहे हो.? आता ते शिव्या का देतात,
तर ते मालक आहेत. पैसा खर्च करत आहेत. त्यामुळे, तुम्ही तुमची जबाबदारी झटकू नका. शक्य तितकं त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा. आणि हो.. हि तुमची ड्युटी आहे बरं का.
राग माणू नका.. लोभ ठेवाच..!
कारण, याच आम जनतेमुळे तुमच्या घरातील चूल पेटत आहे. हे तुम्ही कदापि विसरू नका. वीज बिल भरून कोणी तुमच्यावर उपकार करत नाही. हि सगळी कामं महावितरण पाहत असतं. आणि त्या विभागातील तुम्ही सुद्धा एक सन्माननीय नोकरवर्ग आहात. याचा कधीही विसर पडून देऊ नका. त्रास होईल, पण हे तुमचं कर्तव्य आहे.
निभाना तो पडेगा भाई..!
मित्रांनो.. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्याच विषयाने फार मोठी उचल घेतली आहे.
शेतकरी लोकांवर होणारा अन्याय..!
मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मी सुद्धा शेतकरी वर्गाच्या बाजूने बोलणारा माणूस आहे. कारण, कधीतरी माझे पूर्वज सुद्धा शेतकरी असतीलच कि. आणि, शेतकरी जिवंत असेल तर मी सुद्धा जीवित राहणार आहे. हि अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
पण आजच्या घडीला, आपण जे काही करत आहोत. ते रास्त आहे का..?
थोडं.. स्वतःच्या मनाला विचारून पहा.
नाही हो.. आजच्या घडीला जे काही चाललं आहे.
म्हणजे.. पालेभाज्या, फुलं, दुध आणि इतर जीवनावश्यक आणि नाशवंत गरजेच्या वस्तू.
कोणाच्या तरी सांगण्याने, शेतकरी लोकं, अगदी मातीमोल करत आहेत.
काही, उच्च विद्याविभूषित लोकांनी सुद्धा या गोष्टींना फार मोठा दुजोरा दिला आहे. त्यात मधेच, देवाच्या दुग्ध अभिषेकचा भावनिक विषय काढून आपसात कटुता निर्माण करू पाहत आहेत.
परंतु, हे सगळं अगदी निंदनीय आहे.
मला सांगा.. आजच्या घडीला, लोकांना भाजीपाला किंवा दुध मिळालं नाही. तर ती लोकं उपाशी मरणार आहेत का..?
अहो.. विज्ञान फार पुढे गेलं आहे. आज आपल्यापाशी बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
तुम्ही, भाज्या किंवा दुधं विक्रीसाठी शेतकरी व्यापार्यांना अडवत आहात.
पण, एक गोष्ट तुमच्या लक्षात का येत नाही.
कि.. भाज्या मिळाल्या नाही, तर लोकं कडधान्ये खाऊन सुद्धा जगू शकतात. आणि, दुध मिळालं नाही तर. दुधाची पावडर वापरून ते आपली गुजराण करू शकतात. आणि, पोटाची खळगीच भरायची म्हणल्यावर.. ईतर बरेच पर्याय उपलब्ध आहे.
अरे.. तुम्ही कोणत्या जगात वावरताय..?
काही नालायक राजकारणी, तुमच्या पैश्याला आणि मेहनतीला मातीमोल करू इच्छित आहेत. आणि, तुम्ही त्यांना बेधडक साथ देताय..! हे, सरासर चुकीचं काम आहे.
थोडं, थंड डोक्याने काम घ्या.
आपण सगळी लोकं, महात्मा गांधींच्या देशात राहत आहोत. त्यांनी अवलंबलेली अहिंसा परमो धर्म ही शिकवण आपण विसरून गेलो कि काय..? जीवनावश्यक वस्तूंची नासधूस म्हणजे, एक प्रकारची हिसांच आहे.
इथे.. कोणावाचून कोणाचं काहीही अडत नाहीये. फारफारतर, थोडा त्रास होईल.
पण नुकसान तुमचं होणार आहे. याची भरपाई करायला, उद्या कोणातच नेता पुढे येणार नाहीये.
नशीब.. अजून रक्ताच्या पाण्याचं पावडरीकरण करायला जमलं नाहीये. नाहीतर, स्वतःचं रक्त विकून पैसे कमवायला लोकं मोकळी होणार आहेत. सगळा धंदा झालाय राव.
सावध व्हा.. माणुसकी मरत चालली आहे. तिला संपवण्यासाठी अजून नवीन मार्ग शोधू नका.
सर्वांना, माझी हात जोडून विनंती आहे..!
राजकारण गेलं चुलीत, वेळीच सावध व्हा. नाहीतर, आपला कोणीच वाली नसणार आहे.
काही चुकीचं बोललो असेल, तर.. मोठ्या मनाने माफ करा..!
जन्म आणि मृत्यू..
या दोन दिवसांच्या मध्ये.. अजून दोन दिवस असे असतात. जे आपल्या कायमचे स्मरणात राहतात. ते दोन दिवस म्हणजे..!
एक, आपण ज्या दिवशी कायमस्वरूपी नोकरीला लागलो तो दिवस.
आणि दुसरा, आपल्या सेवानिवृत्त होण्याचा दिवस.
तसे तर.. आपल्या आयुष्यात असे बरेच चांगले वाईट दिवस येऊन जात असतात. पण त्यापैकी, सगळेच क्षण आपल्या ध्यानात राहत नाहीत. हि अगदी सत्य परिस्थिती आहे.
आणि..प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात, सेवानिवृत्त होण्याचा प्रसंग येतोच असं सुद्धा नाही. अकाली मृत्यू किंवा स्वेच्छानिवृत्ती, या दोन गोष्टी त्याला प्रामुख्याने जबाबदार असतात.
उद्या.. माझ्यासोबत काम करत असलेले बरेच कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. बर्याच वर्षाचा जिव्हाळा, एका दिवसात नष्ट आणि नाहीसा होणार.
पळसकर मिस्त्री, अरण्ये बाई, बांबळे आबा, हिप्परगी साहेब, बहिरट साहेब, ग्राउंड पेंटर आणि माझा आवडता जोशी. मी त्याला, प्रेमाने जोशा म्हणत असतो.
माझ्या या सगळ्या वयस्कर मित्रांना, त्यांचा येणारा काळ अगदी आनंदात जावो. जमेल तितकी आणि जास्तीत जास्त, पेन्शन मिळवण्याचा, त्याचा उपभोग घेण्याचा, आणि निरोगी राहण्याचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होवो. हीच सदिच्छा.
आणि.. त्यातल्या त्यात, माझं सर्वात आवडतं व्यक्तिमत्व. माझे वडीलबंधू सुद्धा उद्या सेवानिवृत्त होणार आहेत.
मी अवघा चौथीत असताना, आमच्या वहिनी माझ्या दादांच्या सहचारणी झाल्या. त्या दोघांनी मला अगदी पोटच्या मुलाप्रमाणे जपलं आणि वाढवलं. त्यामुळे त्यांचे उपकार किमान या जन्मी तरी नक्कीच फिटणार नाहीत. या विषयावर मला बरच काही लिहायचं आहे. ते पुन्हा कधितरी लिहीन.
त्याचबरोबर. पुणे महापालिकेत मी जेंव्हा ड्रायव्हर म्हणून कामावर रुजू झालो.
त्यावेळची एक ताजी घटना मला आगदी जशी आहे तशी आठवतेय.
पाच फुट तीन इंचाची उंची आणि अवघं पंचेचाळीस किलो वजन असणारा मी अत्यंत कृश व्यक्ती. त्यावेळी सरकारी कामाला लागताना.. मला एक रुपया सुद्धा खर्च आला नव्हता. म्हणजे, कोणाला पैसे वगैरे ( लाच ) द्यावे लागले नव्हते. माझ्या स्वतःच्या हिमतीवरच मी कामाला लागलो होतो.
पण सुरवातीच्या काळात, मला मोठी आणि अवजड वाहनं काही चालवायला जमत नव्हती. पण हेवी ड्रायव्हर म्हणून कामाला लागलो असल्याने. झक मारत मला अवजड वाहनं चालवावी लागत होती. एकतर आमच्या पालिकेच्या गाड्या धडाच्या नसायच्या, त्यामुळे माझ्या हातून अपघात होण्याची मला फार भीती वाटायची. आता, फुकट मिळालेल्या नोकरीचं मला तरी कितीसं गांभीर्य असणार आहे. परंतु.. महिनाभरातच, आपल्या हातून चुकून एखादा अपघात किंवा काही विपरीत घडण्याअगोदर आपण हे काम सोडून द्यावं. या निर्णयाप्रत मी येऊन पोहोचलो होतो.
पण त्यावेळी.. अचानकपणे, एक चमत्कार घडला.
एके दिवशी.. मी कचरा गाडीवर काम करून आलो होतो. माझी गाडी व्हेईकल डेपोमध्ये पार्क केली, आणि मी, घरी जायच्या तयारीत होतो. तितक्यात माझ्या ओळखीतील एका व्यक्तीने मला सांगितलं.
अरे कुंभार.. तुला ते, गणेश काथवटे साहेब बघत होते..!
मी हातपाय धुतले, थोडा ताजातवाना झालो. आणि ताबडतोब त्या साहेबांना जाऊन भेटलो.
 तर.. ते मला म्हणाले,
काय रे कुंभार.. तू, काम सोडतो आहेस असं मला समजलं आहे..!
मी सुद्धा त्यांना माझा होकार कळवला,
त्यावर ते म्हणाले.. तुझं शिक्षण किती झालं आहे..?
मी म्हणालो, मी S.Y.B.A. पर्यंत शिकलो आहे. ( वासरात लंगडी गाय शहाणी ) हे ऐकताच, ते साहेब मला म्हणाले. उद्यापासून तू माझ्यासोबत पासिंग सेक्शनला कामाला ये. मी तुला येथील सगळी कामं शिकवतो. आणि, काम सोडायच्या भानगडीत तू पडू नकोस. एकतर, लोकांना सरकारी नोकऱ्या मिळत नाहीयेत. आणि तू मोठा आलायेस काम सोडणारा.!
त्या साहेबांचे हे बोल ऐकून, मी पासिंग सेक्शनला नव्याने कामाला रुजू झालो. अवघ्या चारच दिवसात, त्यांनी मला तेथील सगळी कामं शिकवली. आणि बघता बघता त्या कामात मी तरबेज सुद्धा झालो. आणि, ताजातवाना साहेब सुद्धा झालो. आणि छोट्या मोठ्या सर्व प्रकारच्या गाड्या सुद्धा मी अगदी लीलया चालवू सुद्धा लागलो. एकप्रकारे.. त्या विभागाने, मला एकप्रकारची नवसंजीवनी मिळवून दिली होती. ती, आजतागायत कायम आहे.
राम माने.. या माझ्या मृत मित्राबद्धल मी पूर्वी लिहिलंच होतं. कि, त्याच्यामुळेच आज मी इथे कामाला आहे. त्याचबरोबर, त्यावेळी हे गणेश साहेब नसते. तर, आज मी कुठे असतो. ते मला सुद्धा सांगता येणार नाही.
आज.. एकतीस मे रोजी. ते गणेश साहेब सुद्धा सेवानिवृत्त होणार आहेत. भले आज मी त्यांच्या विभागात कामाला नाहीये. काही कालावधी नंतर, माझ्या कामाला भरपूर फाटे फुटले. पण, या मैत्रीला मी कदापि फाटे फोडू शकत नाही.
सदैव परोपकारी असणाऱ्या या व्यक्तीला, आणि माझ्या मोठ्या भावाला उदंड आयुष्य लाभो. आणि, त्यांचा येणारा काळ, समाधानी, निरोगी आणि आनंदी असा जावो.
हीच.. ईश्वर चरणी प्रार्थना.
गतवर्षी आजच्या दिवशी, बारावीच्या परीक्षेचा निकाल होता. त्यावेळी एक फार मोठी गंमत घडली.
माझ्या मित्राचा मेहुणा सुद्धा गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेला बसला होता. सहजच म्हणून, तो पास झालाय की नापास झाला आहे. हे पाहण्यासाठी त्याने आमच्या एका मित्राला नेटवर त्याचा निकाल पाहायला सांगितलं.
त्या मित्राने, मोबाईल नेटवर तो परीक्षा क्रमांक टंकला. आणि ताबडतोब निकला आमचा समोर आला.
माझ्या मित्राचा मेहुणा तब्बल चार विषयात नापास झाला होता..!
हे पाहून निकाल पाहणारा मित्र त्याला म्हणाला..
भाऊ, तुमच्या मेहुण्याला काही कळवू नका बरं का. तो चार विषयात नापास झाला आहे. टेन्शनमध्ये विनाकारण तो काहीतरी बरं वाईट करून घ्यायचा..!
मित्राचे हे बोल ऐकून, माझा मित्र जोरजोरात हसायला लागला. नेमका काय प्रकार घडला आहे. ते आम्हाला समजेना.
शेवटी त्याचं हसू पूर्ण झाल्यावर तो आम्हाला म्हणाला..
अरे.. माझा मेहुणा मिलीटरी मध्ये कामाला आहे. आणि, यावर्षी तो रिटायर्ड सुद्धा होणार आहे.
एक टाईमपास म्हणून त्याने ही बारावीची परीक्षा दिली होती..!
😀😀😀
हा फक्त, एका परीक्षेचा निकाल आहे. याला, तुमच्या आयुष्याचा निकाल समजू नका.!
 बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. 👍
मिरचीचा खर्डा ( ठेचा )
************************
आपल्या ताटात पंचपक्वान्नाचे जेवण जरी असले. तरी त्यात, तोंडाला पाणी आणणारा कोणता पदार्थ असेल. हे काही सांगता येत नाही. हि ज्याच्या त्याच्या जिव्हेची पसंती असते.
कोणाला गोडाची आवड असते, तर कोणाला अगदी कडू कारल्याची आवड असते. तर काही हौशी खवय्यांना तिखटाची सुद्धा आवड असते. भाजीत असणारा तिखटपणा वेगळा, आणि प्रत्यक्षात एखादा तिखट पदार्थ चाखणे, हा विषय अगदी भिन्न आहे.
मिरचीचा खर्डा बनवण्याचे प्रत्येक प्रांतातल्या पद्धती सुद्धा खूप निराळ्या आहेत.
मिरचीचा खर्डा..
या तोंडी लावण्याच्या पदार्थात प्रामुख्याने. हिरवी मिरची आणि मीठ या दोन गोष्टी खूप आवश्यक असतात. पण प्रत्येकाच्या आवडीनुसार हा पदार्थ सुद्धा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जाऊ लागला. तर, मी ज्या पद्धतीने मिरचीचा खर्डा बनवत असतो. ती पद्धत आपण जाणून घेऊयात.
हा खर्डा बनवण्यासाठी लागणारं साहित्य.
वीसेक हिरव्यागार मिरच्या, ( त्यात एखाद दुसरी लालसर मिरची असेल तर उत्तमच. त्यामुळे खरड्याला रंग सुद्धा छान येतो. ) एक लसणाचा कांदा, थोडी कोथंबीर, एक मोठा लालसर टोमॅटो, शेंगदाणा पाकळी, खडे मीठ आणि चार मोठे चमचे तेल.
( लसणाच्या पाकळ्या न सोलता सालीसकट घ्याव्यात. आणि भाजलेल्या शेंगदाण्याच्या साली काढून त्याच्या पाकळ्या करून घ्याव्यात. त्याचबरोबर, कोथंबीर बारीक करून घ्यावी. आणि टोमॅटो उभ्या आकारात पातळसा चिरून घ्यावा. )
कृती :- खोलगट कढई किंवा तव्यामध्ये, तीन चमचे तेल घालावं. तेल तापल्यावर त्यात देठ न काढलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात. थोडासा ठसका येईपर्यंत या मिरच्या तव्यावर खरपूस अशा परतून घ्याव्या. त्यानंतर गॅस बंद करून तो तवा जमिनीवर उतरवून घ्यावा. आणि खरपूस भाजलेल्या मिरच्यांमध्ये.. चवीनुसार जाडं मीठ, लसून पाकळी, शेंगदाणे पाकळी आणि टोमाटोचे उभे काप घालावेत. एका हाताने, तव्याला कपड्याने घट्ट धरून ठेवावं. आणि दुसऱ्या हातात, पितळेचा तांब्या किंवा वरवंटा घेऊन हे सर्व जिन्नस एकत्र हलवून रगडून एकजीव करून घ्यावेत. आणि त्यावर, कच्च्या तेलाची एक चमचा धार पसरवून घालावी.
हे सर्व मिश्रण अगदी जाडं भरडं असावं. त्यामुळे ते खर्डा नामक मिश्रण दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. आणि जेवताना त्यातील जाडसर असलेला भाग आपल्या दाताखाली आला. कि जेवणाची रंगत अजूनच वाढत जाते. आंबट, गोड,तिखट चवीचा खरडा हा असा पदार्थ आहे, कि त्याच्या अप्रतिम ठसकेबाज चवीमुळे माणसाला जेवताना दोन घास नक्कीच जास्ती जातात.
सांगा तर मग, तुमच्या भागातील खर्डा तुम्ही कशा पद्धतीने बनवता..!

Show more re
घोडा आणि गाढव..!
या दोन्ही प्राण्यांना.. विनाकारण, आपण शिविच्या हिशोबाने वापरत असतो.
अमुक तमुकला घोडा लावला, अमुक तमुकला गाढव लावला. पण, हे फक्त आपल्या बोली भाषेत बोलण्या पुरतं झालं. नाहीतर, प्रत्यक्षरित्या त्यांना, तो आनंद उपभोगण्याचा मान विदेशातील " निळ्या " चित्रफिती शिवाय कुठे मिळणार. त्यांचं, एवढं मोठं भाग्य तरी कुठं आहे..!
तसं पाहायला गेलं तर, हे दोन्हीही एकाच जातकुळीतले प्राणी आहेत.
पण आजवर, गाढवाचं फार मोठं नाव लौकिक मला ऐकायला किंवा पाहायला मिळालं नव्हतं.
एकमेव अपवाद.. दादू इंदुरीकर यांचं गाढवाचं लग्न, हे वगनाट्य वगळता.
गाढवाला आजवर हवा तेवढा मान सन्मान मिळालाच नाही. नाही म्हणता, मढी येथील गाढव बाजारात, देशभरातून आलेल्या गाढवांना भल्या मोठ्या किमतीत खरेदी विक्री केलं जातं. परंतु, त्याच्या नशिबी असणारी " गधा मेहेनत " काही केल्या कमी होत नाही. अजूनही, ते राब राब राबतातच. हि अगदी सत्य परिस्थिती आहे..!
धरतीवरील सर्व प्राण्यात.. लहानपणी, सुंदर दिसणारा कोणता प्राणी असेल. तर, तो म्हणजे गाढव. गाढवाच्या लहान पिल्लाला शिंगरू म्हणतात. हे शिंगरू लहानपणी दिसायला इतकं सुंदर असतं. कि कोणालाही ते पटकन आवडावं, आणि त्याला आपल्या कवेत घ्यावसं वाटतं. पण त्याच लहान शिंगराचं मोठ्या गाढवात रुपांतर झाल्यावर. ते आपल्याला लाता सुद्धा मारू लागतं. आणि म्हणावं इतकं सुंदर सुद्धा दिसत नाही.
पण घोड्याचं बाकी तसं नाहीये.. घोडा हा अगदी राजेशाही थाटात वावरणारा प्राणी आहे. सुरवातीच्या काळात.. घोड्याशिवाय, राजा महाराजा लोकांचं पान सुद्धा हलत नव्हतं. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा घोड्यावर स्वार होऊन, अटक ते स्वराज्य असा प्रवास करत आले आहेत. हा इतिहास सुद्धा सर्वांना ठाऊक असावा. महाराणा प्रताप यांच्या चेतक नावाच्या घोड्याची समाधी सुद्धा तुम्हा आम्हाला इतिहासाची एक वेगळीच चुणूक दाखवून जाते.
पण आजच्या घडीला.. त्या राजेशाही घोड्याला फार मोठी अवकळा आली आहे..!
लग्न कार्यात.. घोड्यावर बसून नवरदेवाला श्रीवंदन आणि मंडपात नेलं जात असतं. इतपर्यंत ठीक आहे हो. पण त्याच घोड्याला चाबकाचे फटके मारत. त्या नवरदेवाला उरावर घेऊन त्याच्या मालका मार्फत बँड च्या तालावर विनाकारण नाचवलं जातं. खरं सांगा मित्रांनो, हे योग्य आहे का..? शेवटी वैतागून तो घोडा चिडल्यावर कितीतरी नवरदेवांना त्याने भुईसपाट केलं आहे. हे तुमच्या वाचण्यात किंवा पाहण्यात सुद्धा असेल. अशावेळी, त्याला मार मार मारलं जातं. त्यात त्याची काय चूक आहे हो..?
तुम्ही त्याच्यापुढे बेंडबाजा वाजवणार, फटाके फोडणार.. मग, ते घोडं बिथरून जाणार नाही का..?
घोड्याच्या रेसमध्ये सुद्धा, या घोड्यांना अमाप मेहेनत करून पळवलं जात असतं. आणि, चुकून रेसमध्ये ते जिंकले नाही तर. त्यांना मारलं तरी जातं. किंवा त्यांची विक्री तरी केली जाते.
परंतु..याच नाबाद घोड्याच्या रक्तापासून, कुत्रा चावल्यावर विशिष्ट प्रकारची रेबीजची लस सुद्धा बनवली जाते. त्यामुळे, घोडा या प्राण्याबद्धल मला मनापासून तळतळ वाटत आली आहे.
आपल्या उभ्या हयातीत.. कधीही जमिनीवर न बसणाऱ्या. किंवा, आयुष्यभर उभ्या उभ्याच झोप घेणाऱ्या घोड्याच्या वाट्याला हि दुर्दशा का यावी..?
" तो, मरेल तेंव्हाच खाली पडेल..! "
अर्जुना नंतर, छातीवर स्तन नसणारा खरा मर्द प्राणी कोण असेल. तर हा अश्व आहे. हे आपण काधीही विसरता कामा नये. बैलांना त्रास होतोय, म्हणून बैल गाड्यांच्या शर्यतीवर बंधनं घातली जात आहेत. तर मग, घोड्याच्या बाबतीत हा दुजाभाव का असावा..?
राजेशाही थाट आहे त्याचा, विनाकारण गुलाम करू नका त्याला..!
शेवटी.. गाढवात आणि घोड्यात फरक आहे हो.!