Saturday, 10 June 2017

जन्म आणि मृत्यू..
या दोन दिवसांच्या मध्ये.. अजून दोन दिवस असे असतात. जे आपल्या कायमचे स्मरणात राहतात. ते दोन दिवस म्हणजे..!
एक, आपण ज्या दिवशी कायमस्वरूपी नोकरीला लागलो तो दिवस.
आणि दुसरा, आपल्या सेवानिवृत्त होण्याचा दिवस.
तसे तर.. आपल्या आयुष्यात असे बरेच चांगले वाईट दिवस येऊन जात असतात. पण त्यापैकी, सगळेच क्षण आपल्या ध्यानात राहत नाहीत. हि अगदी सत्य परिस्थिती आहे.
आणि..प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात, सेवानिवृत्त होण्याचा प्रसंग येतोच असं सुद्धा नाही. अकाली मृत्यू किंवा स्वेच्छानिवृत्ती, या दोन गोष्टी त्याला प्रामुख्याने जबाबदार असतात.
उद्या.. माझ्यासोबत काम करत असलेले बरेच कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. बर्याच वर्षाचा जिव्हाळा, एका दिवसात नष्ट आणि नाहीसा होणार.
पळसकर मिस्त्री, अरण्ये बाई, बांबळे आबा, हिप्परगी साहेब, बहिरट साहेब, ग्राउंड पेंटर आणि माझा आवडता जोशी. मी त्याला, प्रेमाने जोशा म्हणत असतो.
माझ्या या सगळ्या वयस्कर मित्रांना, त्यांचा येणारा काळ अगदी आनंदात जावो. जमेल तितकी आणि जास्तीत जास्त, पेन्शन मिळवण्याचा, त्याचा उपभोग घेण्याचा, आणि निरोगी राहण्याचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होवो. हीच सदिच्छा.
आणि.. त्यातल्या त्यात, माझं सर्वात आवडतं व्यक्तिमत्व. माझे वडीलबंधू सुद्धा उद्या सेवानिवृत्त होणार आहेत.
मी अवघा चौथीत असताना, आमच्या वहिनी माझ्या दादांच्या सहचारणी झाल्या. त्या दोघांनी मला अगदी पोटच्या मुलाप्रमाणे जपलं आणि वाढवलं. त्यामुळे त्यांचे उपकार किमान या जन्मी तरी नक्कीच फिटणार नाहीत. या विषयावर मला बरच काही लिहायचं आहे. ते पुन्हा कधितरी लिहीन.
त्याचबरोबर. पुणे महापालिकेत मी जेंव्हा ड्रायव्हर म्हणून कामावर रुजू झालो.
त्यावेळची एक ताजी घटना मला आगदी जशी आहे तशी आठवतेय.
पाच फुट तीन इंचाची उंची आणि अवघं पंचेचाळीस किलो वजन असणारा मी अत्यंत कृश व्यक्ती. त्यावेळी सरकारी कामाला लागताना.. मला एक रुपया सुद्धा खर्च आला नव्हता. म्हणजे, कोणाला पैसे वगैरे ( लाच ) द्यावे लागले नव्हते. माझ्या स्वतःच्या हिमतीवरच मी कामाला लागलो होतो.
पण सुरवातीच्या काळात, मला मोठी आणि अवजड वाहनं काही चालवायला जमत नव्हती. पण हेवी ड्रायव्हर म्हणून कामाला लागलो असल्याने. झक मारत मला अवजड वाहनं चालवावी लागत होती. एकतर आमच्या पालिकेच्या गाड्या धडाच्या नसायच्या, त्यामुळे माझ्या हातून अपघात होण्याची मला फार भीती वाटायची. आता, फुकट मिळालेल्या नोकरीचं मला तरी कितीसं गांभीर्य असणार आहे. परंतु.. महिनाभरातच, आपल्या हातून चुकून एखादा अपघात किंवा काही विपरीत घडण्याअगोदर आपण हे काम सोडून द्यावं. या निर्णयाप्रत मी येऊन पोहोचलो होतो.
पण त्यावेळी.. अचानकपणे, एक चमत्कार घडला.
एके दिवशी.. मी कचरा गाडीवर काम करून आलो होतो. माझी गाडी व्हेईकल डेपोमध्ये पार्क केली, आणि मी, घरी जायच्या तयारीत होतो. तितक्यात माझ्या ओळखीतील एका व्यक्तीने मला सांगितलं.
अरे कुंभार.. तुला ते, गणेश काथवटे साहेब बघत होते..!
मी हातपाय धुतले, थोडा ताजातवाना झालो. आणि ताबडतोब त्या साहेबांना जाऊन भेटलो.
 तर.. ते मला म्हणाले,
काय रे कुंभार.. तू, काम सोडतो आहेस असं मला समजलं आहे..!
मी सुद्धा त्यांना माझा होकार कळवला,
त्यावर ते म्हणाले.. तुझं शिक्षण किती झालं आहे..?
मी म्हणालो, मी S.Y.B.A. पर्यंत शिकलो आहे. ( वासरात लंगडी गाय शहाणी ) हे ऐकताच, ते साहेब मला म्हणाले. उद्यापासून तू माझ्यासोबत पासिंग सेक्शनला कामाला ये. मी तुला येथील सगळी कामं शिकवतो. आणि, काम सोडायच्या भानगडीत तू पडू नकोस. एकतर, लोकांना सरकारी नोकऱ्या मिळत नाहीयेत. आणि तू मोठा आलायेस काम सोडणारा.!
त्या साहेबांचे हे बोल ऐकून, मी पासिंग सेक्शनला नव्याने कामाला रुजू झालो. अवघ्या चारच दिवसात, त्यांनी मला तेथील सगळी कामं शिकवली. आणि बघता बघता त्या कामात मी तरबेज सुद्धा झालो. आणि, ताजातवाना साहेब सुद्धा झालो. आणि छोट्या मोठ्या सर्व प्रकारच्या गाड्या सुद्धा मी अगदी लीलया चालवू सुद्धा लागलो. एकप्रकारे.. त्या विभागाने, मला एकप्रकारची नवसंजीवनी मिळवून दिली होती. ती, आजतागायत कायम आहे.
राम माने.. या माझ्या मृत मित्राबद्धल मी पूर्वी लिहिलंच होतं. कि, त्याच्यामुळेच आज मी इथे कामाला आहे. त्याचबरोबर, त्यावेळी हे गणेश साहेब नसते. तर, आज मी कुठे असतो. ते मला सुद्धा सांगता येणार नाही.
आज.. एकतीस मे रोजी. ते गणेश साहेब सुद्धा सेवानिवृत्त होणार आहेत. भले आज मी त्यांच्या विभागात कामाला नाहीये. काही कालावधी नंतर, माझ्या कामाला भरपूर फाटे फुटले. पण, या मैत्रीला मी कदापि फाटे फोडू शकत नाही.
सदैव परोपकारी असणाऱ्या या व्यक्तीला, आणि माझ्या मोठ्या भावाला उदंड आयुष्य लाभो. आणि, त्यांचा येणारा काळ, समाधानी, निरोगी आणि आनंदी असा जावो.
हीच.. ईश्वर चरणी प्रार्थना.

No comments:

Post a Comment