Saturday, 10 June 2017

तुमच्या घरातील महिलांना..
स्पेशली.. तुमच्या बायकोला, बहिणीला, मुलीला, घरातील ईतर स्त्रिया आणि आईला सुद्धा.
 तुम्ही.. आपल्या आणि त्यांच्या जीवनात, त्यांना ५०% आरक्षण दिलं आहे का..?
भारतातील महिलांना, फक्त नावापुरतं पन्नास टक्के आरक्षण मिळालं. असा, माझा शुद्ध आरोप आहे. खेडेगावातील महिला तर. आज सुद्धा, रानात.. गुरासारख राबराब राबत आहेत. हे मी, माझ्या गावी गेल्यावर सर्रास पाहत असतो.
अजूनही, महिलांना म्हणावी इतकी मोकळीक मिळत नाहीये. नाही म्हणता, शहरी भागात काही ठिकाणी, महिला.. पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन समाजात वावरताना आपल्याला पाहायला मिळतात. पण, त्याची सुद्धा टक्केवारी म्हणावी इतकी मोठी नाहीये.
थोडा खोलात विचार करायला गेलात. तर, प्रत्येक पुरुषाने महिलेला समान हक्काचा दर्जा दिला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. नाहीतर, त्याचे दूरगामी परिणाम हे खूप वाईट आहेत. आणि ते, आपल्याला आणि आपल्या आप्तांना नक्कीच भोगावे लागतील. यात, तिळमात्र शंका नाही.
वानगीदाखल.. मी इथे फक्त, आता " बायको " या स्त्रीला माझ्या नजरेसमोर ठेऊन खालील वक्तव्य करत आहे.
ती बिचारी.. लोकाच्या घरून आपल्या घरात, घरातील एक जबाबदार स्त्री म्हणून आली आहे.
त्यामुळे तिला, जमेल तेवढा आनंद देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि ते, कोणीही चुकून सुद्धा टाळू नये. आणि तिला, घरगडी किंवा परकं किंवा याचक म्हणून कधीच पाहू नये. कारण,
भारतीय समाजव्यवस्था हे फार जुनं खोड आहे. आणि, विवाहसंस्था हे त्याचं एक जिवंत फलित आहे,.
आपल्या बायकोला,
महिन्यातून एकदा तरी.. हॉटेलमध्ये जेवायला किंवा किमान नाश्ता करण्यासाठी तरी घेऊन गेलं पाहिजे. महिन्या दोन महिन्यांनी, तिच्या मनाला वाटेल ती शॉपिंग करण्यासाठी. आपल्या खिशाला सोसेल इतकी रक्कम तिला आपण देऊ केली पाहिजे.
जास्ती नाही.. तर, वर्षातून किमान तीन-चार सिनेमे, ते सुद्धा मल्टीप्लेक्स मध्ये नेऊन तिला आपण दाखवले पाहिजे. वर्षातून एकदा तरी, तिला बाहेरगावी फिरायला नेलं पाहिजे. जेणेकरून, तिला सुद्धा देशविदेशाची सफर घडेल. तिचं मन रमवण्यासाठी, एखाद्या महिला मंडळात तिचं नाव आपण स्वतःहून नोंदवून तिला थोडीशी मोकळीक कशी मिळेल ते पाहिलं पाहिजे. देशविदेशातील नेमक्या काय घडामोडी चालू आहेत. हे तिला समजावं. त्याकरिता, अद्ययावत असा मोबाईल सेट आपण तिला देऊ केला पाहिजे. सोशल मिडीया मधील सगळ्या गोष्टी तिला समजावून सांगितल्या पाहिजेत. वेळ मिळेल तेंव्हा, तिला घरकामात आपण थोडीफार मदत सुद्धा केली पाहिजे.
अजूनही.. अशा आशा बऱ्याच गोष्टी असतील. त्या प्रत्येकाने, आपआपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या बायकोला देऊ केल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी तिला मिळाल्यावर, तिचं मन कुठेही भरकटनार नाही. अगदी तृप्त मनाने ती तिचा संसार मार्गी लावेल. तिची इच्छा नसली तरी सुद्धा, तिला या गोष्टींची आवड आपण स्वतः निर्माण करून दिली पाहिजे. हि काळाची गरज आहे.
कारण, लपवून ठेवलेल्या किंवा माहित नसलेल्या गोष्टीची माणसाला फार उत्सुकता लागून राहते.
कि ते नेमकं काय असेल..? हि शंका जर एकदा मनात रुजली, कि विषय संपला..!
त्यामुळे, मनामध्ये अशी कोणतीही आडी न धरता. तिला सुद्धा, आपण तिच्या स्त्री जन्माचा पुरेपूर लाभ द्यायला हवा. असं माझं वैयक्तिक मत आहे.
जर या गोष्टीत आपण कोणतीही कुचराई केली. तर उद्या त्याचे फारच गंभीर परिणाम आपल्याला भोगावे आणि पहावे सुद्धा लागतील.
ती एक म्हण आहे ना.. " कधी नाही मिळलं, आणि गटकन गीळलं..! "
तुम्हा सर्वाना या विषयाचं आश्चर्य वाटेल. कि, मी या निकषांवर का आलो आहे..?
त्याचं, एक ताजं उदाहरण मी याठिकाणी तुम्हाला देऊ इच्छित आहे.
माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीची, अगदी घरंदाज अशी बायको होती. तिच्या डोक्यावरचा पदर सुद्धा कधी खाली पडत नव्हता. तिचं घर भलं आणि ती भली. इतकी तर ती चारित्र्यवान बाई होती. ती दिसायला अगदी जेमतेम होती. पण तरी सुद्धा, तिचा नवरा फारच काटेकोर आणि शंकेखोर होता.
त्याची.. प्रत्येक गोष्टीत तिला बंधनं असायची. त्यामुळे, ती बिचारी अगदी तिच्या पायाकडे बघून चालायची. तिला.. हॉटेल, सिनेमा, फिरणं, धरणं याची काहीच माहिती नव्हती.
आता.. शहरात राहणाऱ्या महिलांनी इतकं सुद्धा साधं राहू नये ना. पण, ती बाई इतकी भोळी आणि सरळ होती. कि तिच्याकडे फोन करण्यासाठी एखादा साधा मोबाईल सुद्धा नव्हता. किंवा, तिच्या नवऱ्याला तिला तो साधा फोन सुद्धा घेऊन द्यावासा वाटला नाही. हि बाई म्हणजे, अगदी चूल आणि मुल अशातली होती. जग दुनियेची तीला काहीच माहिती नव्हती.
आणि अचानकपणे..
एके दिवशी, तिच्या नवऱ्याचा अकस्मात मृत्यू झाला. सर्वांना चिंता पडली, आता हि बाई कशी काय निभाऊन नेईल..? कारण, हि कधी घराच्या बाहेरच पडली नव्हती. त्यावेळी, तिचा मोठा मुलगा फक्त सोळा वर्षांचा होता. त्यामुळे, वडिलांच्या जागेवर मुलगा कामाला लागू शकत नव्हता. शेवटी नाईलाज झाल्याने, त्या बाईला तिच्या नवऱ्याच्या जागेवर कामाला लागावं लागलं. आणि, इथेच सगळं गणित फिसकटलं.
जनमानसात वावरायची सवय नसलेली हि महिला.
एकदम, भल्या मोठ्या लोकांच्या गोतावळ्यात कामाला जाऊ लागली. त्याठिकाणी, तिला काही अशा महिला सुद्धा भेटल्या, कि त्यांनी तिला सगळं जग उघडं नागडं करून दाखवलं. त्यानंतर मात्र त्या बाईने मागे वळून काही पाहिलं नाही.
दोन चार महिन्यातच.. ती अगदी मॉडर्न झाली.
तिच्या राहणीमानात कमालीचा फरक पडला होता. हातात भरपूर पैसा आला असल्याने. नको ती मौज करायला आता ती मोकळी झाली होती. तिला आता कोणाचंच आणि कोणतंच बंधन नव्हतं.
उंची साड्या, उंची अत्तरं, महागडा मोबाईल, महागडी पर्स, महागड्या चपला. खरं सांगायला गेलं तर, तिचं जीवनच अगदी महागडं होऊन बसलं होतं.
आता, इतकं सगळं काही तिच्या दिमतीला आहे म्हंटल्यावर. पुढे काय.. हि गोष्ट आलीच कि.
आता तिला फक्त एकाच गोष्टीची कमतरता भासत होती. ती म्हणजे, तिला एखादा " जोडीदार " हवा होता. तिच्या जवानीच्या अग्नीला शांत करणारा एक उमदा पुरुष तिला हवा होता.
आणि योगायोगाने.. काही लोकं सुद्धा अशा महिलांच्या अगदी शोधातच असतात. त्यावेळी, त्या महिलेला फक्त पुरुषी सहवास हवा असतो. अंगाला झटणारा आणि मायेची पाखर घालणारं एक हक्काचं माणूस हवं असतं. त्यावेळी, अशा लोभस अभिलाषेने ती अगदी अंध झालेली असते. भल्या बुर्याची तिला कसलीच तमा उरलेली नसते.
आणि.. शेवटी व्हायचं ते झालं. तिचं एका व्यक्तीबरोबर सुत जुळलं. काही महिन्यातच, ती अगदी बिनधास्तपणे निर्ढावल्या सारखी वावरू लागली होती. पैश्यामुळे लालीलाल झालेल्या या चकाचॉर्ण आयुष्यापुढे, तिला तिचा एकुलता एक मुलगा सुद्धा आता दिसेनासा झाला होता. इतकी तर ती बेभान झाली होती. तिच्या मोबाईल मध्ये.. अश्लील क्लिप तर असायच्याच. त्याचबरोबर, ती आता इतकी निडर झाली होती. कि तिच्या याराशी सहवास करण्यासाठी ती चक्क त्याला तिच्या घरी सुद्धा घेऊन येत होती. आता बाकी, त्या बाईने सगळी हद्द ओलांडली होती.
आता.. कितीही डोळेझाक केली, तरी अशा गोष्टी काही लपून राहत नाही. बघता बघता दोन वर्षांचा कालावधी लोटला. आणि आता तर, तिचा मुलगा सुद्धा अठरा वर्षाचा झाला होता. नाही म्हणता, त्या मुलाला सुद्धा चांगलीच समज आली होती. आता तिने थोडं सांभाळून वागायला हवं होतं. कारण, त्याच्या आईचं हे वागनं त्याला बिलकुल पटत नव्हतं. पण तो बिचारा करणार तरी काय..?
आणि.. शेवटी एके दिवशी नको तेच घडलं..
तिच्या राहत्या घरात, तिच्या मुलाने आईला आणि त्या मामा म्हणवणाऱ्या पुरुषाला नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यावेळी, त्या मुलाच्या मस्तकाची शीर उठली. त्याने, घराला बाहेरून कडी लाऊन घेतली. आणि, तडक पोलीस स्टेशन गाठलं. आणि आजवर घरी जे काही घडत आलं आहे, आणि आत्ता काय घडत आहे. त्याचा सगळा पाढा त्याने पोलिसांना वाचून दाखवला. हे सगळं ऐकून, ते पोलीस सुद्धा अगदी सैरभैर झाले.
आणि शेवटी, अश्रुंचा बांध फुटल्यावर तो मुलगा म्हणाला..
साहेब.. तुम्हाला मी हात जोडून विंनती करतो. तिला सुधरायला सांगा. नाहीतर, मी तिला मारून टाकीन..!
बापरे.. पोटच्या मुलाचं आईच्या बाबतीत असं काही बोलणं कोणाला ऐकवेल का..?
पण.. त्याला तो मुलगा तरी काय करणार. हा प्रसंगच अगदी भयंकर होत.
त्याच्या मुलाच्या कोवळ्या मनावर किती मोठा आघात झाला असेल..?
बस.. याच्यापुढे काय घडलं असेल, ते मला माहिती नाही. किंवा पुन्हा कधीही त्या विषयाकडे मी वळून पाहिलं नाही.
पण हे सगळं का घडलं..? आणि कोणामुळे घडलं..? याला नेमकं कोण कारणीभूत आहे..?
मी तर यामध्ये, त्या बाईला बिलकुल दोष देणार नाही. तिच्या नवर्याने तिला सुरवातीपासून समाजात वावरायला शिकवलं असतं. सगळ्या हौस मौज करायला दिल्या असत्या. तर, ती इतकी वाह्यात कधीच गेली नसती.
नाही म्हणता, तिने वर घडलेल्या सर्व गोष्टी केल्या असत्या. शेवटी ती सुद्धा मनुष्य आहे. तिला सुद्धा भावना आहेत. पण तिने, ते सगळं काही तिने पडद्याआड ठेऊन केलं असतं. कारण, समाजात वावरणाऱ्या व्यक्तींना समाजाची जान असते. ते कधीही इतकं बेभान होऊ शकत नाहीत.
त्याकरिता, सर्व व्यक्तींनी या विषयाकडे अगदी डोळसपणे पाहायला शिकलं पाहिजे.
तशी तर.. बाई ही कधीच वाह्यात नसते. आणि, त्यात तिला सगळी सुखं जर मिळाली. तर, उभ्या जन्मात कधीही तिचं पाऊल वाकडं पडणार नाही. याची मला संपूर्ण खात्री आहे.

No comments:

Post a Comment