बब्बू.. ( एक सुगंधी भयकथा )
बब्बू माझा बालवयीन मित्र, बिचारा लवकरच देवाघरी गेला. त्याच्या गुलछबू सवयीप्रमाणे, मृत्युलोकात जाण्याची तारीख सुद्धा त्याने फारच सुंदर निवडली.. ११/१/११.. हो.. खरोखरच एक नंबर माणूस होता तो. शेवटी, मृत्यू कोणाला चुकला आहे म्हणा. आणि, तो त्याला सुद्धा आला. पण, किमान इतक्या लवकर तरी यायला नको होता. त्याची स्मृती कोणीतरी जतन करावी, त्याकरिता हा एक छोटासा प्रयत्न.
आमचा बब्बू फारच करामती माणूस,
वयाच्या.. सोळाच्या आतच, सगळ्या म्हणजे अगदी सगळ्या गोष्टींचं 'ज्ञान' मला त्याच्याकडून शिकायला मिळालं. आता त्याने नेमकं कोणत्या प्रकारचं ज्ञान मला दिलं होतं. ते सगळंच काही मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण तुम्ही सगळे मित्र नक्कीच तेवढे समजदार आहात.
पूर्वी, आमच्या पिंपरीमध्ये ( आम्ही मुलं त्याला बॉम्बे रोड म्हणायचो. बोलताना तेवढाच विदेशी फिलिंग यायचा.) कृप कंपनीच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या भिंतीवर काही नेपाळी लोकं रोडच्या कडेला स्वेटर विक्रीचं दुकान थाटत असत. त्यावेळी, हा हौशी नौजवान तिथे हमखास चक्कर मारायचा. आणि, त्याकाळच्या हाफ पँटच्या जमान्यात अवघ्या पस्तीस रुपयामध्ये तेथून फुल पँट विकत घेऊन यायचा. एखादवेळेस त्याच्याकडे पैसे नसले, आणि.. त्या पथारीवर चांगला माल आला असेल.
तर, तो हि बातमी आमच्या इतर मित्रांना सांगायचा..
ए..दिप्या " थर्टी फाय " ( पस्तीस रुपयात मिळणारी. ) मस्त माल आला आहे.
जा... तुला एखादी पँट घेऊन ये..!
त्याकाळी, मी भलताच कफल्लक माणूस. माणूस कुठला हो, ओठावर मिसरूड न फुटलेला पंधरा वर्षांचा मुलगाच होतो मी. पहिली ते दहावीपर्यंत, बोच्याला चार-चार ठिगळे असणारी हाफ पँट मी वापरली आहे. त्याकाळी..माझ्या बापाची, खूप ऐपत होती. आमचा, स्वतःचा वीट कारखाना होता. पण, वडिलांनी आमच्या चैनीसाठी कधी पैसा सोडलाच नाही. मी दहावीला असताना, माझ्या वडिलांचे वीट कारखान्यातून उत्पन्न झालेले लाखो रुपये मी माझ्या हाताने मोजले होते. पण त्यांनी, आमच्यासाठी म्हणावं असं काही करून ठेवलं नाही. खरं तर, त्यांनी मला जन्म दिला हीच फार मोठी पुण्याई आहे. पण सांगण्या सारखी अजून एक गोष्ट आहे.. खाण्या पिण्याच्या बाबतीत, त्यांनी आम्हाला कधीच आणि काहीच कमी पडू दिलं नाही. त्यांच्यामुळेच मी एक खासा खवैय्या सुद्धा आहे. पण, खाण्या पिण्या व्यतिरिक्त, त्याकाळी मनासारखी हौस मौज आम्हाला कधीच करता आली नाही. दिवाळीत सुद्धा, आम्हा चार भावांना मिळून पँट आणि शर्टसाठी ते एकच कपडा निवडायचे. त्यामुळे, घरामध्ये ती कपडे सुद्धा मला गणवेशा सारखेच भासायचे. त्या एकसारख्या कपड्यामुळे, आम्हा भावांची एखादी बेंडबाजा पार्टी असावी. असं कोणाला तरी वाटून जावं, इतपत मोठमोठ्या गमती जमती आम्हा भावंडात व्हायच्या. वेगवेगळे आणि प्रत्येकाच्या आवडी निवडी प्रमाणे कापड घेतलं असतं.. तरी तितकाच खर्च येणार होता. पण नाही, सरसकट सर्वांना एकच कपडा घेतला जायचा.
हे असं का..? ते कोडं मला आजतागायत उलघडलच नाही.
असो, तर..
सन १९८७ मध्ये बब्बू आणि मी आम्ही दोघेही इयत्ता दहावीला होतो..
माझ्या बापाने, त्याकाळी बांधलेल्या स्ल्याबच्या घरावर. मी, आणि बब्बू दोघेही अभ्यास करायला बसायचो. आमच्या घरातून टेरेसवर लाईट घेतली होती. आणि त्या बल्बच्या उजेडात आम्ही दोघे अभ्यास करायला बसायचो. पण, तो बल्ब होता फक्त साठ वॉटचा त्यामुळे, अभ्यास करताना आम्हाला हवा तेवढा प्रकाश मिळत नव्हता. अगदी मंद असा प्रकाश पडायचा. आणि वाचताना फारच अंधुक असं दिसायचं. मी, हा प्रश्न बब्बू समोर मांडला. ह्या बाबुरावकडे, प्रत्येक प्रश्नांचं अगदी रामबाण औषध असायचं. शेवटी, गुरूच तो माझा..
त्यादिवशी.. रात्री आठ वाजता आम्ही आमचा अभ्यास आटोपला. आणि, आम्ही घरी जेवायला निघालो होतो. जेवण झाल्यावर पुन्हा अभ्यासाला बसायचं होतं.
एकतर उन्हाळ्याचे दिवस, आणि त्याकाळी मच्छर सुद्धा फार नसायचे. त्यामुळे, मोकळ्यावर निवांत बसायला मिळायचं. कोणाची तकतक नाही कि झिगझिग नाही.
तर, त्या दिवशी घरी जाता जाता बब्बू मला म्हणाला..
तुझ्या टेरेसवर पडलेल्या दहा पंधरा विटा मला पाहिजेत. जेवण झाल्यावर, येताना मी एक मोठी पिशवी घेऊन येतो. त्या विटा, आपण दोघे मिळून रात्री आमच्या घरी घेऊन जाऊयात.
आमचा तर विटांचा कारखानाच होता. त्यामुळे, मी सुद्धा त्याला ताबडतोब होकार कळवला.
जेवणं आटोपली,
आणि.. आम्ही पुन्हा एकदा अभ्यासाला बसलो.
रात्रीचे अकरा वाजले होते. सगळीकडे सामसुम झाली होती. बब्बुने सोबत आणलेल्या पिशवीमध्ये आम्ही दहा पंधरा विटा भरल्या. पिशवीचा एक-एक बंध आम्ही दोघांनी पकडला. आणि त्या अवजड विटा बबुच्या घरी पोहोचत्या झाल्या.
त्याने विटांची पिशवी रिकामी केली. आणि मला, चल म्हणून डोळ्याने खुणावलं, कारण, बब्बू बोलताना थोडा अढखळत बोलायचा. म्हणून तो बरीच कामं, डोळ्याने आणि इशाऱ्याने मार्गी पाडायचा. मी सुद्धा, नंदी बैलासारखी मान हलवत त्याच्या पाठोपाठ निघालो.
रात्रीचे साडेअकरा वाजत आले होते. सगळीकडे धीरगंभीर शांतात होती. सगळे लोक निद्रादेवीच्या बाहुपाशात सामावले होते. आणि आम्ही, एका भलत्याच मोहिमेवर निघालो होतो..
शेवटी, कुतूहल म्हणून मी बब्बुला म्हणालो, आपण कुठे चाललोय रे..?
येवढ्या स्तब्ध रात्री सुद्धा.. तोंडावर बोट ठेवून, मला शूउउउउ करत तो म्हणाला..
" अभ्यासाला शंभरचा बल्ब पाहिजेना आपल्याला..! "
मी सुद्धा मानेनेच त्याला होकार कळवला. आणि आम्ही, तेथील एका चाळीतील अंधाऱ्या गल्लीत पोहोचलो. बऱ्याच लोकांच्या घराबाहेरील लाईट्स बंद होत्या.
बब्बू त्यातून सुद्धा, अशा अंधाऱ्या रात्री त्या बल्ब खाली लिहिलेला वाटेज पहायचा. आणि तो बल्ब कमी वाटेजचा जरी असला तरी तो त्याच्या पिशवीत कोंबायचा.
एक साधी आणि सोपी गोष्ट होती, घराबाहेर कोणी शंभर वाटेजचा दिवा लावेल का..?
घराबाहेर जेमतेम प्रकाश असावा, त्याकरिता सगळे जन फारफारतर चाळीस किंवा साठचा बल्ब लावायचे. पण हा गडी काही ऐकायलाच तयार नव्हता.
त्या भयाण अंधाऱ्या रात्री आम्ही दोघे चाळीवर चाळी पालथ्या घालत होतो. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. मधेच, एखादं कुत्रं भुंकल्याचा आवाज कानी पडत होतो. तेच काय ते जागे पणाचं लक्षण होतं. एकाठिकाणी तर, आम्ही आमच्या मित्राच्या घराबाहेरील बल्ब सुद्धा काढून घेतला. मी बब्बुला तशी कल्पना सुद्धा दिली. तर, त्याने मला जागेवर गप्प करून टाकलं. आणि म्हणाला.. लोकांना डाऊट येईल अशी कामं करायची नाहीत..! भलताच शार्प माइंडेड माणूस हो.
आणि..तो बल्ब सुद्धा त्याने पिशवीत कोंबला.
एक-एक, करता-करता, आता तब्बल पंधरा विस बल्ब आमच्याकडे जमा झाले होते. बल्बने आमची पिशवी भरली होती. पण आमच्या बब्बूचं मन काही भरत नव्हतं. आणि, तासभर भटकंती करून सुद्धा. त्या रात्री, आम्हाला शंभरचा बल्ब काही मिळाला नाही.
शेवटी, आम्ही तो नाद सोडला. आणि चोरलेले सगळे बल्ब घेऊन आम्ही बब्बुच्या घरी पोहोचलो.
बब्बुचं घर अगदी हमरस्त्यावर असल्याने, रात्री अपरात्री कधीही आलं तरी त्याठिकाणी भीती अशी वाटत नसायची. घराबाहेर पडतानाच, बब्बुने दरवाजाची बाहेरून लावलेली कडी अलगद उघडली. घरामध्ये.. आई आणि ताई झोपली होती. बाबा आणि भाऊ त्यांच्या घराशेजारील जागेत एक इमारत बांधायचं काम चालू होतं. त्या अर्धवट बांधलेल्या इमारतीत ते झोपले होते. बब्बुने चोरलेल्या बल्बची पिशवी एका कोपऱ्यात ठेऊन दिली. आणि, त्याच्या बोबड्या आवाजात त्याने आईला आवाज दिला,
आई.. आतून कडी लाऊन घे गं..!
असं म्हणून, त्याने घराचा दरवाजा ओढून घेतला, आणि, आम्ही दोघे घराबाहेर पडलो.
बाहेरच.. समोरच्या दोन चाळीतील दगडी पायवाटेवर आम्हाला कसली तरी अस्पष्टशी हालचाल जाणवली. इतक्या अंधाऱ्या रात्री सुद्धा..
तिथे एक बाई उभी असल्याचं आम्हाला स्पष्ट दिसत होतं.
कमनीय आणि ठसठशीत बांधा, अंगावर हिरवी कोरी नवी साडी, डोक्यावर पदर, पदरा खालून समोरील बाजूस आलेले तिचे काळेभोर घनदाट केस, आणि केसांखाली काचोळीत लपलेले तिचे डेरेदार वक्ष, हातातील हिरवा चुडा आणि कपाळावरील लाल कुंकवाचा ठसठसीत टिळा.
आमच्याकडे पहात, मध्येच हालचाल करताना, तिच्या हातातील बांगड्याची खळखळ सुद्धा आम्हाला स्पष्ट जाणवत होती.
आज विचार करायला गेलो, तर मला त्या गोष्टीचं फार अजब वाटतं.
इतक्या अंधाऱ्या रात्री हे सगळे रंग आणि बारकावे आम्हाला इतक्या स्पष्टपणे कसे काय दिसत होते..?
पण त्यावेळी, आमच्यावर एकप्रकारची मोहिनीच घातली गेली होती.
बब्बूच्या घरापासून अगदी शंभर एक मीटर अंतरावर झोपडपट्टी वजा एक एरिया होता. तेथील कोणी अभागी महिला, नवऱ्याच्या मारझोड करण्याला कंटाळून येथे येऊन थांबली असावी. असा आम्ही अंदाज बांधला. मी तर या विषयाला पूर्णपणे फाटा देऊ पाहत होतो, पण बब्बू महा खटपटी माणूस.
मला म्हणाला.. चल त्या बाईला काय झालंय ते आपण तिला विचारून येऊ..!
सगळ्या " विषयात " पारंगत असणारा बब्बू, त्या महिलेसोबत लगट करण्याचा विषय सुद्धा मनात घोळवू लागला होता.
हे असलं भयानक रूप आणि अवतार बघून एकतर मी घाबरून गेलो होतो. आणि, हा नवीन तमाशा कशाला..? म्हणून, मी त्याला माझा स्पष्ट नकार कळवला.
ती बाई बाकी, अजूनही एकाच जागी हळुवार हालचाल करत उभी होती. बब्बूच्या अंगात वणवा पेटला होता. यापूर्वी सुद्धा त्याने असे बरेच विषय हाताळले होते. त्यामुळे तो अगदी बिनधास्त होता. त्याच्या जवानीचा बहर त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे, त्या महिलेची विचारपूस करण्यासाठी तो फारच अधीर झाला होता. नंतर मी अगदी बारकाईने पाहिलं..
बाकी सगळं काही दिसतंय, पण तिचा चेहेरा का दिसत नाही..?
या प्रश्नाने आता माझी पाचावर धारण बसली होती. कधी नाही ते, बब्बुने सुद्धा माझ्या या शब्दाला किंमत दिली. आणि म्हणाला..
तू एक काम कर, तू तुझ्या घरी झोपायला जा. मी इथे बिल्डिंगमध्येच झोपणार आहे.
बब्बू तर अगदी सहजपणे बोलून गेला होता.
तू तुझ्या घरी जा..!
पण माझं पाऊल काही पुढे रेटत नव्हतं. मी त्याला म्हणालो. बब्बू मला फार भीती वाटतेय रे, मी काही आज घरी जात नाही. तुझ्या अंथरुणातच आज मी झोपतो. बब्बुने सुद्धा मला लगेच होकार कळवला. आणि..आम्ही दोघेही, तडक त्या बिल्डिंगमध्ये गेलो.
भीतीमुळे माझ्या अंगात कापरं भरलं होतं. अंग गरम झालं होतं, थोडासा घाम सुद्धा आला होता. भीतभीतच कसाबसा मी बब्बुच्या गोधडीत शिरलो.
आणि, जोरजोरात एक मांजर ओरडल्याचा मला आवाज येऊ लागला. मांजराचा तो भयानक आणि भेसूर आवाज ऐकून माझ्या भीतीमध्ये कमालीची वाढ झाली होती. मांजराचा आवाज थांबतो न थांबतो तोच..
एक लहान मुल रडण्याचा आवाज मला ऐकू येऊ लागला. घड्याळात बाराचा ठोका पडायला सुरवात झाली होती.
त्यावेळी.. प्रत्येक घरात, लोलक असलेलं ठोक्याचं घड्याळ असायचं. अर्धा एक मिनिटाच्या अंतरावर, बऱ्याच घरातून घड्याळाच्या आवाजाचे ठोके घुमू लागले. एकीकडे हा भीतीदायक आवाज, तर दुसरीकडे ते मुल इतक्या जोरात किंचाळत होतं. कि सांगता सोय नाही. भीतभीतच मी बब्बूला म्हणालो..
तुमच्या इथे लहान बाळ कोणाकडे आहे रे..?
माझ्या या, अनपेक्षित प्रश्नावर बब्बू सुद्धा विचारमग्न झाला.
कारण, त्या परिसरात कोणाच्याच घरी लहान मुल नव्हतं..!
आता मात्र, माझा संशय बळावला होता. अंधारात उभी असणारी ती महिला नेमकी कोण असावी..? खरोखरच, ती महिला होती कि एखादी भुताटकी..?
त्यांनतर मात्र, मला फारच दरदरून घाम फुटला. डोळ्याला डोळा लागत नव्हता. भीती माझ्यावर आरूढ होऊ पाहत होती. आजूबाजूला झोपलेल्या लोकांच्या घोरण्याच्या आवाजाला एक अनामिक सोबत समजून. डोळे बंद ठेवून मी निपचित पडलो होतो. जागरणाने आणि भीतीने माझे डोळे तारवटले होते. पहाटेच्या मंद सुगंधी वाऱ्याच्या झुळकेने केंव्हातरी अचानक माझा डोळा लागला.
सकाळ झाली, बिल्डिंगमध्ये झोपलेली सगळी लोकं जिकडे तिकडे झाली होती. बब्बू सुद्धा अंथरुणात नव्हता. काल रात्रीच्या प्रकारामुळे, माझं डोकं सुद्धा जरा जड झालं होतं, अंगात कोमट ताप तसाच होता. मी कसाबसा अंथरुणावरून उठलो. आणि घरी गेलो.
रात्रभर कुठे होतास..? या विषयावर घरच्यांचा तोंड फुटेस्तोवर बोल खाल्ला.
अंघोळ, चहा नाश्ता, उरकला.
आणि..आईला सोबत घेऊन पहिला दवाखाना गाठला.
एक इंजेक्शन आणि काही गोळ्यांमुळे तापात थोडा फरक पडला होता. दुपार झाली, जेवण उरकलं औषधी गोळ्या खाल्ल्या. आणि, काल रात्री घडलेला सगळा समाचार मी माझ्या आईला सांगितला.
आईने, जो अंदाज लावायचा तो लावला. शेवटी माझी आईच ती,
रात्र होताच, तिने कसलासा " उतारा "माझ्या सर्वांगा वरून उतरून टाकला. नाही म्हणता, आता मला थोडा आराम वाटत होता. संध्याकाळी बब्बू सुद्धा माझ्या घरी येऊन गेला.
साला लैच राकट माणूस, त्याला काहीच झालं नव्हतं. अगदी आहे तसा धडधाकट होता तो.
तशाही परीस्थित, माझी विचारपूस करून जाताना, तो एक वाक्य मला बोलून गेलाच.
" पंड्या.. तुझ्यामुळे काल हाती आलेला चांगला चान्स घालवला राव मी. "
मी त्याचे ते शब्द किंवा वाक्य माझ्या मनाला लाऊन घेतलं नाही. शेवटी काहीही केलं तरी, तो मित्र होता ना माझा..
पण, उद्यापासून..
माझी दहावीची परीक्षा सुरु होणार होती. आणि, अभ्यासात काही माझं मन लागत नव्हतं.
त्या बाईचा काळा चेहेरा सतत माझ्या नजरेसमोर यायचा.
उद्या मराठीचा पहिला पेपर होता. त्यानंतर, दोन दिवस सलग सुट्ट्या होत्या. मधल्या सुट्ट्याच्या काळात पुढील विषयाचा थोडा अभ्यास होईल अशी मला आशा होती.
पण उद्याचं काय..?
आणि, शेवटी व्हायचं ते झालंच.
त्या अंधाऱ्या रात्रीच्या भुताटकीने, मला चांगलाच धडा शिकवला होता.
आणि, दहावीचा निकाल लागला तेंव्हा. चक्क मराठीच्या पेपर मध्ये मी नापास झालो होतो.