Thursday, 8 December 2016

एकतर.. मी फारच जेमतेम मनुष्य आहे.
आणि बऱ्यापैकी सर्वसामान्य सुद्धा आहे. त्यामुळे, हि नोटा बंदीची घोषणा होण्याअगोदर, माझ्या घरात हजार पाचशेच्या नोटा नव्हत्याच. होती ती, फक्त शंभर रुपयाची एक गड्डी.
ती सुद्धा, दिवाळीत लक्ष्मी पूजन करण्यासाठी नोटांची एखादी मोठी गड्डी असावी. म्हणून, माझ्या बायकोने ब्यांकेतून ती गड्डी मुद्दाम आणून ठेवली होती. तशी तर, हजार आणि पाचशे रुपयाची गड्डी लक्ष्मी पूजनात पुजायची अजून तरी माझी ऐपत नाहीये. ( तुम्हाला आठवत असेल तर, माझ्या.. दिवाळीतील लक्ष्मी पूजनाच्या फोटोत ती शंभर रुपयांची गड्डी दिसत होती बघा. आणि सुट्ट्या नान्यांसोबतच, काही पाचशेच्या नोटा सुद्धा होत्या. )
मोदी सरकारच्या नोटा बंदीच्या महत्वपूर्ण निर्णयाला, आताशा वीस दिवस पूर्ण होऊन गेले आहेत. आणि, माझी शंभराची ती गड्डी सुद्धा आता जवळपास संपलीच आहे. म्हणून,
इतक्या दिवसात, आज पहिल्यांदा पैसे काढण्यासाठी मी आमच्या महाराष्ट्र ब्यांकेच्या बाहेर लाईनीत उभा राहिलो होतो.
माझं नशीब पण असं आहे ना, दरवेळी नेमकं नवीनच काहीतरी माझ्याच पुढ्यात वाढून ठेवलेलं असतं.
तर प्रस्तुत आहे, आजचा नवीन किस्सा..!
काल सकाळी, पैसे काढण्याकरिता मी ब्यांकेच्या भल्या मोठ्या लाईन मध्ये उभा राहिलो होतो. माझ्यापुढे, मोजून तीसेक लोकं असावीत. फार नाही, पैसे मिळायला फक्त तासभर लागणार होता. हे मला सुद्धा माहिती होतं.
आणि तितक्यात.. माझ्या पाठीमागे, लाईनीत उभ्या असणाऱ्या नवरा बायकोची जोरदार भांडणं सुरु झाली. सुरवातीला, मला काही समजायला मार्ग नव्हता. शेवटी वैतागून त्या भांडणात मी हस्तक्षेप केला. आणि, त्या व्यक्तीला मी खडसावले.
कशाला कालवा करताय हो..? चारचौघात, बायकोला घाण घाण शिव्या देताय. पटतंय का हे तुम्हाला..? तुमचे जे काही वाद असतील ते आपल्या घरात मिटवून यायचे ना, जगा लोकाला कशाला तमाशा दाखवताय..?
माझा हा भयंकर पवित्रा पाहून तो मनुष्य मला म्हणाला..!
माऊली.. ( काल एकादशी होती ना. ;) ) मला माफ करा, पण विषयच तसा घडलाय हो.
हे बघा.. माझ्या मागे जे उभे आहेत. ते माझे वडील आहेत. त्यांनी आत्ताच सत्तरी ओलांडली आहे. आणि मी, फारफार तर तुमच्यापेक्षा पाचेक वर्षांनी मोठा असेल. आणि हि माझी मंडळी.
अहो.. काय सांगू तुम्हाला, माझ्या डोक्याला खूप मोठा ताप झालाय..
पोरीचा हिस्सा म्हणून, हिचा बाप हिला दोन लाख रुपये देणार होता. त्याला आता, चार वर्ष होऊन गेली. माझा सासरा मेला, पण हिच्या भावांनी त्यो पैसा काय आम्हाला दिला नाही.
आम्हाला राहायला घर नाहीये, कुठेतरी छोटीशी गुंठाभर जागा घेऊन स्वतःचं घर बांधावं. त्या हिशोबाने, मी कसेबसे दोन लाख रुपये घरात जमा करून ठेवले होते.
आत्ता मधीच ह्यो नवीन कायदा आला. म्हणून मी ताबडतोब ते पैसे ब्यांकेत जमा केले.
आणि, काल रातच्याला..
हिचा भाऊ, हिच्या वाटणीचे दोन लाख रुपये घेऊन आमच्या घरी आला.
आता काय करता..? नाय बी म्हणता येयीना, आणि काहीच करता येयीना. मी आत्ता येवढ्यातच माझ्या खात्यावर घरातले दोन लाख रुपये जमा केले आहेत. आणि आता हे पैसे मी ब्यांकेत माझ्या नावावर भरले तर..
लगेच, तुमच्याकडे एवढी मोठी रक्कम कुठून आली..? अशी विचारणा मला होईल कि नाही..?
सांगा, तुम्हीच सांगा..?
असं म्हणून, पुन्हा तोच व्यक्ती माझ्याशी बोलू लागला.
आता.. माझ्या बायकोचं सुद्धा कोणत्या ब्यांकेत बचत खातं नाहीये. आणि, माझ्या बापाच्या नावाचं खातं आहे. तर ते म्हनत्यात,
आजवर.. माझ्या खात्यावर, तुम्ही लोकांनी कधी एक रुपाया टाकला नाही. आणि, आता एकदम दोन लाख रुपये माझ्या नावावर टाकायचं म्हणताय. म्हणजे, त्या मोदीने मला पकडायला पाहिजे, अशी तुमची इच्छा आहे.
सांगा.. आता मी भांडू नको तर काय करू..?
समस्या फारच गंभीर होती.
गरीब स्वतःच्या अब्रूला घाबरतोय, तो म्हातारा मनुष्य सुद्धा, त्याच्या अंगावर " बालंट " घ्यायला तयार नाहीये. मित्रांनो, त्या माणसाला मी मस्त सल्ला दिला. म्हणालो, तुम्ही बिलकुल घाबरू नका.
तुमच्या नावावर, हे पैसे तुम्ही ब्यांकेत बिनधास्त भरा. त्याचा तुम्हाला काहीएक त्रास होणार नाही. असं त्यांना सांगितलं.
कर नाही, त्याला डर कशाला पाहिजे..!
पण मी, त्या गरीब लोकांना पाहून फार समाधानी होतो. या अचानक आलेल्या सुनामीचा गरीब लोकांना त्रास होतोय, पण येवढ्या मोठ्या झमेल्यात तो व्यक्ती त्याच्या बायकोला शिव्या देत होता.
पण रागे भरून, तो..
" भारताच्या पंतप्रधानांना शिव्या देत नव्हता. "
सगळं काही, अगदी.. व्यवस्थित, सहकार्याच्या आणि आपुलकीच्या भावनेने चालू आहे.
खरोखर, मला अगदी मनापासून आनंद वाटला..!


No comments:

Post a Comment