Thursday, 8 December 2016

तीन वर्षांपूर्वी, मी अमरनाथ यात्रेला गेलो होतो...
त्या भागातील मला काहीच माहिती नसल्याने, एका नवीनच ग्रुपसोबत मी त्या यात्रेला गेलो होतो. पहेलगाम मध्ये पोहोचल्यावर, उद्या सकाळी यात्रेला जाण्याकरिता आमच्यातीलच काही सात आठ व्यक्तींचे ग्रुप बनवण्यात आले. जेणेकरून कोणाची चुकामुक किंवा फाटाफूट होऊ नये.
आम्हाला सुद्धा.. सहा व्यक्तींचा एक ग्रुप बनवून दिला होता.
आमच्या ग्रुपमध्ये, माझ्या ओळखीतले चार मित्र आणि आमच्या भागात राहणारे दोन अनोळखी तरुण मुलं होते. ती दोन्ही मुलं, दिसायला खूपच सुंदर होते. गोरे गोमटे, अंगापिंडाने मजबूत, स्थानिक गाववाले असल्याने पैश्या पाण्याने मजबूत. नोकरी व्यवसायाने मजबूत. त्या दोघांमध्ये, मायनस पोइंत असा नव्हताच.
आमचा ग्रुप जमला..
आणि आम्ही, ग्रुपमधील सगळ्यांनी एकत्र पायी चालत जायचा निर्णय घेतला. हि मुलं सुद्धा आमच्यामुळे चालत जायला नादावली. आणि आम्ही पायी यात्रेला सुरवात केली. काही अंतर चालत गेल्यावर, आम्हा मित्रांची सुद्धा फाटाफूट झाली. आणि माझ्या ग्रुपमध्ये, ती दोन चिकणी मुलं, आणि मी, असे आम्ही तिघेच जन उरलो होतो.
चालून-चालून थकलो, कि आम्ही तिघे कुठेतरी एखाद्या खडकावर बसकण मारायचो. आम्ही तिघे बसलो, कि ते दोघे मुलं..लगेच, त्यांचे मोबाईल बाहेर काढायचे. आणि फेसबुकवर ताकझाक करायला सुरुवात करायचे.
असं.. एकदोन वेळा घडलं, मी सगळं काही पाहत होतो. पण मुद्दामच मी त्यांना म्हणालो.
काय करताय रे तुम्ही मोबाईल मध्ये..?
तर म्हणाले.. दादा, आम्ही फेसबुकच्या अपडेट आणि नोटिफिकेशन बघतोय हो..!
आणि म्हणाले, दादा.. तुम्ही फेसबुकवर असता कि नाही..?
मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाही.
आणि, त्यातील एक मुलगा लगेच सुरु झाला. दादा, हे फेसबुक म्हणजे एक नंबर आयटम आहे. इथे, जग भरातल्या एकसे एक सामानं ( मुली ) पटत्यात बघा.
मी म्हणालो ते कसं काय..?
तर तो मुलगा म्हणाला.. हे बघा माझा फोटो किती लोकांना आवडला आहे. ते इथे दाखवतात. बघा एकशे सत्तर लोकांना माझा फोटो आवडला आहे. अहो, लई मज्जा असते इथे. पोरींना चाटिंग करायचं. पोरी आपल्याला चाटिंग करत्यात. काम होऊन जातं. अहो, एक पोरगी हाताला लागली ना. कि त्यांचा आक्खा ग्रुपच ओळखीचा होतो. नुसती धरसोड असते बघा. गेल्या महिन्यात तर, मी पाच पोरी पटवल्या. हे सांगताना, तो गडी खूप चेकाळला होता. हे सगळं ऐकून, एका गोष्टीचं मात्र मला विशेष वाटत होतं. पोरं काय आणि पोरी काय या जमान्यात कुणीच शहाणं उरलं नाहीये.
मी फक्त ऐकण्याची भूमिका घेत होतो. आणि, बर्यापैकी वेड्याचं सोंग सुद्धा वटवलं होतं.
त्यानंतर.. काही अंतरावर गेल्यावर, माझ्या मोबाईलला सुद्धा रेंज आली. आणि मी सुद्धा फेसबुक मध्ये डोकं घालून बसलो. काहीवेळाने, तो मुलगा गुपचूप माझ्या मागे येऊन थांबला. आणि, फेसबुकवर काहीतरी वाचत असताना त्याने मला पाहिलं. आणि म्हणाला..
दादा.. तुम्ही सुद्धा फेसबुकवर आहात..?
बघू, बघू.. म्हणून, त्याने माझा मोबाईल जवळजवळ हिसकावूनच घेतला. आणि, तो डायरेक्ट माझ्या वालवर गेला.
माझ्या एका एका पोस्टला दोनशे तीनशे लाईक पाहून तो पक्का हैराण झाला. आणि, माझ्या प्रोफाईल पिकचे लाईक्स पाहून तर. तो अगदी टक लाऊन माझ्याकडे पाहू लागला.
आणि. मला म्हणाला.
" तुम्ही तर फेसबुक सेलिब्रिटी दिसताय राव. नाही म्हणलं तरी.. तुम्ही सुद्धा पाच सहा सामानं नक्की पटवली असतील..! चिकार पोरी तुमच्यावर फिदा असतील. "
येऊन जाऊन, त्याचा एकच विषय होता. पोरी, पोरी आणि फक्त पोरी..
मी त्याचं सगळं ऐकून घेतलं.. आणि त्याला म्हणालो,
नाही रे वेड्या, तू समजतोस तसं काहीएक नाहीये. मी फक्त इथे माझ्या लेखनाचा छंद पूर्ण करतोय. असला कोणताच नाद मी करत नाही. आणि, या गोष्टींची मला आवड सुद्धा नाही. परंतु, त्याला माझं म्हणनं शेवटपर्यंत पटलं नाही, यात्रा संपेपर्यंत, तो माझ्याकडे वेगळ्याच संशयी नजरेने पाहत होता.
जसा काही, मी.. फेसबुक वरील कान्हाच असावा..!

No comments:

Post a Comment