Thursday, 8 December 2016

माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीचं नशीब फार खोटं होतं..
विदर्भातील, अमरावती मध्ये तो राहायला होता. आई वडिलांना हा एकुलता एक मुलगा. पण त्याच्या वयाच्या दहाव्या वर्षी, त्याच्या आई वडिलांचा अपघाती मृत्यू झाला.
वडिलांना सुद्धा कोणीही भाऊ बंदकी नव्हती. त्यामुळे, त्याला सांभाळणारा जवळचा नातेवाईक असा कोणीच नव्हता. त्याचा एकमेव नातेवाईक म्हणजे,
त्याची आत्त्या..
त्याच्या वडिलांची लहान बहिण, जी पुण्यात वास्तव्याला होती. वडील शेतकरी असल्याने, गावी त्यांची काहीतरी वीसेक एकर जमीन होती. राहतं घर होतं. पण, आईवडिलांच्या मृत्यनंतर आता ते कोणत्याच कामाचं उरलं नव्हतं. हा दहा वर्षाचा मुलगा, तिथे एकटा काही राहू शकत नव्हता.
आईवडिलांचं क्रियाकर्म आटोपल्यावर, त्याच्या आत्त्याने त्याला पुण्यात आपल्यापाशी आणून ठेवलं. तिच्या दोन लहान मुलांप्रमाणे, हा सुद्धा आता त्यांच्या कुटुंबातील तिसरा मुलगा आणि घरातील सदस्य झाला होता.
त्याची आत्त्या बिचारी चांगली होती. तिचा नवरा सुद्धा फार समंजस होता. सगळं काही ठीक चालू होतं. बघता बघता दिवस लोटू लागले,
छोटासा दीपक.. आता, पदवीधर झाला होता. दीपकचं नशीब सुद्धा खूप जोरावर होतं. पदवीधर झाल्याबरोबर त्याला लगेचच एक सरकारी नोकरी मिळाली. आत्या आणि मामांना तो आई वडिलांचा दर्जा देत होता. घरातील लहान भावंडांना सुद्धा तो आदरपूर्वक वागवत होता. दीपकला नोकरीला लागून पाच वर्ष होऊन गेली होती. आता त्याच्या लग्नाची तयारी सुरु झाली.
तत्पूर्वी.. काही मित्रांबरोबर तो दक्षीण भारतात फिरायला आणि तिरुपती बालाजी दर्शनाला गेला.
त्याच्या ऑफिसमध्ये कामाला असणारे पाच सहा मित्र, तिरुमला येथे पोहोचले. देवदर्शन आटोपलं. आणि तिरुमला येथे असणाऱ्या शीला तोरनम आणि श्रीवरी पादुका येथे दर्शनाला गेले. शीला तोरनम पासून श्रीवरी पादुका, अगदी दोनेक किमी अंतरावर आहे. पण सगळी लोकं तिथे जीप करूनच जातात. कारण, जाताना वाटेत खूप मोठा चढ आहे. हे सगळे मित्र, श्रीवरी पादुकाचे दर्शन करून आले. आणि परतीच्या प्रवासाला निघाले. श्रीवरी पादुका येथून खाली येताना सगळा उतार असल्याने. बहुतेक ड्रायव्हर लोकं, खाली येताना गाडी न्युट्रल करून येतात. त्यामुळे, त्यांची डीझेल बचत होते. खरं तर, असं करणं योग्य नसतं. पण काही लोकं हा मूर्खपणा करताना आढळतात.
पण यावेळी.. घाट उतरून खाली येत असताना,
त्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला. त्याला, त्याच्या गाडीचा ब्रेकच लागत नव्हता. आणि शेवटी, ती गाडी घाटामध्ये कोसळली.
गाडीतील बऱ्याच लोकांना मुकामार लागला होता. काहींना गंभीर दुखापत झाली होती. पण त्यातल्या त्यात, दीपकला फार जबरी मार लागला होता. त्याच्या गुप्तांगाच्या बाजूला एक फार मोठी आणि खोलवर जखम झाली होती. आणि, त्या जखमेतून फार मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता.
अपघाताची माहिती मीळताच, त्याठिकाणी देवस्थानाची अंबुलन्स आली. आणि, जखमींना ताबडतोब इस्पितळात घेऊन गेले. उपचारादरम्यान दीपकची प्रकृती फारच खालावली होती. तिरुमला येथे, त्याच्यावर योग्य ते उपचार होणार नव्हते. त्याचं एक छोटं ऑपरेशन करणं भाग होतं. त्यामुळे, त्याला ताबडतोब तिरुपती येथे हलवण्यात आलं. पण, अति रक्तस्त्राव झाल्याने. दीपकचा वाटेतच मृत्यू झाला.
त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांना हा आघात सहन होणारा नव्हता. काय करावं ते त्यांना समजेना.
( इथे.. तुम्हा सर्वांना एक गोष्ट मला सांगावीशी वाटतेय.
तिरुमला देवस्थान येथे यात्रेकरिता जाणाऱ्या प्रत्येक भाविकाचा देवस्थानच्या वतीने, एक विमा उतरवला जात असतो. ते, आपल्यापैकी बऱ्याच जनांना माहित नसावं. आपण जेंव्हा दर्शनचा पास काढतो, त्यावेळी.. त्यातच त्या सर्व पूर्तता केलेल्या असतात. तर, तिरुमला येथे चुकून असा काही अपघात घडला. आणि, चुकून कोण्या व्यक्तीला मृत्यू ओढवला. तर.. तिरुमला देवस्थानाच्या वतीने, त्या व्यक्तीचं शव एसी अंबुलन्स मधून त्याच्या घरी निशुल्क पोहोचवलं जातं. आणि सोबतच, सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून त्या व्यक्तीच्या वारसाला त्याच्या वयोमानानुसार ठराविक रकमेचा चेक सुद्धा ताबडतोब अदा केला जातो. )
तर.. शेवटी धाडस करून, मित्रांनी त्याच्या घरी हि बातमी कळवली. त्यांनीही वेळ न दवडता. ते शव डायरेक्ट अमरावती येथे मागवून घेतलं. तोवर, हि सगळी लोकं पुण्याहून अमरावती येथे निघून गेले. दीपकच्या वडिलोपार्जित शेतामध्ये अगदी मधोमध त्याच्या शरीरावर अंत्यविधी करण्यात आले. वारस म्हणून, देवस्थानाच्या वतीने त्याच्या आत्त्याला पंचवीस लाखांचा चेक सुपूर्द करण्यात आला. नोकरीमधील सुद्धा सगळा पैसा त्याच्या आत्त्याला मिळाला.
शेवटी, ज्याचं दुखः त्याला ठावूक असतं. पण एक गोष्ट आहे, तुम्ही निस्वार्थपणे कोणतीही गोष्ट करा. त्या बाईने, भावाच्या मुलाला अगदी पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळला. त्याच्या पालनपोषणात कोणतीही उणीव ठेवली नव्हती. शेवटी, मृत्यू कोणाला चुकला आहे. तसा तो दीपकला सुद्धा आला.
जीवनात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला साध्य होतेच असं नाही. पण एकेकाचं नशीब किती क्रूर असतं.
याचं एक जिवंत उदाहरण मला याची देहा अनुभवायला मिळालं.

No comments:

Post a Comment