Tuesday, 4 September 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- ८ )
=====================
घाटातील खडतर चढाई करत, सायंकाळी पाचच्या सुमारास आम्ही एका ठिकाणी येऊन पोहोचलो. जिथे आम्हाला चहा नाश्त्याची सोय दिसली होती. आजच्या मुक्कामात, हे पहिलं असं ठिकाण मला पाहायला मिळालं होतं. जिथे काहीतरी विक्रीसाठी होतं. दुसरी गाडी अजून बरीच मागे होती, तिची सुद्धा आम्हाला वाट पहायची होती. आमच्या बसमधील काही व्यक्ती खाली जाऊन फ्रेश होऊन आल्या. तिथे असणाऱ्या दुकानदाराला आम्ही विचारलं. इथे जवळपास दवाखाना कुठे असेल.? तर तो म्हणाला.. इथून पुढे पन्नास किलोमीटर अंतरावर पांग नावाचं एक गाव आहे. तिथे तुम्हाला मिलिटरी कॅम्प लागेल, तिथे दवाखान्याची सोय आहे.
प्रथमोपचार म्हणून, उलटी येणाऱ्या व्यक्तींना.. लसून ठेचून त्याला पाण्यात कालवून प्यायला द्या असं त्या दुकानदाराने सांगितलं. त्याच्याकडे असणारा लसून, दहा रुपयाला एक असा विकत घेतला. पाण्याच्या बाटल्या घेतल्या, काही लोकांना कोरा चहा करून घेतला, आणि त्रास होणाऱ्या व्यक्तींना ते लसणाचं पाणी प्यायला दिलं. त्यामुळे काही व्यक्तींचा त्रास थोडाफार कमी झाला होता..
तिथे बाजूला एक बाइकस्वार उभा होता, तो या खडतर प्रवासाला जाम वैतागला होता. आणि तिथे एका ट्रकला थांबवून विचारणा करत होता. हि गाडी आणि मला परत मनालीला घेऊन जाशील का..? त्यांचं पुढे काय ठरलं ते माहित नाही, पण अशा गमजा घडतात बघा. इथे बाईकवर प्रवास करायला मजा वाटते. पण चुकून काही त्रास झाला, किंवा अपघात घडला तर, यापेक्षा मोठी शिक्षा नाही. त्यामुळे दोन पैसे जास्ती गेले तरी चालतील, पण बाईक वरून जाताना सर्व सोयींनी युक्त अशा ग्रुप बरोबरच जावं.
तोवर आमची दुसरी बस सुद्धा आली, त्या गाडीतील रुग्णांना सुद्धा लसणाचं औषध दिलं. आणि आम्ही पुढे मार्गस्थ झालो. या भागात फक्त घाट, मातीचे डोंगर, सोबत वाहती नदी.. बस इतकच काय दिसायचं. या भागात डोंगरावर किंवा आजूबाजूला एक सुद्धा झाड दिसलं नाही. त्याभागात एकमेव पक्षी दिसला तो म्हणजे, पिवळ्या चोचीचा कावळा. मजल दरमजल करत, आम्ही पुढे निघालो होतो. इथले डोंगर अगदी बघत राहावे असेच आहेत. डोंगरात एकटक पाहताना आपल्याला त्यात विविध आकार दिसून येतात.
जरा कुठे ठीकठाक प्रवास सुरु झाला होता, आणि अचानक.. आमच्या बसचा ड्रायव्हरच उलट्या करू लागला. आता बाकी हद्द झाली होती. कारण ड्रायव्हर मंडळींना हा त्रास कधीच होत नसतो. नाहीतर तो व्यक्ती ड्रायव्हिंग कशी करणार.? गाडी बाजूला घेऊन, आमचा ड्रायव्हर फ्रेश होऊन आला. पण मला मात्र त्याचा चेहेरा पक्का पडलेला दिसला. आणि हा बाबुराव आता आजारी पडणार आहे याची खात्री सुद्धा झाली. संध्याकाळचे सात वाजले होते. पांग गाव आलं, आणि सगळे रुग्ण प्रवासी मिलिटरी इस्पितळात दाखल झाले. तिथे असणाऱ्या डॉक्टरांनी सर्वांना प्रथमोपचार दिले. मी आमच्या ड्रायव्हरला सुद्धा तिथे जाऊन ये म्हणालो. पण तो काही गेला नाही. लैच ताठ होता हरामखोर..
औषधं घेतल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता तरतरी आली होती. पांग गाव सोडलं आणि एकदाचा घाटमाथा संपला. हा घाट संपायच्या अगोदर एक डोंगर असा दिसत होता. जसं काही तिथे पूर्वी काही लोकवस्ती वगैरे असावी. मोठ्या वाड्यासारखं काहीतरी दिसत होतं. घटकेत इजिप्तची आठवण होत होती. फारच विचित्र वाटत होतं, तर आमचा ड्रायव्हर म्हणाला.. पूर्वी याठिकाणी एक गाव होतं. आणि ते सगळं गाव रातोरात गायप झालं. आता ही दंतकथा किती खरी असेल ते मला माहित नाही, पण दिसत मात्र अगदी तसच होतं. त्यामुळे येथील पर्वत रांगांना पर्वतांचा आत्मा असं संबोधलं जातं.
घाट संपला, आणि भलं मोठं पठार लागलं. दुतर्फा वालुकामय पठार आणि त्यातून जाणारा काळाकुट्ट रस्ता. फारच वेगळं दृश्य दिसत होतं. त्या पठारावर एका ठिकाणी पश्मीना बकऱ्या चरून येऊन कळप करून बसल्या होत्या.
वातवरणात भयंकर गारवा निर्माण झाला होता. दुसरी बस आमच्या पुढे होती. माझं लक्ष समोरच होतं. आणि एकाएकी समोरच्या बसचा मागील उजव्या बाजूचा टायर फुटला.
बापरे.. हा प्रकार आडवळणी घाटात घडला असता, तर बाकी आमची काही धडगत नव्हती. त्या भागातील निरव शांतता चिरत टायरचा फार मोठा आवाज झाला होता. त्यामुळे बसमधील सगळ्या व्यक्ती भयभीत झाल्या होत्या. नशीब काही अघटित घडलं नव्हतं. त्या बसचा टायर बदली करेपर्यंत, सगळी लोकं निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले. आणि एका मिनिटात पुन्हा बसमध्ये येऊन बसले. इतकी भयंकर थंडी पडली होती. टायर बदली करायला वेळ आहे म्हणून, आमचा ड्रायव्हर आराम करायला मागच्या सीटवर गेला. आणि तिथे आडवा झाला, ते पुन्हा काही उठायचं नावच घेईना. तो तापाने चांगलाच फनफनला होता.
काय करावं.. माझ्या मनात येत होतं, आता आपणच गाडीचा ताबा घ्यावा. पण पुढे रोड कसा असेल आणि कसा नाही. याची खात्री नसल्याने मी सुद्धा हे धाडस करून इच्छित नव्हतो. शेवटी कसाबसा आमचा ड्रायव्हर उठला, आमच्याकडे असणाऱ्या मेडिसिन त्याला खायला दिल्या. आणि कसबसं अगदी तासाभराचं अंतर कापलं असेल. रात्रीचे आठ वाजले होते, अजून आम्हाला दीडशे किलोमीटरचा टप्पा पार करायचा होता. रस्त्यात पुन्हा एक टपरी वजा हॉटेल दिसलं, चहा प्यायला म्हणून दुसऱ्या बसच्या ड्रायव्हरने गाडी बाजूला घेतली. आणि आमच्या ड्रायव्हरने अगदी अंगच टाकून दिलं.
बापरे.. फार मोठा तमाशा झाला होता. शेवटी आम्ही सगळे त्या हॉटेलमध्ये गेलो. हे साधं पत्र्याचं हॉटेल आतमधून बरच मोठं होतं. तिथे मस्तपैकी एक शेगडी पेटवून ठेवली होती. आम्ही सगळे तिच्या उबेला जाऊन बसलो. दुसऱ्या बसच्या ड्रायव्हरने, आमच्या ड्रायव्हरला तिथे आणलं. त्याला गोळ्याचे दोन डोस दिले. आणि तिथे असणाऱ्या खाटेवर ब्लेन्केट मध्ये गुरफटून झोपू दिलं. आठ वाजून गेले होते, आता जेवायला मिळेल कि नाही ते सांगता येत नव्हतं. आणि या वाळूच्या जंगलात कोणी जेवण सुद्धा बनवू शकत नव्हतं.
शेवटी त्या हॉटेलमध्ये आम्ही मॅगी बनवून घेतल्या. शेगडीच्या शेकोटीला बसून सर्वांनी मॅगी खाल्ली. उपवास असणाऱ्या मंडळींनी कॉफी घेतली. सगळ्यांच्या मनात कालवाकालव सुरु झाली होती. ड्रायव्हर आजारी पडल्यामुळे पुढे प्रवास करण्याचं धाडस कोणीच करू इच्छित नव्हतं. आणि आम्ही इथे मुक्काम केला, तर पुढील सगळं नियोजन ढासळनार होतं. सगळे जन मनामध्ये परमेश्वराचा धावा करत होते. काहीतरी चांगला मार्ग निघावा असं प्रत्येकाला वाटत होतं. मी स्वतः सुद्धा प्रवास करण्याच्या तयारीत नव्हतो. सगळा हवाला पांडुरंगावर ठेवला, आणि एकटक पाहत मी शेकोटीला शरण गेलो.
क्रमशः
जिस्पा व्हॅली ते लेह हा रस्ता कसा आहे, ते पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करून विडियो क्लिप नक्की पहा..


Sunday, 2 September 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- ७ )
=====================
दगड धोंड्यातून, खडबडीत रस्त्यावरून सकाळपासून जेमतेम चार पाच तासाचा प्रवास झाला होता. साडेअकरा वाजले होते, दुपारच्या जेवणाची सोय करावी म्हणून.. आम्ही ठीकठाक जागा पाहत होतो. मोकळी जागा तशी भरपूर होती, पण बोचरं वारं आम्हाला काही सुचू देत नव्हतं. वाऱ्याने गॅस काही पेटता राहणार नव्हता. त्यामुळे एखादी सेफ जागा पाहून आम्ही थांबणार होतो. मजल दरमजल करत एका तंबूच्या कॅम्पपाशी आम्ही आमच्या गाड्या थांबवल्या. या टेंटमध्ये दिवसा कोणीही राहत नसतं. इथे फक्त रात्रीच्या मुक्कामाला लोकं येत असतात. तिथे असणाऱ्या केयर टेकर व्यक्तीची परवानगी घेऊन निसर्गाच्या सानिध्यात आम्ही स्वयपाक बनवायला सुरवात केली. तिथे पाण्याची सुद्धा भरपूर सोय होती.
सोमवार असल्याने स्वयपाकात आज भाकरी करणार नव्हते. कोणी म्हणालं चपाती करा, तर त्याला खूप वेळ लागणार होता. मग सर्वानुमते असं ठरलं, कि आजच्या जेवणात पुरी भाजी बनवूयात. पुरी, बटाट्याची रस्सा भाजी वरण आणि भात असा मेन्यू तयार झाला. उपवास असणारी मंडळी आत्ता जेवण करून उपवास सोडणार होती. कारण.. लेहमध्ये रात्री किती वाजता पोहोचू.? याचा काहीच अंदाज बांधता येत नव्हता. सगळी लोकं कामाला लागली, पीठ मळून झालं, भाज्या चिरून झाल्या, भात शिजायला ठेवला.
आपण समुद्रसपाटीपासून जितकं उंच जाऊ, त्याभागात भाज्या लवकर शिजत नाहीत. त्यामुळेच प्रेशर कुकरचा शोध लागला आहे. आणि नेमका या विषयाचा आम्हाला सुद्धा झटका बसला. आम्ही सोबत कुकर नेला नव्हता, भरपूर वेळ झाला, पण पातेल्यात शिजू घातलेले बटाटे काही शिजायलाचह तयार नाही. खूप वेळ झाल्यावर, वरणाची डाळ कशीबशी शिजली. शेवटी अर्धवट कच्च्या बटाट्याची भाजी, खरपूस पुरी आणि वरण भाताची मेजवानी आम्ही झोडली..
सकाळपासून कोणीच काहीच खाल्लं नसल्याने, सगळ्यांनी जेवणावर अडवा हात मारला.
बाहेर फिरायला गेल्यावर मी जास्ती जेवण करत नसतो. कारण मला पोटाचा फार त्रास आहे, जरा इकडे तिकडे झालं, कि मला पोटाचे त्रास सुरु होतात. त्यामुळे बाहेरगावी गेल्यावर, मी शक्य तितके उपवास करत असतो, म्हणजे पोटमारा करत असतो. कारण पोट बिघडलं कि ट्रीप बिघडली असं माझं गणित आहे. त्यामुळे मी फक्त दोन पुऱ्या भाजी आणि थोडा वरण भात खाल्ला. बाकी सगळेजन अगदी गच्च जेवले होते. आमच्या ड्रायव्हरने सुद्धा आठ पुऱ्या मटकावल्या होत्या. जेवणं आटोपली, काही लोकं मोकळ्या वातावरणात मोकळी होऊन आली. भांडी धुतली गेली, सगळी आवराआवर करून सगळं सामान गाडीमध्ये ठेऊन दिलं आणि आम्ही पुढील प्रवासाला निघालो.
आणि शेवटी व्हायचं तेच झालं, घाट माथ्याच्या रस्त्यावर हेलकावे खाल्ल्याने, आणि त्यात तेलकट आणि भरपेठ खाण्यामुळे, बसमधील एकेकाला मळमळ सुरु झाली. मग काय सांगायचं, दोन्ही बसमधील मिळून पंधरा एक लोकं उलट्या करून जाम झाले. एकाचं बघून दुसऱ्याला त्रास व्हायचा. दोन्ही गाड्यात हे चक्र सुरु होतं.
तरी सुद्धा आमच्या प्रवासात कसला खंड पडला नव्हता. ज्या नर्स मॅडमच्या भरवशावर आम्ही निर्धास्त होतो. त्या मॅडमच सुरवातीला भयंकर आजारी पडल्या. उलट्या करून त्यांच्या शरीरातील पाणी कमी झालं. आता वाटेत कुठे दवाखाना सुद्धा नव्हता. आमच्याकडे असणाऱ्या काही गोळ्या घेऊन त्यांनी तसाच प्रवास चालवला होता. पण त्यावेळी हा सगळा प्रकार पाहून मला एक गोष्ट समजली. कि जास्ती वयं झाल्यावर या ट्रीप काही कामाच्या नाहीत. आमच्या नर्स मॅडम सुद्धा पन्नाशी पार केलेल्या होत्या. त्यामुळे हे त्रास होणारच होते. रस्ता काही संपत नव्हता. त्या घाटातील भयंकर चढामुळे आमच्या गाड्यांचं टेम्प्रेचर सुद्धा भयंकर वाढत होतं. त्यामुळे जागोजागी थांबून आम्हाला रेडीयेटर मध्ये पाणी घालावं लागत होतं. त्यात नेमका आमच्या गाडीबरोबर क्लीनर नव्हता. त्यामुळे आता मलाच क्लीनर व्हावं लागलं होतं. गाडीला दगड लाव, पाणी आणून दे, हे सगळी कामं मलाच करावी लागत होती. ड्रायव्हरला सुद्धा काही बोलता येत नव्हतं, मला तर भयंकर राग आला होता, पण उगाच आपण काही बोललो, आणि रागारागाने गाडी चालवत याने अपघात केला तर काय करायचं.? त्यामुळे मी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत होतो. आणि, अगदी मारून मुटकून प्रवास करत होतो.
( जिस्पा व्हॅली ते लेह रस्ता कसा आहे, ते पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करून क्लिप नक्की पहा https://youtu.be/dfX_TuA8sco )
क्रमशः

Saturday, 1 September 2018


#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- ६ )
=====================
दीडशे किलोमीटरचा प्रवास संपवून रात्री नऊ वाजता आम्ही जीस्पा व्हॅली येथे पोहोचलो. बसच्या खाली उतरलो, आणि काय सांगू.. त्या भागात फारच भयानक थंडी होती. आमचा आजचा मुक्काम तंबूमध्ये होता. एका मोकळ्या मैदानात खूप अलिशान असे ते तंबू होते. प्रत्येक चार व्यक्तीकरिता एक तंबू दिला गेला होता. तंबूमध्ये खूप जाडसर ब्लॅंकेट होते, गाद्या सुद्धा फारच उबदार होत्या. जमिनीवर मऊशार मॅट अंथरल्या होत्या.
बाथरूम मध्ये इतकी भयंकर थंडी होती, कि पाण्यात हात सुद्धा घालू वाटत नव्हता. तर मग, हातपाय तोंड धुवायचे खूपच लांब राहिलं. मी हातपाय न धुवताच बाथरूमच्या बाहेर पडलो.
बराच उशीर झाला असल्याने, आमच्या महिला मंडळींनी जराही वेळ न दवडता, स्वयपाकाला सुरवात केली. अगदी काही वेळातच पिठलं भाकरी आणि भात बनवून झाला होता. तोवर आम्ही मंडळी, तिथे असणाऱ्या शेकोटीला शेकत बसलो. भयंकर थंडी होती, तिथे बाजूलाच फायर कॅम्पच्या शेजारी दोन पंजाबी नवविवाहित जोड्या ज्या इथे फिरायला आल्या होत्या. त्यांनी मस्तपैकी हंड्रेड पायपरचा खंबा बाहेर काढला. चौघांनी एक एक पटियाला पेग भरला. आणि चांगभलं केलं.. आणि संगीताच्या तालावर थिरकायला सुरवात केली.
हा सगळा साग्रसंगीत कार्यक्रम पाहून, इकडे माझी जिव्हा सुद्धा चाळवली होती. काय करावं.? मी गुपचूप जाऊन त्या हॉटेलमध्ये असणाऱ्या मॅनेजरला विचारणा केली. काही जुगाड होऊ शकतोय का.? तर तो सुद्धा नाही म्हणाला. म्हणाला.. इथून पुढे दहा किलोमीटर अंतरावर जीस्पा गाव आहे. तिथे जावं लागेल. आणि आम्ही इथे वाईन वगैरे ठेवत नसतो. शेवटी इच्छा असून सुद्धा मला गप्प बसावं लागलं. त्यामुळे या भागात जाताना छंदी फंदी व्यक्तींनी आपापली तजवीज करूनच प्रवासाला सुरवात करावी. अन्यथा तुमच्या पदरी फार मोठी निराशा पडू शकते.
मग मात्र जास्तीचा वेळ न दवडता, आम्ही जेवणाला सुरवात केली. इकडे सरदार कुटुंबीयांनी फक्त एका पेगवरच समाधान मानलं होतं. आणि काही वेळात ती मंडळी सुद्धा जेवायला निघून गेली. कारण, उद्या सकाळी त्यांना सुद्धा लेहला निघायचं होतं.
त्या भागात.. रात्री साडेआठच्या सुमारास अंधार पडतो. आणि सकाळी अगदी चार वाजता उजाडतं. आणि पहाटे पाच वाजता तर नाश्ता सुरू होतो.
उद्या आम्हाला.. जीस्पा ते लेह हा तीनशे वीस किलोमीटरचा टापू एका दिवसात पार करायचा होता. त्यामुळे आम्ही सगळे लवकर झोपी गेलो. जीस्पा मध्ये तंबू बाकी एक नंबर होते, अगदी मस्त उबदार बिछाना भलीमोठी जाडसर रजई आणि अंगभर घातलेले कपडे यामुळे अंथरुणावर पडताच कधी एकदा झोप लागली ते समजलं नाही.
या भागात भयंकर थंडी जरी असली, तरी सोलरचं भरमसाठ गरम पाणी अंघोळीसाठी उपलब्ध असतं. अंघोळी उरकल्या चहा तयारच होता, सर्वांनी चहा घेतला आणि सकाळी सहा वाजता पुन्हा एकदा आम्ही प्रवासाला तयार झालो.
आज सोमवारचा दिवस होता, आमच्यातील बऱ्याच व्यक्तींचा आज उपवास असल्याने, सकाळी नाश्ता करायच्या भानगडीत कोणी पडलं नाही. फक्त एक एक कप चहा पिऊन आम्ही पुढील प्रवासाला निघालो. रस्ते फारच कच्चे असल्याने फार झालं तर, तासाला तीसेक किलोमीटर अंतर कापलं जात होतं. त्यामुळे आजचा प्रवास पूर्ण व्हायला आम्हाला बारा ते पंधरा तास लागणार होते. अजूनही आम्ही हिमाचलच्या कुशीतच होतो. जेंव्हा लेह येईल, त्यावेळी आम्ही काश्मीर मध्ये पोहोचलो असं म्हणता येणार होतं.
प्रवासाला सुरवात झाली, उंचच उंच मातीचे डोंगर आणि त्यावर बर्फाची चंदेरी टोपी यांच्या सानिध्यात आमचा प्रवास सुरु होता. जीस्पा ते लेह हा प्रवास खूपच कंटाळवाणा होता. कारण या रस्त्यात, डोंगर आणि रस्त्याच्या कडेने वाहणारी नदी, वाटेमध्ये लागणारे मिलिटरी कॅम्प याशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. वाटेत कुठेही मोठी हॉटेल्स नाहीत, त्यामुळे खाण्याच्या वस्तू सोबत घ्याव्या लागतात. पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवाव्या लागतात. कारण त्याभागात डोंगरात पाण्याचे भरपूर स्त्रोत असतात. पण ते पाणी पचायला कठीण असतं. म्हणून ते पाणी मी कुठेहि प्यालो नाही. त्या वाटेमध्ये ना पेट्रोलपंप ना पंक्चरचं दुकान. त्यामुळे या भागात जात असताना, सगळी तजवीज करून जावं लागतं. चुकून काही गडबड झाली, तर तुमच्या ट्रिपचा फज्जा उडालाच म्हणून समजा. गाडीचे टायर्स आणि स्टेपनी व्यवस्थित पाहिजेत, डिझेलची टाकी फुल पाहिजे. प्रवासात इतर कसलाही त्रास होणार नाही. याची सगळी खबरदारी घेतली गेली पाहिजे. आम्ही निघालो तेंव्हा, बायकर्स मंडळीची सुद्धा येजा सुरु होती. बुलेटच्या पाठीमागे पाच पाच लिटर पेट्रोलचे केन लाऊन त्यांचा प्रवास चालू होता. काहीजण सिंगल तर काही डबलसीट प्रवास करत होते. जीवनाचा आनंद लुटत होते. आणि त्यांच्या सोबत आमचा प्रवास सुद्धा चालू होता.
क्रमशः



Friday, 31 August 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- ५ )
=====================
आजच्या प्रवासात आम्हाला मनाली ते जीस्पा हा एकशे पन्नास किलोमीटर अंतराचा टप्पा पार करायचा होता. खरं तर हा प्रवास सकाळी अगदी लवकर करावा लागतो. कारण या भागात ट्राफिक जामची भयंकर मोठी समस्या आहे. अरुंद रस्त्यात कधी एखादा अपघात होईल आणि ट्राफिक जाम होईल ते काही सांगता येत नसतं. ताशी वीस ते पंचवीस किलोमीटरच्या वेगाने या मार्गावर प्रवास होत असतो. आजचं एकुणात आठ नऊ तासांचं रनिंग होतं, त्यामुळे आमच्या ड्रायव्हर मंडळींनी वशिष्ठ ऋषी मंदिर न दाखवताच पुढे जाण्याचा चंग बांधला होता. पण मी त्यांना दोन गोष्टी समजावून सांगितल्या, आम्ही काही या भागात पुन्हा फिरायला येऊ शकणार नाही. त्यामुळे मूर्खपणा करू नका. सगळी ठिकाणं आम्हाला न चुकता दाखवा. तेंव्हा कुठे त्यांची आक्कल ठिकाणावर आली..
मनाली मार्गे आम्ही रोहतांग कडे कूच केली, फारच भयानक असा हा एकेरी रस्ता होता. गाडी थोडी अलीकडे आली, कि दरीतून खाली पडतेय कि काय असं व्हायचं. जीव अगदी घाबरून जायचा. या घाटात आम्ही साधारण वीसेक किलोमीटर अंतर कापलं असावं. आणि एका ठिकाणी आम्हाला छोटा ट्राफिक जाम लागला. आम्हाला वाटलं छोटा मोठा जाम असेल, होईल रस्ता क्लियर. पण कसलं काय.. खाली उतरून पाहतो तर, संपूर्ण घाटामध्ये मुंग्यांची रांग पसरावी, अशा गाड्या उभ्या होत्या. अगदी दूरवर मोठाले ट्रक सुद्धा खूप लहान लहान दिसत होते. आता बाकी पुढचा प्रवास कठीण जाणार होता. कारण, चौकशीअंती समजलं कि.. वरच्या बाजूला, डीझेल घेऊन जाणारा एक ट्रक पलटी झाला होता. रोहतांगच्या अवाढव्य पर्वत रांगामध्ये मला एका ठिकाणी बोगद्याचं काम चालू असताना दिसलं. या बोगद्याचं काम दोन हजार दहा साली सुरु झालं आहे. एकूण नऊ किलोमीटर अंतराचा हा टनल असणार आहे. हे काम सुद्धा, आपली भारतीय सेना ( बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ) मार्गी लावत आहे. हा बोगदा सुरु झाल्यावर, प्रवाशांचा फार मोठा वळसा वाचला जाईल. आणि लेहला जाण्यासाठीचं बरच अंतर कमी होईल. साधारण दोन हजार एकोणीस पर्यंत हा बोगदा प्रवासासाठी खुला केला जाईल.
या ट्राफिक जाममध्ये, आमचे दोन तास वाया गेले. दोन तासानंतर आम्ही पुन्हा एकदा घाट चढायला सुरवात केली. घाट चढत असताना, वरील बाजूने एक सरकारी बस येताना दिसली. जवळ आल्यावर पाहतो तर, ती पन्नास सीटर एसटी होती. आणि ती लेह वरून दिल्लीला निघाली होती. ती बस पाहून मी अक्षरशः तोंडात बोट घातलं. कारण.. त्या भागात, छोट्या गाडीने प्रवास करताना सुद्धा काळजाचा ठोका चुकत असतो. तर मग येवढ्या मोठ्या बसने कोण प्रवास करेल.? पण ती बस प्रवाशांनी अगदी खचाखच भरलेली होती. त्यात सगळे स्थानिक प्रवासी दिसून येत होते. ती बस लेहपासून निघाल्यावर किती मुक्काम करत आली होती. ते तिचं तिलाच माहिती. मी अगदी मनापासून त्या प्रवाशांना आणि ड्रायव्हरला अभिवादन केलं. खरच हो.. येवढ्या मोठ्या घाटातून एसटीने प्रवास करणं जोक नाहीये.
फारच कठीण असा हा रस्ता होता. इथे सुद्धा जागोजागी रस्त्याची कामं चालू असल्याने, आमची गाडी सुद्धा अगदी सावकाशपणे निघाली होती. हि सुद्धा माझ्यासाठी फार मोठी जमेची बाजू होती. दुपारी तीनच्या सुमारास आम्ही रोहतांगला पोहोचलो. तिथे हॉटेलमध्ये सर्वांनी थोडाफार नाश्ता केला. नाश्ता म्हणजे काय हो, इथे फक्त मेगी हा विषयच नाश्ता म्हणून योग्य आणि गरमागरम मिळत होता.
आज सकाळपासून आम्ही फक्त पन्नास किलोमीटर अंतर पार केलं होतं. अजून आम्हाला शंभर किलोमीटरचा टप्पा पार करायचा होता. यावेळी.. रोहतांग पासला औषधाला सुद्धा बर्फ शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे आमचा थोडा वेळ वाचला, नाहीतर बर्फात खेळायला आमचा एखादा तास तरी नक्कीच खर्ची पडला असता. रोहतांग पासला.. एका ठिकाण पेरा ग्लायडिंग सेंटर होतं. काही हौशी मंडळी, इथे.. पंख होती तो उड आती रे.. या गीतातील बोलाप्रमाणे हवेत झेपावून दर्या खोऱ्यात उडण्याचा आनंद घेत होते. दुरूनच हा नजरा पाहत, मी मेगीचे गरम घास मुखात घेत होतो.
रोहतांग पास केल्यावर.. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला चिखल मिश्रित बर्फ साचलेला होता. तिथे काही पर्यटक बर्फात खेळण्याचा आनंद लुटत होते. त्यांनंतर एक मोठा उतार उतरल्यावर, भयंकर असा खडकाळ रस्ता सुरु झाला. मुख्य डांबरी रस्ता वाहून गेल्याने, आणि अगदी मातीचा रस्ता असल्याने, भयंकर धूळ उडत होती. त्यात काही ठिकाणी चिखल मातीचा सडा पडला होता. मिलिटरीच्या ( BRO ) गाड्यांची सतत आवकजावक चालू होती. बुलेट वरून सफर करणारी मंडळी, एक दुसऱ्याला प्रोत्साहन देत पुढे कूच करत होते. या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट माझ्या लक्षात आली. कि.. लेह साठी मनाली मार्गे प्रवास करणाऱ्या गाड्या अगदी न च्या बरोबर होत्या. अगदी लेह पर्यंत पोहोचलो तोवर, मला जेमतेम सात ते आठ इनोव्हा आणि दोन तीन टेम्पो ट्रेव्हलर आढळल्या असतील.
रोहतांग ते जीस्पा हा रस्ता तसा मला फार सोपा वाटला. या भागात जास्तीचा घाटमाथा नव्हता. आजूबाजूला पाहायला फक्त अक्राळविक्राळ डोंगर होते. आणि डोंगरच्या टोकाला, बर्फाची टोपी घातलेले हिमशिखरे होती. बरच अंतर कापून झालं होतं, आता आम्ही लाहौल नावाच्या एक खेड्यात प्रवेश केला होता.
तांदीपूल नावाच्या गावात आमची गाडी चहापान आणि डीझेल भरण्यासाठी थांबली. आणि सोबतच.. तिथे असणाऱ्या एका दुकानात, आमच्या ड्रायव्हरने गाडीच्या स्टेपनीचा पंक्चर सुद्धा काढून घेतला. कारण दुसऱ्या दिवसाच्या प्रवासात, जीस्पा ते लेह हा तीनशे वीस किलोमीटरचा प्रवास आम्हाला करायचा होता. आणि या प्रवासात कुठेही पेट्रोलपंप किंवा इतर काही दुकानं नव्हती. तर.. त्या तांदिपूल गावामध्ये रस्त्याच्या कडेला एक नदी वाहत होती. थोडं पुढे जाऊन पाहिलं. तर तिथे दोन नद्यांचा संगम दिसत होता. दोन्ही नद्या अगदी गढूळ होत्या, आणि त्यांचा खळाळता वेगवान प्रवाह सुद्धा खूपच भयानक दिसत होता.
रात्रीचे आठ वाजले होते. पण पश्चिमेकडे झुकणारा सूर्य आसमंतात अजूनही डोकावत होता. एक कुतूहल म्हणून मी तेथील एका व्यक्तीला या कोणत्या नद्या आहेत असं विचारलं. तर तो व्यक्ती म्हणाला..
हा, चंद्र आणि भागा नदीचा संगम आहे..!
हे ऐकताच माझ्या नजरेसमोर आपल्या पंढरपुरातील चंद्रभागा दिसली. आणि हिच नदी आपल्याकडे आली असेल का.? हा भाबडा प्रश्न माझ्या मनात आला. पण ते काही शक्य नव्हतं. कारण आपल्या नदीचा उगम हा आपल्या भागातील आहे. मग हे नेमकं काय कनेक्शन असावं.? या विचाराने मी गोंधळून गेलो. त्या चंद्रभागेच्या संगमावर मी नतमस्तक झालो. मनोभावे त्या संगमाला नमस्कार केला. आणि पुढील प्रवासाला निघालो.!
क्रमशः

Thursday, 30 August 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- ४ )
=====================
जसजशी बस पुढे जात होती, तसतसं कुलू जवळ येऊ लागलं होतं. आणि माझं मन पुन्हा एकदा भूतकाळात जात होतं. मी खूप आठवायचा प्रयत्न करत होतो. पण माझा अपघात झालेलं ठिकाण माझ्या टापूत येत नव्हतं. कारण.. गेल्या दहा वर्षात तिथे आता बरेच बदल झाले आहेत. रस्ते भयंकर रुंद झाले आहेत. वाड्या वस्त्यांमध्ये सुद्धा एक वेगळच चैतन्य संचारलं आहे. मी ज्या इस्पितळात प्रथमोपचार घेतले होते, ते ओयासिस नावाचं इस्पितळ सुद्धा मला दिसलं नाही. शेवटी एका ठिकाणी माझं मन अगदी सैरभैर झालं. बहुतेक हे तेच ठिकाण असावं, असं मला जाणवून गेलं. आणि नकळत माझे दोन्ही हात जोडले गेले. अपघातानंतर याच दरीतून चालत मी वर आलो होतो. आणि त्यामुळेच आज मी जीवित होतो. कटू आठवणी सरता सरत नव्हत्या..
काही अंतर पुढे गेल्यार, एका ठिकाणी.. कसला तरी टोल भरायचा होता. त्यामुळे आमची गाडी बाजूला घेण्यात आली. तितक्यात काही गुलाबी गालाच्या ललना आमच्या बसपाशी आल्या, त्यांच्या डोक्यावर एक छोटीशी टोपली होती. त्यात विविध प्रकारची फळं त्यांनी विक्रीसाठी आणली होती. त्यात.. चेरी, आलू बुखारा आणि इतर बर्याच स्थानिक फळांचा भरणा होता. तीस रुपयात प्रत्येकी एक, अशी सगळी फळं मी खरेदी केली. सगळ्या बसभर ती फळं आम्ही वाटून खाल्ली. आणि काही वेळातच, आम्ही मनाली मध्ये येऊन पोहोचलो.
सकाळचे साडेअकरा वाजले होते, मनालीत आम्हाला मिळालेला लॉज, खूपच आडवळणी आणि आतील बाजूस होता. आम्ही लॉजवर गेलो, तिथे सगळे जन आपापल्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाले. आता आम्हाला पुढील तयारीला लागायचं होतं. पुढील तयारी म्हणजे जेवण. आम्ही लॉजमध्ये अशा प्रकारची बुकिंग करून घेतली होती. कि तिथे गेल्यावर, त्यांच्या किचनमध्ये आम्ही आमचं जेवण बनवून घ्यायचो. आणि जिथे आम्हाला पुरेसा वेळ मिळणार नव्हता. अशा काही ठिकाणी लॉजमध्ये जेवणाची सोय करून घेतली होती.
आम्ही स्वतः जेवण बनवण्यामागे दोन कारणं होती. एकतर हॉटेलमध्ये जेवण्याचा खर्च फार वाढतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, बाहेरच्या प्रवासात, आपलं घरगुती जेवण असल्यावर आपली पोटं बिघडत नाहीत. त्यामुळे इथून जातानाच.. स्वयपाक करण्यासाठी तीन छोट्या शेगड्या, प्रत्येकी दोन किलो ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ, पत्रावळी आणि स्टीलच्या वाट्या, आणि त्यासोबत.. डाळी, तेल, साखर, मीठ, मिरची, पोहे, रवा, बेसन, शेवया. दुध पावडर अशी जय्यत तयारी करून आम्ही गेलो होतो. फक्त ज्या भागात जाऊ, तिथे.. कांदा, वांगी, बटाटा, कोथंबीर, कडीपत्ता किंवा अन्य काही भाज्या खरेदी करायच्या. आणि आपल्या कामाला लागायचं. आमच्या सोबत असणाऱ्या महिला मंडळी, खूपच सुगरणी होत्या. अगदी तासाभरात, त्या सगळा स्वयपाक करून मोकळ्या व्हायच्या.
आजच्या जेवणात.. बटाट्याची रस्सा भाजी, ज्वारीची भाकरी, जीरा राईस, लोणचं. शेंगदाणा चटणी असा जंगी बेत होता. भुकेच्या तडाख्यात सर्वांनी भाजी भाकरीवर यथेच्छ ताव मारला.
जेवणं उरकली.. आणि दोनचार तास आराम करण्यासाठी सगळे जन आपापल्या रुममध्ये निघून गेले. दुपारी चार वाजता, सगळे जन बसमध्ये येऊन बसले. आणि आम्ही, मनाली फिरायला गेलो. सर्वप्रथम.. आम्ही हिडींबा देवीच्या मंदिराला भेट दिली. हिडिंबा मंदिर, हे मनाली मधील ग्रामस्थांच्या आस्थेचा विषय होता. घनदाट वृक्षराजीमध्ये हिडिंबा देवीचं देखणं मंदिर पर्यटकांना आकर्षित करत होतं. त्याठिकाणी आम्ही मनोभावे माथा टेकला.
त्यानंतर तिथे शेजारीच असणाऱ्या घटत्कोच मंदिराला भेट दिली. घटत्कोच हा भीम आणि हिंडीबा यांचा पुत्र, हे मंदिर अगदी उघड्यावर आहे. एका मोठ्या झाडाखाली, या मंदिराची स्थापना केली आहे. प्रथेप्रमाणे तिथे चाकू, त्रिशूळ आणि याक प्राण्याचे शिंग देवाला अर्पण केलेले दिसून येत होते. हा परिसर फिरून झाल्यावर, क्लब हाऊस मध्ये आम्ही थोडी खरेदी केली. खरं तर इथे खरेदी करण्यात काहीच अर्थ नाही. कारण सगळी खरेदी इथे फारच महाग आहे. पण स्थानिक व्यवसायिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी, खिशाला थोडी झळ नक्की लाऊन घ्यावी. मनाली हे ठिकाण अगदी एका दिवसात फिरून होण्यासारखं आहे. पण खरं पाहायला गेलं तर, हा एक पक्का हनिमून स्पॉट आहे. त्यामुळे, इथे नवविवाहित जोड्या भरपूर प्रमाणात दिसून येतात.
क्लब हाऊस जवळच असणार्या मनु मंदिराला आम्ही भेट दिली. मनु मंदिरात जाण्यासाठी एक किलोमीटर अंतराची खडी पायपीट करावी लागते. मनुस्मृतीचे जनक असणारे, मनु ऋषी यांचं हे मंदिर आहे. उंच पहाडावर असणारं हे लाकडी मंदिर फारच आकर्षक आहे.
हे सगळं देवदर्शन उरकून घेतल्यावर, तेथील स्थानिक भाजी मंडई मध्ये भाजी खरेदी केली. तिथे मला एक नवीनच लाल रंगाचा बटाटा पाहायला मिळाला. हा सगळा कार्यक्रम आटोपल्यावर, आम्ही लॉजवर आलो. रात्रीच्या जेवणासाठी महिलांनी बटाटा घालून मसालेभात बनवला. रात्री नऊ वाजता आमची जेवणं उरकली. आणि दहा वाजता सगळं काही चिडीचूप झालं. उद्या सकाळी आम्हाला, मनाली मधील वशिष्ठ ऋषी यांचं मंदिर, श्रीराम मंदिर आणि गरम पाण्याचं कुंड पाहून पुढे रोहतांग मार्गे जीस्पा व्हेली कडे कूच करायची होती. उद्या सकाळी आम्ही मनालीला रामराम करणार होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी, सगळी अवराआवार करून आम्ही वशिष्ठ ऋषी आश्रमाकडे गेलो. तिथे बाजूलाच श्रीरामाचं सुद्धा पुरातन मंदिर आहे. वशिष्ठ ऋषी हे प्रभू श्रीरामाचे गुरु होत. भक्तिभावाने त्या दोन्ही मंदिरात सगळे नतमस्तक झालो.
वशिष्ठ ऋषी आश्रमाच्या परिसरात एक गरम पाण्याचं फार मोठं कुंड आहे. तिथे महिला आणि पुरुषांना वेगवेगळ्या ठिकाणी अंघोळीची व्यवस्था केली आहे. या पाण्यात अंघोळ केल्याने समस्त त्वचारोग दूर होतात. असं त्याठिकाणी आम्हाला ऐकायला मिळालं. मग काय, हाती आलेली हि अमुल्य संधी कोण दवडणार. काही हौशी मंडळींनी गरम पाण्याच्या कुंडामध्ये आपली हाडं शेकून घेतली. मनाली सारख्या थंड वातावरणात गरम पाण्याची अंघोळ एक वेगळाच आनंद देऊन जाते. अंघोळ झाल्यावर, मनोभावे वशिष्ठ ऋषी आणि श्रीरामाच्या मंदिरात माथा टेकवला. जास्ती वेळ न दवडता.. त्या ठिकाणाहून आम्ही बरोबर दहा वाजता बाहेर पडलो. आणि रोहतांगच्या रस्त्याला लागलो.
क्रमशः


Wednesday, 29 August 2018

#मनाली_लेह_लदाख_टू_अमरनाथ ( भाग :- ३ )
=====================
जेवणं उरकली.. रात्रीचे अकरा वाजले होते. आमच्या पुढील प्रवासाला सुरवात होणार होती. मला प्रवास करण्याचा खूप कंटाळा आला होता. कारण माझं एक तत्व आहे, रात्र हि झोपण्या करिता आहे, प्रवास करण्यासाठी नाही. पण काय करता, नाईलाज.. प्रवास हा करावाच लागणार होता. सगळीकडे किर्रर्र अंधार दाटून आला होता. जिकडे पहावं तिकडे धुक्याचे लोट दिसत होते. धाब्याच्या मागील बाजूस, मोर ओरड्ल्याचे म्याव-म्याव असे आवाज ऐकू येत होते.
एक-एक करून आमच्या बस मधील सगळे प्रवासी बसमध्ये बसले. मी सुद्धा माझ्या बायकोच्या शेजारील सीटवर जाऊन बसलो. बसमध्ये खूपच आल्हाददायक वातवरण निर्माण झालं होतं.
आमच्यातील एक हौशी व्यक्ती, ड्रायव्हरच्या शेजारील क्लीनर सीटवर जाऊन बसला. प्रवासाला सुरवात झाली. गुरबचन ड्रायव्हर खूप रंगात आला होता. सुरवातीचा रस्ता अगदी मस्त आणि चौपदरी होता. गाडी हायवेला लागली, गार वारा अंगाला झोंबू लागला. तसा ड्रायव्हर शेजारी बसलेला व्यक्ती उबदार वातावरण निर्माण करून डुलक्या द्यायला लागला. तसा तो ड्रायव्हर त्याच्यावर खेकसला, आणि म्हणाला.. इधर सोनेका नही है..! त्यापेक्षा तुम्ही मागे जाऊन बसा..! तो बिचारा गपगुमान मागे येऊन बसला. आता मात्र पुढील सीटवर बसायला कोणीच तयार नव्हता.
आता.. झक मारत मला त्या सीटवर जाऊन बसावं लागणार होतं. कारण, इथून पुढे सगळा घाट माथ्याचा रस्ता होता. आणि चुकून, ड्रायव्हरने डुलकी मारली तर काय करायचं.? शेवटी तो सुद्धा माणूस आहे. म्हणून त्या सीटवर मी बसलो, आणि उगाच काहीतरी बोलायचं म्हणून, कोणताही विषय काढून ड्रायव्हरला जागता ठेवला.
काही वेळातच.. गाडीतील सगळी मंडळी घोरायला लागली. मला सुद्धा खूप झोप आली होती. पण माझ्या डोळ्याला डोळा लागणार नव्हता. कारण.. दहा वर्षापूर्वी याच घाटामध्ये माझ्या बसला फार मोठा अपघात झाला होता. त्यात माझे चार कर्मचारी मित्र जागेवर गतप्राण झाले होते. माझं नशीब बलवत्तर म्हणून, मी त्या अपघातातून सहीसलामत बचावलो होतो. त्यामुळे मला सतर्क राहणं फार जरुरी होतं.
चंडीगड ते मनाली किंवा दिल्ली ते मनाली.. हा सगळा प्रवास बहुतेक रात्रीच करत असतात. असं मला तिथे समजून आलं. कारण.. इतक्या रात्री सुद्धा रोडवर भयंकर ट्राफिक होतं. त्यात लग्झरी बसचा भरपूर भरणा होता. आलिशान मर्सिडीज लग्झऱ्या हळुवार हेलकावे खात घाटातून मार्गक्रमण करत होत्या. दमले भागलेले मालवाहतूक करणारे काही ट्रक, रस्त्यावर जागोजागी जिथे चांगली जागा मिळेल तिथे विसावले होते. सगळा आसमंत झोपी गेला होता. पण, आमचा प्रवास काही थांबणार नव्हता. ठरलेल्या आराखड्या प्रमाणे आम्हाला एक-एक टप्पा पार करावा लागणार होता.
दहा वर्षापूवी कुलू मनाली मार्गावरील मी जो रस्ता पाहिला होता, त्यात आणि आजच्या रस्त्यात मला भयंकर तफावत आढळून आली. आताचा रस्ता फारच मस्त केला आहे. काही अवघड ठिकाणी, जिथे काहीच करता येऊ शकणार नाही. तिथे फारच धोकादायक वळणं आहेत. पण नाही म्हणता, पूर्वीसारखी परिस्थिती नाहीये. त्यामुळे माझ्या मनावरचा ताण काहीसा कमी झाला होता. पुन्हा एकदा मी मागे वळून पाहिलं, सगळे प्रवासी गाढ झोपी गेले होते. आणि, रात्रभर मला एकट्याला जागावं लागणार होतं.
पहाटे दोन वाजता.. आमच्या ड्रायव्हरला थोडा आळस आल्याने, एका ढाब्यावर चहा पिण्यासाठी आमची गाडी थांबली. गाडीतील काही लोकं लघुशंका करून आले, तोवर चहा पिऊन ड्रायव्हर पुन्हा एकदा ताजातवाना झाला होता. हलकेच त्याने खिशातील विडी बंडल बाहेर काढला. त्यातील एक विडी शिलगावली, आणि तो धुराचे लोट हवेत सोडू लागला. आसमंतात धुक्याचे थर दाटून आले होते. बसवर धुक्याचे थेंब अलगद ओघळत होते. सगळे प्रवासी पुन्हा एकदा आपापल्या सीटवर जाऊन बसले, अंगात उब निर्माण व्हावी म्हणून, प्रत्येकाने.. स्वेटर कानटोप्या परिधान केल्या होत्या. काहींनी तर, आपल्या अंगाभोवती ब्लेंकेट गुंडाळून घेतली होती. एकंदरीत सगळं काही अगदी ठीकठाक आणि उबदार होतं. आणि, आमच्या गाडीने पुन्हा एकदा स्टार्टर मारला..
उत्तरेतील तो भाग म्हणजे.. सरळ रस्ता असा नाहीच, सगळा घाटच घाट. सगळा रस्ता भरधाव वेगाने वाहत होता. एखादी गाडी, मधेच कर्णकर्कश हॉर्न वाजवून वातावरणातील शांतता भंग करीत होती. तर कुठे.. ब्रेक मारल्याच्या कचकचीत आवाज काळजाचा ठोका वाढवून जात होता. मोठमोठ्या हायफाय लग्झरी बसेस, आमच्या मिनीबसला अगदी यु ओव्हरटेक करून पुढे जात होत्या. एवढ्या अरुंद घाटातून एकदम सफाईदारपणे ती ड्रायव्हर मंडळी गाड्या हाकत होते. मला त्यांचं खूपच कौतुक वाटत होतं.
शेवटी-शेवटी माझ्या डोळ्यावर सुद्धा फार ताण येऊ लागला. शेवटी, मी माझ्या मेहुण्याला पुढे बोलवून घेतलं. त्याची बऱ्यापैकी झोप झाली होती. आणि.. शेवटी पहाटे पाच वाजता, माझ्या डोळ्याला सुद्धा आराम मिळाला. अगदी काही क्षणात मी झोपेच्या अधीन झालो.
काहीवेळाने अचानक मला जाग आली. एका ठिकाणी आमची गाडी थांबली होती. सकाळचे सात वाजले होते. दोन तासात माझी हवी तेवढी झोप झाली होती. चहा पिऊन ड्रायव्हर विडी पीत बसला होता. पण त्याच्या डोळ्यावर, मला झोप अशी काही दिसत नव्हती. जागरणाचा कमालीचा स्टॅमिना आहे त्या लोकांचा. तीसेक किलोमीटर अंतरावर कुलू गाव होतं. गाडीतील सर्व व्यक्तींनी मुखमार्जन करून चहापान उरकला. आणि पुन्हा एकदा आम्ही कुलू मनालीच्या दिशेने कूच केलं.
क्रमशः

मोबाईल गेला.. दुखः करत बसण्यात काहीच अर्थ नव्हता. रेल्वे थांबवण्यासाठी चेन ओढायची आठवण सुद्धा झाली नाही. डोकं काम करेना झालं होतं. रेल्वेगाडी सुद्धा खूप दूर निघून गेली होती. चोरट्याने अगदी हेरून काम केलं होतं.
त्यामुळे तुम्हा सर्वांना माझं एक सांगणं आहे.
रेल्वेत प्रवास करताना.. चार्जिंग करण्यासाठी मोबाईल त्या डेस्कटॉपवर कधीही ठेऊ नका. खिडकीपाशी तिथेच खाली पायापाशी एखादी बॅग वगैरे ठेऊन त्यावर मोबाईल ठेवा. जेणेकरून तो कोणाच्या नजरेस पडणार नाही. आणखीन एक गोष्ट, दूरच्या प्रवासातल्या गाड्या, काही मोजक्या स्टेशनवर थांबत नाहीत. पण काही संभाव्य स्टेशनवर त्या थोड्या हळू होतात. आणि मग त्या वेळात, काही रोजचे प्रवासी त्यातून खाली उतरत असतात. हे सवयीमुळे काहींना शक्य झालेलं असतं. पण नेमकं याच वेळी, आपण प्रवाशांनी सावध असणं फार जरुरी असतं. अशावेळी.. चोर लोकं खूप सतर्क असतात. नेमकी हि संधी साधत, ते आपली बॅग वगैरे घेऊन रेल्वेतून पोबारा करू शकतात. त्यामुळे सतर्क राहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरत नाही.
संध्याकाळी सात वाजता.. आमची गाडी चंडीगड रेल्वेस्थानकावर पोहोचली. आम्ही सगळं सामान गाडीच्या खाली उतरवून घेतलं. या सफरीत आम्ही एकूण सव्वीस लोकं होतो. सिरीयल टिकत न मिळाल्याने सगळे वेगवेगळ्या बोगीत बसले असल्याने. सर्वप्रथम आम्ही सगळे रेल्वे स्थानकावर एकत्र जमा झालो. आणि स्थानकाच्या बाहेरील बाजूस गेलो. जिथे आमच्या मिनी बसेस ( टेम्पो ट्रॅव्हलर ) पुढील प्रवासासाठी आमची वाट पाहत उभ्या होत्या.
पुढील प्रवासासाठी आमचं जे काही पॅकेज ठरलं होतं. त्याचं देण्याघेण्याचं काम माझे मेहुणे करणार होते. त्यामुळे मी, पोलीस चौकीत मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी गेलो. तिथे असणाऱ्या पोलीसाला सगळी हकीकत सांगितली. तर तो पोलीस तक्रार नोंदवून घ्यायला आढेवेढे घ्यायला लागला. म्हणाला.. मोबाईल सापडल्यावर तुम्हाला दिल्लीत यावं लागेल. तीन चार चकरा माराव्या लागतील. तुम्हाला हे जमणार आहे का.? एक तर मोबाईल गेल्यामुळे मी त्रस्त झालो होतो. त्यात पोलिसाची हि नवीनच बकबक. मी सरळ त्या पोलिसाला म्हणालो.. मला मोबाईल वगैरे परत नको आहे. फक्त त्या चोराने माझ्या मोबाईलचा काही दुरुपयोग करू नये. ही काळजी घेण्यासाठी मी तक्रार नोंदवत आहे. तेंव्हा त्या पोलिसाला सुद्धा बरं वाटलं. आणि त्याने माझ्याकडून असं लिहून घेतलं. कि.. दिल्ली स्टेशन गेल्यावर, मी माझा मोबाईल गाडीमध्ये शोधत होतो. पण तो काही मला मिळाला नाही. माझा मोबाईल रेल्वेमध्ये गहाळ झाला आहे. संपला विषय, मोबाईल चोराला लखलाभ झाला होता. आणि मला सतरा हजाराला घोडा लागला होता.
तक्रार देऊन बाहेर आलो, मिनी बसवर आमचं सामान लादायचं काम चालू होतं. एकूण तेरा-तेरा लोकं आम्ही दोन बसमध्ये विभागलो गेलो. मिनीबस दिसायला अगदी खटाखट होत्या. पण पुढे प्रवास करताना त्या नेमक्या कशा आहेत. ते समजून येणार होतं. आमचं पॅकेज बुकिंग करणाऱ्या व्यक्तीने आमच्याकडून ठरलेली सगळी रक्कम घेतली होती. पुढील सगळा प्रवास हा फक्त भरवसा या विषयावर होणार होता. तसं प्रवासात सहसा कोणी फसवत नसतं. तरी सुद्धा जर तर हे विषय आपला सतत पिच्छा पुरवत असतातच.
गणपती बाप्पा मोरया.. आमच्या पुढील प्रवासाला सुरवात झाली होती. रात्रीचे नऊ वाजले होते. चंडीगड ते मनाली,, हा तीनशे किलोमीटरचा सगळा प्रवास आम्हाला एका रात्रीत करायचा होता. मी स्वतः ड्रायव्हर आहे, तरी सुद्धा मी रात्री प्रवास करणं टाळत असतो. पण आता काही पर्याय नव्हता. देवावर हवाला ठेऊन आम्ही प्रवासाला सुरवात केली.
थोड्यावेळाने माझी बायको म्हणाली.. सीटच्या बाजूचा पत्रा खूप तापला आहे. आणि आतमध्ये धूर सुद्धा येत होता. मी स्वतः चेक करून पाहिलं, तर हाताला अगदी चटका बसत होता. गाडीने आपले प्रताप दाखवायला सुरवात केली होती. या व्यवसायिक मंडळींना फक्त पैसा हवा असतो. बाकी..गाडीच्या डागडुजीसाठी यांना बिलकुल वेळ नसतो. हि गोष्ट मी ताबडतोब त्या ड्रायव्हरच्या निदर्शनास आणून दिली. तो म्हणाला.. पुढे एका ढाब्यावर आपण जेवायला थांबणार आहोत. तिथे पाहूयात, काही गडबड असेल तर मी लगेच काम करून घेतो.
गाडी जेंव्हा थांबली, तेंव्हा पाहिलं तर, गाडीचा सायलेंसर.. बस बॉडीच्या पत्र्याच्या आतील बाजूस आला होता. आणि त्यामुळे, इंजिनमधून बाहेर पडणार गरम धूर गाडीच्या पत्र्यावर आतील बाजूस आडत होता. त्यामुळे गाडीचा पत्रा गरम होत होता. आणि गाडीमध्ये धूर सुद्धा येत होता. हे आमच्या वेळीच ध्यानात आलं म्हणून बरं. नाहीतर, पुढे काहीही घडू शकलं असतं. कदाचित आमच्या बसने पेट सुद्धा घेतला असता. पण आमचं नशीब बलवत्तर म्हणून हे सगळं काही वेळीच समजून आलं. काही वेळात, हा प्रोब्लेम सॉल झाला. आणि निश्चिंत मनाने ढाब्यावरील जेवणाचा आम्ही आनंद लुटला.
क्रमशः