Thursday, 9 July 2015

अमरनाथ यात्रेची पूर्वतयारी

प्रत्येक भाविकाने, आवर्जून करावी अशी हि यात्रा आहे. अमरनाथला गेल्यावर 'अमर' ह्या शब्दाचा खर्याने अर्थ कळतो.
ह्यावर्षी, अमरनाथ यात्रेचं पंजीकरण १ मार्च २०१४ ला सुरु झालं आहे. आणि, यात्रा दिनांक २ जुलैला ( आज ) सुरु होणार आहे. आणि, रक्षाबंधन या दिवशी यात्रेची सांगता होते.
हि यात्रा, म्हणावी इतकी सोपी नाहीये. प्रत्येक यात्रेकरूला, ह्या प्रवासाची माहिती असेलच असं नाही. किमान, थोडीफार माहिती जरी मिळाली, तरी भरपूर होतं.
जीवनाचं खरंखुरं सार या यात्रेमध्ये दडलेलं आहे. आणि, इथे मी देत असलेली माहिती प्रत्येक यात्रेकरूला खूप उपयोगी पडेल. याची, मला मनोमन खात्री आहे. हा संदेश, दूरपर्यंत पोहोचावा.
त्याकरिता, हा लेख प्रपंच...
भूकेको अन्न प्यासेको पाणी, जय हो बाबा बर्फानी..
-------------------------------------------------------------
१ ) प्रथम रेल्वेचं आरक्षण करून घ्यावं. त्यानंतर, जम्मू काश्मीर ब्यांक किंवा पंजाब नेशनल ब्यांक इथे जाऊन आपला रजीष्ट्रेशन ( पंजीकरण ) फोम घेऊन यावा. एकाच कागदावर चार ओळख पत्र असलेला हिरवा, नीळा, पिवळा, लाल, रंगाचा छापील पास मिळतो. आपण दर्शनाला जो वार आणि तारीख ठरवतो. त्यानुसार त्या कागदाचे रंग ठरलेले असतात.
त्यानंतर, पुण्यातील ससून किंवा औंध येथील उरो रुग्णालयातून आपलं वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावं. तिथे तुमच्या शरीराच्या संपूर्ण चाचण्या, तपासण्या केल्या जातात. आणि, तुम्ही यात्रेला जाण्यास पात्र असाल. तरच तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं जातं. अन्यथा, दिलं जात नाही. हे सोपस्कार पार पडल्याशिवाय, पुढील कोणत्याच गोष्टी होत नाहीत.
मिळालेलं वैद्यकीय प्रमाणपत्र ( फिट सर्टिफिकेट ) सदर बेंकेमध्ये जमा करावं. आणि, आपल्याल्या मिळालेल्या ओळख पत्रावर ( पास ) फोटो चिकटवून त्यावर ब्यांकेतील सदर अधिकार्याची स्वाक्षरी घ्यावी. ( ह्या प्रक्रियेलाच 'पंजीकरण' असं म्हणतात )
हे सोपस्कार पार पाडल्याशिवाय, तुम्हाला यात्रेला जाण्याची अनुमती मिळत नाही. इथून निघतानाच, तुमचं रेल्वे आरक्षण आणि तुम्ही तिथे कधी पोहोचताय याचा ठोकताळा अवश्य करा. तुमच्या ओळख पत्रावर असणार्या ठराविक तारखेलाच तुम्हाला यात्रेला सोडलं जातं. अन्यथा, ती तारीख येयीपर्यंत आपणाला पहेलगाम मधेच थांबावं लागतं.
( उदा. तुम्ही १, तारखेला पुण्यावरून निघताय, तिसर्या दिवशी ( ३, तारीख ) तुम्ही जम्मू मध्ये पोहोचणार. चौथ्या दिवशी ( ४, तारीख ) तुम्ही जम्मूहून पहेलगाम कडे मार्गस्थ होणार. आणि पाचव्या दिवशी ( ५ तारीख ) तुम्ही प्रत्यक्ष यात्रेला निघणार. तुम्हाला, या पाचव्या दिवसाच्या तारखेच पंजीकरण करून घ्यावं लागतं. हे गणित व्यवस्थित लक्षात ठेवा.
त्यामुळे तुमची धावपळ होणार नाही.
२ ) पुणे ते जम्मूतावी एक्स्प्रेस संध्याकाळी ५:२० मिनिटांनी पुण्यावरून रवाना होते. ते तिसर्या दिवशी सकाळी दहा ते बारा वाजता. जम्मूला पोहोचते.
३ ) जम्मू स्टेशन पासून, यात्रेकरूंनी भगवती यात्री निवास येथे टेम्पो किंवा बस ने जावं. ह्या तीन चार किमीच्या प्रवासाला साधारण पंचवीस रुपये खर्च येतो.
४ ) भगवती यात्री निवासा लगतच, एका मुंबईतील भाविकाने सुरु केलेल्या लंगर (भंडारा) मध्ये जेवण आणि अंघोळ उरकून पुढील तयारीला लागावे. यात्रेमध्ये, कोणीही छोटा, मोठा नसतो. तिथे सगळे एकसमान असतात. त्यामुळे, आपल्या राहणीमानात थोडा बदल करून मोकळं वागण्याचा प्रयत्न करावा. जेवणासाठी हॉटेल शोधत बसनं हा वेळकाढू आणि खर्चिक प्रकार आहे. कारण, तेथील जेवण हे सरसोच्या तेलात बनवलं जातं. आणि आपणाला ते आवडत नाही. त्यामुळे, पूर्ण यात्रेदरम्यान लंगर मधेच जेवावं. त्यामुळे, जेवणाचा बराच खर्च वाचतो.
५ ) भगवती यात्री निवासा लगतच, सैनिक दलाचं इस्पितळ आणि प्रथमउपचार केंद्र असतं. तब्बेतीचं, काही कमी जास्ती असल्यास. तिथे, त्या शंखेचं निवारण करून पुढील तयारीला लागावे. ती भारत सरकारची मोफत सेवा आहे.
६ ) भगवती यात्री निवास येथे, सरकारी रूम ( हॉल ) भाड्याने मिळतात. किंवा, तिथे असलेल्या मोकळ्या मैदानात उघड्यावर आपण आपल्या पथार्या मांडू शकतो. पण कधी-कधी, अवेळीचा पाऊस आपली तारांबळ उडवू शकतो. त्यामुळे, शक्यतो रूम कशी मिळेल ते पहावं. महत्वाचं म्हणजे, झोप व्हायला हवी.
तत्पूर्वी, जम्मू ते पहेलगाम पर्यंत जाण्याकरिता मिनी बसचं आरक्षण करून घ्यावं. त्याची सोय, भगवती यात्री निवास येथेच केलेली आहे. ( मोठ्या बस करिता ३७५/- रुपये व मिनी बस करिता ५२०/- रुपये प्रत्येकी. असे, मागील दोन वर्षांपूर्वी भाडे होते. ) कारण, त्या ठिकाणावरून पहाटे ३:३० मिनिटांनी पहेलगामला जाण्याकरिता बस निघतात. म्हणजे, पहाटे आपण आपली बस शोधायची. त्यात जाऊन बसायचं. आणि, निवांत झोपायचं. साधारण पहाटे पाचला, सैनिकी बंदोबस्तात यात्रेला सुरवात होते.
७ ) प्रवासा दरम्यान, आपणाला कोणताच खर्च करावा लागत नाही. जागोजागी जेवणाचे लंगर असतात. त्याच बरोबर आपल्या आवडत्या मोबाईलला चार्ज करण्याची सोय सुद्धा भाविकांनी करून ठेवलेली असते. सकाळी जम्मू वरून निघालेली बस. वेड्या वाकड्या दरीमधील रस्ते पार करत-करत, लंगरवर थांबत सायंकाळी सहा, सात वाजेपर्यंत पहेलगामला पोहोचते.
प्रवासाचं जास्ती वर्णन करत नाही. तुम्ही प्रत्यक्षच त्याचा रोमांचित अनुभव घ्या.
८ ) पहेलगाम मध्ये पोहोचल्यावर, मिलेट्री पोस्ट् किंवा प्रायवेट लॉजची व्यवस्था आहे.
समजा :- तुम्ही, आज पहेलगामला पोहोचलात. आणि, तुमच्या दर्शनाची उद्याची तारीख असेल. तरच, तुम्हाला मिलेट्री पोस्ट् मध्ये मुक्काम करायला मिळतो. त्यामुळे, दर्शनाची तारीख पाहूनच जम्मू वरून पहेलगाम कडे कूच करा. मिलेट्री पोस्ट् मध्ये, राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असते. प्रत्येकी तीनशे रुपये याप्रमाणे एका व्यक्तीला तंबूचा खर्च आकारला जातो. खाजगी लोज मध्ये राहण्यासाठी रुपये १२००/- ते १५००/- मध्ये ( फ़क्त चार जनांसाठी ) लॉज उपलब्ध असतात.
९ ) पहेलगाम येथून, पहाटे चार वाजताच यात्रेकरिता निघावं लागतं. त्यामुळे, आपल्याला अवश्य असणारं सगळं सामान आदल्या दिवशीच ब्याग मध्ये व्यवस्थित भरून ठेवावं. अशाने, सकाळी निघताना गोंधळ होत नाही. पहेलगाम ते चंदनवाडी, हे साधारण अठरा किमीचं अंतर आहे. चंदनवाडीला जाण्यासाठी पहेलगाम वरून सुमो असतात. दोन वर्षांपूर्वी, प्रत्येकी पन्नास रुपयामध्ये आपणाला चंदनवाडी येथे पोहोचवलं जात होतं. किंवा, मिलेट्री पोस्ट् मध्ये राहणाऱ्या यात्रेकरुसाठी मिलेट्रीच्या गाड्यांची मोफत व्यवस्था केलेली असते.
१० ) चंदनवाडीला पोहोचल्यानंतर, लंगर मध्ये थोडा अल्पोपहार उरकावा. यात्रा, तुम्ही पायी करणार असाल. तर, पायी यात्रेला सुरवात करावी. आणि, घोड्यावरून जाणार असाल तर घोडा ठरवून घ्यावा. चंदनवाडी ते पवित्र गुफा हे पस्तीस किमीचं अंतर आहे. जाऊन येऊन सत्तर किमी होतं. एका घोड्याचा सरकारी दर ( दोन वर्षांपूर्वी ) ६५००/- रुपये ( जाऊन, येऊन ) आहे. पण घासाघीस करून २५००/- ३०००/- ३५००/- पर्यंत घोडा मिळून जातो. हे सगळं, तेथे असणार्या गर्दीवर अवलंबून असतं.
११ ) यात्रेला निघताना सोबत, एक जोडी कपडे, स्वेटर, स्कार्फ, टोपी, रेनकोट, कानटोपी, गरम हातमोजे, पायमोजे, सनग्लास, सनस्क्रीम, आवश्यक औषधं गोळ्या, मूव सारख्या पेनकिलर क्रीम, सुकामेवा, विजेरी..इत्यादी वस्तू सोबत असाव्यात.
( तेथील वातावरणाची चौकशी करून एखादं ब्ल्यान्केट सोबत ठेवा. तशी खास आवश्यकता पडत नाही. त्याकरिता, चौकशी महत्वाची. नाहीतर पाठीवरील ओझ्यात विनाकारण वाढ होते. )
आपली यात्रा, आनंदमयी होवो. हीच, भोले चरणी प्रार्थना.. 

No comments:

Post a Comment