Thursday, 9 July 2015

अमरनाथ यात्रा, २०१३ (प्रवास वर्णन) भाग :- तीन.

यात्रेची सुरवातच, कैलास खेर यांच सुप्रसिध्द गीत.... "बमलहेरी" या शिवगीताने झाली. त्या गीतामध्ये मला एक प्रकारची उर्जाच जाणवली. ते गीत ऐकून, माझं संपूर्ण शरीर रोमांचित झालं होतं. 'बम भोले' म्हणत, आम्ही सुद्धा त्या भक्तिमय वातावरणात एकरूप झालो. 
समोरच.. शिवभक्तांनी लंगरच्या ( भंडारा ) भल्या मोठ्या रांगा लावल्या होत्या. ते शिवभक्त, सर्व यात्रेकरूंना विनम्रपने आणि आग्रहाने चहा नाश्त्याचं आमंत्रण देत होते. एवढं आदरतिथ्य पाहून, मला तर अगदी थक्क व्हायला झालं. कारण, ते सर्व शिवभक्त अगदी 'विनामूल्य' सेवा देत होते. लंगरमध्ये बर्याच गोडधोड पदार्थांची रेलचेल होती. त्याच बरोबर, राजमा-भात, भाजी-चपाती असं भरपेट जेवण सुद्धा होतं. आम्हाला पायी प्रवास करायचा होता. आणि, रिकाम्या पोटी प्रवास करू नये. म्हणून, आम्ही थोडी-थोडी दुधाची खीर चाखली. सर्व शिवभक्तांचे, मनोमन आभार मानले. आणि, पुढे निघालो. वाटेमध्ये, पायी प्रवास करणाऱ्या भाविकांना, उर्जा मिळावी म्हणून' चोकलेट, गोळ्या, फ्रुटी, सुकामेवा असे बरेच जिन्नस वाटण्यात येत होते. अन्नदान करणाऱ्या भाविकांच कौतुक करावं इतकं कमीच. थोडीफार चोकलेट्स, गोळ्या व सुकामेवा खिशामध्ये कोंबला. आणि, आम्ही पुढे निघालो.
यात्रेसाठी घोड्यावरून प्रवास करण्यास इच्छुक असणाऱ्या यात्रेकरूंची, तिथे असणाऱ्या घोड्यांच्या मालकाशी देण्याघेण्या वरून घासघीस चालू होती. आणि, जमेल त्या दरामध्ये घोडा ठरवून जो तो पुढे कूच करत होता. घोड्यांचे मालक, आमच्या मागे पुढे येऊन घोडा घेण्यासाठी आम्हाला विनंत्या करत होते. परंतु पायी जायचं खूळ माझ्या डोक्यामध्ये घर करून बसलं होतं. त्यामुळे, मी व माझे चार सहकारी त्या घोडे मालकांपासून कशीबशी सुटका करून घेत पुढे निघालो. बरोबर सकाळी नऊ वाजता, आमच्या पायी प्रवासाला सुरवात झाली.
पहिलीच चढाई, अगदी कठीण अशी होती. त्या टप्प्याच नाव "पिस्सू" टॉप.. चंदनवाडी पासून, साधारण पाच किलोमिटर अंतरावर असणारं हे ठिकाण. अत्यंत अवघड चढण, समुद्रसपाटी पासून साधारण ११५०० फुट उंच असलेल हे ठिकाण. येथे, ऑक्सिजनची खूप कमतरता जाणवते. समोर उभा ठाकलेला पिस्सू टॉप पाहून, माझ्या अंगात कापरंच भरलं. पूर्णपने खडतर' आणि, नागमोडी वळणाचा छातीवर येणारा रस्ता. पिस्सू टॉपचा, असला भयंकर चढ पाहून, आईचं दुध आठवणे, गोट्या कपाळात जाने, अशी साधर्म्य असणारी बरीचशी वाक्य माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेली. एक तर, अवघड चढाई. आणि, खोल दरी.... चुकून, कोणी खाली पडलाच तर ..!

एकच शब्द आठवतो, "भयंकर", हो-हो अगदी भयंकर.
मनाची पूर्ण तयारी केली. आणि, प्रत्यक्ष चालायला सुरवात केली. घोड्यावरील यात्रेकरू आणि पायी चालत जाणारे यात्रेकरू या दोहोंसाठी एकच मार्ग असल्यामुळे, पायवाट तुडुंब भरली होती. त्यात, आम्हा पायी चालणाऱ्या व्यक्तींचे खूप हाल व्हायचे. कधी घोडे सरळ आमच्या अंगावर यायचे. तर, कधी घोड्याकडे पाहता-पाहता दगडी पायऱ्या वरून धडपडायला व्हायचं. फारच कठीण आणि खडतर रस्ता. चढाई करत असताना, अक्षरशः घोडे सुद्धा टराटर पादत आणि हागत सुद्धा होते. तिथे पायी चालणाऱ्या माणसाची काय अवस्था होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. चालून-चालून माझं अंग गरम झालं. थंडी कुठच्या कुठे पळून गेली होती. सुर्यनारायणाने भयंकर चटके द्यायला सुरवात केली. पुन्हा एकदा लहरी वातावरणाचा फटका बसला. अंगातून, घामाच्या धारा व्हाऊ लागल्या. एक-एक करून अंगावरील सगळी गरम वस्त्र, काढली. आणि, पाठीवरील ब्यागेमध्ये ठेवली. आता, माझ्या पाठीवरील ओझं वाढलं होतं.
पाठीवरील ओझ्याची हमाली करण्यासाठी पीट्टू ( हमाल ) आमची मनधरणी करू लागले. त्यांना... नाही, नको म्हणून जीव अगदी मेटाकुटीला आला होता. शेवटी, मी त्यांना दोन्ही हात जोडले. तेंव्हा कुठे त्यांनी आमचा पिच्छा सोडला. दमत का होईना, पण प्रवास चालू होता. वाटेमध्ये जागोजागी फौजी भाई तैनात असायचे. त्यांना जयहिंद ठोकत आम्ही पुढे निघायचो. चालून-चालून घसा कोरडा पडायचा, तेंव्हा' तोंडामध्ये एखादी गोळी टाक' काजू, मनुका, किंवा बदाम चघळ असं करत आमचा प्रवास चालू होता. चालून-चालून खूप धाप लागत होती. छातीमध्ये हलक्याशा कळा जाणवत होत्या. मनाची, थोडी चलबिचल झाली होती. परंतु, मी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. शेवटी, एका मित्राने हार मानली. आणि, आम्हाला सोडून घोडा ठरवून तोही पुढे चालता झाला. आतापर्यंत, पहिल्या टप्प्याच जेमतेम निम्मच अंतर कापलं गेलं होतं...!
शेजारून घोड्यांची आवक-जावक चालूच होती. त्यांच्या टापांचा खडखडाट तो होणारा खडबडीत आवाज खूप छान वाटायचा. घोड्यावरून जाणारी माणसं रुबाबात प्रवास करत होते. परंतु, आपण घोड्यावरून खाली पडू कि काय ? अशी भीतीची झलक, त्यांच्या चेहेर्यावर सुद्धा स्पष्ट जाणवत होती. निम्म्या प्रवासातच माझ्या पायाचं पक्क भजन झालं होतं. अजून, बराच लांबचा पल्ला गाठायचा होता. एकदा बसलं, कि पुन्हा उठता येणार नाही. म्हणून, हळू-हळू का होईना माझं चालनं चालूच होत. मजल दरमजल करत पुढे जात असताना. पुन्हा, एका सुरेल अशा शिवगीताची धून कानावर येऊन धडकली. आणि, पिस्सू टॉप संपत आल्याची चाहूल आम्हाला लागली. शेवटचा टप्पा सपाटीचा होता. तो, भराभर सर करीत आम्ही पिस्सू टॉप येथील लंगर पर्यंत पोहोचलो. तब्बल दीड तासामध्ये आम्ही हे अंतर कापलं होतं. आणि, दमलेल्या, थकलेल्या अवस्थेत एकदाचं' आमचं बुड, आम्ही जमिनीला टेकवलं. तेंव्हा कुठे, जरा हायसं वाटलं.

क्रमशः 

No comments:

Post a Comment