Saturday, 24 September 2016

मी.. मोटार सारथी,
का, कसा आणि कोणामुळे घडलो..!
माझ्या उमेदीच्या काळात, माझा नुकताच प्रेमविवाह पार पडला होता. मला, पैसे कमवायची तर बिलकुल आक्कल नव्हती. आणि, त्यात मी तर लग्न करून मोकळा झालो होतो.
त्या प्रतिकूल परिस्थिती मध्ये माझं लग्न लावणारा आणि माझा सर्वेसर्वा असणारा. माझा मित्र, फारूक आणि आमची सगळी मित्रावळ माझ्या पाठीशी धावून आली होती.
ह्या सर्व मित्रांच्या कृपेमुळे, माझं लग्न तर व्यवस्थित पार पडलं. पण, आता पुढे करायचं काय..? कारण, त्यावेळी एस.वाय.बी.ए. ह्या अर्धवट असणाऱ्या डिग्री शिवाय. माझ्या हातात दुसरं काही सुद्धा नव्हतं. आणि, मनमानीने केलेल्या लग्नामुळे आमच्या घरात सुद्धा मला बिलकुल किंमत नव्हती.
त्यावेळी, माझा मित्र Faruk Inamdar ( जो आज.. पिंपरी चिंचवड शहर, राष्ट्रवादी कॉंग्रेस सेल अल्पसंख्याक गटाचा अध्यक्ष आहे.) तो माझ्या मदतीला धावून आला. तसं पाहायला गेलं तर, तो नेहेमीच माझ्या मदतीला धावून येत असतो. पण, त्या हुल्लड वयात त्याची मला कमालीची साथ लाभली. नाही म्हणता, माझ्या ह्या मित्राने, आईने मुलाला बोटाने धरून चालवायला शिकवावं. त्या उक्तीप्रमाणे, याने.. आमच्या चौकातील जवळ-जवळ प्रत्येक मुलाला ड्रायव्हर हा ट्रेड मोफत देऊन टाकला होता. ओघाने, त्यात मि सुद्धा आलोच.
वासरात लंगडी गाय शहाणी, ह्या म्हणीप्रमाणे. आमच्या चौकात, त्यावेळी जास्तीचा शिकलेला मीच काय तो एकटा होतो. त्यामुळे, माझ्या मित्रांना वाटायचं. कि पुढे चालून, हा शिकून काहीतरी मोठा व्यक्ती वगैरे होईल. पण कसलं काय..
त्याकाळी, पोटा पाण्याच्या प्रश्नामुळे, एम.आय.डी.सी. मधील एका प्लेटिंग वर्कशॉप मध्ये पंधराशे रुपये महिना पगारावर मी नोकरी करत होतो. एकाचे दोन हात झाल्यावर, मला काही तो पगार पुरवठी येत नव्हता. आणि नेमकं त्याच सुमारास. माझ्या ह्या फारूक नावाच्या मित्राला, टाटा कंपनीच्या सुमो गाड्या पुण्याहून नागपूरला नेऊन सोडवायचं कंत्राट मिळालं..
मी ड्रायव्हर होण्या अगोदर, माझे बरेच मित्र.. हि, ड्रायव्हिंग नामक कला शिकून मोकळे झाले होते. आणि, पुणे नागपूर वाऱ्या करून, हि मंडळी चिक्कार पैसा सुद्धा कमवत होते.
लग्न झाल्यावर, अनंत अडचणींना तोंड देता-देता मी पुरता खचून गेलो होतो. नव्या नवरीला, मी कुठे फिरवायला नेऊ शकत नव्हतो. ना कोणती हौस मौज करता येत होती. त्यामुळे, निव्वळ ह्या पैश्याच्या " हव्यासापायी " मी ड्रायव्हर होणं कबुल केलं. अन्यथा, हा माझा पिंड नाही, आणि नव्हता. पण, हे सगळं काही विधिलिखित होतं.
आता तर ह्या ड्रायव्हिंग क्षेत्रात माझी नव्याने सुरवात होणार होती.
अगदी ABCD पासून..
ड्रायव्हिंग कशी करतात..? किंवा, हा नेमका काय विषय आहे..? त्याची मला बिलकुल जानकारी नव्हती. आणि, ह्या पैश्याच्या मोहापाई एके दिवशी मी माझ्या मित्राला म्हणालो..
" महाराज " मला ड्रायव्हिंग शिकायची आहे..! ( माझा, फारूक नामक जो मित्र आहे. त्याला प्रेमाने मी महाराज असं म्हणतो. )
माझ्या तोंडून निघालेलं हे वाक्य ऐकताच. तो मला म्हणाला.. पंडित हे तुझं काम नाहीये रे. तू कॉलेज शिकलेला माणूस आहेस. तू काहीतरी नवीन शिक, हे फार अवघड काम आहे. आणि, लग्न झालेल्या माणसाने तर हे काम मुळीच शिकू नये आणि करू सुद्धा नये.
मी त्याचं सगळं काही ऐकून घेतलं. आणि माझाच हेका मी पुढे लावला. माझ्या मित्र हट्टापुढे, तो सुद्धा हतबल झाला. आणि, मला ड्रायव्हिंग शिकवण्याचं त्याने कबुल केलं.
रोज वेळ मिळेल तसा, तो मला ड्रायव्हिंगचे धडे देत होता. तब्बल महिनाभरात मला थोडी बऱ्यापैकी ड्रायव्हिंग जमू लागली. तब्बल एक महिना, बिनकामाचा घरात बसून काढल्यामुळे. माझ्या खिशात बिलकुल पैसा नसायचा. घरात फुकटच्या भाकरी तोडायच्या, आणि मित्रांबरोबर गाडी शिकायला जायचं. हा माझा महिन्याभराचा नित्यक्रम झाला होता.
एका महिन्यानंतर, फारूकने माझ्या हातामध्ये दोनशे रुपये टेकवले. आणि, नागपूरला सुमो घेऊन निघालेल्या तांगडे नावाच्या एका मित्राला ( ड्रायव्हरला ) सांगितलं. ह्याला सुद्धा थोडी गाडी चालवायला दे, हायवेवर ह्याचा सुद्धा जरा हात साफ होऊन जाईल. त्या मित्राने, नागपूरच्या प्रवासादरम्यान मला बरीच गाडी चालवायला दिली. आणि माझं मनोबल वाढवलं.
त्यावेळी, एक फार मोठी गंमत घडली होती. नगरच्या अलीकडे सुपा नावाचं एक गाव आहे. एक तर मी नवीन खेळाडू, आणि रोडवरील बाजारात भली मोठी गर्दी पाहून मी घाबरलो. आणि, माझा गाडीवरील ताबा सुटला. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दोनचार लोकांना मी उडवणारच होतो. तितक्यात, माझं मीच स्वतःला सावरलं. आणि, त्या अपघातातून सहीसलामत बचावलो. पण, गाडीमध्ये बसलेली लोकं घाबरली ना.. म्हणायला लागली.. हा ड्रायव्हर नवीन आहे का..? का आमचा जीव घ्यायला उठलाय राव..? त्यावेळी, माझ्या सोबत असणाऱ्या त्या ड्रायव्हर मित्राने वेळ मारून नेली.
कि.. हा गडी शहरात गाडी चालवतो. हायवेवर हा जरा नवीन आहे. आणि कसा तरी, मी त्या मोठ्या अपघातातून सावरलो गेलो. आणि लोकांची सुद्धा मनधरणी करण्यात आम्ही यशस्वी झालो.
नागपूर-पुणे दरम्यानच्या तीन दिवसाच्या प्रवासात. माझा.. चहा, नाश्ता आणि जेवण यासाठी मला घेऊन निघालेला मित्रच सर्व खर्च करायचा. आणि फारुकने दिलेल्या त्या दोनशे रुपयामध्ये, माझ्या परतीच्या प्रवासाचं भाडं निघून जायचं.
नागपूर पुणे लग्झरी प्रवासाला, त्यावेळी पाचशे ते सातशे रुपये भाडं असायचं. पण, त्या प्रवासीवाहू बसचे ड्रायव्हर लोकं आमच्या ओळखीचे झाले असल्याने. ते आम्हाला दोनशे रुपयामध्ये गाडीच्या केबिनमध्ये बसवून आणायचे. रात्रभर त्या केबिनमध्ये बसल्या जागी झोपून प्रवास करावा लागायचा. चुकून एखादी रिकामी सिट असेल. तर कधी कधी निवांतपणे प्रवास व्हायचा. तर कधी कधी दोन्ही सिट मधील जी पायवाट असते. तिथे रात्री बारा वाजल्या नंतर झोपून प्रवास करावा लागायचा.
एकदा, बाबू नावाच्या मित्राबरोबर मला ड्रायव्हिंग शिकण्यासाठी नागपूरला पाठवलं गेलं होतं. हा म्हणजे एक नंबर अवली मित्र, त्याने अगदी सुवातीपासूनच सुमो माझ्या हातात दिली. आणि तो माझ्या शेजारी बसून मला ड्रायव्हिंगचे धडे देऊ लागला. मी गाडी चालवत असताना. माझ्यासमोरच, एक सायकलस्वार निघाला होता. याने मला ऑर्डर सोडली..
हॉर्नचा आवाज दे त्याला..
मी, एकदा हॉर्न वाजवला. तर हा म्हणाला, अरे दोनचार वेळा वाजव. तो हरामखोर तसा ऐकत नसतोय. मी सुद्धा तसच केलं. तरीसुद्धा, तो सायकलवाला काही मला साईड देईना. शेवटी, कशीबशी मला थोडीशी जागा मिळाली. तर याने लगेच ऑर्डर सोडली.
आपली गाडी त्या सायकलच्या शेजारी घे. मी आमची सुमो, त्या सायकलवाल्या व्यक्ती शेजारी घेतली. आणि मी त्याला पास करणार इतक्यात तो म्हणाला, आता गाडी एकदम डावीकडे मार. त्याच्या आदेशाप्रमाणे मी अगदी तसच केलं. पण कसलं काय, मी डावीकडे गाडी मारल्या बरोबर ते सायकल वालं दचकून रोडच्या खाली खड्यात पडलं. आणि मोठमोठ्याने बोंबलत शिवीगाळ करू लागलं. जसा तो सायकलवाला खाली पडला, तसं याने मला फर्मान सोडलं.
आता जोरात गाडी पळव. आपण कोणाला सापडलो नाही पाहिजे..!
असे.. एकसे बढकर एक गुरु मला त्याकाळी मिळाले होते. ह्या बाबू नावाच्या व्यक्तीबरोबर गाडी चालवून मी भलताच तरबेज झालो होतो. असच एकदा.. संपूर्ण प्रवासात, त्याने माझ्याकडे गाडी दिली होती. रात्र झाली, अंधार पडू लागला. आणि, अगदी गडद काळोख पसरला. रस्त्याला लाईट म्हणून नसायची. मी जालना सोडून पुढे निघालो होतो. आमच्या गाडीमध्ये दहा प्रवाशी होते. रात्रीची गाडी चालवायची माझी हि पहिलीच वेळ होती. मी गाडीच्या हेडलाईट सुरु केल्या. आणि चाळीसच्या स्पीडने माझी गाडी मार्गक्रमण करत पुढे निघाली होती.
आणि, बाबूने मला फर्मान सोडलं, गाडीची लाईट बंद कर..! नाही म्हणायची सोय नव्हती. मी लाईट बंद करून पुढे निघालो. खरं तर, मी खूप घाबरलो होतो. आणि, पाठीमागे बसलेले लोकं तर माझ्यापेक्षा सुद्धा जास्ती घाबरले होते. शेवटी धाडस करून त्या प्रवाशातील एक व्यक्ती म्हणाला. लाईट बंद करून कशाला गाडी चालवताय राव.? अशाने अपघात व्हायचा. त्यावर, हा बाबू त्या व्यक्तीला म्हणाला.. तुम्ही गप बसा हो. हा नवीन गाडी शिकतोय, म्हणून मी त्याला गाडी चालवायचे नवनवीन धडे शिकवतोय.
ड्रायव्हर शिकाऊ आहे, हे ऐकल्यावर तर तो गडी बेशुद्ध पडायचाच बाकी राहिला होता. तितक्यात मी स्वतःच गाडीची हेडलाईट सुरु केली. तेंव्हा, त्या प्रवाशापेक्षा जास्ती माझाच जीव भांड्यात पडला होता.
त्यानंतर, दोनेक महिन्यात मात्र मी पक्का मोटार सारथी झालो होतो. आणि, लगेचच मी एकट्याने पुणे नागपूरच्या फेऱ्या करू लागलो. पुणे नागपूरच्या प्रत्येक खेपेला हजार पंधराशे रुपये घरी यायचे. महिन्यातून चार पाच वेळा नागपूरला जाणं व्हायचं. त्यामुळे, बराच पैसा माझ्या हातात येत होता. आणि त्यामुळे, घरात बायकोचा सासुरवास सुद्धा कमी झाला होता. पण हे काम म्हणजे काही स्थैर्य नव्हतं. कधी-कधी पुण्यावरून निघालो कि थेट नागपूर पर्यंत मी सतत गाडी चालवत गेलो आहे. तर कधी अकोल्याच्या बस स्टेन्डवर रात्रभर पेसेंजर लोकांची वाट पाहून थकून तिथेच झोपी जायचो. तर कधी, नागपूरच्या गाडगेबाबा बायपासला गाडी लाऊन बायको मुलाच्या आठवणीने या दुक्खी कष्टी जीवनावर ढसाढसा रडलो सुद्धा आहे.
खरच, खूप कष्टदायी जीवन होतं ते. पण नशीब बलवत्तर होतं, म्हणून. या प्रवासादरम्यान माझा कधी अपघात झाला नाही. आणि, कष्टाचं फळ म्हणून. मला पुणे महानगर पालिकेची हि नोकरी सुद्धा मला मिळाली. आणि, बघता, बघता..
अंधकारमय जीवनातून, माझ्या सोनेरी तेजोमय जीवन प्रवासाला नव्याने सुरवात झाली..
परवा..माझ्या मित्रासोबत घडलेला एक धमाल किस्सा.
माझा मित्र, ओला केब मध्ये कामाला आहे. त्यादिवशी, तो शनिवार वाड्यापासून पिंपळे सौदागर या भागात वर्दी घेऊन निघाला होता.
मंगला सिनेमाच्या पुढे असणाऱ्या सिग्नलवर, हा पास होता-होता अचानकपणे पिवळा दिवा लागला. आणि, लगेच लाल दिवा सुद्धा लागला. हा बहुल गर्दीचा भाग असल्याने, त्याला पुढे काही जाता आलं नाही. त्यात, मुंबई मध्ये घडलेल्या प्रकारामुळे पांढऱ्या पोलिसांच्या मदतीला खाकी पोलीस सुद्धा दिले आहेत. त्यामुळे, माझ्या मित्राने कोणताही प्रतिकार न करता त्याची गाडी बाजूला घेतली.
त्याची सगळी बाजू त्याने विस्तृतपणे मांडली. पण, पांढरा पोलीस नव्या दमाचा तरुण पोलीस होता. त्याने, तत्काळ माझ्या मित्राला पोलीस खात्यातील दंडाचं " नवीन मेनूकार्ड " आणि " जुनं मेनूकार्ड " दाखवलं. त्यात, सिग्नल तोडला..
या दंड पदार्थाला, जुना रेट १०० रुपये तर नवा रेट २०० रुपये होता.
माझ्या मित्राने, कोणतेही आढेवेढे न घेता त्यांना पावती करायला सांगितली.
तर.. त्याच्या अगोदर, त्या ठिकाणी नो एन्ट्री मधून आलेल्या दोन 'शामळू' मुलांना सुद्धा त्याच पोलिसाने पकडलं होतं. तर.. हि पावती करता-करता तो पोलीस त्या मुलांना म्हणाला.
बघा... हे भाऊ सुद्धा पावती करत आहेत. आता तुम्ही सुद्धा दोनशे रुपयाची पावती करा..!
दोनशे रुपये हा आकडा ऐकल्यावर ती मुलं जागची उडालीच. आणि म्हणायला लागली, एवढे पैसे कुठे असतात होय..?
त्यावर.. माझा मित्र त्या मुलांना म्हणाला..
तुम्ही पुण्यात नवीन आहात का..? ही लोकं वाक म्हणले कि आपण वाकायचं, कधीही जास्ती बोलायचं नाही. खाली वाकून पावती करत असणारा तो तरुण पोलीस हे सगळं काही ऐकत होता.
तर, माझा मित्र पुढे म्हणाला..
हे बघा मुलांनो.. सुरवातीला शंभर रुपये पावती होती. त्याचा अर्थ असा असायचा, कि हे पोलीस लोकं आपल्याला हागस्तोवर मारणार. आणि, आता दोनशेची पावती म्हणजे..
ते आपल्याला हागस्तोवर मारणारच मारणार त्याचे शंभर रुपये. आणि, का हागला..? म्हणून, त्याचे वेगळे शंभर रुपये. अशा प्रकारची हि नवीन दंड आकारणी असते.
माझ्या मित्राचं हे हास्यस्पद वक्तव्य ऐकून, तो पोलीस मित्र सुद्धा खूप खळखळून हसला. तो पोलीस इतका पोट धरून हसत होता, कि हसताना त्याच्या हातातील पावती पुस्तक सुद्धा खाली पडलं. आणि, सोबत ती दोन्ही मुलं सुद्धा खूप हसत होते. नंतर त्या दोन्ही मुलांनी सुद्धा दंडाची पावती केली. आणि म्हणाले, काका आमचा पैसा वसूल झाला. आता दंड भरायला आमची काहीच हरकत नाही.
पण.. तो पोलीस मित्र प्रामाणिकपणे माझ्या मित्राला म्हणाला..
हि दोन मुलं नसती ना..
तर, मी तुम्हाला फुकट सोडून दिलं असतं. कमालीचा जोक केला राव तुम्ही.
आणि, हास्य विनोदाच्या गडबडीत तो पोलीस मित्र चक्क पावतीवर दंडाची रक्कमच लिहायला विसरला.
प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या मनामध्ये..
उभ्या हयातीत, भारतातील किंवा जगभरातील मोठमोठ्या धामांची यात्रा करण्याची सुप्त इच्छा दडलेली असते. काही व्यक्ती या इच्छांना मूर्त रूप देण्यात सफल होत असतात. तर काही व्यक्ती त्यात अपयशी सुद्धा ठरत असतात. हा सगळा नशिबाचा भाग झाला. शेवटी काय आहे,
" मानला तर देव, नाहीतर माळावरचा दगड "
मी सुद्धा आजवर, अशी बरीच धार्मिक भटकंती केली आहे. आणि, अजूनही करत आहे.
त्यापैकी तिरुपती बालाजी हे माझं आराध्यदैवत आहे..!
त्यामुळे, वर्षातून किमान एकदा आणि जमल्यास दोन तीन वेळा तरी मी बालाजी भेटीला जात असतो. साधारण सतरा वर्षांपूर्वी, पहिल्यांदा मी तिरुपती बालाजीला गेलो. आणि, तेंव्हापासून त्या धार्मिक स्थळाचा मी निस्सीम भक्त झालो. ते आजवर कायम आहे.
पुणे ते रेणीगुंठा ( तिरुपती ) किंवा तुमच्या इच्छित स्थळावरून हा रेल्वेप्रवास किंवा विमानप्रवास पार पडल्यानंतर. तिथून पुढे बसचा प्रवास करत, सप्तगिरी पर्वत पार करत आपण तिरुमला या धार्मिक स्थळी येऊन पोहोचतो. बस प्रवासाने, माझ्या अशा कित्तेक वाऱ्या झाल्या होत्या.
परंतु, त्यानंतर तीनेक वर्षात मला असं समजलं.
कि, रेणीगुंठा ते अलीपिरी हा साधारण आठ दहा किमीचा टप्पा बसने पार केल्यानंतर. तिथून पुढे तिरुमला पर्यंत पायी यात्रा करण्याची फार छान सोय त्या देवस्थानाने केली आहे. आणि एक आवड म्हणून, मी साधारण बारा तेरा वर्षांपासून हि पायी यात्रा करत आहे.
अलीपिरी ते तिरुमला या टप्प्याचं पायी अंतर साधारण नऊ किमी आहे. छातीवर येणाऱ्या, साडेतीन हजार पायऱ्या आणि काही सरळसोट मार्ग असा खडतर, तरीही आल्हाददायक असा हा धार्मिक प्रवास आहे. आपण, या पायी मार्गाने अगदी रमतगमत जरी गेलो, तरी साधारण पाचेक तासात आपण तिरुमला येथे जाऊन पोहोचतो. तसं पाहायला गेलं तर, पायी मार्ग हा खडतर असतोच. पण तिथे टप्प्या टप्प्याला असणारी.. स्वच्छतागृह, अल्पोपहार गृह, अभयारण्य आणि सोबतच भाविकांच्या भल्यामोठ्या लवाजम्यासह आपला पायी प्रवास अगदी सुकर होऊन जातो.
परंतु गतवर्षी, तिरुमला येथे जाण्यासाठी दोन वेगवेगळे पायी मार्ग आहेत. याची मला माहिती मिळाली, आणि गतवर्षी पासून, मी या दुसऱ्या मार्गाने पायी यात्रा करत आहे.
रेणीगुंठा ते श्रीनिवास मंगापुरम..
हे एकूण, पंचवीस किमीचं अंतर आहे. रेणीगुंठा वरून श्रीनिवास मंगापुरम येथे जाण्यासाठी. आपण, सुमो, जीप अथवा सहा आसनी रिक्षा वगैरे करू शकतो. प्रत्येक व्यक्तीला, साधारण सत्तर ते शंभर रुपयामध्ये श्रीनिवास मंगापुरम येथे पोहोचता येतं. पण त्याकरिता, तुमच्याकडे किमान पाच सात लोकांचा ग्रुप तरी हवाच. नाहीतर, एकट्या व्यक्तीकरिता तिथे जाण्यास चार पाचशे रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे.
श्रीनिवास मंगापुरम येथे, श्री बालाजी आणि पद्मावती देवीचा विवाह पार पडला होता. अशी आख्यायिका आहे. तर, श्रीनिवास मंगापुरम येथे तीरुमालाच्या धरतीवरच अगदी हुबेहूब असं बालाजीचं पुरातन मंदिर बनवलं गेलं आहे. तिरुमला येथे, भाविकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने. श्रीनिवास मंगापुरम येथील मूर्ती आणि तिचं मनमोकळं दर्शन भाविकांना फारच समाधान देऊन जातं.
दर्शन आटोपल्यावर, तिथून पुढे साधारण पाचेक किमी अंतरावर सप्तगिरी पर्वताचा पश्चिमेकडील भाग लागतो. आणि तिथूनच आपल्या पायी यात्रेला सुरवात होते.
डोंगर पायथ्याला, आपल्याकडे असणारं अवजड सामान देवस्थानाच्या वाहतूक विभागाकडे सुपूर्त करायचं. ते सामान अगीद मोफत आणि नीटनेटक्या पद्धतीने तिरुमला येथे पोहोचवलं जातं. त्यामुळे पायी चालताना अतिरिक्त बोजा सोबत घेऊन जाण्याची आपल्याला गरज भासत नाही.
एकूण दोन हजार तीनशे आठ्याऐंशी पायऱ्या, आणि साधारण तीन साडेतीन किमी अंतर असणारी हि यात्रा फार कठीणही म्हणता येणार नाही. किंवा अगदी सोप्पी सुद्धा म्हणता येणार नाही.
या पायी मार्गावर सुद्धा स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. परंतु, अलीपिरी मार्गाप्रमाणे या रस्त्यावर मोठमोठी भोजनालयं नाहीत. या मार्गाचं खास वैशिष्ट्य म्हणजे, ज्या भाविकांच्या मनात, नवस रूपाने अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पायी जाण्याचा संकल्प केला जातो. त्या भाविकांसाठी हा रस्ता कमालीचा सोप्पा आहे. अवघ्या एक ते दीड किंवा जास्तीत जास्त दोन तासात आपण तीरुमलाच्या डोंगर माथ्यावर असतो. हा पायी प्रवास करणाऱ्या प्रत्येक भाविकाला वाटेमध्ये एक कुपन दिलं जातं. ते कुपन " दिव्यदर्शन " म्हणून असतं. या कुपनच्या सहाय्याने आपणाला आपल्या आहे त्या पेहेरावात आणि एका वेगळ्या जलद मार्गाने बालाजी दर्शनासाठी सोडलं जातं. अन्यथा, दर्शनासाठी पारंपारिक वेश केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.
तर.. असा नवीन संकल्प करणाऱ्या भाविकांना. किंवा, काहीतरी नवीन मार्ग शोधणाऱ्या भाविकांसाठी हा पायी मार्ग म्हणजे एक सुंदर अनुभूती आहे.
प्रत्येक घरातील महिलेला रोजचा पडलेला प्रश्न म्हणजे..
आजच्या जेवणात नेमकं काय काय बनवायचं, आणि मुख्य म्हणजे भाजी कोणती बनवायची..?
कारण.. भाजीशिवाय सगळं जेवण अधुरं असतं.
मराठी भाषेत, भाजीला सुद्धा बरीच मस्त-मस्त नावं आहेत. कालवन, कोरड्यास, शाक भाजी.. अजून काही नवीन नावं असतील तर अवश्य कळवा..!
सुरवातीला.. माझ्या बायकोने मला " भाजी " या विषयावर अगदी भंडावून सोडलं होतं.
त्यामुळे.. माझ्या आवडीप्रमाणे,
सोमवार ते रविवार पर्यंत, आपल्या घरात रोजच्या जेवणामध्ये कोणता मेनू असेल. मुख्य म्हणजे कोणती भाजी असेल. त्याचं एक वेळापत्रक मी तिला बनवून दिलं. आणि, ते आम्ही आमच्या किचनमध्ये लाऊन ठेवलं आहे.
गेल्या महिन्यात, माझे आणि माझ्या सौचे श्रावणाचे उपवास चालू असल्याने. घरात असणाऱ्या त्या वेळापत्रकाचा काहीच उपयोग होत नव्हता.
कारण, माझ्या मेनूकार्ड मध्ये जास्ती करून नॉनव्हेज पदार्थाचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे.
या गोष्टीचा लाभ उठवत, श्रावण महिना चालू असताना. माझ्या बायकोने मला फार म्हणजे फार पीडलं.
आज स्वयपाक काय करू..?
हा प्रश्न ऐकला, कि मी फार चिडचिडा व्हायचो.
कारण, शाकाहारी जेवण म्हंटल. कि त्यात सतराशे साठ पदार्थ आले. वरण, भात, भाजी, चपाती एखादा गोड पदार्थ.
त्यामुळे, मी सुद्धा या रोजच्या प्रश्नाने पुरता गारद झालो होतो.
काय करावं..?
बायकोला नामोहरम कसं करावं. याचा मी विचार करत होतो. आणि, मला एक आयडिया सुचली.
बायकोने मला विचारलं ना.. आज जेवायला काय बनवू..!
कि, मी लगेच सुरवात केली..
एक काम कर.. पनीरची खवा टाकून मस्तपैकी भाजी बनव. त्यासोबत, थालीपीठ आणि मसाला भात बनव. आणि एक काम कर दही घालून काकडीची कोशिंबीर बनव. गोड काही करू नकोस, दुकानातून एखादा श्रीखंडाचा डबा घेऊन ये.
एवढी मोठी फर्माईश, आणि..असला भयंकर मेनू ऐकल्या बरोबर, माझी बायको जागच्या जागीच डायरेक्ट क्लीन बोल्डच झाली.
आणि म्हणाली, आता येवढा वेळ आहे का माझ्याकडे हे सगळं बनवायला..?
तर मी म्हणालो,
ठीक आहे.. आज राहूदेत, पण अनायसे या सगळ्या वस्तू आपल्या घरात असतातच. तर, उद्यापासून संध्याकाळी चार पाच वाजता मी तुला फोन करून सांगत जाईल.
आज जेवणासाठी नेमकं काय बनवायचं आहे ते..!
माझी मात्रा बरोबर लागू पडली होती, बायकोने मी सांगणाऱ्या अवघड आणि वेळकाढू मेनुंचा भयंकर धसका घेतला होता. आणि, नेहेमीप्रमाणे न सांगताच माझ्या आवडीच्या भाज्या आता ती गपगुमान बनवून देऊ लागली आहे.
आता बरेच दिवस झाले, ती मला असं विचारायचं धाडसच करत नाही..!
अहो, आज जेवायला काय बनवू..?
आग्रा-दिल्ली-पुणे,
बंगला साहिब गुरुद्वारा. ( भाग :- तीन )
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
आम्ही गुरुद्वाराच्या मुख्य पायऱ्या चढण्यास सुरवात करताना. तिथे असणाऱ्या पहिल्या पायरीवर, आपल्या पायाचे तळवे बुडतील इतक्या खोलीचा एक छोटासा लांबूळका खोल खड्डा होता. त्यात आम्ही आमचे पाय धुवून घेतले. ती सोय अशाकरिता, कि प्रत्येक भाविकाने आपले चरण स्वच्छ धुवूनच गुरुद्वारात प्रवेशित व्हावं. आणि, पायऱ्या चढत आम्ही गुरुद्वाराच्या मुख्य द्वारात येवून पोहोचलो. मुख्य द्वारातून, आतमध्ये आम्ही प्रवेशित झालो.
अगदी प्रसन्न वातावरणात गुरुग्रंथ साहिबचे पूजापाठ आणि पठण चालू होते. तगड्या शरीरयष्टीचे, काही पंजाबी युवक त्यांच्या सुमधुर स्वरातून काही पंजाबी भक्तिगीते आणि रचना म्हणता होते. सगळं वातावरण प्रसन्नतेने भारावून गेलं होतं. दर्शन झाल्यावर प्रत्येक भाविक त्याठिकाणी आपला माथा टेकवत होता. सर्वधर्मसमभाव असं ब्रीदवाक्य असणारं हे ठिकाण. आणि खरोखरच त्याठिकाणी प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला मुक्त प्रवेश होता.
त्या पवित्र ठिकाणावरून, आम्हाला बाहेर पडावंसं वाटत नव्हतं. आम्ही पुन्हा एकवार, गुरु ग्रंथाचं दर्शन घेतलं. आणि गुरुद्वाराच्या बाहेर आलो. तिथे असणाऱ्या, पाण्याच्या तलावाशेजारी बसून थोडा विरंगुळा केला. या बंगला साहिब गुरुद्वाराची कहाणी फारच कमालीची आणि तितकीच रोचक आहे. ती मी तुम्हाला सांगू इच्छितोय..
करोड सिंधिया मिसल चे नेता, बाबा बघेल सिंह यांचा जन्म १७२५ मध्ये झाला. मुघली योद्धा अहमद शहा अब्दाली याने केलेल्या आक्रमणा नंतर. सिख फौजांनी, स्वतःला वेगवेगळ्या गटात विभागून घेतलं होतं. बाबा बघेल सिंग, यांच्या नेतृत्वाखाली एक करोड सिंधिया मिसलने.
अंबाला, कर्नाल, मेरठ आणि अवध सारख्या राज्यावर कब्जा करून. संपूर्ण उपद्वीपावर सिख साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. १७८३ मध्ये, जेंव्हा सिख फौजांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला कब्जा प्रस्थापित केला. तेंव्हा, शहा आलम द्वितीय याने बाबा बघेल सिंह यांच्याशी तह केला. आणि, त्यांनी जिंकलेल्या त्या लाल किल्ल्याच्या बदल्यात. त्यांना, दिल्लीमध्ये सात गुरुद्वारे बनवण्याचा अधिकार दिला. त्यामध्ये..
१ ) गुरुद्वारा मजनू का टीला, गुरु नानक देव तथा गुरु हरगोविंद जी यांच्या स्मरणार्थ बनवला गेला.
२ ) गुरुद्वारा नानक प्याऊ, गुरु नानक देव यांच्या स्मरणार्थ बनवला गेला.
३ ) गुरुद्वारा माता सुंदरी, माता सुंदरी यांच्या स्मरणार्थ बनवला गेला.
४ ) गुरुद्वारा मोती बाग, गुरु गोविंद सिंग यांच्या स्मरणार्थ बनवला गेला.
५ ) गुरुद्वारा शिश गंज शहीदी स्थान, गुरु तेगबहादूर साहिब यांच्या स्मरणार्थ बनवला गेला.
६ ) गुरुद्वारा रकब गंज, महागुरू तेगबहादूरजी यांच्या शरीरावर या ठिकाणी पवित्र अंत्यसंस्कार केले गेले होते. आणि,
७ ) गुरुद्वारा बंगला साहिब, गुरु हरिकृष्णजी यांच्या स्मरणार्थ बनवला गेला.
केवळ आठ महिन्याच्या कालावधीत, बाबा बघेल सिंह यांनी हे सातही गुरुद्वारे बनवून. एक नवा इतिहास आणि विक्रम रचला. त्यातीलच, हा एक फार मोठा असा हा बंगला साहिब गुरुद्वारा होय.
याठिकाणी, गुरुनानक साहेबांची एक सुंदर कथा मला ऐकायला मिळाली.
गुरु नानकांनी, सिख धर्माचा झेंडा हाती घेऊन जगभर बरीच भ्रमंती केली आहे. एकदा, अशीच भ्रमंती करत ते मक्केवरून परत येत असताना.
बाबा नानक आणि मरदाना पश्चिम पंजाब येथील हसन अब्दाल नावाच्या छोट्याशा कसब्यातून निघाले होते. गुरु नानक यांच्या सोबत असणारा मरदाना, चालून-चालून खूप थकला होता. आणि त्या थकव्यामुळे, त्याला खूप तहान लागली होती. तहानलेल्या मर्दान्याने, तिथे जवळच असणाऱ्या एका मुस्लीम पीर, वली कंधारी यांना तिथे जवळच असणाऱ्या तळ्यातील पाणी पिण्याची परवानगी मागितली. कारण, ते वली.. त्या तळ्याचे रक्षक होते. त्यांच्या परवानगीशिवाय तो तेथील पाणी पिऊ शकत नव्हता. पण, त्या वलीने त्याची विनंती साफ धुडकावून लावली.
त्यावर, बाबा नानक यांनी मरदानाला तेथील एक दगड हटवण्याची आज्ञा केली. मरदानाने, गुरूच्या आज्ञेच पालन करत, तेथील एक दगड हटवला. आणि काय आश्चर्य, त्या दगडा खालून पाण्याचा एक झरा वाहू लागला. बाबांनी दाखवलेला चमत्कार पाहून, वली खूप रागे भरला. त्याने रागारागात त्याच्या शक्ती सामर्थ्याने, गुरु नानकांना एक चट्टान फेकून मारली. ती चट्टान, गुरु नानकांनी त्यांच्या एका हाताने अडविली. आणि त्याबरोबर, त्या चट्टानावर बाबांच्या हाताच्या ठशाची निशाणी उमटली. आज त्याच ठिकाणी, पवित्र पंजा साहिब गुरुद्वारा स्तिथ आहे.
बंगला साहिब गुरुद्वाराचा प्रसन्न परिसर, आम्हाला एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी आणि शिकवण देवून गेला होता. त्यानंतर थोडीशी भटकंती करत आम्ही थोडं बाहेरील बाजूस फिरून आलो. बाहेरच आमची जेवणं आटोपली. उद्या सकाळी चार वाजता उठावं लागणार होतं. त्यामुळे, लवकरच आम्ही रूमवर पोहोचलो. तो देखणा पापाजी अजूनही आला नव्हता.
आता काहीच इलाज नव्हता, रात्रीचे दहा वाजले होते. पुढील प्रवासाला फक्त सहा तास उरले होते. शेवटी, आम्ही सगळे त्याच भल्यामोठ्या हॉल मध्ये झोपी गेलो. उकाड्यामुळे झोप काही लागत नव्हती. माझीतर जेमतेम तासाभराची झोप झाली असेल.
गजर झाला, पहाटे चार वाजता आम्ही उठलो, प्रातर्विधी उरकला अंघोळी उरकल्या. इमारतीच्या खाली आलो. गुरुद्वाराला भक्तिभावाने नमस्कार केला. क्लोक रूम मध्ये ठेवलेलं आमचं सामान ताब्यात घेतलं. आणि, दोन कार ठरवून सकाळी सहा वाजता आम्ही विमानतळावर पोहोचलो.
आमचं विमान, सकाळी नऊ वाजता उड्डाण करणार होतं. विमानतळावर लवकर आलं तर चालून जातं. पण उशीर झाला तर काय करता..? कारण, दिल्लीचं ट्राफिक सुद्धा नेहेमी जाम असतं. आमच्याकडे अजून बराच वेळ होता. मग फावल्या वेळात, आम्ही सगळं विमातळ फिरून घेतलं. तासाभराने आमच्या बेग्स आम्ही विमान कंपनीच्या हवाली केल्या. आणि विमान कधी येयील त्याची वाट पाहत आम्ही बसलो. काही कारणाने, नऊ वाजताचं विमान तासभर उशिरा म्हणजे दहा वाजता उड्डाण करणार होतं. वेळ, पुढे पुढे सरकत होती.
ठीक साडेनऊ वाजता, कडेकोट बंदोबस्तात आमची चेकिंग करून आम्हाला विमानतळावर सोडण्यात आलं. आमचं विमान, त्या मैदानावर अगदी पायी चालत पाच मिनिटाच्या अंतरावर उभं होतं. परंतु, त्याकरिता सुद्धा तिथे एका लग्झरी बसने आम्हाला विमानापर्यंत नेऊन सोडण्यात आलं. विशिष्ट प्रकारचा सुईंग.. असा आवाज करणाऱ्या एकशेवीस सीटर विमानात आम्ही सगळे मित्र प्रवेशित झालो.
प्रत्येक जन, आपापल्या सीटवर स्थानपन्न झाला. विमानात वैमानिक आले, एक सुंदर मुलाकडून काही जुजबी सूचना सांगून झाल्या. गोऱ्या गोमट्या नेपाळी वाणाच्या हवाई सुंदऱ्या इकडून तिकडे लुडबुड करू लागल्या. विमान उड्डाणाला तयार झालं होतं. हळुवार वळसा घेत विमान मुख्य धावपट्टीवर आलं. आणि त्याने असा काही वेग घेतला, कि सगळ्या विमानात अगदी थरथर जाणवत होती. आणि अचानक उसळी खात ते अजस्त्र विमान हवेत झेपावलं. तसा माझ्या पोटात एक विचित्र गोळा आला. विमान अगदी उंच भरारी घेत होतं. आणि शेवटी ते विमान अगदी ढगांच्या वर जाऊन स्थिरावलं. तसे, विमानातील नेहेमीचे सराईत प्रवासी ताबडतोब निद्रादेवीचीच्या स्वाधीन झाले. आम्ही नवखी माणसं. विमानाच्या काचेतून बाहेर पाहून एक वेगळाच आनंद उपभोगत होतो. छोट्याशा नालीसारख्या दिसणाऱ्या वळणदार नद्या खूपच सुरेख दिसत होत्या. अजस्त्र पहाड अगदी छोट्याशा दगडाप्रमाणे भासत होते. एकूण अगदी मस्त नजारा पाहायला मिळत होता.
गोड दिसणाऱ्या, आणि गोड बोलणाऱ्या हवाई सुंदऱ्यांच्या हातून. विमानात मिळत असणारा महागडा चहा आणि केक आम्ही स्वाहा केला. सोबतच, तहान नसतानाही मोफत मिळत असणारं ग्लासभर बिसलेरी पाणी सुद्धा पिऊन घेतलं. आणि, विमानात बसून बाहेर पाहत कधी एकदा आमचे दोन तास निघून गेले. ते आम्हाला समजलं सुद्धा नाही. आणि,पुन्हा एकदा नव्या सुचनांचं पालन करत आम्ही कंबरेवर सीटबेल्ट आवळले. आणि मोठी घरघर करत त्या विमानाची चाकं एकदाची जमिनीवर टेकली.
बरच अंतर कापत जात. शेवटी विमान एका जागी स्थिरावलं. आणि लगबगीने, आम्ही सगळे जन विमानाच्या बाहेर पडलो. विमानाचा फोटो काढताना, मला हटकनाऱ्या एका कर्मचाऱ्याला मी दोन ज्ञानाच्या गोष्टी सुनावल्या. तेंव्हा तो सुद्धा थोडा ठिकाणावर आला. तेथून बाहेर पडलो,
कन्वेयर वरून पुढे सरकत येणाऱ्या आमच्या ब्यागा ओळखून. त्यांना आमच्या पाठीवर लादून काही बेगा हाताने ओढत आम्ही सर्वांनी आपापल्या घराकडे कूच केली.
समाप्त.
आग्रा-दिल्ली-पुणे,
बंगला साहिब गुरुद्वारा. ( भाग :- दोन )
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
गुरुद्वारा मधील नियमाप्रमाणे, आम्ही आमच्या डोक्याला रुमाल बांधून घेतले. आणि, तिथे असणाऱ्या त्या एकमेव लिंबाच्या झाडापाशी आम्ही जाऊन थांबलो. पाचेक मिनिटात, एक उंची वस्त्र परिधान केलेली व्यक्ती, ज्याने त्याच्या डोक्यावर पिवळ्या रंगाची पगडी धारण केली होती. अतिशय देखणी आणि प्रसन्न मुद्रा असणारा तो व्यक्ती आमच्यापाशी आला.
आणि, अगदी अदबीने आम्हाला तो म्हणाला..
तुम्ही पुण्याहून आलात ना..!
आम्ही सुद्धा, त्याला आमचा आदरार्थी होकार कळवला. तो आम्हाला म्हणाला, पुण्यातील गुरुद्वारा मधील एका व्यवस्थापक व्यक्तीने मला तुमची शिफारस केली आहे. आत्ताच त्यांचा मला फोन आला होता. राग माणू नका... पण, मी तुमची.. मला जमेल तशी व्यवस्था करून देतो. कारण येथील सगळ्या रूम फुल झाल्या आहेत. आता खरं सांगायला गेलं तर, आम्हाला तिथे राहायची बिलकुल इच्छा नव्हती. पण काय करणार..? कोणाची इच्छा आणि मन मोडवत नव्हत. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी आमची गत झाली होती. आता, तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागणार होता.
सर्वप्रथम, त्याने आम्हाला विचारलं. तुमची जेवणं झाली आहेत का..? सकाळपासून आम्ही खरोखर जेवलो नव्हतो. त्या व्यक्तीने, ताबडतोब एका ठिकाणी आमचं सामान आणि चपला ठेवायची व्यवस्था केली. आम्ही, हात पाय धुवून घेतले. आणि जेवण करण्यासाठी, तिथे जवळच असणाऱ्या लंगरमध्ये गेलो. त्या लंगरमध्ये.. लहान, मोठा, गरीब, श्रीमंत असा काहीएक प्रकार नसतो. सगळे जन एका लाईनीत बसून जेवणाचा आस्वाद घेत होते. गव्हाची जाडसर चपाती, आणि उडदाची पातळ भाजी. त्यादिवशी हा मेनू तिथे होता. आम्ही, दोन-दोन घास पोटात ढकलले. आणि, प्याऊ मधील थंड पाण्याचा गारेगार आस्वाद घेतला.
लंगरमध्ये आणि त्या पाण्याच्या प्यावूवर सेवा करणाऱ्या लोकांना पाहून अगदी अचंबित व्हायला होत होतं. मनात, कोणताही स्वार्थ न ठेवता भक्तिभावाने सगळी लोकं त्या सेवेत एकरूप झाली होती. आमची पोटपूजा उरकली होती. गुरुद्वारा मध्ये आपलं सामान न्यायला मनाई होती. त्यामुळे, आम्हाला लागणारं अत्यावश्यक असं मोजकंच सामान आम्ही आमच्यापाशी एका मोठ्या पिशवीत ठेवून घेतलं. आणि बाकी सगळं सामान, तिथे चोवीस तसा चालू असणाऱ्या क्लोक रूम मध्ये जमा करून टाकलं.
तिथून पुढे आमचा मोर्चा एका इमारतीच्या दिशेने वळाला. तिमजली इमरतीच्या शेवटच्या मजल्यावर, तो व्यक्ती आम्हाला घेऊन गेला. तिथे एक भलामोठा हॉल होता. पूर्ण हॉलमध्ये, एक मोठी सतरंजी अंथरून ठेवली होती. त्यावर, बरीच लोकं अस्ताव्यस्त झोपली होती. त्यात महिला आणि पुरुष असा एकत्रित भरणा होता. त्या रूममध्ये, कमालीचा असा असह्य उकाडा होता. तिथे अगोदर पासून असेलेले काही लोकं, कुलरचं तोंड आपल्या दिशेने करून निवांत पहुडले होते. तर काही व्यक्ती, लेपटोप वरील सिनेमा पाहण्यात दंग होते.
तो व्यक्ती आम्हाला म्हणाला, तुम्ही काहीवेळ इथे आराम करा. माझ्याच्याने काही चांगली व्यवस्था झाली. कि मी लगेच तुम्हाला येऊन भेटतो.
त्या हॉल मध्ये, सगळे पंजाबी लोकं होते. त्यात आम्हीच काय ते बाहेरचे होतो. प्रवासामुळे, सगळे मित्र थकले होते. त्यामुळे, तिथे गेल्याबरोबर सगळ्यांनी आपापलं अंग जमिनीवर टाकलं.
आणि काही वेळातच, त्यातील काही जन चक्क घोरू लागले होते.
मला काही त्याठिकाणी झोप लागत नव्हती. दुपारचे चार वाजले होते. उकाडा सहन होत नसल्याने, अंग गार करावं म्हणून मी लगेच अंघोळीला निघून गेलो. पाहतो तर काय, त्या बाथरुमच्या दरवाजांना कड्याच नव्हत्या. आणि, स्त्रिया आणि पुरुषांकरिता हे एकत्रित असं शौचालय आणि स्नानगृह होतं. एका मित्राला, मी त्या बाथरूमच्या बाहेर उभं करून, कशीबशी मी अंघोळ उरकून घेतली. माझ्या पाठोपाठ, झोप झालेल्या प्रत्येक मित्राने अंघोळ उरकली. आणि, सगळी आवारावर करून आम्ही तेथील परिसर फिरायला बाहेर पडलो.
मघाशी येतो म्हणून निघून गेलेला पंजाबी मित्र अजूनतरी काही आला नव्हता. आम्ही अजूनही आशेवर होतो. कि संध्याकाळी तरी आमची काहीतरी उचित व्यवस्था होईल.
गुरुद्वाराच्या परिसरात अगदी शांत आणि प्रसन्न वातवरण होतं. पांढर्याशुभ्र रंगाचा गुरुद्वारा उतरत्या सोनेरी किरणात आणखीनच उजळून निघाला होता. त्याच्या कळसावर असणारा सोन्याचा मुलामा अगदी चकचक करत होता. आज वेळ आहे तर देवदर्शन आटोपून घ्यावं. असं आम्ही ठरवलं. प्रथम प्याऊ मध्ये जाऊन एक एक मग थंड पाणी पोटात उतरवलं. तेंव्हा कुठे जरासं हायसं वाटलं. उघड्या डोक्याने मंदिरात किंवा तेथील प्रांगणात फिरू नये. म्हणून डोक्यावर रुमाल बांधून आम्ही आमच्या चपला ठेवण्यासाठी चप्पल घरापाशी गेलो. खूपच सुसज्ज आणि मोठ्या आकाराचं हे चप्पल घर होतं. तिथे सुद्धा, मनात कोणताही दुजाभाव न ठेवता. अगदी श्रीमंत दिसणारी लोकं, भाविकांच्या चपला पुसून त्यांना चप्पल घरात ठेवताना दिसत होते. पाद्यपूजा किंवा चरणसेवा या विषयाला हिंदू धर्मात फार मोठी मान्यता आहे. तीच उपासना मला सिख धर्मात सुद्धा पाहायला मिळाली. हि सगळी सेवा पाहून मी अगदी चक्रावून गेलो होतो. कुठेही धक्काबुक्की नाही, कि आरडाओरडा नाही. कि घाईगडबड नाही. तिथे सेवा करत असणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मुखात फक्त एकच शब्द असायचा. तो म्हणजे,
वाहेगुरू, वाहेगुरु, वाहेगुरु...!
क्रमशः
आग्रा-दिल्ली-पुणे,
बंगला साहिब गुरुद्वारा. ( भाग :- एक )
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
चारधाम यात्रा संपली,
मजल दरमजल करत, आम्ही हरिद्वारहून आग्र्यात येऊन पोहोचलो. आणि तिथून पुढे, आगऱ्याहून दिल्लीला निघालो होतो. सकाळची वेळ, पण हवेत भलताच उखाडा जाणवत होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. चारी बाजूला असणाऱ्या, आग्रा येथील प्रसिद्ध मिठाईच्या विविध पेठ्यांची दुकानं पाहत, तोंडाची लाळ गटकन गिळत, आमचं अवजड सामान ओढत नेत, कसेबसे आम्ही आमच्या लग्झरी बस पर्यंत पोहोचलो.
नशिबाने..आग्रा दिल्ली सुपरफास्ट, विनाथांबा बस आम्हाला तिथून मिळाली होती. आणि, दिल्लीतील मध्यवर्ती भागात ती आम्हाला नेऊन सोडणार होती. प्रवासाला सुरवात झाली. आणि, थोड्याच अंतरात बस चालकाने आम्हाला त्याचे लटके झटके दाखवायला सुरवात केली.
त्या बसमध्ये, पाचेक रिकाम्या सीट्स होत्या. त्यामुळे, अतिरिक्त पैसे मिळवण्याच्या लालसेने त्या गाडीच्या मोटार सारथ्याने आणि त्याच्या सोबत असणाऱ्या क्लीनरने. विविध थांब्यांवर, वडाप सारखी ती गाडी भरायला सुरवात केली. सुरवातीला पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून, एक दोन वेळा लोकांनी सहन केलं. पण असं तर आता वारंवार घडू लागलं होतं. कमी अंतराच्या लोकांना सुद्धा हि लोकं त्या बसमध्ये घेत होते. त्या बसला त्या दोघांनी मिळून सुपरफास्ट ची अगदी लोकल बस करून टाकली होती. पण, शेवटी उद्रेक झालाच. आणि वैतागलेल्या सहप्रवाश्यांनी, त्या मोटार सारथ्याला शिवीगाळ करायला सुरवात केली. पण, तो कुठला ऐकायला आलाय. कान बंद करून, त्याचं काम तो अव्याहतपणे पार पाडत होता. या.. नको त्या प्रकारामुळे, नियोजित वेळात तीन तासात पोहोचणारी आमची गाडी तब्बल सहा तासांनी दिल्लीत पोहचली.
एकतर, आम्हाला तिथे पोहोचायला तीन तास उशीर झाला होता. त्यात, आम्हाला दिल्लीमधील काहीएक माहिती नव्हती. आमचा दिल्लीत जायचा नेमका विषय काय,
तर.. उद्या सक्काळी दिल्ली हवाई अड्ड्यावरून पुण्याकरिता आम्हाला विमान होतं. गाडी थांबली, तशी बसमधील काही प्रवाश्यांनी पुन्हा एकदा गोंधळ सुरु केला. त्या बसचालक बहाद्दराने, आम्हाला दिल्ली शहराच्या बाहेर कुठेतरी सोडून दिलं होतं. आणि गाडीतून उतरून, तो कुठेतरी निघून गेला होता. शेवटी झक मारत, आम्ही बसच्या खाली उतरलो. आणि, डिकी मधून आमचं सामान ताब्यात घेतलं. वाद घालायचा प्रश्नच येत नव्हता. कारण, आम्ही मराठी होतो ना..!
आता पुढे काय करायचं..? आजचा दिवस आणि रात्र कुठे राहायचं..? याचा काहीच तपास नव्हता. किंवा आम्ही तसं काही नियोजन केलं नव्हतं. मी तर, माझ्या मनात मस्त प्लान तयार केले होते. दिल्लीतील सगळ्या खाऊ गल्ल्या पालथ्या घालुयात, दिलकी दिल्ली करूयात. बाकी विषय एवढाच होता. कि, आपण जिथे कुठे थांबुयात. त्या ठिकाणापासून, विमानतळ जवळ असावं. म्हणजे, सकाळी जाताना घाई गडबड होता कामा नये. झालं, एका मित्राकडे मी विचारपूस केली. तर ते म्हणाले, तुम्ही दिल्लीतील मध्यवर्ती भागातील करोलबाग भागातील कोणत्याही ठिकाणी थांबा. त्याठिकाणी राहायची आणि जेवायची उत्तम सोय आहे. आणि, तिथून विमानतळ सुद्धा अगदी जवळ आहे.
आमच्या मनात फार मोठी भीती हीच, कि.. विमानतळावर विमान उड्डाणाच्या नियोजित वेळेपूर्वी किमान तासभर अगोदर तरी तिथे पोहोचावं लागतं. आणि ती वेळ चुकली, तर पुढील सगळी गणितं चुकतील. हि फार मोठी भीती आमच्या मनात घर करून बसली होती. कारण, चारधाम यात्रा करून. आमच्या सगळ्या शरीराचा अगदी पिठ्ठा पडला होता. आणि, या हवाई प्रवासाची कोणाला म्हणावी अशी खास माहिती सुद्धा नव्हती. माझा तर हा जेमतेम तिसरा विमान प्रवास होता. पण माझ्याबरोबर असणारे माझे सगळे मित्र पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार होते. त्यामुळे, मला या बाबतीत कोणतीच तडजोड नको होती. आणि कोणत्याही परिस्थितीत, आम्हाला उद्या सकाळी असणारं ते प्लेन चुकवायचं नव्हतं.
झालं.. आता पुढे काय..? हा प्रश्न आमच्यासमोर आ वासून उभा राहिला होता. उन्हाचा चटका, आणि अंगातून घामाच्या धारा सतत चालू होत्या. त्यात कमी कि काय म्हणून, तेथील रिक्षावाले आम्हाला विनाकारण पिडत होते. नको, नको म्हंटल तरी..
चला.. तुम्हाला कुठे जायचं आहे, आम्ही सोडतो. इतके पैसे दया तितके पैसे द्या.
तर आमचाच कोणी मित्र म्हणत होता, रिक्षाने नको, आपण बसने किंवा मेट्रोने जाऊयात, ते बरं पडेल. शेवटी, यामुळे आमच्यातच काय ते एकमत होत नव्हतं. कसाबसा त्या रिक्षावाल्यांचा ससेमिरा चुकवत, आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. तितक्यात, आत्तापर्यंत गप्प असलेला आमचा एक मित्र म्हणाला,
पुण्यातील माझ्या एका पंजाबी मित्राने मला सांगितलं आहे. दिल्लीत, फसवणुकीच्या फार घटना घडत असतात. तुम्ही, इकडे तिकडे कुठेही राहून नको त्या खर्चात पडायची कामं करू नका. तुम्ही लोकं, तिथेच जवळ असणाऱ्या " बंगला साहिब " नावाच्या गुरुद्वारात मुक्कामाला जावा. मी तिथे, तुमच्या राहण्याची व्यवस्था करतो.
आता, गुरुद्वारात राहायचं म्हणजे. आमच्या काही मित्रांची पंचायत होणार होती. कारण, तिथे गेल्यावर कोणत्याच प्रकारचं व्यसन करता येणार नव्हत. आणि, माझे बहुतांश मित्र हे तंबाखू शौकीन होते. शेवटी हो नाही करत, आमचं पक्कं एकमत ठरलं, कि आपण सगळे बंगला साहिबला राहायला जाऊयात. त्याकरिता, तिथे असणाऱ्या एका व्यवस्थापकाला मला फोन करावा लागला. त्याला, मी आमच्या पुण्यातील पंजाबी व्यक्तीचा रेफरन्स दिला. त्याने सुद्धा, आमच्या विनंतीला मान देत. आम्हाला बंगला साहिब गुरुद्वारा येथे तुमचं स्वागत आहे. असं म्हणून, आम्हाला त्या ठिकाणी बोलावून घेतलं. आणि आमच्या पुढील प्रवासाला सुरवात झाली. एका स्थानिक नागरिकाला, बंगला साहिबला कसं जावं लागेल. त्याची माहिती विचारून घेतली. आणि दिल्लीमधील परिवहन मंडळाच्या एका " एसी बसमधून " आमचा पुढील प्रवास सुरु झाला.
बसमध्ये तुफान गर्दी होती. त्यात.. माझ्या पारख्या नजरेने, बसमध्ये असणारे खिसेकापू लोकं ताबडतोब ओळखली. सोबतच माझ्या दोनचार मित्रांना सुद्धा त्याची चाहूल लागली. ( आम्हा पुणेकरांना, लोक उगाच भामटे म्हणत नाहीत. यानिमित्ताने याची दखल सर्व वाचकांनी घ्यावी. ) आणि, मी माझ्यासोबत असणाऱ्या मित्रांना सावध केलं. आमची मराठी बोली भाषा कोणाला समजत नव्हती. त्यामुळे, मी काय म्हणतोय ते इतर लोकांना किंवा त्या चोरांना सुद्धा समजलं नाही. थोड्यावेळाने कोणता तरी स्टॉप आला. आणि, धक्काबुक्की करत ती चोर मंडळी सुद्धा बसच्या खाली उतरून निघून गेले. बस पुढे निघाली, आणि बसमधील दोनचार लोकांना समजलं. कि..आपली पाकिटं किंवा मोबाईल चोरीला गेला आहे.
रात गयी बात गयी.. बस बरीच पुढे निघून गेली होती. वस्तू चोरीला गेलेली लोकं, खूप मनापासून तळतळ करत होते. आणि, आम्ही लोकं त्यातून सहीसलामत बचावलो होतो म्हणून, परमेश्वराचे आभार मानत होतो.
त्यानंतर, आम्ही सुद्धा कोणत्यातरी एका बस थांब्यावर उतरलो. तिथून पुढे आम्हाला अजून एक नवीन बस करायची होती. ती बस, आम्हाला बंगला साहिब गुरुद्वारा येथे नेऊन सोडणार होती. तोवर, त्या थांब्यावर असणाऱ्या दोन रुपयात ग्लासभर थंड पाणी मिळणाऱ्या गाड्यावर आम्ही सर्वांनी आमची तहान शमवली. त्यावर..सर्वांनी एक-एक लिंबू सरबर मारला. आणि, पुढील प्रवासासाठी येणार्या बसची आम्ही वाट पाहू लागलो.
थोड्याच वेळात, आम्हाला हवी असणारी बस त्याठिकाणी आली. पुन्हा सगळं ओझं बसमध्ये चढवून आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. दहाएक मिनिटात, आम्ही बंगला साहिब गुरुद्वारा येथे पोहोचलो. मी मनात ठरवलेल्या माझ्या अपेक्षेपेक्षा, हा फारच मोठा गुरुद्वारा होता. त्याठिकाणी प्रवाश्यांची आणि यात्रेकरूंची बरीच मोठी गर्दी होती. यात्रेकरू आलेले पाहून, वाटेत पुन्हा एकदा आम्हाला काही सरदारजी टॅक्सी चालकांनी थांबवलं. आणि आमची विचारपूस केली,
तुम्ही कुठे चालला आहात वगैरे-वगैरे.
आम्ही सुद्धा त्यांना आम्ही गुरुद्वारात दर्शनासाठी आणि मुक्कामाला निघालो आहोत, म्हणून सांगितलं. तर, तो सरदारजी व्यक्ती आम्हाला म्हणाला..
या गुरुद्वारात काही, राहायची फुकट सोय होत नसते. इथे सुद्धा, एका रूमचे तुम्हाला दीडहजार रुपये पडतात. त्यापेक्षा, तुम्ही आमच्या सोबत बाहेरील एसी लॉज मध्ये चला. तुम्हाला आम्ही, तिथे इथल्या पेक्षा स्वस्तात लॉज घेऊन देऊ. आणि.. तसं पाहायला गेलं तर, गुरुद्वाराच्या सगळ्या रूम बुकिंग सुद्धा फुल झाल्या आहेत. त्यामुळे..तुम्हाला तिथे रूम मिळणं मुश्कील आहे..!
आता.. हा नवीन प्रकार ऐकून, आम्ही पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीत अडकलो. पण आमच्या ज्या मित्राने आम्हाला हि सूचना केली होती. तो काही, माघार घ्यायला तयार नव्हता.
इथवर आलोच आहोत, तर पुन्हा एकदा त्या व्यक्तीला फोन करून आपण शहानिशा करून घेऊयात. असं त्याचं म्हणनं झालं. त्यावर, मी सुद्धा त्या व्यक्तीला फोन केला. सुरवातीला तो व्यक्ती काही आमचा फोन उचलतच नव्हता. त्यावेळी मला सुद्धा थोडा संशय आला. आता, नको ती उगाच लटकायची कामं झाली होती. थोड्यावेळाने..मी पुन्हा एकवार, त्या व्यक्तीला फोन लावला. यावेळी मात्र, त्या व्यक्तीने माझा फोन उचलला. आणि आम्हाला, गुरुद्वारा मध्ये असणार्या एका लिंबाच्या झाडापाशी बोलावून घेतलं. पुन्हा सगळं ओझं ओढत आम्ही आतमध्ये निघालो.
त्यावर, तो बाहेर उभा असणारा टॅक्सी चालक आम्हाला म्हणाला.
आतमध्ये, तुमची काही सोय झाली नाही. तर बाहेर या, मी इथेच तुमची वाट पाहतोय..!
आम्हा दहाएक लोकांमागे, लॉजिंग कमिशन म्हणून किंवा गाडी भाडं म्हणून त्याला पाच सहाशे रुपये तरी नक्कीच सुटणार होते. त्यामुळे, तो व्यक्ती काही आमचा पिच्छा काही सोडत नव्हता.
दोन्हीकडे समतोल असावा. म्हणून, त्या सरदारजीला होकार कळवत. आम्ही, बंगला साहिब गुरुद्वारात प्रवेशित झालो.
क्रमशः
आज, ट्राफिक जाममध्ये एका चौकात थांबलो असता..
माझ्या समोर, हाताच्या डाव्या बाजूला एका दुचाकीवरून एक सुंदरसं जोडपं हळुवार गतीने पुढे निघालं होतं. ते दोघेही दिसायला खूपच सुंदर होते. ती मुलगी, त्या मुलाच्या पाठीवर रेलून त्याच्या कंबरेत घट्टशी मिठी मारून, त्याच्या कानात लाडीकपणे काहीतरी कुजबुजत होती.
आणि अचानक, बोलता-बोलता तो मुलगा तिला काय म्हणाला काय माहिती.. तसे,
त्या मागे बसलेल्या मुलीने. लाडिक चेहेरा करत. पुढे बसलेल्या त्या मुलाचा लाडाने एक गालगुच्चा घेतला. त्यासरशी.. पटकन माझं लक्ष त्या मुलीच्या गळ्याकडे गेलं.
कारण, हे जोडपं विवाहित आहे..? कि ते, प्रेमियुगल आहेत..?
याची, शहानिशा मला करायची होती.
आणि फैसला झाला..!!
हो.. त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं.
म्हणजे, ते विवाहित जोडपं होतं. त्या मुलीच्या, या लाडिक कृत्यावर त्या मुलाची प्रतिक्रिया काय असावी, ते मला समजलंच नाही. कारण, ट्राफिक जाम सुटल्यावर ते जोडपं सुसाट वेगाने माझ्यासमोरून पुढे निघून गेलं होतं.
लग्न झाल्या नंतरही, त्यांच्यात प्रेमाचा ओलावा अजूनही हवा तसाच कायम होता. आणि, अजूनही ती मुलगी तिच्या नवऱ्यावर भलतीच फिदा होती. हे पाहून, त्या मुलाचा मला खूप हेवा वाटत होता.
आणि.. कारण नसताना, मी मात्र.. खूप सुखावून गेलो होतो.
तुमचा खरा सन्मान तेंव्हाच होईल..
जेंव्हा,
जनसामान्यांच्या समोर..
तुमच्या, माता पित्याचा " सन्मान " तुमच्या हस्ते होईल..!
थोडक्यात..
पुत्र व्हावा ऐसा बंदा,
ज्याचा मीरवावा चहू लोकी झेंडा..!
" फक्त पुरुषांसाठी " ( वाचायला सर्वांसाठी )
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""'""'""""""""""""""""
( हा कामुक विषय नाही. तर, एक अभ्यासपूर्ण लेख आहे. )
प्रत्येक गोष्टीला.. वेळ, काळ, मर्यादा या ठरवून दिल्या आहेत. लहान मुल जितक्या वेगात रांगू शकतं. तितक्या वेगात आपण रांगू शकू का..? किंवा, लहान मुलं खेळताना धडपडतात, आणि काहीच कुरबुर न करता पुन्हा उठून खेळायला सुरवात करतात. ते आपल्याला उतरत्या वयात जमणार आहे का..? तरुण मुलांचा आहार मोठा असतो, उतरत्या वयात तितका आहार आपल्याला झेपणार आहे का..? नाही, कारण त्यावेळी आपली पचनशक्ती फार कमकुवत झालेली असते. त्यामुळे, वरील सर्व गोष्टी ज्या त्या वयातच व्हायला हव्यात.
वाढत्या वयात मुलांना कंठ फुटतात, त्यांच्या आवाजात एकप्रकारचा थोराडपणा जाणवू लागतो. चेहऱ्या बरोबरच गुप्तांगाजवळ केस वाढीस लागणे, कामवासना जागृत होणे, स्वप्नदोष होणे. मुलीना.. वक्ष आणि नितंबा मध्ये वाढ होणे, चेहेऱ्यावर तारुण्य पिटिका येणे, मासिकपाळी सुरु होणे. या आणि, शरीरातील अशा इतर घडामोडी बरोबरच.
सेक्स या विषयीचं ज्ञान सुद्धा त्यांना कळत नकळत मिळत असतं. लैंगिक शिक्षण, हि सुद्धा एक फार मोठी आणि शरीराला आवश्यक अशी गोष्ट आणि क्रिया आहे. पण दुर्दैवाने, भारतात ती शिक्षणपद्धती आता लोप पावली आहे. जे कि, सुरवातीच्या काळात वात्सायन ऋषींनी या विषयावर भरभरून लिहून ठेवलं आहे. जो आजही, आपल्या भारतीय लैंगिक शिक्षण पद्धतीचा एक अविभाज्य भाग बनून राहिला आहे.
वैवाहिक जीवनासाठी, विवाहयोग्य मुला मुलींकरिता विवाहसंस्था हि संकल्पना संपूर्ण जगभरात अस्तित्वाला आली. प्रांतानुसार, थोड्याफार प्रमाणात त्यात सुद्धा आपल्याला विविधता पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणच्या रिती निरनिराळ्या असतात.
विवाह संपन्न झाल्यावर, तरुणाईचा फार मोठा बहर असतो. तोवर मनुष्याच्या कामशक्ती मध्ये कमालीची ताकत असते. ते सर्व काही, तुमच्या कमावलेल्या शरीरावर आणि तुमच्या कामेच्छेवर अवलंबून असतं.
पण, तरुणपणी असलेली तीच कामशक्ती हि भविष्यातही तशीच राहू शकेल..?
काही अपवाद वगळता, असं कोणालाही छातीठोकपणे सांगता येऊ शकत नाही. शरीर जसं वृद्धत्वाकडे झुकू लागतं. तशी शरीराची प्रत्येक क्रिया संथ होत जाते. हा सृष्टीचा नियम आहे. गात्र थकत जातील, तसा माणूस सुद्धा कमकुवत होत जातो. पण हे सगळं मानायला मनुष्य मन कदापि तयार नसतं. त्याला प्रत्येक गोष्टीत, तोच जोश आणि जुनून हवा असतो. पण, दुर्दैवाने ते शक्य नसतं.
माझ्या ओळखीतला एक अती हौशी गृहस्थ, लैंगिक समस्येने फार त्रस्त होता. तो, शीघ्रपतन या विषयाचा बळी ठरला होता. आता.. खरं पाहायला गेलं तर. वयोमानानुसार शरीरात ठराविक बदल घडत असतात. आणि तो बदल, सर्वांना स्वीकार्य सुद्धा असला पाहिजे.
पण काही लोकं.. हि, फारच हट्टी असतात. त्यांना, जवानीत असणारा तोच जोश उतरत्या वयात सुद्धा नव्याने हवा असतो. त्याकरिता, मेडिकल मध्ये मिळणाऱ्या विविध शक्तिवर्धक गोळ्या, वैद्य किंवा युनानी हकीमाकडे नवनवीन शक्तिवर्धक चूर्ण मिळवण्यासाठी अशा लोकांच्या फेऱ्या आणि धावपळी सुरु होतात.
वीर्य आणि लोणी.. जगातील या दोन अशा गोष्टी आहेत. ज्या कधीही आपल्याला मुल तत्वात दिसत नाहीत. मनुष्याचं शरीर कापलं तरी त्यात वीर्याचा अंश सापडणार नाही. किंवा दुधामध्ये कितीही झोकून पाहिलं. तरी, त्यात लोणी किंवा तूप तुम्हाला दिसणार नाही.
हा सृष्टीचा नियम आहे. या दोन्हीही गोष्टी, मंथन किंवा मैथुन केल्यावरच हस्तगत होत असतात. किंवा बाहेर पडत असतात. हा, फार मोठा अभ्यासाचा विषय झाला.
मैथुन झाल्याशिवाय वीर्य दिसणार नाही. आणि, दह्याचं ताकाचं रुपांतर करून मंथन झाल्याशिवाय लोणी किंवा तूप दिसणार नाही. त्यामुळे, शरीरातील किंवा पदार्थातील या दोन्ही गोष्टीना फार उच्चतम कोटीचं महत्व प्राप्त झालं आहे.
काही वेळेस काय होतं, आडात नाहीये तर पोहऱ्यात तरी कुठून येणार..?
ताकातून, तुम्ही एकदा लोणी काढून घेतलं. कि त्या ताकाला पुन्हा कितीही घुसळले तरी त्यातून लोणी येणार आहे का..? हा प्रॅक्टिकली समजण्याचा विषय आहे. तसच मानवी शरीराचं सुद्धा आहे. मानवी शरीरात, रक्ताप्रमाणे विर्याचा साठा नसतो. योग्य वेळी, त्याची शरीरात निर्मिती होत असते. त्याचा शरीरात साठा होऊच शकत नाही. आणि, आपण मनमानी करून शरीरातून हवं तितकं वीर्यपतन सुद्धा करू शकत नाही. त्याला सुद्धा शारीरिक अशा बऱ्याच मर्यादा आहेत.
विविध प्रकारची औषधं घेऊन, आपण शरीरातून जास्ती प्रमाणात वीर्य निर्मिती करू शकतो. पण तसं करणं आपल्या शरीराला फार घातक असतं. कारण, ते वीर्य काही बाहेरून विकत येणारं नसतं. त्याकरिता, आपल्या शरीरातील हाडा मासाचा काही भागच खर्ची पडत असतो. मागणीपेक्षा जास्ती पुरवठा केला. तर शरीर लवकर थकणार आणि वारंवार असं करण्याने, त्यापुढील काळात तर, ते शरीर कोणत्याच " कामाचं " उरत नाही. हे बरेच जणांच्या ध्यानात येत नाही.
किंवा.. एकतर, हे सगळं गणित ध्यानात यायला फार उशीर झालेला असतो. आणि पर्यायाने, मनुष्याला नको त्या नवनवीन समस्यांना तोंड द्यावं लागतं.
तर.. माझ्या ओळखीतल्या त्या हौशी गृहस्थाच्या, एका उच्च विध्याविभुशीत युनानी डॉक्टरकडे याच विषयासाठी फेऱ्या सुरु होत्या. तो युनानी हकीम, याला बरीच चांगली औषध द्यायचा. पण, त्या गोष्टीने याचं मन काही भरत नव्हतं. किंवा तो समाधानी होत नव्हता. तो गृहस्थ त्या युनानी डॉक्टरांना म्हणायचा..
डॉक्टर साहब, ऐसी दवा दो, के..और जादा स्टैमिना बढना चाहिये..!
शेवटी, तो युनानी हकीम सुद्धा याच्या रोजच्या त्रासाला कंटाळला. आणि, त्याने त्याला एक उदाहरण दिलं. तो म्हणाला, देखो मियां..
तुम्ही.. भारत, पाकिस्तान सीमेवर उभे आहात. घनघोर युद्ध सुरु होणार आहे. तुमच्याकडे सुद्धा भरपूर अद्यावत शस्त्रसाठा आहे. पण, त्या शस्त्र साठ्यासाठी लागणारा दारुगोळा जर तुमच्याकडे नसेल. तर, काय होईल..?
तुमची ती शस्त्र अगदी कुचकामी ठरतील. कारण, त्यात आवश्यक असणारा बॉम्ब किंवा गोळ्या असा दारुगोळा नसणार आहे. त्यामुळे, ती शस्त्र अगदी निकामी ठरणार आहेत.
इससे क्या होगा.. जंग के दौरान, " दुश्मन " तुमपे हावी हो जायेगा. और, आप जंग हार जावोगे.
या छोट्याशा उदाहरणात, हकीम साहेबांनी त्याला लाख मोलाचं ज्ञान शिकवलं होतं. अती वापराने, किंवा नको त्या मार्गाचा अवलंब केल्याने, तुमच्या शरीरातील वीर्याची मात्राच जर संपली.
किंवा.. अति मोह केल्यामुळे, शरीरातील वीर्य निर्मिती होणंच बंद पडलं. तर, तुमचं धडधाकट दिसणारं शरीर हे विना " दारूगोळ्याची " बंदूक असणार आहे.
कारण, सेक्सचा परमोच्च बिंदू हा वीर्यपतन झाल्यावरच अनुभवायला मिळतो. अन्यथा, ती काम भावना किंवा ती लैंगिक क्रिया कोणत्याच आणि कोणाच्याच कामाची उरत नाही.
मंदिरा समोरून जात असताना, नयनात आणि मनात परमेश्वराची मूर्ती साठवत. मनोभावे.. नकळत, माझ्या उजव्या हाताची काही बोटं मस्तकावरून टेकून माझ्या छातीवर येऊन स्थिरावतात..
परंतु, कधी-कधी..
मंदिरासमोरून जात असताना,
एका बाजूला मला देवाची मूर्ती दिसत असते. तर, समोरच्या बाजूला एखादी सुंदर युवती दिसत असते.

अशावेळी..
मी देवाकडे ओझरतं पाहून घेतो,
आणि.. माझं सगळं लक्ष त्या समोरील सुंदर युवतीवर केंद्रित करतो.
कारण, माझ्या रोजच्या रस्त्यात ते मंदिर तर येणारच असतं.
परंतु..
ती सुंदर युवती, त्याच रस्त्यावर मला परत दिसेल कि नाही, त्याची शाश्वती नसते..!
त्यामुळे, अशावेळी..
मी, सौंदर्य पाहण्याला पूर्ण प्राधान्य देत असतो..!
उद्या, आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाचा दिवस आहे.
त्यावेळी, काळाची गरज होती.
म्हणून, आपणाला देवाला रस्त्यावर आणावं लागलं होतं.
आता, तशी परिस्थिती उरलेली नाहीये. त्यामुळे, त्याला पुन्हा एकदा आपल्या घरात नेण्याची वेळ आली आहे. स्वतःला हिंदू म्हणवणारे काही लोकं सुद्धा देवादिकांना मानत नाहीत. किंवा मूर्तीपूजेला मानत नाहीत. तर, इतर धर्मियांना नावं ठेवण्याचा आपल्याला कोणताच अधिकार नाही.
देव रस्त्यावर आनल्यावर, त्याची विटंबना हि होणारच..!
पण तोच देव जर आपल्या घरात असेल. तर त्याची विटंबना कोणी करू शकेल का..?
आपणच हे उद्योग वाढवत असतो, असं तुम्हाला वाटत नाही का..?
घरात बसवणारी मूर्ती सुद्धा अगदी लहान आणि शक्यतो शाडू मातीची आणून बसवा. शक्य असल्यास, आणि जमल्यास, आपल्याच परसबागेत किंवा घरातील पाण्यात तिला विसर्जित करा.
नाहीच तर एक नवीन पर्याय आहे.
तांब्या, पितळेची किंवा एखादी पंचधातूची मूर्ती कायमस्वरूपी आणून ठेवा. विसर्जनाची झंझट नाही. मूर्तीवर आपल्या घरातच विसर्जनाचा सोपस्कार आटोपयचा. आणि, एक शोभिवंत बाप्पाची मूर्ती सुद्धा कायमस्वरूपी आपल्या घरात विराजित असेल.
चला तर मग आज एक शपत घेऊयात.
आम्ही कोणतेच हिंदू सणवार साजरे करायचे बंद करणार नाही. पण त्याला आलेलं एक विशिष्ट ओंगळ रूप, आम्ही नक्कीच बदलू. आणि, आपल्या धर्माप्रती आपली जागरूकता वाढवू.
खरं पाहायला गेलं तर, हॉटेलिंग हा विषय मला बिलकुल आवडत नाही. पण, घरच्या लोकांच्या आग्रहाखातर कधीतरी मी हॉटेलिंग करत असतो. घर परिवार सोबत असल्यावर, झक मारत मला तिथे असणाऱ्या फॅमिलीरूम मध्ये बसावं लागतं.
का तर, तिथे असणाऱ्या पिताड खाताड लोकांचा आपल्या घरच्यांना काही त्रास होऊ नये म्हणून.
पण.. त्या फॅमिलीरूम मध्ये वातावरण फार गंभीर असतं हो.
आपल्या परिवारा सोबत आलेली काही 'टाकेश' मंडळी, त्याठिकाणी अती सज्जन होत, आपल्या परीवारासमोर दारू वगैरे पीत नसल्याचा आव आणतात. त्यांच्याशी खोटा नाटा हसरा संवाद साधत त्यांची दिशाभूल करत असतात. परंतु, मी मात्र अशा गोष्टी हमखास टाळत असतो. आपल्याला जे हवंय ते करायचं. दुनियेची चिंता करायची नाही. मी बिनधास्तपणे, माझी नीप मागवत असतो. आणि, मी माझा एन्जॉय करत असतो.
पण आता.. एक, नवीन समस्या उपलब्ध झाली आहे.
हॉटेलमध्ये असणारे वेटर लोकं, माझी ऑर्डर घेऊन झाल्यावर, माझ्या मुलापाशी जातात.
आणि त्याला विचारतात.
सर.. आपके लिये कुछ बियर, मॉकटेल वगैरा..!
तेंव्हा मात्र, माझी सुद्धा पाचावर धारण बसते. पण, माझा मुलगा सुद्धा तेवढ्याच अदबीने त्याला..
नो थँक्स म्हणतो.
आणि, सरतेशेवटी त्या फॅमिली रूममध्ये, मी एकटाच माझ्या परिवारासोबत एन्जॉयमेंट करत असतो. आणि तिथे असणारे बाकी लोकं, मला पाहून चरफडत असतात..!
बाकी लोकांचा, आज सुद्धा जळफळाट होणार..!
तसं पाहायला गेलं तर, माझी बायको सुद्धा बऱ्यापैकी जाडजूड आहे.
परंतु..
ती एखाद्या कार्यक्रमात, चारचौघीत असल्यावर,
तिच्यापेक्षा जाडजूड असणाऱ्या महिला तिला दिसल्या. कि.. तिचा, एक प्रश्न मला हमखास ठरलेला असतो.
अहो.. " त्यांच्यापेक्षा मी जरा कमी दिसतेय ना..! "
तिच्या समाधानाकरिता, मी सुद्धा तिच्या होकारात माझा होकार मिळवतो.
त्यामुळे, या ना त्या कारणाने..
हर्षोल्हासात, तिच्या अंगावरील " मुठभर " मास तरी नक्कीच कमी होत असेल.
टोमॅटोचा सॉस बनवला जातो, बटाट्याचे वेफर्स बनवले जातात, आले लसणाची पेस्ट बनवली जाते. हिरव्या मिरच्यांना वाळवून लाल मिरच्या तयार केल्या जातात. कोथंबीर आणि पुदिना सुद्धा सुकवून हवाबंद डब्यात विकले जातात.
भाजी पाल्यातील, अजून सुद्धा अशा बऱ्याच वस्तू असतील. ज्या " ड्राय व्हेजिटेबल " या सदरात मोडत असतील. याव्यतिरिक्त, बाकी सुद्धा बऱ्याच भाज्या प्रक्रिया करून ठेवल्या जात असतील.
आजवर, तो टोमॅटो किंवा बटाटा या फळभाज्या मंडई मध्ये फेकल्या गेल्या आहेत का...!
अशा बातम्यांना, म्हणावा इतका उत येत नाही. चुकून, एखाद अर्धा अपवाद वगळता. कधीतरी, अशी बातमी आपल्या ऐकण्यात आली सुद्धा असेल.
पण.. या, कांद्याच्या बाबतीत कायमच बोंबाबोंब ऐकायला मिळते. कांदा या पिकामुळे समस्त शेतकरी हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय.
असं का..?
एकतर, सर्रास कांदा लावण्याच्या पद्धतीमुळे नियोजन ढासळत आहे. कांदा साठवणी करीता, कांद्याच्या वखारी असतात. त्या प्रत्येक शेतकऱ्याकडे असतीलच असं सांगता येत नाही. त्यामुळे नियोजनात बिघाड होत असावा. दलाल लोकांनी तर, शेतकर्यांचे कंबरडे मोडून टाकले आहे.
नाहीच काही तर.. त्या वखारीत सुद्धा, साधारण पाच सहा महिने कांदा टिकतो. आणि त्यानंतर, नाईलाजाने तो कांदा शेतकऱ्याला एकतर स्वस्तात तरी विकावा लागतो. किंवा तो कांदा वखारीत सडून तरी जातो.
मला काय म्हणायचं आहे. रोजच्या जेवणात कांदा हा आपल्याला अगदी लागतोच लागतो.
तर मग, त्याची इतकी परवड का व्हावी..?
त्याबद्धल, कोणीच का उपाययोजना आखत नाहीये..?
कांदा प्रक्रियेच्या उद्योगाला कोणीच का सुरवात करत नाहीये..?
कांद्याच्या पातळ चकत्या बनवून, त्यांना अद्ययावत यंत्राने चिरून जर त्याला यंत्रामार्फत वाळवला गेला. आणि, हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत भरून तो विकला गेला. तर, त्याच कांद्याला बाजारात दहापटीने भाव मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होईल.
तशा प्रकारचा वाळलेला कांदा.. बिर्याणी, व्हेज पुलाव, आणि इतर बऱ्याच भाज्यांची चव वाढवण्यासाठी नक्कीच कामी येईल. आणि, दरवेळेस कांद्याची होणारी परवड सुद्धा थांबेल.
नाबार्ड सारख्या सहकारी संस्थांना हाताशी धरून, किंवा.. शेतकऱ्यांच्या स्थानिक संस्थांनी पुढाकार घेऊन. विदेशातून अशी एखादी यंत्रणा आणली. तर, कांदा वाया सुद्धा जाणार नाही. स्थानिक लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होईल. आणि, कांद्याला मिळणारा हा पाच पैसे किलोसारखा मानहानीकारक भाव सुद्धा कोण्या शेतकऱ्याला पाहायला मिळणार नाही.
टीप :- उन्हाळ्यात कांदा स्वस्त झाल्यावर, दरवर्षी मंडईतून आम्ही मोठमोठे वीसेक किलो कांदे विकत आणतो. आणि, त्यांना सोलून, बारीक चिरून उन्हात वाळत घालतो. तीन दिवसात, पांढरा शुभ्र कुरकुरीत कांदा चिप्स तयार होतात. आणि, हा वाळलेला कांदा वर्षभर टिकतो सुद्धा. शिवाय, भाजी करताना ओला कांदा भाजायला तेल सुद्धा खूप लागतं. या सुख्या कांद्यामुळे, तेलाची सुद्धा बरीच बचत होते, काम सुद्धा लवकर होतं. आणि, सर्व प्रकारच्या भाज्या सुद्धा खूपच लज्जतदार होतात. बिर्याणी साठी असा कांदा फारच फायदेशीर ठरतो.
अनायसे, आता ऑक्टोबर हिट आलीच आहे. या ऑक्टोबरी उन्हाळ्यात, हा प्रयोग प्रत्येकाने करून पाहायला काहीच हरकत नाही.
कोणत्याच प्रकारची खात्री नसलेल्या दारूच्या बाटलीला, एम.आर.पी. पेक्षा जास्ती किंमत मोजून, शिवाय बिल न घेताच आपण ती खरेदी करत असतो.
हॉटेल मध्ये मिळणारी भाजी, शिळी आहे की ताजी..? याची बिलकुल विचारपूस न करता. जेवणासाठीच्या एका भाजीचे, शे-दोनशे रुपये मोजून. मिटक्या मारत, आपण त्या भाज्या खात असतो.
फक्त.. डॉक्टर लिहून देतायेत म्हणून, कोणत्याही औषधांचा प्रयोग आपण स्वतःवर करून घ्यायला तयार असतो. आपण कधीही, त्या डॉक्टरांची डिग्री तपासत नाही. किंवा, तो बोगस डॉक्टर तरी नाही ना..? अशी पुसटशी शंका सुद्धा आपल्या मनात डोकावत नाही.
हि सगळी आंधळी कोशिंबीर आपण कायमच खेळत असतो.
विदेशी कंपन्यांचे, मोठमोठ्या ब्रँड्सचे.. जर्किन्स, बुट्स, बेल्टस उंची लेदरच्या नावाखाली कोणतीही शहानिशा न करता. मोठ्या रकमा देऊन आपण खरेदी करत असतो.
मॉल मध्ये मिळणाऱ्या, हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थ, एक्सपायरीला अवघा महिना उरला असताना सुद्धा. कोणतीही कुरबुर न करता, डोळे झाकून आपण खरेदी करत असतो..
परंतु,
शेतकऱ्याने किंवा व्यापाऱ्याने मंडई मध्ये विक्रीसाठी आणलेली हिरवीगार ताजी भाजी. किमान, तीन चार वेळा खालीवर करून पहायची. त्याचा भावताव करायचा, त्याला अत्यल्प भावाने मागायच्या.
त्यावेळी, आपल्या डोळ्याचे खासडे झालेले असतात का..?
किराणा मालाच्या दुकानात मिळणारा..गहू, तांदूळ, ज्वारी चार वेळा या हातातून त्या हातात घेत वर खाली करत असतो. त्या तांदळाला हाताने चोळून पाहत असतो, त्याचा वास घेत असतो.
त्यावेळी, आपण आपली बुद्धी गहाण ठेवलेली असते का..?
त्यावेळी, आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास नसतो का..?
चारचौघात उठून दिसणारी, देखणी आणि चिकणी चोपडी मुलं.
आपल्या सौंदर्याच्या जोरावर..
एकाचवेळी जास्तीत जास्त मुलींना, आपल्या जाळ्यात ओढण्याचा नेहेमी प्रयत्न करत असतात.
असं, माझ्यातरी पाहण्यात आलं आहे.
एकीला समजलं, तर.. दुसरी आहेच की..!
हि नाही.. तर ती,
काहीशा अशा अविर्भावात, ते वावरत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
याऊलट..
चारचौघीत उठून दिसणाऱ्या देखण्या मुली,
अशा प्रकारचे थिल्लर चाळे करत असतीलच, असं सांगता येत नाही..!
पूर्वी.. सावकारी करणारा माझा एक मित्र होता..!
भयंकर चेंगट माणूस....
सणावाराला, हाताच्या आठी बोटात सोन्याच्या अंगठ्या घालायचा. गळ्यात पाचेक तोळ्याची सोनसाखळी घालायचा. पण त्या सगळ्या अंगठ्या पिळ्याच्या असायच्या. त्याला, असं का म्हणूनं विचारलं, तर म्हणायचा..
" डिझाईनच्या अंगठ्यांना मोडताना घट फार येते..!
प्रत्येक गोष्टीत, त्याचा बारीकसारीक विचार असायचा. त्याने उभ्या जन्मात कोणतच व्यसन अंगाला लाऊन घेतलं नव्हतं. त्याला कारण म्हणजे, व्यसन करायचं म्हणजे खर्च आलाच ना..!
परंतु त्यातूनही, हा व्यक्ती कधीमधी दारू प्यायचा. पण, स्वतःच्या पैशाने बिलकुल नाही बरं का. दारूसाठी स्वतःच्या खिशाला त्याने कधीच चाट दिलेला मी पाहिला नाही.
त्याला दारू पिण्याची तलफ झाली, कि मला म्हणायचा.. पंडितराव, तुम्हाला दारू प्यायची इच्छा आहे का..?
सवयी प्रमाणे, मी सुद्धा त्याला नाही म्हणून सांगायचो.
त्यावर तो म्हणायचा, तुम्ही नुसतं हो तरी म्हणा राव..! मग मी, बळेबळेच त्याला होकार द्यायचो.
मग तो, त्याच्या एखाद्या गिर्हाईकाला तिथे बोलवून घ्यायचा. आणि, त्याला सांगायचा.
दोन गार बेर घेऊन ये ( तो बियरला बेर म्हणायचा..! ) पंडित रावांना आज इच्छा झालीय. आणि विनाकारण, ते बिल तो माझ्या नावे फाडायचा..!
तो बिचारा देणेकरी, त्याच्या सावकारी खाली झुकलेला असायचा. गपगुमान मारून मुटकून तो दोन बियरच्या बाटल्या घेऊन यायचा. आणि, मी पीत नाहीये असं समजल्यावर. त्यातील एक बियर तो देणेकरी स्वतः प्यायचा. त्यामुळे, किमान बियर करीता त्याचे पैसे गेल्याचं त्याला दुखः तरी होत नसायचं.
या बाबाने, पै-पै करून पैसा कमवला, रग्गड माल आहे त्याच्याकडे. पण त्याने, कधीही मोकळ्या हाताने स्वतःकरिता खर्च केला नाही. तर, दुसऱ्या कोना व्यक्तीला खर्च करायचा विषय खूप लांब होता. कधी देवधर्म नाही कि हौस मौज नाही. तो बहाद्दर पैसे खर्च होण्याच्या भीतीने कधी बाहेरगावी फिरायला सुद्धा गेला नाही. खास सांगायला गेलं तर, हा पुण्याच्या बाहेर कधी गेलाच नाही..!
मध्यंतरी..
माझे काही मित्र आणि मी बाहेरगावी फिरायला निघालो होतो. संध्याकाळच्या मज्जेकरिता वारुणी खरेदीसाठी आम्ही एका वाईनच्या दुकानापाशी आमची गाडी थांबवली.
माझे बाकी मित्र वारुनी खरेदी करण्यात व्यस्थ होते. आणि माझं लक्ष गेलं, तर.. त्या दुकानाबाहेर माझ्या त्या सावकार मित्राचा एकुलता एक मुलगा तिथे उभा होता. त्याने, त्याच्यासोबत असणाऱ्या एका मुलाकरवी दारूची बाटली मागवून घेतली होती. तो मुलगा दारूची बाटली घेऊन आला. आणि माझ्या मित्राच्या मुलापाशी येऊन थांबला.
मी मुद्दामच.. त्याला आवाज दिला, अरे क्षितीज ओळखलस का मला, मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे. अशी ओळख सुद्धा मी त्याला सांगितली. पण त्याने काही मला ओळखलं नाही. कि ओळखून न ओळखल्या सारखं केलं ते त्याचं त्यालाच माहित. कारण, त्याचा बाप मला नेहेमी सांगायचा. आमच्या पोरांना पाच पैशाचं व्यसन नाहीये. आणि, इथे तर याने माझ्या समोर दिडेक हजार रुपयाचा दारूचा खंबा विकत घेतला होता.
बघा ना, बापाने पै-पै करून पैसा जमवला. कधी रुपाया म्हणून खर्च केला नाही. आणि, त्याचा मुलगा मात्र महागड्या दारूचे खंबेच्या खंबे रिचवतोय.
काही लोकांना याच गोष्टीची अक्कल नसते. आपण, जे कमवतोय त्याचा स्वतःला उपभोग घेता येत नसेल. तर कमवलेला तो पैसा काय कामाचा..? ते सगळं कमावून ठेवणं अगदी कवडीमोल आहे. आणि नाहीतर मग, अशी चोरांची धन आहेच कि..!