Sunday, 24 June 2018


काल.. पिंप-वड ( पिंपरी चिंचवडला शॉर्टकट मध्ये पिंपवड म्हणतात बरं का. ) मधील, चिखली गावातून देहूगावकडे जात असणाऱ्या रोडवर. हॉटेल वेदांत मध्ये आम्ही सहकुटुंब जेवण करायला गेलो होतो. वेदांत हे नाव जरी तुम्हाला शाकाहारी वाटत असलं. तरी, येथील मांसाहार निव्वळ अप्रतिम आहे.
हे हॉटेल तसं थोडं आडमार्गाला आहे, त्यामुळे इथे येताना तुम्हाला स्पेशल वेळ काढून यावं लागेल. हॉटेल अगदी साधं आहे, पण बिलकुल साफ सुतरं आहे. हॉटेलमध्ये गर्दी म्हणाल तर, दुपारच्या वेळी हॉटेलच्या बाहेर वीसेक दुचाक्या आणि चार पाच कार पार्क असलेल्या तुम्हाला हमखास आढळतील. हे दुमजली छोटेखानी हॉटेल आहे. खालच्या बाजूला साठ सत्तर लोकांची बैठक व्यवस्था आहे. आणि वरील बाजूस, फॅमिली रूम आहे. तिथे तीसेक लोकं जेवायला बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आणि इथे मिळणाऱ्या सगळ्याच थाळ्या खूपच स्वस्त आणि मस्त आहेत. इथे मिळणारी मटन थाळी अवघी दोनशे रुपयाला आहे.
इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचं जेवण मिळतं. मटन थाळी, चिकन थाळी आणि अंडा थाळी सुद्धा इथे उपलब्ध आहे. मी याठिकाणी स्पेशल मटन थाळी खाण्यासाठी गेलो होतो.
एका मोठ्या ताटात, छोट्या डिश सारक्या पितळी मध्ये, मटन रस्सा असतो. आणि दुसर्या डिशमध्ये मटन सुक्का असतं. मटन सुक्का आणि मटन रस्सा, या दोन्हीची चव अगदी भिन्न आहे. हे दोन्ही जिन्नस बनवताना वेगवेगळा आणि विशिष्ट प्रकारचा मसाला वापरला आहे. ते आपल्याला मटन आणि रस्सा खाल्ल्या बरोबर लगेच जाणवतं. इथे मिळत असणारा मटन रस्सा फारच अफलातून आहे. त्याला एक वेगळीच चव आहे. जी चव आपल्याला घरात किंवा इतर ठिकाणी मिळणं शक्य नाही. शिवाय हा चवदार रस्सा अमर्याद आहे. या मटन थाळीसोबत दोन मोठ्या बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी दिल्या जातात. ( चपाती मिळत नाही. ) आणि इंद्रायणी तांदळापासून बनवलेला डीशभरून चिकट भात सुद्धा दिला जातो.
इथे उपलब्ध आहे म्हणून.. सुरवातीला मी, मटन कलेजी आणि मटन वजडी मागवून घेतली. वरील दोन्ही विषय माझे फार विक पॉईंट आहेत. जेवणाची थाळी येईपर्यंत, तोंड चालू राहावं म्हणून हे नियोजन.
अगदी कडक शिजवलेली मटन कलेजी, आणि.. फेर वजडी सोबत, मऊशार फेफस्याचे काही पातळ तुकडे वजडीची रंगत खूपच वाढवून गेले. कलेजी आणि वजडी सुद्धा वेगळ्याच पद्धतीने बनवली गेली होती. त्यावर वरून थोडा मिठाचा शिडकावा केल्यासारखा वाटत होता. त्यामुळे त्याचा खारट स्वाद आणखीन झिंगाट झाला होता. तेवढ्यात ते सुटसुटीत असं मटणाचं ताट माझ्या समोर आलं.
ज्वारीच्या पांढर्याशुभ्र गरम भाकरी सोबत मटन रस्सा कुस्करून खाण्यात एक वेगळीच मजा असते. एक घास भाकरीचा, कि दुसरा घास मटणाचा. नंतर जमेल तसं चमच्याने वजडी आणि कलेजीचा समाचार घेणे. आणि.. दोन्ही हाताने ती लहान पीतळी उचलून, तो मधुर रस्सा भुर्रर्र करून ओरपणे. जवळपास अर्धा तासभर आमची हीच कसरत चालू होती.
खूपच अप्रतिम असं जेवण होतं. रस्सा कितीही पिला तरी, पोट भरतंय पण मन भरत नाही. अशातली गत होते. आणि जेवणाच्या शेवटला, इंद्रायणी वाणाच्या गीजग्या भाताला रश्यामध्ये अगदी पात्तळ कालवून, त्याची नॉनव्हेज खीर करून प्यावी. हा प्रकार एकदा नक्की करून पहा. हा खूपच अफलातून प्रकार आहे. तर इथे तुम्ही एकदा नक्की जेवायला जा. हे हॉटेल, तुमची जिव्हा तृप्त करणारच याची शंभर टक्के खात्री देतो.


Friday, 22 June 2018

बरेच दिवस झाले, व्हाट्सअप वर या थाळीच्या क्लीपने अगदी धुमाकूळ घातला होता. म्हणून, हा नेमका कसा प्रकार प्रकार आहे. ते पाहण्यासाठी आणि चाखण्यासाठी, परवा मुद्दाम मी या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो.
स्वराज्य म्हणजे, अगदी टिपिकल स्वराज्य. बहुतेक हे हॉटेल मालक, शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त असावेत. असं एकंदरीत तिथे कॅश काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीला. आणि त्यांच्या हॉटेलला पाहून मला जाणवलं.
पुण्यात.. शुक्रवार पेठेतील, बाफना पेट्रोल पंपा शेजारी अगदी मध्यवस्तीत हे छोटेखानी हॉटेल आहे. अगदी साफ सुतरं असं हे सोलापुरी पद्धतीच्या जेवणाचं हॉटेल. एकावेळी, पाच पन्नास लोकं जेवायला बसतील अशी सुटसुटीत जागा आहे.
इथे कसलीच गर्दी किंवा गोंधळ नसतो. अगदी टिपिकल हौशी खवय्ये मंडळी इथे जेवायला येत असतात. असं एकंदरीत मला आढळून आलं. वेटर सुद्धा खूप चांगली सर्व्हिस देतात.
अगदी सुरवातीला.. एका तबकामध्ये, वेटर किनलेची पाण्याची बाटली, आणि त्यासोबत कांदा आणि लिंबू असलेली डिश घेऊन आला. इथे साधं पाणी दिलं जात नाही. मोकळ्या ग्लासा सोबत फक्त मिनरल वाटर इथे सर्व्ह केलं जातं.
त्यानंतर.. अवघ्या दहाच मिनिटात, आमची मटणाची थाळी आली.
या थाळीमध्ये, अळणी रस्सा, तांबडा रस्सा, मटन करी, खिमा वाटी, मटन लोणचं, खिमा बॉल, रस्सा वाटी, सोलकढी आणि.. तीन भल्या मोठ्या चपात्या किंवा दोन भाकरी असा एकुणात असा भरगच्च बेत असतो.
नेमकं अशाच पद्धतीने अगदी सेम, पण चिकन थाळीचा सुद्धा इथे बेत असतो. याशिवाय वेगवेगळ्या डिशेस सुद्धा आहेत.
मी जेवणाला सुरवात केली.. सुरवातीला मी सगळे रस्से चमच्याने ट्राय केले. रस्सा ओरपण्यासाठी एकदम तोंडाला वाटी लावणं मला काही जमत नाही.
अळणी सूप ठीकठाक होतं, बाकी तांबडा रस्सा मस्त जमला होता. शिवाय, मटन लोणचं हा आंबट प्रकार मला खूप आवडला. त्यातील जाडसर रस्सा आणि मटन सुद्धा अगदी लोणच्या सारखं मुरलं होतं. खिमा बॉल आणि खिमा वाटी, जवळपास अगदी जुळ्या चवीच्या होत्या. मटन कॉन्टिटी सुद्धा बऱ्यापैकी असते.
अगदी सुरवातीला मी एक डिश मागवून घेतली, आणि ताटातील दोन चपात्या बाजूला काढून ठेवल्या. त्यानंतर, चपातीचा एक घास मोडला, आणि मटन लोणच्या मध्ये बुडवला. मटन लोणच्याची अफलातून चव माझ्या दाताला मस्त अशी आंबट कळ देऊन गेली. त्यावर.. विषय बदली साठी, हाडकाचा बाऊ मस्त चघळून घेतला. मटन सुद्धा अगदी लुसलुशीत शिजलेलं होतं. मग काय, आळीपाळीने.. लोणचं, खिमा, आणि साध्या मटणाची आपसात जुगलबंदी सुरु झाली. हाताची आणि तोंडाची एक घाई उडाली, सोबतीला साथ द्यायला रस्सा वाट्या होत्याच. मी कशीबशी दीड चपाती संपवली, आणि केसरी भाताला ताटात जागा करून दिली. आणि सरतेशेवटी, पाचक सोलकढीने जेवणाचा समारोप झाला.
सोलापुरी विषय असल्याने, जेवण थोडं झटकेबाज होतं. पण अगदी सहन होणार नाही, असंही नव्हतं. आणि विशेष म्हणजे.. अळणी रस्सा, तांबडा रस्सा आणि सुगंधी केसरी बासमती राईस अमर्यादित मिळतो. मस्त हॉटेल आहे, चांगली चव आहे. शिवाय रेट सुद्धा अगदी वाजवी आहेत.
हौशी खवय्यांनी एकवेळ अवश्य भेट द्या..!


Wednesday, 20 June 2018

माझ्या एका रिक्षाचालक मित्राकडे,
पावसाळ्यात रिक्षामध्ये, पॅसेंजर लोकांच्या अनावधाने विसरलेल्या बऱ्याच छत्र्या त्याच्याकडे जमा व्हायच्या.
तेंव्हा..
एवढ्या छत्र्यांचं करायचं तरी काय..?
असा विचार करून..
त्यातील, दोन एक छत्र्या.. दरवर्षी तो मला मोफत देऊ करायचा..
काळाच्या ओघात, तो मित्र सुद्धा आता या जगातून नाहीसा झाला. दुर्दैवाने, आता माझा तो मित्र हयात नाहीये. आणि, त्याने देऊ केलेल्या छत्र्या सुद्धा माझ्याकडे नाहीयेत.
हल्ली... प्रत्येक पावसाळ्यात, मी न विसरता नवीन छत्री विकत घेत असतो.
परंतु...
ती छत्री खरेदी करत असताना. मला, तो मित्र सुद्धा कुठेतरी दिसतो, आठवतो आणि, आढळतो सुद्धा..!
हीच आठवण असते, नाही का..!

खरं तर.. हे पाळीव प्राणी वगैरे पाळायची, मला बिलकुल आवड नाही. पण त्यामुळे.. मी मुक्या प्राण्यांवर प्रेम करत नाही, असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही.
माझ्या बिल्डिंगच्या खाली, मध्यंतरी एक मांजर व्याली होती. तिला तीन पिल्लं झाली. मी जाता येता, त्यांना नेहेमी पाहायचो. मला पाहून ती गोंडस पिल्लं घाबरून पळून जायची, किंवा.. एका कोपऱ्यात लपून, मला गुपचूप चोरून पहायची. शेवटी मला सुद्धा वाटलं, यांना आपण काहीतरी खायला देऊयात. म्हणजे त्यांना माझा लळा लागेल.
मग मी, त्यांना रोज पावशेर दुध देऊ लागलो. एका मस्त आणि स्वच्छ वाडग्यात त्यांना दुध दिल्यावर, मस्त मजेत ते तिघे दुध पिऊ लागले. त्यानंतर... मला पाहिल्यावर, त्यांनी चक्क मला आवाज द्यायला सुरवात केली. आणि मला, ते हक्काने दुधाची मागणी सुद्धा करू लागले.
आजच्याला मला सुद्धा त्यांना दुध दिल्याशिवाय पुढे जाऊ वाटत नाही. नंतर, ती पिल्लं मला दिसेनासे झाले. कि, मी त्यांना आवाज देऊ लागलो..
बच्चू.. फीस, फीस, फीस, फीस..!
आता बाकी.. हा आवाज दिल्याबरोबर, सगळी पिल्लं जिथे असतील तिथून अगदी धावत पळत यायचे. ते दृश्य पाहून, मला सुद्धा खूप समाधान वाटायचं. पण हल्ली ते जरा मोठे झाल्याने, सगळ्या गावभर फिरत असतात. मला ते एका जागेवर काही भेटतच नाहीत. पण मी मात्र अजूनही त्यांची आवर्जून वाट पाहत असतो.
माझ्या ऑफिसमध्ये.. चार वर्षापासून एक झुपकेदार शेपटीची इंग्लिश मांजर कायमस्वरूपी वास्तव्यास होती. गेल्या आठ महिन्यापूर्वी, तिला चार पिल्लं झाली.
ती मांजर, त्या पिलांना अगदी जीवापाड जपायची. पण तिथे असणारा एक हरामखोर बोका.. त्या लहान पिल्लांमुळे, त्याला त्या मांजरीचा सहवास मिळत नाहीये म्हणून. त्या पिल्लांना तो मारायला बघायचा.
आम्ही सगळे मिळून त्याच्या हालचालीकडे भरपूर लक्ष द्यायचो. पण त्या बोक्याने, आमची नजर चुकवत, डाव साधला. आणि, ती चारही पिल्लं मारली, आणि खाऊन सुद्धा टाकली.
निव्वळ मादीचा सहवास मिळावा. म्हणून, मनुष्य किंवा प्राणी सुद्धा कोणत्या थराला जाऊ शकतात. याचा काही नेम नाही. आणि हे सगळं काही, मला उघड्या डोळ्याने पहावं लागलं.
त्यानंतर चार महिन्यापूर्वी.. ती मांजर पुन्हा एकदा व्याली. यावेळी मात्र तिला एकच पिल्लू झालं होतं. थंडीचे दिवस होते, आणि एके दिवशी ते पिल्लू थंडीने काकडून मेलं.
आणि आत्ताच महीन्या भरापूर्वी, त्या मांजरीने पुन्हा एकदा पाच पिल्लांना जन्म दिला. ( या मांजरांचा वेत नेमका कितीवेळा आणि किती महिन्यांनी असतो तेच मला समजेना झालंय. )
यावेळी मात्र.. आम्ही सगळे मित्र सतर्क होतो. Swapnil नावाच्या माझ्या एका मित्राने, त्या पिल्लांना ऑफिसमध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेत नेऊन ठेऊन दिलं. तिथे ती पिल्लं अगदी सुरक्षित होती. त्यानंतर काही दिवसांनी, पिल्लांनी डोळे उघडल्यावर त्यांना पुन्हा एका दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी आणून ठेवलं.
नाही म्हणता, त्या बोक्याची अजून सुद्धा भीती होतीच. पण आम्ही सगळे सतर्क होतो.
आम्ही.. रोजच्या रोज त्या मांजरीला मासे, चिकन, दुध असं खानं आणून देत होतो. त्यामुळे पिल्लांना सुद्धा आईचं भरपूर दुध मिळत होतं.
पण, आठेक दिवसांपूर्वी.. एक विचित्र प्रसंग घडला..!
कधी नाही ते सावध असणारी मांजर.. चिकन खाण्याच्या मूडमध्ये असताना, चुकून तिच्या अंगावरून गाडीचं एक चाक गेलं. आणि ती मांजर जागेवर गतप्राण झाली.
मुका जीव असला तरी, दुःख हे होतंच हो.
आणि मुख्य दुःख म्हणजे, आता त्या पिल्लांचा सांभाळ कोण करणार.? त्यांना दुध कोण पाजणार, त्यांना मायेची पाखर कोण देणार.?
हा प्रकार समजल्यावर.. मला तर खूप टेन्शन आलं होतं. त्यानंतर, मी रोजच्या रोज त्यांना घरून दुध घेऊन जाऊ लागलो. बाकी इतर मित्र सुद्धा, त्यांना काहीबाही खायला घेऊन येऊ लागले. चक्क आमचे साहेब सुद्धा त्यांच्या दुधाकरिता पैसे देऊ लागले.
ज्या दिवशी हा अपघाती प्रकार घडला.. त्या रात्री, आईच्या आठवणीने सगळी पिल्लं,
रात्रभर.. म्याव, म्याव करत शोक करत बसली होती.
त्या दिवशी मला रात्रपाळी होती, आणि काही केल्या मला त्यांचे हाल पाहवत नव्हते. आम्ही त्यांच्या जवळ गेलं, तर घाबरून ती पिल्लं एका कोनाड्यात लपून बसायची.
शेवटी आम्ही मित्रांनी, त्यांना एक खोक्याचं घर करून दिलं. त्याला वरच्या बाजूने पाऊस लागू नये अशी सोय केली. गेल्या चारपाच दिवसात, त्यांनी आणि आम्ही सुद्धा खूप सोसलं.
पण काल संध्याकाळी.. सगळी पिल्लं, आमच्या कोठी रूम मध्ये येऊन मस्त दंगामस्ती करत होते. त्यांच्या बाललिला पाहून, मी मनोमन खूप हरखून आणि सुखावून गेलो.
बहुतेक.. आई गेल्याचं दुःख आता ते विसरले आहेत. आणि आपल्या पायावर उभे राहायला समर्थ सुद्धा झाले आहेत.
काल संध्याकळी, त्यांचा बाप असणारा बोका सुद्धा तिथे येऊन गेला. तसे सगळी पिल्लं लगेच आशेने त्याच्याकडे गेले. पण त्याला त्याचं काही खास आकर्षण होतं, असं मला दिसलं नाही. जाऊदेत.. त्याने नाही पाहिलं तरी चालेल.
फक्त त्याने, किंवा दुसऱ्या कोणत्या बोक्याने त्यांना मारू नये. एवढी एकच माफक इच्छा आहे.
या पृथ्वीतलावर, जगण्याचा सगळ्यांना अधिकार आहे..!!

मी शक्यतो हॉस्पिटल मध्ये एडमीट असणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला भेटायला जात नाही.
त्याला तसं फार मोठं कारण सुद्धा आहे,
फार पूर्वी ज्यावेळी माझा फार मोठा अपघात झाला होता. त्यावेळी, मला भेटायला दवाखान्यात मित्रांच्या नातेवाईकांच्या अगदी झुंडीच्या झुंडी यायच्या. आजवर कधीही, महिनोन्महिने मला न भेटणारे लोकं. त्यावेळी मला भेटायला आले होते.
ते त्यांच्या ठिकाणी भले दुरुस्त असतील. पण साहजिक.. मला संशय येणारच ना...!
मला नको त्या व्यक्ती भेटायला यायला लागल्या आहेत. म्हणजे माझ्या जीवाचं काही बरं वाईट तरी होणार नाहीये ना..?
त्यामुळे.. शेवटचं भेटून घेऊयात..!
म्हणून तरी, हे सगळे मला भेटायला येत नसावेत ना.?
पण सुदैवाने तसं काहीएक नव्हतं.
पण मी, तसा खूप शंकेखोर मनुष्य. शेवटी, मी माझ्या डॉक्टरांना एकांतात विचारलंच.
डॉक्टर सगळं काही ठीक आहे ना.? काही विपरीत घडणार असेल तर तसं मला सांगा..!
त्यावर डॉक्टरांनी मला धीर दिला, आणि काही काळजी करू नकोस म्हणाले.
तेंव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.
कारण अपघातामध्ये माझ्या डोक्याला फार मोठा मार लागला होता. असो, सुदैवाने त्या दुखण्यातून मी सहीसलामत बाहेर पडलो. पण तेंव्हापासून, मी एक गोष्ट आजवर करत आलोय.
माझा कोणी मित्र किंवा आप्तस्वकीयांपैकी कोणी व्यक्ती आजारी असेल. तर मी त्याला सहसा दवाखान्यात भेटायला जात नाही. नाही म्हणता, जमेल तितकं टाळायचा प्रयत्न करत असतो. आणि तो संभाव्य व्यक्ती बरा होऊन घरी आला. कि मस्तपैकी त्याच्यापाशी बसून तास दोन तास घालवत असतो. त्याला, त्याच्या आवडीचा खाऊ घेऊन जात असतो.
खरं तर, रुग्णाला दवाखान्यात भेटायला जाऊन आपण त्याला एकप्रकारे कष्टच देत असतो, त्यावेळी त्याला आरामाची खूप आवश्यकता असते. आणि नेमकं त्यावेळी, आपण त्याला नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो. आणि त्याला, खऱ्या अर्थाने आणखीन आजारी पाडत असतो.
त्याकरिता.. तुमचा कोणी मित्र किंवा आप्त आजारी असेल, दवाखान्यात एडमीट असेल. त्यावेळी तुम्ही त्या रुग्णाला न भेटता, त्याच्या नातेवाईकांना भेटा. त्याच्या उपचाराकरिता काही कमी जास्ती मदत लागतेय का त्याची विचारणा करा. ते तर नक्कीच नाही म्हणतील, पण परिस्तिथी पाहून तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे पाकिटातून त्यांना हजार पाचशे रुपयाची मदत नक्कीच करू शकता. किंवा.. चुकून दवाखान्यात भेटायला गेलाच, आणि तिथे औषध गोळ्यांची चिट्टी वगैरे दिसत असेल. तर हक्काने तुम्ही तो खर्च उचलू शकता.
कोणाच्याही आजारपणात, ते संभाव्य घर खूपच जेरीस आलेलं असतं. त्यावेळी आपला हा आर्थिक आधार त्यांना लाख मोलाचा सहारा देऊन जातो.
आजारी व्यक्तीच्या तोंडाला चव राहत नाही. त्यामुळे बरीच जनं त्यांना महागडे बिस्किट्स, केक्स, जुसेस, मोठाले बुके घेऊन जात असतात. पण त्यावेळी, हे सगळं घेण्यासाठी त्याचं शरीर त्याला साथ देत नसतं. किंवा त्यावेळी ते सगळं स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. जमल्यास वरीलप्रमाणे आपण त्याला कोणतीही मदत करू शकतो.
आजकाल आपण, लग्नात आहेर देण्याचं बंदच केलं आहे. तर त्या हिशोबातील काही पैसा आपण या मार्गाने नक्कीच खर्च करू शकतो. लग्नात सगळे आनंदी असतात, त्यामुळे कोणी आपल्याला आहेर केला कि नाही..? हे पाहायला, यजमानाकडे वेळ नसतो.
परंतु..आजारपणातून बाहेर पडताना आपण केलेली हि लाख मोलाची मदत. घेणारे आणि पाहणारे सुद्धा भरपूर असतात.
त्यामुळे..याप्रकारे त्या कुटुंबाला मदत करून, आपण त्यांना आर्थिक विवंचनेतून नक्कीच बाहेर काढू शकतो. याची मला पुरेपूर खात्री आहे..!

आमच्या लहानपणी 'बुच' नावाचा एक रबरी बॉल खूप फेमस होता. त्याचं खरं नाव काय होतं. ते, आजवर सुद्धा मला माहिती नाहीये. वजनाला जड, मऊ आणि भरीव असा तो बॉल असायचा..
त्याला आपटल्यावर... तो बॉल खूप उंच उडायचा. तो बॉल विकत घ्यावा म्हंटलं तर आमची तशी ऐपत नव्हती. त्यामुळे, मला मन मारून गप्प राहावं लागायचं.
आता मात्र, तो बॉल बाजारात कुठेही दिसत नाही..!
लहानपणी..माझे काही इंग्रजी शाळेत शिकणारे मित्र मैत्रिणी त्या बॉलने खेळत असत. आम्ही नगरपालिकेच्या शाळेत शिकणारी मुलं. त्यामुळे आम्हाला मात्र, ते त्यांच्यासोबत कधी खेळायला घेत नसत. मला समजत नसलेली इंग्रजी भाषा, एक दुसर्याशी बोलून ते मला हिणवत असत. माझी टिंगलटवाळी करत असत.
कधीतरी, आपल्याला सुद्धा ते खेळायला घेतील. ह्या वेड्या आशेने, मी हताशपणे तासंतास त्यांचा खेळ पाहत बसायचो.
परंतु, त्यांना माझी कधीच दया येत नव्हती.
" सालं, हे मन हि असं असतं ना. नेमकं जे मिळणार नाही, त्याचाच पिच्छा पुरवत असतं. "
तर.. आम्ही ज्या ठिकाणी खेळायचो, त्या छोट्याश्या मैदानाच्या बाजूला एक नाला होता. तिथं, हि मुलं मुली बॉल झेलाझेली, तर कधी लींगोरच्या खेळत असायची. खेळता-खेळता, चुकून त्यांचा बॉल सुद्धा त्या ओढ्याच्या गाळात जाऊन रुतून बसायचा.
हि सगळी साहेबाची भाषा शिकणारी आणि बोलणारी मुलं, अशा वेळेस त्या गाळात रुतलेला बॉल कोण काढणार..? यावर सल्ला मसलत करायचे.
जो तो आपल्या जागी दुरुस्त असायचा. त्या गाळात जायला, कोणीच तयार नसायचा.
माझ्या मनाची, खोटी आशा असायची.
जर त्यांना, आपण तो बॉल शोधून दिला. तर, ते आपल्याला खेळात घेतील.
मी सुद्धा, दुरूनच त्यांच्या बोलावण्याची वाट पाहायचो.
पण, ती मुलं मुली सुद्धा खूप हट्टी. मला त्यांचं बोलावणं काही येत नसायचं.
शेवटी, मीच त्यांना म्हणायचो... मी, शोधून देऊ का तुमचा बॉल...!
ते सगळे, एकमेकाकडे पहायचे. त्यांच्या नजरेची खुनावाखुनाव व्हायची.
आणि, त्यातील कोणीतरी एक जन मला तशी अनुमती द्यायचा.
त्यावेळेस, मी त्यांना वचन मागायचो.
बॉल शोधून दिल्यावर, मला तुमच्या सोबत खेळायला घेणार ना..!
नाकं मुरडत का होईना. त्यावेळी ते मला, हो म्हणायचे.
आणि मी, त्या काळ्या वास मारणाऱ्या गुडघाभर गाळामध्ये उतरायचो. बॉल कुठे पडला आहे, ते नेमकं ठिकाण माहित नसल्यामुळे. जो मुलगा मुलगी मला सांगेल त्या ठिकाणी मी पायाने बॉल चाचपायचो. बराच वेळ गाळ तुडवून व्हायचा. पण, बॉल काही सापडायचा नाही.
शेवटी कधीतरी, एकदाचा तो बॉल माझ्या पायाला जाणवायचा. त्या घाणेरड्या गाळात मी माझा डावा हात घालून तो बॉल बाहेर काढायचो. त्या बॉलला, ओढ्यातल्या त्याच गढूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचो. आणि, तो बॉल पुन्हा त्यांच्या स्वाधीन करायचो.
मोठ्या आशेने, मी हात पाय धुवून त्यांच्या सोबत खेळायच्या तयारीला लागायचो.
त्यांनतर पुन्हा एकदा, त्यांच्या नजरेची खुनवाखुनाव व्हायची. आणि, ते एकमेकांना म्हणायचे.
ए... आजचा खेळ संपला रे. आता, आपण उद्या खेळुयात..!
शेवटी निराश मनाने, मी घरी जायचो. गाळात उतरल्यामुळे माझ्या अंगाचा घाण वास येत असायचा. त्यामुळे घरी गेल्यावर आईचा मार ठरलेला असायचा. पुन्हा, गार पाण्याने अंघोळ करून स्वच्छं होऊन अभ्यासाला बसायचं. असं, बरेच वेळा घडलं होतं.
या नको त्या मानसिकतेला, त्या मुलांचे आईबाप सुद्धा अपवाद नसायचे. त्यांच्या घरी, चुकून मी कधी गेलोच. तर ते, सुद्धा मला हिणवायचे.
हि पोरं काही शिकणार नाही. नुसती उंडरत राहणार, यांचं काही खरं नाही..!
पण, नियतीला हे सगळं मान्य नव्हतं, मला हिणवणारी तीच मुलं आज कशातच जमा नाहीयेत. मी त्यांना, प्रत्येक गोष्टीत कधीच मागे सोडून दिलं आहे. आज, त्यांचे तेच पालक मला भेटले कि माझा खूप हेवा करतात. आणि, मी कसा प्रयत्नांची पराकाष्टा करून पुढे गेलो. याचे गोडवे गातात..
मित्रहो... हे सगळं सांगायचा उद्देश एकच आहे.
दिवस तसेच राहत नाहीत हो. हे, प्रत्येकाच्या ध्यानात यायला हवं..!

फार जुनी गोष्ट आहे. आता नेमकं आठवत नाही. पण, आमच्या प्रतीकचा बहुतेक दुसरा वाढदिवस असावा. तेंव्हा, माझी परिस्थिती अगदी जेमतेमच होती. रोजच्या खाण्याची भ्रांत असायची. तर, असले सण उत्सव कधी साजरे करायचे..? पण, माझ्या बायकोची खूपच हौस. काहीही झालं तरी, वाढदिवस साजरा करायचाच. त्याकरिता, काटकसर करून तिने, तीन चारशे रुपये जमा करून ठेवले होते. त्या पैशामध्ये, मी सगळ्या वस्तू खरेदी केल्या. मुलाला नवीन कपडे, केक, फुगे, टोप्या फरसाण आणि बरच काही..
घरगुती कार्यक्रम होता. जवळपास राहणाऱ्या लहान-लहान मुलांना कार्यक्रमाला बोलावून घेतलं होतं. केक कापला गेला, मोठ्या आनंदात प्रतीकचा वाढदिवस साजरा झाला. आम्ही उभयतांनी, केक कापून प्रतीकला भरवला. आणि तोंडात केक घेतल्या बरोबर त्याने तोंड वाकडं केलं. आम्हाला वाटलं, भूक नसेल त्याला. नंतर, लहान मुलांसाठी सगळ्या डिश भरून झाल्या. त्या सगळ्या मुलांना वाटल्या. पण कोणीच मुलगा, त्या केकला तोंड लावत नव्हता, शेवटी मी तो केक चाखून पहिला. तर, त्याचा खूप कुबट असा वास येत होता. मी ताबडतोब, सगळ्या मुलांच्या डिशमधील केक काढून घेतला. आणि, त्या केकच्या दुकानात जाऊन त्या बेकरी वाल्याला घडलेली हकीकत सांगितली. तो व्यक्ती, असं होणं शक्यच नाहीये म्हणू लागला. शेवटी मी त्याला म्हणालो. बरं ठीक आहे. तुम्ही, या केकचा एक तुकडा खाऊन पहा.
त्या दुकान मालकाने, त्या केक मधील एक मोठ्ठा तुकडा आपल्या तोंडात कोंबला..आणि, अगदी चवीने खात त्याला संपवला सुद्धा. आणि, वर मानेने तोंडाने हावभाव करत तो मलाच कोड्यात पाडू लागला. मला समजलं, थोडेसे पैसे वाचवण्या करिता. हा मनुष्य शीळा केक खाऊन गेला आहे..!
काय करावं..? मला तर काहीच सुचेना. शेवटी, मी एक काम केलं. त्याच्या दुकानात कामाला असणार्या एका अल्पवयीन मुलाला जवळ बोलावलं. आणि, त्याला तो केक खायला दिला. त्या मुलाने, तो केक तोंडात टाकला. आणि, चाऊन त्याला गिळायला सुरवात केली. काही क्षणात त्या मुलाला शिळ्या केकची चव जाणवली. आणि तो मुलगा, तिथेच भडभडा ओकला.
आणि मला म्हणाला. किती घाण आहे हा केक..!
मी, त्या दुकान मालकाकडे पाहत होतो. तो सुद्धा, खूप खजील झाला होता. त्याने, खाली वाकून त्याच्या काउंटर मधून दुसरा केक काढला. आणि, मला दिला.
मी त्याला म्हणालो... केक नको, माझे पैसे मला परत दे..!
तुझ्या दुकानातल्या, कोणत्याच खाद्य पदार्थावर आता माझा विश्वास उरला नाहीये. लहान मुलांना, विषबाधा झाली असती तर ते कितीत पडलं असतं..?
त्याने, गपगुमान माझे पैसे मला परत दिले. त्या पैश्याचा, मी दुसर्या दुकानातून केक नेला. आणि, सर्व मुलांना खाऊ घातला.
त्यानंतर, काही कालावधीत त्या माणसाचं ते दुकानच बंद पडलं. पुन्हा त्याने, त्या ठिकाणी दुसरा व्यवसाय सुरु केला. तो सुद्धा म्हणावा असा चालला नाही. पुन्हा तिसरा, आता त्याच ठिकाणी त्याने चौथा व्यवसाय सुरु केला आहे. त्याचा, सध्याचा व्यवसाय चालतो कि नाही. ते मला माहित नाही. कारण, त्याच्या दुकानात असलेला माल वर्षभर जरी खपला नाही. तरी, त्याचं त्यात काही बिघडणार नाही. सध्या, अशा प्रकारचा माल त्याने त्याच्या दुकानात विक्रीसाठी ठेवला आहे. " प्लायवूड "
नियत में खतरा, तो.. झोलीमें पत्थरा..!!

काल दुपारी.. आमच्या ऑफिस मधील मॅडम माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या,
चला.. आपल्याला बाहेर जेवायला जायचं आहे..!
मी त्यांना म्हणालो.. अहो माझं जेवण झालं आहे. तर त्या म्हणाल्या, चला.. साहेब सुद्धा येणार आहेत. माझ्या मुलीने आणि जावयाने पुण्यात एक नवीन हॉटेल सुरु केलं आहे. आपल्याला तिथे जायचं आहे. शेवटी, नाही हो करता आम्ही सहा जन त्या हॉटेलात जेवायला निघालो.
सहकारनगर मध्ये, पर्वती पायथ्याच्या डाव्या बाजूला, शे पाचशे मीटर अंतरावर..
शिंदे शाळेसमोर, " #दख्खन_डेलिकसीज " नावाचं एक नवीनच हॉटेल सुरु झालं आहे. प्रत्यक्षदर्शी बाहेरून तरी हॉटेल मला अगदी ठीकठाक वाटत होतं. आतमध्ये गेल्यावर, पहिलं आमचं एकच काम होतं. सगळं हॉटेल फिरून पाहणं. कारण, स्पेशल गेस्ट होतो ना आम्ही.
आतमध्ये प्रवेश केल्यावर, हॉटेलच्या डाव्या भिंतीवर, हंपीच्या प्रसिद्ध रथाचं फारच सुरेख हॅन्ड मेड पोर्ट्रेट लावलं होतं. ती अप्रतिम कलाकारी पाहत आम्ही पुढे निघालो. काही पावलं पुढे चालून गेल्यावर, डाव्या हाताला एका उंच कठड्यावर, काही महिला गॅस शेगडीवर भल्या मोठ्या ज्वारीच्या भाकऱ्या थापत असताना मला दिसल्या. हॉटेलमध्ये चूल पेटवता येणार नाही, म्हणून गॅसवर भाकरी बनवत होते. आणि त्या भाकरी सुद्धा बऱ्याच मोठ्या आणि पांढऱ्या शुभ्र होत्या.
माझ्या पोटात जागा नसल्याने, मी मनामध्ये उगाचच चरफडत होतो. आज मॅडमने मला लवकर तरी सांगायचं होतं. मी कशाला जेवलो असतो..?
बाहेरून सगळं हॉटेल फिरून झालं. आणि, आम्ही सगळे आतमध्ये प्रवेशित झालो.
आणि..येवढ्या कडक उन्हाळ्यात, एसीच्या गार वार्याची एक झुळूक माझ्या मनाला फार मोठा गारवा देऊन गेली. हॉटेलच्या आतमध्ये.. फारच प्रसन्न वातावरण होतं. सगळं हॉटेल एसीने परिपूर्ण आणि कस्टमर्स ने भरगच्च असं, आणि.. अगदी राजवाड्या सारखं होतं.
आता.. आमच्या जावयाचं आणि मुलीचं हॉटेल असल्यामुळे, आमची सगळी सरबराई होणार.
यात तिळमात्र शंका नव्हती.
आता.. स्टार्टरला काय मागवायचं..? हा फार मोठा प्रश्न होता. कारण मी काही जेवणार नव्हतो. म्हणजे, थोडं फार काहीतरी चाखणार होतो. त्यात आमच्या सोबत असणाऱ्या दोन महिला, अधिक मासामुळे शाकाहारी झाल्या होत्या.
आणि, उरलेले आम्ही चौघे.. येउद्या म्हणणारे होतो..!
झालं.. शेवटी ऑर्डर दिली गेली. एक सुरमई फ्राय, चिकन पकोडे, मटणाची उकड ( अळणी मटन ) एक व्हेज बिर्याणी, एक पनीर मसाला आणि दोन मटन बिर्याणी मागवण्यात आल्या. शाकाहारी मंडळीसाठी, व्हेज पकोडे मागवले गेले. सगळी ऑर्डर आम्ही एका दमात देऊन टाकली.
तितक्यात कोणी तरी म्हंटल, इथे पाया सूप फार छान मिळतो. झालं, लगेच तीन पाया सूप सुद्धा मागवण्यात आले.
थोड्याच वेळात.. आमच्या समोर चिकन पकोडे आणि व्हेज पकोडे आले. आणि सोबतच मटणाची उकड सुद्धा आली. आणि त्यामागोमाग, स्टीलच्या भल्या मोठ्या वाडग्यात पाया सूप सुद्धा आला.
नाही म्हणता.. हा सगळा सांग्रसंगीत कार्यक्रम पाहून, माझी भूक सुद्धा चाळवली होती.
मी.. एक चिकन पकोडा तोंडात घातला.. आणि काय सांगू, वरून खरपूस असणारा अगदी मऊसुत चिकनचा तुकडा, कधी स्वाहा झाला ते मला सुद्धा समजलं नाही. सुरमई फ्राय सुद्धा झकास होती. त्यासोबत मिळणारा सलाड, फारच लाजवाब होता. अर्धवट तळलेला कांदा, कोथंबीर आणि लिंबाच्या रसात भिजवलेला पात्तळ कांदा, हा प्रकार मी आज पहिल्यांदाच पाहत आणि चाखत होतो.
समोरच.. पिवळ्या जर्द पाया सूपची वाटी माझ्याकडे आ वासून पाहत होती, काळ्या मिरीची नाजूक फोडणी दिलेला तो अळणी रस्सा, एका मोठ्या चमच्याच्याने माझ्या जिव्हेवर स्थिरावला, आणि माझी ब्रम्हानंदी टाळी लागली. तुम्हाला खोटं सांगत नाही, हा सूप मी घरात तर नेहेमी बनवत असतोच. पण आज, बिलकुल मिलावट नसलेला, आणि.. हॉटेलमध्ये मिळणारा अस्सल पाया सूप आज मला चाखायला मिळाला होता.
त्या पाया सुपमध्ये.. पायाची एक नळी सुद्धा डोकावत होती. ( हे मी..माझ्या आजवरच्या खाद्य भ्रमंतीमध्ये पहिल्यांदाच पाहिलं होतं. ) त्या नळीला मी हाताने अलगत उचलून पाहिली. तर, नळीच्या एका टोकाला लोण्याचा गोळा चिटकून बसावा, असा मऊसुत चरबीयुक्त मासाचा तुकडा मला चायलेंज करू पाहत होता. मी तशीच ती नळी माझ्या तोंडात घातली, आणि माझ्या मुखात, तो मटन युक्त लोण्याचा गोळा.. माझ्या जिव्हेला आसमंती घेऊन गेला.
समोरच मटणाची उकड होती, समोर आहे म्हणजे तो विषय चाखून पहिलाच पाहिजे ना.. म्हणून, त्यातील मटणाचा एक भलामोठा तुकडा मी माझ्या मुखात कोंबला. आणि काही समजायच्या आत, तो तुकडा माझ्या तोंडात विरघळून पोटात गेला. आता बाकी मी फारच चवताळून गेलो होतो.. आणि अगदी त्वेषाने, मी वेटरला ऑर्डर सोडली..
मर्दा.. एक पांढऱ्या रश्याची वाटी घेऊन ये कि..!
तो वेटर लगबगीने गेला, आणि पांढरा रस्सा वाटी घेऊन आला. मी सुद्धा घाईघाईने त्याचा एक भुरका ओढला, आणि.. माझ्या जिव्हेला हवा तसा चटका, मारून घेतला.
आता बाकी.. मला हेच समजत नव्हतं. कि.. मी, पुण्यात आहे कि कोल्हापुरात..?
तितक्यात हॉटेलची मालकीण अनुजा आली,
तिच्या आईने.. तिला आमची ओळख करून दिली. त्यानंतर, गपांच्या ओघात बोलता-बोलता अनुजा मला म्हणाली..
कोल्हापुरात आमचं एक हॉटेल आहे. पण ते शुद्ध शाकाहारी आहे. हॉटेल #बासुरी असं त्याचं नाव. बावडा रोडवरील.. दसरा चौकातील, धर्मेश मेहेंदळे यांचं शुद्ध शाकाहारी जेवणासाठी प्रसिध्द असलेलं कोल्हापुरातील हे एकमेव हॉटेल आहे. गेली आठ वर्ष, कोल्हापुरातील शाकाहारी खवयांसाठी हे हॉटेल, सतत झटत असतं.
आता पुढे काय बोलायचं..? खुद्द अन्नपूर्णा प्रसन्न असणाऱ्या कोल्हापूर करांच हे हॉटेल होतं.
आणि आता तर.. त्यांनी पुणेकरांना जिंकायचं ठरवलं होतं.
काही वेळातच, आमच्या समोर मटन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी आली. आणि सोबतच, शाकाहारी मंडळीसाठी पनीरची भाजी सुद्धा आली. पण हि भली मोठी बिर्याणी पाहून, त्यांनी ती पनीरची भाजी परत पाठवून दिली. अस्सल बासमती तांदळात बनवलेली हि बिर्याणी, अस्सल कोल्हापुरी चव आणि सुवास घेऊन आमच्या समोर हजर होती.
या बिर्याणीचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे.. स्टार्टर घेतल्यानंतर, एका व्यक्तीला हि बिर्याणी खूपच होते. अशी भरपूर कॉन्टिटी असलेली बिर्याणी, आम्हा तिघांमध्ये एक सुद्धा संपली नाही.
खरं तर.. हे हॉटेल, मटन, चिकन आणि फिश थाळीसाठी प्रसिद्ध आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मांसाहारी आणि शाकाहारी थाळ्या सुद्धा आहेत..
मटण सुक्का, चिकन सुक्का, तांबडा पांढरा रस्सा, खिमा, मसाले भात आणि दोन भल्यामोठ्या कोल्हापुरी चपाती, किंवा.. गरमागरम भाकरी असा एक नंबर बेत असतो.
व्हेज थाळी सुद्धा मस्त आहे.
खरं तर, मी स्वतः मटन थाळीचा खूप शौकीन आहे, पण माझ्या पोटात रीघ नसल्याने, मला इथे मटन थाळी काही खाता आली नाही.
पण मी खास.. पुण्यातील कोल्हापुरी थाळी खाण्यासाठी इथे पुन्हा एकदा आवर्जून जाणार आहे. आणि हो.. तुम्ही सुद्धा नक्की जा.
येथील थाळीचे रेट तुम्ही म्हणाल तर..
ते फक्त, साडे तीनशे रुपयाच्या आत आहेत. ते सुद्धा थंडगार एसी हॉटेलमध्ये.
आजवर बऱ्याच ठिकाणी, एका थाळीला साडेतीनशे रुपये मोजून. घामाने चिंब भिजून मी जेवण केलं आहे. त्यामानाने, इथे खूपच स्वस्त आणि मस्त सुविधा आहे.
आणि खरं सांगायला गेलं तर, या हॉटेलमध्ये आपल्या खिशाला जास्ती झळ सुद्धा पोहोचत नाही.
या हॉटेलमध्ये.. तुम्ही सुद्धा एकदा जाऊन याच, माझं नक्की नाव काढताल..!

कालच्या.. शेवग्याच्या शेंगा भाजीचा विषय बऱ्याच मित्रांना समजला नाही.
काहींना वाटलं, कि त्या मित्राकडे जेवायला जाऊन माझा पोपट झाला. कारण, मी तर पट्टीतला मांसाहारी आहे.. वगैरे, वगैरे.. .
कसं आहे, अर्धवट ज्ञान किंवा माहिती कधीही हानिकारक असते.
त्याकरिता, हा लेखप्रपंच..!
तर मुळापासून सुरवात करतो..
आम्ही.. लहापणापासूनचे चार जिवलग मित्र आहोत. सुदैवाने आमचं बालपण सुद्धा एकाच गावात गेलं. आणि आजही आम्ही सगळे त्याच गावात आसपासच्या भागात राहत आहोत.
एक विषय असतो बघा, लहानपणीचे मित्र तुम्हाला शेवटपर्यंत अगदी नशिबानेच मिळू शकतात. कारण शिक्षण झाली, कि.. जो तो त्याच्या मार्गाला लागतो. आणि मित्रांची फाटाफूट होते. तर आम्ही चौघे मित्र, अनुक्रमे..
राहुल, सिद्धार्थ, मी आणि. चंद्रकांत.
लहानपणापासून आम्ही सगळे अगदी लंगोटीयार, पण या कामाच्या धकाधकीमुळे, आमचं सुद्धा हल्ली भेटनं होत नव्हतं. नाही म्हणता, आमची फोनाफोनी कायमच चालू असायची.
शेवटी.. वर्ष भरापूर्वी, आमच्या सिद्धार्थ नामक मित्राने एक कल्पना पुढे आणली. कि महिन्यातून एकदा, आपण चौघे एकत्र जामुयात.
ती संध्याकाळ फक्त आपली आणि आपलीच असेल. निवांत गप्पागोष्टी करायच्या, खानं पिणं करायचं. जुन्या आणि नवीन आठवणींना उजाळा देत, ती रात्र आनंदात घालवायची. आणि आम्ही सर्वांनी, या मासिक भेटीवर शिक्कामोर्तब केला.
यात आणखीन एक जमेची बाजू म्हणजे, आमच्या मिसेस मंडळी सुद्धा एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. त्यांचा सुद्धा मस्त एकोपा आहे.
झालं.. हा विषय जसा सुरु झाला, तसा आमच्या बायकांनी सुद्धा आमच्या मागे तगादा लावला. तुम्ही एकटे एकटेच पार्ट्या करता. आम्हाला कसलाच एन्जॉयमेंट नाही.
त्यावर.. आम्ही सर्वांनी एकमत करत असं ठरवलं. कि, दर तीन महिन्यांनी सर्वांनी एका मित्राकडे सहकुटुंब जेवायला जायचं. मग हि रुटीन सुद्धा आम्ही सुरु केली.
त्यानंतर.. वर्षातून किमान तीन फॅमिली ट्रीप तरी करायच्या असं सुद्धा ठरलं. त्यामुळे. मध्यंतरी आम्ही सगळे सहकुटुंब अलिबागला जाऊन आलो. आता पुढील दोन महिन्यात एक पावसाळी ट्रीप करायची. नंतर, तिसरी ट्रीप कुठे करायची त्याचं नियोजन होईल.
तर.. हे रुटीन करत असताना..
सिद्धार्थ च्या घरची चमचमीत मटणाची मेजवानी झोडल्या नंतर, मध्यंतरी राहुल नामक मित्राच्या घरी आम्हाला जेवणाची मेजवानी होती.
आमचा राहुल, ब्राम्हण मनुष्य आहे. त्यामुळे अर्थातच, त्याच्या घरी मास मच्छी वगैरे बनणार नाही. आणि आमची कोणाची तशी जोर जबरदस्ती नसते. त्यामुळे, राहुलच्या घरात त्यादिवशी, मस्तपैकी.. आमरस, चपाती, बटाटे वडे, कुरडई, पापड आणि मुख्य आकर्षण म्हणजे.
" शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी. "
म्हणजे, त्या एक प्रकारच्या शाकाहारी नळ्याच झाल्या.
तर एकुणात हा.. असा विषय होता. तर त्यादिवशी, ती शेवग्याची भाजी इतकी अप्रतिम झाली होती. कि शेवटी, ती भाजीच संपली. तर शेवगा हा असा विषय आहे, कि तो.. एखाद्या सुगरणीच्या हातात पडला पाहिजे. त्यावेळी त्याचा स्वाद मस्तपैकी खुलून येतो. आमच्या राहुल वहिनी मस्त सुगरण आहेत. याची मला त्या दिवशी मौखिक प्रचीती मिळाली.
आम्ही सगळे मित्र, जातीपातीच्या खूप पुढे निघून गेलो आहोत. आमच्यात कसलाच भेदभाव नसतो. किंवा जातपातीचं राजकारण नसतं. कारण आम्ही सगळेच तळागाळातील व्यक्ती आहोत. आणि चौघेही चारी टोकाचे आहोत.
राहुल.. आज मर्सिडीज बेंज या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे.
सिद्धार्थ.. आजच्याला बजाज अलियान्झ या इन्शुरन्स कंपनीत फार मोठ्या हुद्द्यावर आहे. एम.आय.डी.सी. मध्ये एका छोट्या कार डीलर कडे काम-करता शिक्षण घेत. तो आज येवढ्या मोठ्या पदावर विराजमान झाला आहे. त्याला शिक्षणाची भारी हौस, त्यामुळे अगदी मागच्याच महिन्यात तो वकिली सुद्धा पास झाला.
आमचा चंदू.. एम.आय.डी.सी. मध्ये एक छोटा तीनचाकी टेम्पो चालवायचा. पण आज त्याचा स्वतःचा ट्रान्सपोर्टचा फार मोठा व्यवसाय आहे. चंदू वहिनी, एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. तर बाकी आम्हा तिघांच्या बायका, गृहिणी आहेत.
आम्ही चौघे हुद्द्याने जरी चार टोकाला असलो. तरी टेबलवर बसल्यावर आमच्यात साहेब असा कोणी उरत नाही. तेच एकेरीतील बोलणं, तीच शिवीगाळ, आणि सगळं काही लहानपणी होतं तसच.
केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे..
तुम्हाला सुद्धा बालपणीच्या मित्रांसोबत शेवटपर्यंत मैत्री टिकवून ठेवायची असेल, तर तुम्ही सुद्धा असे प्रयोग नक्कीच करू शकता. शेवटी कितीही केलं तरी,
जुनं तेच सोनं असतं..!
( फोटोमध्ये, डावीकडून.. राहुल, पंडित, चंदू, सिद्धार्थ )

माझा बाप तसा लई खडूस होता..
नको त्या विषयात, नको त्या शिस्ती ते आम्हाला लाऊ पहायचे. ते सुद्धा असे विषय असायचे, कि त्या गोष्टींना तळ नसायचा कि बुड सुद्धा नसायचा.
विनाकारण काहीच कारण नसताना ते आम्हाला त्रास द्यायचे. ते असं का करायचे.? ते मला शेवटपर्यंत म्हणजे, ते जाईपर्यंत कधीच समजलं नाही..
त्यांनी आम्हाला कधी गोट्या खेळू दिल्या नाहीत. कधी भोवरा खेळू दिला नाही. विटी दांडू खेळू दिला नाही, पतंग उडवणे हा विषय मी निव्वळ त्यामुळे शिकलो नाही. कारण खेळून झाल्यावर, तो पतंग आणि मांजा ठेवायचा कुठे..? हा फार मोठा प्रश्न असायचा.
तरी सुद्धा, गोट्या आणि भोवरा आम्ही गुपचूप खेळायचोच. गोट्या आणि भोवरा खेळून झाला. कि, कोणाचं लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी, त्यांना सांधी कोपऱ्यात गुपचूप कुठेतरी दडवून ठेवायचो. तरी सुद्धा काही चाप्टर मुलं, ती ठिकाणं गुपचूप पाहून आमचा मुद्देमाल गायप करायचे.
रविवारची सुट्टी, हि आमच्यासाठी फार मोठी शिक्षा असायची. त्या दिवशी आम्हाला आमच्या वीटभट्टीवर काम करण्यासाठी जावं लागायचं. त्यामुळे, सुट्टी हा विषय माझ्या शालेय जीवनात मला कधी आवडलाच नाही. उन्हाळी आणि दिवाळी सुट्टी म्हणजे आम्हाला अक्षरशः जन्मठेपेची शिक्षाच वाटायची.
लहानपणी मला क्रिकेट खेळायची भारी हौस होती, त्यामुळे एका फळीची मी बॅट बनवून आणली होती. ती बॅट इतकी भारी होती, कि प्रत्येक मित्र माझ्याच बॅटने खेळायचा. वडील सकाळी कामावर गेल्यावर, आम्हाला सुद्धा दिवसभर शाळा असायची. शाळा पाच वाजता सुटायची, आणि घरी आल्यावर आम्ही थोडंफार खेळायला जायचो.
एकदा असाच माझा भाऊ आणि मी मैदानात बॅट बॉल खेळायला गेलो होतो. वडील कामावरून घरी आले. तर आम्ही दोघे भाऊ घरात नाही. वडील बाहेरून कोठूनतरी टेन्शनमध्ये आले होते. आणि आता तो सगळा राग आमच्यावर निघणार होता. आम्ही दोघे भाऊ मैदानात क्रिकेट खेळत होतो, वडील मागून गुपचूप आले. त्यांच्या लेंग्याच्या खिशात त्यांनी चामडी पट्टा गुंडाळून आणला होता. आम्ही जसे त्यांना दिसलो, तसं सर्व मित्रांसमोर त्यांनी आम्हाला पट्ट्याने मारत-मारत घरापर्यंत आणलं होतं.
शिवाय वडील मारत असताना, आम्हाला पळून जायची सुद्धा सोय नव्हती. नाहीतर दुप्पट मार, आणि उपासमार ठरलेली असायची. त्यामुळे आम्ही गपगुमान कुत्र्या सारखा मार खात घरी यायचो. आमची आई तर वडिलांना इतकी घाबरायची. कि त्यांच्या समोर ती चकार शब्द बोलायची नाही. कि त्यांना आमच्या मार खाण्यात मध्यस्थी सुद्धा करायची नाही. तिने दोनचार वेळा अशी मध्यस्थी केली होती. तेंव्हा माझ्या आईला सुद्धा वडिलांनी बेदम मारलं होतं.
एकदा माझे वडील अंघोळ करत असताना, चुकून त्यांना मी बनवून आणलेली ती बॅट दिसली. विषय असा असायचा, कि ते घरामध्ये काहीतरी खुसपट शोधतच असायचे. जेणेकरून घरात वादंग निर्माण होईल. आता तर त्यांना आयतं कोलीत मिळालं होतं. मग काय सांगायचं, अंघोळ उरकल्यावर कामाला जायच्या अगोदर त्यांनी पहिली ती बॅट बाहेर काढली, आणि त्यावर मोठाली दगडं घालून त्या बॅटचे तुकडे तुकडे करून टाकले. आणि लागलीच ते तुकडे, त्यांनी पाणी गरम करायच्या बंबात टाकून दिले. त्या दिवशी माझ्या बॅटने जळणाची भूमिका पार पाडली होती.
मैदानी खेळाची मला आणि माझ्या भावाला फार आवड होती. कदाचित त्याकाळी आम्हाला थोडी जरी मोकळीक मिळाली असती. तर आम्ही, कोणत्या तरी खेळात नक्कीच काहीतरी चमकदार कामगिरी केली असती. पण वडिलांच्या भीतीमुळे खेळ या विषयात आम्ही कधीच प्राविण्य मिळवता आलं नाही.
मी आठवी नववीत असताना, आम्ही आमच्या नवीन घरात राहायला गेलो. सिंगल रूम मधून आता आम्ही वन आरके मध्ये राहायला गेलो होतो. दिवसभर शाळेतून थकून भागून आल्यावर. रात्री आठ वाजता जेवण झाल्यावर मला लगेच डुलकी यायची. आमच्या वडिलांची त्यावर सुद्धा पाबंदी असायची. हातावर पाणी पडल्या पडल्या लगेच झोपायचं नाही. त्याकाळी आमच्या घरात टीव्ही सुद्धा होता. पण तो पाहायला देखील आम्हाला परवानगी नसायची, असा त्यांचा दंडक असायचा. शेवटी झोप आवरायची नाही म्हणून, मी तोंडासमोर वर्तमानपत्र धरायचो, आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करायचो. या कारणामुळे सुद्धा मी कितीतरी वेळा मार खाल्ला असेल.
संध्याकाळी वडील घराच्या बाहेर गेले, कि आम्ही गुपचूप टीव्ही लावायचो. आणि त्यावेळी, एकजण बाहेर राखणदार म्हणून थांबायचा. कोपऱ्यावरून वडील येताना दिसले कि आमच्या घरातील टीव्ही लगेच बंद व्हायचा. फार त्रास काढला हो. पण हे सगळं घडत असताना, माझे वडील असे का वागायचे.? हेच मला समजत नव्हतं. आणि, कधी समजलं देखील नाही.
आजच्या जमान्यात.. मी माझ्या मुलाला सगळ्या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी त्याला हव्या त्या सुविधा देत आहे. त्याने मैदानी खेळ खेळावे म्हणून मी फार आग्रही होतो. पण त्याला त्याची बिलकुल आवड नाही. असो.. मी त्याला त्याबद्दल कोणतीही जोर जबरदस्ती करत नसतो. फक्त जिम हा एकमेव विषय त्याच्या आवडीचा आहे. जेवण झाल्यावर लवकर झोप म्हंटलं.
तर, तो मोबाईल मध्ये तोंड घालून बसतो. कधी टीव्ही पाहत बसतो. पण या गोष्टीसाठी, मी त्याला कधीही टोकत नाही.
मला उपभोगायला न मिळालेल्या प्रत्येक विषयात माझ्या मुलाला सूट देऊन मी माझं बालपण पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यात समाधानी सुद्धा असतो. पण माझे वडील माझ्याशी तसे का वागले असतील..? हा प्रश्न आजची माझी पाठ सोडत नसतो..!
शेवटी जन्म दिलेला बाप आहे, त्यामुळे त्यांना कधी शिव्या सुद्धा देऊ शकलो नाही. आणि आता तर काय, गेलेल्या माणसाला शिव्या देऊन काही साध्य सुद्धा होणार नाही.

सुरवातीच्या काळात, मी पानाचा एक ठेला चालवायचो. विडी, काडी, पान मसाला, जर्दा ह्या वस्तू मी तिथे खाऊ म्हणून प्रौढ लोकांना विकायचो. नाही म्हणता, काही लहान वयाची चाबरट मुलं सुद्धा, ह्या वस्तू विकत घ्यायला तिथे यायची. त्यांना, मी नाही सुद्धा म्हणू शकत नव्हतो.
कारण, धंदा है पर गंधा है ये..!
तर, मुद्यावर येतो. खूप ठेचा खात-खात मी इथपर्यंत येऊन पोहोचलो होतो. माझ्या मित्राने, एक नवीन कोरा 'फाईव स्टार' पान स्टोल बनवला होता. आणि, तो स्टोल त्याला भाड्याने चालवायला द्यायचा होता..
त्यावेळेस, मी एका खाजगी कंपनी मध्ये कामाला असताना. माझा मासिक पगार, अवघा पंधराशे रुपये होता. त्यात काय कप्पाळ व्हायचं..!
म्हणून, अगदी नाईलाजाने मी हा व्यवसाय स्वीकारला होता.
या व्यवसायातील मला काहीच माहिती नव्हती. पण, "लाथ मारेन तिथे पाणी काढेन" ह्या पठडीतला मी माणूस होतो. त्यामुळे, ह्या व्यवसायात सुद्धा मी उडी मारली.
सोळा ऑगस्ट १९९९ ला मी हा व्यवसाय सुरु केला.
पहिल्याच दिवशी, सकाळी सात वाजता माझ्या दुकानात एक गिर्हाईक आलं. आणि त्याने, मला एकशे वीस तीनशेचं जर्दा पान मागितलं. मला तर पान काही बनवायला येत नव्हतं.
त्या व्यक्तीला, मी थांबा म्हणून सांगितलं..
कसाबसा पाण्यामध्ये कात आणि चुना कालवला. आणि, जमेल तसं ओभड-धोबड पान बनवून त्या व्यक्तीला खाऊ घातलं. ते पान कसं बनलं होतं ? ते, मला माहित नाही.
पण, माझ्या पान टपरी पासून फर्लांगभर दूर अंतरावर असणारी जुनी जाणती पान टपरी सोडून, स्वतःचा वेळ वाया घालवून, तो व्यक्ती माझ्या इथे पान खायला थांबला होता.
पान खाल्ल्यानंतर, मला हाताने मस्त अशी खून करून तो तेथून निघून गेला. जे कि, मला पान बनवण्याची कला अवगत नव्हती तरी सुद्धा...
मी तर, ह्याला दैवी चमत्कारच म्हणेन. कारण, तो व्यक्ती नंतर पुन्हा कधीच माझ्या दुकानावर पान घेण्यासाठी आला नाही. किंवा पुन्हा कधीच मला दिसला सुद्धा नाही. जर तो व्यक्ती त्याच भागातील असता, तर तो मला पुन्हा कधीतरी दिसला असताच. कारण पान खाणारी लोकं पान आवडेल त्याठिकाणी पान खायला हमखास येत असतात. पण तसं काही झालं नाही.
पहिल्याच दिवशी, माझा गल्ला पंधराशे रुपये झाला होता. एकोणीसशे नव्यान्नव सालची हि गोष्ट आहे. त्या पैश्यांचा अंदाज लावा. फार मोठी रक्कम होती ती.
त्या नव्या कोऱ्या स्टोल मध्ये, एक कप्पा 'देवघर' म्हणून बनवला होता. स्टोल सुरु होऊन, जेमतेम पंधरा एक दिवस झाले होते. आणि, त्या देव्हार्यात मी कोणताच देवाचा फोटो किंवा मूर्ती स्थापन केली नव्हती.
त्यादिवशी..माझा एक मित्र स्टोल वर आला. आणि त्याने, मला नेमका हाच प्रश्न विचारला.
देव्हाऱ्यात देवाचा फोटो ठेवला नाहीस अजून.?
मी त्याला म्हणालो, अरे कोणत्या देवाचा फोटो लाऊ तेच मला समजत नाहीये..!
त्यावर, तो म्हणाला..
मी उद्या दत्त गुरूंचा फोटो घेऊन येतो. तो, तू इथे ठेव..!
साई आणि स्वामींचा मी कठ्ठर भक्त जरी असलो. आणि हे दोन्ही दिव्य पुरुष दत्त अवतार जरी असले, तरी.. स्पेशल दत्त या देवाविषयी माझ्या मनात विशेष आस्था नव्हती. शेवटी माझ्या मनात नसताना सुद्धा, मी त्याला हो म्हणालो.
ठीक आहे, तू फोटो घेऊन ये..!
दुसर्या दिवशी संध्याकाळी, तो मित्र एक फोटो घेऊन माझ्या स्टोल वर आला. न जाणो का, त्या दिवशी तो मित्र मला अगदी भ्रमिष्टासारखाच वाटला. त्याच्या चेहेर्यावर, मला एक वेगळीच धुंदी जाणवत होती. एका जुन्या लाकडी फ्रेमचा जुनाच फोटो त्याने माझ्या हातात दिला. आणि, आला तसा माझ्याशी न बोलताच निघून गेला. मी त्याच्याकडे, पाहण्यातच दंग होतो. तो जेंव्हा दूर नजरे आड झाला तेंव्हा प्लास्टिकच्या पिशवीत असणारा तो फोटो मी पाहिला.
तर.. तो फोटो दत्त गुरूंचा नव्हता.
तर, तो फोटो माझ्या स्वामींचा होता. स्वामी समर्थांचा होता.
स्वामी, खुद्द चालून माझ्याकडे आले होते. तो फोटो, जसा माझ्या स्टोल मध्ये स्थानापन्न झाला. त्या दिवसापासून, माझ्या भरभराटीला खूपच सुरवात झाली. रोज, दोन तीन हजार रुपयांचा गल्ला होत होता. पण.. सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मला स्टोल मधून बाहेर पडता येत नव्हतं. जेवण, खानं सगळं त्याच ठिकाणी. चार पाच महिनेच, मला हा व्यवसाय करण्याची संधी मिळाली. कारण, त्यानंतर लगेचच मी पुणे महापालिकेत रुजू झालो.
हे सगळं सांगण्यामागचं कारण एकच आहे. परवा, एका फेबु मित्राचा मला फोन आला. नवीन घर घेतल्याबद्धल त्यांनी मला शुभेच्छा तर दिल्याच. पण, त्याच बरोबर मला तो मित्र म्हणाला.
तुमच्या घरातील भिंतीवर, एक दोन बाय तीन ची जागा मी आणणाऱ्या गिफ्ट साठी राखून ठेवा. आणि म्हणाले, ते गिफ्ट दुसरं तिसरं काही नसेल.
खुद्द "स्वामीच" असतील..!
बापरे, त्यावेळेस माझ्या अंगावर अगदी काटाच आला. 'स्वामी' पुन्हा एकदा माझ्या घरी येणार. म्हणजे, मला आता मागे वळून पहायची आवश्यकताच नव्हती.