Wednesday, 20 June 2018

आमच्या लहानपणी 'बुच' नावाचा एक रबरी बॉल खूप फेमस होता. त्याचं खरं नाव काय होतं. ते, आजवर सुद्धा मला माहिती नाहीये. वजनाला जड, मऊ आणि भरीव असा तो बॉल असायचा..
त्याला आपटल्यावर... तो बॉल खूप उंच उडायचा. तो बॉल विकत घ्यावा म्हंटलं तर आमची तशी ऐपत नव्हती. त्यामुळे, मला मन मारून गप्प राहावं लागायचं.
आता मात्र, तो बॉल बाजारात कुठेही दिसत नाही..!
लहानपणी..माझे काही इंग्रजी शाळेत शिकणारे मित्र मैत्रिणी त्या बॉलने खेळत असत. आम्ही नगरपालिकेच्या शाळेत शिकणारी मुलं. त्यामुळे आम्हाला मात्र, ते त्यांच्यासोबत कधी खेळायला घेत नसत. मला समजत नसलेली इंग्रजी भाषा, एक दुसर्याशी बोलून ते मला हिणवत असत. माझी टिंगलटवाळी करत असत.
कधीतरी, आपल्याला सुद्धा ते खेळायला घेतील. ह्या वेड्या आशेने, मी हताशपणे तासंतास त्यांचा खेळ पाहत बसायचो.
परंतु, त्यांना माझी कधीच दया येत नव्हती.
" सालं, हे मन हि असं असतं ना. नेमकं जे मिळणार नाही, त्याचाच पिच्छा पुरवत असतं. "
तर.. आम्ही ज्या ठिकाणी खेळायचो, त्या छोट्याश्या मैदानाच्या बाजूला एक नाला होता. तिथं, हि मुलं मुली बॉल झेलाझेली, तर कधी लींगोरच्या खेळत असायची. खेळता-खेळता, चुकून त्यांचा बॉल सुद्धा त्या ओढ्याच्या गाळात जाऊन रुतून बसायचा.
हि सगळी साहेबाची भाषा शिकणारी आणि बोलणारी मुलं, अशा वेळेस त्या गाळात रुतलेला बॉल कोण काढणार..? यावर सल्ला मसलत करायचे.
जो तो आपल्या जागी दुरुस्त असायचा. त्या गाळात जायला, कोणीच तयार नसायचा.
माझ्या मनाची, खोटी आशा असायची.
जर त्यांना, आपण तो बॉल शोधून दिला. तर, ते आपल्याला खेळात घेतील.
मी सुद्धा, दुरूनच त्यांच्या बोलावण्याची वाट पाहायचो.
पण, ती मुलं मुली सुद्धा खूप हट्टी. मला त्यांचं बोलावणं काही येत नसायचं.
शेवटी, मीच त्यांना म्हणायचो... मी, शोधून देऊ का तुमचा बॉल...!
ते सगळे, एकमेकाकडे पहायचे. त्यांच्या नजरेची खुनावाखुनाव व्हायची.
आणि, त्यातील कोणीतरी एक जन मला तशी अनुमती द्यायचा.
त्यावेळेस, मी त्यांना वचन मागायचो.
बॉल शोधून दिल्यावर, मला तुमच्या सोबत खेळायला घेणार ना..!
नाकं मुरडत का होईना. त्यावेळी ते मला, हो म्हणायचे.
आणि मी, त्या काळ्या वास मारणाऱ्या गुडघाभर गाळामध्ये उतरायचो. बॉल कुठे पडला आहे, ते नेमकं ठिकाण माहित नसल्यामुळे. जो मुलगा मुलगी मला सांगेल त्या ठिकाणी मी पायाने बॉल चाचपायचो. बराच वेळ गाळ तुडवून व्हायचा. पण, बॉल काही सापडायचा नाही.
शेवटी कधीतरी, एकदाचा तो बॉल माझ्या पायाला जाणवायचा. त्या घाणेरड्या गाळात मी माझा डावा हात घालून तो बॉल बाहेर काढायचो. त्या बॉलला, ओढ्यातल्या त्याच गढूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचो. आणि, तो बॉल पुन्हा त्यांच्या स्वाधीन करायचो.
मोठ्या आशेने, मी हात पाय धुवून त्यांच्या सोबत खेळायच्या तयारीला लागायचो.
त्यांनतर पुन्हा एकदा, त्यांच्या नजरेची खुनवाखुनाव व्हायची. आणि, ते एकमेकांना म्हणायचे.
ए... आजचा खेळ संपला रे. आता, आपण उद्या खेळुयात..!
शेवटी निराश मनाने, मी घरी जायचो. गाळात उतरल्यामुळे माझ्या अंगाचा घाण वास येत असायचा. त्यामुळे घरी गेल्यावर आईचा मार ठरलेला असायचा. पुन्हा, गार पाण्याने अंघोळ करून स्वच्छं होऊन अभ्यासाला बसायचं. असं, बरेच वेळा घडलं होतं.
या नको त्या मानसिकतेला, त्या मुलांचे आईबाप सुद्धा अपवाद नसायचे. त्यांच्या घरी, चुकून मी कधी गेलोच. तर ते, सुद्धा मला हिणवायचे.
हि पोरं काही शिकणार नाही. नुसती उंडरत राहणार, यांचं काही खरं नाही..!
पण, नियतीला हे सगळं मान्य नव्हतं, मला हिणवणारी तीच मुलं आज कशातच जमा नाहीयेत. मी त्यांना, प्रत्येक गोष्टीत कधीच मागे सोडून दिलं आहे. आज, त्यांचे तेच पालक मला भेटले कि माझा खूप हेवा करतात. आणि, मी कसा प्रयत्नांची पराकाष्टा करून पुढे गेलो. याचे गोडवे गातात..
मित्रहो... हे सगळं सांगायचा उद्देश एकच आहे.
दिवस तसेच राहत नाहीत हो. हे, प्रत्येकाच्या ध्यानात यायला हवं..!

No comments:

Post a Comment