Wednesday, 20 June 2018

फार जुनी गोष्ट आहे. आता नेमकं आठवत नाही. पण, आमच्या प्रतीकचा बहुतेक दुसरा वाढदिवस असावा. तेंव्हा, माझी परिस्थिती अगदी जेमतेमच होती. रोजच्या खाण्याची भ्रांत असायची. तर, असले सण उत्सव कधी साजरे करायचे..? पण, माझ्या बायकोची खूपच हौस. काहीही झालं तरी, वाढदिवस साजरा करायचाच. त्याकरिता, काटकसर करून तिने, तीन चारशे रुपये जमा करून ठेवले होते. त्या पैशामध्ये, मी सगळ्या वस्तू खरेदी केल्या. मुलाला नवीन कपडे, केक, फुगे, टोप्या फरसाण आणि बरच काही..
घरगुती कार्यक्रम होता. जवळपास राहणाऱ्या लहान-लहान मुलांना कार्यक्रमाला बोलावून घेतलं होतं. केक कापला गेला, मोठ्या आनंदात प्रतीकचा वाढदिवस साजरा झाला. आम्ही उभयतांनी, केक कापून प्रतीकला भरवला. आणि तोंडात केक घेतल्या बरोबर त्याने तोंड वाकडं केलं. आम्हाला वाटलं, भूक नसेल त्याला. नंतर, लहान मुलांसाठी सगळ्या डिश भरून झाल्या. त्या सगळ्या मुलांना वाटल्या. पण कोणीच मुलगा, त्या केकला तोंड लावत नव्हता, शेवटी मी तो केक चाखून पहिला. तर, त्याचा खूप कुबट असा वास येत होता. मी ताबडतोब, सगळ्या मुलांच्या डिशमधील केक काढून घेतला. आणि, त्या केकच्या दुकानात जाऊन त्या बेकरी वाल्याला घडलेली हकीकत सांगितली. तो व्यक्ती, असं होणं शक्यच नाहीये म्हणू लागला. शेवटी मी त्याला म्हणालो. बरं ठीक आहे. तुम्ही, या केकचा एक तुकडा खाऊन पहा.
त्या दुकान मालकाने, त्या केक मधील एक मोठ्ठा तुकडा आपल्या तोंडात कोंबला..आणि, अगदी चवीने खात त्याला संपवला सुद्धा. आणि, वर मानेने तोंडाने हावभाव करत तो मलाच कोड्यात पाडू लागला. मला समजलं, थोडेसे पैसे वाचवण्या करिता. हा मनुष्य शीळा केक खाऊन गेला आहे..!
काय करावं..? मला तर काहीच सुचेना. शेवटी, मी एक काम केलं. त्याच्या दुकानात कामाला असणार्या एका अल्पवयीन मुलाला जवळ बोलावलं. आणि, त्याला तो केक खायला दिला. त्या मुलाने, तो केक तोंडात टाकला. आणि, चाऊन त्याला गिळायला सुरवात केली. काही क्षणात त्या मुलाला शिळ्या केकची चव जाणवली. आणि तो मुलगा, तिथेच भडभडा ओकला.
आणि मला म्हणाला. किती घाण आहे हा केक..!
मी, त्या दुकान मालकाकडे पाहत होतो. तो सुद्धा, खूप खजील झाला होता. त्याने, खाली वाकून त्याच्या काउंटर मधून दुसरा केक काढला. आणि, मला दिला.
मी त्याला म्हणालो... केक नको, माझे पैसे मला परत दे..!
तुझ्या दुकानातल्या, कोणत्याच खाद्य पदार्थावर आता माझा विश्वास उरला नाहीये. लहान मुलांना, विषबाधा झाली असती तर ते कितीत पडलं असतं..?
त्याने, गपगुमान माझे पैसे मला परत दिले. त्या पैश्याचा, मी दुसर्या दुकानातून केक नेला. आणि, सर्व मुलांना खाऊ घातला.
त्यानंतर, काही कालावधीत त्या माणसाचं ते दुकानच बंद पडलं. पुन्हा त्याने, त्या ठिकाणी दुसरा व्यवसाय सुरु केला. तो सुद्धा म्हणावा असा चालला नाही. पुन्हा तिसरा, आता त्याच ठिकाणी त्याने चौथा व्यवसाय सुरु केला आहे. त्याचा, सध्याचा व्यवसाय चालतो कि नाही. ते मला माहित नाही. कारण, त्याच्या दुकानात असलेला माल वर्षभर जरी खपला नाही. तरी, त्याचं त्यात काही बिघडणार नाही. सध्या, अशा प्रकारचा माल त्याने त्याच्या दुकानात विक्रीसाठी ठेवला आहे. " प्लायवूड "
नियत में खतरा, तो.. झोलीमें पत्थरा..!!

No comments:

Post a Comment