Wednesday, 20 June 2018

कालच्या.. शेवग्याच्या शेंगा भाजीचा विषय बऱ्याच मित्रांना समजला नाही.
काहींना वाटलं, कि त्या मित्राकडे जेवायला जाऊन माझा पोपट झाला. कारण, मी तर पट्टीतला मांसाहारी आहे.. वगैरे, वगैरे.. .
कसं आहे, अर्धवट ज्ञान किंवा माहिती कधीही हानिकारक असते.
त्याकरिता, हा लेखप्रपंच..!
तर मुळापासून सुरवात करतो..
आम्ही.. लहापणापासूनचे चार जिवलग मित्र आहोत. सुदैवाने आमचं बालपण सुद्धा एकाच गावात गेलं. आणि आजही आम्ही सगळे त्याच गावात आसपासच्या भागात राहत आहोत.
एक विषय असतो बघा, लहानपणीचे मित्र तुम्हाला शेवटपर्यंत अगदी नशिबानेच मिळू शकतात. कारण शिक्षण झाली, कि.. जो तो त्याच्या मार्गाला लागतो. आणि मित्रांची फाटाफूट होते. तर आम्ही चौघे मित्र, अनुक्रमे..
राहुल, सिद्धार्थ, मी आणि. चंद्रकांत.
लहानपणापासून आम्ही सगळे अगदी लंगोटीयार, पण या कामाच्या धकाधकीमुळे, आमचं सुद्धा हल्ली भेटनं होत नव्हतं. नाही म्हणता, आमची फोनाफोनी कायमच चालू असायची.
शेवटी.. वर्ष भरापूर्वी, आमच्या सिद्धार्थ नामक मित्राने एक कल्पना पुढे आणली. कि महिन्यातून एकदा, आपण चौघे एकत्र जामुयात.
ती संध्याकाळ फक्त आपली आणि आपलीच असेल. निवांत गप्पागोष्टी करायच्या, खानं पिणं करायचं. जुन्या आणि नवीन आठवणींना उजाळा देत, ती रात्र आनंदात घालवायची. आणि आम्ही सर्वांनी, या मासिक भेटीवर शिक्कामोर्तब केला.
यात आणखीन एक जमेची बाजू म्हणजे, आमच्या मिसेस मंडळी सुद्धा एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. त्यांचा सुद्धा मस्त एकोपा आहे.
झालं.. हा विषय जसा सुरु झाला, तसा आमच्या बायकांनी सुद्धा आमच्या मागे तगादा लावला. तुम्ही एकटे एकटेच पार्ट्या करता. आम्हाला कसलाच एन्जॉयमेंट नाही.
त्यावर.. आम्ही सर्वांनी एकमत करत असं ठरवलं. कि, दर तीन महिन्यांनी सर्वांनी एका मित्राकडे सहकुटुंब जेवायला जायचं. मग हि रुटीन सुद्धा आम्ही सुरु केली.
त्यानंतर.. वर्षातून किमान तीन फॅमिली ट्रीप तरी करायच्या असं सुद्धा ठरलं. त्यामुळे. मध्यंतरी आम्ही सगळे सहकुटुंब अलिबागला जाऊन आलो. आता पुढील दोन महिन्यात एक पावसाळी ट्रीप करायची. नंतर, तिसरी ट्रीप कुठे करायची त्याचं नियोजन होईल.
तर.. हे रुटीन करत असताना..
सिद्धार्थ च्या घरची चमचमीत मटणाची मेजवानी झोडल्या नंतर, मध्यंतरी राहुल नामक मित्राच्या घरी आम्हाला जेवणाची मेजवानी होती.
आमचा राहुल, ब्राम्हण मनुष्य आहे. त्यामुळे अर्थातच, त्याच्या घरी मास मच्छी वगैरे बनणार नाही. आणि आमची कोणाची तशी जोर जबरदस्ती नसते. त्यामुळे, राहुलच्या घरात त्यादिवशी, मस्तपैकी.. आमरस, चपाती, बटाटे वडे, कुरडई, पापड आणि मुख्य आकर्षण म्हणजे.
" शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी. "
म्हणजे, त्या एक प्रकारच्या शाकाहारी नळ्याच झाल्या.
तर एकुणात हा.. असा विषय होता. तर त्यादिवशी, ती शेवग्याची भाजी इतकी अप्रतिम झाली होती. कि शेवटी, ती भाजीच संपली. तर शेवगा हा असा विषय आहे, कि तो.. एखाद्या सुगरणीच्या हातात पडला पाहिजे. त्यावेळी त्याचा स्वाद मस्तपैकी खुलून येतो. आमच्या राहुल वहिनी मस्त सुगरण आहेत. याची मला त्या दिवशी मौखिक प्रचीती मिळाली.
आम्ही सगळे मित्र, जातीपातीच्या खूप पुढे निघून गेलो आहोत. आमच्यात कसलाच भेदभाव नसतो. किंवा जातपातीचं राजकारण नसतं. कारण आम्ही सगळेच तळागाळातील व्यक्ती आहोत. आणि चौघेही चारी टोकाचे आहोत.
राहुल.. आज मर्सिडीज बेंज या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे.
सिद्धार्थ.. आजच्याला बजाज अलियान्झ या इन्शुरन्स कंपनीत फार मोठ्या हुद्द्यावर आहे. एम.आय.डी.सी. मध्ये एका छोट्या कार डीलर कडे काम-करता शिक्षण घेत. तो आज येवढ्या मोठ्या पदावर विराजमान झाला आहे. त्याला शिक्षणाची भारी हौस, त्यामुळे अगदी मागच्याच महिन्यात तो वकिली सुद्धा पास झाला.
आमचा चंदू.. एम.आय.डी.सी. मध्ये एक छोटा तीनचाकी टेम्पो चालवायचा. पण आज त्याचा स्वतःचा ट्रान्सपोर्टचा फार मोठा व्यवसाय आहे. चंदू वहिनी, एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. तर बाकी आम्हा तिघांच्या बायका, गृहिणी आहेत.
आम्ही चौघे हुद्द्याने जरी चार टोकाला असलो. तरी टेबलवर बसल्यावर आमच्यात साहेब असा कोणी उरत नाही. तेच एकेरीतील बोलणं, तीच शिवीगाळ, आणि सगळं काही लहानपणी होतं तसच.
केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे..
तुम्हाला सुद्धा बालपणीच्या मित्रांसोबत शेवटपर्यंत मैत्री टिकवून ठेवायची असेल, तर तुम्ही सुद्धा असे प्रयोग नक्कीच करू शकता. शेवटी कितीही केलं तरी,
जुनं तेच सोनं असतं..!
( फोटोमध्ये, डावीकडून.. राहुल, पंडित, चंदू, सिद्धार्थ )

No comments:

Post a Comment