Wednesday, 20 June 2018

सुरवातीच्या काळात, मी पानाचा एक ठेला चालवायचो. विडी, काडी, पान मसाला, जर्दा ह्या वस्तू मी तिथे खाऊ म्हणून प्रौढ लोकांना विकायचो. नाही म्हणता, काही लहान वयाची चाबरट मुलं सुद्धा, ह्या वस्तू विकत घ्यायला तिथे यायची. त्यांना, मी नाही सुद्धा म्हणू शकत नव्हतो.
कारण, धंदा है पर गंधा है ये..!
तर, मुद्यावर येतो. खूप ठेचा खात-खात मी इथपर्यंत येऊन पोहोचलो होतो. माझ्या मित्राने, एक नवीन कोरा 'फाईव स्टार' पान स्टोल बनवला होता. आणि, तो स्टोल त्याला भाड्याने चालवायला द्यायचा होता..
त्यावेळेस, मी एका खाजगी कंपनी मध्ये कामाला असताना. माझा मासिक पगार, अवघा पंधराशे रुपये होता. त्यात काय कप्पाळ व्हायचं..!
म्हणून, अगदी नाईलाजाने मी हा व्यवसाय स्वीकारला होता.
या व्यवसायातील मला काहीच माहिती नव्हती. पण, "लाथ मारेन तिथे पाणी काढेन" ह्या पठडीतला मी माणूस होतो. त्यामुळे, ह्या व्यवसायात सुद्धा मी उडी मारली.
सोळा ऑगस्ट १९९९ ला मी हा व्यवसाय सुरु केला.
पहिल्याच दिवशी, सकाळी सात वाजता माझ्या दुकानात एक गिर्हाईक आलं. आणि त्याने, मला एकशे वीस तीनशेचं जर्दा पान मागितलं. मला तर पान काही बनवायला येत नव्हतं.
त्या व्यक्तीला, मी थांबा म्हणून सांगितलं..
कसाबसा पाण्यामध्ये कात आणि चुना कालवला. आणि, जमेल तसं ओभड-धोबड पान बनवून त्या व्यक्तीला खाऊ घातलं. ते पान कसं बनलं होतं ? ते, मला माहित नाही.
पण, माझ्या पान टपरी पासून फर्लांगभर दूर अंतरावर असणारी जुनी जाणती पान टपरी सोडून, स्वतःचा वेळ वाया घालवून, तो व्यक्ती माझ्या इथे पान खायला थांबला होता.
पान खाल्ल्यानंतर, मला हाताने मस्त अशी खून करून तो तेथून निघून गेला. जे कि, मला पान बनवण्याची कला अवगत नव्हती तरी सुद्धा...
मी तर, ह्याला दैवी चमत्कारच म्हणेन. कारण, तो व्यक्ती नंतर पुन्हा कधीच माझ्या दुकानावर पान घेण्यासाठी आला नाही. किंवा पुन्हा कधीच मला दिसला सुद्धा नाही. जर तो व्यक्ती त्याच भागातील असता, तर तो मला पुन्हा कधीतरी दिसला असताच. कारण पान खाणारी लोकं पान आवडेल त्याठिकाणी पान खायला हमखास येत असतात. पण तसं काही झालं नाही.
पहिल्याच दिवशी, माझा गल्ला पंधराशे रुपये झाला होता. एकोणीसशे नव्यान्नव सालची हि गोष्ट आहे. त्या पैश्यांचा अंदाज लावा. फार मोठी रक्कम होती ती.
त्या नव्या कोऱ्या स्टोल मध्ये, एक कप्पा 'देवघर' म्हणून बनवला होता. स्टोल सुरु होऊन, जेमतेम पंधरा एक दिवस झाले होते. आणि, त्या देव्हार्यात मी कोणताच देवाचा फोटो किंवा मूर्ती स्थापन केली नव्हती.
त्यादिवशी..माझा एक मित्र स्टोल वर आला. आणि त्याने, मला नेमका हाच प्रश्न विचारला.
देव्हाऱ्यात देवाचा फोटो ठेवला नाहीस अजून.?
मी त्याला म्हणालो, अरे कोणत्या देवाचा फोटो लाऊ तेच मला समजत नाहीये..!
त्यावर, तो म्हणाला..
मी उद्या दत्त गुरूंचा फोटो घेऊन येतो. तो, तू इथे ठेव..!
साई आणि स्वामींचा मी कठ्ठर भक्त जरी असलो. आणि हे दोन्ही दिव्य पुरुष दत्त अवतार जरी असले, तरी.. स्पेशल दत्त या देवाविषयी माझ्या मनात विशेष आस्था नव्हती. शेवटी माझ्या मनात नसताना सुद्धा, मी त्याला हो म्हणालो.
ठीक आहे, तू फोटो घेऊन ये..!
दुसर्या दिवशी संध्याकाळी, तो मित्र एक फोटो घेऊन माझ्या स्टोल वर आला. न जाणो का, त्या दिवशी तो मित्र मला अगदी भ्रमिष्टासारखाच वाटला. त्याच्या चेहेर्यावर, मला एक वेगळीच धुंदी जाणवत होती. एका जुन्या लाकडी फ्रेमचा जुनाच फोटो त्याने माझ्या हातात दिला. आणि, आला तसा माझ्याशी न बोलताच निघून गेला. मी त्याच्याकडे, पाहण्यातच दंग होतो. तो जेंव्हा दूर नजरे आड झाला तेंव्हा प्लास्टिकच्या पिशवीत असणारा तो फोटो मी पाहिला.
तर.. तो फोटो दत्त गुरूंचा नव्हता.
तर, तो फोटो माझ्या स्वामींचा होता. स्वामी समर्थांचा होता.
स्वामी, खुद्द चालून माझ्याकडे आले होते. तो फोटो, जसा माझ्या स्टोल मध्ये स्थानापन्न झाला. त्या दिवसापासून, माझ्या भरभराटीला खूपच सुरवात झाली. रोज, दोन तीन हजार रुपयांचा गल्ला होत होता. पण.. सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मला स्टोल मधून बाहेर पडता येत नव्हतं. जेवण, खानं सगळं त्याच ठिकाणी. चार पाच महिनेच, मला हा व्यवसाय करण्याची संधी मिळाली. कारण, त्यानंतर लगेचच मी पुणे महापालिकेत रुजू झालो.
हे सगळं सांगण्यामागचं कारण एकच आहे. परवा, एका फेबु मित्राचा मला फोन आला. नवीन घर घेतल्याबद्धल त्यांनी मला शुभेच्छा तर दिल्याच. पण, त्याच बरोबर मला तो मित्र म्हणाला.
तुमच्या घरातील भिंतीवर, एक दोन बाय तीन ची जागा मी आणणाऱ्या गिफ्ट साठी राखून ठेवा. आणि म्हणाले, ते गिफ्ट दुसरं तिसरं काही नसेल.
खुद्द "स्वामीच" असतील..!
बापरे, त्यावेळेस माझ्या अंगावर अगदी काटाच आला. 'स्वामी' पुन्हा एकदा माझ्या घरी येणार. म्हणजे, मला आता मागे वळून पहायची आवश्यकताच नव्हती.

No comments:

Post a Comment