Tuesday, 24 April 2018

सायंकाळची.. पाच साडेपाचची वेळ असावी.
सूर्य पश्चिमेकडे पूर्णपणे झुकला होता. त्याची लालीमाच काय ती फक्त क्षितिजात दिसत होती. स्मशानात हि संपूर्ण स्मशान शांतता पसरली होती.
चाहुबाजूने फक्त, पक्षांचा किलकिलाटच काय तो ऐकू येत होता. मी सुद्धा घरी निघायच्या तयारीत होतो. तेवढ्यात, हि शांतता चिरत टर्र्र्रर्र्र्रर्र्र्र... असा आवाज करत, एक रिक्षा माझ्या समोर येऊन थांबली..
माझ्या दिवसाची सुरवात.. आणि, परतीची संध्याकाळ. हि स्मशानातच होत असायची. कारण.. तिथे माझी कामातील गाडी आणि माझी दुचाकी सुद्धा पार्क केलेली असायची. अनायसे.. आता मला सुद्धा तेथील रडारडीची सवयच जडून गेली होती..
मी फारच चौकस स्वभावाचा असल्याने, काही गोष्टींची मला चौकशी करावीशी वाटायची. आणि वरील विषय पाहून.. आजही, मला नेमकं तसच वाटत होतं.
रिक्षाने, आपली टरटर थांबवली होती. आणि आता मात्र, रिक्षात बसलेल्या त्या बाईच्या हंबरड्याचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता.
मी थोडं जवळ जाऊन पाहिलं.
तर.. तिच्या हातामध्ये, एका पाच सहा वर्षाच्या चिमुरडीचं 'कलेवर' ( पांढर्या कपड्यात गुंडाळलेल ) होतं. ती मुलगी, अगदी शांत झोपल्यासारखी दिसत होती.
कोणीतरी आवाज दिल्यावर, ती ताबडतोब उठेल आणि, दुडूदुडू धाऊ लागेल असं वाटत होतं. आई नामक त्या स्त्रीचं रडून-रडून डोळ्यातलं पाणी सुद्धा आटलं होतं.
फक्त तिचा गळाच काय तो, ओरडण्याच काम करत होता. तिचा नवरा, कपाळाला हात लाऊन सुन्नपणे एका बाजूला बसला होता.
पूर्ण विचारपूस केल्यानंतर, मला समजलेली कहाणी अशी होती..!
बिहारवरुन, मोलमजुरी करिता आलेल ते दांपत्य होतं. ते दोघे उभयंता, मोलमजुरी करण्याकरिता जाताना. मुलांना घरातच ठेऊन जायचे. हा त्यांचा नित्यक्रम होता.
पण, आजचा दिवस त्यांच्या करिता एवढं मोठं दुखः घेऊन येईल. याची त्यांना पुसटशी सुद्धा कल्पना नसेल.
पुण्यातील एका रेल्वेलाईन च्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्टी मध्ये, या लोकांनी त्यांची एक छोटीशी वसाहत निर्माण केली होती. घरात बसून काय करायचं..? जीव रमवायचा म्हणून रेल्वे रुळावर खेळण्याचं कसब या मुलांनी लीलया स्वीकारलं होतं.
पण आज..
एका सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या.. नुसत्या वार्याच्या फटकार्याने, त्या मुलीला हवेत भिरकावून दिलं होतं. आणि, त्या फटक्याने ती बिचारी जागेवरच गतप्राण झाली होती.
हि चिमुरडी, जेव्हा जन्माला आली असेल.
तेंव्हा, किती लोकं तिला बघायला आले असतील. याची तर गणतीच नसेल. कारण तेंव्हा ती तिच्या हक्काच्या घरात राहायला होती. या पापी पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी ती लोकं पुण्यात काय आले. आणि होत्याचं नव्हतं झालं.
पण, आता हि चिमुरडी काळाच्या पडद्याआड गेली होती. तेंव्हा, तिच्या अंत्ययात्रेला जेमतेम तीनच लोकं तिथे उपस्थित होती.
खड्डा खंदणारा तो सरकारी कर्मचारी. आणि, तिचे आई वडील. कारण, त्यांना सोडून रिक्षावाला तर कधीच निघून गेला होता.
अशी वेळ कोणावर सुद्धा येऊ नये.
किमान.. शेवटला चार खांदेकरी तरी प्रत्येकाच्या नशिबात असावेत.
शेवटी मला सुद्धा राहवलं नाही.. आणि पुढाकार घेऊन, मी सुद्धा त्या अंत्ययात्रेत सामील झालो. माझ्या हातची, दोन-चार मुठ माती त्या चिमुकल्या जीवाला मी अर्पण केली. तेवढच मनाला समाधान वाटलं..!
काही जीव या पृथ्वीवर फक्त नरकयातना भोगायलाच जन्माला आलेले असतात, या गोष्टीचं मला राहून राहून दुःख होत होतं.
शेवटी, कोण कोणाचं नसतं..
असा विचार करत, मी तेथून निघालो. आणि, रोजच्या रामरगाड्यात केंव्हा विलीन झालो.
ते, माझं मला सुद्धा समजलं नाही..!!

गेल्यावर्षी, मला एक नवीनच त्रास सुरु झाला होता..!
माझ्या नाकावर आणि कपाळावर नाकाच्या वरच्या बाजूला ( आपण गंध लावतो तिथे. ) या दोन्ही भागातील माझी त्वचा उकलून वर येत होती. त्याठिकाणी त्वचेच्या साली निघायच्या. ( जसा काही, माझ्या नाकावर आणि कपाळावर दुष्काळ पडला असावा.  ) बाकी दुसरा काहीच त्रास नव्हता, पण ते दिसायला खूपच विद्रूप वाटायचं हो.
मी काही.. हि गोष्ट जास्ती सिरीयसली घेत नव्हतो. पण शेवटी, माझ्या बायकोच्या दबावामुळे, मी हा प्रॉब्लेम दाखवन्यासाठी, एका स्कीन स्पेशालीस्ट डॉक्टरकडे गेलो.
मी ज्या दवाखान्यात गेलो होतो, ते.. पुण्यातील एक नंबर अलिशान असं स्कीन स्पेशालिस्ट हॉस्पिटल होतं. ( इथे कोणाचं नाव लिहून मला त्याची बदनामी करायची नाहीये. )
तर.. त्याठिकाणी, एकदम स्मार्ट दिसणारी अशी रिसेप्शनिस्ट तिथे नावं नोंदवून घ्यायला सज्ज ठेवली होती. ती मुलगी इतकी सुंदर होती, कि तिला पाहूनच पेशंटचा अर्धा आजार बरा होत असावा. अशी मला दाट शंका आहे.
मी तिथे जाताच.. तिने माझं नाव लिहून घेतल्यावर, साधारण तासाभराने माझा नंबर लागला.
अंदाजे, साठी पार केलेल्या.. एका गोऱ्या गोमठ्या " रडत मुख " डॉक्टरांनी मला नजरेनेच आतमध्ये या म्हणून सांगितलं.
मी आतमध्ये गेलो, एका महागड्या अशा विशिष्ट आकारबद्ध खुर्चीवर त्यांनी मला बसायला सांगितलं. आणि मला विचारलं..
काय झालं आहे..?
मी म्हणालो.. हे बघा, हे माझ्या नाकापाशी आणि कपाळावर त्वचा शुष्क होऊन उकलत आहे. दुसरा काही त्रास नाही, पण ते दिसायला फारच कसं तरीच वाटतंय. चेहेरा खूप खराब दिसतोय.
मी जे काही सांगतोय.. ते सगळं काही त्या डॉक्टरने ऐकून घेतलं.. आणि एका कागदावर पेनाने काहीतरी खरडून तो कागद त्यांनी माझ्या हातात दिला.
मी त्यांना म्हणालो...
हे काय आहे..?
तर म्हणाले.. काही औषधं आणि क्रीम लिहून दिल्या आहेत, त्याने तुम्हाला आराम पडेल.!
त्यांच्या.. या वाक्यावर, मी असा काही चिडलो म्हणून सांगतो.. आणि, त्या डॉक्टरच्या वयाचं भान विसरून मी त्यांना म्हणालो.
तुम्ही काय अंतर्ज्ञानी आहात का..?
तसा तो डॉक्टर बावरून थोडा शुद्धीवर आला, आणि मला म्हणाला..
का हो, काय झालं..?
मी म्हणालो.. तुम्ही माझ्या नाकाची त्वचा हाताने चेक करून पाहिलीत का..? कि कपाळाची त्वचा पाहिलीत..? माझ्या नाकाच्या त्वचेला हात लाऊन पहा..! ती त्वचा किती जाड आणि रफ झाली आहे, ते तुम्हाला समजून येईल. पेशंटला चेक करत नाही, आणि डायरेक्ट कागद खरडून हातात देताय. हा काय सरकारी दवाखाना आहे का..?
तुम्ही, हि..पाचशे रुपये फी कशाची म्हणून घेता..?
आता बाकी माझा पवित्रा पाहून, ते म्हातारं सुद्धा गांगरून गेलं. आणि ताबडतोब त्याच्या हातामध्ये रबरी हॅन्ड ग्लोस घालून माझी त्वचा त्याने व्यवस्थितपणे तपासून घेतली.
आणि एक नवीन चिट्ठी मला त्यांनी लिहून दिली.
मी बाहेर जाताना, तो खाली मान घालून काहीतरी लिहायचं फालतू नाटक करत होता.
पण, मी कसला डेंजर माणूस आहे.
त्याला आवाज देऊन पुन्हा एकदा मी सुनावलं.
तुम्ही पेशंट तपासायला जशी मोठी फीस घेता ना, तशी पेशंटला ट्रीटमेंट सुद्धा देत जावा. विनाकारण लोकांना वेड्यात काढायची कामं बंद करा. तुम्ही लोकं स्पेशालिस्ट आहात म्हणून, फार मोठी आशा घेऊन लोकं तुमच्याकडे येत असतात. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका..!
म्हाताऱ्याने मी केलेला पाणउतारा गपगुमान ऐकून घेतला. आणि नजरेनेच, माझ्यासमोर त्याने चक्क शरणागती पत्करली.
मी तेथून बाहेर पडलो.. बाहेर बसलेल्या त्या चिकण्या पोरीने, माझ्याकडून फिसचे पाचशे रुपये घेतले. आणि, मला डॉक्टरने दिलेली चिट्ठी पाहून ती मला म्हणाली.
इथे पुढे गेल्यावर, त्या समोरच्या चौकात एक मेडिकल आहे. तिथे तुम्हाल हि औषधं मिळतील..!
एकतर मी पहिलाच चिडलेल्या अवस्थेत होतो, आणि रागारागाने मी तिला म्हणालो.
का.. बाकी दुसरी मेडिकल काय ओस पडली आहेत का..? कि तिथे तुमचं काही कमिशन वगैरे ठरलं आहे..? तशी ती मुलगी सुद्धा जरा चाचपली. आणि घाबरतच मला म्हणाली,
सर.. तुम्हाला जिथे योग्य भावात मिळेल तिथे घ्या. त्याबाबत माझं काहीएक म्हणनं नाहीये..!
सगळा धंदा करून ठेवलाय हो या डॉक्टर लोकांनी. यात सगळेच सारखे नाहीयेत, पण एकामुळे सगळ्यांना डाग लागणारच ना..!
शेवटी मला लिहून दिलेली ती औषधं मी एका वेगळ्याच मेडिकल मध्ये खरेदी करून वापरली, आणि.. माझी अवघ्या सात दिवसात माझी नाकावरील त्वचा एकदम मुलायम झाली.
जाऊदेत.. पैसे गेले पण माझं काम ओके झालं..!
पण कसलं काय, मी ती क्रीम लावायची बंद केली. गोळ्यांचा डोस संपला, आणि तिसऱ्या दिवसापासून, तोच आजार पुन्हा एकदा उफाळून आला. मी पुन्हा, तीच क्रीम माझ्या नाकाला आणि कपाळाला लावली, कि सगळं काही एका दिवसात लगेच ओके व्हायचं.
पण क्रीम हा असा विषय आहे.. कि ते काही सौंदर्य प्रसाधन नाहीये. कि रोजच्या रोज तिला,
" फिरवून लावली " शेवटी.. माझ्या एका फार्मासिस्ट मित्राला मी ती क्रीम दाखवली.
तर तो मला म्हणाला..
अरे.. या क्रीम मध्ये स्टिरॉइड्स आहे. ज्यामुळे, आजार लवकर बरा होतो. पण कायमस्वरूपी ठीक होत नाही. हे तुझ्या काहीच कामाचं नाही. तू हि क्रीम काही लाऊ नकोस. फार डेंजर काम आहे.
आता विश्वास तरी कोणावर ठेवावा..?
म्हणून मध्यंतरी, मी माझ्या आणखीन एका स्कीन स्पेशालीस्ट डॉक्टर मित्राला माझी कैफियत सांगितली. तर ते मला म्हणाले..
तुम्ही.. त्या भागाला बिलकुल हात लाऊ नका. हात लावल्याने, तिथे इन्फेक्शन वाढतंय. म्हणून तो आजार बळावतोय. तुम्ही एक काम करा. तुमच्या नाकावर तुम्ही काहीतरी पट्टी वगैरे लावा. ज्यामुळे तुमचा हात सारखा सारखा तिकडे जाणार नाही. आणि इन्फेक्शन होणार नाही. बाकी तुम्हाला दुसरा कसलाच त्रास नाहीये. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी.. हे सुद्धा करून पाहिलं, पण निकाल अगदी शून्य आला..!
शेवटी.. सगळे डॉक्टर संपले.. आणि एकदा माझा एक जिगरी मित्र मला भेटला.
मी सहजच त्याच्याकडे हा विषय काढला.
तो मित्र जरा, आयुर्वेद या विषयात तरबेज आहे. फार चीक्त्सक आणि तितकाच हुशार सुद्धा आहे. तर.. तो हे सगळं पाहून मला म्हणाला..
तुला उष्णतेचा भयंकर त्रास आहे.. तू एक काम कर, रोज रात्री दोन मोठे चमचे " सब्जा " बीज पाण्यात भिजू घाल. आणि सकाळी मोकळ्या पोटी त्याचं प्राशन कर. तुझा आजार ताबडतोब बरा होईल. शेवटी काय आहे, बुडत्याला काठीचा आधार..!
पण मित्रांनो.. तुम्हाला खोटं सांगत नाही..
या औषधाने अगदी पाचच दिवसात माझा भला मोठा प्रोब्लेम अगदी चुटकीसरशी सॉल झाला..!
नाक आणि कपाळावरील त्वचा खूप मऊ झाली, शिवाय त्वचा शुष्क पडणं सुद्धा कमी झालं. आणि त्वचा उकलने हा विषय फक्त दहा टक्के उरला आहे..!
आता मला सांगा.. आपल्या आयुर्वेदात येवढा मोठा दम असताना. या खिसाभरू डॉक्टर लोकांकडे उपचार करायला जाण्यात काय हाशील आहे..? हि लोकं फक्त आपल्या जीवाशी आणि पैशाशी खेळत आहेत. आणि आपली तुंबडी भरत आहेत.
त्याकरिता.. माझी सर्वांना हातजोडून विनंती आहे..
छोट्या मोठ्या व्याधींवर घरगुती उपचार करत चला. मित्र म्हणा, किंवा गुगलवर सुद्धा याच्या सगळ्या माहित्या आता उपलब्ध आहेत. बिनकामी डॉक्टर लोकांचे घरं भरण्यापेक्षा,
" आपल्या, आजीचा बटवा कधीही भारीच आहे..! "
उन्हाळा सुरु झाला आहे.. आता प्रत्येक व्यक्तीला त्याचा काहीना काही त्रास नक्कीच होणार आहे. त्याकरिता प्रत्येकाने आपल्या घरात सब्जा भिजवून ठेवा. लिंबू सरबत किंवा अन्य कोणत्याही सरबता सोबत, रोजच्या रोज सब्जा मिक्स करून पीत चला. तुमचा उन्हाळा अगदी सुसह्य होईल.
( टीप :- डॉक्टर मंडळी कृपया नाराज होऊ नका, जे आहे ते सत्य आहे. मी कोणालाही उगाच धारेवर धरत नाही. चुकून, तुम्ही सुद्धा चुकत असाल तर वेळीच स्वतःला सुधारून घ्या. )

भरपूर मजा करायची आहे, दुनियादारी करायची आहे, देशविदेश फिरायचा आहे, मोठमोठ्या कॉकटेल पार्ट्या करायच्या आहेत, भरपूर, मास मटन आणि चांगलं चुंगलं गोडधोड खायचं आहे.
सर्वांना.. हे सगळं काही अगदी भरभरून आणि मनभरून करायचं आहे..!
पण हे सगळं करण्यासाठी, एका गोष्टीची फार मोठी आवश्यकता असते. ते म्हणजे,
" निरोगी शरीर "
आणि दुर्दैवाने.. आजच्या घडीला हे कोणाकडेच नाहीये.
प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या व्याधीने ग्रासला गेला आहे. माझ्या वयाच्या जवळपास प्रत्येक मित्राला काही नाहीतर, किमान.. बिपी आणि शुगरचा त्रास तरी नक्कीच आहे.
हॉटेलमध्ये पार्टी करताना, दोनेक तास आपण त्या एकाच जागेवर, टेबलवर बसून पेगवर पेग रिचवत असतो. चिकन तंदुरी बिर्याणीवर आडवा हात मारत असतो. जुगारी लोकं, एकदा रमी खेळायला बसले कि त्या जागेवरून तासंतास उठत नाहीत. एकदा का मोबाईल मध्ये तोंड घातलं, कि तास दोन तास कसा निघून जातो ते सुद्धा समजत नाही. थियेटर मध्ये, सलग तीन तासाचा सिनेमा पाहून येतात. फिरायला जाताना, दहा-दहा तासाच्या लॉंग ड्राईव्ह करत असतात.
हे सगळे शौक करत असताना.. आपण,
" आपल्या शरीरासाठी किती वेळ देत असतो..? "
बहुतेक, याचं उत्तर कोणाकडेच नसेल. कारण, भरपूर आराम करून आणि मनसोक्त भोजन करून. सगळ्यांनी आपल्याला नको आहेत तेवढे पोटाचे, आणि आपल्या " तशरिफचे " घेर वाढवून घेतले आहेत. पण आता, काही केल्या ते कमी काही होत नाहीत. त्यामुळे जवळपास सगळेच व्यक्ती अगदी त्रस्त आहेत. कारण, वजन कमी करणं काही सोपं काम नाहीये.
हि सगळी हजामजा करण्यासाठी शरीर फार महत्वाचं आहे.
आणि त्यातल्या त्यात " निरोगी शरीर " फार महत्वाचं आहे. तसा मी सुद्धा व्यायाम या विषयाचा फार मोठा शौकीन नाहीये. पण दैवकृपेने, मला आजवर कसलीही रोगराई जडली नाहीये. पण नाही म्हणता, माझ्या पोटाचा घेर सुद्धा थोडा थोडा वाढायला लागला आहे.
बारा तासाच्या ड्रायविंग ड्युटी मध्ये, मला व्यायाम करायला वेळ मिळत नाही. किंवा मी स्वतः आळस करत होतो. आता यावर उपाय तरी काय करावा..?
म्हणून शेवटी काहीतरी हालचाल करावीच लागली. माझ्या घरापासून माझं ऑफिस फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. आणि शेवटी मी मनाचा हिय्या केला. कि आजपासून कामावर जाताना आपण सायकलवरूनच जायचं. मोटारसायकल बिलकुल बंद करून टाकायची. काही दिवस मी सायकलिंगचा थोडा सराव केला.
विषय कसा आहे.. मला कामाला तर झक मारत जावच लागणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाहीये. आणि काम संपल्यावर, घरी जायची प्रत्येकाला ओढ असते. त्यामुळे, नाही म्हणून उपयोग होणार नाही. शेवटी तंगडेतोड करत घरी यावच लागतं.
हे म्हणजे..
आम के आम, और गुठलीयोंके दाम. अशातला प्रकार झाला..!
एकीकडे पेट्रोलची बचत होतेय, तर दुसरीकडे.. सायकलिंग केल्याने व्यायाम सुद्धा होतोय. आणि वजना बरोबरच पोटाची अतिरिक्त चरबी आणि घेर सुद्धा कमी होतोय.
हे सगळं करण्यामध्ये मुख्य कारण म्हणजे..
काही दिवसापासून मी खूपच सूक्ष्म निरीक्षण केलं. त्यात मला असं आढळून आलं. कि सायकल चालवणाऱ्या नव्वद टक्के व्यक्तींना पोट सुटत नाहीये.
त्यामुळे.. परवापासून मी सुद्धा एक साधी सायकल घेऊन त्यावर पुण्याला ये जा करू लागलो आहे. सायकल चालवल्याने चांगला थकवा येतोय. त्यामुळे भूक सुद्धा खूप चांगली लागते. पचनक्रिया सुद्धा मस्त होतेय. आणि, रात्री पलंगावर पडल्या पडल्या झोप कधी लागतेय ते सुद्धा समजत नाहीये.
हे कामात काम झाल्याने, मला फार आनंद झाला आहे. जिम लावायचा खर्च नाही. कि व्यायाम करण्यासाठी अतिरिक्त वेळ काढायचा प्रश्न सुद्धा येत नाही. सायकलिंग म्हणजे एक नंबर व्यायाम. एका छोट्या आणि चांगल्या निर्णयामुळे. माझ्याकडून, एका दगडात दोन पक्षी मारले गेले. फक्त, रोडच्या ट्राफीकचा फार मोठा त्रास आहे.
खरं तर.. सायकलिंग साठी वेगळे ट्रैक बनवले गेले पाहिजेत. किंवा.. सायकल स्वारांना, दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी " पहेले आप " हा अलिखित पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. तेंव्हा सगळं काही आलबेल होईल..!!
मग, तुम्ही सायकलिंगला कधी सुरवात करताय..?

मी आजपर्यंत.. शंभर वेळा ठरवलं असेल.
कि, बायकोबरोबर साडी खरेदी करायला जायचंच नाही. पण साला दरवेळी काय होतं काय माहित नाही. ती मला काही तरी पट्टी पाडते. आणि, साडी खरेदीला घेऊनच जाते.
आणि, पुन्हा एकदा तिचा तो नेहेमीचा पकाऊ कार्यक्रम सुरु होतो.
भैय्या.... वो, साडी दिखाओ.! नही वो..!! नही, नही वो वाली..!!!
खरं सांगायला गेलं तर, या महिला मंडळीला एकच साडी घ्यायची असते. पण जोवर यांच्या समोर, साड्यांचा भलामोठा ढीग लागत नाही. तोपर्यंत, याचं समाधान काही होत नाही.
खरी कमाल तर, मला त्या सेल्समनची वाटत असते.
बिचारे, खरच त्यांना 'बिचारेच' म्हणावं लागेल.. काहीही कटकट न करता. ते बिचारे यांना लागेल तितक्या साड्या दाखवत असतात.
कौनसी भाभीजी.. ये..!
अस म्हणत, ते त्यांचा अक्षरशः हट्ट पुरवत असतात.
काल मात्र एक कोटीच झाली.
साडी घेण्यासाठी आम्ही दुकानात गेलो, हिचा साडी पाहण्याचा कार्यक्रम चालू होता.
आणि नेमकं आमच्या समोरच्या बाजूला, एक बाई साडी खरेदी करत होत्या. गौर वर्ण, मध्यम बांध्याची अगदी सुखवस्तू घरातील ती महिला असावी.
पण ती सुद्धा.. साडी या विषयात खूपच चोखंदळ होती. पाच पन्नास साड्यांच्या ढिगार्यातून, त्या बाईना, कशीबशी एक साडी खूप आवडली होती. पण, तरीही त्या साडीकडे पहात नाक मुरडायच्या, आणि म्हणायच्या..
नको-नको.. गोळ्याच येतील, टिकल्याच पडतील, हिचा रंगच जाईल..!
तो, बिचारा सेल्समन म्हणायचा,
नही बहेनजी, कुछ नही होगा.! आप, बेफिक्र होके ये साडी ले जाईये..! एक नंबर बढीया साडी है ये, सिर्फ आखरी पीस बचा है. कल तक ऐसी वाली पचास साडी मैने बेची है. मै कहेता हुं, आप ये साडी लेजाव..!!!
तरीही, त्या बाई त्यांच्या मतावर ठामच..!
शेवटी वैतागून.. तो सेल्समेन त्या बाईंना म्हणाला.
देखो बहेनजी.. आपने अगर ये साडी नही ली. और, आपके जानेके बाद अगर ये साडी कही बिक गयी. तो, घर जाके आपको दो दिन तक खाना अच्छा नही लगेगा..! कसमसे कहेता हुं..!!
आता बाकी.. बाईंच्या चेहेऱ्यावर मला एक भितीयुक्य लालसा दिसून आली.
आणि त्या म्हणाल्या..
हा SSS लय शहाणा आहेस, आन ती साडी हिकडं..! असं म्हणत, ती साडी घेऊन त्या बाई काउंटर कडे निघून गेल्या.
सेल्समनची मात्रा लागू पडली होती. त्याने ती साडी त्या बाईच्या बरोबर गळ्यात मारली होती.
अशा व्यवसायात.. या महिला मंडळींना त्यांना खूप पटवावं लागत असतं. या कामात त्या सेल्समनचं सगळं कसब पणाला लागत असतं. आणि याच कामाचा त्यांना मोबदला मिळत असतो.
इकडे हा प्रकार चालू होता, तोपर्यंत.. माझ्या बायकोने दोन साड्या पसंद केल्या होत्या. तरीही नाही म्हणता एक तास वाया गेलाच.
बायकोच्या अपरोक्ष समोर घडलेल्या प्रकरणाकडे तिचं काही लक्षच नव्हतं.
साडीचं बिल देण्यासाठी आम्ही सुद्धा काउंटरवर पोहोचलो. तर, मगाशी साडी घेत असलेल्या त्या बाई सुद्धा तीथेच उभ्या होत्या. त्यांनी घेतलेल्या साडी बाबत, त्या अजूनही मला साशंक वाटत होत्या.
आता, मी तरी गप्पं बसावं कि नाही.. पण शेवटी न राहवून, मी त्या बाईंना म्हंटलं.
" तुम्ही घेतलेली साडी खरच खूप छान आहे हो..! "
तेंव्हा कुठे त्या बाईचं समाधान झालं. माझ्या या वाक्यावर त्या बाई तर जाम खुश झाल्या होत्या.
त्यांनी ताबडतोब पर्समधून पैसे काढले आणि साडीचं बिल चुकतं केलं.
आणि इकडे मात्र..
आमच्या "सौं " च्या कपाळावर, शंभर आट्या पडल्या होत्या.


थंडीचे दिवस, सकाळी आठची वेळ होती..
हवेमध्ये भलताच गारवा जाणवत होता. थोड कोवळं ऊन खावं म्हणून, मी बाहेर ओठ्यावर येऊन बसलो. तितक्यात.. स्वेटर आणि कानटोपीने सर्वांग झाकून घेतलेला छोट्या, मामा- मामा करत माझ्या कुशीत येऊन बसला. ताईने, गरमागरम चहाचा कप माझ्यासमोर धरला. म्हंटलं वाह.. थंडीमध्ये गरमागरम चहा पिण्यात एक वेगळाच आनंद मिळतो.
आल्या पावली ताई घरात निघून गेली, आणि घरातील काही भांडी धुण्याकरिता, बाहेरील ओट्यावर घेऊन आली. ताई भांडी घासायला सुरवात करणार...
इतक्यात, समोरून आवाज आला.
" आई sss भाकर वाढ गं माई "
माझ्यासमोर... अंदाजे, एक सहा सात वर्षाची मुलगी. आणि, चारेक वर्षांचा मुलगा उभा होता. दोघांच्या अंगात, फाटलेली व मळलेली कपडे होती. मुलीने सरकारी शाळेत मिळणारं एक जुनं पुराणं पोलकं घातलं होतं. अंगाने शिडशिडीत बांध्याची असणारी ती कोवळी मुलगी, रंगाने काळी सावळी जरी असली. तरी खूपच नाकशार होती. तर तिच्या सोबत असणाऱ्या त्या मुलाने, फक्त म्हणायला पांढरा असणारा शर्ट घातला होता. त्या शर्टाचा अर्धवट उसवलेला खिसा खालच्या बाजूला लोंबत होता. आणि खिशाच्या त्या उरलेल्या अर्ध्या भागात, लाल रंगात कोणत्या तरी शाळेचं नाव लिहिलेलं दिसत होतं. आणि, हुक तुटलेली खाकी हाल्फ चड्डी, कंबरेच्या कट दोऱ्यात अडकवून सुद्धा तिला एका हाताने गच्च धरून सावरत तो तिथे उभा होता. त्याच्या काळवंडलेल्या चेहेऱ्यावर, नाकाच्या खाली, सुकलेल्या शेंबडाचे व्रण स्पष्ट दिसत होते.
त्या दोघांच्या डोळ्यात, मला एक विशिष्ट प्रकारची चमक दिसत होती. त्या मुलाच्या हातात, शिळीपाकि भाजी घेण्यासाठी जर्मलचं एक कळकटलेलं भांडं होतं. आणि त्या मुलीच्या काखेत, शिळ्या भाकरी चपत्यांनी भरलेली एक जुनाट पिशवी होती.
त्या मुलीचं वाक्य पूर्ण होतं ना होतं तोच.. ताई त्या मुलीला म्हणाली.
ए पोरी.. तुला चपाती देते, हि येवढी भांडी घासतेस का..?
ताईचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच.. त्या मुलीने, मानेनेच होकारात्मक इशारा करत. आपल्या, काखेतली पिशवी जमिनीवर काढून ठेवण्याची तयारी दर्शवली.
समोरील हे अनपेक्षित दृश्य पाहून, माझ्या डोळ्यात खळकन पाण्याची धार लागली.
काय रे देवा, काय बुद्धी दिली असशील तू या लहान लेकराला. फक्त एका चपातीसाठी, ती लहान मुलगी भांड्याचा एवढा मोठा ढीग घासायला एका क्षणात तयार झाली होती.
हे दृश्य पाहून, माझं मन फार हेलावून गेलं.
आणि.. आमच्या घरातील, लहान मुलांची चित्रं माझ्या डोळ्यासमोर तरळू लागली..
सकाळ होताच, सगळी अवराअवर झाल्यावर. शाळेत जाण्या अगोदर, आई त्यांना गरम-गरम चहा आणि चपाती खायला देतेय.
आणि, ती मुलं.. चपाती नको बिस्किट पाहिजे, बिस्कीट नको ब्रेड पाहिजे, ब्रेड नको खारी पाहिजे, खारी नको टोस्ट पाहिजे.. उपिट का नाही केलंस.? शिरा का नाही केलास..? म्हणून रुसून फुगून बसलेत. तरीही त्यांची आई त्यांना लाडाने हो बाबा उद्या आणूया, उद्या करूयात. अशी बोळवण करत त्यांना खाऊ घालतेय.
मी भूतकाळातून पुन्हा वर्तमानात आलो, माझी तंद्री भंग पावली. आणि मी जसा भानावर आलो. तसा एकाएकी मी ताईवर खेकसलो,
काय गं ताई.. हे, असं वागनं शोभतंय का तुला..?
त्यावर ताई म्हणाली. अरे तसं नाही रे, मी तिचं मन पाहत होते. कारण, भिक मागणाऱ्या बहुतेक मोठ्या बायका भिक मागायला येतात. आणि, असं काही काम सांगितलं. कि, लगेच पुढच्या घरचा रस्ता धरतात.
अगं पण.. ती किती लहान आहे ते तरी बघ..!
ताई म्हणाली, अरे मी पटकन बोलून गेले. माझा तिला काम करायला लावायचा असा कोणताच उद्देशच नव्हता.
मी ताईला म्हणालो.. पण ताई, हि मुलगी मला त्यातली वाटत नाही गं...! कष्ट करून खायची तयारी दिसतेय ह्या मुलीत.
तेवढ्यात, ताईने घरात जाऊन दोन पोळ्या आणल्या. आणि, त्या दोघांच्या हातात एक-एक पोळी दिली. तशी, ती दोन्ही मुलं दुसऱ्या घराकडे वळाली. पण, माझी नजर काही त्यांचा पिच्छा सोडत नव्हती.
आमच्या घरापासून, साधारण पाच पन्नास पावलं चालत ती मुलं पुढे गेली असतील.
आणि मी पाहतो तर काय, त्या दोघांनीही चालता-चालता त्यांना मिळालेली ती पोळी फस्त केली होती. बहुतेक, ते दोघेही खूप भुकेलेले असावेत.
आणि आता, ते उभे असलेल्या शेजारच्या घरात त्या बाईला पिण्यासाठी पाणी मागत होते. मनात म्हंटलं, गरम-गरम पोळी त्यांना फार आवडली असणार. म्हणून, त्यांनी लगेच खाऊन घेतल्या असतील.
मी ताबडतोब ताईला आवाज दिला, आणि म्हणालो..!
ताई sss त्या मुलांना तू गरमागरम ताज्या पोळ्या दिल्यास का..?
ताईने माझ्याकडे पाहत, मानेने नाही असं म्हंटल. आणि, म्हणाली का रे काय झालं..? कालच्या उरलेल्या चपात्या मी त्यांना दिल्या.
मी सुद्धा.. ताईला, काही नाही..!
असं म्हणून गप्प बसलो. बहुतेक ती शिळी आणि कोरडी चपाती खाल्ल्याने. त्यांना घास बसला असावा, येवढ्या सकाळी भिक म्हणून त्यांना चहा कोण देणार आहे..?
म्हणून ते, त्या घरात पाणी मागत असावेत.
तेवढ्यात ताई मला म्हणाली.
अरे, तू तो चहा नाही घेतलास अजून..?
चहा तर, थंडीने केंव्हाच थंड होऊन गेला होता. विविध विचारांनी माझं मन बधीर झालं होतं. आणि, काही केल्या माझी नजर त्या लहान बाळांच्या पाठमोऱ्या आकृती वरून हालता हलत नव्हती..!

माझ्या एका मित्राचं लग्न होतं,
दुपारी एकचा मुहूर्त होता. नवरदेव उतावीळ असल्याने, अगदी राईट टाईम बोहोल्यावर दाखल झाला. तो आल्या बरोबर, भटजींनी इतर सोपस्कारा बरोबरच, त्याला दाडेखाली धरून ठेवण्यासाठी पानाचा एक विडा सुद्धा दिला.
बराच वेळ झाला, तरीही..नवरी मुलगी काही मेकप रुमच्या बाहेर यायलाच तयार नव्हती.
या एकमेव कारणामुळे, माझा मित्र पक्का बोअर झाला होता. शेवटी.. त्याठिकाणी, तो एकटा अगदी विदुषक वाटत होता. त्यामुळे, मी सुद्धा त्याच्या जोडीला ( दुसरा विदुषक ) जाऊन उभा राहिलो. चलो, एकसे भले दो..!
आणि.. मी पाहतो तर काय, हा गडी भटजींनी दिलेला पानाचा विडा चाऊन खाऊन मोकळा झाला होता. आणि मुखात उरलेल्या विड्याची तो अजूनही रवंथ करत होता. त्यावेळी..मी त्याला म्हणालो..
अरे वेड्या, हा विडा तुला दाढेखाली धरून ठेवायला दिलेला असतो. खायचा नसतो..!
त्यावर तो मित्र म्हणाला..
कितीवेळ झाला राव, एकतर.. मेकअप रुमच्या बाहेर हि काही अजून येईना झालीय. गरम किती होतंय, त्यात.. दाढेखाली विडा धरून माझी दाढ दुखायला लागली. कोणाशी बोलता येईना, त्यात भूक सुद्धा लागली होती. जाऊदे मरुदेत टाकला खाऊन..!
आणि.. अजून एक महत्वाची गोष्ट मला त्याने माझ्या कानात येऊन सांगितली.
तिकडे काहीही असो, पण.. गुरुजी, पान छान बनवतात बरं का,
फक्त, त्यात गुलकंद तेवढं नव्हतं..!
( टीप :- हि सत्य घटना आहे, त्यामुळे मनात आकस आणून, ब्राम्हण समाज किंवा भटजींवर कोणीही फालतू टीका टिपणी करू नये. ताबडतोब " ब्रम्हास्त्र " वापरलं जाईल.! )

फार मजेशीर किस्सा आहे, एका लग्नाला गेलो होतो.
मला लग्नाला जायला उशीरच झाला होता. तिथे पोहोचल्यावर नवरा घोड्यावर बसून श्रीवंदनाला निघालाच होता, कार्यालयात बसण्यापेक्षा मी सुद्धा त्या वरातीत सामील झालो.
मारुतीच्या पाया पडून, नवरा मुलगा घोड्यावर बसून परत कार्यालयाकडे निघाला होता. मुलाच्या मागे हातात तबक घेऊन पाच सहा तरुण महिला सुद्धा होत्या. त्यामागे आम्ही काही पुरुष मंडळी, बाकी उरलेली सगळी तरुणाई, नवऱ्या मुलाच्या समोर बेंडच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होते.
काही अंतर चालून आल्यावर, तो घोडा अचानक मधूनच वाकला, त्याने चारी पाय फाकवले. नाही म्हणता, नवरा मुलगा तसा चांगलाच धष्टपुष्ट होता. घोडा वाकल्या बरोबर, नवरदेव मुलगा घोड्याच्या खाली उतरला.
तो घोडेवाला, नेमका त्या कार्यालया जवळच राहायला होता. त्याने ताबडतोब जाऊन दुसरा घोडा आणला. नवरदेव पुन्हा एकदा नव्या घोड्यावर स्वार झाला, आणि काही वेळात, तो दुसरा घोडा सुद्धा वाकला. आता बाकी कामालच झाली, नेमका दोष कोनात आहे..?
घोड्यात कि नवरदेवात..? तेच काही समजेना झालं होतं.
घडल्या प्रकारामुळे, नवरा मुलगा दचकून पुन्हा त्या घोड्यावर बसायला काही तयार होत नव्हता.
तितक्यात गर्दीतून कोणीतरी म्हणालं, त्याला खांद्यावर घ्या रे..!
आता.. घोड्याची अवस्था अशी झाली होती. तर खांद्यावर घेणाऱ्या व्यक्तीचं काय होईल..? हा धसका खाऊन, त्याला खांद्यावर घ्यायला कोणीच तयार होईना. शेवटी नाईलाज झाल्याने, नवरदेव चालतच लग्न कार्यालयाकडे निघाला.
तर त्या वरातीत.. काही महिला सुद्धा नवरदेवाच्या मागोमाग निघाल्या होत्या. भल्या मोठ्या आवाजात मुंगडा मुंगडा करत..बँड चालूच होता, त्याचा आवाजही चांगला मोठा होता.
तर हा घडला प्रकार पाहून.. त्यातील एक तरुण महिला तिच्या शेजारी चालत असणार्या दुसऱ्या महिलेला अगदी जोरात म्हणाली..
बया.. आता, ह्या पोरीचं कसं होईल काय माहिती..?
बेंडचा आवाज जरा मोठा असल्याने, आपला आवाज त्या शेजारील महिलेला ऐकू येईल कि नाही..?
त्यामुळे, ती बाई हे सादर वाक्य जरा मोठ्यानेच बोलली होती.
आणि मी नेमका त्या दोघींच्या मागोमाग चालत असल्याने, ते वाक्य मला अगदी स्पष्टपणे ऐकू आलं होतं. त्या जे काही बोलल्या ते मी ऐकलं आहे, हे बाकी त्यांच्या गावीच नव्हतं.
त्या दोघींमध्ये घडलेल्या विनोदावर, एकमेकींना त्या दोघी टाळ्या देत मोठमोठ्याने हसत होत्या.
आणि दुसरीकडे मी एकटाच दिवा स्वप्नात रममाण झालो होतो.
माझ्या नजरेसमोर एक विशिष्ट प्रसंग, आणि बया.. " आता ह्या पोरीचं कसं होईल काय माहिती..? "
हे, एकमेव वाक्य तरळून जात होतं..!

Tuesday, 3 April 2018

पेट्रोल पंपावर.. एक कार पेट्रोल भरण्याकरीता उभी होती.
ड्रायव्हिंग सीटवर.. स्वतः, गाडी मालक बसला होता. मालक कसला, तीसेक वर्षांचा तरुण आणि रुबाबदार मुलगाच होता तो. कारच्या मागील सीटवर, नजर लागेल इतपत सुंदर अशी त्याची बायको, व त्याचा वर्षभराचा लहान मुलगा बसले होते.
पेट्रोल भरणारा मुलगा, कारच्या सामोरील दरवाजातून, पेट्रोल टाकीचं झाकण उघडण्याकरिता, उघड्या काचेतून हाथ पुढे करत, त्या गाडीमालक मुलाला चावी मागत होता. त्या मुलाने सुद्धा, लगेच चावी काढून दिली. चावी हातात घेत असताना.
नकळत त्या पेट्रोल भरणाऱ्या कर्मचारी मुलाचं लक्ष, मागील सीटवर गेलं. कारमध्ये, मागे बसलेली आई वजा तरुण मुलगी दिसायला खूपच सुंदर होती.
तिचं लग्न झालं असलं तरी, तिला कोणत्याच अंगाने बाई म्हणता येणार नव्हतं. तर ती सुंदर अशी, एक मुलगीच हो. फक्त, लग्न झालेली. आणि, एका लहान मुलाची आई.. इतकच काय ते.
या कर्मचारी महाशयाने, कारच्या पेट्रोल टाकीचं झाकण उघडलं. आणि, कारमध्ये पेट्रोल भरायला सुरवात केली. आणि थोडा अलीकडच्या बाजूला होऊन पेट्रोल भरत असताना..
तो एक सारखा.. वाकून, चोरून, काकदृष्टीने त्या मुलीकडे पाहात होता.
कारमध्ये पेट्रोल भरण्याकडे, त्याचं बिलकुल लक्षच नव्हतं. आता हे सगळं रामायण घडतंय, तर मग.. त्या मुलीच्या, नवर्याच्या नजरेतून हा विषय कसा सुटेल..?
पण विशेष म्हणजे, हे सगळं घडत असताना, त्या मुलीचं त्या पेट्रोल भरणाऱ्या मुलाकडे मात्र बिलकुल लक्षच नव्हतं. ती बिचारी, आपल्या लहान मुलाला खेळवण्यात दंग होती. तरी हा बिचारा कर्मचारी, तिच्याकडे खूप.. वाकून-वाकून पाहायचा प्रयत्न करत होता. तो फक्त त्या लावण्यवतीच्या एका 'झलकचा' भुकेला होता.
त्या मुलीचा नवरा, हे सगळं काही लांबूनच पाहात होता. आणि मनोमन हासत सुद्धा होता.
बहुतेक, तो मुलगा ( तिचा नवरा ) खुशमस्कऱ्या असावा. आणि शेवटी वैतागून..
तिचा नवरा.. त्या पेट्रोल भरणाऱ्या मुलाकडे हात करत, त्याच्या 'बायकोला' म्हणाला.
अगं प्रीती.. बाळाला खाली ठेव.
आणि, एकदा बघ गं त्याच्याकडे. नाहीतर, जीव जाईल त्याचा..!
नवऱ्याच्या या अनपेक्षित अशा वक्तव्यावर, त्या आई मुलीची तंद्री ताबडतोब भंग पावली. आणि ती मुलगी लाजेने खूप ओशाळली. हा प्रकार घडल्या नंतर, त्या पेट्रोल भरणाऱ्या मुलाचा चेहेरा तर अगदी पाहण्यासारखा झाला होता. त्याच्या हाताला थरथरी भरली होती. तो बिचारा, इतका ओशाळून गेला होता.
कि लाजेच्या मारेने पेट्रोल भरून झाल्यावर, पेट्रोलचे पैसे घ्यायला सुद्धा तो आला नाही. त्याने, दुसर्याच मुलाला तिथे पैसे घेण्यासाठी पाठवून दिलं होतं.
हा सगळा प्रकार घडून गेल्यावर, त्याची बायको बिचारी लाजून चूर झाली होती.
आणि.. या नवरोबाच्या गालावर मला एक वेगळच स्मित दिसत होतं.
बहुतेक.. आपली बायको, खूप सुंदर असल्याचा त्याला अभिमान वाटला असावा..!!

जसा डॉक्टर हा पेशा आहे,
तसा.. ड्रायव्हर हा सुद्धा एक पेशा आहे..!
काही गोष्टी लोकांच्या लवकर ध्यानात येतच नाहीत. ड्रायव्हिंग हे एक असं वैशिष्ट्यपूर्ण काम आहे. कि, हे काम करण्यासाठी मनुष्याला त्याचे सगळे इंद्रिय जागृत ठेवावे लागतात.
उदा :- हात.. स्टियरिंग, व्हायपर, हेड लाईट्सचे अप्पर डीप्पर आणि इंडिकेटर सांभाळत असतात, पाय.. ब्रेक, क्लच आणि एक्सिलेटरवर नियंत्रण ठेवत असतात.
डोळे तर काय.. अगदी, चौरस काम करत असतात. दोन्ही साईड मिरर, आणि एक मिडल मीरर, शिवाय आजूबाजूला पाहत व्यवस्थितपणे गाडी चालवण्यासाठी चालकाला ते मदत करत असतात.
मेंदू.. हे सगळं कार्य व्यवस्थित हँडल करायचं काम करत असतो.
आणि.. राहता राहिला आता, शेवटचा अवयव..
तो म्हणजे, नाक.. नाकाचं सुद्धा फार महत्वाचं काम आहे बरं का. गाडीतून, डीझेल किंवा पेट्रोल लिक होतंय का, ब्रेक लायनर, क्लच प्लेटचा, किंवा वायरिंग जळल्याचा काही वास वगैरे येतोय का..? या सगळ्या गोष्टीची ते चाचपणी करत असतं.
म्हणजे.. थोडक्यात काय, तर ड्रायविंग करताना व्यक्तीला त्याची सगळी इंद्रिय जागृत ठेवावी लागतात. अन्यथा अपघाताला आमंत्रण हे ठरलेलं असतं.
तर.. काही डॉक्टरी पेशातील सर्जन व्यक्तींकरिता, किंवा.. वकिली पेशातील व्यक्तींना मी इथे काही सांगू इच्छित आहे. माझ्या बरेचदा पाहण्यात आलं आहे.
काही डॉक्टर मंडळी, हॉस्पिटल मध्ये जाताना किंवा वकील लोकं कोर्टात जाताना, आवड म्हणून स्वतः ड्रायव्हिंग करत कामाला जात असतात.
पुण्या मुंबईत.. आजच्याला फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना, व्यक्ती थोडासा चिडचिडा होतो. पण ड्रायव्हर व्यक्तीचा हा पेशाच असल्याने, ते काम करत असताना. हा आपल्या कामाचा रोजचा भाग आहे. असं समजून, तो या सर्व गोष्टी निमूटपणे सहन करत असतो.
पण त्याच ठिकाणी, दुसरी कोणती व्यक्ती असेल, तर.. हॉर्न वाजवून, ते स्वतःचं आणि इतरांचं मानसिक संतुलन बिघडवून टाकतात.
आणि चुकून.. हि ड्रायव्हिंग करणारी व्यक्ती, सर्जन किंवा वकील असली तर.?
एवढी चिडचिड करून ती ऑपरेशन करायला गेली. किंवा, एखाद्या मोठ्या गुंतागुंतीच्या केससाठी गेली, तर तो त्याचं काम व्यवस्थितपणे करू शकणार आहे का..?
सकाळच्या त्या कटकटीचा, त्याच्या मनावर आणि मेंदूवर थोडातरी परिणाम होईल कि नाही..?
त्यामुळे.. माझं तर एक ठाम मत आहे,
अशा मोठमोठ्या सर्जन किंवा वकिली करणाऱ्या व्यक्तींनी. त्यांच्या गाडीवर कामाला ड्रायव्हर ठेवला पाहिजे. आणि ऑपरेशन करायला जात असताना. किंवा मोठी केस लढायला जात असताना. जी केस ते आज हाताळणार आहेत. त्याची कार मध्ये बसून संपूर्ण फाईल वाचून त्यावर अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे, ते करत असणारं " ऑपरेशन " सहजरीत्या पार पडलं जाईल.
हे फक्त, एक प्रतीकात्मक उदाहरण आहे..
फक्त डॉक्टरच नाही.. तर, जी कोणती लोकं बुद्धीचा फार मोठ्या प्रमाणात वापर करून काम करणारी असतील. त्या सर्वांनी हि खबरदारी नक्कीच घेतली पाहिजे.
ज्याचं काम त्याला वाटून दिलेलं आहे. त्यात कोणीही गफलत करता कामा नये..!
आजच्याला मी रोज पाहत असतो.. आयटी सेक्टर मध्ये काम करणारी मुलं, आजच्याला गलेलठ्ठ पगार घेत आहेत. पण, त्या कामामुळे.. त्यांच्या शरीराची फार मोठी हेळसांड होत आहे. हे त्यांनी वेळीच ओळखलं, आणि.. कामावर जाताना, त्यांनी सायकलवरून कामाला जायला सुरवात केली. रोजच्याला.. त्यांच्या घरासमोर कार येऊन उभी राहत असते.
पण. काही बुद्धीजीवी व्यक्ती, त्या गोष्टीला सरळ नकार देऊन मोकळे होतात.
वरील दोन्ही विषय अगदी भिन्न आहेत. पण, त्यामागचा आशय मात्र एकच आहे.
हे.. जाणकाराला सांगणे न लागावे..!!
सावधान होई वेड्या, सावधान होई..!!
नमस्कार माऊली..
काही मदत करा, आमचं सगळं सामान चोरीला गेलय. पुण्यात आलो होतो, परत गावाकडं जायचंय, वाटखर्ची पण संपलीय. करा, काही मदत करा माऊली..!
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम..
माऊली या शब्दात, एक फार मोठी आई दडली आहे. त्यामुळे, या शब्दाचं मला नेहेमी विशेष कौतुक वाटत असतं. आणि, कोणी माऊलींच्या नावाने काही पुकारा करत असेल. त्यावेळी मात्र, मी फारच गहिवरून येतो.
पांढरं धोतर आणि सदरा, माथ्यावर कळकटलेली गांधी टोपी.. असा वेश परिधान केलेला साठीतला एक जाडजूड व्यक्ती. त्याच्या सोबत, नऊवारी साडी नेसलेली एक पन्नाशीतील जाडी भरडी स्त्री. बहुतेक.. ती, त्या व्यक्तीची बायको असावी.
तिच्या काखेवर, त्यांच्या वयाला न शोभणारा एक लहान मुलगा. ज्याला, ते आपला मुलगा म्हणत होते. आणि, माझ्याकडे मदतीची याचना करत होते.
मदत मागताना ते खूप काकुळतीला आले होते.
माझं मन म्हणजे निव्वळ मेन हो, असं काही ऐकलं कि मी लगेच पाघळून जातो.
काय करता.. मला त्यांची खूप दया आली.
पण.. सत्य परिस्थिती काहीतरी वेगळीच होती,
कि.. माझ्या खिशात फक्त शेवटची, आणि एकमेव पन्नास रुपयाची एकच नोट उरली होती.
माझ्या खिशात म्हणतोय बरं का, पाकिटात नाही. कारण.. त्याकाळी पैसे ठेवायला, पाकीट विकत घेण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसेच नसायचे.
चालू महिना संपायला, आणि पगार व्हायला, अजून.. तब्बल सात दिवसांचा अवधी होता. त्या सात दिवसातील, माझी हि अखेरची जेबखर्ची होती.
नंगा नाहायेगा क्या, और निचोडेगा क्या..?
काय करावं.. ? माझ्या मनात, विचारांचं चक्र सुरु झालं..!
तेंव्हा, मी पुणे महानगरपालिकेत नवीनच रोजंदारीवर कामाला लागलो होतो.
दोन हजार सालातील घटना आहे,
सकाळी सहा वाजता लवकर उठून.. काखेत, जेवणाच्या डब्याची पिशवी अडकवायची. आणि.. दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या, पिंपरी रेल्वे स्टेशन पर्यंत रोज चालत जायचं. हा माझा रोजचा नित्यक्रम होता. आणि घरी येताना सुद्धा, लिफ्ट मागत किंवा चालतच यायचं.
गरिबी खूप वाईट हो, हे मी जे काही लिहिलंय. यातील एक सुद्धा शब्द खोटा नाहीये बरं का.!
माझी हि रोजची ससेहोलपट पाहून, माझ्या एका मित्राने त्याच्याकडे असलेली, आणि.. वापरात नसलेली एक जुनी सायकल मला मोफत देऊ केली.
मी सुद्धा थोडा खर्च करून, तिला मस्तपैकी तयार केली. काय करता, अंधळ्याला काठी मिळाली, अशातली गत झाली.
आणि.. मी, रोज त्या सायकलवर स्वार होऊन अगदी आरामात, रेल्वेस्टेशन पर्यंत पोहोचायला लागलो. वेळेची बचत झाली, आणि माझी पायपीट सुद्धा थांबली. उपकारच म्हणायचे हो त्या मित्राचे.
त्यावेळी.. पिंपरी ते पुणे, अवघ्या पंच्याऐंशी रुपयाच्या मासिक पास वर माझा महिनाभराचा रेल्वे प्रवास होऊन जायचा. आणि तेंव्हा..माझा महिन्याचा पगार, अवघा तीन हजार रुपये होता.
त्यात.. घरभाडं, घरसामान, माझ्या येण्याजाण्याचा खर्च, तेंव्हा आमचा प्रतिक खूप लहान होता. त्याचा लहानपणीच्या दवाखान्याचा खर्च,
मला मिळणाऱ्या त्या तुटपुंज्या पगारात हे सगळं बिलकुल भागत नव्हतं. तरी नशीब.. तेंव्हा मला कोणतेही अतिरिक्त शौक नव्हते.
खरं सांगतो, महिना अखेरीला.. कोणाकडे तरी हातऊसने म्हणून, शे पाचशे रुपयाची उधारी हि ठरलेली असायचीच.
आणि.. हे पन्नास रुपये म्हणजे, माझ्या आठवड्याची जेब खर्ची. आणि, बस भाडं.. किमान, या लाचार लोकांपेक्षा तरी मी सुखी आहे. असा विचार करून, ती पन्नास रुपयाची नोट, मन मोठं करून त्या उभयतांच्या स्वाधीन केली.
त्या दिवशी, स्वारगेट ते शिवाजीनगर हे अंतर मी पायी चालत गेलो.
कारण.. बसने जायला माझ्याकडे पैसेच नव्हते ना.
जाऊदेत.. कोणाच्यातरी कामी आलो याचं मला फार समाधान वाटत होतं.
चालत-चालत, मजा करत.. तासाभरात मी शिवाजीनगरला येऊन पोहोचलो. त्यावेळी मला चालायची बिलकुल सवय नव्हती.. ड्रायव्हर माणूस, काय करणार नाही का..!
त्यामुळे..त्यादिवशी चालून-चालून माझ्या पायाचे अगदी भडके उडाले होते. मांड्या आणि पोटऱ्याचं मास, जागेवर फडफड करत होतं. रेल्वे स्टेशनला बसून, थोडा आराम केला. काही वेळातच लोकल आली..
नित्यनियमा प्रमाणे.. लोकलचा, प्रवास करून धक्के बुक्के खात वीस मिनिटात मी पिंपरी स्टेशनला पोहोचलो. पुन्हा, तीच जुनी आणि आवडती सायकल घेऊन, धापा टाकत मी घराकडे निघालो.
या संपूर्ण विषयाला.. साधारण, पंधरा दिवसाचा काळ लोटला असावा..!
सायंकाळी.. सहा साडेसहाची वेळ, सायकलवर धापा टाकत पिंपरीहुन मी घराकडे निघालो होतो. आणि, अचानकपणे..
मला, पंधरा दिवसांपूर्वी भेटलेलं नेमकं तेच जोडपं समोर दिसून आलं.
त्यांना पाहून मी जागीच थबकलो. आणि ताबडतोब सायकलवरून खाली उतरलो.
मी त्यांच्यासमोर हातात सायकल घेऊन उभा होतो, पण..त्यांनी काही मला ओळखलं नव्हतं. सरवाप्रमाणे, ते हि माझ्याकडे आले.
आणि.. मागचेच पाढे त्यांनी वाचायला सुरु केले.
मी ते सगळं काही शांतपने ऐकत होतो. ते सगळं काही ऐकत असताना, माझ्या मनात भयंकर राग उफाळून आला होता.
विषय संपला.. आता मात्र, मला त्यांच्या वयाचं सुद्धा भान उरलं नव्हतं.
मी त्यांना.. पंधरा दिवसापूर्वी घडलेल्या दिवसाची आठवन करून दिली. तसे, ते दोघेही चपापले.
आणि, एकाएकी माझ्या तोंडातून शिव्यांची सरबत्ती सुरु झाली. त्यांनीही, त्या शिव्या गपगुमान ऐकल्या. आणि, पुढे निघून गेले.
असा योगायोग क्वचितच घडावा. माझा राग काही शांत व्हायला तयार नव्हता. माझं सगळं शरीर रागाने थरथर कापत होतं. आणि अचानकपणे माझ्या डोळ्यात खळकन पाणी आलं.
पन्नास रुपयाची ती नोट, माझ्या डोळ्यासमोर रुंजी घालत होती..!
पैसे सत्कारणी लागले असते, तर त्याचं मला काहीच वाटलं नसतं.
राहून-राहून त्या पैशामध्ये, मला.. माझ्या मुलासाठी लागणारी डॉक्टरांची फी डोळ्यासमोर दिसत होती, माझ्या शिवाजीनगर ते स्वारगेट बसचं पंधरावड्याचं बस भाडं दिसत होतं, सायकल स्टॅन्डचं दोन महीन्याचं भाडं दिसत होतं.
काय करता..हताश मनाने पुन्हा एकदा सायकलला टांग मारून मी घरी निघालो.
आणि, तेंव्हापासून आजतागायत 'इच्छा' असूनही मी कोणालाही मदत करायचं टाळत असतो. शेवटी ती म्हण आहेच कि, गव्हासोबत किडे सुद्धा रगडले जातातच.
खरं सांगतो..ती फसवणूक, माझ्या फार जिव्हारी लागली होती..!

 · 
कोल्हापूर आणि मटणाचा तांबडा पांढरा रस्सा.. हे फार जुनं आणि चविष्ट समीकरण आहे. मी जेव्हा कधी कोल्हापूरला जात असतो, त्यावेळी..देवदर्शना सोबतच, या तांबड्या पांढऱ्या रश्याचा नक्की आस्वाद घेत असतो.
शिवाजी चौकातील हॉटेल #गंधार मध्ये..फार सुंदर, चमचमीत आणि रुचकर जेवण मिळतं. मी नेहेमी याच हॉटेलमध्ये जेवायला जात असतो. कारण हे हॉटेल.. मंदिरापासून बरच जवळ आहे. आणि स्वच्छतेच्या बाबतीत एकुणात हे हॉटेल मला अगदी ठीकठाक वाटलं.
इथे..दीडशे रुपयापासून अगदी साडेतीनशे रुपयांपर्यंत मटण थाळी आहे. शिवाय, इतर वेगवेगळ्या डिशेश सुद्धा आहेत. त्यात चिकन थाळी आणि कोंबडी वडे सुद्धा मिळतात. पण मी, इथे स्पेशल मटन खायला आलो असल्याने, यावेळी खुद्द त्या मालकालाच मी प्रश्न केला.
मालक.. कोणती थाळी घेऊ..?
त्यावेळी अगदी प्रामाणिकपणे, त्यांनी मला दोनशेतीस रूपायावाली मटण थाळी घ्या म्हणून सांगितलं. हा माझा कायमचा फंडा आहे, आपण अशी विचारपूस केल्याने फार फरक पडतो. तो व्यावसायिक आपल्याला सहसा फसवत नाही. म्हणजे, खिशाला चाट देत नाही.
थोड्याच वेळात आमच्या टेबलवर स्टीलची तीन ताटं लावण्यात आली.
सुरवातीला.. एका मोठ्या बाऊलमध्ये चिकन सूप आणून दिलं. चायनिस चमच्याने,ते चिकन सूप पिल्यावर माझी भूक भलतीच चाळवली.
पण तो वाढपी काही पुढच्या विषयाला हात घालायलाच तयार नव्हता, निवांत हातावर हात ठेवून एका बाजूला उभा होता. शेवटी मी त्या वेटरला जवळ बोलवून खडसावला, तेंव्हा तो पटकन खाली गेला. आणि..आमच्या ताटात,
मटणाचा आळणी रस्सा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अंडा मसाला आणि सोलकडी येऊन स्थिरावली..
पुन्हा एकदा त्या वेटरला मी खसकवला..
काय लका.. नुसता रस्सा पाजूनच पोट भरायला लावतोस का काय..!!
तसा धावतच तो खाली गेला.. आणि, मटण सुक्क्याची एक मोठी डिश आणि भली मोठी मऊशार चपाती तो घेऊन आला.
इथली चपाती म्हणजे एक खास वैशिष्ट्य आहे बरं का. हि चपाती, जंबो चपाती प्रकारात मोडते. शिवाय, या चपातीच्या गव्हाची कॉलीटी सुद्धा अगदी उच्च प्रतीची असते. ते आपल्याला ती चपाती खाल्ल्यावरच समजतं. अशी चपाती, सहसा आपल्या घरात बनत नाही. त्यामुळे, या चपातीला मी घरगुती चपाती म्हणू शकत नाही. त्यामुळे, या चपातीला आपल्याकडून एकशे एक मार्क आहेत. आणि, तिला बनवणाऱ्या तायांना सलाम आहे.
आमच्या बाजूच्या टेबलावर.. काही इन्स्पेक्टर मंडळी जेवायला आली असल्याने. मालकांचं तिकडे जरा जास्तीच लक्ष होतं. पण या सर्व गोष्टीकडे पाहायला मला आता वेळ नव्हता.
तोवर.. आमच्या समोरच, ( म्हणजे, माझ्या बायकोच्या पाठमोरं  ) एक नवविवाहित जोडपं येऊन बसलं, तो मुलगा फोनवर बोलण्यात गुंग होता. तर हि सावळी चिकणी मुलगी, मेनूकार्ड बघून नकारात्मक असे तोंडाचे विशिष्ट हावभाव करत होती. मेनूकार्ड वाचून, तिने तिच्या नवऱ्याला नकारात्मक इशारा केला. त्यासरशी, तो मुलगा रागारागाने तिच्यावर थोडाफार खट्टू होऊन तिथून बाहेर पडला. पण बाहेर जाताना, ती मुलगी खूप गुलाबी हसून गेली. बहुतेक, तिच्या इच्छित स्थळी तिला जायला मिळालं असावं. असो.. गेली ते बरं झालं,
नाहीतर.. माझी बायको पोटभर जेवली नसती. 
जेवताना अगदी सुरवातीला.. गरमागरम पांढऱ्या रश्याची वाटी मी ओठाला लाऊन मोकळी करून टाकली. तेंव्हा कुठं मला जरा बरं वाटलं. हा पांढरा रस्सा म्हणजे, निव्वळ अमृतच.
नंतर.. मऊशार चपातीचा लुसलुशीत मटणासोबत मिलन घडवून, तो स्वर्गीय घास मी स्वाहा केला. त्यावर..थोडा तांबडा रस्सा फुरका मारून ओढला. आहाहा.. मग काय, दोन चपात्या संपेपर्यंत हा सिलसिला असाच चालू राहिला.
मधे मधे तोंडी लावायला, अंडा मसाला होताच. शिवाय, लोणीदार दह्यात भिजवलेला कांदा सुद्धा खूप चवदार होता.
जेवताना..हातामध्ये रस्सा असलेलं पात्र घेऊन, तो वाढपी एकसारखा..
वाढू का-वाढू, का..? करायचा.
पण मी.. पक्का पुणेरी असल्याने, त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करायचो.
( लक्षात ठेवा, त्यां वाढपी लोकांना जेवताना हो, नको, बस झालं, पुरे.. अशी उत्तरं तुम्ही देत बसलात, तर तुमची भूक मरून जाईल. त्यामुळे, जेवताना निव्वळ मुक्याचं सोंग घ्यायचं. )
दोन भल्या मोठ्या चपात्या सोबत.. तीन पांढऱ्या रश्याचा वाट्या, दोन तांबड्या रश्याच्या वाट्या, आणि दोन आळणी रश्याच्या वाट्या माझ्या पोटामध्ये व्यवस्थित सेट झाल्या होत्या. प्लेटमध्ये अजूनही मसालेदार मटणाचे काही तुकडे डोकावत होते. ते मी..आळणी, आणि तांबड्या रश्याच्या सोबतीने मन लाऊन मटकावून टाकले.
तेवढ्यात..घाई घाईघाईने, धावत पळत बिर्याणी राईस आला.
पण त्याने यायला खूपच उशीर केला होता. कारण..आता बाकी, माझ्या पोटात बिलकुल जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे त्या सुगंधी भाताला आला तसाच माघारी पाठवला.
कसं आहे, अन्न ऊष्ट सोडनं मला आवडत नाही.
" माणसाने खाऊन माजावं, पण.. टाकून माजू नये.! "
आता.. एवढा गलेलठ्ठ ( मांसा ) आहार घेतल्यावर, पाचक म्हणून.. वरून, दोन आंबट सोलकडीच्या वाट्या, नको म्हणताना मला प्याव्याच लागल्या.
एक नंबर जेवण झालं..
काही वेळातच.. तबकामध्ये बिलासोबत लगेच मसाला पान सुद्धा आलं. मसाला पानाने, मुखशुद्धी केली. भरल्या पोटाने जेवणाच्या मोकळ्या ताटाला नमस्कार केला.
बिल चुकतं केलं, आणि गंधारला बाय-बाय केला.



दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना, मला काही सांगावसं वाटतंय.
तुमच्या मुलाची काही दिवसात परीक्षा संपेल. आणि त्याला दीर्घ काळाची म्हणजे, तब्बल तीन महिन्यांची उन्हाळी सुट्टी मिळेल. पहिली ते नववी पर्यंत, आजवर त्याला इतकी लांबलचक सुट्टी कधीच मिळालेली नसते. याचा तुम्ही एकदा डोळसपणे अभ्यास करा.
बहुतेक पालक, या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये त्यांच्या मुलांना भरपूर सूट देतात. आपल्या मुलाने वर्षभर अभ्यास केला आहे. त्यामुळे मोकळीक म्हणून, रोज सकाळी झोपेतून उशिरा उठणे. सिनेमा पाहायला जाने, मामाकडे राहायला जा, आजीकडे राहायला जा, किंवा आणखीन काही गोष्टींसाठी आपण त्यांना भरपूर प्रमाणात सूट देत असतो.
पण या गोष्टी तुम्ही चुकून सुद्धा करू नका. दहावीचा अभ्यास म्हणजे, त्याने काही फार मोठा डोंगर वगैरे खोदलेला नसतो. उगाच कोणत्याही गोष्टीचं अवडंबर माजवू नका. आणि त्याला तसं भासू सुद्धा देऊ नका. पूर्वीच्या मानाने दहावीचा अभ्यास आता खूप सोपा झाला आहे. सरसकट मुलांना, साठ सत्तर टक्के अगदी डोळे झाकून मिळत असतात. त्यामुळे, तुम्ही त्या मुलांच्या कोणत्याच भूलथापांना बळी पडू नका.
सोळावं वरीस हे धोक्याचं असतं. मग हि मात्रा मुलाला आणि मुलींना सुद्धा लागू पडते.
वानगीदाखल एक उदाहर देतो.. तुमचा मुलगा किंवा मुलगी सुट्टीमध्ये बाहेरगावी मामाकडे / काकांकडे राहायला गेलेत. त्यावेळी त्यांना तिथे कोणत्या प्रकारचे नवीन मित्र मैत्रिणी मिळतील. ते तुम्ही सांगू शकता का..? सरसकट सगळेच मित्र चांगले मिळतातच असं नाही.
" चुकून तुमच्या मुलीला वाममार्गाला लावणारी एखादी मैत्रीण मिळाली तर.? चुकून तुमच्या मुलाला एखाद्या टुकार व्यसनी मुलाची संगत लाभली तर..? "
या सगळ्या घटना घडल्या आहेत म्हणून मी सांगतोय.. निव्वळ या एकमेव विषयामुळे, माझ्या पाहण्यातील कित्तेक मुला मुलीचं आयुष्य बरबाद झालं आहे.
ए बघ ना, तो मुलगा तुझ्याकडे सारखा बघतो आहे. बहुतेक त्याला तू आवडली आहेस..!
अगदी सोप्या गोष्टी असतात या. वरील वक्तव्य ऐकून नासमज मुलगी, त्या गुलाबी वयात नक्कीच चुकीचं पाऊल टाकते. कारण तिला अजून म्हणावी तितकी समज आलेली नसते. आणि याला कारणीभूत असते ती म्हणजे फक्त संगत. कारण.. घरी पाहुनी म्हणून आलेल्या मुलीला किंवा मुलाला. मामा, मामी, आज्जी, आजोबा, काका, काकी.. किती दडपणात ठेवणार आहेत..? ते सुद्धा त्यांना मोकळीक देतात. आणि नेमकी हि मोकळीकच घात करून जाते. नको त्या वयात, एखादी कोवळी कळी अकाली कुस्करली जाऊ शकते.
मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर.. एखादा टुकार मुलगा मित्र म्हणून मिळाल्यावर,
अरे काही नाही.. हे बघ, असा धूर आतमध्ये ओढायचा. आणि, तो हळूच गिळून टाकायचा. आणि नंतर नाकातून बाहेर सोडायचा. खूप मज्जा येते रे, बघ ना करून बघ. नाहीतर मग, अरे वोडका आहे हि, हिचा तोंडाला वास सुद्धा येत नाही. घेऊन तर बघ, किती मजा येतेय ते. अरे ही फक्त ओठाखाली ठेवायची, खूप मज्जा येते. अरे जोड पत्ता आहे, फक्त एक रुपाया डाव.. अशी एक नाही, सतरा कारणं आहेत.
मित्र नवीन असतात, कोणी पाहणारं नसतं. मग काय सगळा आनंदी आनंदच असतो. अजूनही बरेच विषय आहेत, जे तुम्ही तुमच्या मनाला विचारू शकता, किंवा त्याची पडताळणी करू शकता. वरील घटनांमध्ये, नव्या पिढीतील कितीतरी मी-मी म्हणणारी मुलं आणि मुली बळी ठरले आहेत. आणि ते मी माझ्या डोळ्याने पाहिले आहेत.
काही अंशी, मी स्वतः सुद्धा या विषयीचा बळी ठरलो होतो. माझी फार जुनी गोष्ट झाली. ( आताची पिढी किती ऍडव्हान्स आहे, हे किमान मी तरी तुम्हाला सांगायला नकोय. ) पण मी वेळीच सावध झाल्याने, पुढील अनर्थ टळले. हे माझं नशीब म्हणायचं.
त्यामुळे, सुट्ट्यांमध्ये मुलांना शक्यतो, तुमच्यापासून दूर ठेऊ नका. रोज सकाळी लवकर उठवून त्यांना व्यायाम करायला पाठवा, स्विमिंग करायला पाठवा. जमल्यास काही इतर ऍक्टिव्हिटीस किंवा काही साधे सोपे कोर्सेस त्यांना लाऊन द्या. ज्यामुळे भविष्यात त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. सिनेमा नाटकं सुद्धा दाखवा, पण त्यावेळी तुम्ही सोबत असणं फार जरुरी आहे. त्यांना रोजच्या मित्रांसाबोत खेळण्याची मुभा नक्कीच द्या. पण ते सुद्धा मुलं पारखूनच. त्यामुळे, सर्व पालकांनी हि एक गोष्ट लक्षात घ्या,
मुलांच्या घडण्याचं वय सुद्धा हेच असतं..
आणि, बिघडण्याचं सुद्धा हेच वय असतं..!!
एकदा.. मित्राच्या गावी यात्रेला जाण्याचा योग आला.
तिखटाची यात्रा होती, त्यामुळे.. रानात बसून सगळ्या मित्रांचा 'रंगीत' कार्यक्रम चालू होता.
तोपर्यंत घरातील लक्ष्म्यांची मटन बनवण्याची लगबग सुरु होती.
तासाभरात मित्रांचा रंगीत कार्यक्रम उरकला..
आणि रानातून.. गाडी घेऊन ते सगळे मित्र घरी परतले. घरासमोरील बाजूस आमची कार पार्क केली होती. कारच्या मागील बाजूस, एका मित्राने दारूची बाटली ठेवली होती. मागील काचेतून ती बाटली अगदी स्पष्ट दिसत होती. बाटली मध्ये, थोडी शिल्लक सुद्धा राहिली होती. ती, गाडीत तशीच ठेऊन बाकी मित्र गावात फेरफटका मारायला निघून गेले. मी, मित्राच्या मोठ्या भावाशी गप्पा मारत तिथेच थांबलो होतो.
दुपारचे बारा वाजून गेले होते. तितक्यात, भाऊंचा एक मित्र तेथे आला. आणि, आमच्या गप्पांमध्ये तो हि सामील झाला.
गप्पा मारता-मारता 'त्या' तिसऱ्या व्यक्तीचं लक्ष गाडीतल्या दारूच्या बाटलीकडे गेलं.
आणि, 'तो' मित्राच्या मोठ्या भावाला म्हणाला..!
शिरपा.. 'ती' गाडीतली कुणाची रं..?
आरं, ती पुण्यातल्या पावण्याची हाय..!
मी वैच घिऊ का त्यातली..?
त्या व्यक्तीच्या या प्रश्नावर, विचार करत भाऊ माझ्याकडे पाहत होते.
मी त्यांना, मानेनेच होकार दिला. पण, एक प्रश्न मला सारखा खटकत होता. त्या गड्याच्या गळ्यात 'तुळशीमाळ' होती राव..!
होकार मिळताच, त्या व्यक्तीने.. पहिली त्याच्या गळ्यातील तुळशीमाळ काढली. आणि ती खुंटीला टांगली.
( आजवर मी हे फक्त ऐकून होतो, तेंव्हा बाकी माझ्या पाहण्यात सुद्धा आलं. )
त्या व्यक्तीने, अगदी घाईघाईने गाडीतली बाटली घेतली. दोन 'झटक्यात' उरलेली बाटली घशाखाली ओतली.
आणि.. बसला ना मटणाचं जेवायला.
आता तर.. न करून सुद्धा माझी नशाच उतरली. काय कराव..? का करतात अशी लोकं.?
या नको त्या विचाराने.. माझ्या डोक्यात किडे पडले होते.
शेवटी, त्या भाऊंना मी विचारलच.
म्हंटलं.. भाऊ हा काय प्रकार आहे..?
त्यावर, भाऊ म्हंटले.. ह्यो काही खरा माळकरी नव्हं.
अहो.. पाव्हनं, आपल्या गळ्यात 'माळ' असल्यावर दुसरा कोणी, दारू-मटन मागत नाय. तेज्यामुळ ही लोकं असं करत्यात..! गड्याने भारी शक्कल लढवली होती.
भाऊंनी मला अजून एक माहिती दिली. कि.. यांच्या गळ्यातल्या तुळशी माळा सुद्धा खोट्या असतात..!
इकडे आमच्या गप्पा संपे पर्यंत, तो गडी जेऊन उठला सुद्धा.
पुन्हा एकदा त्याने..हात, पाय धुऊन गळ्यात, 'माळ' अडकवून सायकलवर टांग मारून गडी चालता झाला.
आणि, मी मात्र त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे 'तोंडात बोट' घालून बघत राहिलो.

पूर्वी काय आणि आज काय..
पुण्या मुंबई मधील विशीष्ट परिसरात, प्रेमी युगल आपल्या प्रेमाचं अगदी खुलेआम प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रेमाचा परमोच्च बिंदू गाठल्यावर, त्यांना हे सुद्धा भान उरत नाही. कि या नको त्या अवस्थेत आपल्याला कोणी पाहत तर नसेल ना.?
पूर्वी हा विषय.. फक्त नेत्रसुख घेऊन सोडून देण्यातला होता. पण आता याच विषयाने फार गंभीर रूप धारण केलं आहे. काही मुलंमुली, या विषयात इतके बेभान झालेले आहेत. कि त्यांनी या विषयातील बऱ्याच हद्दी आणि मर्यादा ओलांडलेल्या असतात. त्याही अगदी खुलेआम.
आता जमाना बदलला आहे.. प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल नामक घातक खेळणं आलं आहे. आणि.. असे चोरटे आणि कामुक सीन टिपण्यात ते फारच माहीर झालेले असतात.
स्वतःच्या क्षणभंगुर समाधाणासाठी, किंवा थोड्याशा पैशाच्या लोभापायी. काही व्यक्ती असे कामुक विडीयो.. व्हाट्सअप किंवा युट्युबवर अपलोड करतात. अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळवतात.
तर दुसरीकडे.. हे नको ते उद्योग करणाऱ्या मुलामुलींचे चाळे या माध्यमाद्वारे थेट त्यांच्या आईवडील, मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंत जाऊन पोहोचतात. त्यावेळी मात्र भलतीच पंचायत निर्माण होऊन बसते. एक बाका प्रसंग निर्माण होतो.
त्या मुलामुलीच्या आईवडिलांना समाजात तोंड दाखवायला जागा उरत नाही. या प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या मुलीला तर, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग दिसत नाही.
मला काय म्हणायचं आहे.. तुमचं प्रेम फारच उतू चाललं असेल. तर, एखाद्या लॉज मध्ये जाऊन, किंवा मित्रांच्या फ्ल्याट मध्ये जाऊन चार भिंतीच्या आत तुम्हाला वाटेल ती मजा मारून यावी. विनाकारण हे जाहीर आणि ओंगळवाणे प्रदर्शन काय कामाचं आहे..?
जीवन एकदाच आहे. विषयवासना हा विषय आपल्या जीवनात वारंवार येणार आहे. आणि या नको त्या विषयासाठी, आपला जीव दावणीला लावण्यात काय अर्थ आहे.?
सर्व मुला मुलींना माझी हात जोडून विनंती आहे. आपल्या प्रेमाचं असं खुलेआम प्रदर्शन करू नका. विनाकारण, आपल्या जीवाचा सौदा करू नका.
मराठी नवीन वर्षाच्या पूर्व दिवशी.. स्पेशल, मुलींना माझं एक सांगणं आहे,
" नकार द्यायला शिका "

माझं ऑफिस, पुणेस्टेशनच्या अगदी जवळ असल्यामुळे.
असे प्रसंग, माझ्याशी नेहेमीच घडत असतात..
नेहेमीप्रमाणे.. बर्याच महिन्या नंतर मुद्देमाल काढून घेऊन, फेकून दिलेलं रिकामं पाकीट मला सापडलं.
मला तर, खूपच आनंद झाला.
मनात म्हंटल, चला.. एका नवीन माणसाची सेवा करण्याची संधी परमेश्वराने मला दिली. आणि मी, ते पाकीट चाचपायला सुरवात केली.
त्या पाकिटात, बरीच महत्वाची कागदपत्र होती. आणि, त्याचबरोबर...
त्या व्यक्तीचं.. ड्राइविंग लायसन्स, पॅनकार्ड, डेबिट कार्ड, इलेक्शन कार्ड आणि जवळपास सगळं काही त्यात होतं.
पण, त्या व्यक्तीचा फोन नंबर, किंवा इतर काही माहिती मला त्या पाकिटात काही सापडत नव्हती. दोन चार आतील कप्पे खोलून बघितले. तर त्यात, मला दोन कोंडोम दिसून आले. ते पाहून खरं तर मला खूप राग आला होता. पण, जाऊदेत म्हणून मी पुन्हा त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करू लागलो.
बरीच शोधाशोध केल्यावर त्या पाकिटात, मला एकाच व्यक्तीचे पाच व्हिजीटिंग कार्ड्स मिळाले. ते कार्ड, कोण्या जादुगाराचं होतं. त्यावर, मुंबई 'दहिसर' चा पत्ता होता. मी, ताबडतोब त्या व्यक्तीला फोन लावला.
आणि, ह्या मुलाचं नाव सांगून. त्याचं पाकीट, मला सापडलं आहे वगैरे-वगैरे त्यांना कळवलं.
आणि, त्या मुलाचा फोन नंबर सुद्धा मागवून घेतला.
त्यानंतर..मला मिळालेल्या नंबरवर मी फोन लावला.
त्या नंबरवर मी फोन लावला.. समोरून, एक गावठी व्यक्ती बोलत होती.
त्यांना, मी ह्या मुलाचं नाव विचारलं. ते म्हणाले, थांबा हा बोलावतो पावण्याला..
त्या मुलाने फोन घेतला,
आणि माझ्याशी, खूप रुबाबात आणि मोठ्या आवाजात बोलायला सुरवात केली.
हॅल्लो कोण बोलतय..? काय काम आहे..?
मी म्हणालो, तुम्ही अमुक तमुक बोलताय ना..?
हो बोलतोय..
मी म्हणालो... तुमचं पाकीट वगैरे हरवलय का ?
माझं हे वाक्य ऐकताच, एखाद्या फुग्यातली हवा निघून जावी. तसा, त्या मुलाचा आवाज अगदी गळून गेला.
हो साहेब... बोलतोय ना, तुम्हाला सापडलय का माझं पाकीट ? साहेब पैसे आहेत का त्यात ? कुठे आहात तुम्ही ? अर्ध्या तासात पोहोचतो मी. कुठे आहात तुम्ही..?
एका दमातच, त्याने सगळे प्रश्न मला विचारले...
मी त्याला म्हणालो, अरे मुर्खा पैसे कसे असतील त्यात ? तुझे डाक्यूमेंट्स हवेत कि नकोत तुला ?
तू कुठे आहेस आता ?
तो म्हणाला, मी धावडी मध्ये आहे. पैसे नको साहेब, डॉक्यूमेंटस महत्वाची आहेत.
मी म्हणालो, तू मुंबईला कधी जाणार आहेस ?
तो, परवा जाणार आहे...
मी, ठीक आहे.. पुण्यात आल्यावर मला ह्या नंबरवर फोन कर.
हो साहेब.. धन्यवाद साहेब..
आणि, मी फोन कट केला.
काल दुपारी, तो मुलगा पुण्यात आला. मला त्याने फोन केला.
साहेब कुठे येऊ ?
मी त्याला पुणे स्टेशनच्या भुयारी मार्गाच्या पुलावर बोलावलं.
दहा एक मिनिटात तो माझ्यापाशी पोहोचला.
शिडशिडीत बांध्याचा, तेवीस चोवीस वर्षांचा बुटकासा मुलगा होता.
मी त्याला विचारलं, कुठे असतोस ?
मुंबईला..
काम काय करतोस ?
म्हणाला, मी जादुगार आहे..
मी त्याला म्हणालो, तू आख्ख्या मुंबईला जादू दाखवतोस. पण तुला, पुण्यातल्या चोराने हात दाखवला ना. हाहाहाहा..!
यावर आमची थोडी हसी मजाक झाली. त्यानंतर, कोंडोमच्या कारणावरून मी त्याला थोडा झापला. त्यानेही, कान पकडून मला माफी मागितली. आणि, मी त्याच्या हातात त्याचं पाकीट सोपवलं.
पाकीट हातात पडल्यावर त्याच्या चेहेर्यावर, मला खूप आनंद दिसत होता.
कारण, पैसे नसले तरी त्यात असणाऱ्या कागद पत्रांना खूप महत्व होतं. ते नव्याने काढण्यासाठी त्याला खूप परिश्रम पडले असते. आणि, बराच पैसा सुद्धा खर्च झाला असता.
धन्यवाद म्हणून, माझ्याशी हात मिळवण्यासाठी त्याने त्याचा हात पुढे केला.
तेंव्हा, आपण पोलिसाला कशी हातामध्ये घडी करून गुपचूप नोट देतो. तशी त्याने, एक शंभर रुपयाची नोट हातामध्ये धरली होती.
मी त्याला म्हणालो. मित्रा, मला भरपूर पगार आहे. हे काम, मी पैशासाठी करीत नाही. एक, समाज सेवा म्हणून करतो.
तरी सुद्धा, तो माझ्या खूप मागे लागला. साहेब घ्या, चहा पाणी करा.
मी, कसा बसा त्याला आवरला. आणि, तेथून निघून गेलो.
त्याला फोन करण्यामध्ये, माझे पाच दहा रुपये खर्च झाले असतील. पण, त्याच्या मोबदल्यात त्या मुलाच्या तोंडून. मला, भरभरून आशीर्वाद सुद्धा मिळाले असतील. पैश्यापेक्षा, मला ते आशीर्वाद लाख मोलाचे वाटतात. त्यांना मिळालेला आनंद पाहून माझं मन समाधानी होतं.
यापूवी सुद्धा, अशाच प्रकरणात चार पाच व्यक्तीचे आशीर्वाद मी मिळवले आहेत. आणि, इथूनपुढे सुद्धा मिळवत राहील.
थोड्या वेळाने, मला पुन्हा त्या मुलाचा फोन आला.
मी विचारल, काय रे.. काय झालं..?
तर म्हणाला, तुम्ही मुंबईला फोन लावला होता. तेंव्हा, त्यांना काही सांगितलं नाही ना..!
मी म्हणालो, कशाबद्धल ?
तेच.. " कोंडोमचं " ओ, तुम्ही ज्यांना फोन केला होता. ते माझे गुरु आहेत..!
मी त्याला, नाही असं म्हणालो. आणि हक्काने त्याला एक प्रश्न केला. पुण्यात मला कधी वाटलं, तर एखाद्या कार्यक्रमात जादूचा प्रयोग दाखवायला येशील का..?
तर म्हणाला.. साहेब कधीही बोलवा, एक रुपाया सुद्धा न घेता मी कार्यक्रम करून जाईल.
पुन्हा एकदा मी त्याचा धन्यवाद 'साहेब' ऐकला. आणि, मी माझ्या कामाला लागलो.