Tuesday, 3 April 2018

माझं ऑफिस, पुणेस्टेशनच्या अगदी जवळ असल्यामुळे.
असे प्रसंग, माझ्याशी नेहेमीच घडत असतात..
नेहेमीप्रमाणे.. बर्याच महिन्या नंतर मुद्देमाल काढून घेऊन, फेकून दिलेलं रिकामं पाकीट मला सापडलं.
मला तर, खूपच आनंद झाला.
मनात म्हंटल, चला.. एका नवीन माणसाची सेवा करण्याची संधी परमेश्वराने मला दिली. आणि मी, ते पाकीट चाचपायला सुरवात केली.
त्या पाकिटात, बरीच महत्वाची कागदपत्र होती. आणि, त्याचबरोबर...
त्या व्यक्तीचं.. ड्राइविंग लायसन्स, पॅनकार्ड, डेबिट कार्ड, इलेक्शन कार्ड आणि जवळपास सगळं काही त्यात होतं.
पण, त्या व्यक्तीचा फोन नंबर, किंवा इतर काही माहिती मला त्या पाकिटात काही सापडत नव्हती. दोन चार आतील कप्पे खोलून बघितले. तर त्यात, मला दोन कोंडोम दिसून आले. ते पाहून खरं तर मला खूप राग आला होता. पण, जाऊदेत म्हणून मी पुन्हा त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करू लागलो.
बरीच शोधाशोध केल्यावर त्या पाकिटात, मला एकाच व्यक्तीचे पाच व्हिजीटिंग कार्ड्स मिळाले. ते कार्ड, कोण्या जादुगाराचं होतं. त्यावर, मुंबई 'दहिसर' चा पत्ता होता. मी, ताबडतोब त्या व्यक्तीला फोन लावला.
आणि, ह्या मुलाचं नाव सांगून. त्याचं पाकीट, मला सापडलं आहे वगैरे-वगैरे त्यांना कळवलं.
आणि, त्या मुलाचा फोन नंबर सुद्धा मागवून घेतला.
त्यानंतर..मला मिळालेल्या नंबरवर मी फोन लावला.
त्या नंबरवर मी फोन लावला.. समोरून, एक गावठी व्यक्ती बोलत होती.
त्यांना, मी ह्या मुलाचं नाव विचारलं. ते म्हणाले, थांबा हा बोलावतो पावण्याला..
त्या मुलाने फोन घेतला,
आणि माझ्याशी, खूप रुबाबात आणि मोठ्या आवाजात बोलायला सुरवात केली.
हॅल्लो कोण बोलतय..? काय काम आहे..?
मी म्हणालो, तुम्ही अमुक तमुक बोलताय ना..?
हो बोलतोय..
मी म्हणालो... तुमचं पाकीट वगैरे हरवलय का ?
माझं हे वाक्य ऐकताच, एखाद्या फुग्यातली हवा निघून जावी. तसा, त्या मुलाचा आवाज अगदी गळून गेला.
हो साहेब... बोलतोय ना, तुम्हाला सापडलय का माझं पाकीट ? साहेब पैसे आहेत का त्यात ? कुठे आहात तुम्ही ? अर्ध्या तासात पोहोचतो मी. कुठे आहात तुम्ही..?
एका दमातच, त्याने सगळे प्रश्न मला विचारले...
मी त्याला म्हणालो, अरे मुर्खा पैसे कसे असतील त्यात ? तुझे डाक्यूमेंट्स हवेत कि नकोत तुला ?
तू कुठे आहेस आता ?
तो म्हणाला, मी धावडी मध्ये आहे. पैसे नको साहेब, डॉक्यूमेंटस महत्वाची आहेत.
मी म्हणालो, तू मुंबईला कधी जाणार आहेस ?
तो, परवा जाणार आहे...
मी, ठीक आहे.. पुण्यात आल्यावर मला ह्या नंबरवर फोन कर.
हो साहेब.. धन्यवाद साहेब..
आणि, मी फोन कट केला.
काल दुपारी, तो मुलगा पुण्यात आला. मला त्याने फोन केला.
साहेब कुठे येऊ ?
मी त्याला पुणे स्टेशनच्या भुयारी मार्गाच्या पुलावर बोलावलं.
दहा एक मिनिटात तो माझ्यापाशी पोहोचला.
शिडशिडीत बांध्याचा, तेवीस चोवीस वर्षांचा बुटकासा मुलगा होता.
मी त्याला विचारलं, कुठे असतोस ?
मुंबईला..
काम काय करतोस ?
म्हणाला, मी जादुगार आहे..
मी त्याला म्हणालो, तू आख्ख्या मुंबईला जादू दाखवतोस. पण तुला, पुण्यातल्या चोराने हात दाखवला ना. हाहाहाहा..!
यावर आमची थोडी हसी मजाक झाली. त्यानंतर, कोंडोमच्या कारणावरून मी त्याला थोडा झापला. त्यानेही, कान पकडून मला माफी मागितली. आणि, मी त्याच्या हातात त्याचं पाकीट सोपवलं.
पाकीट हातात पडल्यावर त्याच्या चेहेर्यावर, मला खूप आनंद दिसत होता.
कारण, पैसे नसले तरी त्यात असणाऱ्या कागद पत्रांना खूप महत्व होतं. ते नव्याने काढण्यासाठी त्याला खूप परिश्रम पडले असते. आणि, बराच पैसा सुद्धा खर्च झाला असता.
धन्यवाद म्हणून, माझ्याशी हात मिळवण्यासाठी त्याने त्याचा हात पुढे केला.
तेंव्हा, आपण पोलिसाला कशी हातामध्ये घडी करून गुपचूप नोट देतो. तशी त्याने, एक शंभर रुपयाची नोट हातामध्ये धरली होती.
मी त्याला म्हणालो. मित्रा, मला भरपूर पगार आहे. हे काम, मी पैशासाठी करीत नाही. एक, समाज सेवा म्हणून करतो.
तरी सुद्धा, तो माझ्या खूप मागे लागला. साहेब घ्या, चहा पाणी करा.
मी, कसा बसा त्याला आवरला. आणि, तेथून निघून गेलो.
त्याला फोन करण्यामध्ये, माझे पाच दहा रुपये खर्च झाले असतील. पण, त्याच्या मोबदल्यात त्या मुलाच्या तोंडून. मला, भरभरून आशीर्वाद सुद्धा मिळाले असतील. पैश्यापेक्षा, मला ते आशीर्वाद लाख मोलाचे वाटतात. त्यांना मिळालेला आनंद पाहून माझं मन समाधानी होतं.
यापूवी सुद्धा, अशाच प्रकरणात चार पाच व्यक्तीचे आशीर्वाद मी मिळवले आहेत. आणि, इथूनपुढे सुद्धा मिळवत राहील.
थोड्या वेळाने, मला पुन्हा त्या मुलाचा फोन आला.
मी विचारल, काय रे.. काय झालं..?
तर म्हणाला, तुम्ही मुंबईला फोन लावला होता. तेंव्हा, त्यांना काही सांगितलं नाही ना..!
मी म्हणालो, कशाबद्धल ?
तेच.. " कोंडोमचं " ओ, तुम्ही ज्यांना फोन केला होता. ते माझे गुरु आहेत..!
मी त्याला, नाही असं म्हणालो. आणि हक्काने त्याला एक प्रश्न केला. पुण्यात मला कधी वाटलं, तर एखाद्या कार्यक्रमात जादूचा प्रयोग दाखवायला येशील का..?
तर म्हणाला.. साहेब कधीही बोलवा, एक रुपाया सुद्धा न घेता मी कार्यक्रम करून जाईल.
पुन्हा एकदा मी त्याचा धन्यवाद 'साहेब' ऐकला. आणि, मी माझ्या कामाला लागलो.

No comments:

Post a Comment