Tuesday, 3 April 2018

 · 
कोल्हापूर आणि मटणाचा तांबडा पांढरा रस्सा.. हे फार जुनं आणि चविष्ट समीकरण आहे. मी जेव्हा कधी कोल्हापूरला जात असतो, त्यावेळी..देवदर्शना सोबतच, या तांबड्या पांढऱ्या रश्याचा नक्की आस्वाद घेत असतो.
शिवाजी चौकातील हॉटेल #गंधार मध्ये..फार सुंदर, चमचमीत आणि रुचकर जेवण मिळतं. मी नेहेमी याच हॉटेलमध्ये जेवायला जात असतो. कारण हे हॉटेल.. मंदिरापासून बरच जवळ आहे. आणि स्वच्छतेच्या बाबतीत एकुणात हे हॉटेल मला अगदी ठीकठाक वाटलं.
इथे..दीडशे रुपयापासून अगदी साडेतीनशे रुपयांपर्यंत मटण थाळी आहे. शिवाय, इतर वेगवेगळ्या डिशेश सुद्धा आहेत. त्यात चिकन थाळी आणि कोंबडी वडे सुद्धा मिळतात. पण मी, इथे स्पेशल मटन खायला आलो असल्याने, यावेळी खुद्द त्या मालकालाच मी प्रश्न केला.
मालक.. कोणती थाळी घेऊ..?
त्यावेळी अगदी प्रामाणिकपणे, त्यांनी मला दोनशेतीस रूपायावाली मटण थाळी घ्या म्हणून सांगितलं. हा माझा कायमचा फंडा आहे, आपण अशी विचारपूस केल्याने फार फरक पडतो. तो व्यावसायिक आपल्याला सहसा फसवत नाही. म्हणजे, खिशाला चाट देत नाही.
थोड्याच वेळात आमच्या टेबलवर स्टीलची तीन ताटं लावण्यात आली.
सुरवातीला.. एका मोठ्या बाऊलमध्ये चिकन सूप आणून दिलं. चायनिस चमच्याने,ते चिकन सूप पिल्यावर माझी भूक भलतीच चाळवली.
पण तो वाढपी काही पुढच्या विषयाला हात घालायलाच तयार नव्हता, निवांत हातावर हात ठेवून एका बाजूला उभा होता. शेवटी मी त्या वेटरला जवळ बोलवून खडसावला, तेंव्हा तो पटकन खाली गेला. आणि..आमच्या ताटात,
मटणाचा आळणी रस्सा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अंडा मसाला आणि सोलकडी येऊन स्थिरावली..
पुन्हा एकदा त्या वेटरला मी खसकवला..
काय लका.. नुसता रस्सा पाजूनच पोट भरायला लावतोस का काय..!!
तसा धावतच तो खाली गेला.. आणि, मटण सुक्क्याची एक मोठी डिश आणि भली मोठी मऊशार चपाती तो घेऊन आला.
इथली चपाती म्हणजे एक खास वैशिष्ट्य आहे बरं का. हि चपाती, जंबो चपाती प्रकारात मोडते. शिवाय, या चपातीच्या गव्हाची कॉलीटी सुद्धा अगदी उच्च प्रतीची असते. ते आपल्याला ती चपाती खाल्ल्यावरच समजतं. अशी चपाती, सहसा आपल्या घरात बनत नाही. त्यामुळे, या चपातीला मी घरगुती चपाती म्हणू शकत नाही. त्यामुळे, या चपातीला आपल्याकडून एकशे एक मार्क आहेत. आणि, तिला बनवणाऱ्या तायांना सलाम आहे.
आमच्या बाजूच्या टेबलावर.. काही इन्स्पेक्टर मंडळी जेवायला आली असल्याने. मालकांचं तिकडे जरा जास्तीच लक्ष होतं. पण या सर्व गोष्टीकडे पाहायला मला आता वेळ नव्हता.
तोवर.. आमच्या समोरच, ( म्हणजे, माझ्या बायकोच्या पाठमोरं  ) एक नवविवाहित जोडपं येऊन बसलं, तो मुलगा फोनवर बोलण्यात गुंग होता. तर हि सावळी चिकणी मुलगी, मेनूकार्ड बघून नकारात्मक असे तोंडाचे विशिष्ट हावभाव करत होती. मेनूकार्ड वाचून, तिने तिच्या नवऱ्याला नकारात्मक इशारा केला. त्यासरशी, तो मुलगा रागारागाने तिच्यावर थोडाफार खट्टू होऊन तिथून बाहेर पडला. पण बाहेर जाताना, ती मुलगी खूप गुलाबी हसून गेली. बहुतेक, तिच्या इच्छित स्थळी तिला जायला मिळालं असावं. असो.. गेली ते बरं झालं,
नाहीतर.. माझी बायको पोटभर जेवली नसती. 
जेवताना अगदी सुरवातीला.. गरमागरम पांढऱ्या रश्याची वाटी मी ओठाला लाऊन मोकळी करून टाकली. तेंव्हा कुठं मला जरा बरं वाटलं. हा पांढरा रस्सा म्हणजे, निव्वळ अमृतच.
नंतर.. मऊशार चपातीचा लुसलुशीत मटणासोबत मिलन घडवून, तो स्वर्गीय घास मी स्वाहा केला. त्यावर..थोडा तांबडा रस्सा फुरका मारून ओढला. आहाहा.. मग काय, दोन चपात्या संपेपर्यंत हा सिलसिला असाच चालू राहिला.
मधे मधे तोंडी लावायला, अंडा मसाला होताच. शिवाय, लोणीदार दह्यात भिजवलेला कांदा सुद्धा खूप चवदार होता.
जेवताना..हातामध्ये रस्सा असलेलं पात्र घेऊन, तो वाढपी एकसारखा..
वाढू का-वाढू, का..? करायचा.
पण मी.. पक्का पुणेरी असल्याने, त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करायचो.
( लक्षात ठेवा, त्यां वाढपी लोकांना जेवताना हो, नको, बस झालं, पुरे.. अशी उत्तरं तुम्ही देत बसलात, तर तुमची भूक मरून जाईल. त्यामुळे, जेवताना निव्वळ मुक्याचं सोंग घ्यायचं. )
दोन भल्या मोठ्या चपात्या सोबत.. तीन पांढऱ्या रश्याचा वाट्या, दोन तांबड्या रश्याच्या वाट्या, आणि दोन आळणी रश्याच्या वाट्या माझ्या पोटामध्ये व्यवस्थित सेट झाल्या होत्या. प्लेटमध्ये अजूनही मसालेदार मटणाचे काही तुकडे डोकावत होते. ते मी..आळणी, आणि तांबड्या रश्याच्या सोबतीने मन लाऊन मटकावून टाकले.
तेवढ्यात..घाई घाईघाईने, धावत पळत बिर्याणी राईस आला.
पण त्याने यायला खूपच उशीर केला होता. कारण..आता बाकी, माझ्या पोटात बिलकुल जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे त्या सुगंधी भाताला आला तसाच माघारी पाठवला.
कसं आहे, अन्न ऊष्ट सोडनं मला आवडत नाही.
" माणसाने खाऊन माजावं, पण.. टाकून माजू नये.! "
आता.. एवढा गलेलठ्ठ ( मांसा ) आहार घेतल्यावर, पाचक म्हणून.. वरून, दोन आंबट सोलकडीच्या वाट्या, नको म्हणताना मला प्याव्याच लागल्या.
एक नंबर जेवण झालं..
काही वेळातच.. तबकामध्ये बिलासोबत लगेच मसाला पान सुद्धा आलं. मसाला पानाने, मुखशुद्धी केली. भरल्या पोटाने जेवणाच्या मोकळ्या ताटाला नमस्कार केला.
बिल चुकतं केलं, आणि गंधारला बाय-बाय केला.



No comments:

Post a Comment