Tuesday, 3 April 2018

दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना, मला काही सांगावसं वाटतंय.
तुमच्या मुलाची काही दिवसात परीक्षा संपेल. आणि त्याला दीर्घ काळाची म्हणजे, तब्बल तीन महिन्यांची उन्हाळी सुट्टी मिळेल. पहिली ते नववी पर्यंत, आजवर त्याला इतकी लांबलचक सुट्टी कधीच मिळालेली नसते. याचा तुम्ही एकदा डोळसपणे अभ्यास करा.
बहुतेक पालक, या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये त्यांच्या मुलांना भरपूर सूट देतात. आपल्या मुलाने वर्षभर अभ्यास केला आहे. त्यामुळे मोकळीक म्हणून, रोज सकाळी झोपेतून उशिरा उठणे. सिनेमा पाहायला जाने, मामाकडे राहायला जा, आजीकडे राहायला जा, किंवा आणखीन काही गोष्टींसाठी आपण त्यांना भरपूर प्रमाणात सूट देत असतो.
पण या गोष्टी तुम्ही चुकून सुद्धा करू नका. दहावीचा अभ्यास म्हणजे, त्याने काही फार मोठा डोंगर वगैरे खोदलेला नसतो. उगाच कोणत्याही गोष्टीचं अवडंबर माजवू नका. आणि त्याला तसं भासू सुद्धा देऊ नका. पूर्वीच्या मानाने दहावीचा अभ्यास आता खूप सोपा झाला आहे. सरसकट मुलांना, साठ सत्तर टक्के अगदी डोळे झाकून मिळत असतात. त्यामुळे, तुम्ही त्या मुलांच्या कोणत्याच भूलथापांना बळी पडू नका.
सोळावं वरीस हे धोक्याचं असतं. मग हि मात्रा मुलाला आणि मुलींना सुद्धा लागू पडते.
वानगीदाखल एक उदाहर देतो.. तुमचा मुलगा किंवा मुलगी सुट्टीमध्ये बाहेरगावी मामाकडे / काकांकडे राहायला गेलेत. त्यावेळी त्यांना तिथे कोणत्या प्रकारचे नवीन मित्र मैत्रिणी मिळतील. ते तुम्ही सांगू शकता का..? सरसकट सगळेच मित्र चांगले मिळतातच असं नाही.
" चुकून तुमच्या मुलीला वाममार्गाला लावणारी एखादी मैत्रीण मिळाली तर.? चुकून तुमच्या मुलाला एखाद्या टुकार व्यसनी मुलाची संगत लाभली तर..? "
या सगळ्या घटना घडल्या आहेत म्हणून मी सांगतोय.. निव्वळ या एकमेव विषयामुळे, माझ्या पाहण्यातील कित्तेक मुला मुलीचं आयुष्य बरबाद झालं आहे.
ए बघ ना, तो मुलगा तुझ्याकडे सारखा बघतो आहे. बहुतेक त्याला तू आवडली आहेस..!
अगदी सोप्या गोष्टी असतात या. वरील वक्तव्य ऐकून नासमज मुलगी, त्या गुलाबी वयात नक्कीच चुकीचं पाऊल टाकते. कारण तिला अजून म्हणावी तितकी समज आलेली नसते. आणि याला कारणीभूत असते ती म्हणजे फक्त संगत. कारण.. घरी पाहुनी म्हणून आलेल्या मुलीला किंवा मुलाला. मामा, मामी, आज्जी, आजोबा, काका, काकी.. किती दडपणात ठेवणार आहेत..? ते सुद्धा त्यांना मोकळीक देतात. आणि नेमकी हि मोकळीकच घात करून जाते. नको त्या वयात, एखादी कोवळी कळी अकाली कुस्करली जाऊ शकते.
मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर.. एखादा टुकार मुलगा मित्र म्हणून मिळाल्यावर,
अरे काही नाही.. हे बघ, असा धूर आतमध्ये ओढायचा. आणि, तो हळूच गिळून टाकायचा. आणि नंतर नाकातून बाहेर सोडायचा. खूप मज्जा येते रे, बघ ना करून बघ. नाहीतर मग, अरे वोडका आहे हि, हिचा तोंडाला वास सुद्धा येत नाही. घेऊन तर बघ, किती मजा येतेय ते. अरे ही फक्त ओठाखाली ठेवायची, खूप मज्जा येते. अरे जोड पत्ता आहे, फक्त एक रुपाया डाव.. अशी एक नाही, सतरा कारणं आहेत.
मित्र नवीन असतात, कोणी पाहणारं नसतं. मग काय सगळा आनंदी आनंदच असतो. अजूनही बरेच विषय आहेत, जे तुम्ही तुमच्या मनाला विचारू शकता, किंवा त्याची पडताळणी करू शकता. वरील घटनांमध्ये, नव्या पिढीतील कितीतरी मी-मी म्हणणारी मुलं आणि मुली बळी ठरले आहेत. आणि ते मी माझ्या डोळ्याने पाहिले आहेत.
काही अंशी, मी स्वतः सुद्धा या विषयीचा बळी ठरलो होतो. माझी फार जुनी गोष्ट झाली. ( आताची पिढी किती ऍडव्हान्स आहे, हे किमान मी तरी तुम्हाला सांगायला नकोय. ) पण मी वेळीच सावध झाल्याने, पुढील अनर्थ टळले. हे माझं नशीब म्हणायचं.
त्यामुळे, सुट्ट्यांमध्ये मुलांना शक्यतो, तुमच्यापासून दूर ठेऊ नका. रोज सकाळी लवकर उठवून त्यांना व्यायाम करायला पाठवा, स्विमिंग करायला पाठवा. जमल्यास काही इतर ऍक्टिव्हिटीस किंवा काही साधे सोपे कोर्सेस त्यांना लाऊन द्या. ज्यामुळे भविष्यात त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. सिनेमा नाटकं सुद्धा दाखवा, पण त्यावेळी तुम्ही सोबत असणं फार जरुरी आहे. त्यांना रोजच्या मित्रांसाबोत खेळण्याची मुभा नक्कीच द्या. पण ते सुद्धा मुलं पारखूनच. त्यामुळे, सर्व पालकांनी हि एक गोष्ट लक्षात घ्या,
मुलांच्या घडण्याचं वय सुद्धा हेच असतं..
आणि, बिघडण्याचं सुद्धा हेच वय असतं..!!

No comments:

Post a Comment