Tuesday, 24 April 2018

भरपूर मजा करायची आहे, दुनियादारी करायची आहे, देशविदेश फिरायचा आहे, मोठमोठ्या कॉकटेल पार्ट्या करायच्या आहेत, भरपूर, मास मटन आणि चांगलं चुंगलं गोडधोड खायचं आहे.
सर्वांना.. हे सगळं काही अगदी भरभरून आणि मनभरून करायचं आहे..!
पण हे सगळं करण्यासाठी, एका गोष्टीची फार मोठी आवश्यकता असते. ते म्हणजे,
" निरोगी शरीर "
आणि दुर्दैवाने.. आजच्या घडीला हे कोणाकडेच नाहीये.
प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या व्याधीने ग्रासला गेला आहे. माझ्या वयाच्या जवळपास प्रत्येक मित्राला काही नाहीतर, किमान.. बिपी आणि शुगरचा त्रास तरी नक्कीच आहे.
हॉटेलमध्ये पार्टी करताना, दोनेक तास आपण त्या एकाच जागेवर, टेबलवर बसून पेगवर पेग रिचवत असतो. चिकन तंदुरी बिर्याणीवर आडवा हात मारत असतो. जुगारी लोकं, एकदा रमी खेळायला बसले कि त्या जागेवरून तासंतास उठत नाहीत. एकदा का मोबाईल मध्ये तोंड घातलं, कि तास दोन तास कसा निघून जातो ते सुद्धा समजत नाही. थियेटर मध्ये, सलग तीन तासाचा सिनेमा पाहून येतात. फिरायला जाताना, दहा-दहा तासाच्या लॉंग ड्राईव्ह करत असतात.
हे सगळे शौक करत असताना.. आपण,
" आपल्या शरीरासाठी किती वेळ देत असतो..? "
बहुतेक, याचं उत्तर कोणाकडेच नसेल. कारण, भरपूर आराम करून आणि मनसोक्त भोजन करून. सगळ्यांनी आपल्याला नको आहेत तेवढे पोटाचे, आणि आपल्या " तशरिफचे " घेर वाढवून घेतले आहेत. पण आता, काही केल्या ते कमी काही होत नाहीत. त्यामुळे जवळपास सगळेच व्यक्ती अगदी त्रस्त आहेत. कारण, वजन कमी करणं काही सोपं काम नाहीये.
हि सगळी हजामजा करण्यासाठी शरीर फार महत्वाचं आहे.
आणि त्यातल्या त्यात " निरोगी शरीर " फार महत्वाचं आहे. तसा मी सुद्धा व्यायाम या विषयाचा फार मोठा शौकीन नाहीये. पण दैवकृपेने, मला आजवर कसलीही रोगराई जडली नाहीये. पण नाही म्हणता, माझ्या पोटाचा घेर सुद्धा थोडा थोडा वाढायला लागला आहे.
बारा तासाच्या ड्रायविंग ड्युटी मध्ये, मला व्यायाम करायला वेळ मिळत नाही. किंवा मी स्वतः आळस करत होतो. आता यावर उपाय तरी काय करावा..?
म्हणून शेवटी काहीतरी हालचाल करावीच लागली. माझ्या घरापासून माझं ऑफिस फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. आणि शेवटी मी मनाचा हिय्या केला. कि आजपासून कामावर जाताना आपण सायकलवरूनच जायचं. मोटारसायकल बिलकुल बंद करून टाकायची. काही दिवस मी सायकलिंगचा थोडा सराव केला.
विषय कसा आहे.. मला कामाला तर झक मारत जावच लागणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाहीये. आणि काम संपल्यावर, घरी जायची प्रत्येकाला ओढ असते. त्यामुळे, नाही म्हणून उपयोग होणार नाही. शेवटी तंगडेतोड करत घरी यावच लागतं.
हे म्हणजे..
आम के आम, और गुठलीयोंके दाम. अशातला प्रकार झाला..!
एकीकडे पेट्रोलची बचत होतेय, तर दुसरीकडे.. सायकलिंग केल्याने व्यायाम सुद्धा होतोय. आणि वजना बरोबरच पोटाची अतिरिक्त चरबी आणि घेर सुद्धा कमी होतोय.
हे सगळं करण्यामध्ये मुख्य कारण म्हणजे..
काही दिवसापासून मी खूपच सूक्ष्म निरीक्षण केलं. त्यात मला असं आढळून आलं. कि सायकल चालवणाऱ्या नव्वद टक्के व्यक्तींना पोट सुटत नाहीये.
त्यामुळे.. परवापासून मी सुद्धा एक साधी सायकल घेऊन त्यावर पुण्याला ये जा करू लागलो आहे. सायकल चालवल्याने चांगला थकवा येतोय. त्यामुळे भूक सुद्धा खूप चांगली लागते. पचनक्रिया सुद्धा मस्त होतेय. आणि, रात्री पलंगावर पडल्या पडल्या झोप कधी लागतेय ते सुद्धा समजत नाहीये.
हे कामात काम झाल्याने, मला फार आनंद झाला आहे. जिम लावायचा खर्च नाही. कि व्यायाम करण्यासाठी अतिरिक्त वेळ काढायचा प्रश्न सुद्धा येत नाही. सायकलिंग म्हणजे एक नंबर व्यायाम. एका छोट्या आणि चांगल्या निर्णयामुळे. माझ्याकडून, एका दगडात दोन पक्षी मारले गेले. फक्त, रोडच्या ट्राफीकचा फार मोठा त्रास आहे.
खरं तर.. सायकलिंग साठी वेगळे ट्रैक बनवले गेले पाहिजेत. किंवा.. सायकल स्वारांना, दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी " पहेले आप " हा अलिखित पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. तेंव्हा सगळं काही आलबेल होईल..!!
मग, तुम्ही सायकलिंगला कधी सुरवात करताय..?

No comments:

Post a Comment