Tuesday, 3 April 2018

पेट्रोल पंपावर.. एक कार पेट्रोल भरण्याकरीता उभी होती.
ड्रायव्हिंग सीटवर.. स्वतः, गाडी मालक बसला होता. मालक कसला, तीसेक वर्षांचा तरुण आणि रुबाबदार मुलगाच होता तो. कारच्या मागील सीटवर, नजर लागेल इतपत सुंदर अशी त्याची बायको, व त्याचा वर्षभराचा लहान मुलगा बसले होते.
पेट्रोल भरणारा मुलगा, कारच्या सामोरील दरवाजातून, पेट्रोल टाकीचं झाकण उघडण्याकरिता, उघड्या काचेतून हाथ पुढे करत, त्या गाडीमालक मुलाला चावी मागत होता. त्या मुलाने सुद्धा, लगेच चावी काढून दिली. चावी हातात घेत असताना.
नकळत त्या पेट्रोल भरणाऱ्या कर्मचारी मुलाचं लक्ष, मागील सीटवर गेलं. कारमध्ये, मागे बसलेली आई वजा तरुण मुलगी दिसायला खूपच सुंदर होती.
तिचं लग्न झालं असलं तरी, तिला कोणत्याच अंगाने बाई म्हणता येणार नव्हतं. तर ती सुंदर अशी, एक मुलगीच हो. फक्त, लग्न झालेली. आणि, एका लहान मुलाची आई.. इतकच काय ते.
या कर्मचारी महाशयाने, कारच्या पेट्रोल टाकीचं झाकण उघडलं. आणि, कारमध्ये पेट्रोल भरायला सुरवात केली. आणि थोडा अलीकडच्या बाजूला होऊन पेट्रोल भरत असताना..
तो एक सारखा.. वाकून, चोरून, काकदृष्टीने त्या मुलीकडे पाहात होता.
कारमध्ये पेट्रोल भरण्याकडे, त्याचं बिलकुल लक्षच नव्हतं. आता हे सगळं रामायण घडतंय, तर मग.. त्या मुलीच्या, नवर्याच्या नजरेतून हा विषय कसा सुटेल..?
पण विशेष म्हणजे, हे सगळं घडत असताना, त्या मुलीचं त्या पेट्रोल भरणाऱ्या मुलाकडे मात्र बिलकुल लक्षच नव्हतं. ती बिचारी, आपल्या लहान मुलाला खेळवण्यात दंग होती. तरी हा बिचारा कर्मचारी, तिच्याकडे खूप.. वाकून-वाकून पाहायचा प्रयत्न करत होता. तो फक्त त्या लावण्यवतीच्या एका 'झलकचा' भुकेला होता.
त्या मुलीचा नवरा, हे सगळं काही लांबूनच पाहात होता. आणि मनोमन हासत सुद्धा होता.
बहुतेक, तो मुलगा ( तिचा नवरा ) खुशमस्कऱ्या असावा. आणि शेवटी वैतागून..
तिचा नवरा.. त्या पेट्रोल भरणाऱ्या मुलाकडे हात करत, त्याच्या 'बायकोला' म्हणाला.
अगं प्रीती.. बाळाला खाली ठेव.
आणि, एकदा बघ गं त्याच्याकडे. नाहीतर, जीव जाईल त्याचा..!
नवऱ्याच्या या अनपेक्षित अशा वक्तव्यावर, त्या आई मुलीची तंद्री ताबडतोब भंग पावली. आणि ती मुलगी लाजेने खूप ओशाळली. हा प्रकार घडल्या नंतर, त्या पेट्रोल भरणाऱ्या मुलाचा चेहेरा तर अगदी पाहण्यासारखा झाला होता. त्याच्या हाताला थरथरी भरली होती. तो बिचारा, इतका ओशाळून गेला होता.
कि लाजेच्या मारेने पेट्रोल भरून झाल्यावर, पेट्रोलचे पैसे घ्यायला सुद्धा तो आला नाही. त्याने, दुसर्याच मुलाला तिथे पैसे घेण्यासाठी पाठवून दिलं होतं.
हा सगळा प्रकार घडून गेल्यावर, त्याची बायको बिचारी लाजून चूर झाली होती.
आणि.. या नवरोबाच्या गालावर मला एक वेगळच स्मित दिसत होतं.
बहुतेक.. आपली बायको, खूप सुंदर असल्याचा त्याला अभिमान वाटला असावा..!!

No comments:

Post a Comment