Tuesday, 3 April 2018

नमस्कार माऊली..
काही मदत करा, आमचं सगळं सामान चोरीला गेलय. पुण्यात आलो होतो, परत गावाकडं जायचंय, वाटखर्ची पण संपलीय. करा, काही मदत करा माऊली..!
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम..
माऊली या शब्दात, एक फार मोठी आई दडली आहे. त्यामुळे, या शब्दाचं मला नेहेमी विशेष कौतुक वाटत असतं. आणि, कोणी माऊलींच्या नावाने काही पुकारा करत असेल. त्यावेळी मात्र, मी फारच गहिवरून येतो.
पांढरं धोतर आणि सदरा, माथ्यावर कळकटलेली गांधी टोपी.. असा वेश परिधान केलेला साठीतला एक जाडजूड व्यक्ती. त्याच्या सोबत, नऊवारी साडी नेसलेली एक पन्नाशीतील जाडी भरडी स्त्री. बहुतेक.. ती, त्या व्यक्तीची बायको असावी.
तिच्या काखेवर, त्यांच्या वयाला न शोभणारा एक लहान मुलगा. ज्याला, ते आपला मुलगा म्हणत होते. आणि, माझ्याकडे मदतीची याचना करत होते.
मदत मागताना ते खूप काकुळतीला आले होते.
माझं मन म्हणजे निव्वळ मेन हो, असं काही ऐकलं कि मी लगेच पाघळून जातो.
काय करता.. मला त्यांची खूप दया आली.
पण.. सत्य परिस्थिती काहीतरी वेगळीच होती,
कि.. माझ्या खिशात फक्त शेवटची, आणि एकमेव पन्नास रुपयाची एकच नोट उरली होती.
माझ्या खिशात म्हणतोय बरं का, पाकिटात नाही. कारण.. त्याकाळी पैसे ठेवायला, पाकीट विकत घेण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसेच नसायचे.
चालू महिना संपायला, आणि पगार व्हायला, अजून.. तब्बल सात दिवसांचा अवधी होता. त्या सात दिवसातील, माझी हि अखेरची जेबखर्ची होती.
नंगा नाहायेगा क्या, और निचोडेगा क्या..?
काय करावं.. ? माझ्या मनात, विचारांचं चक्र सुरु झालं..!
तेंव्हा, मी पुणे महानगरपालिकेत नवीनच रोजंदारीवर कामाला लागलो होतो.
दोन हजार सालातील घटना आहे,
सकाळी सहा वाजता लवकर उठून.. काखेत, जेवणाच्या डब्याची पिशवी अडकवायची. आणि.. दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या, पिंपरी रेल्वे स्टेशन पर्यंत रोज चालत जायचं. हा माझा रोजचा नित्यक्रम होता. आणि घरी येताना सुद्धा, लिफ्ट मागत किंवा चालतच यायचं.
गरिबी खूप वाईट हो, हे मी जे काही लिहिलंय. यातील एक सुद्धा शब्द खोटा नाहीये बरं का.!
माझी हि रोजची ससेहोलपट पाहून, माझ्या एका मित्राने त्याच्याकडे असलेली, आणि.. वापरात नसलेली एक जुनी सायकल मला मोफत देऊ केली.
मी सुद्धा थोडा खर्च करून, तिला मस्तपैकी तयार केली. काय करता, अंधळ्याला काठी मिळाली, अशातली गत झाली.
आणि.. मी, रोज त्या सायकलवर स्वार होऊन अगदी आरामात, रेल्वेस्टेशन पर्यंत पोहोचायला लागलो. वेळेची बचत झाली, आणि माझी पायपीट सुद्धा थांबली. उपकारच म्हणायचे हो त्या मित्राचे.
त्यावेळी.. पिंपरी ते पुणे, अवघ्या पंच्याऐंशी रुपयाच्या मासिक पास वर माझा महिनाभराचा रेल्वे प्रवास होऊन जायचा. आणि तेंव्हा..माझा महिन्याचा पगार, अवघा तीन हजार रुपये होता.
त्यात.. घरभाडं, घरसामान, माझ्या येण्याजाण्याचा खर्च, तेंव्हा आमचा प्रतिक खूप लहान होता. त्याचा लहानपणीच्या दवाखान्याचा खर्च,
मला मिळणाऱ्या त्या तुटपुंज्या पगारात हे सगळं बिलकुल भागत नव्हतं. तरी नशीब.. तेंव्हा मला कोणतेही अतिरिक्त शौक नव्हते.
खरं सांगतो, महिना अखेरीला.. कोणाकडे तरी हातऊसने म्हणून, शे पाचशे रुपयाची उधारी हि ठरलेली असायचीच.
आणि.. हे पन्नास रुपये म्हणजे, माझ्या आठवड्याची जेब खर्ची. आणि, बस भाडं.. किमान, या लाचार लोकांपेक्षा तरी मी सुखी आहे. असा विचार करून, ती पन्नास रुपयाची नोट, मन मोठं करून त्या उभयतांच्या स्वाधीन केली.
त्या दिवशी, स्वारगेट ते शिवाजीनगर हे अंतर मी पायी चालत गेलो.
कारण.. बसने जायला माझ्याकडे पैसेच नव्हते ना.
जाऊदेत.. कोणाच्यातरी कामी आलो याचं मला फार समाधान वाटत होतं.
चालत-चालत, मजा करत.. तासाभरात मी शिवाजीनगरला येऊन पोहोचलो. त्यावेळी मला चालायची बिलकुल सवय नव्हती.. ड्रायव्हर माणूस, काय करणार नाही का..!
त्यामुळे..त्यादिवशी चालून-चालून माझ्या पायाचे अगदी भडके उडाले होते. मांड्या आणि पोटऱ्याचं मास, जागेवर फडफड करत होतं. रेल्वे स्टेशनला बसून, थोडा आराम केला. काही वेळातच लोकल आली..
नित्यनियमा प्रमाणे.. लोकलचा, प्रवास करून धक्के बुक्के खात वीस मिनिटात मी पिंपरी स्टेशनला पोहोचलो. पुन्हा, तीच जुनी आणि आवडती सायकल घेऊन, धापा टाकत मी घराकडे निघालो.
या संपूर्ण विषयाला.. साधारण, पंधरा दिवसाचा काळ लोटला असावा..!
सायंकाळी.. सहा साडेसहाची वेळ, सायकलवर धापा टाकत पिंपरीहुन मी घराकडे निघालो होतो. आणि, अचानकपणे..
मला, पंधरा दिवसांपूर्वी भेटलेलं नेमकं तेच जोडपं समोर दिसून आलं.
त्यांना पाहून मी जागीच थबकलो. आणि ताबडतोब सायकलवरून खाली उतरलो.
मी त्यांच्यासमोर हातात सायकल घेऊन उभा होतो, पण..त्यांनी काही मला ओळखलं नव्हतं. सरवाप्रमाणे, ते हि माझ्याकडे आले.
आणि.. मागचेच पाढे त्यांनी वाचायला सुरु केले.
मी ते सगळं काही शांतपने ऐकत होतो. ते सगळं काही ऐकत असताना, माझ्या मनात भयंकर राग उफाळून आला होता.
विषय संपला.. आता मात्र, मला त्यांच्या वयाचं सुद्धा भान उरलं नव्हतं.
मी त्यांना.. पंधरा दिवसापूर्वी घडलेल्या दिवसाची आठवन करून दिली. तसे, ते दोघेही चपापले.
आणि, एकाएकी माझ्या तोंडातून शिव्यांची सरबत्ती सुरु झाली. त्यांनीही, त्या शिव्या गपगुमान ऐकल्या. आणि, पुढे निघून गेले.
असा योगायोग क्वचितच घडावा. माझा राग काही शांत व्हायला तयार नव्हता. माझं सगळं शरीर रागाने थरथर कापत होतं. आणि अचानकपणे माझ्या डोळ्यात खळकन पाणी आलं.
पन्नास रुपयाची ती नोट, माझ्या डोळ्यासमोर रुंजी घालत होती..!
पैसे सत्कारणी लागले असते, तर त्याचं मला काहीच वाटलं नसतं.
राहून-राहून त्या पैशामध्ये, मला.. माझ्या मुलासाठी लागणारी डॉक्टरांची फी डोळ्यासमोर दिसत होती, माझ्या शिवाजीनगर ते स्वारगेट बसचं पंधरावड्याचं बस भाडं दिसत होतं, सायकल स्टॅन्डचं दोन महीन्याचं भाडं दिसत होतं.
काय करता..हताश मनाने पुन्हा एकदा सायकलला टांग मारून मी घरी निघालो.
आणि, तेंव्हापासून आजतागायत 'इच्छा' असूनही मी कोणालाही मदत करायचं टाळत असतो. शेवटी ती म्हण आहेच कि, गव्हासोबत किडे सुद्धा रगडले जातातच.
खरं सांगतो..ती फसवणूक, माझ्या फार जिव्हारी लागली होती..!

No comments:

Post a Comment