Tuesday, 24 April 2018

सायंकाळची.. पाच साडेपाचची वेळ असावी.
सूर्य पश्चिमेकडे पूर्णपणे झुकला होता. त्याची लालीमाच काय ती फक्त क्षितिजात दिसत होती. स्मशानात हि संपूर्ण स्मशान शांतता पसरली होती.
चाहुबाजूने फक्त, पक्षांचा किलकिलाटच काय तो ऐकू येत होता. मी सुद्धा घरी निघायच्या तयारीत होतो. तेवढ्यात, हि शांतता चिरत टर्र्र्रर्र्र्रर्र्र्र... असा आवाज करत, एक रिक्षा माझ्या समोर येऊन थांबली..
माझ्या दिवसाची सुरवात.. आणि, परतीची संध्याकाळ. हि स्मशानातच होत असायची. कारण.. तिथे माझी कामातील गाडी आणि माझी दुचाकी सुद्धा पार्क केलेली असायची. अनायसे.. आता मला सुद्धा तेथील रडारडीची सवयच जडून गेली होती..
मी फारच चौकस स्वभावाचा असल्याने, काही गोष्टींची मला चौकशी करावीशी वाटायची. आणि वरील विषय पाहून.. आजही, मला नेमकं तसच वाटत होतं.
रिक्षाने, आपली टरटर थांबवली होती. आणि आता मात्र, रिक्षात बसलेल्या त्या बाईच्या हंबरड्याचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता.
मी थोडं जवळ जाऊन पाहिलं.
तर.. तिच्या हातामध्ये, एका पाच सहा वर्षाच्या चिमुरडीचं 'कलेवर' ( पांढर्या कपड्यात गुंडाळलेल ) होतं. ती मुलगी, अगदी शांत झोपल्यासारखी दिसत होती.
कोणीतरी आवाज दिल्यावर, ती ताबडतोब उठेल आणि, दुडूदुडू धाऊ लागेल असं वाटत होतं. आई नामक त्या स्त्रीचं रडून-रडून डोळ्यातलं पाणी सुद्धा आटलं होतं.
फक्त तिचा गळाच काय तो, ओरडण्याच काम करत होता. तिचा नवरा, कपाळाला हात लाऊन सुन्नपणे एका बाजूला बसला होता.
पूर्ण विचारपूस केल्यानंतर, मला समजलेली कहाणी अशी होती..!
बिहारवरुन, मोलमजुरी करिता आलेल ते दांपत्य होतं. ते दोघे उभयंता, मोलमजुरी करण्याकरिता जाताना. मुलांना घरातच ठेऊन जायचे. हा त्यांचा नित्यक्रम होता.
पण, आजचा दिवस त्यांच्या करिता एवढं मोठं दुखः घेऊन येईल. याची त्यांना पुसटशी सुद्धा कल्पना नसेल.
पुण्यातील एका रेल्वेलाईन च्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्टी मध्ये, या लोकांनी त्यांची एक छोटीशी वसाहत निर्माण केली होती. घरात बसून काय करायचं..? जीव रमवायचा म्हणून रेल्वे रुळावर खेळण्याचं कसब या मुलांनी लीलया स्वीकारलं होतं.
पण आज..
एका सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या.. नुसत्या वार्याच्या फटकार्याने, त्या मुलीला हवेत भिरकावून दिलं होतं. आणि, त्या फटक्याने ती बिचारी जागेवरच गतप्राण झाली होती.
हि चिमुरडी, जेव्हा जन्माला आली असेल.
तेंव्हा, किती लोकं तिला बघायला आले असतील. याची तर गणतीच नसेल. कारण तेंव्हा ती तिच्या हक्काच्या घरात राहायला होती. या पापी पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी ती लोकं पुण्यात काय आले. आणि होत्याचं नव्हतं झालं.
पण, आता हि चिमुरडी काळाच्या पडद्याआड गेली होती. तेंव्हा, तिच्या अंत्ययात्रेला जेमतेम तीनच लोकं तिथे उपस्थित होती.
खड्डा खंदणारा तो सरकारी कर्मचारी. आणि, तिचे आई वडील. कारण, त्यांना सोडून रिक्षावाला तर कधीच निघून गेला होता.
अशी वेळ कोणावर सुद्धा येऊ नये.
किमान.. शेवटला चार खांदेकरी तरी प्रत्येकाच्या नशिबात असावेत.
शेवटी मला सुद्धा राहवलं नाही.. आणि पुढाकार घेऊन, मी सुद्धा त्या अंत्ययात्रेत सामील झालो. माझ्या हातची, दोन-चार मुठ माती त्या चिमुकल्या जीवाला मी अर्पण केली. तेवढच मनाला समाधान वाटलं..!
काही जीव या पृथ्वीवर फक्त नरकयातना भोगायलाच जन्माला आलेले असतात, या गोष्टीचं मला राहून राहून दुःख होत होतं.
शेवटी, कोण कोणाचं नसतं..
असा विचार करत, मी तेथून निघालो. आणि, रोजच्या रामरगाड्यात केंव्हा विलीन झालो.
ते, माझं मला सुद्धा समजलं नाही..!!

No comments:

Post a Comment