Sunday, 29 November 2015

आत्ताच, थोड्या वेळापूर्वीची घडलेली घटना.. 

माझ्या दुकाना समोरील इमारतीत, एका दुकानाचं शटर दुरुस्तीचं काम चालू होतं. आमच्या दुकानाचं शटर सुद्धा, थोडं जड झालं होतं. म्हंटलं, अनायसे कामाचा माणूस आलाच आहे. तर, कामात काम उरकून घेऊयात. नाहीतर हि लोकं लवकर भेटत नाहीत. म्हणून, त्या व्यक्तीला मी माझ्या दुकानाच्या शटर बद्धल विचारलं. 
त्या व्यक्तीने, शटर चेक केलं. शटरच्या आतील स्प्रिंगा टाईट कराव्या लागणार होत्या. एकूण कामाचे, त्याने मला सातशे रुपये सांगितले. शेवटी, तो सौदा पाचशे रुपयात ठरवला गेला. 

त्या व्यक्तीसोबत, काम करायला त्याचा आठ दहा वर्षाचा मुलगा सुद्धा आला होता. ते मला काही रुचलं नाही, म्हणून...
मी, त्या व्यक्तीला म्हणालो..
पोराला कशाला कामाला आणता..? त्याला शाळेत पाठवा ना,
तर म्हणाला..
हाय कि, शाळेत हाय त्यो. पण, येवढा हुशार नाय. आज, त्याच्या शाळेला सुट्टी हाये ना. म्हणून माझ्या संगं आलाय. माझ्याबर आल्याव, त्याला हाटीलातलं खायाला मिळतंय ना. म्हणून, येतो कधीतरी माझ्याबर..

सुट्टी दिवशी, निव्वळ हॉटेल मधील काहीतरी खायला मिळेल. ह्या आशेने, ते पोरगं खेळण्या कुद्न्याच्या वयात त्याच्या बापासोबत कामाला आलं होतं. त्याचं, मला खूप वाईट वाटलं.
आणि त्याच्या मोबदल्यात, त्या मुलाला हातगाडी वरील वडापाव आणि भजी खायाला मिळाली होती. तेच त्यांच्यासाठी हॉटेल नाही का.. 
त्यात सुद्धा, ते पोरगं मला खूप समाधानी वाटत होतं.

अर्ध्या तासात, माझ्या शटरचं काम उरकलं. मी, त्याचा मोबदला पाचशे रुपये त्याला दिले. 
तर तो म्हणाला, वरती काही चहा पाणी द्याकी राव..! 
मी त्याला म्हणालो.. अरे, तुम्ही अर्ध्या तासात पाचशे रुपये कमवलेत. मला सुद्धा तासाला येवढा पगार नाहीये. त्यामानाने, तुम्ही खूप पैसे कमवले आहेत. 
त्यावर तो म्हणाला.. रोज कामं नाही भेटत. कधी-कधी फक्त शंबर रुपये भेटत्यात..
मी सहज म्हणून त्याला विचारलं.. घरी कोण-कोण असतं तुझ्या..?
म्हणाला, एक सोळा वर्षाची पोरगी, एक चौदा वर्षाचा पोरगा, आणि ह्यो. तिघच असतोय आम्ही.
आणि.. तुझी बायको..?
तिनं तर फसावलं ना मला..!  तीन पोरं टाकून, गेली दुसऱ्या बाबा बरुबर पळून..
मी लगेच विषयाला फाटा दिला, आणि त्याला म्हणालो...!
मग.. आज मजबूत धंदा झालाय..! आता, एखादी चपटी वगैरे लावणार असशील.
तर म्हणाला.. नाही हो, आठ वर्ष झाली. 
जशी बायकू मला सोडून निघून गेली. तशी म्या सुधिक दारू सोडून दिली. 
नायतर.. रोजच्या आठ कॉटर मारायचो. माझ्या पोरानला, दुध सोडा साधा चहा सुधिक मिळत नव्हता. येवढा उतमात केला म्या..

रोजच्या आठ कॉटर मारणारा माणूस, दारू सोडू शकतो. यावर, माझा काही विश्वास बसेना..
म्हणून, त्याला सहज म्हणालो.. मला पण सांग, कशी काय सोडली राव तू दारू..?
तर म्हणाला, चला माझ्या बरुबर म्या दावतो तुम्हाला..
आमच्या इथं एक झाड हाय. त्याला घट्ट मिठी मारायची. आणि म्हणायचं. सोड मला, सोड मला.
मी म्हणालो... अरे, झाडाला मिठी आपण मारायची, आणि झाडाला 'सोड मला' म्हणून सांगायचं. ते कसं काय शक्य आहे..? ती मिठी आपणच सोडायला हवी ना..!

" तेच तर म्या सांगतोय.. दारु नी आपल्याला धरलंय. का, आपुन दारूला धरलंय.? "

लई सोप्पं असतंय हो.. पण, कराय मातर लागतंय..!

कोणता व्यक्ती काय तत्त्वज्ञान शिकवून जाईल. त्याचा आडाखा बांधणं खूप कठीण काम असतं.
त्यामुळे, मी कोणालाच कमी समजत नसतो. मिळेल त्याच्याकडून ज्ञान घेत असतो.

Thursday, 26 November 2015

आम्ही पुरुष मंडळी, किंवा हवं तर मुलं म्हणा..

आम्हाला, एखादी सुंदर मुलगी दिसली. कि आमच्या पुणे भागात, आवडीने तिला. 

" काय भारी " सामान " आहे राव..! "

असं, बोलून जातात..
पण तेच, मुलांच्या किंवा पुरुषांच्या बाबतीत मुली किंवा महिला काय म्हणत असाव्यात..? 
ह्याचं.. मला फार पूर्वीपासून कोडं होतं. 
माझ्या बायकोला सुद्धा, मी हा प्रश्न विचारला होता. पण, तिला सुद्धा ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देता आलं नव्हतं.
पण आज...
माझी, एक गावरान गंगू मैत्रीण आहे. तिझं सुद्धा, बाहेर अफेयर आहे. 
असं, मी ऐकून होतो. 
पण, तो व्यक्ती कोण आहे..? ते, मला माहिती नव्हतं. 

आज, अचानक ते दोघे मला जोडीने दिसले. आणि, थोड्या वेळाने तो व्यक्ती तेथून निघून गेला. 
आता, तो नेमका कोण होता..? ते मला माहित नव्हतं.. म्हणून, नंतर मी तिला एकांतात घेऊन विचारलं.. 

कोण होते गं ते..?
तर, म्हणाली...

आमचं क्याशीट ( केसेट )

आणि... गालामध्ये खुदुखुदू हसू लागली. तिला काय म्हणायचं आहे. 
त्याचा, मला लगेच उलगडा झाला. 
बऱ्याच वर्षापासून पाडलेल्या प्रश्नाचं, मला एकतरी समाधनकारक उत्तर मिळालं होतं.

आयला... कोण, कोणाला काय नावं ठेवतील त्याचा नेम नाही राव..

Wednesday, 25 November 2015

काश्मिरी घटना... एक, थरारक सत्यकथा..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इसवीसन.. एकोणीसशे एक्यान्नव, 
वय वर्ष वीस, तेंव्हा मला नुकतच मिसूरड फुटायला सुरवात झाली होती. माझ्या बापाची इच्छा मोठी, पोराला बाहेर कुठं कामाला लावायचं नाही. त्याला, स्वतःचा व्यवसाय सुरु करून द्यायचा. लैच धोरणी होता माझा बाप. त्या अनुषंगाने, त्यांनी आमच्या इथे खास माझ्यासाठी एका नव्याने तयार होत असलेल्या इमारतीमध्ये एक दुकान खरेदी केलं. आणि मला, त्या दुकानात त्यांनी एक कटलरी व्यवसाय सुरु करून दिला. पण, माझ्या दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा. मला काही 'मारवाडी' व्यावसायिक होता आलं नाही. आणि, माझा धंदा चौपट झाला.
पण, त्या दोन वर्षाच्या काळामध्ये मला बरच काही शिकायला मिळालं. बरेच अनुभव आले. बऱ्याच चांगल्या वाईट माहित्या मिळाल्या. ज्या आजवर, माझ्या जीवनाची गुरुकिल्ली बनून राहिल्या आहेत. त्यातलं, एक फार मोठं उदाहरण. आणि, मी ऐकलेली थरारक घटना...

कर्नायल अंकल...
एकोणीसशे एक्यान्नव साली, माझ्या दुकानाच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर हे निर्वासित काश्मिरी पंडितांचं कुटुंब पुण्यामध्ये राहायला आलं होतं. त्यांचा मुलगा, कोल्हापुरातल्या डी. वाय. पाटील कॉलेज मध्ये मेकेनिकल इंजिनियरईंग च्या शेवटच्या वर्षाला होता. पण, ते सुद्धा आता कायमचेच इथे राहायला आले होते.

गोरा गोमटा, उंचापुरा कर्नायल अंकल, त्यांना साजेशी लालबुंद गालाची त्यांची गोरी गोमटी बायको. आणि, एका पायामध्ये अपंग असलेली त्यांची पंधरा एक वर्षांची लहान मुलगी. असं, त्यांचं छोटंसं आणि मनमिळावू कुटुंब. त्यांचं पूर्ण नाव मला माहित नाही. आणि, मी कधी त्यांना ते विचारायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. कर्नायल हे त्यांचं आडनाव..   

कर्नायल अंकल..रोज सकाळी, पांढऱ्या रंगाचा थोडासा ढगळ असणारा नेहेरू शर्ट पायजमा घालून. ओठात, विल्स सिगारेट चेतवत माझ्या दुकानापाशी येऊन, उन्हाला उभा राहायचा. कोणाशी ओळख ना पाळख, त्यामुळे बिचारा एकटाच उभा राहायचा. मी चौकस बुद्धीचा माणूस, असे बरेच दिवस गेले. शेवटी, मीच त्यांना आवाज दिला. आणि, बोलायला सुरवात केली. 
क्या अंकल.. क्या कर रहे हो, कैसे हो..?
माझ्या ह्या वाक्यासरशी, त्यांच्या चेहेर्यावर जे स्मित झळकलं होतं. ते मी, आजवर विसरू शकत नाही. सिगारेटचा मोठा झुरका घेत, ते माझ्यापाशी आले. आणि, माझे दोन्ही खांदे घट्ट दाबत मला म्हणाले..
कुछ नही... बढीया है.., बोलो, तुम्हारा क्या चल रहा है...! 
त्या दिवसापासून, त्यांची आणि माझी अगदी घनिष्ट मैत्री झाली. एकतर, मी गोष्टी वेल्हाळ माणूस. मला सुद्धा, नवनवीन गोष्टीची फार आवड. म्हणून, ते अंकल मला काश्मीर मधल्या काही रंजक गोष्टी सांगायचे. काश्मीर मधील बर्फाचे डोंगर, सफरचंदाच्या बागा, गुलमर्ग, सोनमर्ग, दल सरोवराच्या गोष्टी.. बरच काही सांगायचे. आणि, बोलता-बोलता स्वतः मधेच हरवून जायचे.
एके दिवशी, सहजच मी त्यांना विचारलं.. 
अंकल.. तिथे इतकं सारं सुंदर निसर्ग सौंदर्य होतं. तर मग, तुम्ही इकडे का आलात..?
माझ्या ह्या वाक्यासरशी, मंद स्मित करत हळुवार त्यांच्या अश्रूचा बांध फुटला. आणि, ते मला काश्मीर मध्ये घडलेली हकीकत सांगू लागले..

काश्मीर मध्ये, आमचा खूप मोठा बंगला होता. मी सरकारी नोकर, पी.डब्लू. डी. मध्ये इंजिनियर. मला, महिना पंचवीस हजार रुपये असा घसघशीत पगार होता. आमचं अगदी सुखवस्तू कुटुंब होतं. काश्मीरमध्ये, कायम थंड वातावरण असतं. तरी सुद्धा, मी माझ्या घरी फ्रीज विकत घेतला होता. घरामध्ये, सगळ्या सुखसुविधा होत्या. मुलगा उच्चशिक्षित व्हावा, म्हणून त्याला कोल्हापुरात शिकायला पाठवलं. सगळं काही अगदी व्यवस्थित चाललं होतं..

आणि अचानक, काश्मीर मधील वातवरण बिघडलं. हिंदू मुस्लीम दंगे भडकू लागले. सुरवातीला मला, त्याचं काहीच सोयरसुतक वाटलं नाही. कारण, आमच्या आजूबाजूला राहणारी सगळी माणसं जातीने मुसलमान जरी असले. तरी, ती खूप चांगली लोकं होती. 
पण, एके दिवशी..
रात्री बाराच्या सुमारास, आमच्या घराच्या दरवाजावर जोरजोरात थापा पडू लागल्या. 
धाड-धाड-धाड-धाड...  दरवाजा खोलो..!
घरामध्ये, मी माझी बायको आणि आमची हि अपंग मुलगी. नाही म्हणता, मी सुद्धा थोडा घाबरलो होतो. भीत-भीत मी दरवाजा उघडला. दारामध्ये, सात आठ हत्यारबंद व्यक्ती उभे होते. प्रत्येकाने, आपले चेहरे कपड्याने झाकले होते. त्यांचे फक्त डोळेच तेवढे उघडे दिसत होते. पहिलं त्यांनी मला दरडावलं. आणि, घर सोडून निघून जाण्याचा आदेश सोडला. मी, खाली मान घालून गप्प उभा होतो. तोच... अचानक माझ्या पायावर, जोरदार लत्ताप्रहार झाला. तसा मी, खाली जमिनीवर कोसळलो. ते सगळे लोक, माझ्यावर अगदी तुटून पडले. जसा काय, मी त्यांचा सात पिढीचा दुश्मन असावा. सगळे मिळून, मला कुत्र्या सारखा तुडवत होते. मी मोठमोठ्याने ओरडत होतो. मदतीची याचना करत होतो. " मुझे मत मारो, तुम्हे अल्लाह का वास्ता है.. "  म्हणून, शपत सुद्धा घालत होतो. पण, त्यांच्यावर त्याचा कसलाच परिणाम होत नव्हता. माझ्या मदतीला कोणीच आलं नाही. माझा मार वाचवण्यासाठी, माझी.. बायको, पोरगी मध्ये पडली. तर, त्यांना सुद्धा ते केसं धरून मारत होते. आणि.. चाकू, सुरा, बंदूक दाखवून मोठ मोठ्याने दम भरायचे, 

" कल सुबह यहां दिखना नही. नही तो जिंदा गाड देंगे...! "

जवळपास तासभर हा दंगा चालू होता.. आणि, थोड्या वेळाने ते सगळे निघून गेले. रात्रभर, आमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. पूर्ण रात्र, आम्ही दहशतीखाली काढली..

दुसरा दिवस उजाडला.. सकाळ झाली, आमच्या आजूबाजूला राहणारी सगळी मुस्लीम कुटुंबं होती. त्यात फक्त आम्ही एकटेच काश्मिरी पंडित. थोड्या वेळाने, शेजारील घरातील एक बाई येऊन आम्हाला विचारती झाली. 
काल रात्री, तुमच्या घरी काही दंगा वगैरे झाला का..? कोणी आलं होतं का ..?
काय सांगायचं.. आणि, कोणाला सांगायचं.. 
घराबाहेर पडलो, कामावर निघालो होतो. वाटेत, माझे दोनचार मुस्लीम मित्र मला भेटले. 
त्यांनी सुद्धा, मला हाच प्रश्न विचारला. पण काय आहे, 

" कापडाने तोंडं कितीही झाकुद्यात हो. त्यांचे डोळे मला सगळं काही सांगत होते..! " 

त्यादिवशी माझं सांत्वन करणारे मित्रच, काल रात्री आम्हाला मारायला माझ्या घरी आले होते. 
हे सत्य, कोणाला सांगूनही पटणार नाही.. आणि, ते मित्र सुद्धा.. अगदी वेड्याचं सोंग घेऊन मला मदतीचं आश्वासन देत होते. सगळीकडे आराजाकता माजली होती. पोलिसात आमची कोणीही दखल घेत नव्हतं. आमची अगदी ससेहोलपट चालू होती.
आम्ही, पुरते हवालदिल झालो होतो..
हा प्रकार, आमच्याघरी सलग सात दिवस चालू होता. नंतर-नंतर हे हल्लेखोर 'मित्र' आमच्या घरी येण्यागोदर. पहिली, आमच्या घरातील लाईट आणि टेलिफोन कनेक्शन कापलं जायचं. 
कि... आम्ही ताबडतोब समजून जायचो. आता, आपल्या छळाला सुरवात होणार आहे. आणि, हतबल होऊन आम्ही त्यांना सामोरे जायचो. खूप मार खाल्ला, सगळं काही अगदी सहनशक्तीच्या पुढे गेलं होतं. पण माझ्या भाबड्या मनाला असं वाटत होतं.  कंटाळून, हि लोकं आपला नाद सोडतील. 
पण कसंल काय..
शेवटी वैतागून, आम्हीच काश्मीर सोडायचा निर्णय घेतला. 

त्या रात्री पुन्हा एकदा... मी त्यांचा भरपूर मार खाल्ला, शेवटी त्यांनी जबरदस्ती आम्हाला घरातून बाहेर काढलं. रात्रीची वेळ, हात वर करून त्यांनी आम्हाला पुढे जायला सांगितलं, आमच्या पाठीवर बंदुखा रोखल्या गेल्या. शेवटची घटका समीप आली होती. 
परंतु... काहीही झालं, तरी ते 'मारेकरी' शेवटी माझे 'मित्रच' होते. त्यांनी, आम्हाला अभय दिलं. नाही मारल्या आम्हाला गोळ्या, अंगावरील कपड्यानिशी आम्ही घर सोडलं. खिशात पैसा म्हणून नव्हता. येवढ्या रात्री आता जायचं कुठे..? हा, फार मोठा प्रश्न होता.

त्या गडध अंधाऱ्या रात्री, माझ्या अपंग मुलीला खांद्यावर घेऊन मी आडमार्गाने मार्गक्रमण करत होतो. माझ्या पाठीमागे माझी बायको येत होती. तिच्या डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत नव्हते. मागे वळून आम्ही आमच्या घराकडे पाहत होतो. पण, अंधाराशिवाय आम्हाला काहीच दिसत नव्हतं. मी काश्मीर मधील एवढा मोठा सरकारी अधिकारी. पण, माझ्याच मायभूमीत मी अगदी मातीमोल ठरलो होतो.  मी गडी माणूस, रडू तरी कसा..? आणि ते सुद्धा कोणत्या तोंडाने..? तशाने, माझी बायका पोरं पार खचून गेली असती. दुखः गिळून मी पुढे चालत होतो. 

चालता-चालता आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. तितक्यात दूरवरून, मला एक गाडी येताना दिसली. जीपच होती ती, मला मरणाचं बिलकुल भयच उरलं नव्हतं. त्यामुळे, मी बिनधास्त उभा राहिलो. ती जीप आमच्या एकदम जवळ आली, आणि करकचून ब्रेक मारून थांबली. माझ्या मनात थोडी धाकधूक होती. पण ती जीप, माझा एक मुस्लीम मित्रच चालवत आला होता. 
आज मात्र, त्याचा चेहरा कपड्याने झाकलेला नव्हता. जाऊदेत, पण तो माझ्या मदतीला आला होता. त्यामुळे, त्याच्या विषयीचा माझ्या मनामधील राग थोडा का होईना निवळला होता.  मला थोडं हायसं वाटलं. त्याने, मला थोडी सहानुभूती दाखवली. आणि, कशी का होईना काश्मीर मधून बाहेर पडण्यास मला त्याने मदत केली.  मजल दरमजल करत, दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास आम्ही जम्मू मध्ये येऊन पोहोचलो. 

त्यानंतर, आम्ही सलग दोन वर्ष जम्मूमध्ये काढले. पण, तिथेही मला थोडं असुरक्षित वाटत होतं. त्यामुळे, आम्ही पुण्याला निघून आलो. आता, आमच्या मुलाला पुण्यातील एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्य्यावर नोकरी मिळाली आहे. मला सुद्धा, सरकारकडून घरी बसून पगार मिळत आहे. फक्त, तो पगार घेण्यासाठी मला जम्मूत जावं लागतं. दोन तीन महिन्यांनी जम्मूत जाऊन मी माझा पगार घेऊन येतो. पण, फुकटचा पगार मला नको वाटतो. आणि, इथे दुसरं काही काम सुद्धा मी करू शकत नाही. कारण, माझ्याकडे कोणतंच प्रमाणपत्र नाहीये. 
काय करतोस... मी, माझी ओळखच काश्मीर मध्ये ठेवून आलोय..

पण बरं वाटतंय आता इकडे. किमान, रोज उठून मरणाची भीती तरी वाटत नाहीये. 
परंतु, तिकडची आठवण काही केल्या जात नाहीये. हे सगळं जेंव्हा थांबेल. तेंव्हा, मी माझ्या गावी, माझ्या बायको मुलांसोबत परत माझ्या काश्मीरला राहायला जाणार आहे..!

दोन वर्षांपूर्वी, पुण्यामध्ये एका दुचाकीच्या अपघातात, कर्नायल अंकल कोमात गेले. 
ते.. परत न येण्यासाठीच. 
शेवटी, काश्मीरला जाण्याचं त्यांचं स्वप्न हे स्वप्नंच राहिलं...!

आमीर :- क, क, क, क, किर ssssssss न..
किरण :- काय झालं तुम्हाला एवढं ओरडायला..?
आमीर :- तू...तू.. माझा तो टेपरेकॉर्डर कुठे ठेवला आहेस..? दिवसभरात, माझ्या सगळ्या चाहत्यांनी मिळून, पूर्ण नागडा केला आहे मला. एकही कपडा माझ्या अंगावर शिल्लक ठेवला नाही या लोकांनी.. 
आणि.. अशा अवतारात, मला विमानात तरी कोणी घेतील कि नाही. याची दाट शंका आहे मला.
किरण :- अहो तुम्ही पहिले आत या, आपल्या घरी कोण आलंय ते पाहिलंत का..?
आमीर :- कौन..? तू.. शाहरुख,
शाहरुख :- हाहाहाहा... वीस वर्षांपूर्वी, ह्या किरण नावापाई मी सनी भाऊ चा खूप मार खाल्ला होता. तरी सुद्धा, तू.... 'मेरी' सॉरी तुझ्या किरणचं ऐकलंस.
हाहाहाहा... इतका शाब्दिक मार खाल्ल्यावर तू कसा दिसतोयेस, तेच पहायचं होतं मला. म्हणून वेळ काढून आलो. पण, तू तर नुसत्या शाब्दिक प्रहारानेच नग्न झालास.. जाऊदेत,
ही घे " जंगलीस्थान " ची तिकिटं..
आणि, हो एकदाचा मोकळा.
काय आहे, 'नागडी' माणसं जंगलात राहिलेलीच बरी दिसतात.
शाहरुख रॉक्स & अमीर शॉकस्
आज.. थोर संत, साधू वासवानी यांची जयंती.. 

संपूर्ण भारतात, आजचा दिवस  मिटलेस डे ( मास वर्जित दिवस ) म्हणून साजरा केला जातो. 
आता, आपल्यापैकी किती लोकं हा नियम पाळत असतील. हा चर्चेचा विषय ठरावा. 

तर, त्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी घडलेली एक घटना आठवली..
पुण्यातील काही कॉलेज मधील मुलांना, एक सामाजिक उपक्रम म्हणून, एका कागदावर किमान पन्नास लोकांची नावं लिहिली जातील. असा, छापील कागद त्यांना दिला गेला होता.  आणि, त्यावर लिहिलं होतं..

" आजच्या दिवशी, मी शाकाहाराचं पूर्ण पालन करेन अशी शपत घेतो..! "

प्रत्येक मुलामुलींना, त्या शपत पत्रावर लोकांची नावं, पत्ता, आणि सह्या घ्यायच्या होत्या. 
त्या दिवशी, मी बस मधून पुण्याला निघालो होतो. 
बसने काही अंतर पार केल्यावर, बसमधील एक मुलाने तो फॉर्म बाहेर काढला. आणि, प्रत्येक सीटवरील प्रवाशाकडून तो सगळी माहिती भरून घेऊ लागला. मी सुद्धा, त्या शपतपत्रावर माझं नाव पत्ता आणि सही केली. आणि, तो फॉर्म माझ्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीकडे दिला. त्या व्यक्तीने, त्या फॉर्मवर आपली माहिती काही लिहिलीच नाही. म्हणाला, मला लिहिता येत नाही.. 
तो मुलगा म्हणाला.. ठीक आहे, मला सांगा मी लिहितो. 
शेवटी कसंबसं, त्याने त्याचं नाव आणि पत्ता सांगितला. आता, सही करायची वेळ आली. तर म्हणाला, मला सही येत नाही. तो मुलगा, अजून पुढचा निघाला. तो म्हणाला, ठीक आहे तुमचा अंगठा द्या. आता मात्र, तो मनुष्य धर्मसंकटात सापडला. आणि, अंगठा द्यायला टाळाटाळ करू लागला. मला काही समजेना, कि हा मनुष्य असा का करत आहे..?
शेवटी, मी त्याला म्हणालो.. 
करा कि अंगठा, तुम्हाला काय त्रास आहे. त्या कागदावर फक्त इतकंच लिहिलं आहे. कि,

" आजच्या दिवशी, मी शाकाहाराचं पूर्ण पालन करेन अशी शपत घेतो..! "

मग तर त्या व्यक्तीने, त्याच्या गळ्यातील तुळशी माळच काढून मला दाखवली. आणि म्हणाला, मी उभ्या आयुष्यात कधी मास मटणाला शिवलो नाही. आणि, आता कशाला नव्याने शपत घ्यायची. त्याचं काय नडलय एवढं..?
मी म्हणालो, अहो.. मग तर हि चांगली गोष्ट आहे. द्या तुम्ही अंगठा, काही फरक पडत नाही..
शेवटी.. तो, व्यक्ती त्याच्या मनातलं बोललाच..

म्हणाला.. हि लोकं अशी गोड बोलून माहित्या गोळा करत्यात आणि अंगठा घेत्यात. आणि, नंतर पैशे मागत्यात. मी म्हणालो, कसले पैसे..? अहो, आम्ही सुद्धा त्या कागदावर सह्या केल्या आहेत. आमच्याकडून कुठे पैसे घेतलेत त्यांनी..? 
तर म्हणाला.. काय सांगता येतंय, तुम्ही लोकं सुद्धा त्याला सामील असताल..! 
आता मात्र, आमची हसून अगदी पुरेवाट झाली..

थोडीशी गम्मत करावी म्हणून, मी त्या बाबांचा अंगठा पकडला. आणि, त्या मुलाने त्यावर पेनाच्या निब मधील निळी शाई त्यांच्या अंगठ्यावर चोळली. आणि, त्या बाबांचा अंगठ्याचा ठसा आम्ही त्या कागदावर घेणार... 
इतक्यात, बस थांबा आला. आणि गाडीने करकचून ब्रेक मारला..
तसा.. त्या बाबांनी माझ्या हाताला हिसका दिला. आणि, त्यांचं नियोजित ठिकाण येण्या अगोदरच त्या बस मधून त्यांनी पोबारा केला..

Monday, 23 November 2015

वर्षभरापासून आमच्या घरी, कपडे धुण्याकरिता. आम्ही म्हणजे, माझ्या सौभाग्यवतीने कामा करिता एका मावशीला नियुक्त केलं आहे..
त्यामुळे...  हल्ली असं सर्रास घडतं. मी, कपडे परिधान करत असताना..
कधी नाही ते, माझ्या शर्टाची बटनं मला तुटलेली आढळतात. 

सरळ हिशोब आहे, आपली बायको स्वतः कपडे धुवत असेल, तर ती  नवऱ्याची कपडे अगदी प्रेमाने आणि आत्मीयतेने धुवणार ना. आणि, त्यामुळे त्या कपड्यांना झगमगाट सुद्धा भरपूर आणि त्या कपड्यांना भरपूर आयुष्य सुद्धा लाभणार. तर मग.. शर्टाची बटनं तुटणं, वा विशिष्ट ठिकाणी कपडे फाटणं. हि खूप दूरची गोष्ट झाली. हे सत्य सुद्धा, कोणी नाकारू शकत नाही.

पण, करता काय..? मजबुरी का नाम..

त्यामुळे.. सकाळी कामावर जातेवेळी, कपडे घालताना मी पाहतो. तर, कधी-कधी माझ्या शर्टची काही बटनं मला तुटलेली आढळतात. त्यावेळी, एकतर मला कामावर जायची घाई झालेली असते.
आणि, सिनेमा मध्ये दाखवतात त्याप्रमाणे. अंगावर घातलेल्या शर्टच्या वरील बाजूस सुई दोरा घेऊन छातीवरील माझ्या शर्टाचं बटन टाचताना. बायकोला 'काही' करण्याइतपत, माझ्याकडे वेळ सुद्धा नसतो..

त्यामुळे, घाईघाईने मी दुसरा एखादा शर्ट घालून कामावर निघून जातो..!
प्रेमात असताना..

प्रेयसीच्या मुखातला, उष्टा 'घास' सुद्धा प्रियकराला गोड लागत असतो.
लग्न झाल्यानंतर, कालांतराने...

त्याच प्रियकराला, 

तिच्या तोंडाचा 'वास' सुद्धा सहन होत नसतो.

Sunday, 22 November 2015

किती फिरतोस रे बाबा..

ह्या विषयवार, दीड वर्षात बरेच विनोद निर्माण झाले. काल परवा, ब्रिटन वारीवर असताना तर. त्या विनोदांनी अगदी कहरच केला. लोकशाही मध्ये हे सगळं चालायचंच. त्याचं कोणी वाईट मानून घेऊ नये.

पण, एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटतेय...!

स्वतःवरून उदाहरण घ्या, आपण काय रोज उठून फिरायला जात नाही. वर्षातून एकदा किंवा खूप झालं तर दोनदा. याच्या पलीकडे काय आहे नाही का.. 
पण, आपण ती नियोजित सहल करत असताना तिसऱ्या, चौथ्या दिवशीच आपल्याला घराची आठवण येते. घराबाहेर कितीही सुखसोयी असुध्यात, पण आपल्याला घरचेच वेद लागतात. ते का..? 
कारण, घराबाहेर कितीही उंची सुविधा असल्या. तरी, आपल्याला आपलं घरच चांगलं वाटत असतं. शेवटी, आपलं ते आपलंच असतं..

आपण, तरणे ताटे असताना फिरण्याच्या बहाण्याने का होईना वर्षातून दोनदा हफ्ताभर घराच्या बाहेर राहू शकत नाही.. तर, या वयात हा व्यक्ती इतके देश फिरण्याची धावपळ कशासाठी करत असावा..?

फुकटात देश विदेश फिरायला मिळतोय म्हणून...? 

नाही... त्यापाठीमागे, नक्कीच काही तरी ठोस कारणं असतील. असं, मला तरी मनापासून वाटतंय. आणि, येत्या काळात आपल्याला ते पाहायला सुद्धा मिळेल..
जास्ती काही चर्चा करत बसत नाही..

आलिया भोगाशी असावे सादर.. असं म्हणा, आणि विषयाला पूर्णविराम द्या.
स्कुटीवर.. डबल सिट बसून निघालेल्या मुलींना पाहून.
बाईकवर,
सिंगल सिट असणाऱ्या मुलांचा..
फारच 'जळफळाट' होतो...!

Friday, 20 November 2015

मन चाहे गीत...

विविध भारतीवरील, त्या खर्जातल्या आवाजाचा एकेकाळी मी खूप मोठा चाहता होतो. त्यावेळी, माझ्या घरी सुद्धा टेपरेकॉर्डर होता. परंतु, मला मन चाहे गीतं काही ऐकायला मिळायची नाहीत. कारण, घरी नेहेमी त्याच-त्याच केसेट लावल्या जायच्या. आणि, त्याचा तर मला जाम कंटाळा यायचा. दर महिन्याला नवीन केसेट आणायला पैसे तरी कोणाकडे होते..! 
आणि त्यात, माझी आवड तर बापरे बाप..

त्या लहान वयात, मी अण्णाभाऊ साठे यांना वाचून मोकळं केलं होतं. तर मग, मी किती पुढचा असेल. याची तुम्हाला कल्पना आलीच असेल. बांगो.. बांगो.. बांगो च्या  जमान्यात. " जब भी ये दिल उदास होता है. जाने कौन आसपास होता है. " अशी दिलखेचक दर्दी गीतं ऐकायची मला त्यावेळी सवय होती. 
तर मुद्दा असा...
कि त्याकाळी, घरोघरी फोन नव्हते. त्यामुळे, मन चाहे गीत ह्या कार्यक्रमात आपली आवडती गीतं रेडियोवर ऐकण्याकरिता लोकं आकाशवाणी मध्ये तशी फर्माईशी पत्रं पाठवायचे. मग, आपला नंबर कधी लागतोय. त्याकरिता, रोज नित्यनेमाने तो कार्यक्रम ऐकणं क्रमप्राप्त असायचं. न जाणो, एखाद दिवशी आपलं नाव रेडियोवर यायचं. आणि, ते ऐकायला आपण तिथे हजर नसायचो. नाही का...
त्यामुळे, त्याकाळी वेळातवेळ काढून. अशी फर्माईश पाठवणार्या व्यक्ती. त्या कार्यक्रमा पुरतं का होईना... ते, रेडियो समोरून हलायचेच नाहीत.. त्या बाबतीत, हि लोकं खूप चौकस असायची.

आता, प्रत्येक गोष्टीचं रुपडं बदलत चाललं आहे. त्यामुळे, विविध भारतीने सुद्धा कात टाकली आहे. आता, सर्रास फोनद्वारे आपल्या गीताची फर्माईश कळवली जाते. किंवा त्याहीपुढे जाऊन, एसएमएस द्वारे सुद्धा आपल्या आवडत्या गीताची नोंद होऊ लागली. 
हल्ली तर, मोबाईल मध्ये सुद्धा रेडियो असतो. त्यामुळे, काम करता करता सुद्धा आपण त्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतो. किंवा, आपल्या आवडत्या गीताच्या फर्माईशी करिता ताटकळत बसण्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता भासत नाही.

आजच्या घडीला इंटरनेटच्या माध्यमातून, आपण पाहिजे तेंव्हा आणि हवं ते गीत पाहू किंवा ऐकू शकतो. पण, शेवटी नावलौकिकाचा प्रश्न आला. कि, अशा फर्माईशी आल्याच. प्रत्येक व्यक्ती, हा नावाचा भुकेला असतो. सगळेच काही स्टार होऊ शकत नाहीत. 
त्यामुळे, आपलं नाव कोणाला माहित असो अथवा नसो. पण आपण, स्वतःच नाव जरी त्या रेडियोवर ऐकलं. तरी, आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे, स्वतःच्या नावाचं लौकिक ऐकण्यासाठी हे माध्यम फारच प्रभावी ठरत होतं आणि आहे..

और.. पुणासे, पंडित पॉटर इन्होने अपनी फर्माईश भेजी है. फिल्म का नाम है, अग्नी परीक्षा और गीत के बोल है..

ओह ओह रे मन गुण गुण गुण गुण झूम के. 
गा रे कोही गीत, 
जिसे सुनके जागे मेरा सोया सोया मित.

खरंच, इंग्रज खूप हुशार होते....
त्यांनी, ज्या कोणत्या देशावर राज्य केलं. तिथे-तिथे आपली छाप सोडून ते तेथून निघून गेले. त्यांनी कोणतंही काम करताना, पुढील पन्नास वर्षांचा विचार केला. म्हणून, भारतात त्यांनी राज्य केल्या नंतर आजवर सगळं काही ठीकठाक चालू होतं. असं म्हंटलं तर, ते वावगं ठरू नये.
तर मग, त्या सुधारणांमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आल्या. 
रस्ते, रेल्वेसेवा, ईमारती, या गोष्टींमध्ये त्यांचा बराच दूरदृष्टीपणा जाणवतो.
आजही.. त्यांनी बांधलेल्या भव्य दगडी आणि सुंदर ईमारती भारतात दिमाखात उभ्या आहेत. त्यामुळे, भारतात असून सुद्धा आपण विदेशात असल्याचा आपल्याला भास होत असतो. वानगीदाखल, मुंबई मधील पूर्वीचं व्हीटी स्टेशन आणि आत्ताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस. पुण्यातील रे मार्केट आणि हल्लीचं महात्मा फुले मंडई.. आणि, अशी बरीच उदाहरणं असतील..
हे सत्य, कोणीही नाकारू शकणार नाही.
मुंबई मध्ये सुद्धा, पूर्वी ट्राम धावायची. तिला नामशेष करून कोणी काय मिळवलं असेल. ते तो परमेश्वरच जाणो.. त्यामुळे, मागील पन्नास वर्ष कोणालाच नवीन कामांचं काहीच सोयरसुतक नव्हतं. नाही म्हणता, 'संमिश्र' सरकारकडून थोडीफार कामं झाली सुद्धा असतील.
पण कसं आहे माहितीये का..
भरगच्च घरामध्ये, एखाद दुसऱ्या वस्तूची भर पडली. तर, ती आपल्याला चटकन जाणवत नाही. असं सुद्धा काही घडलं असेल.
पण, मोदी लाट अचानक येत नसते हो. त्याचा, उद्रेक व्हावा लागतो. तेंव्हा, ह्या गोष्टी घडायला सुरवात होते.
कालच्या बिहारी निकालानंतर, बऱ्याच लोकांचा जीव भांड्यात पडला असेल.
का, तर..
त्यामुळे, त्यांचं अस्तित्वं टिकून राहणार आहे ना..! नाहीतर, वर्ष भरापूर्वी सगळ्यांचे पत्ते कट झाल्यात जमा होते. सगळ्यांनी आशा सोडून दिल्या होत्या.
" माझं अस्तित्व टिकून राहावं. म्हणून, विरोधाला विरोध करणारे खरे देशद्रोही आहेत. "
असं, माझं ठाम मत आहे.
सुभाष बाबूंची हत्या घडवली गेली. लाल बहादूर शास्त्रींना यमसदनी धाडलं गेलं. अजून, बरीच ज्ञात अज्ञात उदाहरणं असतील. पण, आपणा सर्वसामान्यांना माहित असलेली हि ठळक उदाहरणं..
कोण होता हो या घटनां पाठीमागचा करता करविता..?
आणि, मी वर उल्लेख केलेली दोन्ही माणसं खूप वाईट होती असं तरी आहे का..?
मग यांचा गेम प्लान का झाला..? आणि, तो कोणी करविला..?
कोणीतरी असेलच ना...!
पण, हे जे कोणी असतील. त्यांचा छडा आजवर का लागला नाही..?
कारण, सुभास बाबू आणि लाल बहादूर हे दोघेही एकाच पक्षात होते. फक्त, जहाल आणि मवाळ एवढाच काय तो त्यांच्यात फरक असेल. त्यांना, जर कोणी तिसऱ्या पक्षाच्या व्यक्तीने मारलं असतं. तर आतापर्यंत, त्याचा किंवा त्या पक्षाचा भारतात नामोनिशान राहिला नसता.
मी काही, फार मोठा राजकारणी नाही. किंवा, फार मोठा विश्लेषक सुद्धा नाहीये.
पण, परमेश्वराने थोडी फार अक्कल मला सुद्धा दिली आहे. बस, एवढंच सांगायचं होतं.
बाकी, कोणी हुरळून जाऊ नका....
त्या मोदीला.. ना आगा ना पिच्छा, त्याने करायचं तरी " कोणासाठी..? "
हा, 'फालतू' पर्याय त्यांच्याकडे नाहीये. थोडावेळ, पक्ष बाजूला ठेवा.
एक आदर्श व्यक्ती म्हणून, हा मनुष्य मला फार प्रिय आहे. आणि, शेवटपर्यंत राहील यात शंका नाही. फक्त, त्यांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करूद्यात. बघुयात काय होतंय ते..
जागे व्हा, लाटणं शिरे पर्यंत गप्प राहण्यात काहीच अर्थ नाहीये. 

Wednesday, 18 November 2015

तसं पाहायला गेलं तर...
कुत्रा.. ह्या प्राण्याविषयी, मला फारसा लळा नाहीये.  कारण, एकदा मध्यरात्री मी कामावरून घरी येत असताना. काहीएक कारण नसताना, माझ्या चालत्या सायकलवर. उभ्या-उभ्या, एका भटक्या कुत्र्याने माझ्या पोटरीचा लचका काढला होता.  तेंव्हापासून, ह्या जातीवर मी फारच खार खाऊन असतो. 

काही वर्षांपूर्वी, मी सुद्धा एक कुत्रा पाळला होता. त्यामुळे, त्याला कुरवाळण्याच्या किंवा दरडावण्याच्या काही क्लुप्त्या मला अवगत आहेत. हा भाग अलहिदा. या गोष्टीचा मला भविष्यात कधीतरी उपयोग होईल असं वाटलं नव्हतं.  परंतु, त्याचा मला काल बराच उपयोग झाला.
खरं तर, मला कुत्रा चावल्या पासून मी त्यांना फारच भिऊन असतो. परंतु, कालचा प्रसंग अगदी बाका होता. 
रात्री.. साडे अकराची वेळ, मी माझ्या बाईकवर घरी निघालो होतो. घराजवळ वळताना, एका अंधाऱ्या ठिकाणी, चार पाच कुत्र्यांनी एका तरुण मुलीला घेरलं होतं. गुरकून तिच्यावर चाल करू पाहत होते. खरं तर, त्यावेळी मी तिला.. " इतक्या रात्री कुठे फिरतीयेस " म्हणून, दरडावण्याच्या तयारीत होतो. पण, आता तो जमाना राहिला नाही ना. उगाच, " तुम्हाला काय करयचंय " म्हंटली, तर काय घ्या. म्हणून, मी तो शहाणपणा टाळला. ती बिचारी मुलगी, फार घाबरली होती. 
पण... तितक्यात माझी एंट्री झाली ना..
ते चार, भटके कुत्रे पाहून नाही म्हणता मी सुद्धा थोडा घाबरलो होतो. पण, त्या भयाण अंधाऱ्या रात्री जीवाच्या आकांताने त्या कुत्र्यांच्या अंगावर माझी बाईक घालत मी जोरात हाड-हाड केली, आणि, सोबतीला माझ्या बाईकचा रेस सुद्धा वाढवला. योजना कामी आली होती. लागलीच, त्या कुत्र्यांनी तेथून कलटी मारली. 
त्या मुलीला म्हणालो... जा गं बाई पटपट जा घरी..!
ती पोरगी पण, जरा वेडीच होती. माझे धन्यवाद मानायचे राहिले बाजूला. आणि, नुसती खुद्कत खुद्कत पुढे निघून गेली. त्या परिसरातून, ती बरीच दूरवर जाईपर्यंत मी तिथे उभा होतो. 
आता.. माझी निघायची वेळ झाली होती.
आणि.. मोठ्ठा आवाज झाला. अचानक, सगळ्या स्ट्रीट लाईट गेल्या....! सगळीकडे काळोख पसरला. थंडीमुळे ,सगळी लोकं आपापल्या घरात गपगार झाली होती. माझ्या तर, काळजात धस्सच झालं.

आता तर, रस्त्यावर 'कुत्रा' सुद्धा नव्हता..

" एक तर ती हसत गेली, आणि अचानक दुसरीकडे लाईट गेली. " 

त्यात.. आमच्याच गावातली पोरगी म्हणावी. तर ती माझ्या पाहण्यातली सुद्धा नाही. 
पण.. अजून बारा वाजायला थोडासा अवकाश होता. म्हणून, माझ्या थोडा जीवात जीव आला.
चुकून, बाराचा ठोका असता तर... माझाच 'ठोका' गायब झाला असता. घाबऱ्या गुबर्या अवस्थेत तशीच बाईक दामटली. आमची सौ माझी वाट पाहत गेलरीत उभीच होती. तेंव्हा कुठं मला जरा हायसं वाटलं. पण, घरी गेल्यावर झोप लागेपर्यंत मला एकच प्रश्न पडला होता.

वह कौन थी..? 

Thursday, 12 November 2015

पहाटे पाच वाजता, बायकोने आवाज दिला..
आहो.... सहा वाजलेत, उठा..!
( हि तिची नेहेमीचीच सवय, अशाने एक तास जास्ती झोप मिळाल्याचा 'फसवा' आनंद मिळतो. )
नेहेमीप्रमाणे... अंगाला आळोखे, पिळोखे देत उठलो.
बेडवरूनच धरणीमातेला ( पार्टेक्स फरशीला ) स्पर्श करून नमस्कार केला. आणि, धरणीमातेची क्षमा मागून जमिनीवर पाय ठेवला. प्राथर्विधी उरकले, मुखमार्जन करून घेतलं.
आरशामध्ये पाहिलं, हनुवटीवरील दाढीचे वाढलेले खुंट डोकावत होते.
हातासरशी, त्यांचा सुद्धा सफाया करून टाकला.
गालावर उलटा हात फिरवून, दाढीचे खुंट हाताला लागत तर नाहीत ना..?
त्याची, एकदा खात्री करून घेतली. तुळतुळीत मुखड्याला, आफ्टर शेव्ह चोपडून पुन्हा एकवार न्याहाळलं.
आणि, हसत मुखाने पाटावर येऊन बसलो.
बाहेर.. सौ ने अभ्यंगस्नानाची तयारी करून ठेवली होती.
तिने, गुलाबजल आणि तेलमिश्रीत सुगंधी उटण्याने माझं सगळं अंग हळुवार चोळून दिलं.
स्नानगृहात, गेसगीजर च्या उकळत्या पाण्यामध्ये थोडं थंड पाण्याचं मिश्रण घेतलं.
गंघाळा मध्ये हात घालून, पाण्याची तपासणी केली. त्यामुळे, मेंदूला पाण्याचा उष्मांक समजला.
मेंदूने होकार दिल्यानंतर, मुखाने हर हर गंगे म्हणत... तांब्यातील पाणी मस्तकावरून पायापर्यंत ओघळले. अंगाला आलेल्या तेलकट पणामुळे, शरीरावर पाणी असं दिसतच नव्हतं.
अधूनमधून एखाद दुसरा थेंब डोकावत ओघळण्याच्या तयारीत दिसत होता.
सुगंधित चंदन उटी असलेल्या मोती साबणाची, हातामध्ये न मावणारी मोठी गोलसर वडी ( वडा ) घेतली. सर्वांगाला, 'मोती' साबण चोळवटून घेतला. बाहेरून, पुन्हा एकदा सौ चा आवाज..
अहो... थांबा, जरा... तुमच्या पाठीला साबण लावून देते.
ह्या पाठीचं सुद्धा, वर्षातून एकवेळ नशीब उघडतंच. नाहीतर, एरवी सगळ्या पाठभर आपला कुठे हात पोहोचतो. नाही का...!
सौ ने.. पाठीला साबण लाऊन, नायलॉनच्या चोत्याने खसखसून पाट घासून दिली. पाठीवरून तांब्याभर पाणी टाकलं. नंतर मी, हळुवारपणे चोत्याने कांती खुलवण्याचा प्रयत्न केला.
पुन्हा एकदा, सर्वांगावरून गरम पाण्याचा अभिषेक करून घेतला. वाफाळलेल्या अंगावर, थबकलेले पाण्याचे 'मोती' पंच्याने टिपून घेतले. ओलेत्याने, परमेश्वराचे दर्शन घेतले.
दिवाळ सनातली, " पहिली अंघोळ " अशा रीतीने पार पडली.
माझ्या सर्व... कुबेर मित्र आणि मैत्रिणींना. भाऊ, बहिणींना दीपावलीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा.
हि दिवाळी, सर्वांना भरभराटीची, तेजोमय आणि आनंदमयी जावो.
हीच, ईश्वरचरणी प्रार्थना..
परी म्हणू, कि सुंदरा... तिची अदा, असे जरा निराळी.
तिची अदा, करी फिदा.... ती मेनका, ती मेनका, ती मेनका sss....
परी जणू निघाली......
हे गानं, तुम्हाला छान वाटलं ना.....!!
हो.... परवा असच काही तरी घडलं....
तिच्यावर, आमचं संपूर्ण ऑफिस फिदा आहे. बरेच रती महारती, तिच्यापुढे.. दाने टाकून थकले. पण छे ...
ती, कोणालाच भिक घालत नव्हती..
सुंदर, कमनीय, ठसठशीत, रेखीव, भरीव, कोरीव, उथळ, निथळ आणि अजून काय काय शब्द शिल्लक असतील ते...!
" छत्तीस चोवीस छत्तीस " हि तर झाली, नखरेल गणिती भाषा.
" परंतु, हे 'समीकरण' काही तरी निराळच हो..! "
ह्या' वेड्या, भोळ्या, भाबड्या.. मनाला. आकडे, थोडीच माहिती असतात..?
" मनाचे आकडे, आणि गणितं फक्त मनालाच माहिती असतात..! "
तीची,खूपच स्तुती झाली, नाही का...! चला तर, मग आता मूळ मुद्द्यावर येतो...
तिला पाहून, भले-भले नेहमी घायाळ होत असतात.
परंतु आज.. तीच रुपगर्विता, जिचा कमनीय देह सर्वांना नेहमीच आव्हान करत असतो. घायाळ करीत असतो...!
आज ती,
ऑफिस मधील, कामाच्या फ़ाइलींचा गठ्ठा घेऊन घाई-घाई मध्ये निघाली होती.
आणि, ऑफिसमध्ये असणाऱ्या एका चिंचोळ्या बोळीमध्ये....
ती सुद्धा, बेसावध... आणि मी कमालीचा घाईमध्ये..!
आणि, तिने... उभ्या-उभ्या मला धडक दिली...!
बापरे...
माझे तर, पक्के होशच उडून गेले. नकळत तो कमनीय देह, माझ्या बाहुपाशात आला. मनामध्ये, नको त्या विषयांची घालमेल सुरु झाली. प्रत्यक्षात न होणार्या गोष्टी, मला डोळ्यासमोर दिसू लागल्या. भर दिवसा, डोळ्यासमोर तारे चमकत होते. अशा, बर्याच गोष्टी.. दिवसा ढवळ्या, माझ्या डोळ्यासमोर गोंधळ घालू लागल्या होत्या...
त्या पाच सेकंदामध्ये, माझी बरीच 'अपूर्ण' स्वप्न डोळ्यासमोरुन तरळून गेली.
मी, थोडासा सावध झालो. खूप ओशाळलो, लाजलो, मुरडलो, नटलो, थटलो..
आणि, हरकलो सुद्धा. मनामध्ये, खूप उकळ्या फुटत होत्या.
बळेच, तिच्या बाहुपाशातून मी विलग झालो...
मी, खाली पडलेल्या सगळ्या फायली गोळा करून तिच्या हातामध्ये दिल्या. ती सुद्धा मला त्या कामात मदत करत होती. नाही म्हणता, तिच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडी लाली चढली होती.
आणि, काहीतरी बोलायचं म्हणून..
चेहेर्यावर, फुकाचा लाजरापणा आणून... मी, तिला म्हणालो.
हेल्लो, सॉरी हं...!
त्यावर, ती म्हणाली...
ठीक आहे, ठीक आहे...एवढे लाजू नका...!
" दिवाळीचा, "बोनस" मिळाला म्हणून समजा...! "
आणि, ती आली त्याच दिमाखात.. लाजत, मुरडत, थिरकत निघून सुद्धा गेली...
मी... शांत, स्तब्ध, निशब्द..
तिच्या, पाठमोर्या देहाकडे; देहभान हरवून, एकटक तिला न्याहाळत उभा होतो.
अगदी, वेड्यासारखा...!

Sunday, 8 November 2015

क्षणभर मिळणाऱ्या 'चुकार' आनंदाच्या बदल्यात.
आयुष्य भराचं मिळणारं, 

" दुखः "

मनुष्याला, खूप काही शिकवून जातं.

Saturday, 7 November 2015

बकऱ्यांचा आक्रोश मला आवडत नाही.
मटन खाल्ल्याशिवाय मला जमत नाही.
खोटेपणाचा बुरखा मी पांघरणार नाही.
सत्यतेत काहीएक फरक पडणार नाही.
भर टळटळीत दुपारी... 
सायकलच्या ह्यांडलला दिवाळीच्या घर सामानाच्या पिशव्या लादून. एक मनुष्य, त्याची सायकल जीवाच्या आकांताने हाताने रेटत चालत निघाला होता. 
त्याच्या पाठीमागे, काही अंतर सोडून. त्याची भार्या, डोक्यावर कसलंसं वजनी गाठोडं घेऊन. त्याच्या मागे, धावण्या सदृश्य घाईघाईने चालत होती. 
गाठोड्या खाली असलेला, तिच्या हिरव्या साडीचा पदर. आणि, तिच्या ठसठशीत कुंकवा वरून ओघळणारे घामाचे टपोरे थेंब. डोळ्याच्या खोबणी शेजारून ओघळत, तिच्या हनुवटी वरून मानेच्या दिशेने वाहत निघाले होते. इतके कष्ट पडून सुद्धा, ती बिचारी हसतमुख होती. याचं, मला खूप नवल वाटत होतं.
सायकलच्या पाठीमागील केरियरवर, 
दोन्ही पाय, सायकलच्या पुढील नळीवर एकावर एक आडीत टाकून. सीटला धरून, त्यांचं एक सात आठ वर्षाचं मुल बसलं होतं. आणि पाठीमागून, ते त्याच्या वडिलांना म्हणत होतं..

" बाबा.. तुम्ही मला 'खायाला' का नाय घेतलं..? "
त्यावर... त्याचे वडील त्याला म्हणाले...
" बाळ्या... आरं हे सगळं, आपुन 'खायलाच' घेतलंय कि...! "  

त्या पोराला... 'खायालाच' यातील नेमका अर्थ समजला असेल कि नाही. ते मला माहित नाही. 
पण, ते पोरगं आनंदाने आपली मान डोलवत. 

त्याच्या बापाच्या हो मध्ये, हो मिसळून गेलं होतं...! 

Wednesday, 4 November 2015

एक सामाजिक भान म्हणून...
मला नेहेमीच, लग्न समारंभात जावच लागतं. त्यावेळी, मला आमच्या किंवा इतर समाजातील तरुण मुलं हौसेने भेटत असतात. मला भेटणाऱ्या त्या मुलांमध्ये, एखादा अविवाहित तरुण जर माझ्यासमोर आला. तर, नकळतपणे माझ्या तोंडून सुद्धा हे वाक्य निघतच..
" काय रे... तुझे लाडू कधी खाऊ घालातोयेस मला..? "

त्यावर, लाजून... एकतर तो अविवाहित मुलगा निरुत्तर तरी होतो. किंवा, त्या विषयाला तो हसण्यावारी तरी घेऊन जातो.
हे झालं, मुलांच्या बाबतीत. आम्ही, पुरुष मंडळी तरी काही गोष्टी फार गमतीने आणि हलक्याच घेतो.

परंतु, हाच प्रश्न.. 
लग्न समारंभात, एखाद्या अविवाहित मुलीला. एका, स्त्रीकडून विचारण्यात आला तर..?

" काय गं, तुझं अजून ठरतंय कि नाही...?
तेंव्हा.. त्या, अविवाहित मुलींवर काय संकट कोसळत असेल..? 
याची, तुम्ही फक्त कल्पना करा..

" स्त्रीने, स्त्रीवर केलेला शाब्दिक 'प्रहार' खूपच वर्मी असतो.. "

Tuesday, 3 November 2015

घोरवडेश्वराच्या डोंगरावर, हर तर्हेचे लोकं येत असतात. त्यात.. हौशे, नवशे, गवशे सगळेच आले. 
कारण नसताना, ग्रामस्थांनी डोंगराच्या पायथ्याला पे एन्ड पार्क का सुरु करून ठेवलंय...?  त्याचं कारण मात्र, मला अध्याप समजलं नाही. 

" हा निसर्ग आणि परमेश्वर आहे कि आमचा रखवाला. " 

तर.. आमच्या त्या कवडीमोल गाड्यांना तिथे कोण काय करणार आहे...? 
पण काय आहे, देवस्थानाच्या नावाखाली सगळं काही खपून जातं.

नेहेमीप्रमाणे, या रविवारी मी डोंगराच्या पायऱ्या चढायला सुरवात केली. सकाळी नऊ वाजता, उन्हाचा चांगलाच तडाका जाणवत होता. पाचव्या मिनिटालाच, माझा श्वास फुलायला सुरवात झाली. मोफत मिळणारा स्वच्छ ऑक्सिजन, फुफुसाच्या भात्यामध्ये यथेच्छ भरला जाऊ लागला. हिरवागार निसर्ग डोळ्यांना सुखद अनुभूती देत होता. एक-एक गात्र, मोकळी व्हायला सुरवात झाली होती. अंगातून, घामाचे खारट थेंब बाहेर येऊ लागले होते.
बघता-बघता, त्या घामाच्या थेंबाचं औष्णिक धारांमध्ये रुपांतर व्हायला फारसा वेळ लागला नाही. मोजून एकोणीसाव्या मिनिटाला, मी मंदिरालगत जाऊन पोहोचलो. सर्वांग उष्ण झालं होतं. घामाने ओला चिंब झालो होतो. कमालीचा थकवा जाणवत होता.

पण निसर्गाचा चमत्कार.. कडे कपाऱ्यातून, गार वारा अंगाशी लाडिक चाळे करत होता. पक्षांचा किलकिलाट मधुर संगीत ऐकवत होता. पाठीवरून ओघळनाऱ्या घामाच्या धारा, सुंदर अनुभूती देत होत्या. पंधरा मिनिटे, मी त्याच अवस्थेत दगडी आसनावर समाधी लावली. 
काय वर्णावा तो आनंद. थोडा ताजातवाना झालो. शिवशंभो च्या चरणी नमस्कार अर्पण केला. आणि, डोंगर उतरायला सुरवात केली.

उताराला काही अंतर चालून गेल्यावर, झुडुपांच्या आसपास बरेच प्रेमी युगल गप्पा मारत बसलेले आढळतात. त्यांना सुद्धा, इथे मस्त आणि निवांत एकांत मिळतो. काही टुकार पोरं, बियरच्या बाटल्या फोडून लोकांच्या नजरेत धूळ फेकत. हळू-हळू बियरचा एक-एक घोट रिचवत असतात. त्यांना वाटत असतं, आपल्याला कोणी पाहत नाहीये. पण, तो त्यांचा गोड गैरसमज असतो.

तर, झुडपामागे बसलेल्या एका किशोरवयीन जोडप्या मध्ये चाललेला संवाद माझ्या कानी पडला.
बहुतेक, ती मुलगी डोंगर चढून खूप वैतागली असावी. आणि, हा गडी तिला बाहुपाशात घ्यायला आसुसलेला असावा. मला, फक्त एवढंच वाक्य ऐकू आलं.

" इतक्या लांबची तंगड्या तोड करायला लावली मला. आता, पाय दाब माझे.."

त्या मुलीचं हे वाक्य ऐकून, मनातच मी खूप हसलो. त्या प्रेमवीराची, मला अगदी कीव करावीशी वाटली. परमेश्वरी कृपेने अशा छोट्या मोठ्या गमती जमती ऐकण्याचं भाग्य मला लाभलं. म्हणून, स्वतःवरच खुश झालो. 
आणि, अगदी पंधराव्या मिनिटाला मी पायथ्याला येऊन सुद्धा पोहोचलो. 

Monday, 2 November 2015

दहावी झाल्यावर, किवा त्या अगोदर सुद्धा... 

प्रत्येक मुलाला तालमीत किंवा जिम मध्ये जाण्याचा नाद लागतोच. तसा, तो मला सुद्धा लागला. आमच्या गावातील, एका तालमीत मी नियमित व्यायामाला जायचो. 
अल्पावधीतच.. जोर बैठका मारण्यात, मी पक्का सराईत झालो. लैच मस्त घुमायचो.
तुम्हाला खोटं वाटेल. पण त्यावेळी, एका दमात मी तब्बल 'पाचशे' जोर मारायचो. 
आयच्यान.. खोटं सांगत नाही बरं का..!
व्यायाम करायला, मी कुठेच कमी पडत नव्हतो. पण, येवढ्या मोठ्या व्यायामाला तेवढा मोठा खुराक सुद्धा मिळाला पाहिजे ना. म्हणून, आमच्या वस्तादाने मला सांगितलं. 

तू.. एवढ्या जोर बैठका मारत जाऊ नकोस. व्यायाम जिरवायला, शरीराला तेवढा खुराक सुद्धा द्यावा लागतो. नाहीतर, विनाकारण तुला 'कडकी' भरायची. 

त्या दिवसापासून, मी तालमीला कायमचा रामराम ठोकला. नको ती दुखणी कशाला नाही का. एकदा शरीरात कडकी भरल्यावर, उभ्या आयुष्यात 'सोनं' जरी खाल्लं तरी तब्बेत होणारा नसते. 
हे मी, चांगलं जाणून होतो. 

नंतरच्या काळात, मी स्टेडियम वर जायचो. शरीरात धग असावी. म्हणून.. धावणे, पोहोणे काही मैदानी खेळ असे छोटेमोठे व्यायामाचे प्रकार करायचो. पण, मनात एक खंत कायम असायची. 
कि, आपली सुद्धा 'पिळदार' शरीर यष्टी असावी. पण, घरच्या गरिबीमुळे माझं ते स्वप्न स्वप्नच राहणार. हे मला, चांगल्याप्रकारे ठावूक होतं..

ब्यान्नव-त्र्यान्नव च्या सुमारास, आमच्या पुण्या भागात एक नवीनच पेव फुटलं होतं. गुजरात मधील एक डॉक्टर, पोस्टाने काही लाल, पिवळ्या, काळ्या गोळ्या पाठवायचा. आणि, त्या गोळ्यांच्या नियमित सेवनाने. दोन महिन्यातच, व्यक्तीचं जवळ-जवळ वीस-तीस किलो वजन हमखास वाढायचं. जबरी तब्बेत होऊन जायची...

त्या डॉक्टर चं नाव होतं. " डॉ.अमिशकुमार दावडा. "

जाऊदेत... तब्बेतच बनवायची आहे ना. तर मग, अशी नाही तर तशी.  ह्या उद्देशाने, मी सुद्धा त्या डॉक्टर कडून गुजरात वरून गोळ्या मागवल्या. 
एका वेळेला सात, अशा दिवसातून तीन वेळा गोळ्या खाव्या लागायच्या. आणि, काय सांगू तुम्हाला त्या गोळ्यांचा प्रताप...
गोळ्या खाल्ल्या.. कि अशी कडकडून भूक लागायची कि बास रे बास.. त्याकाळचा, माझा आहार ऐकताल तर तुम्हाला सुद्धा चक्कर आल्याशिवाय राहणार नाही..
दिवसातून, मी तीन वेळा जेवायचो. आणि, एका वेळेला माझा आहार असायचा. 

" गव्हाच्या, सात मोठ्या चपात्या. "

दिवसभरात एकवीस चपात्या, आणि कुकरचं एक भांडं भात. मी एकटाच फस्त करायचो. सोबत वरण आणि भाजी सुद्धा आलीच कि..
त्यावेळी, माझ्या ह्या राक्षसी आहाराला, माझ्या घरचे सुद्धा जाम वैतागले होते. 
पूर्ण घराला लागणारं जेवण, मी एकटाच फस्त करत होतो. आमच्या वहिनी तर, चपात्या लाटून- लाटून अगदी हैराण झाल्या होत्या. 

पण, त्या गोळ्यांनी मला त्याचा चांगला असर दाखवला. दोन महिन्यात, माझं वजन पन्नास वरून थेट ऐंशी किलो झालं. कोल्हापुरातल्या पैलवाना सारखा, 
मी, " गोल गुटगुटीत झालो होतो.. " 
माझी खूप जुनी इच्छा फळाला आली होती. माझी तब्बेत झालेली पाहून, आमच्या गावात आणखीन बऱ्याच मुलांनी त्या गोळ्या मागवल्या. आणि, जो तो 'टराटर' फुगायला लागला होता.

झालं.. माझा दोन महिन्यांच्या गोळ्यांचा कोर्स एकदाचा संपला. आणि, त्याचबरोबर माझी भूक सुद्धा मंदावली. तेंव्हा कुठे, आमच्या घरच्यांनी मोकळा श्वास घेतला. पण, नंतरच्या काळात एक वेगळीच गम्मत घडली. दिवसाला, एकवीस चपाती खाणारा मी माणूस. परंतु, त्या गोळ्यांचा डोस संपल्या नंतर, मला दिवसातून दोन चपात्या सुद्धा जात नव्हत्या. 
बघता-बघता, दोन महिन्याच्या आत. मी पूर्वी होतो तसाच झालो. उलट, त्यापेक्षा थोडा खराबच झालो. काय करावं ते सुचत नव्हतं. भूक अशी लागतच नव्हती. 

जाऊदेत, माझं तरी एवढ्यावरच भागलं होतं. परंतु, ह्या तब्बेतीच्या मोहापाई झिरो फिगरवाल्या एका बाईला आपला जीव गमवावा लागला. तर, माझ्या एका मित्राच्या पायावरून कसलं तरी वारं गेलं. आणि तो कायमचाच लंगडा झाला. एका मित्राच्या चेहेरा, अगदी काळा ठिक्कर पडला. 
ते त्याने, पुन्हा गोरं व्हायचं काही नावच घेतलं नाही... 

बापरे, हे सगळे प्रकार पाहून मी तर पुरताच घाबरून गेलो होतो.
पण, कोणतंही नुकसान न होता पूर्वपदावर आलो. त्याचं बाकी मला समाधान वाटत होतं.

कोणाचाही सल्ला न घेता. आम्ही, परस्पर हा उद्योग उरकला होता. त्याची फळं तर आम्हाला भोगावी लागलीच होती. नंतर, त्या डॉक्टरचा आम्हाला काहीच तपास लागला नाही. मी तर, एक शिव्याने भरलेलं खरमरीत पत्र त्याला लिहून पाठवलं होतं. पण मला नंतर समजलं, त्याला मराठी येत नसणार. त्यामुळे, माझे ते श्रम सुद्धा वाया गेले. 

त्या, अमिशकुमार दावडा ने, आम्हाला चांगलंच आमिष दाखवून. खूप पैसा कमवला असेल. आणि तो श्रीमंत सुद्धा झाला असेल.. पण एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटतेय. त्याने, त्याचं काम केलं होतं. आणि, कोणतीही शहानिशा न करता आम्ही त्याला दुजोरा दिला होता. आमचं, 'बलवत्तर' नशीब आमच्याबरोबर होतं. म्हणून, आम्ही बचावलो.

त्या अमिशकुमार ने, काय करायचं ते केलं असेल. पण आम्हाला फसवून. त्याने, त्याच्या आडनावाचा 'अपभ्रंश' मात्र आमच्या हातात ठेवून दिला होता.      

हे धर्मादाय संस्थेतील लोक, गरिबांना अन्न वाटतात... खरच, हे खूप चांगलं काम आहे...!
पण त्यामुळे, ती लोकं ऐतखाऊ होतात त्याचं काय..?
एकदा अशाच एका संस्थेतील लोकांना, मी ह्या विषयावरून हटकलं होतं.
तर म्हणाले... तुम्हारा क्या जाता है.. ?
मी त्यांना म्हणालो..
हमारा, कुछ भी नही जाता है. लेकीन, तुम्हारे घरका कुछ जाता है क्या..?
इथून तिथून, फंड जमा करता. आणि, यांना पोसता...!
हि लोकं तुमची कोण लागतायेत..?
तर म्हणाले, आम्ही समाजसेवा करतोय..!
आता, मला माहित आहे. हे लोकं नेमिकी समाजसेवा करतायत, कि समाज भरकटवत आहेत..?
हे मी सांगायला नकोय. या फुकट खाऊ लोकांना एकच धंदा आहे. काहीही कामधंदा न करता फुकटचं खायचं, आणि रात्रंदिवस फुटपाथवर पडून राहायचं.
अशाने, आपली मोठी शहरं " स्मार्ट सिटी " होणार आहेत का..?
मध्यंतरी, पुण्यातील एक मोठे व्यावसायिक अशा गरजू लोकांना. मोफत.. दुधाच्या पिशव्या, तांदळाच्या पिशव्या वाटायचे. तर हि नालायक लोकं, त्या पिशव्या अल्प दरात कोणाला तरी विकायचे. आणि, त्यापासून मिळणाऱ्या पैश्यातून व्यसनं करायचे. काही काळानंतर, हा प्रकार त्या व्यावसायिकाच्या ध्यानात आल्यानंतर. त्याने, ताबडतोब हा प्रकार बंद करून टाकला.
आणि, पुण्यातच कोठेतरी अन्नछत्र उघडलं. ज्याच्या पोटात खरोखर आग पडली असेल. तो येईल, आणि अन्न ग्रहण करून जाईल. हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश.
निस्वार्थ सेवा करा हो.
हे नालायक ऐतखाऊ लोकं. यांचे फुकटचे तुकडे तोडतात. आणि दिवसभर.. गांजा, दारू आणि नशा म्हणून नवीन आलेलं ते व्हाईटनर ओढत बसतात.
गरिबांना अजून गरीब आणि लाचार करायचं. आणि, आपल्या देशाला आणखीन पाठीमागे न्यायचे हे धंदे आहेत.
असं, माझं ठाम आणि परखड मत आहे...! 
दारू पिनारांसाठी, गटारी 'अमावास्या' असते..
त्याचप्रमाणे...
दुध पिनारांसाठी, कोजागिरी 'पौर्णिमा' असते.
घरामध्ये... घरकामाला एखादी बाहेरची बाई असावी...!
हि संकल्पना, मला कधीच पटली नाही. आणि, पटणार सुद्धा नाही. आपण, स्वतःहून जे काम करू. ते, बाहेरची कामाला असलेली बाई. तितकंच मन लाऊन, करू शकनार आहे का...?
याबाबत, माझ्या मनामध्ये बऱ्याच दुविधा आहेत. आणि, त्या रास्त सुद्धा आहेत...
( काही, सरकारी किंवा अन्य ठिकाणी कामाला असणाऱ्या महिलांना वगळून हा विषय आहे. )
परंतु, दुर्दैवाने... आज, माझ्या घरी सुद्धा एक कामवाली बाई आहेच.
काय करता..!
तसं पाहिलं तर.. हा, फार मोठा आणि गंभीर विषय आहे. आणि, हा प्रकार नेमका कशामुळे घडतो. त्याचं स्पष्टीकरण मी खाली देत सुद्धा आहे.
काही गोष्टींना पर्याय नसतोच. माझ्या बायकोचा फोटो तुम्ही पाहिला असेलच. ती वजनी गटात मोडत असल्यामुळे. हल्ली तिला, हि सोप्या पद्धतीची अवजड कामं करता येत नाही.
( यामध्ये सुद्धा, काही गंभीर आजारपण असलेल्या महिलांना मी वगळत आहे.. )
तर... दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..
माझ्या बायकोचा स्वभाव सुद्धा माझ्यासारखा मनमोकळा. आणि, तेंव्हा वजनाने सुद्धा ती अगदी हलकी फुलकी होती. असो... तो विषय निराळा आहे.
सवयी प्रमाणे, ती आल्यागेल्याची विचारपूस करणार. कोणाही महिलेशी थांबून दोन शब्द बोलणार. हि, तिची आवड. अगदी, मनमिळाऊ आहे माझी बायडी.
तर, त्याकाळी... ( साधारण, दहा वर्षांपूर्वी )
एक, धुणीभांडी करणारी महिला. माझ्या बायकोला म्हणाली.
दीदी... तुमच्या घरी सुद्धा मला काहीतरी काम द्या कि हो..
तर, हि म्हणाली..
नको हो.. आमच्या ह्यांना ते आवडत नाही. घरातील कामं मी केली तरच यांना पटतात.
नाहीतर, ते फार रागावतात.
नंतर बोलता-बोलता.. माझी बायको, त्या कामवाल्या बाईला म्हणाली.
तुम्ही तर, दहा बारा घरची कामं करता. तीच दिवसभर तुम्हाला होत नाहीत. तर मग, अजून कशाला कामाचा जास्तीचा व्याप करून घेताय..?
तर, ती कामवाली बाई म्हणाली...
दीदी, मला कामं भरपूर आहेत हो..! पण हि लोकं, वेळेवर आमचे पैसे देत नाहीत ना..
म्हणून तर, हि सगळी उठाठेव करावी लागतेय...
हे बघा... आत्ताच मी 'त्या' घरातून काम करून आले. तीन महिने झाले, पण त्यांनी अजून मला पगार दिला नाही. आता, सांगता कोणाला..?
त्यावर...माझी बायको, भोळसरपने त्या कामवाल्या बाईला म्हणाली...
त्यांना काहीतरी 'अडचण' असेल हो.. देतील ते तुमचे पैसे, चुकवणार नाहीत. आणि, तशी वाईट लोकं पण नाहीयेत ती.
तर, ती बाई म्हणाली.. कसली 'अडचण'..?
रोज सकाळी.. यांचं घर साफ करावं,
तर... त्यांच्या खाटेखाली दारूची एक मोकळी बाटली पडलेली असतेच. तिच्या नवऱ्याला, रोज दारू ढोसायला पैसे आहेत. आणि, आम्हाला द्यायला नाहीत..!
खरोखर... हि वस्तूस्थिती आहे....
काही लोकं, मोठेपणा म्हणून घरात कामाला बाई ठेवतात. आणि, वेळेवर त्यांचे पगार करत नाहीत. त्यांची छळवणूक आणि पिळवणूक करतात..
याला, काहीच अर्थ नाहीये हो..
मी काही, फार मोठा जहागीरदार माणूस नाहीये. पण, आमच्या कामवाल्या मावशीला. आम्ही, त्यांची महिन्याची ठरलेली रक्कम तर अगदी वेळेवर देतोच.
त्याउपर, त्या मावशी अधेमधे आमच्या हिला पाच पन्नास रुपये मागत असतातच.
त्याचा मात्र, आम्ही कधीच हिशोब ठेवत नसतो.
काय करता...
उद्या... माझ्या घरात, घर साफ करताना. त्या मावशीला, चुकून दारूची एखादी रिकामी बाटली सापडली. तर, काय करता..? आणि, कोणाला बोलता...!
खरं पाहिलं तर, तसं काहीच होऊन शकत नाहीये.
कारण, त्या रिकाम्या बाटलीचा मी स्वतःच ताबडतोब बंदोबस्त करत असतो.
उगाच कशाला, आपल्या आब्रूचं खोबरं करून घ्या..?
माणूस 'मोकळा' आहे.
आणि,
स्त्री 'बांधील' आहे.
दुर्दैवाने..
हि आपली, समाजव्यवस्था आहे.
आज बऱ्याच दिवसांनी,
चिकनच्या दुकानात जाणं झालं. लोखंडी जाळीच्या पिंजर्यात, दाटीवाटीने बसलेल्या पांढऱ्या शुभ्र ब्रॉयलर कोंबड्यांची एकसारखी चिवचिवाट चालू होती.
एका सुद्धा कोंबडीला, दुसरी कोंबडी काय बोलतेय...! त्याची, अजिबात खबरबात नसेल.
इतका, भयंकर कालवा चालू होता.
पांढऱ्या रंगाला कधीच त्यागलेली... जाळीची टोपी घातलेला सय्यद. त्याच्या, दणकट बाहू आणि मनगटाच्या सहाय्याने. कळकटलेल्या, ओशट लाकडाच्या ओंडक्यावर. मन लाऊन, चिकनचे एकसारखे छोटे-छोटे तुकडे करत होता..
दुकानाबाहेर, तिरक्या नजरेने मला पाहताच.. माझ्याकडे, एक मंदस्मित मिश्रित कटाक्ष टाकत. एकाच दमात तो मला म्हणाला..
" क्या पंडित भाय, बहोत दिनो के बाद आणा हुवा...! हो गया... सब खतम हो गया क्या..?
" हो.... संपले एकदाचे सगळे धार्मिक कार्यक्रम.. आता, नेहेमीच यावं लागेल तुझ्याकडे.
" बोलो...!
" कर बाबा आपलं नेहेमीचंच...!
ए.... पंडित भायके लिये एक देड किलोकी जिंदा मुर्गी निकाल. और, कोल्ड्रड्रेस्ड बना जल्दीसे..!
हुकमाच्या ताबेदाराने, दीड किलो वजनी कोंबडीच्या मानेवर सर्रकन सुरी फिरवली. आणि, पांढरी शुभ्र कोंबडी लालभडक होऊन सय्यद समोर येऊन पडली.
" बोल... क्या करू..?
" बना ना... बिर्यानिके लिये बना...!
ठाक, ठाक, ठाक करत...सय्यदच्या सराईत हाताने. आख्या कोंबडीचे बिर्याणी साठीचे एकसारखे तुकडे केले गेले. कलेजी आणि पत्री एका वेगळ्या पिशवीत बांधली गेली.
पैश्यांची देवाणघेवाण उरकली.
आणि... ती काळी पिशवी, त्याने माझ्या ताब्यात दिली..
आता, पुढील काम माझी सौभाग्यवती उरकेलच...
अरे हो... आणि, ते सांगायचं राहिलंच कि..!
हाहाहाहा.... समजलं असेलच तुम्हाला. तुम्ही सुद्धा, आता फारच सराईत झाला आहात.
चांगभलं....!
भविष्याचा, 
ईतकाही गहन विचार करु नये.
कि, त्यामुळे...
वर्तमान, 

जगताना सुद्धा अनंत अडचनी याव्यात.

Sunday, 1 November 2015

दोन वेगवेगळ्या बाईकवर बसून,
चार मित्र जेंव्हा भटकायला निघालेले असतील. तेंव्हा, रस्त्यावर त्यांची नजर हमखास कुठे असते माहितीये..?
त्यांच्या समोरच्या बाईकवर,
एखादा राजबिंडा मुलगा असेल. तर, त्याच्या गाडीचा व्हीआयपी 'नंबर'
आणि, समोर स्कूटीवर एखादी सुंदर मुलगी असेल, तर तिची नाजूक कमनीय 'कंबर'..
ह्या दोन गोष्टी सोडून, मुलांची ( पुरुषांची ) दुरीकडे कुठेच नजर असू शकत नाही.
हे मी, छातीठोकपणे सांगू शकतो..
तर.. काहीवेळेस काय होतं..
सोबतच निघालेला...एका, बाईकवरील मित्र..
समोरून, स्कूटीवर निघालेली एखादी सुंदर मुलगी त्याच्या नजरेस पडलेली असते. तर तो, दुसऱ्या एका बाईकवर असलेल्या आपल्या मित्राला खुणवून 'तिला' दाखवतो..
बघ.. माझी चोइस कसली भारी आहे...!
आणि, नजरेनेच म्हणतो.. बघ रे, बघ.. काय सुंदर मुलगी आहे.
अशावेळी, त्या समोरच्या मित्राला सुद्धा ती मुलगी फार आवडलेली असते. त्याने सुद्धा, तिला त्याच वेळी पाहिलेलं असतं. तो सुद्धा, तिच्यावर जाम फिदा झालेला असतो. पण तो, मुद्दामच त्याच्या शरीराच्या आणि डोळ्याच्या अशा काही विचित्र हालचाली करतो.
आणि, नजरेनेच त्याला म्हणतो..
काय राव... जाउदे ना तिला. विनाकारण वाईट नजरेने पाहतोस मुलींना..
त्यावेळी,
असा सोज्वळपणा त्या मित्राच्या 'अंगी' कोठून आलेला असतो....?
याचं कोडं, मला अद्याप उलगडलेलं नाहीये..