Saturday, 7 November 2015

भर टळटळीत दुपारी... 
सायकलच्या ह्यांडलला दिवाळीच्या घर सामानाच्या पिशव्या लादून. एक मनुष्य, त्याची सायकल जीवाच्या आकांताने हाताने रेटत चालत निघाला होता. 
त्याच्या पाठीमागे, काही अंतर सोडून. त्याची भार्या, डोक्यावर कसलंसं वजनी गाठोडं घेऊन. त्याच्या मागे, धावण्या सदृश्य घाईघाईने चालत होती. 
गाठोड्या खाली असलेला, तिच्या हिरव्या साडीचा पदर. आणि, तिच्या ठसठशीत कुंकवा वरून ओघळणारे घामाचे टपोरे थेंब. डोळ्याच्या खोबणी शेजारून ओघळत, तिच्या हनुवटी वरून मानेच्या दिशेने वाहत निघाले होते. इतके कष्ट पडून सुद्धा, ती बिचारी हसतमुख होती. याचं, मला खूप नवल वाटत होतं.
सायकलच्या पाठीमागील केरियरवर, 
दोन्ही पाय, सायकलच्या पुढील नळीवर एकावर एक आडीत टाकून. सीटला धरून, त्यांचं एक सात आठ वर्षाचं मुल बसलं होतं. आणि पाठीमागून, ते त्याच्या वडिलांना म्हणत होतं..

" बाबा.. तुम्ही मला 'खायाला' का नाय घेतलं..? "
त्यावर... त्याचे वडील त्याला म्हणाले...
" बाळ्या... आरं हे सगळं, आपुन 'खायलाच' घेतलंय कि...! "  

त्या पोराला... 'खायालाच' यातील नेमका अर्थ समजला असेल कि नाही. ते मला माहित नाही. 
पण, ते पोरगं आनंदाने आपली मान डोलवत. 

त्याच्या बापाच्या हो मध्ये, हो मिसळून गेलं होतं...! 

No comments:

Post a Comment