Thursday, 28 April 2016

माझ्या ऑफिसच्या बाजूला, 
एक नवीन इमारत बांधण्याचं काम चालू आहे. विटांचा सांगाडा तयार झालाय. आता, प्लास्टरचं काम चालू आहे. त्या साईटवर कामाला असणारा, एक साठीतला मनुष्य..
रोज सकाळी.. त्या विटांच्या बांधकामावर पाणी मारण्याचं काम करत असतो. हिवाळ्यात मला त्याची खूप कीव यायची. आता उन्हाळा आहे, म्हणून काही वाटत नाही.
काही माणसाचं नशीबच खोटं असतं. त्यांना, मरेस्तोवर राबायचा शापच मिळालेला असतो.

तर.. आज तो व्यक्ती बांधकामाला पाणी मारत असताना. चुकून, त्या पाण्याचा फवारा शेजारील इमारतीच्या एका गेलरीत पडला. तिथे, अगदी त्यांच्याच वयाचे एक वृद्ध गृहस्थ राहायला होते. आणि, त्यावेळी नेमके ते सुद्धा गेलरीत उभे होते. 
त्यांच्या गेलरीत पाणी पडल्या बरोबर. व्हस्सकन, ते त्या म्हाताऱ्यावर खेकसले.

"काय रे म्हाताऱ्या, अक्कल नाहीये का तुला..! नीट पाणी मारता येत नाही का तुला..?
त्यावर शांतपणे, तो वृद्ध गृहस्थ त्यांना म्हणाला..!
"अरे म्हाताऱ्या.. मी मुद्दाम पाणी नाही टाकलं रे, चुकून पडलं बघ..!
त्या व्यक्तीचं, एकेरीतलं प्रतिउत्तर ऐकून, हा धनाड्य म्हातारा भलताच चिडला, आणि त्याला म्हणाला..!
"म्हातारा कोणाला म्हणतोस रे..? तुझी लायकी आहे का मला म्हातारा म्हणण्याची..?
त्यावर..तो गृहस्थ म्हणाला..
"अरे म्हाताऱ्या.. मला म्हातारा म्हणण्याचा अधिकार तुला कोणी दिला..? 
तू, उंची इमारतीत राहतोस, म्हणून मला काहीही बोलशील का..?  तू काय, मला खायाला घालतोस का..?

हे सगळं, मी तिथे उभं राहून पाहत होतो. त्या म्हाताऱ्या व्यक्तीचा अनावर झालेला राग मला पाहवत नव्हता. 

" मी लाचार आहे, पण कोणाचा मिंदा नाही..! "
त्याला.. फक्त हेच सांगायचं होतं. आणि, ते मला समजलं होतं..!

शेवटी, मी सुद्धा त्या भांडणात सहभाग घेतला. आणि, त्या शेजारच्या इमारती मधील काकांना म्हणालो. 
काका.. पावसाळ्यात, पावसाचं पाणी तुमच्या गेलरीत येतं, तेंव्हा तुम्ही कोणावर राग काढता हो..?
माझ्या ह्या एका वाक्यासरशी, काका निशब्द झाले. आणि गुपचूप घरात निघून गेले. 

म्हातारपण फार वाईट असतं. " गरीबाचं सुद्धा आणि श्रीमंताचं सुद्धा. " 
एकाला, सांभाळायला कोणी नाहीये. म्हणून, नाईलाजाने तो हे काम करत आहे. आणि, दुसऱ्याला सोबतीने बोलायला कोणी नाहीये. म्हणून, तो बोलण्यासाठीचा बहाणा शोधत आहे..! 

" वाह रे प्रभू तेरी अजब लीला..! "

कामगार बाबांची बाजू घेऊन बोलल्याने, ते माझ्यावर खूप प्रसन्न झाले होते. इतक्या म्हाताऱ्या वयात सुद्धा, ते.. माझे उपकार मानायला विसरले नाहीत. गरीबाचा सुद्धा कोणीतरी वाली असतो. हे अनुभवल्याने त्यांचा आनंद गगनात मानत नव्हता.

आणि.. आनंदाच्या भरात, भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत. त्यांनी, कृतज्ञता पूर्वक मला हात जोडले. हात जोडताना, त्यांच्या हे सुद्धा ध्यानात आलं नाही. 
कि.. आपल्या हातातील पाण्याचा पाईप तसाच चालू आहे. आणि, सकाळच्या पारी.. नकळतच, त्यांना सुद्धा आपादमस्तक गंगास्नान मिळालं.

आणि.. हर्ष उल्ल्हासाने, माझी " नयनगंगा " सुद्धा.. आपसूकच, वाहती झाली..!


भारतीय..

मी.. कॉंग्रेसी नाही,
पण, इंदिराजींचा सुपुत्र आहे.
मी.. भाजपीय नाही,
पण, मोदी साहेबांचा भक्त आहे.
मी.. राष्ट्रवादी नाही,
पण, पवार साहेबांचा चाहता आहे.
मी.. मनसैनिक नाही,
पण, राज साहेबांचा चेला आहे.
मी.. नांगरधारी नाही,
पण, शेतकऱ्यांचा कैवारी आहे.
मी.. शिवसैनिक नाही,
पण, बाळासाहेबांचा सच्चा शिलेदार आहे.
मी.. जयभीम नाही,
पण, डॉ.बाबासाहेबांचा खरा पाईक आहे.
मी.. क्रांतिकारी नाही,
पण, त्या त्रिमूर्तीचं रक्त माझ्या अंगात सळसळत आहे.
मी प्रामाणिक नाही,
पण.. लालबहादूर मला लाचखोर होऊ देत नाहीत.
मी.. जहाल नाही,
पण, लोकमान्य टिळक मला मवाळ होऊ देत नाहीत.
मी.. मावळा नाही,
पण, श्री छत्रपती शिवराय मला गुलाम होऊ देत नाही..
मी.. कवी नाही,
पण, अटल बिहारींना मी कदापि विसरू शकत नाही.
पण.. मी एक भारतीय आहे.
आणि, त्याचा मला सार्थ अभिमान आहे..!

~पंडित पॉटर~

Friday, 22 April 2016

स्वतःच्या घराला,
सोन्यासारखं आणि नीटनेटकं ठेवता येत नसेल...!
तर..
सोनाराकडून विकत आणलेल्या, भेसळयुक्त आणि महागड्या सोने खरेदीने.
घर, सोन्यासारखं होणार आहे का..?
समस्त स्त्री वर्गाला, कोणत्याही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जावा..! 

या मताशी, मी अगदी ठाम आहे. पुरुषांना जशी देवाची, देवीची सेवा पूजाअर्चा करावीशी वाटते. तशी, स्त्रियांना सुद्धा ती वाटत असेलच कि. किंबहुना, पुरुषांपेक्षा महिलाच जास्ती धार्मिक असतात. बरेच धार्मिक विधी त्या स्वहस्ते पार पाडत असतात. हे सुद्धा माझ्या बरेचदा पाहण्यात आलं आहे. आणि, प्रत्येक व्यक्ती आपापल्या घरी ते पहातच असेल. घरातील पूजापाठ, ह्या महिला मंडळीच करत असतात. पुरुष फक्त एक अगरबत्ती ओवाळून मोकळे होतात.
 
राहिला विषय विटाळाचा.. 
शरीराच्या ज्या भागातून, खुद्द पुरुष सुद्धा जन्म घेतो. ती जागा, अपवित्र असेलच कशी..? हिंदू संस्कृती मध्ये, योनीपूजा आणि लिंगपूजा, हा फार मोठा श्रद्धेचा भाग आहे. त्याला अपवित्र म्हणणं म्हणजे, फारच मूर्खपणाचं ठरेल..

काही वर्षांपूर्वी, हौसेखातर मी माझ्या काही मित्रांना सहकुटुंब तिरुपती यात्रेला घेऊन गेलो होतो. एकूण.. वीस बावीस लोकं आम्ही त्या धार्मिक यात्रेत सहभागी झालो होतो.
ज्या दिवशी, आम्हाला बालाजीच्या दर्शनाला जायचं होतं. त्याच दिवशी सकाळी, माझ्या एका मित्राच्या पत्नीचा नेमका ऋतुकाळ सुरु झाला. 
आज दर्शन करून, आम्ही साधारण तिसर्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघणार होतो. तोपर्यंत, त्या वहिनींचा ऋतुकाळ काही संपणार नव्हता. आणि, त्या वहिनींना बालाजीच्या मूर्तीचं दर्शन काही घडणार नव्हतं. हे आता जवळजवळ पक्कं झालं होतं. आणि, नाईलाजाने त्यांनी सुद्धा त्याकरिता होकार दर्शविला होता. अशा बाबतीत, महिला खूप समंजस असतात हो..
त्यामुळे, मित्राने त्याच्या बायकोला दर्शनाला सोबत न्यायला टाळाटाळ केली. आणि, नेमकी हि गोष्ट माझ्या कानावर आली. 

त्या मित्राला, एकाबाजूला नेऊन मी विचारलं. का रे बाबा काय गडबड आहे..? तर त्याने वरील घडलेला प्रकार मला सांगितला. त्यावर मी त्याला विचारलं, हा प्रकार आणखी कोणाला माहित आहे का..? तर म्हणाला, नाही कोणालाच माहित नाहीये. हे सगळं अजून आमच्यातच आहे. आणि, आता तुला समजलंय. पण काय आहे, आमच्यामुळे इतर लोकांना शिवताशिवत नको. म्हणून, मीच हा निर्णय घेतला आहे. आणि, तिला सुद्धा हे सगळं मान्य आहे.

हि 'आतली' गोष्ट कोणाला माहित नव्हती म्हणून बरं झालं. आणि, खासकरून कोणत्याच महिलेला माहित नव्हतं. हि फार मोठी जमेची बाजु होती. कारण, एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची फार मोठी अशुभ चिंतक असते. आणि लगेच, तिचं पितळ सर्वांसमोर उघडं करून ती दाखवत असते. राग माणू नका, परंतु हि अगदी सत्य परिस्थिती आहे. 
शेवटी, त्या वाहिनी सुद्धा आमच्या चर्चेत सामील झाल्या. आणि, त्या मला म्हणाल्या. 

" नको हो भाओजी, आम्ही बायका ऋतुचक्र काळात एकमेकींना लगेच ओळखतो..! "

शेवटी, त्या वहिनींची मी कशीबशी समजूत घातली. आणि, त्यांना दर्शनाला येण्यासाठी तयार केलं.. मी त्या मित्राला म्हणालो.. अरे एवढं मोठं देवस्थान आहे. इथे कोण कसा आणि काय करून आला असेल ते आपल्याला माहित आहे का..? आणि, पुन्हा तुझं तरी इकडे कधी येणं होणार आहे का..?
तू काहीही काळजी करू नको. वहिनींना पुन्हा एकवेळा नाहून घ्यायला सांग. आणि, निसंकोचपणे त्यांना आपल्यासोबत घेऊन चल. फारफार तर..दर्शन झाल्यानंतर मंदिरा बाहेर आल्यावर ऋतुचक्र सुरु झाला. असं इतर मैत्रिणींना त्यांना सांगायला सांग. त्यामुळे, इतर महिला सुद्धा त्यांचा हेवा करतील. आणि, तुमचं हि मन मोकळं होईल..

" बघा ना किती भारी नशीब आहे तुमचं..! दर्शन झाल्यावर तुमचा ऋतुकाळ सुरु व्हावा. कमालच झाली कि नाही. शेवटी, त्याला सुद्धा काळजी असतेच हो..! "

नेमकं मी योजल्याप्रमाणे, आमचं दर्शन आटोपलं. त्या वहिनींनी सुद्धा, मंदिराबाहेर आल्यावर काही वेळानंतर इतर मैत्रिणींना तो प्रकार सांगितला. त्यावर, नेमकी त्यांची सुद्धा तीच प्रतिक्रिया होती..
दर्शन आटोपलं, सगळं फिरणं धरणं झालं, आणि कोणालाही त्या विटाळाचा कसलाच त्रास झाला नाही. आणि, त्या दांपत्याला तर नाहीच नाही..

देवाचं काही नसतं हो. हे सगळं काही मानवनिर्मित आहे. पण एक गोष्ट आहे बरं का.

" महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश द्या. पण, त्या खरोखर धार्मिक कारणाने आल्या असतील तरच. विनाकारण, पुरुषांना आणि समाजव्यवस्थेला शह देण्यासाठी हा खटाटोप चालू असेल. तर अशा, नास्तिक स्त्री-पुरुषांना मंदिरात अजन्म बंदीच असावी..! " 
 

Thursday, 21 April 2016

काय गं.. काय, करतेयस " हनी "
बरेच दिवस झाले, तुला पत्रच लिहिलं नाही...!
परंतु आज मात्र, तुझी आठवण काही जाता जात नाहीये. बघ ना, हि रात्र कशी उरावर बसलीये माझ्या. तुला आठवतंय का गं, उन्हाळ्यात.. उकाड्याने आपल्या दोघांची खूप घालमेल व्हायची. त्यावेळी, घराच्या छतावर रात्र-रात्र गप्पा मारण्यात कशा निघून जायच्या, काही कळायचंच नाही.
तू हळुवारपणे, माझ्या केसांना जास्वंदीचं तेल लाऊन द्यायचीस. मी, नको-नको म्हणत असताना सुद्धा माझे हात पाय चेपून द्यायचीस. माझ्या पायाच्या तळव्यांना, थंड पाण्याने पुसून घ्यायचीस..
आणि, हे सगळं कशाला करत असतेस. मला सवय लागेल ना याची..!
असं म्हंटल्यावर, लाडीकपणे म्हणायचीस.
जाऊदेत.. कोणीतरी प्रेमाने काही तरी करतंय. याचं, कौतुकच नसतं कोणाला. आणि, त्या गोडगुलाबी रुसव्या फुगव्यात. शेवटी, घड्याळात पहाटेचा दोन तीनचा ठोका ऐकून आपण मुकाट घरात येऊन झोपी जायचो.
आता, मी आपल्या घरात एसी बसवून घेतला आहे, बिलकुल उखाडा जाणवत नाही. पण, तुझी सोबत नाहीये गं. त्या, गोडगुलाबी गप्पा नाहीयेत. तो मंद धुंद रातराणीचा सहवास नाहीये. टिपूर चांदण्यात, तुझ्या गोऱ्या चेहऱ्याची तेजी काही निराळीच भासायची मला. आता ते काहीच उरलं नाहीये.
रात्रीचं जागणं कधीचा विसरून गेलोय मी.
आता, मोबाईलचा गजर सकाळ झाल्याचं कळवत असतो मला.
पण.. तुझं ते रोज सकाळी हळुवारपणे माझ्या केसात हात गुंफून, अहो उठा ना..! म्हणनं,
त्याची सर कशालाच नाहीये गं. तुला आठवतंय ना गं, शी.. मी पण ना,
सारखं.. तुला आठवतंय ना, तुला आठवतंय ना..म्हणून, पुन्हा-पुन्हा तेच विचारतोय. मला माहित आहे. तू तरी, हे सगळं कशी विसरशील गं..!
कोणालाही न सांगता, लग्न करायचा गुपचूप निर्णय घेतला होता आपण. माझ्या खिशात एक छदाम सुद्धा नव्हती. आणि, तू तर चक्क लखलखीत सोन्याचं मंगळसूत्र घेऊन आली होतीस. किती हौस होती गं तुला लग्न करायची. माझं मेलं लक्षण खोटं,
थांब.. माझी जरा सेटलमेंट होऊदेत..!
हाच घोषा चालू होता माझा. तू बाई मोठ्या धीराची, राजमहाल सोडून दहा बाय बाराच्या खोलीमध्ये माझ्यासोबत राहायची तयारी दाखवलीस.
नेमकं काय पाहिलं होतंस गं तू माझ्यामध्ये..? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र माळत असताना. अचानक, तुझे डोळे पाणावले होते. मला वाटलं, तू घाबरलीस कि काय. पण, अग्नीच्या सात फेऱ्या मारताना तू माझा हात घट्ट धरून माझ्या पुढे चालत होतीस. त्यावेळी, कदाचित तो अग्नी सुद्धा तुझ्यासमोर लाजला असावा. किती मोठ्ठं धाडस होतं गं तुझ्या अंगी. मी तुझ्या रंगाचा ना अंगाचा, कशामुळे भाळली होतीस गं तू माझ्यावर..?
जाऊदेत.. मी पण ना, नेहेमी-नेहेमी तुला तेच विचारात असतो. आणि, मला सुद्धा पुन्हा-पुन्हा तुझं तेच ऐकायची सवय झाली आहे. " काही नाही रे, माझ्या वेड्या राजा..! "
खरच, वेडा होतो का गं मी..? कि, तुलाच तसं वाटत होतं. कि, तूच मला वेडं केलं होतंस..?
मला तर, काहीच आठवत नाही बघ. हो.. पण तुझ्या प्रेमात मी ठार वेडा झालो होतो. हे फक्त, मी माझं स्वतःलाच सांगितलं आहे. चक्क.. तुझ्यापासून सुद्धा हे दडवून ठेवलं होतं मी.
तू मोठ्या घरची पोर, काही नाही तर, तुला स्वतःच्या आपल्या हक्काच्या घराची फार आवड होती. पण त्याकरिता, तुला कोणाची मदत नको होती. तुझा लाखोपती बाप, तुझ्या आणि माझ्यासाठी लाल पायघड्या घालायला तयार होता. पण, तू सुद्धा स्वाभिमानी. त्याचीच मुलगी ना. ते सगळे गुण, तुझ्या रक्तात सुद्धा उतरले होते. मीच तुला म्हणालो होतो..
" ते म्हणतायेत तर.. आपण त्यांची थोडी मदत घेऊयात ना..! "
बस्स sssss माझ्या, ह्या एका वाक्यामुळे चक्क महिनाभर तू माझ्याशी अबोला धरला होतास. शेवटी हात जोडून, मी माफी मागितल्यावर तू स्वतःला त्रास करून घेतला होतास.
कोठून शिकली होतीस गं तू हे..?
तुझा तर, मला निव्वळ छंदच जडला होता. मी, हौसेने त्याला 'व्यसन' म्हणायचो. आणि त्यासरशी तुझ्या गालावर लालसर लाली चढायची. त्यावेळी, किती गोड लाजरी होतीस गं तू..
तुझ्या सहवासामुळे मी कष्ट सोसले, पण तुझ्या मनोबलामुळे आपलं घर सुद्धा झालं.
त्या.. छोट्याशा वन बी एच के मध्ये, पहिलं पावूल ठेवताना.. तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते.
मी कुठेही चुकले नाही, याची ती साक्ष होती.
त्यादिवशी, कोणीच नव्हतं ना गं आपल्या बरोबर..!
शेवटी, तूच निर्णय घेतलास.. आपल्या घरात, तिसरं माणूस सुद्धा यायला हवं.
खरं सांगतो, त्या क्षणी मी किती मोहोरून गेलो होतो. तो दिवस, माझ्यासाठी खरी मधुचंद्राची रात्र घेऊन आला होता..
जाऊदेत.. पुन्हा, तुला तो प्रणय प्रसंग आठवतोय कि नाही. असं मी मुळीच विचारणार नाही. हे सगळं वाचताना, गोडशी लाजली असशील नाही.. हं, हं लब्बाड..
मीच वेडा कुठला.. तू तर सगळी तयारी करून ठेवली होतीस. अगदी गर्भसंस्काराच्या पुस्तकासाहित. पण तुझं मात्र एकच ठरलेलं.
मी हे पुस्तक आणलंय खरं. पण तुला पाहून मला जी उर्मी येते ती ह्या पुस्तकात नाही रे. आणि एवढं बोलून, तुझी गोडशी घट्ट मिठी मला खूप मोठं स्वर्गसुख देऊन जायची.
पहाटे पाच वाजता, तुला प्रसव कळा जाणवू लागल्या. आपल्याकडे गाडी ना घोडा. खूप सोसलस गं तू. चालतच नेलं मी तुला.. थोडं थोडकं नाही. दिडेक किलोमीटर अंतर होतं गं ते.
आणि.. मी तेंव्हाच ठरवलं.. वेळ काही सांगून येत नाही. आपल्याकडे एखादी कार सुद्धा हवी आहे. असा त्रास पुन्हा नको.
त्यावेळी, डॉक्टर मला ओरडत होते..
किती बेअक्कल आहात तुम्ही. येवढ्या अवघडलेल्या बाईला तुम्ही चक्क चालवत आणलत..?
तरी सुद्धा, तु डॉक्टरांना म्हणत होतीस.
डॉक्टर.. " त्याच्यावर रागावू नका हो. तो जीव आहे माझा..! "
तुझ्या प्रसव वेदना पराकोटीला गेल्या होत्या. घाईघाईने, त्यांनी तुला स्ट्रेचरवर टाकलं. ऑपरेशन थियेटरचा दरवाजा झटकन उघडला, आणि ताबडतोब लावला सुद्धा गेला. दरवाजाबाहेर बंद असणारा लाल दिवा, मला अनाहूत भीती दाखवत होता. तासाभराने, डॉक्टर बाहेर आले..
आणि, माझ्या खांद्यावर हात ठेवून ते निघून गेले.
मला काहीच कळेना, मी आतमध्ये गेलो. तू शांत झोपली होतीस. नर्सच्या हातामध्ये, आपली चिमुरडी होती. तिने, अलगद ती चिमुरडी माझ्या हातामध्ये देताना. तुझ्याकडे पाहत..
शी इज नो मोअर..!
म्हणत, ती तेथून निघून गेली.
का फसवलंस गं मला..? हा अधिकार तुला कोणी दिला..?
आपलं ठरलं होतं ना.. एकमेकांना कधीच अंतर द्यायचं नाही म्हणून. का केलंस तू असं, तू एवढी नाजूक आहेस हे मला कळालं असतं. तर संपूर्ण आयुष्य मी 'वांझोटा' म्हणून साजरं केलं असतं. का फसवलंस गं तू मला..
ए.. तुला माहित नाहीये, पण त्यावेळी मी रडत असताना. ती तान्हुली माझ्याकडे पाहून हसत होती. आणि त्यात, मला तुझी छबी दिसत होती. नियतीने माझी फार मोठी थट्टा चालवली होती.
अरे, हो.. बोलता-बोलता तुला एक सांगायचं विसरूनच गेलो. मी, कार घेतलीय बरं का..! पण अजून, मी तिच्यात बसलो नाही. आणि, कधीही बसणार नाही. मला तू सोबत हवी होतीस गं. नाही बसणार मी. कधीच नाही बसणार...
जाऊदेत.. मी पण ना..!
ए.. पहिले तुझ्या डोळ्यात आलेले अश्रू पूस पाहू. आणि, एकदा गोड हास पाहू, हसलीस ना..
येस्स.. येस्स..धिस इज लाईक अ गुड गर्ल..
तुला माहिती आहे का, आपली चिमुरडी सुद्धा आता डॉक्टर झाली आहे.
हो..हो, गायनेक स्पेशालीस्ट झाली आहे ती. तुझ्यासारखं कोणालाच ती आडू देणार नाही. आणि, अकाली जाऊ सुद्धा देणार नाही. अशी शपतच घेतली आहे तिने.. प्रत्येक गर्भवती मध्ये, आपल्या आईला पाहत असते ती.
पण.. एक गोष्ट तुला माहित आहे का गं, मी आजच तुला हे पत्र का लिहायला घेतलं आहे..?
नाही ना.. तर ऐक,
उद्या, लग्न आहे आपल्या बच्च्याचं. मुलगा फार मोठा सर्जन आहे. हो.. तिनेच निवडलाय त्याला. माझ्यासारखाच गुलाम आहे साला तिचा.. चांगला आहे मुलगा,
तिचे हात एकदाचे पिवळे करतो.. म्हणजे, माझ्या जबादारीतून मी मोकळा झालो. काय करणार, तू तर तुझी जबाबदारी वेळेच्या अगोदरच झटकून मोकळी झालीस ना..
ह्या एकाकी जीवनाला, मी सुद्धा आता फार कांटाळलो आहे गं. तू सुद्धा, आता तिथे एकटीच असशील ना, माझी वाट पाहून खूप ताटकळली असशील नाही.
एवढं एक काम उरकतो, आपल्या बच्च्याला तिच्या मार्गी लावतो. म्हणजे, मी मोकळा झालो, तुझ्याकडे यायला.
ए.. पण मी तुझ्याकडे आल्यावर तू मला ओळखशील ना. कारण, पूर्वी होतो तसा नाही दिसत गं मी आता. थकलोय मी, तुझ्या विरहाने झुरलोय मी..
पण माझं मन सांगतय मला, तू नक्की ओळखशील मला. आणि तितक्याच त्वेषाने आलिंगन सुद्धा देशील मला.
देशील ना.. लवकरच येतोय मी,
तुझाच, लाडका " मून " 

Wednesday, 20 April 2016

तसं तर..
इंग्रजी भाषेमध्ये, कोनीही जुजबी संभाषण करू शकतो. परंतु, नुसत इंग्रजीमध्ये बोलता येऊन काहीच उपयोग नाहीये. त्या बोलण्यात, एकसारखी विजेची चपळाई फार महत्वाची असते.
इंग्रजीत.. किंवा, आपली मातृभाषा सोडून.. इतर कोणत्याही नवख्या भाषेत संभाषन करतेवेळी, मनामध्ये सावकाशपने विचार करुन बोलायची संधी प्रत्येकाला मिळत असते. त्यामुळे, थोडासा आवंढा गिळून बरेच जन सफाईदारपने इंग्रजी किंवा इतर भाषा बोलताना आपल्याला पाहायला मिळतात.
परंतु.. माझ्या मते इंग्रजीचा खरा संभाषक तोच..

जो.. " इंग्रजीमध्ये संभाषन करत जोरजोरात भांडु शकतो "

कारण, भांडन करत असताना. आपल्या बोलन्याचा फ्लो फार मोठ्या प्रमानात वाढलेला असतो. मोठमोठी वाक्य आणि अवघड शब्द टाकून समोरच्या व्यक्तीला आपल्याला नेस्तनाबूत करायचं असतं. त्यावेळी, फटाफट वाक्यरचना तयार करुन आपल्याला व्यक्त व्हायचं आसतं. आणि, त्या भाषेवर आपली मजबुत पकड नसली. कि, आयत्यावेळी बोलताना आपली भंबेरी उडुन जाते. अचानक, बोलायला काहीच न सुचल्याने आपण जागेवर म्युट होऊन जातो.

विचार करून बघा,आपल्या मातृभाषेतून भांडण करत असताना असं कधीच घडत नाही. आणि शेवटी, नाईलाज म्हणून..
आपण, त्यावेळी इंग्रजी किंवा तत्सम कोणतीही भाषा सोडून. आपण, आपल्या मायबोलीत भांडायला सुरवात करतो. त्यावेळी, ती भाषा समोरच्या व्यक्तीला समजतेय कि नाही. याचा सुद्धा आपण विचार करत नसतो. कारण, आपला रेटा आपल्याला पुढे चालवायचा असतो.

म्हणून.. अवगत असलेल्या भाषेमध्ये सफाईदारपने जो व्यक्ती भांडन करु शकतो. त्यानेच त्या भाषेवर प्रभुत्व मिळवलेलं असतं. असं मानायला काहीच हरकत नसावी.

Monday, 18 April 2016

कही, नजर ला लग जाये...

नजर लागणे.. हा प्रकार, किती खरा आणि किती खोटा आहे. ते मला माहित नाही, पण आमच्या इथे एखाद्या घरातील लहान मुल विनाकारण रडत असेल. आणि, लाख औषधी उपाय करून देखील ते जेंव्हा त्याचं रडणं थांबवत नसायचं. तेंव्हा, त्याला कोणाची तरी नजर लागली असावी..! 
असा निष्कर्ष काढला जायचा. मग त्याकरिता, निरनिराळ्या उपाययोजना सुद्धा आल्याच. 
माझ्या पाहण्यात आलेल्या काही उपाययोजना पुढीलप्रमाणे.

नजर लागलेल्या त्या संभाव्य लहान मुला-मुलीला मावळत्या बाजूला तोंड करून बसवलं जायचं. आणि.. जाडं मीठ, त्याच्या किंवा तिच्या डोक्यावरून खाली पायाच्या भागापर्यंत हवेतल्या हवेत त्याच्या अंगावरून उतरवून टाकलं जायचं. तर कधी, तांदूळ उतरवून टाकले जायचे. तर कधी, खाऊच्या पानाला एका बाजूला तेल लावून ते उतरवून जळत्या निखाऱ्यावर ठेवलं जायचं. तुरटी उतरवून, तिला चुलीतील निखाऱ्यावर ठेवलं जायचं. तर कधी, साडीचा पदर पाच वेळा उतरवून त्याला गाठ मारून ठेवली जायची. 
असे विविध प्रकार, त्यावेळी मला पाहायला मिळाले होते. या गोष्टींमध्ये किती तथ्य होतं. ते मला माहित नाहीये.. पण, हे उतारे केल्यावर बरेचदा त्या लहान मुलाला गुण आलेला मला पाहायला मिळाला होता. त्याच्यामागे, नेमकं कोणतं गुपित दडलेलं असायचं. तो संशोधनाचा विषय ठरवा.

घर, दुकान किंवा अन्य व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आपल्या व्यवसायावर किंवा घरावर कोणाची वाईट, काळी नजर लागू नये. म्हणून, काही मंडळी बऱ्याच उपाययोजना करताना आढळत असतात.
त्यातल्या त्यात.. सगळ्यांना माहित असणारा प्रमुख उपाय म्हणजे.. 
" लिंबू मिरची..! "
आजकाल.. शनिवारी आणि अमावास्या, पौर्णिमेला चौकाचौकात एका तारेमध्ये किंवा दोर्यामध्ये लिंबू मिरची ओवून त्या विकताना काही मंडळी दिसत असतात. आता, हा लिंबू मिरची दुचाकी किंवा चारचाकी वाहनांना लावल्याने नेमका काय फरक पडत असतो..? ते, मला माहित नाहीये. 
पण.. कधी-कधी, हौसेखातर मी सुद्धा हा प्रयोग करत असतो. 

त्यापुढे जाऊन काही मंडळी, आपल्या घरामध्ये आढ्याला " कोहळा " सुद्धा बांधत असतात. 
असं ऐकिवात आहे. कि, आपल्या घरावर किंवा घरातील मंडळीवर चुकून काही नजरबाधा झाली. तर, हा कोहळा जागेवरच सडून जातो. आपल्या घरावर येणारं ते सगळं संकट त्याकडे आकर्षित होत असतं. अगदी ताजा, आणि बिनडागी कोहोळा सुद्धा काही दिवसातच सडलेल्या अवस्थेत मी पाहिला आहे. नाहीतर, तोच कोहोळा महिनोन्महिने जागचा हालत सुद्धा नाही. 
यापाठीमागे.. नेमकं काय शास्त्रीय कारण असावं..? किंवा आणखीन काय गणित असावं. हा संसोधनाचा विषय आहे. पण.. काहीतरी कारण नक्कीच आहे. 
हे झालं.. आपल्या महाराष्ट्र किंवा पुण्यापुरता मर्यादित असा तोडगा.

तसा तर.. मी फार फिरस्ता मनुष्य असल्या कारणाने. भारतातील बऱ्याच ठिकाणी माझी पायधूळ मी झाडून आलो आहे. हल्लीच कारवारला गेलो असता. त्या भागामध्ये, प्रत्येक घरावर, दुकानावर आणि काही नारळांच्या आंब्याच्या झाडांवर सुद्धा डोळ्याचं चित्र काढलेलं. किंवा, चौकोनी प्लायवूडवर काढलेलं डोळ्याचं चित्र तिथे लटकावलेलं पाहायला मिळत होतं. अर्थातच, हे सगळं निव्वळ नजर लागू नये. म्हणून केलेली उपाययोजना होती.

परंतु, ह्या विषयावर.. गाढा आणि सखोल अभ्यास करत असताना. मला, भारतातील एका भागामध्ये या विषयाची फारच काटेखोरता पाहायला मिळाली. ते गाव म्हंजे..
" तिरुपती "     
तामीळनाडू मधील बालाजी देवस्थानच्या पायथ्याला असणाऱ्या या गावामध्ये. नजर लागू नये म्हणून, त्याकरिता.. नवनवीन क्लुप्त्या लढवताना मला पाहायला मिळाल्या.

रोज संध्याकाळी, लिंबाच्या दोन भकल्या करून त्या लिंबाच्या दोन्ही भागावर कुंकू लावून त्यावर एक कापूर ठेवून त्याला प्रज्वलित करून आपल्या घरावरून किंवा दुकानावरून ओवाळून उंबर्यापाशी ठेवलं जातं. किंवा, फायबर पासून बनवलेल्या राक्षसी चेहेऱ्याला तारा मासा, शंख आणि सोबतच एक विशिष्ट फळ आणि तुरटी अशी गुंतवण करून त्याला दरवाजात अडकवून ठेवलेलं आढळतं. तर कधी. कोहळा, लिंबू मिरची आणि त्याचबरोबर कोरफड सुद्धा घरांमध्ये उलट्या करून बांधलेल्या आढळतात. 
अमावास्या असली, कि एक वेगळाच प्रकार त्या भागात केला जातो.
कोहोळ्याला देठाकडील बाजूने ( कलिंगड पिकलेलं किंवा लालभडक आहे कि नाही, ते पाहण्यासाठी एक चौकोनी काप कापला जातो. )  तसा, त्या कोहोळ्याचा एक तुकडा काढला जातो. आणि त्यामध्ये, त्या ठराविक भागातील लालभडक कुंकू त्या पोकळी मध्ये भरलं जातं. आणि, कुंकू भरल्या नंतर. त्या पोकळीत, चाकूने दोनचार वेळा खुपसण करून ते कुंकू त्या आतील गाभ्यात एकजीव केलं जातं. त्यानंतर, तो चौकोनी तुकडा होता त्या जागेवर लाऊन त्या कोहोळ्याला दुकानाच्या किंवा घराच्या उंबर्या समोर जोरात आपटलं जातं. 
तो फुटलेला कोहळा जेंव्हा इतस्ततः विखुरला जातो. तेंव्हा, तो अगदी रक्ताळल्या सारखा दिसत असतो. असं केल्याने सुद्धा, वाईट नजरबाधा होत नाही. असा तिथे समज आहे..

ह्या विविध प्रकारच्या उपाययोजना करून, नेमकं काय इप्सित साध्य होत असतं. ते त्यांनाच ठावूक, पण काही मंडळी या गोष्टी अगदी कटाक्षाने पाळत असतात. हा, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. परंतु, 

अशा विविध गोष्टी आणि घटनांनी घडलेला माझा भारत देश महान आहे.

Tuesday, 12 April 2016

विवाहीत स्त्री पुरुषांमधील परस्पर आकर्षन तेंव्हा संपतं..!
जेंव्हा..
मानसाला 'पोट' सुटतं.
आणि,

बाईचं 'अंग ' वाढतं.
जीवन मरणाचा प्रश्न " अचूक " आहे...
म्हणुन,
हा जन्मच..
एक,
फार मोठी " चूक " आहे...?
नेता असो किंवा अभिनेता..
हा व्यक्ती,
कितीही खराखुरा, आणि धायमोकलुन जरी रडला.
तरी तो..
" अभिनयच " वाटतो...!
सांग रे वेड्या मना..! 
आता, मी काय ऊरावी..?

निज तुला द्यावी,
कि..
रात्र मी झुरावी..?
वणवा..

माथ्यावर चंद्र,
चांदन्यांची बरसात होती.
चिमण्यांचा चिवचीवाट,
वटवाघळांची साथ होती.

मी एकटाच होतो,
तिचा लवलेशही नव्हता साधा.
भुतकाळात मी रमलो,
कि खरेच होती ती भुतबाधा.
नव्हताच भास मुळी तो,
मज स्पर्श झाला होता तिचा.
ती आसवांनी भिजली,
मी नाहलो चिंब ओला पिसा.
ओलेत्याने ती अन मी हि,
अंगी उष्णतेचा वनवा पेटला.
त्या अग्नी ज्वाळेमध्ये,
तोल दोघांचाही सुटला.
कारवारी भटकंती ( भाग :- पाच )
========================
कारवारी किंवा कोकणी माणसाचं प्रमुख अन्न म्हणजे भात. आणि त्यातल्या त्यात, खासकरून म्हणजे उकडा तांदूळ. रोजच्या जेवणात, भाजी पोळी असा प्रकार तिथे फारसा पाहायला मिळत नाही. तर मग, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी हा खूप दूरचा विषय झाला. या भागात, तांदळाचीच भाकरी केली जाते. चपाती म्हणाल, तर तांदळाच्या पिठापासून बनवलेली लुसलुशीत घावनं तुम्हाला पाहायला किंवा खायला मिळतील. आजवर, मी बऱ्याच मॉल

मध्ये हायजेनिक ह्या नावाखाली लालसर रंगाचा बाटलीबंद तांदूळ पाहिला होता. पण, याचं मूळ नेमकं काय आणि कसं असतं..?
ते मला, यावर्षी कारवारच्या भेटीदरम्यान पाहायला मिळालं.


माझ्या मित्राच्या मामाची कारवारमध्ये एक तांदूळ मिल आहे. त्याचबरोबर, खोबर्याचं तेल काढण्याचा घाना आणि मिरची वाटप यंत्र सुद्धा त्याठिकानी मला पाहायला मिळालं.
उकडा तांदूळ बनवण्याची प्रक्रिया तशी फार मोठी आहे. शेतात उगवलेला भात, साळून पोत्यामध्ये एकत्र भरला जातो. आणि, त्याचा तांदूळ बनवण्याकरिता अशा मिलमध्ये आणला जातो.
सुरवातीला, मोठ्या लोखंडी काईलमध्ये हा तांदूळ काठोकाठ भरला जातो. आणि त्यात, अंगभर पाणी सोडलं जातं. नंतर त्या काईलीला, खालून जाळ लावला जातो. आणि, ठराविक एका वेळेपर्यंत त्या भाताला काईली मध्ये वाफवून घेतलं जातं.
दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच, त्या भाताला काईल मधून बाहेर काढलं जातं. शेणाने सारवलेल्या जमिनीवर, त्याला सुखवन्या करिता पसरवलं जातं. हि सगळी प्रक्रिया, वाचताना जितकी सोपी वाटतीये तितकी सोपी मुळीच नाहीये.
आणि हा सुकलेला भात, त्यानंतर मशीन मध्ये टाकला जातो. तेंव्हा त्यावरील टरफल निघून जातं. हि प्रक्रिया सलग दोन वेळा करावी लागते. तेंव्हा कुठे तो तांदूळ खाण्यालायक होतो.
या तांदळा पासून, सुंदर अशी पेज बनवली जाते. खिरी सदृश्य दिसणारा हा पदार्थ खूपच स्वादिष्ट आणि त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा असतो. खास करून, आजारी व्यक्ती किंवा तोंडाला चव येण्याकरिता हा द्रव पदार्थ खूपच लाजवाब असतो.
समाप्त..

Sunday, 10 April 2016

कारवार भटकंती, ( भाग :- तीन )
====================
कारवार, गोवा किंवा समुद्रकिनारा हा माझा फार मोठा विक पोईंट आहे. परंतु, या खेपेला मला समुद्रातील खाऱ्या पाण्याला अंगावर झेलायची हौस काही भागवता आली नाही. कारवार मधील समुद्रकिनारी, नव्याने उभारलेला मच्छी बाजार. थोडा ऐसपैसच वाटत होता. कारवार शहराच्या मध्यवस्ती मध्ये असणाऱ्या जुन्या मच्छी बाजारात. कमी जागेमध्ये, फार मोठा चिवचिवाट चालू असायचा. तो मात्र मला इथे ऐकायला मिळाला नाही. बाजारात फिरत असताना अधूनमधून समुद्राची सुंदरशी गाज तेवढी ऐकू येत होती.
त्याच कोळीणी, पण ह्या नवीन जागेमध्ये मला त्या सुद्धा अगदी नवीन आणि फ्रेश वाटत होत्या



. बाजारात हौस म्हणून फोटो काढत फिरत असताना..
यावेळी सुद्धा, त्या कोळणी महिलांचं पुन्हा तेच बोलनं मला ऐकावं लागलं.

" ओगीत फोटो किद्या खाट्टा... थोडे नुस्ते घे रे विकत..! " ( नुसता फोटो काय काढतोस रे. काहीतरी विकत पण घे ना. )
आणि, त्यावर माझं सुद्धा ठरलेलं तेच उत्तर..
" हय गॉ, घेता हाव नुस्ते... तू ते नुस्ते माका तुगेल्या घरात कन्न घालतले..??? " ( हो, हो घेतो मी मासे. पण ते, मला तुझ्या घरी बनवून देणार का..? )
माझ्या ह्या उत्तरावर, त्या कोळणी सुद्धा खळखळून हसल्या. आणि..
" अमृत हॉटेलात वच, थय तुका जाय ते मेळतले..! " ( अमृत हॉटेलमध्ये जा तुला तिकडे सगळं काही मिळेल..! ) हे प्रतिउत्तर सुद्धा मला ऐकायला मिळालं.
मच्छी बाजारातील भटकंती मला फार आवडते. माशांचा ओशट वास, घासाघीस करून मासे खरेदी करणारे ग्राहक, विजेच्या चपळाईने मासे सोलून त्याचे सुरेख तुकडे करणाऱ्या त्या कोळणी, हे सगळं पाहणं म्हणजे माझ्यासाठी ती एक फार मोठी पर्वणीच असते. यावर्षी मच्छी बाजारात मला एक वेगळ्याच प्रकारचा मासा पाहायला मिळाला. त्याचं नाव " मूळगिरी " मासा. गोल चेंडूला चहुबाजूने काटे खोचल्या सारखा हा माशाचा प्रकार दिसायला जरी विचित्र असला. तरी चवीला मात्र झकास असणार आहे. त्यात काडीमात्र शंका नाही. जास्ती खोलात चौकशी केली असता समजलं. कि या माश्याच्या टोकदार काट्यांचा काही कालावधी आणि प्रक्रीये नंतर पाटीवरील पेन्सिल सारखा सुद्धा वापर केला जातो. आता, ह्या गोष्टीत किती सत्यता आहे. ते त्या कोळणीनीलाच माहिती. निसर्गाने आपल्याला खूप काही दिलं आहे. परंतु.. ते पाहायला आणि समजायला आपल्याकडे तेवढी कुशाग्र बुद्धी मात्र नक्कीच असायला हवी..
क्रमशः 
कारवार भटकंती, ( भाग :- चार )
====================
वरील चित्रात दिसत असणारं हे ठिकाण म्हणजे. कोकणी किंवा कारवारी व्यक्तीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. हा काही एक साधारण ओटा नाहीये. तर हा एक प्रकारचा मल्टीपर्पज असा कट्टा आहे. ह्या ओठ्या



वर धुणीभांडी तर केली जातातच, पण त्याचबरोबर..
कोकणी किंवा कारवारी माणूस..

हा मत्स्य आहाराचा भलताच शौकीन माणूस आहे. यांच्यासाठी बाजारात मिळत असणारे महागडे मासे काहीच कामाचे किंवा आवडीचे नसतात. यांना हवी असते, त्या-त्या भागातल्या समुद्रात किंवा खाडीमध्ये मिळत असणारी स्थानिक मासळी.
हा कोकणी व्यक्ती किंवा महिला, सकाळीच मच्छी बाजारात मासळी खरेदी करिता जात असतात. किंवा, बंदर लांब असेल तर. आपल्या वाडीमध्ये टोपलीत मासे घेऊन विक्रीसाठी येणाऱ्या कोळणीची तरी ते आतुरतेने वाट पाहत असतात.
बाजारात हवी तेवढी आणि आवडीची मच्छी जरी मिळत असली. तरी, वाडी वस्तीवर येणाऱ्या कोळणीकडे मोजकीच मच्छी असते. त्यामुळे, त्याठिकाणी मासे खरेदी करण्या करिता अगदी झुंबड उडालेली पाहायला मिळते. शिवाय, भाव ताव करून आपल्या पसंतीची मच्छी खरेदी करणाऱ्या व्यक्तीला. घोडा मैदाम मारल्याचा आनंद मिळत असतो.
त्यानंतर, ते मासे घरी नेवून. घराबाहेर असणाऱ्या या खडबडीत ओठ्यावर मस्त पैकी मासे चोळून त्याचे खवल काढले जातात. आणि, त्यांना स्वच्छ सुद्धा केलं जातं. पूर्वीच्या काळात, मासे स्वच्छ करण्याकरिता प्रत्येक घराबाहेर एक विशिष्ट असा मोठा आणि चपटा दगड ठेवलेला आढळायचा.
नाही म्हणता, काही ठिकाणी अजून सुद्धा ते दगड पाहायला मिळतात. पण नव्याने बांधलेल्या घरांमध्ये हे अशा प्रकारचे ओठे बांधलेले पाहायला मिळतात. तेच हो.. दुधाची तहान ताकावर. पण कोकणात किंवा कारवारात प्रत्येक घराबाहेर तुम्हाला हे ठिकाण नक्की आढळणारच बरं का.
यावर्षी सुद्धा, माझ्या मित्राच्या घरी अगदी स्पेशल कारवारी पाहुणचार झोडपला. सकाळी न्याहारीला घावनं, चटणी आणि दुपारच्या जेवणात माश्याची खुमासदार आमटी आणि भात. आणि त्यासोबत, तळलेल्या माशाचा तुकडा. हे सगळं जेवण फक्त आणि फक्त हिरव्यागार केळाच्या पानावर वाढलेलं होतं. स्वर्ग म्हणजे, दुसरं काय असतं हो..
क्रमशः 

Friday, 8 April 2016

कारवार भटकंती, ( भाग :- दोन )
======================
कारवारमधील उळगा या गावी निराकार देवाच्या यात्रेला मी यावर्षी गेलो होतो. यात्रेदरम्यान, कारवारच्या विविध वाड्या वस्त्यावर घरोघरी एक विशिष्ट पदार्थ बनवला जातो. त्यालाच, देवाचा प्रसाद असं सुद्धा म्हंटलं जातं. कारण, आवड म्हणून हा पदार्थ एरवी कोणी बनवत नसतो. ह्या पदार्थाची खरी लज्जत, हि या यात्रेच्या काळात


च असते.
घरामध्ये, नाश्त्याला आपण इडली बनवण्याकरिता ज्या मिश्रणाचा वापर करत असतो. साधारण तशा प्रकारच्या पात्तळ पिठापासून हा लज्जतदार पदार्थ बनवला जातो. त्या पदार्थाला ह्या भागामध्ये " हिट " ह्या नावाने ओळखलं जातं.
हा पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी सामुग्री म्हणजे. इडलीचं तयार मिश्रण, फणसाची चार मध्यम आकाराची पानं आणि नारळाच्या पानाच्या काट्या.
फणसाच्या चार पानांना, अधिक चिन्हासारखं एकमेकात विशिष्ट प्रकारे गुंफून घेतलं जातं. त्यानंतर, त्या पानांपासून विशिष्ट अशा आकारमानातील एक पोकळ मोदक तयार केला जातो. पोकळ मोदकाच्या वरील बाजूस असणारी पानाची देठं कापली जातात. फक्त, त्यातील एका पानाचं देठ मात्र ठेवलं जातं. हे सर्व कशासाठी तर, देठ कापल्यामुळे त्या पोकळ मोदकात इडलीचं मिश्रण विनासायास भरता येतं. आणि एका पानाचं देठ ठेवल्यामुळे, त्या भरीव किंवा पोकळ मोदकाला वरील बाजूने अलगद उचलता सुद्धा येतं.
तर.. प्रथम, ह्या फणसाच्या पानाच्या तयार मोदकामध्ये इडलीचं जाडसर मिश्रण ओतलं जातं. आणि त्यानंतर, ह्या मोदकांना उकड पात्रामध्ये वाफेवर उकडून घेतलं जातं. आणि, हे इडली मोदक किंवा हिट तयार झाल्यावर. काबुली चना आणि वाटाण्या पासून बनवलेल्या मसालेदार कुर्म्याबरोबर. किंवा,ओल्या नारळाच्या दुधापासुन बनवलेल्या रसाबरोबर पाहुण्यांना हा प्रसाद खायला दिला जातो.
खूपच लज्जतदार आहे हा पदार्थ, एकदा तुम्ही सुद्धा नक्की करून पहाच.
क्रमशः 

Thursday, 7 April 2016

कारवार भटकंती, ( भाग :- एक )
======================
यावर्षी कारवारमध्ये येण्या मागचं मुख्य कारण म्हणजे. त्या भागात सुरु झालेला यात्रेचा हंगाम. आम्ही खास याच गोष्टीचं औचित्य साधून कारवारला गेलो होतो. या हंगामात माझे मित्र, श्री. राहुल नाईक यांच्या गावची सुद्धा यात्रा होती. सालाबादप्रमाणे, यावर्षी सुद्धा सत्तावीस मार्च रोजी कारवार मधील उळगा या गावी श्री निराकार देवाचा वार्षिक जत्रोत्सव होता.
उळगा हे गाव अगदी लहान खेडं आहे. परंतु सगळ्या गोष्टी आणि गरजांनी सुसज्ज आणि परिपूर्ण असं गाव मला पहिल्यांदाच पाहायला मिळालं. गावामागे, निर्मळ खळखळत्या आवाजात वाहणारी काळी नदी. नेत्रांना सुखद अनुभूती देत होती.


जागोजागी असणारी नारळी, आंब्या पोफळीची झाडं. त्या गावाची शोभा वाढवत होती. छोट्याशा गावामध्ये असणारं इंजिनीअरींग कॉलेज आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र पाहून मी तर अगदी चक्रावून गेलो होतो. प्रगतीचा बराच मोठा आलेख या गावाने उंच शिखरावर नेऊन ठेवलेला मला आढळला.

त्या टुमदार गावामध्ये असणारी तुरळक लोकवस्ती. बऱ्याच बंद घरांना असणारी कुलपं त्याची साक्ष देत होती. नोकरी निमित्त, पुण्या मुंबईला गेलेला चाकरमानी अशावेळी आपल्या गावी हमखास आपली हजेरी नोंदवताना आढळत होता. उभ्या उभ्याच थांबून, एकमेकांना त्यांच्या सुमधुर कारवारी भाषेत विचारपूस करताना पाहायला मिळत होतं.
तशी तर या गावातील मंडळी, पूर्वी गोव्यातील काणकोण या गावी वास्तव्याला होते. परंतु, पोर्तुगीज लोकांच्या जुलमाला आणि धर्मांतराला कंटाळून. गोव्यातील बऱ्याच कोकणी बांधवानी आसरा मिळेल त्याठिकाणी जाणं पसंत केलं होतं. तसं पाहायला गेलं तर, या गावातील लोकांचं मूळ कुलदैवत हे गोव्यातील मल्लिकार्जुन आहे. परंतु, गाव आहे तर देव हवाच. या उक्तीप्रमाणे, त्यांनी या नवीन गावामध्ये नवीन देवाची स्थापना केली.
मंदिराच्या गाभाऱ्यात मधोमध असणारी फणसाच्या चौकोनी लाकडापासून बनवलेली हि देवाची मूर्ती निराकार आहे. म्हणजे तिला कोणताच आकार नाहीये. म्हणून ती निराकार, पण हल्ली त्या लाकडाच्या चौकोनी खांबाला देवाचा एक चांदीचा मुखवटा सुद्धा बसवण्यात आला आहे. त्यामुळे, श्रद्धाळूंसाठी ती एक फार मोठी पर्वणी ठरत आहे. यात्रेनिमित्त या छोट्याश्या मंदिराबाहेर, हार फुलांची आणि खाजा नावाच्या कोकणी मिठाईची दोनचार दुकानं थाटलेली पाहायला मिळतात. त्या दोन दिवसात, सगळे चाकरमानी आणि गावकरी अगदी आनंदात न्हाऊन गेलेले असतात.
यात्रेदरम्यान, दरवर्षी अदलून बदलून गावातील प्रत्येक घराला मंदिरातील 'गुरव' होण्याचा मान प्राप्त होत असतो. त्यामुळे, गुरव होणाऱ्या घरात त्यावर्षी फार मोठी जबाबदारी ठरलेली असते. मंदिरातील पूजाअर्चा आणि इतर खर्चांबरोबरच, रात्री करमणूक म्हणून होत असलेल्या नाटक कंपनीचा खर्च सुद्धा हौसेखातर त्यांनाच उचलावा लागत असतो. तसा तर हा ऐच्छिक मामला असतो. तरी सुद्धा, यजमानपद भूषवणारं घर हा खर्च अगदी आनंदाने उचलत असतात. यामध्ये, त्या गावाच्या एकोप्याची फार मोठी साक्ष दडलेली आहे. या निमित्ताने, एका आगळ्या वेगळ्या संस्कृतीचे दर्शन मला याची देहा पाहायला मिळालं.

क्रमशः 

Wednesday, 6 April 2016

मध्यंतरी.. घराबाहेर कसला तरी आरडाओरडा चालू होता.
मोठमोठ्याने मारामारीचा आणि किंचाळण्याचा आवाज येत होता. तशी तर भांडणं पाहायला, किंवा करायला सुद्धा मला बिलकुल आवडत नाही. भांडण म्हंटलं, कि माझ्या अंगावर अगदी काटाच येतो.
पण.. नेम काय घडतंय ते पाहायला मी गेलरीमध्ये आलो. तर, नेमकी स्ट्रीट लाईट बंद होती. शेवटी, सगळा पोशाख अंगावर चढवून मला जिना उतरून खाली जावं लागलं.
अंधारामुळे काही दिसत नव्हतं. पण एक आडदांड मुलगा एका नाजूक मुलीला भयंकर मारझोड करत होता. अंधार असून सुद्धा, समोरचं दृश्य फक्त कानाने ऐकूनच असं वाटत होतं, आपण मध्ये पडून ती भांडणं मिटवावी. पण, रागाच्या भरात त्या व्यक्तीने आपल्याल्या ठोकलं तर..? नवीन वादाला तोंड फुटायची शक्यता नाकारता येत नव्हती. आणि हमखास असं घडतंच हे तुम्ही सुद्धा ऐकून किंवा जाणून असाल..
असो.. तर त्या गर्दीमध्ये न पडता. मी तिथे असणाऱ्या माझ्या मित्रांना हा काय प्रकार चालू आहे, ते विचारलं. आणि, घडलेली हकीकत ऐकून मी अगदी सैरभैर झालो.
तसं पाहिलं तर, हा विषय काही खास नव्हता. आणि, तसं पाहायला गेलं तर. हा विषय तितकाच गंभीर सुद्धा होता. नवऱ्याच्या हातून मार खात असणाऱ्या त्या तरुणीने..
" चक्क, शुद्ध हरपे पर्यंत मदिरा प्राशन केली होती..! "
त्यामुळे, तिचा नवरा तिला गुरासारखा बडवत होता. आणि, ती बिचारी मार वाचवण्यासाठी फुकाचे प्रयत्न करत होती. इथे तिथे लपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. आज तिचा कोणीच वाली नव्हता. त्यात.. आगीत तेल म्हणून, काही महिला सुद्धा त्या मुलाला तिला मारण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. त्या मुलीवर फार मोठं संकट कोसळलं होतं. तिने, भारतीय रितीरिवाजाला अनुसरून फार मोठा गंभीर गुन्हा केला होता. असह्य मारामुळे, तिचं ते गुरासारखा हंबरडा फोडनं मला तरी ऐकवत नव्हतं.
आपल्यावर फार मोठं संकट कोसळल्यावर, आपण 'बापरे' म्हणतो. किंवा, आपण बापाची आठवण करत असतो, आईची नाही. याची मला त्यावेळी पुन्हा एकदा प्रचीती आली.
मद्यधुंद अवस्थेत सुद्धा.. ती मुलगी, तिच्या वडिलांच्या नावाचा पप्पा ss , पप्पा ss , पप्पा ss म्हणून धावा करत होती. आणि, सोबतच भयंकर बडवली सुद्धा जात होती.
शेवटी गर्दीतील काही महिलांनी तिचे हाल पाहून तिथे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तर त्या महिलांना सुद्धा भलताच बोल पडला.
" दोन पोरांची आई आहे हि. आणि रोजच्या रोज अशी फुल पिऊन घरी येतीय ती. काय करावं आमच्या पोरानी..? तुम्हाला येवढा पुळका येत असेल तर तुमच्या घरी घेऊन जावा तिला..! "

या वाक्क्यापुढे कोण आणि काय बोलणार..? शेवटी, सगळ्यांनी मिळून त्यांना समज दिली. तिला तुम्हाला जे काय मारायचं असेल, ते तुमच्या घरी नेवून मारा. रस्त्यावर कशाला तमाशा करताय..?
तेंव्हा कुठे, त्यांची भांडणं थोडावेळ थांबली. आणि, सगळे जिकडे तिकडे झाले.
माणूस दारू प्यायला, तर त्याला सगळं माफ असतं.
आणि..
बाई दारू प्यायली, तर त आपल्यामध्ये ते पाप असतं..! "
आजवर कोणत्याच व्यक्तीला, तो दारू प्यायला आहे म्हणून इतकं बडवलेलं मी पाहिलं नाहीये. आता.. त्या महिलेला, दारूचं व्यसन का आणि कोणामुळे जडलं असावं..? ते त्या बिचारीलाच ठावुक. पण आपल्या देशात, तळागाळातील महिलांना या असल्या गोष्टींची बिलकुल मान्यता नाहीये. उच्चभ्रूंसाठी.. महिलांनी दारू पिणं, हि अगदी किरकोळ बाब आहे. परंतु.. काहीही झालं तरी, तळागाळातील स्त्री हि अजून बंदिनीच आहे. हे सगळं लिहिण्यामागे, महिलांनी मदिरा प्राशन करावी. असा माझा मुळीच हेतू नाहीये. परंतु,समान नागरी कायदा किंवा महिलांना पन्नास टक्के आरक्षण, ह्या फक्त कागदोपत्रीच्या गोष्टी आहेत. याची, पुन्हा एकदा मला प्रकर्षाने जाणीव झाली.

Monday, 4 April 2016

थोडाथोडका काळ नव्हे, 
तर..तब्बल तीस वर्षांनी, काल आम्ही एकत्र आलो होतो..!

१९८७ साली, दहावीची परीक्षा दिल्यानंतर, सगळे मित्र जिकडे तिकडे झाले होते. हाताच्या ओंजळीत असणारी मोत्यांची रास, हवेत उधळून द्यावी. त्याप्रमाणे, सगळे मित्र इतस्तः विखरून गेले होते. अगदी, बोटावर मोजण्या इतपत मित्रच एकमेकांच्या संपर्कात होते. 
कोणी कॉलेज करत होतं, तर कोणी गावी निघून गेलं होतं. तर कोणी माझ्यासारखे " रिपिटर " मित्र, पंढरपूरच्या वाऱ्या करत होते.

कालांतराने.. प्रत्येकाचं शिक्षण पूर्ण झालं, तर कोणी ते अर्ध्यावर सोडलं. त्यानंतर, पोटाची खळगी भरण्यासाठी नोकऱ्या कराव्या लागल्या, जो तो मित्र आपापल्यापरीने संसाररूपी चक्रामध्ये पुरता अडकून गेला होता. नाही म्हणता, वयाप्रमाणे सगळ्यांची मुलं आता हाताला आली आहेत. काही नाही तर, बऱ्यापैकी जाणती तरी झाली आहेत.
संसारातून थोडसं बाहेर डोकावू असं वाटत असताना. प्रत्येकाला, आपल्या बालपणीच्या शालेय मित्रांची आठवण होत होती. पण, ते सगळं जुळवून कसं आणायचं..? हा फार मोठा प्रश्न, प्रत्येकाच्या मनामध्ये दडला होता. परंतु ते शिवधनुष्य, आमच्यापैकी दोन मित्रांनी अगदी लीलया पेललं. त्या दोन मित्रांनी, उराशी जिद्द बाळगून हा सगळा मित्रपरिवार एकत्र आणण्याचं कसब पणाला लावलं. आणि, शेवटी तो दिवस उजाडला..

" कोण, कुठला, काय आणि कसा.. कोणाची कोणाला खबरबात नाही. पण एका घट्ट साखळीने आम्ही सगळे जखडलो गेलो होतो. ते प्रेम होतं, तो जिव्हाळा होता. कोणत्याही नात्यात गुंफता न येणा

रा तो प्रेमाचा उमाळा होता..! "

छोटेसे बहिण भाऊ, उद्याला मोठाले होऊ. ह्या गीतांच्या ओळीप्रमाणे, आमच्या पैकी बरेच मित्र आज फारच उच्च पदाला पोहोचले आहेत. कोणी प्रोफेसर आहे, तर कोणी मेनेजर आहे तर काही माझ्यासारखे सरकारी कर्मचारी आहेत. तर काही मित्रांचे स्वतःचे व्यवसाय आहेत.
लहानपणी हाफ चड्डीवर फिरणारे आम्ही मित्र. कैकवेळा.. आमच्या त्या हाफ चड्डीला सुद्धा, पाठीमागून दोन मोठमोठी ठीगळं असायची. लाज नाही, कि कोणाची भीडभाड नाही. पण आज तीच मुलं, लहानाची मोठी होत असताना. सुटाबुटात आणि उंची कार घेऊन एकमेकांच्या भेटीला आलेले पाहून. माझा उर तर अगदी आनंदाने भरून आला होता.

तीस वर्षात जग फार बदलून गेलं होतं. आमच्यापैकी कैक मित्र, अकालीच काळाच्या पडद्याआड निघून गेले होते. ती पोकळी मात्र प्रकर्षाने जाणवत होती.
एकमेकांच्या ओळखी करून घेत असताना. काही मित्रांना एकमेकांना ओळखायला फारच कष्ट पडत होते. कारण, कोणी जाड झाला होता. तर कोणी माझ्यासारखा टक्कल ग्रस्थ झाला होता. तर कोणी जाड असणारा अगदी लुकडा होऊन बसला होता.

आमच्यापैकी बरेच मित्र आज उच्चपदस्थ जरी असले. तरी त्याचा, कोणालाही गर्व असा झालेला आढळला नाही. हि फार मोठी जमेची बाजू होती. पुन्हा एकदा नव्याने ओळखी पाळखी झाल्यानंतर, जुन्या आठवणीत रममाण होत. एकमेकांची साथ कधीही न सोडण्याचा संकल्प करत. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. थोड्याच दिवसात, फक्त एकमेकांची नाळ घट्ट जोडली जावी ह्या उद्देशाने. सर्व मित्रांनी मिळून एका समुद्र सफरीचं नियोजन केल आहे.

पुन्हा तेच जुने दिवस अनुभवायला मिळणार. पुन्हा आम्ही तीस वर्षांनी लहान होणार. हरवलेलं बालपण पुन्हा एकदा अनुभवणार. एकमेकांशी पुन्हा तीच दंगामस्ती घालणार. आणि, खूप सारी मज्जा करणार..

पुन्हा एकदा, आम्ही लहान होणार...!

Sunday, 3 April 2016


मी, व्हाट्सअप वर नसल्यान कारणाने..
माझे काही हौशी मित्र, त्यावर नव्याने आलेल्या काही नवनवीन चित्रविचित्र व्हिडियो क्लिप्स मला हमखास दाखवत असतात. काल सुद्धा, मला एका मित्राने अशीच एक व्हिडियो क्लिप दाखवली.
एका बाईला.. तिच्या दोन्ही हाताच्या मनगटाला एकत्र बांधून. खांबाच्या वरील बाजूस, घंटा लटकावावी तसं तिला लटकावून ठेवलं होतं. नशीब, तिचे दोन्ही पाय तरी जमिनीवर टेकत होते. आणि सोबतच, तशाच पद्धतीने एका पुरुषाला सुद्धा बांधून ठेवलं होतं.
आणि.. एक चिडलेला व्यक्ती, रागारागाने प्लास्टिकच्या पाईपने त्या दोघांना यथेच्छ झोडत होता. मारहाण होत असताना, तो मार खाणारा पुरुष जास्ती आरडाओरडा किंवा प्रतिकार करत नव्हता. परंतु, त्या महिलेला तो मार काही सहन होत नव्हता.
हा नेमका काय प्रकार असावा..? ते मला कळत नव्हतं. पण त्या बाईचा आक्रोश मला पाहवत नव्हता. नंतर कळालं, कि त्या महिलेला व पुरुषाला तिच्या नवऱ्याने "प्रणय क्रीडा" करताना रंगेहात पकडलं होतं. त्यामुळे.. शिक्षा म्हणून, तो व्यक्ती त्या दोघांना गुरासारखा बडवत होता. आणि, त्यांच्या आसपास असणारे लोक सताड उघड्या डोळ्याने हा तमाशा पाहत उभे होते.
समोरील मारहाणीचं दृश्य, आणि त्या बाईचा हंबरडा माझं काळीज पिळवटून टाकत होता.
चुकली असेल बिचारी,
परंतु.. त्यापाठीमागे सुद्धा काही ठोस कारणं नक्कीच असतील.
पुरुषाने शेन खाल्लं तर चालून जातं. बाईने मात्र.. असले, तसले, भलते, सलते नाद करायचेच नाहीत. असा आपल्याकडे अलिखित नियम किंवा दंडकच आहे म्हणा. त्यानंतर.. मी हे सुद्धा ऐकलं, कि हि क्लिप एका मराठी वाहिन्यावरील बातम्यांना सुद्धा दाखवली गेली होती. आणि त्यानंतर, त्या मारेकऱ्याला अटक सुद्धा झाली होती.
येवढा मोठा, सगळ्या गावभर तमाशा करून त्या व्यक्तीने काय मिळवलं..? स्वतःच्या जीवाला त्रास, त्या बाईला पुरुषाला मारझोड करण्याचा त्रास, समाजामध्ये स्वतःच्या नावाची नाचक्की. आणि एवढं सगळं करून हाती काय मिळालं. तर, कायदा हातात घेतल्यामुळे खुद्द स्वतःलाच जेलची वारी. हे कुठेतरी थांबायला हवं आहे. सामोपचाराने सुद्धा काही गुंते सुटू शकतात.
ह्या प्रकरणावरून.. मी ऐकलेला, एक रंजक किस्सा मला आठवतोय. तो मी तुमच्यासमोर प्रस्तुत करीत आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी, ग्रामीण भागातून एक जोडपं आमच्या येथील भागात राहायला आलं होतं. नवरा बायको, त्यांची दोन लहान मुलं. आणि त्या व्यक्तीचा लहान भाऊ. एकंदरीत काहीसा असा त्यांचा फौजफाटा होता. ते सगळे मिळून, कष्ट करून गुण्यागोविंदाने राहात होते. दहा बाय बाराच्या रूममध्ये यांचं सुंदर विश्व सामावलं होतं.
एके दिवशी, उडत-उडत आमच्या कानावर एक बातमी आली. कि.. त्या बाईचं, तिच्या घरातीलच छोट्या दिराबरोबर काहीतरी 'झेंगट' आहे. काय असेल ते असेल, पण अशा गोष्टी बिलकुल लपून राहतच नाहीट. पण, हे सगळं समजून आम्ही तरी काय करणार होतो..?
हा सगळा प्रकार, घरातील त्या प्रमुख व्यक्तीला सांगावा. तर, त्यांच्या घरात फार मोठ्ठा वाद होणार हे ठरलेलं होतं. शेवटी, आम्ही सुद्धा त्या गोष्टीकडे कानाडोळा केला.
" करतलो तो भोगतलो " ह्या तत्वावर, आम्ही तो विषय तिथेच सोडून दिला..
कालांतराने.. हि कुणकुण, आता त्या बाईच्या नवऱ्याला सुद्धा लागली होती. पण त्याची भूमिका बाकी, अगदी ताठर होती. " हाताची घडी आणि तोंडावर बोट..! " त्याने, पक्कं वेड्याचं सोंग वठवलं होतं. आम्हाला तर काहीच कळायला मार्ग नव्हता. हे सगळं घडतंय कि घडवलं जातंय हेच मुळी कळायला तयार नव्हतं. आणि, एके दिवशी..
नेहेमीप्रमाणे, जेवणाची शिदोरी घेऊन त्या बाईचा नवरा सकाळ पाळीला कामावर निघून गेला. तिच्या दिराला ( याराला ) दुपार पाळी असल्याने, तो घरातच पसरला होता. सकाळची धामधूम संपली, नाश्ता पाणी उरकलं. बघता-बघता सूर्यनारायण डोक्यावर आला, दुपारची जेवणं आटोपली. दुपारची वेळ, उन्हाचा तडाखा वातवरण अगदी भयंकर तापलं होतं. त्याचबरोबर, घरातील वातावरण सुद्धा 'मस्त' तयार झालं होतं. काही वेळाने, आजूबाजूचा कानोसा घेऊन वामकुक्षीच्या बहाण्याची संधी साधून. यांच्या घराची आतून कडी लागली.
आतमध्ये, सावळा गोंधळ सुरु झाला. कामवासनेने पछाडलेले दोन नग्न देह एकमेकात गुरफटून पडले होते. तसं पाहायला गेलं तर, हा रोजचाच प्रकार होता. पण, चार भिंतींच्या आत..
परंतु.. आज काहीतरी आक्रीत घडणार होतं. कामावर म्हणून गेलेला हा गडी. आसपास बाजूलाच कुठेतरी दडी मारून यांच्या पाळतीवर बसला होता. त्याची, या दोघांवर अगदी करडी नजर होती.
आणि, दरवाजाची कडी लागल्यानंतर. थोड्यावेळाने, कानोसा घेत हा घरापाशी गेला.
घराच्या भिंतीला खेटून उभ्या असलेल्या सायकलवर चढून, त्याने खिडकीच्या झडपेतून आतील बाजूस डोकावलं. आतमध्ये, " धुमधडाका " चालू होता. ते दोघेही, आपल्या 'कामात' मश्गुल होते. आणि अचानक, त्या लोखंडी गजाच्या लाकडी झडपेतून याने त्या दोघांना आवाज दिला. तसे, ते दोघेही चपापले. त्या दोघांनीही विवस्त्र अवस्थेत, स्वतःला लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला. पण वेळ निघून गेली होती. ते दोघेही रंगेहाथ त्याच्या तावडीत गवसले होते.
झडपेतून पाहत असणाऱ्या नवऱ्याला आणि भावाला पाहून त्या दोघांची पक्की गाळण उडाली होती. शरमेने, त्यांच्या माना खाली झुकल्या होत्या. शेजारीच बाजूच्या बिछान्यावर, ती दोन लहान मुलं शांत निजली होती. त्यांना बाकी ह्या गोष्टीची काहीच गंधवार्ता नव्हती..
त्या दोघांना रंगेहात पकडून, तो व्यक्ती दरवाजात तसाच उभा होता. थोड्यावेळाने, घराचा दरवाजा उघडला गेला. विषय इभ्रतीचा आणि त्याचबरोबर चारित्र्याचा सुद्धा होता.
आता.. तुंबळ हाणामारीला सुरवात होणार होती. परंतु, तो गृहस्थ फारच संयमी निघाला. त्याने, हाताच्या मुठी आवळून सगळा राग आपल्या पोटात गिळला होता. काळजावर दगड ठेवून, त्याने त्या दोघांना हात जोडून विनंती केली.
हे बघा, तुम्हा दोघांचं फारच प्रेम जडलं आहे. एक काम करा, तुम्ही दोघं त्या मुलांना घेऊन इथून चालते व्हा. कुठेतरी लांब जाऊन, सुखाचा संसार करा.
आणि, मला मोकळं करा..!
वाद नाही, झंजट नाही, जगाला तमाशा नाही.
आज.. ते दीर, वहिनी आणि ती दोन मुलं नवरा बायको सारखे सुखाने नांदत आहेत. आणि, ह्या नवरा म्हणवणाऱ्या गड्याने नवीन मुलीशी लग्न करून आपला संसार मार्गी लावला आहे.
प्रत्येक गोष्टीला तोडगा असतो. फक्त डोकं शांत ठेवून परिस्थिती हाताळता आली पाहिजे.
परंतु, प्रत्येक व्यक्ती इतका संयमी सुद्धा असू शकेल. असं सांगता येत नाही. हि घटना म्हणजे, अगदी लाखात एक उदाहरण झालं.
नाहीतर, त्या ठिकाणी रागाच्या भरात एखादा मुडदा तरी नक्कीच पडला असता. ती बाई किंवा तो पुरुष यमसदनी धाडला गेला असता. ती दोन्ही लेकरं अनाथ झाली असती. आणि, हा बाबा जन्मठेपेची शिक्षा भोगायला निघून गेला असता. क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं.
पण असं काहीच घडलं नाही. सगळं काही अगदी गुण्यागोविंदाने आणि पूर्वी सारखंच चालू आहे. होणाऱ्या घटनेला कोणी टाळू शकत नसतं.
परंतु, दुसऱ्याने केलेल्या चुकीची शिक्षा आपण का भोगावी..? हि गोष्ट प्रत्येक पिडीत व्यक्तीने ध्यानात ठेवणं फार जरुरी आहे. अशा वेळी, संयम बाळगणं फार महत्वाचं असतं..! 

Saturday, 2 April 2016

माझ्या सोबत काम करत असणाऱ्या, माझ्या बहुतांशी मित्रांना..
मी असं काही बाही लेखन वगैरे करत असतो. किंवा, माझे लेख दैनिक वर्तमानपत्रात वगैरे येत असतात. किंवा, मी लोकांना काही छोट्यामोठ्या मौलिक गोष्टी शिकवत असतो.
हे, जास्ती करून कोणाला माहित नाहीये.
आणि, हे मी.. कोणाला सांगून सुद्धा त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये.
कारण, त्यांच्या लेखी मी फक्त एक 'ड्रायव्हर' आहे. आणि, त्यांना माझ्या हे लेख लिहिण्याचं वगैरे कळालं. तर माझे ते मित्र, मला असं म्हणायला सुद्धा कमी नाही करणार..
ते.. लेख म्हणजे, नेमकं काय असतंय..?
आणि, माझ्यामते हे सगळं अगदी बरोबर सुद्धा आहे. खरं पाहायला गेलं तर, ह्या अनाडी मित्र वर्गाकडून मला बरच काही शिकायला आणि लिहायला सुद्धा मिळालं आहे. हे मी, कदापि विसरू शकत नाही. त्यामुळे, माझा ट्रक चालवत असताना, माझ्या ड्रायव्हर सीट शेजारी असणाऱ्या सीटवर बसणारी हौशी मंडळी. मला नको असलेले विविध विषय सांगून. मला हवं तसं 'चावत' असतात. आणि मी सुद्धा, अगदी हौसेने त्यांचे ते चावे सहन करत असतो.
कित्तेक वर्षांपूर्वी, मी चगळून फेकलेले तेच रटाळ विनोद. मला, त्यांच्याकरवी नव्याने ऐकवले जातात. तर बरेचदा, जुन्याच माहित्या ते नव्याने माझ्या माथी मारत असतात.
त्यांच्या लेखी,
" ह्याला कुठे हे सगळं माहिती असणार आहे..! मी सांगतोय म्हणून, याला थोडीफार माहिती होत असावी..! "
अशा अविर्भावात, ते मला जुन्या पुराण्या रटाळ गोष्टी ऐकवत असतात. आणि, मी सुद्धा कंटाळा न करता ते सगळं काही आनंदाने ऐकत असतो. आणि बक्षीस म्हणून, वरती त्यांचं हे बोलनं सुद्धा मी ऐकून घेतो बरं का.
" मग, कशी हे आपल्या कडं माहिती..! "
मी सुद्धा.. अगदी नवखा आणि लाचार असल्या सारखा, ते सगळं काही ऐकत असतो. त्यामुळे, त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्याचं मनोबल वाढल्याची खात्री होत असते.
तर.. काल गाडी चालवत असताना माझ्या शेजारी बसलेला एक जन मला म्हणाला..
तुम्हाला माहिती हे का.. त्या छगन भुजबळ कडं, पन्नास 'बोटी' सापडल्या..!
हि नवीन बातमी ऐकून, मी मला स्वतःलाच दोष देऊ लागलो. पंडिता.. किती मागे आहेस रे तू.
हा छगन, चक्क बोटीच्या व्यवसायात सुद्धा उतरला होता. हे सुद्धा तुला ठाऊक नसावं..!
आणि, त्याचं हे वक्तव्य ऐकून..
माझं मन, क्षणार्धात सगळ्या समुद्र्भर घिरट्या घालून आलं. समुद्रात फिरणारे छगनरावांचे मोठमोठाले ट्रोलर माझ्या नजरेसमोरून मोठमोठे भोंगे वाजवत निघून जात होते. मासेमारीचा, आणि खनिज संपत्तीचा त्याचा भलामोठा व्यवसाय माझ्या नजरेसमोर सर्रकन तरळून गेला.
आणि.. शुद्धीवर यावं तसं, एकदम मी त्या स्वप्नातुन सत्यात प्रवेशित झालो. तोवर, तो माझ्याकडे तोंडाचा 'आ' वासून पाहत होता.
बहुतेक.. तो त्याच्या मनामध्ये म्हणत असावा. आयला, ऐकुन घाबरला वाटतं ह्यो गडी..
आणि.. झटकन मी त्या मित्राला म्हणालो..
त्याच्या पन्नास बोटी होत्या. आणि, आजवर ते कोणालाच कसं कळालं नाही..?
त्यावर, माझा तो विद्वान मित्र मला म्हणाला..
" आहो.. बोटी नाही, पन्नास कोटी म्हणालो मी..! "
तसं पाहायला गेलं तर, छगनरावांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. पण हा बिचारा अजून फक्त पन्नास कोटीमध्येच अडकून पडला होता..
हान तिच्या मारी..
त्यावेळी मी असला भयंकर वैतागलो होतो ना, अगदी स्वतःवरच.
पण.. मज्जा येते राव..!