Sunday, 10 April 2016

कारवार भटकंती, ( भाग :- तीन )
====================
कारवार, गोवा किंवा समुद्रकिनारा हा माझा फार मोठा विक पोईंट आहे. परंतु, या खेपेला मला समुद्रातील खाऱ्या पाण्याला अंगावर झेलायची हौस काही भागवता आली नाही. कारवार मधील समुद्रकिनारी, नव्याने उभारलेला मच्छी बाजार. थोडा ऐसपैसच वाटत होता. कारवार शहराच्या मध्यवस्ती मध्ये असणाऱ्या जुन्या मच्छी बाजारात. कमी जागेमध्ये, फार मोठा चिवचिवाट चालू असायचा. तो मात्र मला इथे ऐकायला मिळाला नाही. बाजारात फिरत असताना अधूनमधून समुद्राची सुंदरशी गाज तेवढी ऐकू येत होती.
त्याच कोळीणी, पण ह्या नवीन जागेमध्ये मला त्या सुद्धा अगदी नवीन आणि फ्रेश वाटत होत्या



. बाजारात हौस म्हणून फोटो काढत फिरत असताना..
यावेळी सुद्धा, त्या कोळणी महिलांचं पुन्हा तेच बोलनं मला ऐकावं लागलं.

" ओगीत फोटो किद्या खाट्टा... थोडे नुस्ते घे रे विकत..! " ( नुसता फोटो काय काढतोस रे. काहीतरी विकत पण घे ना. )
आणि, त्यावर माझं सुद्धा ठरलेलं तेच उत्तर..
" हय गॉ, घेता हाव नुस्ते... तू ते नुस्ते माका तुगेल्या घरात कन्न घालतले..??? " ( हो, हो घेतो मी मासे. पण ते, मला तुझ्या घरी बनवून देणार का..? )
माझ्या ह्या उत्तरावर, त्या कोळणी सुद्धा खळखळून हसल्या. आणि..
" अमृत हॉटेलात वच, थय तुका जाय ते मेळतले..! " ( अमृत हॉटेलमध्ये जा तुला तिकडे सगळं काही मिळेल..! ) हे प्रतिउत्तर सुद्धा मला ऐकायला मिळालं.
मच्छी बाजारातील भटकंती मला फार आवडते. माशांचा ओशट वास, घासाघीस करून मासे खरेदी करणारे ग्राहक, विजेच्या चपळाईने मासे सोलून त्याचे सुरेख तुकडे करणाऱ्या त्या कोळणी, हे सगळं पाहणं म्हणजे माझ्यासाठी ती एक फार मोठी पर्वणीच असते. यावर्षी मच्छी बाजारात मला एक वेगळ्याच प्रकारचा मासा पाहायला मिळाला. त्याचं नाव " मूळगिरी " मासा. गोल चेंडूला चहुबाजूने काटे खोचल्या सारखा हा माशाचा प्रकार दिसायला जरी विचित्र असला. तरी चवीला मात्र झकास असणार आहे. त्यात काडीमात्र शंका नाही. जास्ती खोलात चौकशी केली असता समजलं. कि या माश्याच्या टोकदार काट्यांचा काही कालावधी आणि प्रक्रीये नंतर पाटीवरील पेन्सिल सारखा सुद्धा वापर केला जातो. आता, ह्या गोष्टीत किती सत्यता आहे. ते त्या कोळणीनीलाच माहिती. निसर्गाने आपल्याला खूप काही दिलं आहे. परंतु.. ते पाहायला आणि समजायला आपल्याकडे तेवढी कुशाग्र बुद्धी मात्र नक्कीच असायला हवी..
क्रमशः 

No comments:

Post a Comment