Thursday, 21 April 2016

काय गं.. काय, करतेयस " हनी "
बरेच दिवस झाले, तुला पत्रच लिहिलं नाही...!
परंतु आज मात्र, तुझी आठवण काही जाता जात नाहीये. बघ ना, हि रात्र कशी उरावर बसलीये माझ्या. तुला आठवतंय का गं, उन्हाळ्यात.. उकाड्याने आपल्या दोघांची खूप घालमेल व्हायची. त्यावेळी, घराच्या छतावर रात्र-रात्र गप्पा मारण्यात कशा निघून जायच्या, काही कळायचंच नाही.
तू हळुवारपणे, माझ्या केसांना जास्वंदीचं तेल लाऊन द्यायचीस. मी, नको-नको म्हणत असताना सुद्धा माझे हात पाय चेपून द्यायचीस. माझ्या पायाच्या तळव्यांना, थंड पाण्याने पुसून घ्यायचीस..
आणि, हे सगळं कशाला करत असतेस. मला सवय लागेल ना याची..!
असं म्हंटल्यावर, लाडीकपणे म्हणायचीस.
जाऊदेत.. कोणीतरी प्रेमाने काही तरी करतंय. याचं, कौतुकच नसतं कोणाला. आणि, त्या गोडगुलाबी रुसव्या फुगव्यात. शेवटी, घड्याळात पहाटेचा दोन तीनचा ठोका ऐकून आपण मुकाट घरात येऊन झोपी जायचो.
आता, मी आपल्या घरात एसी बसवून घेतला आहे, बिलकुल उखाडा जाणवत नाही. पण, तुझी सोबत नाहीये गं. त्या, गोडगुलाबी गप्पा नाहीयेत. तो मंद धुंद रातराणीचा सहवास नाहीये. टिपूर चांदण्यात, तुझ्या गोऱ्या चेहऱ्याची तेजी काही निराळीच भासायची मला. आता ते काहीच उरलं नाहीये.
रात्रीचं जागणं कधीचा विसरून गेलोय मी.
आता, मोबाईलचा गजर सकाळ झाल्याचं कळवत असतो मला.
पण.. तुझं ते रोज सकाळी हळुवारपणे माझ्या केसात हात गुंफून, अहो उठा ना..! म्हणनं,
त्याची सर कशालाच नाहीये गं. तुला आठवतंय ना गं, शी.. मी पण ना,
सारखं.. तुला आठवतंय ना, तुला आठवतंय ना..म्हणून, पुन्हा-पुन्हा तेच विचारतोय. मला माहित आहे. तू तरी, हे सगळं कशी विसरशील गं..!
कोणालाही न सांगता, लग्न करायचा गुपचूप निर्णय घेतला होता आपण. माझ्या खिशात एक छदाम सुद्धा नव्हती. आणि, तू तर चक्क लखलखीत सोन्याचं मंगळसूत्र घेऊन आली होतीस. किती हौस होती गं तुला लग्न करायची. माझं मेलं लक्षण खोटं,
थांब.. माझी जरा सेटलमेंट होऊदेत..!
हाच घोषा चालू होता माझा. तू बाई मोठ्या धीराची, राजमहाल सोडून दहा बाय बाराच्या खोलीमध्ये माझ्यासोबत राहायची तयारी दाखवलीस.
नेमकं काय पाहिलं होतंस गं तू माझ्यामध्ये..? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र माळत असताना. अचानक, तुझे डोळे पाणावले होते. मला वाटलं, तू घाबरलीस कि काय. पण, अग्नीच्या सात फेऱ्या मारताना तू माझा हात घट्ट धरून माझ्या पुढे चालत होतीस. त्यावेळी, कदाचित तो अग्नी सुद्धा तुझ्यासमोर लाजला असावा. किती मोठ्ठं धाडस होतं गं तुझ्या अंगी. मी तुझ्या रंगाचा ना अंगाचा, कशामुळे भाळली होतीस गं तू माझ्यावर..?
जाऊदेत.. मी पण ना, नेहेमी-नेहेमी तुला तेच विचारात असतो. आणि, मला सुद्धा पुन्हा-पुन्हा तुझं तेच ऐकायची सवय झाली आहे. " काही नाही रे, माझ्या वेड्या राजा..! "
खरच, वेडा होतो का गं मी..? कि, तुलाच तसं वाटत होतं. कि, तूच मला वेडं केलं होतंस..?
मला तर, काहीच आठवत नाही बघ. हो.. पण तुझ्या प्रेमात मी ठार वेडा झालो होतो. हे फक्त, मी माझं स्वतःलाच सांगितलं आहे. चक्क.. तुझ्यापासून सुद्धा हे दडवून ठेवलं होतं मी.
तू मोठ्या घरची पोर, काही नाही तर, तुला स्वतःच्या आपल्या हक्काच्या घराची फार आवड होती. पण त्याकरिता, तुला कोणाची मदत नको होती. तुझा लाखोपती बाप, तुझ्या आणि माझ्यासाठी लाल पायघड्या घालायला तयार होता. पण, तू सुद्धा स्वाभिमानी. त्याचीच मुलगी ना. ते सगळे गुण, तुझ्या रक्तात सुद्धा उतरले होते. मीच तुला म्हणालो होतो..
" ते म्हणतायेत तर.. आपण त्यांची थोडी मदत घेऊयात ना..! "
बस्स sssss माझ्या, ह्या एका वाक्यामुळे चक्क महिनाभर तू माझ्याशी अबोला धरला होतास. शेवटी हात जोडून, मी माफी मागितल्यावर तू स्वतःला त्रास करून घेतला होतास.
कोठून शिकली होतीस गं तू हे..?
तुझा तर, मला निव्वळ छंदच जडला होता. मी, हौसेने त्याला 'व्यसन' म्हणायचो. आणि त्यासरशी तुझ्या गालावर लालसर लाली चढायची. त्यावेळी, किती गोड लाजरी होतीस गं तू..
तुझ्या सहवासामुळे मी कष्ट सोसले, पण तुझ्या मनोबलामुळे आपलं घर सुद्धा झालं.
त्या.. छोट्याशा वन बी एच के मध्ये, पहिलं पावूल ठेवताना.. तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते.
मी कुठेही चुकले नाही, याची ती साक्ष होती.
त्यादिवशी, कोणीच नव्हतं ना गं आपल्या बरोबर..!
शेवटी, तूच निर्णय घेतलास.. आपल्या घरात, तिसरं माणूस सुद्धा यायला हवं.
खरं सांगतो, त्या क्षणी मी किती मोहोरून गेलो होतो. तो दिवस, माझ्यासाठी खरी मधुचंद्राची रात्र घेऊन आला होता..
जाऊदेत.. पुन्हा, तुला तो प्रणय प्रसंग आठवतोय कि नाही. असं मी मुळीच विचारणार नाही. हे सगळं वाचताना, गोडशी लाजली असशील नाही.. हं, हं लब्बाड..
मीच वेडा कुठला.. तू तर सगळी तयारी करून ठेवली होतीस. अगदी गर्भसंस्काराच्या पुस्तकासाहित. पण तुझं मात्र एकच ठरलेलं.
मी हे पुस्तक आणलंय खरं. पण तुला पाहून मला जी उर्मी येते ती ह्या पुस्तकात नाही रे. आणि एवढं बोलून, तुझी गोडशी घट्ट मिठी मला खूप मोठं स्वर्गसुख देऊन जायची.
पहाटे पाच वाजता, तुला प्रसव कळा जाणवू लागल्या. आपल्याकडे गाडी ना घोडा. खूप सोसलस गं तू. चालतच नेलं मी तुला.. थोडं थोडकं नाही. दिडेक किलोमीटर अंतर होतं गं ते.
आणि.. मी तेंव्हाच ठरवलं.. वेळ काही सांगून येत नाही. आपल्याकडे एखादी कार सुद्धा हवी आहे. असा त्रास पुन्हा नको.
त्यावेळी, डॉक्टर मला ओरडत होते..
किती बेअक्कल आहात तुम्ही. येवढ्या अवघडलेल्या बाईला तुम्ही चक्क चालवत आणलत..?
तरी सुद्धा, तु डॉक्टरांना म्हणत होतीस.
डॉक्टर.. " त्याच्यावर रागावू नका हो. तो जीव आहे माझा..! "
तुझ्या प्रसव वेदना पराकोटीला गेल्या होत्या. घाईघाईने, त्यांनी तुला स्ट्रेचरवर टाकलं. ऑपरेशन थियेटरचा दरवाजा झटकन उघडला, आणि ताबडतोब लावला सुद्धा गेला. दरवाजाबाहेर बंद असणारा लाल दिवा, मला अनाहूत भीती दाखवत होता. तासाभराने, डॉक्टर बाहेर आले..
आणि, माझ्या खांद्यावर हात ठेवून ते निघून गेले.
मला काहीच कळेना, मी आतमध्ये गेलो. तू शांत झोपली होतीस. नर्सच्या हातामध्ये, आपली चिमुरडी होती. तिने, अलगद ती चिमुरडी माझ्या हातामध्ये देताना. तुझ्याकडे पाहत..
शी इज नो मोअर..!
म्हणत, ती तेथून निघून गेली.
का फसवलंस गं मला..? हा अधिकार तुला कोणी दिला..?
आपलं ठरलं होतं ना.. एकमेकांना कधीच अंतर द्यायचं नाही म्हणून. का केलंस तू असं, तू एवढी नाजूक आहेस हे मला कळालं असतं. तर संपूर्ण आयुष्य मी 'वांझोटा' म्हणून साजरं केलं असतं. का फसवलंस गं तू मला..
ए.. तुला माहित नाहीये, पण त्यावेळी मी रडत असताना. ती तान्हुली माझ्याकडे पाहून हसत होती. आणि त्यात, मला तुझी छबी दिसत होती. नियतीने माझी फार मोठी थट्टा चालवली होती.
अरे, हो.. बोलता-बोलता तुला एक सांगायचं विसरूनच गेलो. मी, कार घेतलीय बरं का..! पण अजून, मी तिच्यात बसलो नाही. आणि, कधीही बसणार नाही. मला तू सोबत हवी होतीस गं. नाही बसणार मी. कधीच नाही बसणार...
जाऊदेत.. मी पण ना..!
ए.. पहिले तुझ्या डोळ्यात आलेले अश्रू पूस पाहू. आणि, एकदा गोड हास पाहू, हसलीस ना..
येस्स.. येस्स..धिस इज लाईक अ गुड गर्ल..
तुला माहिती आहे का, आपली चिमुरडी सुद्धा आता डॉक्टर झाली आहे.
हो..हो, गायनेक स्पेशालीस्ट झाली आहे ती. तुझ्यासारखं कोणालाच ती आडू देणार नाही. आणि, अकाली जाऊ सुद्धा देणार नाही. अशी शपतच घेतली आहे तिने.. प्रत्येक गर्भवती मध्ये, आपल्या आईला पाहत असते ती.
पण.. एक गोष्ट तुला माहित आहे का गं, मी आजच तुला हे पत्र का लिहायला घेतलं आहे..?
नाही ना.. तर ऐक,
उद्या, लग्न आहे आपल्या बच्च्याचं. मुलगा फार मोठा सर्जन आहे. हो.. तिनेच निवडलाय त्याला. माझ्यासारखाच गुलाम आहे साला तिचा.. चांगला आहे मुलगा,
तिचे हात एकदाचे पिवळे करतो.. म्हणजे, माझ्या जबादारीतून मी मोकळा झालो. काय करणार, तू तर तुझी जबाबदारी वेळेच्या अगोदरच झटकून मोकळी झालीस ना..
ह्या एकाकी जीवनाला, मी सुद्धा आता फार कांटाळलो आहे गं. तू सुद्धा, आता तिथे एकटीच असशील ना, माझी वाट पाहून खूप ताटकळली असशील नाही.
एवढं एक काम उरकतो, आपल्या बच्च्याला तिच्या मार्गी लावतो. म्हणजे, मी मोकळा झालो, तुझ्याकडे यायला.
ए.. पण मी तुझ्याकडे आल्यावर तू मला ओळखशील ना. कारण, पूर्वी होतो तसा नाही दिसत गं मी आता. थकलोय मी, तुझ्या विरहाने झुरलोय मी..
पण माझं मन सांगतय मला, तू नक्की ओळखशील मला. आणि तितक्याच त्वेषाने आलिंगन सुद्धा देशील मला.
देशील ना.. लवकरच येतोय मी,
तुझाच, लाडका " मून " 

No comments:

Post a Comment