Sunday, 3 April 2016


मी, व्हाट्सअप वर नसल्यान कारणाने..
माझे काही हौशी मित्र, त्यावर नव्याने आलेल्या काही नवनवीन चित्रविचित्र व्हिडियो क्लिप्स मला हमखास दाखवत असतात. काल सुद्धा, मला एका मित्राने अशीच एक व्हिडियो क्लिप दाखवली.
एका बाईला.. तिच्या दोन्ही हाताच्या मनगटाला एकत्र बांधून. खांबाच्या वरील बाजूस, घंटा लटकावावी तसं तिला लटकावून ठेवलं होतं. नशीब, तिचे दोन्ही पाय तरी जमिनीवर टेकत होते. आणि सोबतच, तशाच पद्धतीने एका पुरुषाला सुद्धा बांधून ठेवलं होतं.
आणि.. एक चिडलेला व्यक्ती, रागारागाने प्लास्टिकच्या पाईपने त्या दोघांना यथेच्छ झोडत होता. मारहाण होत असताना, तो मार खाणारा पुरुष जास्ती आरडाओरडा किंवा प्रतिकार करत नव्हता. परंतु, त्या महिलेला तो मार काही सहन होत नव्हता.
हा नेमका काय प्रकार असावा..? ते मला कळत नव्हतं. पण त्या बाईचा आक्रोश मला पाहवत नव्हता. नंतर कळालं, कि त्या महिलेला व पुरुषाला तिच्या नवऱ्याने "प्रणय क्रीडा" करताना रंगेहात पकडलं होतं. त्यामुळे.. शिक्षा म्हणून, तो व्यक्ती त्या दोघांना गुरासारखा बडवत होता. आणि, त्यांच्या आसपास असणारे लोक सताड उघड्या डोळ्याने हा तमाशा पाहत उभे होते.
समोरील मारहाणीचं दृश्य, आणि त्या बाईचा हंबरडा माझं काळीज पिळवटून टाकत होता.
चुकली असेल बिचारी,
परंतु.. त्यापाठीमागे सुद्धा काही ठोस कारणं नक्कीच असतील.
पुरुषाने शेन खाल्लं तर चालून जातं. बाईने मात्र.. असले, तसले, भलते, सलते नाद करायचेच नाहीत. असा आपल्याकडे अलिखित नियम किंवा दंडकच आहे म्हणा. त्यानंतर.. मी हे सुद्धा ऐकलं, कि हि क्लिप एका मराठी वाहिन्यावरील बातम्यांना सुद्धा दाखवली गेली होती. आणि त्यानंतर, त्या मारेकऱ्याला अटक सुद्धा झाली होती.
येवढा मोठा, सगळ्या गावभर तमाशा करून त्या व्यक्तीने काय मिळवलं..? स्वतःच्या जीवाला त्रास, त्या बाईला पुरुषाला मारझोड करण्याचा त्रास, समाजामध्ये स्वतःच्या नावाची नाचक्की. आणि एवढं सगळं करून हाती काय मिळालं. तर, कायदा हातात घेतल्यामुळे खुद्द स्वतःलाच जेलची वारी. हे कुठेतरी थांबायला हवं आहे. सामोपचाराने सुद्धा काही गुंते सुटू शकतात.
ह्या प्रकरणावरून.. मी ऐकलेला, एक रंजक किस्सा मला आठवतोय. तो मी तुमच्यासमोर प्रस्तुत करीत आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी, ग्रामीण भागातून एक जोडपं आमच्या येथील भागात राहायला आलं होतं. नवरा बायको, त्यांची दोन लहान मुलं. आणि त्या व्यक्तीचा लहान भाऊ. एकंदरीत काहीसा असा त्यांचा फौजफाटा होता. ते सगळे मिळून, कष्ट करून गुण्यागोविंदाने राहात होते. दहा बाय बाराच्या रूममध्ये यांचं सुंदर विश्व सामावलं होतं.
एके दिवशी, उडत-उडत आमच्या कानावर एक बातमी आली. कि.. त्या बाईचं, तिच्या घरातीलच छोट्या दिराबरोबर काहीतरी 'झेंगट' आहे. काय असेल ते असेल, पण अशा गोष्टी बिलकुल लपून राहतच नाहीट. पण, हे सगळं समजून आम्ही तरी काय करणार होतो..?
हा सगळा प्रकार, घरातील त्या प्रमुख व्यक्तीला सांगावा. तर, त्यांच्या घरात फार मोठ्ठा वाद होणार हे ठरलेलं होतं. शेवटी, आम्ही सुद्धा त्या गोष्टीकडे कानाडोळा केला.
" करतलो तो भोगतलो " ह्या तत्वावर, आम्ही तो विषय तिथेच सोडून दिला..
कालांतराने.. हि कुणकुण, आता त्या बाईच्या नवऱ्याला सुद्धा लागली होती. पण त्याची भूमिका बाकी, अगदी ताठर होती. " हाताची घडी आणि तोंडावर बोट..! " त्याने, पक्कं वेड्याचं सोंग वठवलं होतं. आम्हाला तर काहीच कळायला मार्ग नव्हता. हे सगळं घडतंय कि घडवलं जातंय हेच मुळी कळायला तयार नव्हतं. आणि, एके दिवशी..
नेहेमीप्रमाणे, जेवणाची शिदोरी घेऊन त्या बाईचा नवरा सकाळ पाळीला कामावर निघून गेला. तिच्या दिराला ( याराला ) दुपार पाळी असल्याने, तो घरातच पसरला होता. सकाळची धामधूम संपली, नाश्ता पाणी उरकलं. बघता-बघता सूर्यनारायण डोक्यावर आला, दुपारची जेवणं आटोपली. दुपारची वेळ, उन्हाचा तडाखा वातवरण अगदी भयंकर तापलं होतं. त्याचबरोबर, घरातील वातावरण सुद्धा 'मस्त' तयार झालं होतं. काही वेळाने, आजूबाजूचा कानोसा घेऊन वामकुक्षीच्या बहाण्याची संधी साधून. यांच्या घराची आतून कडी लागली.
आतमध्ये, सावळा गोंधळ सुरु झाला. कामवासनेने पछाडलेले दोन नग्न देह एकमेकात गुरफटून पडले होते. तसं पाहायला गेलं तर, हा रोजचाच प्रकार होता. पण, चार भिंतींच्या आत..
परंतु.. आज काहीतरी आक्रीत घडणार होतं. कामावर म्हणून गेलेला हा गडी. आसपास बाजूलाच कुठेतरी दडी मारून यांच्या पाळतीवर बसला होता. त्याची, या दोघांवर अगदी करडी नजर होती.
आणि, दरवाजाची कडी लागल्यानंतर. थोड्यावेळाने, कानोसा घेत हा घरापाशी गेला.
घराच्या भिंतीला खेटून उभ्या असलेल्या सायकलवर चढून, त्याने खिडकीच्या झडपेतून आतील बाजूस डोकावलं. आतमध्ये, " धुमधडाका " चालू होता. ते दोघेही, आपल्या 'कामात' मश्गुल होते. आणि अचानक, त्या लोखंडी गजाच्या लाकडी झडपेतून याने त्या दोघांना आवाज दिला. तसे, ते दोघेही चपापले. त्या दोघांनीही विवस्त्र अवस्थेत, स्वतःला लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला. पण वेळ निघून गेली होती. ते दोघेही रंगेहाथ त्याच्या तावडीत गवसले होते.
झडपेतून पाहत असणाऱ्या नवऱ्याला आणि भावाला पाहून त्या दोघांची पक्की गाळण उडाली होती. शरमेने, त्यांच्या माना खाली झुकल्या होत्या. शेजारीच बाजूच्या बिछान्यावर, ती दोन लहान मुलं शांत निजली होती. त्यांना बाकी ह्या गोष्टीची काहीच गंधवार्ता नव्हती..
त्या दोघांना रंगेहात पकडून, तो व्यक्ती दरवाजात तसाच उभा होता. थोड्यावेळाने, घराचा दरवाजा उघडला गेला. विषय इभ्रतीचा आणि त्याचबरोबर चारित्र्याचा सुद्धा होता.
आता.. तुंबळ हाणामारीला सुरवात होणार होती. परंतु, तो गृहस्थ फारच संयमी निघाला. त्याने, हाताच्या मुठी आवळून सगळा राग आपल्या पोटात गिळला होता. काळजावर दगड ठेवून, त्याने त्या दोघांना हात जोडून विनंती केली.
हे बघा, तुम्हा दोघांचं फारच प्रेम जडलं आहे. एक काम करा, तुम्ही दोघं त्या मुलांना घेऊन इथून चालते व्हा. कुठेतरी लांब जाऊन, सुखाचा संसार करा.
आणि, मला मोकळं करा..!
वाद नाही, झंजट नाही, जगाला तमाशा नाही.
आज.. ते दीर, वहिनी आणि ती दोन मुलं नवरा बायको सारखे सुखाने नांदत आहेत. आणि, ह्या नवरा म्हणवणाऱ्या गड्याने नवीन मुलीशी लग्न करून आपला संसार मार्गी लावला आहे.
प्रत्येक गोष्टीला तोडगा असतो. फक्त डोकं शांत ठेवून परिस्थिती हाताळता आली पाहिजे.
परंतु, प्रत्येक व्यक्ती इतका संयमी सुद्धा असू शकेल. असं सांगता येत नाही. हि घटना म्हणजे, अगदी लाखात एक उदाहरण झालं.
नाहीतर, त्या ठिकाणी रागाच्या भरात एखादा मुडदा तरी नक्कीच पडला असता. ती बाई किंवा तो पुरुष यमसदनी धाडला गेला असता. ती दोन्ही लेकरं अनाथ झाली असती. आणि, हा बाबा जन्मठेपेची शिक्षा भोगायला निघून गेला असता. क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं.
पण असं काहीच घडलं नाही. सगळं काही अगदी गुण्यागोविंदाने आणि पूर्वी सारखंच चालू आहे. होणाऱ्या घटनेला कोणी टाळू शकत नसतं.
परंतु, दुसऱ्याने केलेल्या चुकीची शिक्षा आपण का भोगावी..? हि गोष्ट प्रत्येक पिडीत व्यक्तीने ध्यानात ठेवणं फार जरुरी आहे. अशा वेळी, संयम बाळगणं फार महत्वाचं असतं..! 

1 comment:

  1. विचार क्षमता व संयम महत्वाचा!

    ReplyDelete