कही, नजर ला लग जाये...
नजर लागणे.. हा प्रकार, किती खरा आणि किती खोटा आहे. ते मला माहित नाही, पण आमच्या इथे एखाद्या घरातील लहान मुल विनाकारण रडत असेल. आणि, लाख औषधी उपाय करून देखील ते जेंव्हा त्याचं रडणं थांबवत नसायचं. तेंव्हा, त्याला कोणाची तरी नजर लागली असावी..!
असा निष्कर्ष काढला जायचा. मग त्याकरिता, निरनिराळ्या उपाययोजना सुद्धा आल्याच.
माझ्या पाहण्यात आलेल्या काही उपाययोजना पुढीलप्रमाणे.
नजर लागलेल्या त्या संभाव्य लहान मुला-मुलीला मावळत्या बाजूला तोंड करून बसवलं जायचं. आणि.. जाडं मीठ, त्याच्या किंवा तिच्या डोक्यावरून खाली पायाच्या भागापर्यंत हवेतल्या हवेत त्याच्या अंगावरून उतरवून टाकलं जायचं. तर कधी, तांदूळ उतरवून टाकले जायचे. तर कधी, खाऊच्या पानाला एका बाजूला तेल लावून ते उतरवून जळत्या निखाऱ्यावर ठेवलं जायचं. तुरटी उतरवून, तिला चुलीतील निखाऱ्यावर ठेवलं जायचं. तर कधी, साडीचा पदर पाच वेळा उतरवून त्याला गाठ मारून ठेवली जायची.
असे विविध प्रकार, त्यावेळी मला पाहायला मिळाले होते. या गोष्टींमध्ये किती तथ्य होतं. ते मला माहित नाहीये.. पण, हे उतारे केल्यावर बरेचदा त्या लहान मुलाला गुण आलेला मला पाहायला मिळाला होता. त्याच्यामागे, नेमकं कोणतं गुपित दडलेलं असायचं. तो संशोधनाचा विषय ठरवा.
घर, दुकान किंवा अन्य व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आपल्या व्यवसायावर किंवा घरावर कोणाची वाईट, काळी नजर लागू नये. म्हणून, काही मंडळी बऱ्याच उपाययोजना करताना आढळत असतात.
त्यातल्या त्यात.. सगळ्यांना माहित असणारा प्रमुख उपाय म्हणजे..
" लिंबू मिरची..! "
आजकाल.. शनिवारी आणि अमावास्या, पौर्णिमेला चौकाचौकात एका तारेमध्ये किंवा दोर्यामध्ये लिंबू मिरची ओवून त्या विकताना काही मंडळी दिसत असतात. आता, हा लिंबू मिरची दुचाकी किंवा चारचाकी वाहनांना लावल्याने नेमका काय फरक पडत असतो..? ते, मला माहित नाहीये.
पण.. कधी-कधी, हौसेखातर मी सुद्धा हा प्रयोग करत असतो.
त्यापुढे जाऊन काही मंडळी, आपल्या घरामध्ये आढ्याला " कोहळा " सुद्धा बांधत असतात.
असं ऐकिवात आहे. कि, आपल्या घरावर किंवा घरातील मंडळीवर चुकून काही नजरबाधा झाली. तर, हा कोहळा जागेवरच सडून जातो. आपल्या घरावर येणारं ते सगळं संकट त्याकडे आकर्षित होत असतं. अगदी ताजा, आणि बिनडागी कोहोळा सुद्धा काही दिवसातच सडलेल्या अवस्थेत मी पाहिला आहे. नाहीतर, तोच कोहोळा महिनोन्महिने जागचा हालत सुद्धा नाही.
यापाठीमागे.. नेमकं काय शास्त्रीय कारण असावं..? किंवा आणखीन काय गणित असावं. हा संसोधनाचा विषय आहे. पण.. काहीतरी कारण नक्कीच आहे.
हे झालं.. आपल्या महाराष्ट्र किंवा पुण्यापुरता मर्यादित असा तोडगा.
तसा तर.. मी फार फिरस्ता मनुष्य असल्या कारणाने. भारतातील बऱ्याच ठिकाणी माझी पायधूळ मी झाडून आलो आहे. हल्लीच कारवारला गेलो असता. त्या भागामध्ये, प्रत्येक घरावर, दुकानावर आणि काही नारळांच्या आंब्याच्या झाडांवर सुद्धा डोळ्याचं चित्र काढलेलं. किंवा, चौकोनी प्लायवूडवर काढलेलं डोळ्याचं चित्र तिथे लटकावलेलं पाहायला मिळत होतं. अर्थातच, हे सगळं निव्वळ नजर लागू नये. म्हणून केलेली उपाययोजना होती.
परंतु, ह्या विषयावर.. गाढा आणि सखोल अभ्यास करत असताना. मला, भारतातील एका भागामध्ये या विषयाची फारच काटेखोरता पाहायला मिळाली. ते गाव म्हंजे..
" तिरुपती "
तामीळनाडू मधील बालाजी देवस्थानच्या पायथ्याला असणाऱ्या या गावामध्ये. नजर लागू नये म्हणून, त्याकरिता.. नवनवीन क्लुप्त्या लढवताना मला पाहायला मिळाल्या.
रोज संध्याकाळी, लिंबाच्या दोन भकल्या करून त्या लिंबाच्या दोन्ही भागावर कुंकू लावून त्यावर एक कापूर ठेवून त्याला प्रज्वलित करून आपल्या घरावरून किंवा दुकानावरून ओवाळून उंबर्यापाशी ठेवलं जातं. किंवा, फायबर पासून बनवलेल्या राक्षसी चेहेऱ्याला तारा मासा, शंख आणि सोबतच एक विशिष्ट फळ आणि तुरटी अशी गुंतवण करून त्याला दरवाजात अडकवून ठेवलेलं आढळतं. तर कधी. कोहळा, लिंबू मिरची आणि त्याचबरोबर कोरफड सुद्धा घरांमध्ये उलट्या करून बांधलेल्या आढळतात.
अमावास्या असली, कि एक वेगळाच प्रकार त्या भागात केला जातो.
कोहोळ्याला देठाकडील बाजूने ( कलिंगड पिकलेलं किंवा लालभडक आहे कि नाही, ते पाहण्यासाठी एक चौकोनी काप कापला जातो. ) तसा, त्या कोहोळ्याचा एक तुकडा काढला जातो. आणि त्यामध्ये, त्या ठराविक भागातील लालभडक कुंकू त्या पोकळी मध्ये भरलं जातं. आणि, कुंकू भरल्या नंतर. त्या पोकळीत, चाकूने दोनचार वेळा खुपसण करून ते कुंकू त्या आतील गाभ्यात एकजीव केलं जातं. त्यानंतर, तो चौकोनी तुकडा होता त्या जागेवर लाऊन त्या कोहोळ्याला दुकानाच्या किंवा घराच्या उंबर्या समोर जोरात आपटलं जातं.
तो फुटलेला कोहळा जेंव्हा इतस्ततः विखुरला जातो. तेंव्हा, तो अगदी रक्ताळल्या सारखा दिसत असतो. असं केल्याने सुद्धा, वाईट नजरबाधा होत नाही. असा तिथे समज आहे..
ह्या विविध प्रकारच्या उपाययोजना करून, नेमकं काय इप्सित साध्य होत असतं. ते त्यांनाच ठावूक, पण काही मंडळी या गोष्टी अगदी कटाक्षाने पाळत असतात. हा, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. परंतु,
अशा विविध गोष्टी आणि घटनांनी घडलेला माझा भारत देश महान आहे.
No comments:
Post a Comment