Thursday, 7 April 2016

कारवार भटकंती, ( भाग :- एक )
======================
यावर्षी कारवारमध्ये येण्या मागचं मुख्य कारण म्हणजे. त्या भागात सुरु झालेला यात्रेचा हंगाम. आम्ही खास याच गोष्टीचं औचित्य साधून कारवारला गेलो होतो. या हंगामात माझे मित्र, श्री. राहुल नाईक यांच्या गावची सुद्धा यात्रा होती. सालाबादप्रमाणे, यावर्षी सुद्धा सत्तावीस मार्च रोजी कारवार मधील उळगा या गावी श्री निराकार देवाचा वार्षिक जत्रोत्सव होता.
उळगा हे गाव अगदी लहान खेडं आहे. परंतु सगळ्या गोष्टी आणि गरजांनी सुसज्ज आणि परिपूर्ण असं गाव मला पहिल्यांदाच पाहायला मिळालं. गावामागे, निर्मळ खळखळत्या आवाजात वाहणारी काळी नदी. नेत्रांना सुखद अनुभूती देत होती.


जागोजागी असणारी नारळी, आंब्या पोफळीची झाडं. त्या गावाची शोभा वाढवत होती. छोट्याशा गावामध्ये असणारं इंजिनीअरींग कॉलेज आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र पाहून मी तर अगदी चक्रावून गेलो होतो. प्रगतीचा बराच मोठा आलेख या गावाने उंच शिखरावर नेऊन ठेवलेला मला आढळला.

त्या टुमदार गावामध्ये असणारी तुरळक लोकवस्ती. बऱ्याच बंद घरांना असणारी कुलपं त्याची साक्ष देत होती. नोकरी निमित्त, पुण्या मुंबईला गेलेला चाकरमानी अशावेळी आपल्या गावी हमखास आपली हजेरी नोंदवताना आढळत होता. उभ्या उभ्याच थांबून, एकमेकांना त्यांच्या सुमधुर कारवारी भाषेत विचारपूस करताना पाहायला मिळत होतं.
तशी तर या गावातील मंडळी, पूर्वी गोव्यातील काणकोण या गावी वास्तव्याला होते. परंतु, पोर्तुगीज लोकांच्या जुलमाला आणि धर्मांतराला कंटाळून. गोव्यातील बऱ्याच कोकणी बांधवानी आसरा मिळेल त्याठिकाणी जाणं पसंत केलं होतं. तसं पाहायला गेलं तर, या गावातील लोकांचं मूळ कुलदैवत हे गोव्यातील मल्लिकार्जुन आहे. परंतु, गाव आहे तर देव हवाच. या उक्तीप्रमाणे, त्यांनी या नवीन गावामध्ये नवीन देवाची स्थापना केली.
मंदिराच्या गाभाऱ्यात मधोमध असणारी फणसाच्या चौकोनी लाकडापासून बनवलेली हि देवाची मूर्ती निराकार आहे. म्हणजे तिला कोणताच आकार नाहीये. म्हणून ती निराकार, पण हल्ली त्या लाकडाच्या चौकोनी खांबाला देवाचा एक चांदीचा मुखवटा सुद्धा बसवण्यात आला आहे. त्यामुळे, श्रद्धाळूंसाठी ती एक फार मोठी पर्वणी ठरत आहे. यात्रेनिमित्त या छोट्याश्या मंदिराबाहेर, हार फुलांची आणि खाजा नावाच्या कोकणी मिठाईची दोनचार दुकानं थाटलेली पाहायला मिळतात. त्या दोन दिवसात, सगळे चाकरमानी आणि गावकरी अगदी आनंदात न्हाऊन गेलेले असतात.
यात्रेदरम्यान, दरवर्षी अदलून बदलून गावातील प्रत्येक घराला मंदिरातील 'गुरव' होण्याचा मान प्राप्त होत असतो. त्यामुळे, गुरव होणाऱ्या घरात त्यावर्षी फार मोठी जबाबदारी ठरलेली असते. मंदिरातील पूजाअर्चा आणि इतर खर्चांबरोबरच, रात्री करमणूक म्हणून होत असलेल्या नाटक कंपनीचा खर्च सुद्धा हौसेखातर त्यांनाच उचलावा लागत असतो. तसा तर हा ऐच्छिक मामला असतो. तरी सुद्धा, यजमानपद भूषवणारं घर हा खर्च अगदी आनंदाने उचलत असतात. यामध्ये, त्या गावाच्या एकोप्याची फार मोठी साक्ष दडलेली आहे. या निमित्ताने, एका आगळ्या वेगळ्या संस्कृतीचे दर्शन मला याची देहा पाहायला मिळालं.

क्रमशः 

No comments:

Post a Comment